व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्तासारखे आज्ञाधारक व धैर्यवान असा

ख्रिस्तासारखे आज्ञाधारक व धैर्यवान असा

ख्रिस्तासारखे आज्ञाधारक व धैर्यवान असा

“धीर धरा; मी जगाला जिंकले आहे.”—योहा. १६:३३.

१. येशू कोठवर देवाच्या आज्ञेत राहिला?

येशू ख्रिस्त नेहमी देवाच्या इच्छेनुसार चालला. त्याच्या स्वर्गातील पित्याच्या आज्ञेचे उल्लंघन करण्याचा विचारही कधी त्याने आपल्या मनात येऊ दिला नाही. (योहा. ४:३४; इब्री ७:२६) पण, पृथ्वीवर असताना देवाला आज्ञाधारक राहणे त्याला सोपे गेले नाही. येशूच्या प्रचार कार्याच्या सुरुवातीपासूनच, त्याच्या शत्रूंनी, इतकेच काय तर स्वतः सैतानाने देखील त्याला देवाच्या इच्छेच्या विरोधात जाण्यास प्रवृत्त करण्यासाठी त्याचे मन वळवण्याचा, त्याच्यावर दबाव आणण्याचा किंवा त्याची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. (मत्त. ४:१-११; लूक २०:२०-२५) येशूच्या शत्रूंनी त्याला प्रचंड मानसिक व शारीरिक यातना दिल्या. अखेरीस त्यांनी त्याला वधस्तंभावर खिळले. (मत्त. २६:३७, ३८; लूक २२:४४; योहा. १९:१, १७, १८) पण, या सर्व परिस्थितीत आणि तीव्र यातना सहन करूनही येशूने ‘मरणापर्यंत आज्ञापालन केले.’फिलिप्पैकर २:८ वाचा.

२, ३. येशूला यातना सहन कराव्या लागल्या तरीही तो देवाला आज्ञाधारक राहिला यावरून आपण काय शिकू शकतो?

पूर्वी कधीही न अनुभवलेल्या अशा कठीण परिस्थितीत आज्ञाधारक राहण्याचा काय अर्थ होतो, हे मानव या नात्याने पृथ्वीवर राहिल्यानंतरच येशूला शिकायला मिळाले. (इब्री ५:८) पण, त्याने तर कितीतरी युगे यहोवाच्या निकट सहवासात घालवली होती आणि सृष्टीच्या वेळी देवाचा “कुशल कारागीर” म्हणून कार्य केले होते. (नीति. ८:३०) त्यामुळे, यहोवाच्या सेवेत येशूला खरेच नवीन काही शिकण्यासारखे होते का, असे कदाचित आपल्याला वाटेल. पण, मानव या नात्याने स्वतः यातना सहन करून विश्‍वासात टिकून राहिल्याने तो यहोवाला पूर्णपणे एकनिष्ठ होता हे सिद्ध झाले. अशा प्रकारे, येशूचा आपल्या पित्याशी असलेला नातेसंबंध आणखी दृढ झाला. येशूच्या उदाहरणावरून आपण काय शिकू शकतो?

येशू एक परिपूर्ण मनुष्य होता. तरीही, त्याने देवाला पूर्णपणे आज्ञाधारक राहण्याचा स्वतःच्या बळावर प्रयत्न केला नाही. तर, आज्ञाधारक राहण्यास मदत मिळावी म्हणून त्याने देवाला प्रार्थना केली. (इब्री लोकांस ५:७ वाचा.) देवाला आज्ञाधारक राहण्यासाठी आपणही नम्र असले पाहिजे व मदतीसाठी देवाला प्रार्थना केली पाहिजे. म्हणूनच, प्रेषित पौलाने ख्रिश्‍चनांना असा सल्ला दिला: “अशी जी चित्तवृत्ति ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्या ठायीहि असो,” ज्याने ‘मरणापर्यंत आज्ञापालन करून स्वतःला लीन केले.’ (फिलिप्पै. २:५-८) पृथ्वीवरील आपल्या जीवनक्रमातून येशूने हे दाखवून दिले, की दुष्ट लोकांमध्ये राहूनही देवाला आज्ञाधारक राहणे मनुष्यांना शक्य आहे. येशू परिपूर्ण होता हे खरे आहे. पण, अपरिपूर्ण मनुष्यांबद्दल काय म्हणता येईल?

अपरिपूर्ण असूनही आज्ञाधारक राहणे शक्य आहे

४. आपल्याला इच्छास्वातंत्र्यासह निर्माण करण्यात आले आहे याचा काय अर्थ होतो?

देवाने आदाम व हव्वेला बुद्धी व इच्छास्वातंत्र्य देऊन निर्माण केले. त्यांचे वंशज असल्यामुळे आपल्यालाही इच्छास्वातंत्र्याची देणगी मिळाली आहे. याचा काय अर्थ होतो? याचा असा अर्थ होतो की आपण चांगले किंवा वाईट करण्याचे निवडू शकतो. दुसऱ्‍या शब्दांत, देवाच्या आज्ञांचे पालन करावे की नाही हे ठरवणे देवाने आपल्यावर सोडले आहे. पण, एवढ्या मोठ्या स्वातंत्र्यासोबतच आपल्यावर जबाबदारीही येते. नैतिकतेविषयी आपण जे काही निर्णय घेतो त्यांचा परिणाम आपल्याकरता एकतर जीवन किंवा मृत्यू असू शकतो. शिवाय, आपल्या जवळच्या लोकांवरही आपल्या या निर्णयांचा परिणाम होतो.

५. आपल्या सर्वांनाच कोणता संघर्ष करावा लागतो आणि आपण कशा प्रकारे यशस्वी होऊ शकतो?

आदामाकडून मिळालेल्या अपरिपूर्णतेमुळे देवाला आज्ञाधारक राहण्याची प्रवृत्ती उपजतच आपल्यात नसते. त्यामुळे, देवाच्या नियमांचे पालन करणे आपल्याला नेहमीच सोपे जात नाही. पौलासाठी देखील हा एक मोठा संघर्ष होता. त्याने लिहिले: “माझ्या अवयवांत मला निराळाच नियम दिसतो; तो माझ्या मनातल्या नियमाबरोबर लढतो आणि मला कैद करून माझ्या अवयवांतील पापाच्या नियमाच्या स्वाधीन करितो.” (रोम. ७:२३) अर्थात, आयुष्यात सर्वकाही अगदी सुरळीत चाललेले असते म्हणजेच, आपल्याला काही त्याग करावा लागत नाही, त्रास अथवा गैरसोय सहन करावी लागत नाही तेव्हा आज्ञा पाळणे सोपे असते. पण, “देहाची वासना, डोळ्यांची वासना,” देवाला आज्ञाधारक राहण्याच्या आपल्या इच्छेच्या आड येते तेव्हा आपण कसे वागतो? या वाईट इच्छा आपल्या अपरिपूर्णतेमुळे, तसेच आपल्या सभोवती असलेल्या ‘जगाच्या आत्म्यापासून’ उत्पन्‍न होतात आणि त्या अतिशय प्रबळ असतात. (१ योहा. २:१६; १ करिंथ. २:१२) या इच्छांचा प्रतिकार करण्यासाठी, आपल्यावर समस्या किंवा प्रलोभन येण्याअगोदरच आपण आपल्या मनाची तयारी केली पाहिजे आणि काहीही झाले तरी यहोवाला आज्ञाधारक राहण्याचा आपल्या ‘अंतःकरणात’ निश्‍चय केला पाहिजे. (स्तो. ७८:८) असा मनःपूर्वक निश्‍चय केल्यामुळे यशस्वी ठरलेल्या अनेकांची उदाहरणे बायबलमध्ये आपल्याला आढळतात.—एज्रा ७:१०; दानी. १:८.

६, ७. वैयक्‍तिक अभ्यासामुळे सुज्ञपणे निर्णय घेण्यास कशा प्रकारे आपल्याला साहाय्य मिळू शकते हे एक उदाहरण देऊन सांगा.

यहोवाला सर्व परिस्थितीत आज्ञाधारक राहण्याचा मनात निश्‍चय करण्याचा एक मार्ग म्हणजे बायबलचा व बायबल आधारित प्रकाशनांचा काळजीपूर्वक अभ्यास करणे. तुम्ही स्वतः खाली दिलेल्या स्थितीत आहात अशी कल्पना करा. समजा आजची संध्याकाळ तुमची वैयक्‍तिक अभ्यासाची संध्याकाळ आहे. बायबलमधून तुम्हाला जे शिकायला मिळेल त्याचा उपयोग करता यावा म्हणून तुम्ही नुकतीच प्रार्थनेत यहोवाच्या आत्म्याची मदत मागितली आहे. उद्या संध्याकाळी टीव्हीवर एक विशिष्ट चित्रपट पाहण्याचे तुम्ही ठरवले आहे. वृत्तपत्रांमध्ये व मासिकांमध्ये या चित्रपटाबद्दल चांगल्या समीक्षा छापून आल्याचे तुमच्या कानावर आले आहे. पण, त्या चित्रपटात काही अनैतिक व हिंसक दृश्‍ये दाखवण्यात आली आहेत हे देखील तुम्हाला माहीत आहे.

इफिसकर ५:३ मध्ये असलेल्या पौलाच्या सल्ल्यावर तुम्ही विचार करता: “पवित्र जनांना शोभते त्याप्रमाणे, जारकर्म, सर्व प्रकारची अशुद्धता व लोभ ह्‍यांचे तुमच्यामध्ये नावसुद्धा निघू नये.” फिलिप्पैकर ४:८ (वाचा.) मध्ये असलेला पौलाचा सल्ला देखील तुम्हाला आठवतो. या देवप्रेरित सल्ल्यावर तुम्ही मनन करता तेव्हा, स्वतःला विचारता, ‘अशा प्रकारचे कार्यक्रम पाहून मी जाणूनबुजून माझे मन आणि अंतःकरण दूषित करण्याचा धोका पत्करला, तर देवाच्या आज्ञांचे काटेकोर पालन करण्याच्या येशूच्या उदाहरणाचे मी अनुसरण करत आहे असे म्हणता येईल का?’ तुम्ही काय कराल? हे सर्व माहीत असूनही तुम्ही तो चित्रपट पाहाल का?

८. आपण उच्च नैतिक व आध्यात्मिक दर्जे का टिकवून ठेवले पाहिजे?

आपण आध्यात्मिक रीत्या दृढ आहोत त्यामुळे वाईट संगती मग ती हिंसक, अनैतिक मनोरंजनाच्या स्वरूपात का असेना आपल्यावर तिचा काहीच परिणाम होणार नाही असा विचार करून आपले नैतिक व आध्यात्मिक दर्जे खाली आणणे चुकीचे ठरेल. त्या उलट, सैतानाच्या कुप्रभावापासून आपण आपले व आपल्या मुलांचे संरक्षण केले पाहिजे. उदाहरणार्थ, काही घातक कॉम्प्यूटर वायरस कॉम्प्यूटरला नुकसान पोचवून माहिती नष्ट करतात, त्याच्या कार्यात अडथळा निर्माण करतात आणि एखाद्या कॉम्प्यूटरचा उपयोग करून इतरांच्या कॉम्प्यूटरलाही नुकसान पोचवू शकतात. म्हणूनच, कॉम्प्यूटरचा वापर करणारे अशा घातक वायरसपासून आपल्या कॉम्प्यूटरचे संरक्षण करण्याची खूप काळजी घेतात. तर मग, सैतानाच्या ‘डावपेचांपासून’ स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आपणही तितकीच काळजी घेऊ नये का?—इफिस. ६:११.

९. आपण दररोज यहोवाच्या आज्ञांचे पालन करण्याचा निर्धार का केला पाहिजे?

आपण यहोवाच्या इच्छेनुसार चालणार की नाही हे ठरवण्याचे प्रसंग जवळजवळ दररोजच आपल्यावर येतात. पण, तारण प्राप्त करण्यासाठी आपण देवाच्या आज्ञांचे पालन केले पाहिजे आणि त्याच्या नीतिमान तत्त्वांनुसार जगले पाहिजे. ख्रिस्ताप्रमाणे ‘मरणापर्यंत’ आज्ञाधारक राहून आपण दाखवू शकतो की आपला विश्‍वास खरा आहे. आपण यहोवाला विश्‍वासू राहिल्यास तो आपल्याला त्याचे प्रतिफळ देईल. येशूने असे वचन दिले: “जो शेवटपर्यंत टिकून राहील तोच तरेल.” (मत्त. २४:१३) तर मग हे स्पष्टच आहे की यासाठी आपल्याला येशूप्रमाणे धैर्य दाखवायला शिकावे लागेल.—स्तो. ३१:२४.

येशू—धैर्याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण

१०. आपल्यावर कोणकोणत्या प्रकारचे दबाव येऊ शकतात आणि त्यांच्याप्रती आपली प्रतिक्रिया कशी असली पाहिजे?

१० सैतानाच्या जगातील दूषित करणाऱ्‍या आचार-विचारांचा सतत आपल्यावर भडिमार होत असल्यामुळे त्यांचा प्रतिकार करण्यासाठी आपल्याला धैर्याची गरज आहे. यहोवाच्या नीतिमान मार्गांपासून परावृत्त करू शकणाऱ्‍या नैतिक, सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक दबावांचा ख्रिश्‍चनांना सामना करावा लागतो. अनेकांना कौटुंबिक सदस्यांकडून होणाऱ्‍या विरोधाला तोंड द्यावे लागते. काही देशांत शाळा-कॉलेजमधून उत्क्रांतीवादाचा सिद्धान्त आणखीनच भर देऊन शिकवला जात आहे. आणि अधिकाधिक लोक नास्तिकवादाकडे वळत आहेत. असे दबाव आपल्यावर येत असताना आपण काय करावे? नुसतेच हातावर हात देऊन बसावे का? नाही! तर त्यांचा प्रतिकार करण्यासाठी योग्य पाऊल उचलून स्वतःचे संरक्षण करणे जरुरीचे आहे. यात आपल्याला कशा प्रकारे यश येईल हे येशूच्या उदाहरणावरून आपल्याला दिसते.

११. येशूच्या उदाहरणावर मनन केल्याने कशा प्रकारे आपल्याला आणखी धैर्य मिळू शकते?

११ येशूने आपल्या शिष्यांना असे सांगितले: “जगात तुम्हाला क्लेश होतील, तरी धीर धरा; मी जगाला जिंकले आहे.” (योहा. १६:३३) जगाच्या प्रभावापुढे त्याने कधीही हात टेकले नाहीत. जगातल्या कोणत्याही गोष्टीला त्याने आपल्या प्रचार कार्याच्या आड येऊ दिले नाही किंवा शुद्ध उपासनेसंबंधी व नैतिक आचरणासंबंधी त्याने कधीही तडजोड केली नाही. या सर्व बाबतींत आपण येशूचे अनुकरण केले पाहिजे. येशूने प्रार्थनेत आपल्या शिष्यांबद्दल असे म्हटले: “जसा मी जगाचा नाही तसे तेहि जगाचे नाहीत.” (योहा. १७:१६) ख्रिस्ताच्या धैर्यवान उदाहरणाचे परीक्षण केल्याने व त्यावर मनन केल्याने, सैतानाच्या जगापासून अलिप्त राहण्यास आपल्याला आवश्‍यक असलेले धैर्य प्राप्त होऊ शकते.

येशूच्या धैर्यापासून शिका

१२-१४. येशूने कोणकोणत्या प्रसंगी धैर्य दाखवले होते त्याची काही उदाहरणे द्या.

१२ पृथ्वीवरील आपल्या संबंध सेवाकार्यादरम्यान येशूने उल्लेखनीय धैर्य दाखवले. देवाचा पुत्र या नात्याने त्याला मिळालेल्या अधिकाराचा उपयोग करून तो मंदिरात गेला आणि “मंदिरात जे क्रयविक्रय करीत होते त्या सर्वांना त्याने बाहेर घालवून दिले, सराफांचे चौरंग व कबुतरे विकणाऱ्‍यांच्या बैठकी पालथ्या केल्या.” (मत्त. २१:१२) त्याच्या मृत्यूच्या आदल्या रात्री त्याला अटक करण्यासाठी शिपाई आले तेव्हा तो आपल्या शिष्यांचे संरक्षण करण्यासाठी धैर्याने पुढे होऊन म्हणाला: “तुम्ही मला शोधीत असाल तर ह्‍यांना जाऊ द्या.” (योहा. १८:८) ही घटना घडली त्याच्या काही क्षणांनंतरच त्याने पेत्राला आपली तलवार म्यानात ठेवण्यास सांगितले. यावरून त्याचा भरवसा शस्त्रांवर नव्हे तर यहोवावर होता हे त्याने दाखवून दिले.—योहा. १८:११.

१३ येशूने त्याच्या काळातील निर्दयी खोट्या शिक्षकांचा व त्यांच्या खोट्या शिकवणींचा निर्भयपणे पर्दाफाश केला. त्याने त्यांना म्हटले: “अहो शास्त्र्यांनो, अहो परूश्‍यांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही लोकांना स्वर्गाचे राज्य बंद करिता; . . . आणि नियमशास्त्रातील मुख्य गोष्टी म्हणजे न्याय, दया व विश्‍वास ह्‍या तुम्ही सोडल्या आहेत; . . . तुम्ही ताटवाटी बाहेरून साफ करिता, पण ती आतून जुलूम व असंयम ह्‍यांनी भरलेली आहेत.” (मत्त. २३:१३, २३, २५) हे खोटे धार्मिक पुढारी पुढे येशूच्या शिष्यांचाही छळ करून त्यांच्यापैकी काहींना मारून टाकणार असल्यामुळे त्यांनाही अशाच प्रकारच्या धैर्याची गरज होती.—मत्त. २३:३४; २४:९.

१४ येशूने दुरात्म्यांचा देखील धैर्याने सामना केला. एकदा, दुरात्म्यांनी ग्रस्त असलेला एक मनुष्य त्याला भेटला. तो माणूस इतका ताकदवान होता की त्याला कोणीही साखळदंडाने बांधू शकत नव्हता. पण, येशू घाबरला नाही. त्याने त्या माणसावर नियंत्रण केलेल्या अनेक दुरात्म्यांना त्याच्यातून बाहेर घालवले. (मार्क ५:१-१३) आज, अशा प्रकारचे चमत्कार करण्याचे सामर्थ्य देवाने ख्रिश्‍चनांना दिलेले नाही. तरीसुद्धा, प्रचाराच्या व शिकवण्याच्या कार्यात आपल्यालाही, ‘विश्‍वास न ठेवणाऱ्‍या लोकांची मने आंधळी करणाऱ्‍या’ सैतानाविरुद्ध आध्यात्मिक लढा द्यावा लागतो. (२ करिंथ. ४:४) येशूप्रमाणेच, आपली शस्त्रे ‘दैहिक नाहीत, तर तटबंदीप्रमाणे’ लोकांच्या मनात पक्की बसलेली चुकीची धार्मिक मते “जमीनदोस्त करण्यास ती देवाच्या दृष्टीने समर्थ आहेत.” (२ करिंथ. १०:४) ही आध्यात्मिक शस्त्रे कशा प्रकारे वापरता येतील याबद्दल आपण येशूच्या उदाहरणावरून बरेच काही शिकू शकतो.

१५. येशूचे धैर्य कशावर आधारित होते?

१५ येशूचे धैर्य फाजील आत्मविश्‍वासावर नव्हे, तर देवावरील दृढ विश्‍वासावर आधारित होते. आपले धैर्य देखील देवावरील दृढ विश्‍वासावर आधारित असले पाहिजे. (मार्क ४:४०) आपण हा दृढ विश्‍वास कसा प्राप्त करू शकतो? पुन्हा एकदा येशूच्या उदाहरणाकडे वळू या. येशूला शास्त्रवचनांचे पूर्ण ज्ञान होते आणि शास्त्रवचनांवर त्याला पूर्ण भरवसा होता. त्याने खऱ्‍याखुऱ्‍या तरवारीचा नव्हे, तर देवाच्या आत्म्याच्या तरवारीचा म्हणजेच देवाच्या वचनाचा उपयोग केला. त्याची शिकवण शास्त्रवचनांवर आधारित आहे हे दाखवण्यासाठी त्याने वेळोवेळी शास्त्रवचनांचा उल्लेख केला. त्याने अनेकदा, “असा शास्त्रलेख आहे,” किंवा देवाच्या वचनात “असे लिहिले आहे” असे म्हटले. *

१६. आपला विश्‍वास आणखी दृढ होण्यासाठी आपण काय केले पाहिजे?

१६ येशूचे शिष्य असल्यामुळे आपल्यावर परीक्षा या येणारच. या परीक्षांतही टिकून राहील अशा प्रकारचा विश्‍वास उत्पन्‍न करण्यासाठी आपण दररोज बायबलचे वाचन व अभ्यास केला पाहिजे आणि ख्रिस्ती सभांना उपस्थित राहून आपल्या विश्‍वासाचा पाया असलेली सत्ये आत्मसात केली पाहिजेत. (रोम. १०:१७) जर आपला विश्‍वास जिवंत किंवा कार्यशील असेल, तरच तो आपल्याला धैर्याने पाऊल उचलण्याची प्रेरणा देईल. म्हणूनच, आपण जे काही शिकतो ते आपल्या अंतःकरणापर्यंत पोचण्यासाठी आपण त्याच्यावर मनन म्हणजेच गांभीर्याने विचार केला पाहिजे. (याको. २:१७) तसेच, विश्‍वास हा आत्म्याच्या फळाचा एक भाग असल्यामुळे, आपण पवित्र आत्मा मिळण्यासाठी प्रार्थना केली पाहिजे.—गलती. ५:२२.

१७, १८. एका तरुण बहिणीने शाळेत कशा प्रकारे धैर्य दाखवले?

१७ खऱ्‍या विश्‍वासामुळे कशा प्रकारे धैर्य मिळते याची प्रचिती किटी नावाच्या एका तरुण बहिणीला आली. शाळेत आपल्याला ‘सुवार्तेची लाज वाटू’ नये याची तिला लहानपणापासूनच जाणीव होती. आणि आपल्या शाळासोबत्यांना चांगली साक्ष देण्याची तिची मनापासून इच्छाही होती. (रोम. १:१६) इतरांना सुवार्ता सांगण्याचा ती दरवर्षी निश्‍चय करायची. पण, धैर्याअभावी ती साक्ष देण्यास कचरायची. काही वर्षांनी तिने शाळा बदलली तेव्हा तिने विचार केला, “आजपर्यंत मी अनेक संधी वाया घालवल्या, यापुढे मी असं होऊ देणार नाही.” किटीने ख्रिस्तासारखे धैर्य, समजबुद्धी आणि योग्य संधी मिळावी अशी प्रार्थना केली.

१८ शाळेच्या पहिल्या दिवशी, सर्व विद्यार्थ्यांना आपापली ओळख करून देण्यास सांगण्यात आले. आपली ओळख करून देताना अनेकांनी आपल्या धर्माचाही उल्लेख केला. पण, आपण धर्माला फारसे महत्त्व देत नाही असेही त्यांनी सांगितले. किटीला वाटले की तिने ज्या संधीसाठी प्रार्थना केली होती ती हीच आहे. ओळख करून देण्याची तिची वेळ आली तेव्हा तिने आत्मविश्‍वासाने म्हटले, की “मी एक यहोवाची साक्षीदार आहे, आणि आध्यात्मिक व नैतिक बाबतीत मी बायबललाच आपले मार्गदर्शक मानते.” ती सांगत होती तेव्हा, काही जणांनी नाक मुरडले. पण, इतर काहींनी अगदी कान लावून ऐकले व नंतर तिला अनेक प्रश्‍नही विचारले. आपल्या धार्मिक विश्‍वासांचे समर्थन केल्याबद्दल शिक्षकांनी तिचे कौतुक केले. येशूच्या धैर्यवान उदाहरणाचे अनुकरण केल्याबद्दल किटीला किती आनंद झाला!

ख्रिस्तासारखा विश्‍वास व धैर्य दाखवा

१९. (क) खरा विश्‍वास असण्यात काय समाविष्ट आहे? (ख) आपण कशा प्रकारे यहोवाचे मन आनंदित करू शकतो?

१९ धैर्याने पाऊल उचलण्यासाठी विश्‍वासाची गरज आहे याची प्रेषितांनाही जाणीव होती. त्यांनी येशूकडे अशी कळकळीची विनंती केली: “आमचा विश्‍वास वाढवा.” (लूक १७:५, ६ वाचा.) खरा विश्‍वास असणे म्हणजे केवळ देव अस्तित्वात आहे एवढेच मानणे नाही. तर, यासाठी यहोवासोबत भरवशाचा, अतूट नातेसंबंध विकसित करणे गरजेचे आहे. याची तुलना एका लहान मुलाच्या आपल्या दयाळू व प्रेमळ पित्याशी असलेल्या नातेसंबंधाशी आपण करू शकतो. देवाच्या प्रेरणेने शलमोनाने असे लिहिले: “माझ्या मुला, तुझे चित्त सुज्ञ असले तर माझ्या, माझ्याच चित्ताला आनंद होईल; तुझ्या वाणीतून यथार्थ बोल निघाल्यास माझे अंतर्याम उल्लासेल.” (नीति. २३:१५, १६) त्याच प्रकारे, आपण नीतिमान तत्त्वांचे धैर्याने समर्थन करतो तेव्हा यहोवाचे मन आनंदित होते आणि त्यामुळे आपले धैर्य आणखी वाढते. म्हणून, धैर्याने नीतिमत्वाचे समर्थन करण्याद्वारे आपण नेहमी येशूच्या उदाहरणाचे अनुकरण करू या!

[तळटीप]

तुम्ही स्पष्ट करू शकता का?

• अपरिपूर्ण असूनही आज्ञाधारक राहणे आपल्याला कशामुळे शक्य होते?

• खरा विश्‍वास कशावर आधारित आहे आणि आपण धैर्यवान होण्यास तो कशा प्रकारे आपली मदत शकतो?

• आज्ञाधारक राहिल्याने आणि ख्रिस्तासारखे धैर्य दाखवल्याने आपल्याला काय प्रतिफळ मिळेल?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१३ पानांवरील चित्र]

प्रलोभनांचा प्रतिकार करण्यासाठी तुम्ही आपल्या मनाची तयारी करत आहात का?

[१५ पानांवरील चित्र]

येशूप्रमाणे आपलेही धैर्य देवावरील दृढ विश्‍वासावर आधारित असले पाहिजे