व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या सेवेत व्यस्त असूनही आनंदी राहणे

देवाच्या सेवेत व्यस्त असूनही आनंदी राहणे

देवाच्या सेवेत व्यस्त असूनही आनंदी राहणे

तुम्ही आनंदी असावे अशी यहोवाची इच्छा आहे. (स्तो. १००:२) पण, देवाचे सेवक या नात्याने अनेक जबाबदाऱ्‍याही पार पाडाव्या लागत असल्यामुळे कदाचित तुमचे जीवन अतिशय व्यस्त असेल. तुम्ही देवाला आपले जीवन समर्पित केले होते, तेव्हा कदाचित तुम्ही इतके व्यस्त नसाल. पण आता प्रापंचिक व आध्यात्मिक जबाबदाऱ्‍यांमुळे तुम्हाला दबावाखाली असल्यासारखे वाटू लागले असेल. मनाशी ठरवलेल्या अनेक गोष्टी करता न आल्यामुळे तुमचे मन तुम्हाला खात असेल. असे असल्यास, जीवनातल्या अनेक जबाबदाऱ्‍यांमध्ये योग्य समतोल साधून तुम्ही आपल्या जीवनात ‘परमेश्‍वराचा आनंद’ कसा टिकवून ठेवू शकता?—नहे. ८:१०.

शेवटल्या कठीण काळात राहत असल्यामुळे आज आपल्याला पुष्कळ दबावांना तोंड द्यावे लागते. म्हणूनच, जीवनात सर्व काही सुनियोजित, व्यवस्थित पद्धतीने करण्याची आपण स्वतःला सवय लावली पाहिजे. यासंदर्भात पौलाने दिलेल्या सल्ल्यातील काही मुद्दे अतिशय समयोचित आहेत. पौलाने म्हटले: “अज्ञान्यांसारखे नव्हे तर ज्ञान्यांसारखे सभोवार नजर ठेवून जपून चाला. वेळेचा सदुपयोग करा, कारण दिवस वाईट आहेत.”—इफिस. ५:१५, १६.

हा सुज्ञ सल्ला लक्षात घेऊन, साध्य करता येतील अशी व्यावहारिक ध्येये तुम्हाला कशी ठेवता येतील? तसेच वैयक्‍तिक अभ्यास, कुटुंबाची देखभाल, सेवाकार्य, नोकरीव्यवसाय आणि इतर आवश्‍यक कार्यांमध्ये तुम्ही कशा प्रकारे समतोल साधू शकता?

तुम्ही आपले जीवन देवाला समर्पित करून बाप्तिस्मा घेतला तेव्हा तुम्हाला किती आनंद झाला होता हे तुम्हाला आठवते का? यहोवा व त्याच्या उद्देशांविषयीचे ज्ञान हे त्या आनंदाचे गुपित होते. अर्थात, हे सुस्पष्ट ज्ञान व हा आनंद प्राप्त करण्यासाठी तुम्हाला अनेक महिन्यांपर्यंत बायबलचा काळजीपूर्वक अभ्यास करावा लागला असेल. पण, तुमची सर्व मेहनत नक्कीच व्यर्थ ठरली नाही. कारण, बायबलच्या अभ्यासामुळे तुमच्या जीवनाला एक नवी दिशा मिळाली.

पण सुरुवातीचा तो आनंद टिकवून ठेवण्यासाठी पुढेही बायबलचा नियमित अभ्यास करत राहणे गरजेचे आहे. जर तुम्हाला बायबल वाचण्यासाठी व अभ्यास करण्यासाठी वेळ काढणे खूप कठीण वाटत असेल, तर तुमचा नित्यक्रम पडताळून पाहा. दररोज काही मिनिटे जरी तुम्ही अभ्यास व मनन करण्याकरता काढली, तरी यामुळे तुम्हाला यहोवाच्या आणखी जवळ येण्यास मदत मिळेल व तुमच्या आनंदात नक्कीच भर पडेल.

देवाच्या सेवकांपैकी बहुतेकांना कमी महत्त्वाच्या गोष्टींसाठी दिल्या जाणाऱ्‍या वेळातून काही वेळ महत्त्वाच्या कार्यांसाठी काढणे शक्य आहे. स्वतःला हा प्रश्‍न विचारा: ‘बाहेरची मासिके, वृत्तपत्रे वाचण्यासाठी, टीव्ही पाहण्यासाठी, संगीत ऐकण्यासाठी किंवा एखादा छंद जोपासण्यासाठी मी किती वेळ खर्च करतो?’ या गोष्टींचा माफक प्रमाणात आस्वाद घेतला तरच त्या खऱ्‍या अर्थाने आनंददायक ठरतात. (१ तीम. ४:८) तेव्हा, वेळेचे नीट संयोजन न केल्यामुळे तुम्हाला बायबल अभ्यासाकरता वेळ मिळत नाही असे आढळल्यास, आपल्या वेळापत्रकात आवश्‍यक फेरबदल करण्यासाठी लवकरात लवकर पावले उचला.

पत्नी व तीन मुलांचे कुटुंब असलेले व मंडळीत वडील म्हणून सेवा करणारे आदाम आपल्याला कोणती गोष्ट साहाय्यक ठरली आहे हे सांगतात: “मी शक्य तितकं साधंसुधं जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. वेळखाऊ छंद, तसंच, ज्यांकडे खूप लक्ष द्यावं लागेल अशा वस्तू विकत घेण्याचं मी सहसा टाळतो. याचा अर्थ माझ्या जीवनात मौजमजाच नाही असं नाही. इतकंच, की मी अगदी साध्या प्रकारचं मनोरंजन निवडतो.”

तुमच्या निर्णयांमुळे घडून आलेल्या चांगल्या परिणामांवर मनन केल्यास तुमचा आनंद वाढत जाईल आणि तुम्हाला जीवनात आशावादी दृष्टिकोन बाळगण्यास साहाय्य मिळेल. उदाहरणार्थ मार्यूश, ज्यांना तीन मुले आहेत व जे मंडळीत वडील म्हणून सेवा करतात, ते सांगतात: “मी बायबलचा अभ्यास करण्यास सुरुवात केली तेव्हापासून मी जीवनाकडे आशावादी दृष्टिकोनाने पाहण्यास शिकलो. अर्थात, अधूनमधून आजही माझ्या जीवनात समस्या येतात, ज्यांपैकी बऱ्‍याच केवळ यहोवा जाणतो. पण तो सदैव पाठीशी आहे या जाणिवेमुळे मी भविष्याकडे आशावादी दृष्टिकोनाने पाहतो.”

अर्थात, मार्यूश यांच्यासारखा आशावादी दृष्टिकोन विकसित केल्यामुळे तुमच्या सर्व चिंता पूर्णपणे नाहीशा होणार नाहीत. पण अशा प्रकारच्या दृष्टिकोनामुळे तुम्हाला आपले भावनिक संतुलन न गमावता जीवनातील समस्यांना अधिक चांगल्या प्रकारे तोंड देणे शक्य होईल. बायबल असे सांगते: “दुःखग्रस्ताला सर्व दिवस वाईट असतात, पण ज्याचे हृदय आनंदी असते त्याला सदा मेजवानी असते.” (नीति. १५:१५) शिवाय, देवाने आजपर्यंत कोणकोणत्या मार्गांनी तुमच्याबद्दल प्रेम व्यक्‍त केले आहे यावर मनन करा. असे केल्यामुळे देवावरील तुमचे प्रेम आणि त्याच्या सेवेतील तुमचा आनंद आणखी वाढेल.—मत्त. २२:३७.

यहोवा व त्याच्या राज्याशी संबंधित कार्यांना प्राधान्य दिल्यामुळे कुटुंबाच्याही आनंदात भर पडते. कुटुंबातील सर्वांनी ख्रिस्ती गुण उत्पन्‍न करण्याचा प्रयत्न केल्यामुळे आपसांतील ताणतणाव कमी होतात, कुटुंबाचे सदस्य एकमेकांच्या आणखी जवळ येतात आणि एकंदरीत कुटुंबातले वातावरण अधिक सुखकर होते. परिणामस्वरूप, कुटुंबातील सर्वांसाठी घर हे शांती, समाधान व सुरक्षा देणारे स्थान बनते.—स्तो. १३३:१.

संपूर्ण कुटुंब मिळून आध्यात्मिक कार्यांत सहभागी झाल्यामुळे खरा आनंद मिळतो. मार्यूश म्हणतात: “कुटुंब म्हणून आम्ही जो वेळ सोबत मिळून घालवतो तो मला अतिशय महत्त्वाचा वाटतो. या बाबतीत माझी बायको मला नेहमीच खूप साथ देते. क्षेत्र सेवेला किंवा अधिवेशनांआधी स्टेडियमची स्वच्छता करायला मी जातो तेव्हा सहसा ती माझ्या सोबतच असते. तसेच, मी निरनिराळ्या मंडळ्यांमध्ये जाहीर भाषणं द्यायला जातो तेव्हासुद्धा ती मला सोबत देते. यामुळे, मला तिचा आधार वाटतो.”

बायबल ख्रिश्‍चनांना आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करण्याची आज्ञा देते. (१ तीम. ५:८) पण, तुमचा जास्तीत जास्त वेळ व शक्‍ती नोकरीत खर्च होत असेल तर देवाच्या सेवेतील तुमच्या आनंदावर विरजण पडू शकते. असे असल्यास, याबाबतीत यहोवाला प्रार्थना करा. (स्तो. ५५:२२) देवाच्या राज्याला जीवनात प्रथम स्थान देण्याच्या इच्छेमुळे काहींना आपली नोकरी बदलण्याची आवश्‍यकता वाटली. कोणत्याही ख्रिस्ती व्यक्‍तीने केवळ लठ्ठ पगाराच्या लालसेने, खूप वेळ व शक्‍ती घेणाऱ्‍या नोकरीत अडकून जास्त महत्त्वाच्या असलेल्या आध्यात्मिक गोष्टींकडे दुर्लक्ष करू नये.—नीति. २२:३.

जी नोकरी धरण्याच्या तुम्ही विचारात आहात किंवा सध्या जी नोकरी करत आहात तिचे सर्व फायदे व तोटे एका कागदावर लिहून काढणे तुम्हाला साहाय्यक ठरेल. चांगला पगार आणि समाधान देणारे काम या गोष्टी नक्कीच चांगल्या आहेत. पण तुमच्या नोकरीमुळे कुटुंबाच्या आध्यात्मिक प्रगतीला हातभार लावणे तुम्हाला शक्य होते का? या सर्व गोष्टींचा प्रामाणिकपणे विचार करा आणि यहोवासोबतच्या आपल्या नातेसंबंधाला सर्वात जास्त महत्त्व देऊनच निर्णय घ्या.

तुमच्या सध्याच्या नोकरीमुळे तुम्हाला आध्यात्मिक प्रगती करण्यास वाव मिळत नसल्यास, तुमच्या परिस्थितीत काही बदल करणे जरुरीचे आहे. आध्यात्मिक गोष्टींकरता वेळ देता यावा म्हणून अनेक ख्रिश्‍चनांनी आपल्या जीवनात आमूलाग्र बदल केले आहेत. पोलंडमध्ये राहणारा एक बांधव असे म्हणतो: “एकदा अशी वेळ आली की नोकरी सोडून देणं हा एकच पर्याय माझ्यापुढं उरला होता, कारण मला सारखं दौऱ्‍यावर जावं लागायचं. आध्यात्मिक गोष्टींकडे किंवा माझ्या कुटुंबाकडे लक्ष देण्यासाठी माझ्याजवळ वेळच नसायचा.” आज या बांधवाने आपल्या उपजिविकेसाठी अशी नोकरी धरली आहे ज्यात पूर्वीच्या तुलनेत त्यांना फार कमी वेळ व शक्‍ती खर्च करावी लागते.

इतरांना मदत करण्यात आनंद माना

येशूने म्हटले, “घेण्यापेक्षा देणे ह्‍यात जास्त धन्यता [“आनंद,” NW] आहे.” (प्रे. कृत्ये २०:३५) इतरांना काही देण्याच्या ख्रिश्‍चनांजवळ अनेक संधी आहेत. कधीकधी केवळ एखाद्याकडे पाहून स्मितहास्य करणे, त्याच्याशी हात मिळवणे, किंवा सेवेतील एखादी नेमणूक पार पाडण्यासाठी केलेल्या परिश्रमासाठी मनापासून आभार मानणे हे त्या व्यक्‍तीसाठी व तुमच्यासाठीही अतिशय आनंददायक ठरू शकते.

प्रेषित पौलाने आपल्या बांधवांना असे प्रोत्साहन दिले: “जे अल्पधीराचे आहेत त्यांना धीर द्या. अशक्‍तांना आधार द्या.” (१ थेस्सलनी. ५:१४) निराशेच्या गर्तेत असलेल्या व्यक्‍तीला आपण स्वतःच्या बळावर समस्यांचा सामना करू शकत नाही असे वाटू शकते. तुम्ही अशा बांधवांना मदतीचा हात देऊ शकता का? एखादा बांधव यहोवाच्या सेवेत इतका आनंदी वाटत नाही असे दिसल्यास त्याला उत्तेजन देण्याचा प्रयत्न करा. असे केल्याने तुम्हालाही प्रोत्साहन मिळेल. अर्थात काही समस्यांवर मात करणे मानवांच्या हातात नाही. तरीसुद्धा, तुम्ही आपल्या बांधवाप्रती मनःपूर्वक सहानुभूती नक्कीच व्यक्‍त करू शकता. तसेच, आपल्या लोकांना कधीही न सोडणाऱ्‍या यहोवा देवावर विसंबून राहण्याचे तुम्ही त्याला प्रोत्साहन देऊ शकता. जे यहोवावर भरवसा ठेवतात त्यांची कधीही निराशा होणार नाही.—स्तो. २७:१०; यश. ५९:१.

तुम्हाला आणखी एक गोष्ट करता येईल. निरुत्साही झालेल्या बांधवाला तुम्ही आपल्यासोबत सेवाकार्याला नेऊ शकता. येशूने आपल्या ७० शिष्यांना प्रचाराकरता पाठवले तेव्हा त्याने त्यांना “दोघे दोघे असे” पाठवले. (लूक १०:१) यामुळे सोबत जाणाऱ्‍या दोघांनाही एकमेकांकडून नक्कीच प्रोत्साहन मिळाले असेल, नाही का? तर मग याच मार्गाने तुम्ही आपल्या बांधवांना यहोवाच्या सेवेतील गमावलेला आनंद पुन्हा मिळवण्यास मदत करू शकाल का?

आपल्याला जीवनात अनेक वाजवी चिंता-विवंचनांना तोंड द्यावे लागते यात शंकाच नाही. तरीसुद्धा, पौलाने आपल्याला असा सल्ला दिला: “प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा; पुन्हा म्हणेन, आनंद करा.” (फिलिप्पै. ४:४) आज तुमचे जीवन अर्थपूर्ण, उद्देशपूर्ण आहे. याचे कारण म्हणजे तुमचे देवावर प्रेम आहे. त्याच्या आज्ञांचे तुम्ही पालन करता. तसेच, त्याने तुमच्यावर सोपवलेले कार्य आवेशाने करण्यास व त्यात टिकून राहण्यास तुम्ही प्रयत्नशील आहात. हेच तुमच्या आनंदाचे रहस्य आहे. शिवाय, जीवनातील ताणतणाव व समस्यांना तोंड देण्यास यहोवा नेहमी तुमच्या पाठीशी असतो.—रोम. २:६, ७.

बायबलमधील प्रतिज्ञांवर आपला विश्‍वास असल्यामुळे, यहोवाने वचन दिलेल्या नव्या जगाच्या आपण किती जवळ आहोत याची आपल्याला जाणीव आहे. त्या नव्या जगात आपल्याला कितीतरी आनंददायक आशीर्वाद लाभतील! (स्तो. ३७:३४) ही आशा नक्कीच आपल्याला आनंदी राहण्यास मदत करते. पण त्याच वेळेस, आजही यहोवाने आपल्याला किती आशीर्वाद दिले आहेत, हे आपण सदोदित आठवणीत ठेवले पाहिजे. असे केल्यास, ‘हर्षाने परमेश्‍वराची सेवा करत’ राहणे आपल्याला शक्य होईल.—स्तो. १००:२.

[८ पानांवरील रेखाचित्र]

(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)

देवाच्या सेवेतील आनंद टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक गोष्टीला तुम्ही जो वेळ देता त्यात कदाचित तुम्हाला काही फेरबदल करावा लागेल

करमणूक व मनोरंजन

घरादाराची व कुटुंबाची काळजी

नोकरी-व्यवसाय

ख्रिस्ती सभा

वैयक्‍तिक अभ्यास

सेवाकार्य

[१० पानांवरील चित्रे]

हरवलेला आनंद पुन्हा मिळवण्यास तुम्ही इतरांना मदत करू शकता का?