व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्ही यहोवाला समर्पण का केले पाहिजे?

तुम्ही यहोवाला समर्पण का केले पाहिजे?

तुम्ही यहोवाला समर्पण का केले पाहिजे?

‘ज्याचा मी आहे त्या देवाचा दूत गेल्या रात्री माझ्याजवळ उभा राहिला.’—प्रे. कृत्ये २७:२३.

१. बाप्तिस्मा घेण्याची इच्छा असलेल्यांनी कोणती पावले आधीच उचललेली असतात आणि यामुळे कोणते प्रश्‍न उपस्थित होतात?

 “येशू ख्रिस्ताच्या बलिदानाच्या आधारावर, तुम्ही आपल्या पापांबद्दल पश्‍चात्ताप करून आपले जीवन यहोवाची इच्छा पूर्ण करण्याकरता त्याला समर्पित केले आहे का?” बाप्तिस्म्याच्या भाषणाच्या शेवटी, बाप्तिस्मा घेऊ इच्छिणारे उमेदवार ज्या दोन प्रश्‍नांचे उत्तर देतात त्यांपैकी हा एक प्रश्‍न आहे. पण, ख्रिश्‍चनांनी यहोवाला आपले जीवन समर्पित करणे का आवश्‍यक आहे? देवाला समर्पण केल्याने आपल्याला काय फायदा होतो? जोपर्यंत एक व्यक्‍ती देवाला समर्पण करत नाही तोपर्यंत तिला स्वीकारयोग्य पद्धतीने देवाची उपासना करणे शक्य नाही असे का म्हणता येईल? या प्रश्‍नांची उत्तरे समजून घेण्यासाठी समर्पण म्हणजे काय हे आपण आधी पाहिले पाहिजे.

२. यहोवाला आपले जीवन समर्पित करण्याचा काय अर्थ होतो?

देवाला आपले जीवन समर्पित करण्याचा काय अर्थ होतो? प्रेषित पौलाने देवासोबतच्या आपल्या नातेसंबंधाचे वर्णन कसे केले ते विचारात घ्या. त्याने वादळात सापडलेल्या एका जहाजात असताना सर्वांच्या देखत आपण यहोवाचे आहोत असे कबूल केले. त्याने म्हटले: ‘ज्याचा मी आहे त्या देवाचा दूत गेल्या रात्री माझ्याजवळ उभा राहिला.’ (प्रेषितांची कृत्ये २७:२२-२४ वाचा.) पौलाप्रमाणेच सर्व खरे ख्रिस्ती यहोवाचे आहेत. याच्या अगदी उलट, जगातले लोक ‘त्या दुष्टाला [सैतानाला] वश झाले आहेत.’ (१ योहा. ५:१९) ख्रिस्ती जेव्हा प्रार्थनेत यहोवाला स्वतःचे स्वीकारयोग्य समर्पण करतात तेव्हा ते यहोवाचे बनतात. हे समर्पण म्हणजे एका व्यक्‍तीने स्वतःहून घेतलेली शपथ आहे. अशा प्रकारे समर्पण केल्यानंतर त्या व्यक्‍तीचा पाण्यात बाप्तिस्मा होतो.

३. येशूच्या बाप्तिस्म्यावरून काय सूचित झाले, आणि त्याचे अनुयायी त्याच्या उदाहरणाचे कशा प्रकारे अनुकरण करू शकतात?

या संदर्भात आपल्यासमोर येशूचे उत्तम उदाहरण आहे. त्याने देवाची इच्छा पूर्ण करण्याचे स्वेच्छेने निवडले. त्याचा इस्राएलात, अर्थात देवाला समर्पित असलेल्या एका राष्ट्रात जन्म झाला होता आणि त्याअर्थी तो आधीच यहोवाला समर्पित होता. तरीसुद्धा, बाप्तिस्मा घेण्याद्वारे तो नियमशास्त्रानुसार जे अपेक्षित होते त्याच्या एक पाऊल पुढे गेला. बायबल दाखवते की त्याच्या बाप्तिस्म्याच्या वेळी त्याने म्हटले: ‘पाहा, हे देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी मी आलो आहे.’ (इब्री १०:७; लूक ३:२१) त्याअर्थी, येशूच्या बाप्तिस्म्यावरून तो आपल्या पित्याच्या इच्छेनुसार जीवन जगण्यासाठी स्वतःस देवाला सादर करत असल्याचे सूचित झाले. त्याचे अनुयायी देखील बाप्तिस्म्याकरता स्वतःस सादर करण्याद्वारे त्याच्या उदाहरणाचे अनुकरण करतात. अर्थात, त्यांच्या बाबतीत पाहिल्यास, त्यांच्या बाप्तिस्म्यावरून जाहीर रीत्या असे सूचित होते की त्यांनी प्रार्थनेत स्वतःचे जीवन देवाला समर्पित केले आहे.

समर्पणामुळे आपल्याला होणारा फायदा

४. दावीद आणि योनाथान यांच्या मैत्रीतून वचनबद्धतेविषयी आपल्याला काय दिसून येते?

ख्रिस्ती समर्पण ही केवळ वचनबद्धता नव्हे. तर ती यापेक्षा गंभीर अशी गोष्ट आहे. पण समर्पण केल्याने आपल्याला काय फायदा होतो? हे समजून घेण्याकरता मानवी नातेसंबंधांत वचनबद्धतेमुळे कोणते फायदे होतात हे विचारात घेऊ या. मैत्रीचे उदाहरण घ्या. मैत्रीचा आनंद अनुभवण्यासाठी, स्वतः एक चांगला मित्र असण्याची जबाबदारी तुम्हाला स्वीकारावी लागते. आणि त्यासाठी वचनबद्धता आवश्‍यक असते. म्हणजेच, सर्व प्रसंगी तुमच्या मित्राला साथ देण्यास तुम्ही बांधील असता. बायबलमध्ये वर्णन केलेल्या मैत्रीसंबंधांपैकी सर्वात उल्लेखनीय मैत्री दावीद व योनाथान यांची आहे. त्यांनी तर एकमेकांशी आणभाक किंवा मैत्रीचा करारही केला होता. (१ शमुवेल १७:५७; १८:१,  वाचा.) आजकाल इतकी वचनबद्धता अभावानेच आढळत असली तरी मित्र एकमेकांस वचनबद्ध असतात किंवा एकमेकांप्रती बांधील असतात तेव्हा मैत्रीसंबंध सहसा बहरतात.—नीति. १७:१७; १८:२४.

५. एका चांगल्या मालकाचा कायमचा दास बनल्यामुळे त्या दासाला कोणता फायदा होत असे?

देवाने इस्राएल राष्ट्राला दिलेल्या नियमशास्त्रात आणखी एका नातेसंबंधाबद्दल सांगण्यात आले होते, ज्यात वचनबद्धतेमुळे लोकांना फायदा होत असे. तो म्हणजे मालक व गुलाम यांच्यातील नातेसंबंध. एखाद्या दासाला आपल्या चांगल्या मालकाचा गुलाम बनून कायम त्याच्या घराण्यातच राहण्याची सुरक्षितता अनुभवायची असल्यास तो आपल्या मालकासोबत अशा प्रकारचा कायमस्वरूपी व बंधनकारक करार करू शकत होता. नियमशास्त्रात असे सांगितले होते, “जर तो दास साफ म्हणू लागला की, माझ्या धन्यावर व माझ्या बायकोमुलांवर मी प्रेम करितो, मी मुक्‍त होऊन जाणार नाही, तर त्याच्या धन्याने त्याला देवासमोर आणून दारापाशी किंवा दाराच्या चौकटीपाशी उभे करावे व अरीने त्याचा कान टोचावा म्हणजे तो आयुष्यभर त्याची चाकरी करील.”—निर्ग. २१:५, ६.

६, ७. (क) वचनबद्धतेमुळे लोकांना कशा प्रकारे फायदा होतो? (ख) यावरून यहोवासोबतच्या आपल्या नातेसंबंधाविषयी काय दिसून येते?

इतर नातेसंबंधांच्या तुलनेत, विवाह हा असा एक नातेसंबंध आहे ज्यात दोन्ही जोडीदारांनी एकमेकांशी पूर्णपणे वचनबद्ध असणे अत्यंत आवश्‍यक आहे. ही वचनबद्धता कागदोपत्री केलेल्या करारनाम्याशी नव्हे, तर एका व्यक्‍तीशी असते. लग्न न करता एकत्र राहणाऱ्‍या दोन व्यक्‍तींना किंवा त्यांच्या मुलांनाही खऱ्‍या अर्थाने सुरक्षितता अनुभवता येत नाही. पण सन्माननीय पद्धतीने विवाह केलेले जोडीदार एकमेकांशी वचनबद्ध असतात तेव्हा त्यांच्यात समस्या निर्माण झाल्या तरी त्या समस्या प्रेमळपणे सोडवण्याचा प्रयत्न करण्यास ते शास्त्रवचनांनुसार बांधील असतात.—मत्त. १९:५, ६; १ करिंथ. १३:७, ८; इब्री १३:४.

बायबल काळांत, व्यापारात व उद्योगधंद्यांत बंधनकारक करार केल्याने लोकांना फायदा व्हायचा. (मत्त. २०:१, २, ८) हीच गोष्ट आजही पाहायला मिळते. उदाहरणार्थ, व्यापार सुरू करण्याआधी किंवा एखाद्या कंपनीत रुजू होण्याआधी बंधनकारक लिखित करारपत्र असल्यास ते आपल्याकरता फायद्याचे ठरते. विचार करा, जर मैत्री, विवाह व नोकरीव्यवसाय यांसारख्या क्षेत्रांत वचनबद्धतेमुळे नातेसंबंध दृढ होत असतील, तर मग यहोवा देवाला पूर्ण मनाने केलेल्या समर्पणामुळे त्याच्यासोबतच्या नातेसंबंधात तुम्हाला आणखी किती फायदा होईल! आता आपण गतकाळातील काही व्यक्‍तींची उदाहरणे पाहू या, ज्यांना यहोवा देवाला स्वतःचे समर्पण केल्यामुळे अनेक आशीर्वाद मिळाले. तसेच, कशा प्रकारे त्यांच्या या समर्पणात केवळ वचनबद्धता नव्हे, तर आणखीही बरेच काही समाविष्ट होते हे देखील आपण पाहू या.

समर्पणामुळे इस्राएल राष्ट्राला झालेला फायदा

८. देवाला समर्पित असण्याचा इस्राएल लोकांसाठी काय अर्थ होता?

इस्राएल राष्ट्राने यहोवाच्या आज्ञांचे पालन करण्याचे वचन दिले तेव्हा ते एक समर्पित राष्ट्र बनले. यहोवाने त्यांना सीनाय पर्वताजवळ एकत्र करून असे सांगितले: “तुम्ही खरोखर माझी वाणी ऐकाल आणि माझा करार पाळाल तर सर्व लोकांपेक्षा माझा खास निधि व्हाल.” यावर इस्राएल लोकांनी एकमुखाने उत्तर दिले: “परमेश्‍वराने सांगितले आहे ते सर्व आम्ही करू.” (निर्ग. १९:४-८) पण देवाच्या आज्ञा पाळण्यास वचनबद्ध असणे इतकाच इस्राएल राष्ट्राच्या समर्पणाचा अर्थ नव्हता. तर त्यांच्या समर्पणामुळे आता ते यहोवाचे झाले होते आणि यहोवा त्यांच्याशी आपला “खास निधि” म्हणून व्यवहार करणार होता.

९. देवाला समर्पित असल्यामुळे इस्राएल लोकांना कशा प्रकारे फायदा झाला?

यहोवाचे लोक बनल्यामुळे इस्राएलांना अनेक फायदे मिळाले. एक प्रेमळ पालक आपल्या मुलाची काळजी घेतो त्याप्रमाणे यहोवाने एकनिष्ठेने इस्राएल लोकांचा संभाळ केला. देवाने इस्राएल लोकांस उद्देशून म्हटले: “स्त्रीला आपल्या पोटच्या मुलाची करुणा येणार नाही एवढा तिला आपल्या तान्ह्या बाळाचा विसर पडेल काय? कदाचित्‌ स्त्रियांना विसर पडेल, पण मी तुला विसरणार नाही.” (यश. ४९:१५) यहोवाने त्यांच्या मार्गदर्शनाकरता नियमशास्त्र दिले. संदेष्ट्यांद्वारे त्यांना प्रोत्साहन दिले आणि देवदूतांद्वारे त्यांचे संरक्षण केले. एका स्तोत्रकर्त्याने या संदर्भात असे लिहिले: “तो याकोबाला आपले वचन, इस्राएलाला आपले नियम व निर्णय विदित करितो. कोणत्याहि राष्ट्राबरोबर त्याने असे वर्तन केले नाही.” (स्तो. १४७:१९, २०; स्तोत्र ३४:७, १९; ४८:१४ वाचा.) देवाचे खास लोक बनलेल्या राष्ट्राचा ज्याप्रमाणे गतकाळात त्याने संभाळ केला त्याचप्रमाणे आजही जे त्याला समर्पण करतात त्यांचा तो संभाळ करेल.

आपण देवाला समर्पण का करावे?

१०, ११. देवाच्या विश्‍वव्यापी कुटुंबात आपला जन्म झाला आहे का? स्पष्ट करा.

१० सर्मपण आणि बाप्तिस्म्याचा प्रश्‍न येतो तेव्हा काही जण विचार करतात, ‘समर्पण न करता मला देवाची उपासना करता येणार नाही का?’ याचे उत्तर, सध्या देवासमोर आपली काय स्थिती आहे हे लक्षात घेतल्यानंतर स्पष्ट होते. आदामाच्या पापामुळे आपण जन्मतःच अपरिपूर्ण आहोत आणि त्याअर्थी देवाच्या कुटुंबाचा भाग नाही. (रोम. ३:२३; ५:१२) तेव्हा, देवाच्या विश्‍वव्यापी कुटुंबाचा भाग म्हणून स्वीकारले जाण्यासाठी स्वतःस देवाला समर्पित करणे ही एक अत्यावश्‍यक गोष्ट आहे. असे का म्हणता येईल हे आपण पाहू या.

११ आपल्यापैकी कोणाच्याही नैसर्गिक पित्याने, जीवन मुळात जसे असले पाहिजे तशा स्वरूपात ते आपल्याला वारशाने दिलेले नाही. (१ तीम. ६:१९) आपल्यापैकी कोणाचाही देवाचे पुत्र म्हणून जन्म झाला नाही, कारण पहिल्या मानवी जोडप्याने पाप केले तेव्हा मानवजात तिच्या प्रेमळ पित्यापासून व सृष्टिकर्त्यापासून दुरावली. (अनुवाद ३२:५ पडताळून पाहा.) तेव्हापासून, सबंध मानवजात यहोवाच्या विश्‍वव्यापी कुटुंबाच्या बाहेर, त्याच्यापासून दुरावलेल्या स्थितीत आहे.

१२. (क) अपरिपूर्ण मानव कशा प्रकारे देवाच्या कुटुंबाचे सदस्य बनू शकतात? (ख) बाप्तिस्म्याच्या आधी आपण कोणती पावले उचलणे जरुरीचे आहे?

१२ देवाच्या विश्‍वव्यापी कुटुंबाचा जरी सध्या आपण भाग नसलो, तरी त्याची संमती असलेल्या त्याच्या सेवकांच्या कुटुंबात आपला स्वीकार व्हावा अशी विनंती आपल्यापैकी प्रत्येक जण देवाला करू शकतो. * पण, सध्याच्या आपल्या पापी स्थितीत हे आपल्याला कसे शक्य आहे? प्रेषित पौलाने लिहिले: “आपण शत्रु असता देवाबरोबर त्याच्या पुत्राच्या मृत्यूद्वारे आपला समेट झाला.” (रोम. ५:१०) आपण बाप्तिस्मा घेतो, तेव्हा देवाने आपल्याला एक चांगला विवेक द्यावा आणि त्यायोगे आपल्याला त्याची स्वीकार्य उपासना करता यावी अशी आपण विनंती करतो. (१ पेत्र ३:२१) पण, बाप्तिस्म्याच्या आधी आपण काही पावले उचलणे जरुरीचे आहे. आपण देवाविषयीचे ज्ञान घेतले पाहिजे, त्याच्यावर भरवसा ठेवायला शिकले पाहिजे, गतकाळात केलेल्या पापांबद्दल पश्‍चात्ताप केला पाहिजे आणि वाईट वर्तन सोडून दिले पाहिजे. (योहा. १७:३; प्रे. कृत्ये ३:१९; इब्री ११:६) यासोबतच, देवाच्या कुटुंबात स्वीकार होण्यासाठी आणखी एक गोष्ट करणे आवश्‍यक आहे. ती कोणती?

१३. देवाची संमती असलेल्या उपासकांच्या कुटुंबाचा भाग होण्यासाठी एका व्यक्‍तीने देवाला समर्पण केल्याचे वचन देणे का योग्य आहे?

१३ देवापासून दुरावलेल्या स्थितीत असलेल्या एका व्यक्‍तीचा, त्याच्या संमतीप्राप्त उपासकांच्या कुटुंबात स्वीकार होण्याआधी त्या व्यक्‍तीने यहोवाला गांभीर्यपूर्वक वचन देणे गरजेचे आहे. हे समजून घेण्याकरता एक उदाहरण लक्षात घ्या. एक गृहस्थ एका अनाथ मुलाबद्दल आत्मीयता दाखवतो आणि या मुलाला दत्तक घेऊन आपल्या कुटुंबाचा सदस्य म्हणून स्वीकारण्याची इच्छा व्यक्‍त करतो. मुलेबाळे असलेल्या या गृहस्थाला समाजात एक भला माणूस म्हणून ओळखले जाते. तरीसुद्धा, त्या अनाथ मुलाला आपला पुत्र म्हणून स्वीकारण्याआधी त्याने आपल्याला एक वचन द्यावे अशी त्या सद्‌गृहस्थाची अपेक्षा आहे. त्यामुळे तो त्या मुलाला म्हणतो, “तुला माझा मुलगा म्हणून स्वीकारण्यास मी तयार आहे, पण तू मला आपला पिता मानून माझ्यावर प्रेम करशील का आणि माझा आदर करशील का?” जर तो मुलगा अशा प्रकारचे वचन देण्यास तयार असेल, तरच तो मनुष्य आपल्या कुटुंबात त्याचा स्वीकार करेल. त्या मनुष्याची अपेक्षा रास्तच नाही का? त्याच प्रकारे, यहोवा देखील आपल्या कुटुंबात केवळ अशाच लोकांचा स्वीकार करतो, जे आपले जीवन त्याला समर्पित करण्याचे वचन देण्यास तयार आहेत. बायबल म्हणते: “तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी.”—रोम. १२:१.

प्रेम व विश्‍वास व्यक्‍त करणारे कृत्य

१४. समर्पण करण्याद्वारे आपण प्रेम व्यक्‍त करतो असे का म्हणता येईल?

१४ आपण यहोवाला स्वतःचे समर्पण करत असल्याचे वचन देतो तेव्हा यातून आपल्याला त्याच्याबद्दल असलेले मनस्वी प्रेम व्यक्‍त होते. काही बाबतींत, हे लग्नाच्या वेळी घेतल्या जाणाऱ्‍या शपथेप्रमाणे आहे. यहोवाच्या उपासकांतील लग्नसमारंभात नवरामुलगा सर्व परिस्थितींत आपल्या वधूला विश्‍वासू राहण्याची शपथ घेऊन तिच्याकरता असलेले आपले प्रेम व्यक्‍त करतो. ही केवळ एका कृतीला नव्हे तर, एका व्यक्‍तीला एकनिष्ठ राहण्याची शपथ असते. नवऱ्‍यामुलाला माहीत असते की लग्नाची शपथ न घेतल्यास त्याला आपल्या वधूसोबत राहण्याचा अधिकार मिळणार नाही. त्याच प्रकारे, समर्पणाची शपथ न घेता आपण यहोवाच्या कुटुंबाच्या सदस्यांना लाभणाऱ्‍या आशीर्वादांचा पूर्ण आस्वाद घेऊ शकत नाही. म्हणूनच, आपण स्वतःस यहोवाला समर्पित करतो कारण अपरिपूर्ण असलो तरीही आपण त्याचे होऊ इच्छितो आणि काहीही झाले तरी त्याला एकनिष्ठ राहण्याचा आपला पक्का निर्धार आहे.—मत्त. २२:३७.

१५. समर्पण करण्याद्वारे आपण विश्‍वास कृतीतून व्यक्‍त करतो असे का म्हणता येईल?

१५ देवाला समर्पण करण्याद्वारे आपण आपला विश्‍वास कृतीतून व्यक्‍त करत असतो. असे का म्हणता येईल? यहोवावर विश्‍वास असल्यामुळेच आपल्याला याची खातरी पटते की त्याच्याजवळ जाणे आपल्या भल्याकरता आहे. (स्तो. ७३:२८) आपल्याला माहीत आहे, की “ह्‍या कुटिल व विपरीत पिढीत” राहत असताना देवासोबत चालणे जरी सोपे नसले, तरी देव आपल्या पाठीशी राहून आपले साहाय्य करेल. (फिलिप्पै. २:१५; ४:१३) आपण अपरिपूर्ण आहोत याची आपल्याला जाणीव आहे पण आपल्याकडून चुका झाल्या तरी तो आपल्याशी दयाळूपणे वागेल याचीही आपल्याला खातरी आहे. (स्तोत्र १०३:१३, १४; रोमकर ७:२१-२५ वाचा.) यहोवाला एकनिष्ठ राहण्याचा निर्धार केल्यास तो आपल्या प्रयत्नांवर आशीर्वाद देईल असा आपल्याला विश्‍वास आहे.—ईयो. २७:५.

देवाला समर्पण केल्यामुळे आपले जीवन आनंदी बनते

१६, १७. यहोवाला आपले जीवन समर्पित केल्याने आपण आनंदी का होतो?

१६ यहोवाला समर्पण केल्यामुळे आपले जीवन आनंदी बनते कारण समर्पण करण्याद्वारे आपण यहोवाची इच्छा पूर्ण करण्याकरता स्वतःला वाहून घेतो. येशूने पुढील शब्दांत एक मूलभूत सत्य व्यक्‍त केले: “घेण्यापेक्षा देणे ह्‍यात जास्त धन्यता आहे.” (प्रे. कृत्ये २०:३५) पृथ्वीवर सेवाकार्य करत असताना, इतरांना देण्यामुळे मिळणारा आनंद येशूने पूर्णपणे अनुभवला. वेळप्रसंगी, येशू आपली तहान-भूक, सोय-गैरसोय सारे विसरून इतरांना जीवनाचा मार्ग मिळवण्यास साहाय्य करण्यासाठी झटला. (योहा. ४:३४) आपल्या पित्याचे मन आनंदित करण्यातच येशूने आनंद मानला. त्याने म्हटले: “जे त्याला आवडते ते मी सर्वदा करितो.”—योहा. ८:२९; नीति. २७:११.

१७ अशा रीतीने येशूने आपल्या अनुयायांना जीवनात खऱ्‍या अर्थाने समाधानी होण्याचा मार्ग दाखवला. त्याने म्हटले: ‘माझ्यामागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वतःचा त्याग करावा व मला अनुसरावे.’ (मत्त. १६:२४) असे केल्यामुळे आपण यहोवाच्या अधिक जवळ येतो. खरोखर, इतक्या भरवशाने यहोवाशिवाय आणखी कोणाच्या हाती आपण आपले जीवन सोपवू शकतो आणि आणखी कोण इतक्या प्रेमळपणे आपली काळजी घेऊ शकेल?

१८. यहोवाला केलेले समर्पण आठवणीत ठेवून जीवन जगल्यामुळेच आपल्याला सर्वात जास्त आनंद मिळतो असे का म्हणता येईल?

१८ यहोवाला समर्पण केल्याने व हे समर्पण आठवणीत ठेवून जीवन जगल्याने जितका आनंद आपल्याला मिळेल, तितका आनंद दुसऱ्‍या कोणत्याही गोष्टीला किंवा कोणत्याही व्यक्‍तीला समर्पित असल्याने मिळू शकत नाही. उदाहरणार्थ, अनेक जण अमाप धनदौलत मिळवण्यासाठी सबंध आयुष्य खर्ची घालतात. पण, सरतेशवेटी हवे असलेले खरे सुखसमाधान त्यांना लाभत नाही. याउलट, जे यहोवाला समर्पण करतात ते खऱ्‍या अर्थाने जीवनात आनंदी होतात. (मत्त. ६:२४) त्यांना “देवाचे सहकारी” होण्याचा बहुमान मिळाल्याबद्दल ते निश्‍चितच आनंदी आहेत. पण, त्यांनी आपले जीवन केवळ एका कार्याला नव्हे तर आपली मनस्वी कदर करणाऱ्‍या देवाला समर्पित केले आहे. (१ करिंथ. ३:९) त्यांच्या आत्मत्यागाची सगळ्यात जास्त कदर करणारा यहोवा देवच आहे. तो आपल्या एकनिष्ठ सेवकांना त्यांच्या तारुण्याचे दिवसही परत देईल जेणेकरून त्याची प्रेमळ काळजी ते सदासर्वकाळ अनुभवू शकतील.—ईयो. ३३:२५; इब्री लोकांस ६:१० वाचा.

१९. यहोवाला समर्पित असलेल्या लोकांना कोणता सुहक्क लाभतो?

१९ यहोवाला तुमचे जीवन समर्पित केल्याने तुम्हाला त्याच्यासोबत एक घनिष्ठ नातेसंबंध जोडणे शक्य होते. बायबल म्हणते: “देवाजवळ या म्हणजे तो तुम्हांजवळ येईल.” (याको. ४:८; स्तो. २५:१४) यहोवाला समर्पण करून त्याच्या उपासकांपैकी एक होण्याचा निर्णय आपण आत्मविश्‍वासाने का घेऊ शकतो याविषयी पुढील लेखात चर्चा करण्यात येईल.

[तळटीप]

^ परि. 12 येशूची “दुसरी मेंढरे” हजार वर्षांच्या शेवटीच देवाचे पुत्र बनतील. पण, त्यांनी देवाला समर्पण केले असल्यामुळे आजही त्यांचे देवाला “पिता” म्हणून संबोधणे योग्य आहे आणि ते यहोवाच्या उपासकांच्या कुटुंबाचे सदस्य म्हणून उचितपणे गणले जाऊ शकतात.—योहा. १०:१६; यश. ६४:८; मत्त. ६:९; प्रकटी. २०:५.

तुमचे उत्तर काय असेल?

• देवाला आपले जीवन समर्पित करण्याचा काय अर्थ होतो?

• देवाला समर्पित असल्यामुळे आपल्याला कशा प्रकारे फायदा होतो?

• यहोवाला समर्पण करणे का जरुरीचे आहे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[६ पानांवरील चित्र]

देवाला केलेले समर्पण आठवणीत ठेवून जीवन जगल्याने आपल्याला खरा आनंद मिळतो