व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुमच्या सुटकेसाठी यहोवाने जे केले त्याविषयी तुम्हाला कदर वाटते का?

तुमच्या सुटकेसाठी यहोवाने जे केले त्याविषयी तुम्हाला कदर वाटते का?

तुमच्या सुटकेसाठी यहोवाने जे केले त्याविषयी तुम्हाला कदर वाटते का?

“इस्राएलाचा देव प्रभु धन्यवादित असो, कारण त्याने आपल्या लोकांची भेट घेऊन त्यांची खंडणी भरून सुटका केली आहे.”—लूक १:६८.

१, २. आपण सध्या कोणत्या गंभीर परिस्थितीत आहोत हे एका उदाहरणाच्या साहाय्याने कसे स्पष्ट करता येईल आणि आपण कोणत्या प्रश्‍नांवर चर्चा करणार आहोत?

तुम्ही हॉस्पिटलमध्ये बिछान्यावर पडलेले आहात अशी कल्पना करा. ज्या वॉर्डमध्ये तुम्हाला ठेवण्यात आले आहे, त्यात तुमच्यासहित सर्वच रुग्णांना एक जीवघेणा रोग झाला आहे, ज्यावर अजूनतरी कोणतेही औषध उपलब्ध नाही. पण एका डॉक्टरने पुढाकार घेऊन या रोगावर उपाय शोधण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत, हे ऐकल्यावर तुमच्या मनाला दिलासा मिळतो. संशोधनाच्या प्रगतीविषयी काही नवीन बातमी मिळते का, म्हणून तुम्ही मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत असता. आणि शेवटी तो दिवस उजाडतो! उपाय सापडला असल्याची बातमी तुमच्या कानावर येते. रोगावर गुणकारी औषध शोधून काढण्यासाठी त्या डॉक्टरला फार मोठे त्याग करावे लागल्याचे तुम्हाला समजते. जरा विचार करा, त्या डॉक्टरप्रती तुमच्या मनात कशा भावना असतील? नक्कीच त्यांच्याविषयी आदराने व कृतज्ञतेने तुमचे हृदय भरून येईल. कारण, त्यांच्या प्रयत्नांमुळे तुम्हालाच नव्हे तर आणखी कित्येकांना मृत्यूच्या विळख्यातून सुटका मिळणे शक्य झाले.

वरील वर्णन कदाचित काहीसे नाट्यमय वाटेल, पण खरे पाहता आपल्यापैकी प्रत्येक जण अगदी अशाच, किंबहुना याहीपेक्षा गंभीर परिस्थितीत आहे. आणि या अवस्थेतून आपली सुटका करणाऱ्‍याची आपल्याला नितान्त गरज आहे. (रोमकर ७:२४ वाचा.) पण, यहोवाने फार मोठे त्याग करून आपली सुटका करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. आणि त्याच्या पुत्रानेही आपल्या सुटकेसाठी फार मोठे त्याग केले आहेत. या संदर्भात, आता आपण चार मुख्य प्रश्‍नांवर चर्चा करू या. आपल्याला सुटकेची गरज का आहे? आपली सुटका करण्यासाठी येशूला कोणती किंमत मोजावी लागली? यहोवाला कोणती किंमत मोजावी लागली? आणि, आपल्या सुटकेसाठी देवाने जे केले आहे त्याबद्दल आपल्याला कदर असल्याचे आपण कसे दाखवू शकतो?

सुटकेची गरज का आहे?

३. पापाची तुलना साथीच्या रोगाशी कशा प्रकारे करता येईल?

अलीकडेच केलेल्या एका अभ्यासातून असे दिसून आले, की आजवरच्या इतिहासात आलेला सगळ्यात भयानक साथीचा रोग १९१८ मधील लक्षावधी लोकांचा बळी घेणारा स्पॅनिश फ्लू होता. अर्थात, इतर काही रोग याहीपेक्षा अधिक घातक आहेत. ते या अर्थाने, की त्यांची तुलनेने कमी लोकांना लागण होत असली, तरी लागण झालेल्यांपैकी मृत्यूमुखी पडणाऱ्‍यांचे प्रमाण बरेच जास्त आहे. * पण, अशा भयानक रोगांच्या तुलनेत पापाविषयी काय म्हणता येईल? रोमकर ५:१२ यातील शब्द आठवा: “एका माणसाच्या द्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले; आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले.” पापाचे संसर्गाचे प्रमाण १०० टक्के आहे असे म्हणता येईल, कारण सर्व अपरिपूर्ण मानव पापी आहेत. (रोमकर ३:२३ वाचा.) आणि मृत्यूमुखी पडणाऱ्‍यांच्या प्रमाणाविषयी काय म्हणता येईल? पौलाने लिहिले, पापामुळे ‘सर्व माणसे’ मरतात.

४. आपल्या आयुष्याबद्दल यहोवाचा दृष्टिकोन काय आहे आणि आजच्या काळातील अनेक लोकांच्या दृष्टिकोनापेक्षा तो कशा प्रकारे वेगळा आहे?

आज बरेच लोक कदाचित पापाची व मृत्यूची अशा भयानक रोगांशी तुलना करणार नाहीत. अकाली मृत्यू येण्याची त्यांना भीती वाटत असली, तरी म्हातारपणामुळे येणाऱ्‍या मृत्यूला मात्र ते “नैसर्गिक” मृत्यू म्हणतात. खरोखर, मानवांना आपल्या सृष्टिकर्त्याच्या दृष्टिकोनाचा किती सहजासहजी विसर पडतो! यहोवाच्या मनात मानवांकरता जे जीवन होते, त्यापेक्षा सध्याचे आपले आयुष्य खूपच कमी आहे. खरे पाहता, यहोवाच्या दृष्टिकोनातून आजवर कोणताच मनुष्य ‘एक दिवसही’ जगलेला नाही. (२ पेत्र ३:८) म्हणूनच, देवाचे वचन आपल्या जीवनाची तुलना काही दिवसांतच सुकून जाणारे गवत किंवा निःश्‍वास यांसारख्या क्षणभंगुर गोष्टींशी करते. (स्तो. ३९:५; १ पेत्र १:२४) ही गोष्ट आपण नेहमी आठवणीत ठेवली पाहिजे. का? कारण आपण ज्या ‘रोगाने’ पीडित आहोत त्याचे गांभीर्य लक्षात आल्यावरच, त्यावरील ‘उपायाचे’ किंवा सुटकेचे मोल आपल्याला कळू शकेल.

५. पापामुळे आपल्यापैकी प्रत्येकाला काय गमवावे लागले?

पाप व त्याच्या दुष्परिणामांचे गांभीर्य लक्षात घेण्यासाठी पापामुळे आपल्याला काय गमवावे लागले हे प्रथम आपण जाणून घेतले पाहिजे. सुरुवातीला कदाचित आपल्याला हे समजून घेणे कठीण वाटेल, कारण आपण पापामुळे जे गमावले आहे ते खरेतर आजपर्यंत आपण कधी अनुभवलेच नाही. पाप करण्याअगोदर आदाम व हव्वा परिपूर्ण मानवी जीवन अनुभवत होते. शरीर व मन दोन्ही परिपूर्ण असल्यामुळे त्यांच्या विचारांवर, भावनांवर व कृतींवर नियंत्रण करणे त्यांच्या हातात होते. यहोवाचे सेवक या नात्याने दिवसेंदिवस प्रगती करत राहण्याची आणि ज्या अद्‌भुत क्षमतांसह त्यांना निर्माण करण्यात आले होते त्यांचा सदासर्वकाळ पुरेपूर उपयोग करत राहण्याची त्यांच्यासमोर संधी होती. पण, त्यांनी ही बहुमोल देणगी धुडकावून लावली. जाणूनबुजून पाप केल्यामुळे, यहोवाच्या मनात त्यांच्याकरता ज्या प्रकारचे जीवन होते ते त्यांनी स्वतः तर गमावलेच, पण त्यांच्यामुळे त्यांच्या संततीलाही ते जीवन मिळू शकले नाही. (उत्प. ३:१६-१९) शिवाय, आपण आधी चर्चा केल्याप्रमाणे त्यांनी स्वतःवर आणि आपल्या सर्वांवरही पापाचा प्राणघातक “रोग” ओढवून घेतला. यहोवाने न्यायीपणे त्यांना शिक्षा ठोठावली. पण आपल्याला मात्र त्याने सुटकेची आशा देऊ केली आहे.—स्तो. १०३:१०.

आपल्या सुटकेसाठी येशूला कोणती किंमत मोजावी लागली?

६, ७. (क) मानवांच्या सुटकेसाठी मोठी किंमत मोजावी लागेल हे यहोवाने पहिल्यांदा कशा प्रकारे प्रकट केले? (ख) हाबेलाने आणि नियमशास्त्र मिळण्याआधीच्या काळात राहणाऱ्‍या यहोवाच्या सेवकांनी जी बलिदाने दिली त्यांवरून आपल्याला काय समजते?

आदाम व हव्वा यांच्या वंशजांची सुटका करण्यासाठी फार मोठी किंमत मोजावी लागेल हे यहोवाला माहीत होते. ही किंमत काय असेल याविषयी उत्पत्ति ३:१५ यातील भविष्यवाणीतून आपल्याला काही माहिती मिळते. या भविष्यवाणीनुसार, यहोवा एका ‘संततीची’ अर्थात सुटका करणाऱ्‍या मुक्‍तिदात्याची व्यवस्था करणार होता, जो एके दिवशी सैतानाचा नाश करून त्याचे अस्तित्व कायमचे मिटवणार होता. पण असे करताना त्या मुक्‍तिदात्याला स्वतःला दुःख सोसावे लागणार होते. लाक्षणिक अर्थाने त्याच्या टाचेला घाव होणार होता. पण, हा वेदनादायक घाव काय असणार होता? यहोवाच्या निवडलेल्यास नेमके काय सहन करावे लागणार होते?

मानवजातीची पापापासून सुटका करण्यासाठी मुक्‍तिदात्याला पापाचे परिणाम मिटवून टाकण्याद्वारे प्रायश्‍चित्ताचा म्हणजेच, देवासोबत मानवाचा समेट करण्याचा मार्ग मोकळा करावा लागणार होता. हे कसे साध्य केले जाणार होते? यासाठी एका बलिदानाची आवश्‍यकता आहे हे फार पूर्वीपासूनच सुचवण्यात आले. मानवांपैकी यहोवाचा पहिला विश्‍वासू सेवक हाबेल याने यहोवाला पशूंचे बलिदान दिले तेव्हा त्याच्यावर देवाची कृपादृष्टी झाली. कालांतराने नोहा, अब्राहाम, याकोब व ईयोब या देवभीरू कुलपित्यांनीही अशी बलिदाने दिली आणि देवाने त्यांच्या बलिदानांविषयी संतुष्टी व्यक्‍त केली. (उत्प. ४:४; ८:२०, २१; २२:१३; ३१:५४; ईयो. १:५) कालांतराने, मोशेच्या नियमशास्त्रामुळे लोकांना बलिदानाचे महत्त्व अधिक स्पष्टपणे कळले.

८. दर वर्षी प्रायश्‍चित्ताच्या दिवशी मुख्य याजक काय करायचा?

नियमशास्त्रात सांगितलेल्या बलिदानांपैकी, प्रायश्‍चित्ताच्या दिवशी अर्पण केली जाणारी बलिदाने सर्वात महत्त्वाची होती. त्या दिवशी मुख्य याजक असे अनेक विधी पार पाडायचा, ज्यांचा काही ना काही लाक्षणिक अर्थ होता. तो सर्वप्रथम याजकगणाच्या आणि मग इस्राएलांच्या इतर वंशांच्या पापांच्या प्रायश्‍चित्तासाठी यहोवाला बलिदाने अर्पण करायचा. वर्षातून फक्‍त या प्रायश्‍चित्ताच्या दिवशीच मुख्य याजक निवासमंडपातील अथवा मंदिरातील परमपवित्रस्थानात प्रवेश करायचा. तेथे तो कराराच्या कोशासमोर बलिदानांचे रक्‍त शिंपडायचा. कराराच्या पवित्र कोशाच्या वरती कधीकधी यहोवाच्या उपस्थितीस सूचित करणारा एक शुभ्र प्रकाशमान मेघ दिसत असे.—निर्ग. २५:२२; लेवी. १६:१-३०.

९. (क) प्रायश्‍चित्ताच्या दिवशी निरनिराळे विधी पार पाडणारा मुख्य याजक कोणाला सूचित करतो आणि त्याने अर्पण केलेली बलिदाने कशास सूचित करतात? (ख) मुख्य याजकाचे परमपवित्रस्थानात प्रवेश करणे कशाचे सूचक होते?

या सर्व लाक्षणिक विधींचा काय अर्थ होतो हे स्पष्ट करण्यास देवाने प्रेषित पौलाला प्रेरित केले. पौलाने सांगितले की मुख्य याजक मशीहाला म्हणजेच येशू ख्रिस्ताला सूचित करतो आणि पापांसाठी बलिदाने दिली जाणे हे ख्रिस्ताच्या बलिदानरूपी मृत्यूला सूचित करते. (इब्री ९:११-१४) ख्रिस्ताचे परिपूर्ण बलिदान दोन गटांतील लोकांसाठी खऱ्‍या अर्थाने प्रायश्‍चित्त करणार होते—ख्रिस्ताच्या १,४४,००० आत्म्याने अभिषिक्‍त असलेल्या बांधवांच्या याजक वर्गासाठी तसेच, ‘दुसऱ्‍या मेंढरांसाठी.’ (योहा. १०:१६) मुख्य याजकाचे परमपवित्रस्थानात प्रवेश करणे, हे येशू आपल्या खंडणी बलिदानाचे मोल सादर करण्यासाठी स्वर्गात प्रत्यक्ष यहोवासमोर जाईल याचे सूचक होते.—इब्री ९:२४, २५.

१०. बायबलमधील भविष्यावाण्यांनुसार मशीहाला काय सोसावे लागणार होते?

१० या सर्व गोष्टींवरून स्पष्ट झाले की आदाम व हव्वा यांच्या वंशजांची सुटका करण्यासाठी एका मोठ्या बलिदानाची गरज होती. मशीहाला त्याच्या जीवनाचे बलिदान द्यावे लागणार होते! इब्री शास्त्रवचनांत संदेष्ट्यांनी या सत्याचे सविस्तर वर्णन केले. उदाहरणार्थ, दानीएल संदेष्ट्याने स्पष्टपणे सांगितले की “अधर्माबद्दल प्रायश्‍चित्त करावे” म्हणून “अभिषिक्‍त, अधिपति” अर्थात मशीहा याचा “वध होईल.” (दानी. ९:२४-२६) यशयाने भाकीत केले की मशीहाचा लोक अव्हेर करतील, त्याचा छळ करतील, आणि अपरिपूर्ण मानवांच्या पापांसाठी त्याला जिवे मारले जाईल.—यश. ५३:४, ५, ७.

११. मानवांच्या सुटकेसाठी स्वतःचे बलिदान देण्याची तयारी यहोवाच्या पुत्राने कोणकोणत्या मार्गांनी दाखवली?

११ मानवांची सुटका करण्यासाठी आपल्याला कोणती किंमत मोजावी लागणार याची देवाच्या एकुलत्या एका पुत्राला पृथ्वीवर येण्याअगोदरच पूर्ण कल्पना होती. त्याला भयंकर यातना सहन कराव्या लागतील आणि शेवटी जिवे मारले जाईल हे त्याला माहीत होते. त्याच्या पित्याने ही सत्ये त्याला शिकवली तेव्हा तो मागे हटला का किंवा त्याने देवाचा विरोध केला का? नाही. उलट, पित्याने दिलेले शिक्षण त्याने आज्ञाधारकपणे स्वीकारले. (यश. ५०:४-६) त्याच प्रकारे, पृथ्वीवर असतानाही येशूने प्रामाणिकपणे आपल्या पित्याच्या इच्छेनुसार केले. त्याने असे का केले? याचे एक कारण त्याने स्वतः या शब्दांत व्यक्‍त केले: “मी पित्यावर प्रीति करितो.” आणखी एक कारण सांगताना तो म्हणाला: “आपल्या मित्रांकरिता आपला प्राण द्यावा ह्‍यापेक्षा कोणाची प्रीति मोठी नाही.” (योहा. १४:३१; १५:१३) त्याअर्थी, आपली सुटका ही बऱ्‍याच प्रमाणात यहोवाच्या पुत्राच्या प्रेमामुळेच शक्य झाली आहे. त्याला त्याच्या परिपूर्ण मानवी जीवनाचे बलिदान द्यावे लागले, तरीसुद्धा आपल्या सुटकेसाठी असे करण्यास तो आनंदाने तयार झाला.

आपल्या सुटकेसाठी यहोवाने कोणती किंमत मोजली?

१२. खंडणी बलिदान कोणाच्या इच्छेमुळे शक्य झाले आणि त्याने ही तरतूद का केली?

१२ मुळात खंडणी बलिदानाची तरतूद करणारा किंवा असा संकल्प करणारा उद्देशकर्ता स्वतः येशू नव्हता. तर, खंडणी बलिदानाच्या माध्यमाने मानवांची सुटका यहोवाच्या इच्छेमुळे शक्य झाली. मंदिरात जेथे बलिदाने अर्पण केली जायची ती वेदी यहोवाच्या इच्छेला सूचित करते असे प्रेषित पौलाने सुचवले होते. (इब्री १०:१०) त्याअर्थी, ख्रिस्ताच्या बलिदानाकरवी मिळणाऱ्‍या सुटकेसाठी आपण सर्वप्रथम यहोवाचे ऋणी आहोत. (लूक १:६८) ख्रिस्ताच्या बलिदानावरून यहोवाची परिपूर्ण इच्छा आणि त्याचे मानवांवर असलेले अपार प्रेम व्यक्‍त होते.योहान ३:१६ वाचा.

१३, १४. यहोवाने आपल्याकरता जे केले आहे ते समजण्यास व त्याची कदर करण्यास अब्राहामाचे उदाहरण आपल्याला कशा प्रकारे मदत करू शकते?

१३ खंडणीची तरतूद करण्याद्वारे आपल्याबद्दल प्रेम व्यक्‍त करण्यासाठी यहोवाला कोणती किंमत मोजावी लागली? मानव या नात्याने आपण हे पूर्णपणे समजू शकत नाही. पण, बायबलमधील एक अहवाल आपल्याला हे अधिक स्पष्टपणे समजून घेण्यास मदत करू शकतो. यहोवाने आपला विश्‍वासू सेवक अब्राहाम यास एक अतिशय कठीण गोष्ट करण्यास सांगितली. त्याने त्याला इसहाक या त्याच्या एकुलत्या एका पुत्राचे बलिदान देण्यास सांगितले. अब्राहामाचे आपल्या पुत्रावर अतोनात प्रेम होते. यहोवाने इसहाकाविषयी अब्राहामाशी बोलताना त्याला “तुझा पुत्र, तुझा एकुलता एक प्रिय इसहाक” असे म्हटले होते. (उत्प. २२:२) तरीसुद्धा, इसहाकावर असलेल्या प्रेमापेक्षा यहोवाच्या इच्छेनुसार करणे जास्त महत्त्वाचे आहे हे अब्राहामाने ओळखले. त्यामुळे, मागेपुढे न पाहता त्याने यहोवाने सांगितल्यानुसार केले. पण, यहोवा स्वतः पुढे जे करणार होता, ते त्याने अब्राहामाला करू दिले नाही. अब्राहाम आपल्या पुत्राचे बलिदान देणारच होता, तेवढ्यात देवाने एका देवदूताला पाठवून त्याला रोखले. या कठीण परीक्षेत देवाच्या आज्ञेनुसार वागण्याचा अब्राहामाचा निश्‍चय इतका पक्का होता की आता फक्‍त पुनरुत्थानाच्या द्वारेच इसहाकाला पुन्हा जिवंत पाहता येईल असे त्याला वाटले. देव असे पुनरुत्थान करू शकतो यावर त्याला पूर्ण विश्‍वास होता. म्हणूनच पौलाने म्हटले, की अब्राहामाला “लाक्षणिक अर्थाने” पुनरुत्थानाद्वारे इसहाक परत मिळाला.—इब्री ११:१९.

१४ अब्राहाम आपल्या प्रिय इसहाकाचा बली देण्याची तयारी करू लागला, तेव्हा त्याला किती यातना होत असतील याची कल्पना तुम्ही करू शकता का? यहोवाने ज्याच्याविषयी “हा माझा पुत्र, मला परमप्रिय आहे” असे म्हटले, त्याचे बलिदान देताना त्याला कसे वाटले असेल हे काही प्रमाणात अब्राहामाच्या अनुभवावरून आपल्याला समजण्यास मदत मिळते. (मत्त. ३:१७) पण, यहोवाला अब्राहामापेक्षा कितीतरी जास्त यातना झाल्या असतील हे विसरू नका. कारण त्याने व त्याच्या पुत्राने स्वर्गात कोट्यवधी, कदाचित अब्जावधी वर्षे सोबत घालवली होती. पित्याला प्रिय असलेला “कुशल कारागीर” आणि त्याच्या वतीने बोलणारा “शब्द” या नात्याने देवाच्या पुत्राने आनंदाने कार्य केले होते. (नीति. ८:२२, ३०, ३१; योहा. १:१) त्यामुळे, पुत्राला छळले गेले, त्याची थट्टा करण्यात आली आणि शेवटी त्याला गुन्हेगार ठरवून जिवे मारण्यात आले तेव्हा यहोवाला जे सहन करावे लागले ते आपल्या समजण्यापलीकडे आहे. आपल्या सुटकेसाठी यहोवाने खरोखर अतिशय भारी किंमत मोजली एवढेच आपण म्हणू शकतो! तर मग, आपल्याला मिळालेल्या या सुटकेची आपण कदर करतो हे आपल्याला कसे दाखवता येईल?

मिळालेल्या सुटकेची तुम्हाला कदर आहे हे कसे दाखवाल?

१५. येशूने कशा प्रकारे प्रायश्‍चित्ताचे महान कार्य पूर्ण केले आणि यामुळे काय शक्य झाले?

१५ पुनरुत्थान होऊन स्वर्गात गेल्यानंतर येशूने मानवजातीसाठी केलेल्या प्रायश्‍चित्ताचे महान कार्य पूर्ण केले. आपल्या प्रिय पित्याकडे परत गेल्यावर त्याने आपल्या बलिदानाचे मूल्य त्याला सादर केले. यामुळे अद्‌भुत आशीर्वाद मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. सर्वप्रथम ख्रिस्ताच्या अभिषिक्‍त बांधवांच्या आणि मग “सर्व जगाच्याहि” पापांची पूर्ण क्षमा मिळणे शक्य झाले. त्या बलिदानामुळेच, आज जो कोणी आपल्या पापांबद्दल मनःपूर्वक पश्‍चात्ताप करून खऱ्‍या अर्थाने ख्रिस्ताचा अनुयायी बनतो तो यहोवा देवासोबत एक घनिष्ठ नातेसंबंध जोडू शकतो. (१ योहा. २:२) या आशीर्वादांचा लाभ घेण्यासाठी तुम्ही काय केले पाहिजे?

१६. यहोवाने आपल्याकरता शक्य केलेल्या सुटकेची आपण का कदर केली पाहिजे हे उदाहरणाच्या साहाय्याने कशा प्रकारे स्पष्ट करता येईल?

१६ सुरुवातीला सांगितलेल्या उदाहरणाकडे पुन्हा वळू या. रोगावर उपाय शोधणारा डॉक्टर तुमच्या वॉर्डमध्ये असलेल्या रुग्णांना असे सांगतो अशी कल्पना करा: कोणत्याही रुग्णाने औषधोपचार घेऊन, सांगितलेल्या पथ्याचे पालन केल्यास तो हमखास बरा होईल. समजा, तुमच्यासोबतच्या बहुतेक रुग्णांनी हा उपचार घेणे किंवा हे पथ्य पाळणे फारच कठीण आहे असे म्हणून डॉक्टरांचा सल्ला नाकारला तर? हा उपचार खरोखरच गुणकारी आहे याचा खातरीलायक पुरावा तुमच्याजवळ असूनही तुम्ही त्या इतर रुग्णांचे ऐकाल का? साहजिकच, तुम्ही त्यांचे ऐकणार नाही! उलट, तुम्ही या उपचाराबद्दल मनापासून आभार व्यक्‍त कराल, डॉक्टरांच्या सल्ल्याचे काटेकोरपणे पालन कराल आणि कदाचित इतरांनाही तुमच्या निर्णयाबद्दल सांगाल. तर मग, यहोवाने त्याच्या पुत्राच्या खंडणी बलिदानाच्या माध्यमाने शक्य केलेल्या सुटकेबद्दल कृतज्ञता व्यक्‍त करण्यास आपल्यापैकी प्रत्येकाने कितीतरी जास्त उत्सुक असू नये का?रोमकर ६:१७, १८ वाचा.

१७. तुमच्या सुटकेसाठी यहोवाने जे केले आहे त्याबद्दल तुम्ही कोणकोणत्या मार्गांनी आपली कदर व्यक्‍त करू शकता?

१७ यहोवाने व त्याच्या पुत्राने आपल्याला पापाच्या व मृत्यूच्या विळख्यातून सोडवण्यासाठी जे काही केले आहे त्याची मनापासून कदर वाटत असेल, तर आपण ती व्यक्‍त केल्याशिवाय राहणार नाही. (१ योहा. ५:३) पाप करण्याच्या आपल्या प्रवृत्तीविरुद्ध आपण सतत लढत राहू. आपण जाणूनबुजून पाप करणार नाही आणि धार्मिकतेचा आव आणून दुटप्पी जीवन जगणार नाही. अशा प्रकारे वागल्यास आपल्याला खंडणीची जराही किंमत नाही असा त्याचा अर्थ होईल. त्याऐवजी, देवाच्या नजरेत शुद्ध राहण्याचा हरतऱ्‍हेने प्रयत्न करून आपण आपली कृतज्ञता व्यक्‍त करू. (२ पेत्र ३:१४) तसेच, आपली कदर व्यक्‍त करण्यासाठी, पाप व मृत्यूपासून सुटकेच्या या अद्‌भुत आशेविषयी आपण इतरांनाही सांगू, जेणेकरून त्यांनाही यहोवासोबत घनिष्ठ नातेसंबंध जोडता येईल आणि सार्वकालिक जीवनाची आशा मिळवता येईल. (१ तीम. ४:१६) खरोखर, यहोवाने व त्याच्या पुत्राने आपल्याकरता जे केले आहे त्याचा विचार करता, आपण त्यांची स्तुती करण्यासाठी जास्तीत जास्त वेळ व शक्‍ती खर्च करण्यास नेहमी प्रयत्नशील असले पाहिजे! (मार्क १२:२८-३०) विचार करा! एक असा दिवस येणार आहे जेव्हा आपण पापाच्या प्राणघातक रोगापासून पूर्णपणे मुक्‍त झालेले असू. मग, यहोवाच्या मनात होते तशा प्रकारचे, अर्थात परिपूर्ण जीवन आपण सदासर्वकाळ उपभोगू. आणि हे सर्व यहोवाने आपल्या सुटकेसाठी जे केले आहे त्यामुळेच!—रोम. ८:२१.

[तळटीप]

^ परि. 3 स्पॅनिश फ्लूची साथ आली तेव्हा जगातील एकूण लोकसंख्येपैकी २०-५० टक्के लोकांना याचा संसर्ग झाल्याचे सांगण्यात येते. संसर्ग झालेल्यांपैकी या विषाणूने १ ते १० टक्के लोकांचा बळी घेतला असण्याची शक्यता आहे. याच्या तुलनेत एबोला हा कमी ओळखीचा रोग आहे. पण या रोगाचा उद्‌भव झाला तेव्हा त्याने काही वेळा, संसर्ग झालेल्यांपैकी जवळजवळ ९० टक्के लोकांचा बळी घेतला.

तुमचे उत्तर काय असेल?

• तुम्हाला सुटकेची अत्यंत गरज का आहे?

• येशूने केलेल्या त्यागाचा तुमच्यावर काय प्रभाव पडतो?

• यहोवाने दिलेल्या खंडणीच्या देणगीबद्दल तुम्हाला कसे वाटते?

• यहोवाने तुमच्या सुटकेसाठी केलेल्या तरतुदींच्या बदल्यात तुम्हाला काय करण्याची प्रेरणा मिळते?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२७ पानांवरील चित्र]

प्रायश्‍चित्ताच्या दिवशी इस्राएलचा मुख्य याजक मशीहाला चित्रित करत असे

[२८ पानांवरील चित्र]

अब्राहामाने आपल्या पुत्राला अर्पण करण्याची तयारी दाखवली, यावरून यहोवाने केलेल्या कितीतरी मोठ्या त्यागाबद्दल पुष्कळ काही शिकायला मिळते