व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवा आपल्याकडून काय मागतो?

यहोवा आपल्याकडून काय मागतो?

देवाच्या जवळ या

यहोवा आपल्याकडून काय मागतो?

अनुवाद १०:१२, १३

आज्ञा मानावी की नाही हा निर्णय नेहमीच सोपा नसतो. एखादा अधिकारी जर खूपच कडक किंवा जास्त अपेक्षा करणारा असेल तर त्याच्या हाताखाली काम करणारे फक्‍त वरवर त्याला आदर दाखवतील. यहोवा देवाचे सर्व उपासक मात्र त्याचा मनापासून आदर करतात. का? या प्रश्‍नाचे उत्तर मिळवण्यासाठी आपण अनुवाद १०:१२, १३ येथील मोशेच्या शब्दांकडे लक्ष देऊया. *

देवाच्या अपेक्षांचे तात्पर्य सांगताना मोशेने एक विचार करायला लावणारा प्रश्‍न विचारला: ‘तुझा देव यहोवा तुझ्यापासून . . . काय मागतो?’ (वचन १३) देव आपल्याकडून त्याला जे पाहिजे ते मागू शकतो. कारण तो सार्वभौम परमेश्‍वर, जीवनाचा स्त्रोत व आपल्या जीवाचे तारण करणारा आहे. (स्तोत्र ३६:९; यशया ३३:२२) आपण यहोवाच्या आज्ञेत राहिले पाहिजे हे सांगण्याचा त्याला हक्क आहे. पण, बळजबरीने आपण त्याची आज्ञा पाळावी असे त्याला वाटत नाही. मग तो आपल्याकडून कशाची अपेक्षा करतो? आपण त्याच्या आज्ञांचे “पालन . . . मनापासून” करावे अशी अपेक्षा तो करतो.—रोमकर ६:१७.

देवाची आज्ञा पूर्ण मनाने मानण्यास आपल्याला काय प्रेरित करेल? मोशे एका गोष्टीबद्दल सांगतो: “तू आपला देव परमेश्‍वर ह्‍याचे भय धरावे.” * (वचन १२) हे वाईट परिणामांच्या भीतीमुळे वाटणारे भय नाही तर देव व त्याच्या मार्गांबद्दल वाटणारे हितकारक, आदरयुक्‍त भय आहे. जर आपल्या मनात देवाबद्दल गहिरा आदर असेल तर तो नाखुश होईल असे आपण काहीही करणार नाही.

कोणत्या प्रमुख कारणामुळे आपण देवाची आज्ञा मानली पाहिजे? मोशेने इस्राएली लोकांना असे म्हटले की तुम्ही “त्याच्यावर [यहोवावर] प्रीति करावी, पूर्ण मनाने व पूर्ण जिवाने तुझा देव परमेश्‍वर ह्‍याची सेवा करावी.” (वचन १२) देवावर माझे प्रेम आहे, फक्‍त असे म्हणणेच पुरेसे नाही यात आणखीही काही गोवलेले आहे. एक संदर्भ ग्रंथ स्पष्ट करतो: “भावनांसाठी जी इब्री क्रियापदे आहेत ती कधीकधी, या भावनांमुळे प्रेरित होऊन आपण जी कृती करतो त्यांस सूचित करतात.” हाच संदर्भ ग्रंथ पुढे असे म्हणतो की देवावर प्रेम करणे म्हणजे “कार्यांद्वारे आपले प्रेम व्यक्‍त करणे.” दुसऱ्‍या शब्दात सांगायचे झाल्यास, आपले खरेच देवावर प्रेम असेल तर आपण त्याला आनंदित करणाऱ्‍या मार्गांनी चालू.—नीतिसूत्रे २७:११.

देवाची आज्ञा आपण कितपत मानली पाहिजे? मोशेने म्हटले: ‘त्याच्या सर्व मार्गांनी चाला.’ (वचन १२) यहोवाच्या आपल्याकडून ज्या अपेक्षा आहेत त्या आपण पूर्ण कराव्यात असे त्याला वाटते. अशा प्रकारे पूर्णपणे आज्ञाधारक राहिल्याने आपले नुकसान होईल का? असे होणे अशक्य आहे.

आपण जर मनापासून आज्ञांचे पालन केले तर आपल्याला अनेक आशीर्वाद मिळतील. मोशेने लिहिले: ‘परमेश्‍वराच्या ज्या आज्ञा . . . मी आज तुझ्या बऱ्‍यासाठी सांगत आहे त्या तू पाळाव्यात.’ (वचन १३) होय, यहोवाची प्रत्येक आज्ञा अर्थात तो आपल्याकडून जे काही मागतो ते सर्व आपल्या हिताचेच आहे. देवाने आपल्याकडून अशी अपेक्षा करणे योग्यच आहे, “कारण देव प्रीति आहे” असे बायबल म्हणते. (१ योहान ४:८) त्याने आपल्याला अशाच आज्ञा दिल्या आहेत ज्यांचे पालन केल्याने आपले हित होते. (यशया ४८:१७) यहोवा आपल्याकडून ज्या अपेक्षा करतो त्या पूर्ण केल्याने आपण सध्या अनेक समस्यांपासून वाचू शकतो व भविष्यात आपल्याला त्याच्या राज्याधिकाराखाली अनंत काळासाठी आशीर्वाद मिळू शकतात. *

आज्ञा मानावी की मानू नये हा प्रश्‍न जेव्हा यहोवाने दिलेल्या आज्ञेबद्दल विचारला जातो तेव्हा आपले उत्तर होय असेच असेल. कारण यहोवाच्या आज्ञा मानण्याला पर्याय नाही. पूर्णपणे व स्वेच्छेने केलेल्या आज्ञांचे पालन नेहमीच योग्य असते. अशा प्रकारच्या विश्‍वासूपणाच्या आचरणामुळे आपण नेहमी आपल्या हिताची काळजी करणाऱ्‍या प्रेमळ यहोवा देवाच्या आणखी जवळ येऊ. (w०९-E १०/०१)

[तळटीपा]

^ परि. 4 मोशेचे शब्द जरी प्राचीन इस्राएली लोकांना लागू होणारे असले तरी आज देवाला संतुष्ट करू इच्छिणाऱ्‍या सर्वांना त्यातील तत्त्वांचा उपयोग होतो.—रोमकर १५:४.

^ परि. 6 अनुवादाच्या संपूर्ण पुस्तकात मोशेने देवाचे भय त्याच्या सेवकांच्या जीवनातील मार्गदर्शक तत्त्व असले पाहिजे यावर भर दिला आहे.—अनुवाद ४:१०; ६:१३, २४; ८:६; १३:४; ३१:१२, १३.

^ परि. 9 अधिक माहितीसाठी यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकातील “पृथ्वीबद्दल देवाचा काय उद्देश आहे?,” हा अध्याय ३ पाहा.