व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाकडून मिळणारे शिक्षण सर्वश्रेष्ठ

देवाकडून मिळणारे शिक्षण सर्वश्रेष्ठ

देवाकडून मिळणारे शिक्षण सर्वश्रेष्ठ

“ख्रिस्त येशू माझा प्रभु, ह्‍याच्याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्व काही हानि असे समजतो.”—फिलिप्पै. ३:८.

१, २. काही ख्रिश्‍चनांनी कोणती निवड केली आहे आणि का?

लहानपणापासूनच रॉबर्ट अभ्यासात फार हुशार होता. तो केवळ आठ वर्षांचा असताना त्याची एक शिक्षिका त्याला भेटायला त्याच्या घरी गेली. त्याने निवडलेल्या कोणत्याही क्षेत्रात हमखास यशस्वी होण्याची कुवत त्याच्यात आहे असे तिने त्याला सांगितले. त्याने डॉक्टर बनावे असे तिला मनापासून वाटत होते. रॉबर्टला हायस्कूलमध्ये मिळालेल्या यशाच्या बळावर देशातल्या कोणत्याही नामांकित विद्यापीठात अगदी सहजासहजी प्रवेश मिळू शकला असता. अनेकांच्या मते जीवनात अशी संधी पुन्हा-पुन्हा येत नाही. पण रॉबर्टने मात्र, नियमित पायनियर म्हणून सेवा करण्याचे आपले ध्येय साध्य करण्यासाठी, ही संधी सोडून देण्याची निवड केली.

रॉबर्टसारखेच, यहोवाच्या सेवकांपैकी लहानमोठ्या अनेकांना या जगात खूप काही साध्य करण्याच्या अनेक संधी मिळतात. पण, आध्यात्मिक ध्येये साध्य करता यावीत म्हणून काही जण अशा संधींचा पूर्ण फायदा न घेण्याची निवड करतात. (१ करिंथ. ७:२९-३१) रॉबर्टप्रमाणेच या ख्रिश्‍चनांना प्रचार कार्यात जास्त मेहनत करण्याची प्रेरणा कशामुळे मिळते? याचे प्रमुख कारण म्हणजे यहोवावर त्यांचे प्रेम आहे. तसेच, यहोवाकडून मिळणाऱ्‍या सर्वश्रेष्ठ शिक्षणाचीही त्यांना कदर आहे. तुम्हाला सत्याचे ज्ञान मिळाले नसते, तर तुमचे जीवन कसे असते याचा तुम्ही वेळोवेळी विचार करता का? यहोवाच्या शिक्षणामुळे आपल्याला मिळालेल्या काही अद्‌भुत आशीर्वादांबद्दल विचार केल्याने, अनमोल सुवार्तेची कदर करण्यास व ती सुवार्ता आवेशाने इतरांना सांगण्यास आपल्याला मदत होईल.

देवाकडून शिकणे मोठ्या सन्मानाची गोष्ट आहे

३. यहोवा अपरिपूर्ण मानवांना शिकवण्यास उत्सुक आहे असे आपण खातरीने का म्हणू शकतो?

यहोवाच्या चांगुलपणामुळेच तो अपरिपूर्ण मानवांना शिकवण्यास उत्सुक आहे. अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांसंबंधी यशया ५४:१३ असे भाकीत करते: “तुझी सर्व मुले परमेश्‍वरापासून शिक्षण पावतील; तुझ्या मुलांना मोठी शांति प्राप्त होईल.” हे शब्द एका अर्थाने, ख्रिस्ताच्या ‘दुसऱ्‍या मेंढरांनाही’ लागू होतात. (योहा. १०:१६) आपल्या काळात पूर्ण होत असलेल्या एका भविष्यवाणीवरून हे अगदी स्पष्टपणे दिसून येते. यशयाने एका दृष्टांतात राष्ट्रांतील लोकांचे लोंढेच्या लोंढे खऱ्‍या उपासनेकडे येत असल्याचे पाहिले. यशयाने वर्णन केल्याप्रमाणे हे लोक एकमेकांना असे म्हणतात: “आपण परमेश्‍वराच्या पर्वतावर याकोबाच्या देवाच्या मंदिराकडे चढून जाऊ; तो आम्हास आपले मार्ग शिकवो, म्हणजे आम्ही त्याच्या पथांनी चालू.” (यश. २:१-३) खरेच, देवाने आपल्याला शिक्षण द्यावे ही आपल्याकरता किती सन्मानाची गोष्ट आहे!

४. यहोवा ज्यांना शिकवतो त्यांच्याकडून तो काय अपेक्षा करतो?

देवाकडील शिक्षणाचा लाभ घेण्यासाठी आपण काय केले पाहिजे? यासाठी सगळ्यात महत्त्वाची अपेक्षा म्हणजे एका व्यक्‍तीने नम्र व शिकून घेण्यास उत्सुक असले पाहिजे. स्तोत्रकर्त्या दाविदाने असे लिहिले: “परमेश्‍वर उत्तम व सरळ आहे, . . . तो दीनांस आपला मार्ग शिकवितो.” (स्तो. २५:८, ९) आणि येशूने असे म्हटले: “हे पित्या, स्वर्गाच्या व पृथ्वीच्या प्रभू, मी तुझे स्तवन करितो; कारण ज्ञानी आणि विचारवंत ह्‍यांच्यापासून ह्‍या गोष्टी गुप्त ठेवून त्या तू बाळकांस प्रगट केल्या आहेत.” (लूक १०:२१) देव “लीनांवर कृपा करितो” हे समजल्यामुळे तुम्हाला त्याच्याकडून शिकून घेण्याची प्रेरणा मिळत नाही का?—१ पेत्र ५:५.

५. देवाबद्दलचे ज्ञान मिळवणे आपल्याला केवळ कशामुळे शक्य झाले आहे?

यहोवाचे सेवक या नात्याने, सत्याचे ज्ञान मिळवण्याचे श्रेय आपण स्वतः घेऊ शकतो का? नाही. खरेतर, स्वतःच्या बळावर आपण कधीच देवाबद्दलचे ज्ञान मिळवू शकलो नसतो. येशूने म्हटले: “ज्याने मला पाठविले त्या पित्याने आकर्षिल्याशिवाय कोणीहि माझ्याकडे येऊ शकत नाही.” (योहा. ६:४४) आज यहोवा प्रचार कार्याद्वारे आणि आपल्या पवित्र आत्म्याद्वारे “सर्व राष्ट्रांतील निवडक वस्तु” म्हणजे, मेंढरांसमान असलेल्या नम्र मनोवृत्तीच्या लोकांना आपल्याकडे आकर्षित करत आहे. (हाग्ग. २:७) यहोवाने आपल्या पुत्राकडे आकर्षिलेल्यांपैकी एक असल्यामुळे तुम्ही त्याचे आभारी नाहीत का?यिर्मया ९:२३, २४ वाचा.

जीवनात बदल करण्याचे सामर्थ्य

६. ‘परमेश्‍वराचे ज्ञान’ घेतल्यामुळे लोकांच्या जीवनात कोणते चांगले बदल घडून येतात?

आज कित्येक लोकांच्या व्यक्‍तिमत्त्वात होत असलेल्या परिवर्तनाविषयी यशयाच्या भविष्यवाणीत एका अतिशय सुरेख शब्दचित्राच्या साहाय्याने वर्णन करण्यात आले आहे. पूर्वी हिंसक असलेले लोक आता शांतीप्रिय बनले आहेत. (यशया ११:६-९ वाचा.) जात-पात, राष्ट्र, वंश किंवा सांस्कृतिक पार्श्‍वभूमी वेगळी असल्यामुळे एके काळी जे एकमेकांचे शत्रू होते, ते आता शांतीने एकत्र नांदण्यास शिकले आहेत. लाक्षणिक अर्थाने, त्यांनी “आपल्या तरवारी मोडून त्यांचे फाळ” केले आहेत. (यश. २:४) आयुष्यात इतके मोठे बदल करणे लोकांना कशामुळे शक्य झाले आहे? ‘परमेश्‍वराचे ज्ञान’ घेतल्यामुळे आणि त्याचे पालन केल्यामुळे. देवाचे सेवक अपरिपूर्ण असले, तरीही ते एका आंतरराष्ट्रीय बंधुसमाजाचा भाग आहेत. सुवार्तेमुळे जगातील सर्व प्रकारचे लोक देवाकडे आकृष्ट होतात व या ज्ञानामुळे त्यांचे जीवन सुधारते, यावरून हेच दिसून येते की देवाकडील शिक्षण सर्वात श्रेष्ठ आहे.—मत्त. ११:१९.

७, ८. (क) देवाकडून मिळणाऱ्‍या शिक्षणामुळे ‘तटबंदीसारख्या’ असलेल्या कोणत्या काही गोष्टींपासून लोक मुक्‍त होतात? (ख) यहोवाकडून मिळणाऱ्‍या शिक्षणामुळे त्याची स्तुती होते हे कशावरून दिसते?

देवाचे उपासक करत असलेल्या सेवाकार्याची तुलना प्रेषित पौलाने आध्यात्मिक युद्धाशी केली. त्याने लिहिले: ‘आमच्या युद्धाची शस्त्रे दैहिक नाहीत, तर तटबंदी जमीनदोस्त करण्यास ती देवाच्या दृष्टीने समर्थ आहेत. तर्कवितर्क व देवविषयक ज्ञानाविरुद्ध उंच उभारलेले असे सर्व काही आम्ही पाडून टाकतो.’ (२ करिंथ. १०:४, ५) देवाकडून मिळणाऱ्‍या शिक्षणामुळे ‘तटबंदीसारख्या’ असलेल्या कोणत्या काही गोष्टींपासून लोक मुक्‍त होतात? जाचक असणाऱ्‍या खोट्या शिकवणी, अंधविश्‍वास, मानवी तत्त्वज्ञान यांसारख्या गोष्टींचा यांत उल्लेख करता येईल. (कलस्सै. २:८) देवाकडील शिक्षणामुळे लोकांना वाईट चालीरीतींवर मात करण्यास व देवाला पसंत असलेले गुण विकसित करण्यास मदत मिळते. (१ करिंथ. ६:९-११) त्यामुळे कौटुंबिक जीवन सुधारते आणि कोणतीही आशा नसलेल्यांना जीवनात एक खरा उद्देश प्राप्त होतो. आज अशाच प्रकारच्या शिक्षणाची गरज आहे.

यहोवा लोकांना जे गुण विकसित करण्यास मदत करतो त्यांपैकी एक गुण आहे प्रामाणिकपणा. याचे एक उदाहरण पाहा. (इब्री १३:१८) भारतातील एका स्त्रीने बायबलचा अभ्यास करण्यास सुरुवात केली आणि कालांतराने ती बाप्तिस्मा न घेतलेली प्रचारक बनली. एके दिवशी राज्य सभागृहाचे बांधकाम चाललेल्या ठिकाणाहून घरी येताना तिला एका बस स्थानकाजवळ एक सोन्याची साखळी सापडली. त्या साखळीची किंमत जवळजवळ ४०,००० रुपये होती. ती गरीब असूनही तिने पोलीस स्थानकात जाऊन ती साखळी पोलिसांच्या सुपूर्द केली. तेथील पोलीस अधिकाऱ्‍याचा आपल्या डोळ्यांवर विश्‍वासच बसेना! नंतर, आणखी एका पोलीस अधिकाऱ्‍याने तिला विचारले, “ही साखळी इथं आणून देण्याचा निर्णय तुम्ही का घेतला?” तिने म्हटले, “बायबलच्या शिक्षणाने माझ्यात बदल घडवून आणल्यामुळे आता मी एक प्रामाणिक व्यक्‍ती आहे.” हे ऐकून प्रभावित झालेल्या अधिकाऱ्‍याने तिच्यासोबत असलेल्या ख्रिस्ती वडिलांना असे म्हटले: “या राज्यात ३ कोटी ८० लाखांपेक्षा जास्त लोक आहेत. त्यांपैकी दहा जणांना जरी तुम्ही या स्त्रीसारखं बनण्यास मदत करू शकलात, तर ते खूप मोठं यश असेल.” देवाच्या शिक्षणामुळे या स्त्रीसारख्या लाखो लोकांचे जीवन सुधारले आहे. खरोखर, आपल्याजवळ यहोवाची स्तुती करण्याची कितीतरी कारणे आहेत, नाही का?

९. लोकांना आपल्या जीवनात लक्षणीय बदल करणे कशामुळे शक्य होते?

देवाच्या वचनाच्या सामर्थ्यामुळे आणि यहोवा पुरवत असलेल्या पवित्र आत्म्याच्या मदतीमुळे लोकांना आपल्या जीवनात लक्षणीय बदल करणे शक्य होते. (रोम. १२:२; गलती. ५:२२, २३) कलस्सैकर ३:१० मध्ये असे म्हटले आहे: “जो नवा मनुष्य, आपल्या निर्माणकर्त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे पूर्ण ज्ञानात नवा केला जात आहे, त्याला तुम्ही धारण केले आहे.” एक व्यक्‍ती खरोखर कशी आहे हे प्रकट करण्याचे सामर्थ्य देवाच्या वचनातील संदेशात आहे. तसेच, देवाचे वचन एका व्यक्‍तीच्या विचारांत व भावनांतही परिवर्तन घडवून आणू शकते. (इब्री लोकांस ४:१२ वाचा.) शास्त्रवचनांचे यथार्थ ज्ञान घेण्याद्वारे आणि यहोवाच्या नीतिमान स्तरांनुसार आपले जीवन जगण्याद्वारे एक व्यक्‍ती, देवाशी मैत्री करू शकते आणि सदासर्वकाळ जगण्याची आशा बाळगू शकते.

यहोवा आपल्याला भविष्यासाठी तयार करतो

१०. (क) केवळ यहोवाच आपल्याला भविष्यासाठी तयार करण्यास का समर्थ आहे? (ख) लवकरच संपूर्ण पृथ्वीवर कोणते विलक्षण बदल घडून येतील?

१० भविष्यात काय घडणार आहे हे यहोवाला माहीत असल्यामुळे आणि मानवजातीचे भविष्य काय असेल हे तो ठरवत असल्यामुळे तोच आपल्याला भविष्यासाठी तयार करू शकतो. (यश. ४६:९, १०) बायबलमधील भविष्यवाण्यांवरून आपल्याला समजते की “परमेश्‍वराचा मोठा दिवस समीप आहे.” (सफ. १:१४) त्या दिवसाविषयी नीतिसूत्रे ११:४ मधील शब्द खरे ठरतील: “क्रोधाच्या समयी धन उपयोगी पडत नाही, पण धार्मिकता मृत्यूपासून सोडविते.” सैतानाच्या जगावर यहोवाचे न्यायदंड बजावण्याची वेळ येईल तेव्हा देवासोबत असलेला आपला नातेसंबंधच केवळ उपयोगी पडेल. त्यावेळी पैसा, धनसंपत्ती यांना काहीच मोल राहणार नाही. यहेज्केल ७:१९ मध्ये तर असे म्हटले आहे: “ते आपले रूपे रस्त्यांवर फेकून देतील, त्यांस आपले सोने अमंगळ वाटेल.” भविष्यात असे घडणार हे आपल्याला आधीच माहीत झाल्यामुळे आपल्याला आज सुज्ञपणे निर्णय घेण्यास साहाय्य होऊ शकते.

११. भविष्यासाठी तयार असण्यास देवाचे शिक्षण आपल्याला कोणत्या एका मार्गाने साहाय्य करते?

११ जीवनात उचित गोष्टींना प्राधान्य देण्यास साहाय्य करण्याद्वारे देवाचे शिक्षण आपल्याला यहोवाच्या दिवसाकरता एका खास मार्गाने तयार करते. प्रेषित पौलाने तीमथ्याला असे लिहिले: ‘प्रस्तुत युगातल्या धनवानांस निक्षून सांग की, तुम्ही अभिमानी होऊ नये, चंचल धनावर आशा ठेवू नये, तर जिवंत देवावर आशा ठेवावी.’ आपण धनवान नसलो, तरीही यहोवा देवाच्या या सल्ल्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो. त्यासाठी आपण काय करावे? धनसंपत्ती मिळवण्याच्या मागे लागण्याऐवजी आपण “चांगले ते करावे” आणि “सत्कर्माविषयी धनवान्‌” असण्याचा प्रयत्न करावा. यहोवाच्या सेवेला आपल्या जीवनात पहिले स्थान दिल्याने, आपल्याला ‘पुढील काळी चांगला आधार होईल, असा साठा स्वतःसाठी करता’ येईल. (१ तीम. ६:१७-१९) अशा प्रकारचे आत्मत्यागी जीवन जगण्यातच शहाणपण आहे. कारण, येशूने असे म्हटले: “मनुष्याने सर्व जग मिळविले आणि आपला जीव गमावला तर त्याला काय लाभ?” (मत्त. १६:२६, २७) यहोवाचा दिवस जवळ असल्यामुळे, आपल्यापैकी प्रत्येकाने हे प्रश्‍न स्वतःला विचारावे: ‘मी आपले धन कोठे साठवत आहे? मी देवाच्या कार्यासाठी राबत आहे की पैशासाठी?’—मत्त. ६:१९, २०, २४.

१२. काही जण आपल्या सेवेला तुच्छ लेखत असले तरीही आपण का खचून जाऊ नये?

१२ देवाच्या वचनात सांगितलेल्या ‘सत्कर्मांपैकी’ सर्वात महत्त्वाचे आहे, देवाच्या राज्याच्या प्रचाराचे व शिष्य बनवण्याचे जीवनरक्षक कार्य. (मत्त. २४:१४; २८:१९, २०) पहिल्या शतकात, काहींनी या कार्याला तुच्छ लेखले. आज आपल्या सेवाकार्यालाही काही जण तुच्छ लेखतील. (१ करिंथकर १:१८-२१ वाचा.) पण, त्यामुळे आपल्या संदेशाचे महत्त्व कमी होत नाही. तसेच, वेळ आहे तोपर्यंत प्रत्येकाला विश्‍वास ठेवण्याची संधी देण्याचे महत्त्वही त्यामुळे कमी होत नाही. (रोम. १०:१३, १४) खरेतर, देवाकडून मिळणाऱ्‍या शिक्षणाचा फायदा घेण्यास इतरांना मदत केल्यामुळे आपल्यालाही अनेक आशीर्वाद मिळतील.

त्याग केल्यामुळे मिळणारे आशीर्वाद

१३. सुवार्तेसाठी प्रेषित पौलाने कोणते त्याग केले?

१३ ख्रिस्ती बनण्याअगोदर, प्रेषित पौलाला यहुदी समाजात यशस्वी होण्यासाठी प्रशिक्षित केले जात होते. तो अवघ्या १३ वर्षांचा असताना, नियमशास्त्राचा प्रसिद्ध शिक्षक गमलिएल याच्या छत्रछायेत शिक्षण घेण्यासाठी तार्स या त्याच्या जन्मगावाहून जेरूसलेमला गेला. (प्रे. कृत्ये २२:३) कालांतराने, त्याच्या काळातल्या लोकांमध्ये तो ओळखला जाऊ लागला. आणि जर तो त्याच मार्गाने वाटचाल करत राहिला असता, तर यहुदी धर्मातील एक नामांकित पुढारी बनला असता. (गलती. १:१३, १४) पण, त्याने हे सर्व काही सोडून दिले आणि सुवार्तेचा स्वीकार करून प्रचाराचे कार्य हाती घेतले. असे केल्याचा त्याला कधी पस्तावा झाला का? नाही. उलट, त्याने असे लिहिले: “ख्रिस्त येशू माझा प्रभु, ह्‍याच्याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्व काही हानि असे समजतो; त्याच्यामुळे मी सर्व गोष्टींना मुकलो, आणि त्या केरकचरा अशा लेखतो.”—फिलिप्पै. ३:८.

१४, १५. “देवाचे सहकारी” या नात्याने आपण कोणते आशीर्वाद अनुभवतो?

१४ पौलाप्रमाणेच, ख्रिस्ती या नात्याने आज आपणही सुवार्तेसाठी त्याग करतो. (मार्क १०:२९, ३०) असे केल्यामुळे आपले काही नुकसान होते का? या लेखाच्या सुरुवातीला उल्लेख केलेल्या रॉबर्टने जे म्हटले त्यातून आपल्यापैकी अनेकांच्या भावना व्यक्‍त होतात. त्याने म्हटले: “मला जराही खंत नाही. पूर्ण वेळेच्या सेवेमुळं मला आनंद व समाधान मिळालं आहे. आणि त्यामुळं ‘परमेश्‍वर किती चांगला आहे ह्‍याचा अनुभव घेण्याची’ मला संधी मिळाली आहे. आध्यात्मिक ध्येयांचा पाठपुरावा करण्यासाठी मी जेव्हा जेव्हा भौतिक गोष्टींचा त्याग केला आहे, तेव्हा तेव्हा मी त्याग केलेल्या गोष्टींपेक्षा कितीतरी पटीनं जास्त यहोवानं मला आशीर्वाद दिले आहेत. जणू आयुष्यात काहीही न गमावता मी खूप काही कमावलंय!”—स्तो. ३४:८; नीति. १०:२२.

१५ तुम्हीही प्रचार करण्याच्या व शिकवण्याच्या कार्यात काही काळापासून सहभागी होत असाल, तर यहोवा किती चांगला आहे याचा अनुभव घेण्याची संधी तुम्हाला स्वतःला देखील अनेकदा मिळाली असेल. तुम्ही इतरांना सुवार्ता सांगत असताना त्याचा पवित्र आत्मा तुम्हाला साहाय्य करत असल्याचे तुम्हाला कधी जाणवले आहे का? संदेशाकडे लक्ष देण्यासाठी यहोवाने लोकांचे मन उघडले तेव्हा त्यांना आनंद झाला असल्याचे तुम्ही पाहिले आहे का? (प्रे. कृत्ये १६:१४) अडथळ्यांवर मात करून तुमचे सेवाकार्य आणखी वाढवण्यास यहोवाने तुम्हाला मदत केली आहे का? तुमच्यापुढे समस्या आल्यामुळे तुमचे धैर्य खचले, तेव्हा त्याची सेवा करत राहण्यासाठी त्याने तुम्हाला आधार दिला आहे का? (फिलिप्पै. ४:१३) सेवा कार्य करत असताना, यहोवा आपल्याला मदत करत असल्याचे आपण वैयक्‍तिक रीत्या अनुभवतो, तेव्हा तो आपल्याला आणखी खराखुरा वाटतो आणि आपण त्याच्या आणखी जवळ येतो. (यश. ४१:१०) तर मग, देवाचे शिक्षण देण्याच्या महान कार्यात “देवाचे सहकारी” या नात्याने भाग घेणे हा एक आशीर्वादच आहे, नाही का?—१ करिंथ. ३:९.

१६. देवाचे शिक्षण देण्याच्या कार्यासाठी तुम्ही जी मेहनत व त्याग करता त्याबद्दल तुम्हाला कसे वाटते?

१६ अनेकांना आपल्या जीवनात, लोकांच्या लक्षात राहील असे काहीतरी साध्य करण्याची आकांक्षा असते. पण, आजच्या जगात लोकांनी केलेल्या मोठमोठ्या कामगिरींचाही इतरांना लवकरच विसर पडतो हे आपण पाहिले आहे. या उलट, आधुनिक काळात यहोवा आपल्या नावाच्या पवित्रीकरणाशी संबंधित असलेली जी कार्ये साध्य करत आहे, ती त्याच्या उपासकांच्या इतिहासात कायमची कोरली जातील. त्यांचे कधीही विस्मरण होणार नाही. (नीति. १०:७; इब्री ६:१०) तर मग, इतरांना यहोवाचे शिक्षण देण्याच्या या इतिहास घडवणाऱ्‍या कार्यात सहभागी होण्याचा आपल्याला जो सन्मान मिळाला आहे त्याची आपण मनापासून कदर करू या.

तुमचे उत्तर काय असेल?

• यहोवा ज्यांना शिकवतो त्यांच्याकडून तो काय अपेक्षा करतो?

• देवाकडून मिळणारे शिक्षण कशा प्रकारे लोकांच्या जीवनात बदल घडवून आणते?

• इतरांना देवाच्या शिक्षणाचा फायदा घेण्यास साहाय्य केल्यामुळे आपल्याला कोणकोणते आशीर्वाद मिळतात?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२३ पानांवरील चित्र]

यहोवाकडून ज्यांना शिक्षण मिळते ते एका आंतरराष्ट्रीय बंधुसमाजाचा भाग बनतात

[२४ पानांवरील चित्र]]

“देवाचे सहकारी” असणे हा एक आशीर्वादच आहे, नाही का?