व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवाच्या कृपेमुळेच आपण त्याचे होऊ शकतो

यहोवाच्या कृपेमुळेच आपण त्याचे होऊ शकतो

यहोवाच्या कृपेमुळेच आपण त्याचे होऊ शकतो

“आपण प्रभूचेच [यहोवाचेच] आहो.”—रोम. १४:८.

१, २. (क) आपल्याला कोणता विशेषाधिकार लाभला आहे? (ख) आपण कोणते प्रश्‍न विचारात घेणार आहोत?

 यहोवाने इस्राएल राष्ट्राला म्हटले, ‘तुम्ही सर्व लोकांपेक्षा माझा खास निधि व्हाल.’ खरोखर इस्राएल लोकांना किती मोठा बहुमान देऊ करण्यात आला होता! (निर्ग. १९:५) आज ख्रिस्ती मंडळीतील सदस्यांना देखील यहोवाचे खास लोक असण्याचा सन्मान प्राप्त झाला आहे. (१ पेत्र २:९; प्रकटी. ७:९, १४, १५) हा असा एक विशेषाधिकार आहे ज्यामुळे आपल्याला सदासर्वकाळ आशीर्वाद मिळतील.

यहोवाचे असणे हा एक विशेषाधिकार असला तरी त्यासोबत जबाबदारीसुद्धा येते. काहींना कदाचित प्रश्‍न पडेल: ‘यहोवाला माझ्याकडून असलेल्या अपेक्षा मी पूर्ण करू शकेन का? माझ्या हातून एखादी गंभीर चूक झाल्यास तो माझ्याकडे पाठ तर फिरवणार नाही ना? यहोवाला समर्पण केल्यामुळे माझ्या व्यक्‍तिगत स्वातंत्र्यावर बंधने येतील का?’ या नक्कीच विचारात घेण्याजोग्या शंका आहेत. पण, हे प्रश्‍न विचारात घेण्याआधी आपण आणखी एका महत्त्वपूर्ण प्रश्‍नाचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. तो म्हणजे: यहोवाच्या खास लोकांपैकी असल्यामुळे आपल्याला कोणते आशीर्वाद लाभतात?

यहोवाचे असल्यामुळे आनंद प्राप्त होतो

३. राहाबेने यहोवाची सेवा करण्याचा निर्णय घेतल्यामुळे तिला कशा प्रकारे फायदा झाला?

जे यहोवाचे लोक बनतात त्यांना काही लाभ होतो का? प्राचीन यरीहो शहरात राहणाऱ्‍या राहाब वेश्‍येचे उदाहरण विचारात घ्या. कनानच्या हिणकस देवदैवतांची उपासना करतच ती लहानाची मोठी झाली असेल यात शंका नाही. पण, यहोवाने इस्राएल लोकांसंबंधी केलेले पराक्रम तिच्या ऐकण्यात आले तेव्हा यहोवा हाच खरा देव असल्याची तिला जाणीव झाली. त्यामुळे तिने आपला जीव धोक्यात घालून देवाच्या निवडलेल्या लोकांचे रक्षण केले आणि अशा प्रकारे स्वतःचे भविष्य त्यांच्या हातात सोपवून दिले. तिच्याविषयी बायबल म्हणते: “राहाब वेश्‍या हिने देखील जासूदांचा पाहुणचार केला व त्यांना दुसऱ्‍या वाटेने लावून दिले; ह्‍यांत ती क्रियांनी नीतिमान्‌ ठरली नाही काय?” (याको. २:२५) देवाच्या नियमशास्त्रातून प्रेमाच्या व न्यायाच्या मार्गांचे शिक्षण प्राप्त झालेल्या लोकांपैकी एक बनल्यामुळे राहाबेला किती लाभ झाले याचा विचार करा. आपली पूर्वीची जीवनशैली सोडून दिल्यामुळे तिला किती आनंद झाला असेल! पुढे एका इस्राएली मनुष्याशी तिचे लग्न झाले आणि त्यांचा मुलगा बवाज हा देवाचा एक अतिशय उल्लेखनीय सेवक ठरला.—यहो. ६:२५; रूथ २:४-१२; मत्त. १:५, ६.

४. यहोवाची सेवा करण्याच्या रूथच्या निर्णयामुळे तिला कशा प्रकारे फायदा झाला?

मवाबच्या रूथने देखील यहोवाची सेवा करण्याचा निर्णय घेतला होता. लहानपणी तिने कदाचित कमोश व इतर मवाबी दैवतांची भक्‍ती केली असावी. पण, नंतर तिला खरा देव यहोवा याची ओळख झाली आणि तिच्या देशात आश्रय घेतलेल्या एका इस्राएली पुरूषाशी तिचे लग्न झाले. (रूथ १:१-६ वाचा.) नंतर रूथ आणि तिची जाऊ अर्पा या दोघी, आपली सासू नामी हिच्याबरोबर बेथलेहेमला जायला निघाल्या तेव्हा नामीने त्या दोघ्या तरुण स्त्रियांना आपापल्या घरी परतण्याची गळ घातली. कारण इस्राएलात राहणे त्यांच्यासाठी सोपे असणार नव्हते. त्यावर अर्पा “आपल्या लोकांकडे व आपल्या देवाकडे परत गेली.” पण, रूथने परत जाण्यास नकार दिला. तिने आपला विश्‍वास कृतीतून व्यक्‍त केला. आपण कोणत्या लोकांपैकी असले पाहिजे हे तिला पक्के ठाऊक होते. तिने नामीला म्हटले: “मला सोडून जा आणि माझ्यामागे न येता परत जा असा मला आग्रह करू नका; तुम्ही जेथे जाल तेथे मी येईन, तुम्ही जेथे राहाल तेथे मी राहीन, तुमचे लोक ते माझे लोक, तुमचा देव तो माझा देव.” (रूथ १:१५, १६) यहोवाची उपासना करण्याचा निर्णय घेतल्यामुळे रूथला नियमशास्त्रातील तरतुदींचा फायदा झाला. कारण नियमशास्त्रात विधवांसाठी, गरिबांसाठी आणि स्वतःची शेतीवाडी नसलेल्या लोकांसाठी खास तरतूद करण्यात आली होती. यहोवाच्या छत्रछायेत आल्यामुळे तिला आनंद व सुरक्षितता लाभली.

५. विश्‍वासूपणे यहोवाची सेवा करणाऱ्‍या लोकांबद्दल तुम्हाला काय दिसून आले आहे?

यहोवाची वर्षानुवर्षे अगदी विश्‍वासूपणे उपासना करणारे काही जण तुम्हाला माहीत असतील. यहोवाची सेवा केल्यामुळे त्यांना कोणकोणते फायदे झाले आहेत याविषयी त्यांना विचारून पाहा. त्यांच्या जीवनात समस्या येत नाहीत असे नाही. पण, त्यांच्या जीवनाकडे पाहिल्यास स्तोत्रकर्त्याचे पुढील शब्द किती खरे आहेत याचा ढळढळीत पुरावा तुम्हाला मिळेल: “ज्या लोकांचा देव यहोवा आहे तेच सुखी आहेत.”—स्तो. १४४:१५, पं.र.भा.

यहोवाच्या अपेक्षा वाजवी आहेत

६. यहोवाच्या अपेक्षा पूर्ण करणे आपल्याला जमणार नाही अशी भीती आपल्याला का वाटू नये?

मला यहोवाच्या अपेक्षा पूर्ण करता येतील की नाही असा प्रश्‍न कदाचित तुम्हाला पडला असेल. देवाच्या उपासकांपैकी एक असण्याच्या, त्याच्या नीतीनियमांनुसार चालण्याच्या आणि इतरांना त्याच्या नावाविषयी सांगण्याच्या विचाराने आपल्यावर दडपण येऊ शकते. उदाहरणार्थ, मोशेला इस्राएल लोकांशी आणि इजिप्तच्या राजाशी बोलण्याकरता पाठवण्यात आले, तेव्हा आपल्याला हे जमणार नाही असे त्याला वाटले. पण, यहोवा त्याच्याकडून अवाजवी अपेक्षा करत नव्हता. उलट, यहोवाने ‘काय करावयाचे ते त्याला शिकवले.’ (निर्गम ३:११; ४:१, १०, १३-१५ वाचा.) यहोवाने दिलेली मदत स्वीकारल्यामुळे देवाची इच्छा पूर्ण करण्याचा आनंद मोशेला अनुभवता आला. आज आपल्याशीही यहोवा तितक्याच वाजवीपणे वागतो. आपली अपरिपूर्ण स्थिती तो जाणतो व आपल्याला मदत करण्यास सदैव तयार असतो. (स्तो. १०३:१४) तेव्हा, येशूचे अनुयायी या नात्याने देवाची उपासना करणे हा दडपण आणणारा नव्हे तर आनंदविणारा अनुभव आहे. कारण, अशा प्रकारचे जीवन जगल्याने आपण इतरांना अनेक लाभ मिळवून देतो आणि यहोवाचे मन आनंदी करतो. येशूने म्हटले: “माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जू आपणावर घ्या व माझ्यापासून शिका म्हणजे तुमच्या जिवास विसावा मिळेल.”—मत्त. ११:२८, २९.

७. यहोवा तुमच्याकडून जे अपेक्षितो ते पूर्ण करण्यासाठी तो तुम्हाला मदत करेल याबद्दल तुम्ही भरवसा का बाळगू शकता?

यहोवावर विसंबून राहिल्यास आपल्याला आवश्‍यक असलेले पाठबळ तो नक्कीच पुरवेल. उदाहरणार्थ, यिर्मया बोलण्याच्या बाबतीत इतका निपुण नव्हता. त्यामुळे यहोवाने त्याला आपला संदेष्टा म्हणून नियुक्‍त केले तेव्हा तो म्हणाला: “अहो, प्रभु परमेश्‍वर, पाहा, मला बोलावयाचे ठाऊक नाही; मी केवळ बाळ आहे.” काही काळाने तर त्याने असेही म्हटले: “यापुढे मी त्याच्या नावाने बोलणार नाही.” (यिर्म. १:६; २०:९) पण, यहोवाच्या पाठबळामुळेच तब्बल ४० वर्षांपर्यंत यिर्मयाला एक अप्रिय संदेश लोकांना सांगणे शक्य झाले. यहोवाने वारंवार असे म्हणून त्याला धीर दिला: “तुझा बचाव करण्यास व तुला सोडविण्यास मी तुझ्याबरोबर आहे.”—यिर्म. १:८, १९; १५:२०.

८. यहोवावर आपला भरवसा असल्याचे आपण कसे दाखवतो?

यहोवाने मोशे आणि यिर्मया यांना ज्याप्रमाणे पाठबळ दिले त्याचप्रमाणे तो ख्रिश्‍चनांकडून आज ज्या काही गोष्टी अपेक्षितो त्या पूर्ण करण्यास तो त्यांनाही मदत करू शकतो. पण, त्यासाठी आपण त्याच्यावर विसंबून राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. बायबल म्हणते: “तू आपल्या अगदी मनापासून परमेश्‍वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको; तू आपल्या सर्व मार्गांत त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल.” (नीति. ३:५, ६) यहोवा आपल्या वचनाद्वारे व मंडळीद्वारे पुरवत असलेल्या मदतीचा आपण फायदा करून घेतो, तेव्हा आपल्याला त्याच्यावर भरवसा असल्याचे आपण दाखवून देतो. जीवनात पावलोपावली यहोवाचे मार्गदर्शन स्वीकारल्यास कोणतीही गोष्ट आपल्याला त्याच्यापासून दूर करू शकणार नाही.

यहोवा आपल्या प्रत्येक उपासकाची काळजी घेतो

९, १०. स्तोत्र ९१ मध्ये कोणत्या प्रकारच्या संरक्षणाचे अभिवचन दिले आहे?

यहोवाला समर्पण करण्याचा विचार करत असताना, ‘आपल्या हातून काही गंभीर पाप घडले तर? यहोवाच्या नजरेतून आपण पडलो तर? किंवा यहोवाने आपल्याकडे पाठ फिरवली तर?’ असे प्रश्‍न काहींना भेडसावत असतील. पण, आनंदाची गोष्ट म्हणजे, यहोवासोबतचा आपला नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी आवश्‍यक असलेले संरक्षण यहोवा आपल्याला पुरवतो. स्तोत्र ९१ मध्ये याचे वर्णन कशा प्रकारे करण्यात आले आहे ते आपण पाहू या.

१० या स्तोत्राच्या सुरुवातीला असे म्हटले आहे: “जो परात्पराच्या गुप्त स्थली वसतो, तो सर्वसमर्थाच्या सावलीत राहील. परमेश्‍वराला मी माझा आश्रय, माझा दुर्ग असे म्हणतो; तोच माझा देव, त्याच्यावर मी भाव ठेवितो. कारण तो पारध्याच्या पाशापासून घातक मरीपासून तुझा बचाव करील.” (स्तो. ९१:१-३) या शब्दांतून, देव आपल्यावर प्रेम करणाऱ्‍या व भरवसा ठेवणाऱ्‍या लोकांचे संरक्षण करण्याचे अभिवचन देतो. (स्तोत्र ९१:९, १४ वाचा.) पण, स्तोत्रकर्ता येथे कोणत्या प्रकारच्या संरक्षणाविषयी बोलतो? यहोवाने प्राचीन काळातील आपल्या काही सेवकांचे शारीरिक दृष्टीने संरक्षण केले. प्रतिज्ञात मशीहापर्यंत जाणारी वंशावळ टिकवून ठेवण्यासाठी यहोवाने काही वेळा असे केले होते. पण, त्याच वेळी, इतर अनेक विश्‍वासू पुरुषांना तुरुंगात डांबण्यात आले, त्यांचा छळ करण्यात आला व त्यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली. यहोवाला विश्‍वासू राहण्यापासून त्यांना परावृत्त करण्याचे हे सैतानाचे प्रयत्न होते. (इब्री ११:३४-३९) पण, या विश्‍वासू सेवकांना हे सर्व सहन करण्याचे धैर्य मिळाले, कारण त्यांनी दबावाला बळी पडून आपली एकनिष्ठा त्यागू नये म्हणून यहोवाने आध्यात्मिक रीत्या त्यांचे संरक्षण केले. त्यामुळे ९१ व्या स्तोत्रात ज्या संरक्षणाबद्दल सांगण्यात आले आहे ते आध्यात्मिक संरक्षण आहे असे म्हणता येईल.

११. ‘परात्पराचे गुप्त स्थल’ काय आहे आणि यात देव कोणाचे संरक्षण करतो?

११ तर मग, स्तोत्रकर्त्याने उल्लेखिलेले ‘परात्पराचे गुप्त स्थल’ हे आध्यात्मिक संरक्षणाचे लाक्षणिक स्थान आहे. जे लोक या ठिकाणी देवासोबत वस्ती करतात, ते देवावरील त्यांच्या विश्‍वासावर व प्रेमावर घाला घालणाऱ्‍या कोणत्याही गोष्टीपासून किंवा व्यक्‍तीपासून सुरक्षित राहतात. (स्तो. १५:१, २; १२१:५) हे स्थान, विश्‍वास न ठेवणाऱ्‍या लोकांच्या समजशक्‍तीपलीकडे आहे, त्याअर्थी ते गुप्त आहे. ‘तूच माझा देव, तुझ्यावर मी भाव ठेवितो,’ असे यहोवाविषयी म्हणणाऱ्‍या लोकांचे तो संरक्षण करतो. आपण नेहमी या आश्रयस्थानात राहिलो तर “पारध्याच्या” अर्थात सैतानाच्या पाशात अडकून देवाच्या नजरेतून पडण्याची अनावश्‍यक चिंता करण्याची आपल्याला गरज नाही.

१२. कोणत्या गोष्टींमुळे देवासोबतचा आपला नातेसंबंध धोक्यात येऊ शकतो?

१२ कोणत्या काही गोष्टी आहेत ज्यांमुळे देवासोबतचा आपला मौल्यवान नातेसंबंध धोक्यात येऊ शकतो? स्तोत्रकर्ता अनेक धोक्यांचा उल्लेख करतो. त्यांपैकी एक आहे ‘काळोखात फिरणारी मरी व भर दुपारी नाश करणारी पटकी.’ (स्तो. ९१:५, ६) ‘पारध्याने’ अर्थात सैतानाने अनेकांच्या मनात स्वतंत्र वृत्तीने कार्य करण्याची लालसा उत्पन्‍न करून त्यांना फसवले आहे. (२ करिंथ. ११:३) काहींना तो लोभ, गर्व आणि धनदौलतीच्या पाशात अडकवतो. तर देशभक्‍ती, उत्क्रांतीवाद आणि खोटा धर्म यांसारख्या तत्त्वज्ञानाद्वारे तो इतर काहींची दिशाभूल करतो. (कलस्सै. २:८) तसेच, आणखी कितीतरी लोकांना त्याने अवैध लैंगिक संबंधाच्या जाळ्यात अडकवले आहे. आध्यात्मिक दृष्टीने घातक असलेल्या अशा धोक्यांमुळे लाखो लोकांचे देवावरील प्रेम आटले आहे.स्तोत्र ९१:७-१० वाचा; मत्त. २४:१२.

देवाबद्दल असलेल्या प्रेमाचे संरक्षण करणे

१३. आपल्या आध्यात्मिकतेस घातक ठरणाऱ्‍या गोष्टींपासून यहोवा कशा प्रकारे आपले संरक्षण करतो?

१३ आपल्या लोकांच्या आध्यात्मिकतेस घातक ठरणाऱ्‍या अशा धोक्यांपासून यहोवा कशा प्रकारे त्यांचे संरक्षण करतो? स्तोत्रकर्ता म्हणतो: “तुझ्या सर्व मार्गांत तुझे रक्षण करण्याची तुझ्याविषयी तो आपल्या दिव्यदूतांना आज्ञा देईल.” (स्तो. ९१:११) आपल्याला राज्याची सुवार्ता सांगणे शक्य व्हावे म्हणून देवदूत आपले मार्गदर्शन व संरक्षण करतात. (प्रकटी. १४:६) देवदूतांशिवाय, ख्रिस्ती वडील देखील खोट्या तर्कवादामुळे आपली फसवणूक होऊ नये म्हणून शास्त्रवचनांवर आधारित शिक्षणाद्वारे आपले संरक्षण करतात. वाईट प्रवृत्तींवर मात करण्याचा प्रयत्न करणाऱ्‍यांना ते वैयक्‍तिक पातळीवर मदत करू शकतात. (तीत १:९; १ पेत्र ५:२) तसेच, उत्क्रांतीवादाच्या शिक्षणापासून, लैंगिक वासनांच्या मोहजालापासून, धनदौलतीच्या व प्रतिष्ठेच्या हव्यासापासून व इतर असंख्य घातक इच्छा व प्रभावांपासून आपले रक्षण करण्यासाठी ‘विश्‍वासू व बुद्धिमान दास’ आपल्याला आध्यात्मिक अन्‍न पुरवतो. (मत्त. २४:४५) अशा काही धोक्यांचा प्रतिकार करण्यास कोणत्या गोष्टीने तुमची मदत केली आहे?

१४. देव पुरवत असलेल्या संरक्षणाचा आपण कशा प्रकारे फायदा घेऊ शकतो?

१४ देवाकडून मिळणाऱ्‍या संरक्षणाच्या ‘गुप्त स्थलात’ राहण्यासाठी आपण काय केले पाहिजे? ज्याप्रमाणे अपघात, गुन्हेगारी किंवा संसर्ग यांसारख्या शारीरिक धोक्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आपल्याला सतत प्रयत्न करावे लागतात, त्याचप्रमाणे आध्यात्मिक दृष्ट्या धोकेदायक गोष्टींपासून आपले संरक्षण करण्यासाठीही आपण प्रयत्नशील असले पाहिजे. त्यासाठी यहोवा आपल्याला प्रकाशनांद्वारे, मंडळीच्या संभांद्वारे व संमेलनांद्वारे जे काही मार्गदर्शन पुरवतो त्याचा आपण नियमितपणे लाभ घेतला पाहिजे. तसेच, आपण ख्रिस्ती वडिलांचाही सल्ला घेतला पाहिजे. याशिवाय, आपले बंधुभगिनी प्रदर्शित करत असलेल्या निरनिराळ्या ख्रिस्ती गुणांचाही आपल्याला फायदा होत नाही का? मंडळीच्या निकट सहवासात राहिल्याने आपल्याला नक्कीच सुज्ञ होण्यास मदत मिळते.—नीति. १३:२०; १ पेत्र ४:१० वाचा.

१५. यहोवाचा अनुग्रह गमावण्यास कारणीभूत ठरणाऱ्‍या कोणत्याही गोष्टीपासून तो नक्कीच आपले संरक्षण करेल याबद्दल आपण खातरी का बाळगू शकतो?

१५ यहोवाचा अनुग्रह गमावण्यास कारणीभूत ठरणाऱ्‍या कोणत्याही गोष्टीपासून तो आपले संरक्षण करेल याविषयी आपण पूर्ण खातरी बाळगू शकतो. (रोम. ८:३८, ३९) कारण यापूर्वीही, त्याने अशा शक्‍तिशाली धार्मिक आणि राजनैतिक शत्रूंपासून मंडळीचे संरक्षण केले आहे, ज्यांचा हेतू बहुतेक वेळा आपल्याला मारून टाकण्याचा नव्हे, तर आपल्या पवित्र देवापासून आपल्याला दूर करण्याचा होता. पण, यहोवाने दिलेले अभिवचन अगदी खरे ठरले आहे: “तुझ्यावर चालविण्याकरिता घडिलेले कोणतेहि हत्यार तुजवर चालणार नाही.”—यश. ५४:१७.

आपल्याला स्वातंत्र्य कोण देतो?

१६. हे जग आपल्याला स्वातंत्र्य का देऊ शकत नाही?

१६ यहोवाच्या खास लोकांपैकी एक झाल्यास आपण आपले स्वातंत्र्य गमावून बसू का? नाही. उलट, या जगाचा भाग बनल्यास आपण आपले स्वातंत्र्य गमावून बसू. कारण हे जग यहोवापासून दुरावलेले असून त्यावर राज्य करणारा क्रूर सैतान लोकांना आपल्या गुलामगिरीत अडकवतो. (योहा. १४:३०) उदाहरणार्थ, सैतानाचे जग आर्थिक दबाव आणून लोकांचे स्वातंत्र्य त्यांच्यापासून हिरावून घेते. (प्रकटीकरण १३:१६, १७ पडताळून पाहा.) पापामध्येसुद्धा लोकांची फसवणूक करून त्यांना गुलाम बनवण्याची ताकद आहे. (योहा. ८:३४; इब्री ३:१३) यहोवावर विश्‍वास न ठेवणारे लोक देवाच्या शिकवणुकींच्या विरोधात असलेल्या जीवनशैलीला बढावा देऊन लोकांना स्वातंत्र्याची हमी देतात. पण, त्यांच्यावर विश्‍वास ठेवणाऱ्‍या लोकांना लवकरच हे कळून चुकते की ते एका पापपूर्ण व नीच प्रकारच्या जीवनशैलीचे गुलाम बनले आहेत.—रोम. १:२४-३२.

१७. यहोवा आपल्याला कोणत्या प्रकारचे स्वातंत्र्य देऊ करतो?

१७ याच्या अगदी उलट, आपण स्वतःला यहोवाच्या हातात सोपवून दिल्यास कुठल्याही घातक गोष्टीपासून तो आपल्याला मुक्‍त करेल. काही प्रमाणात आपली स्थिती अशा एका मनुष्यासारखी आहे जो एका जीवघेण्या रोगापासून मुक्‍त होण्यासाठी स्वतःला एका निपुण डॉक्टरच्या हाती सोपवून देतो. आपल्या सर्वांमध्ये एक जीवघेणा रोग अर्थात वारशाने मिळालेले पाप आहे. पण, आपण ख्रिस्ताच्या बलिदानावर विश्‍वास ठेवून स्वतःला यहोवाच्या हाती सोपवून दिले तरच पापाच्या दुष्परिणामांपासून मुक्‍त होऊन सदासर्वकाळ जगण्याची आशा आपण बाळगू शकतो. (योहा. ३:३६) ज्याप्रमाणे एखाद्या डॉक्टरच्या ख्यातीबद्दल ऐकल्यावर त्याच्यावरील आपला भरवसा वाढतो, त्याचप्रमाणे आपण जितके अधिक यहोवाविषयी शिकू तितका अधिक त्याच्यावरील आपला भरवसा वाढेल. म्हणूनच, आपण देवाच्या वचनाचा काळजीपूर्वक अभ्यास करत राहिले पाहिजे. असे केल्याने यहोवावरील आपले प्रेम वाढेल आणि त्याला आपले जीवन समर्पित करण्यासंबंधी आपल्या मनात असलेली कोणतीही भीती किंवा शंका दूर होऊ शकेल.—१ योहा. ४:१८.

१८. जे लोक यहोवाला समर्पण करतात ते काय अनुभवतात?

१८ यहोवा सर्व लोकांना निवड करण्याचे स्वातंत्र्य देतो. त्याचे वचन म्हणते: “तू जीवन निवडून घे म्हणजे तू व तुझी संतति जिवंत राहील. आपला देव परमेश्‍वर ह्‍याच्यावर प्रीति कर.” (अनु. ३०:१९, २०) आपण स्वतः निर्णय घेऊन यहोवावरील आपले प्रेम व्यक्‍त करावे अशी त्याची इच्छा आहे. ज्याच्यावर आपले प्रेम आहे अशा देवाला आपले जीवन समर्पण केल्याने आपण आपले स्वातंत्र्य गमावून बसणार नाही. उलट, त्यामुळे आपण नक्कीच आनंदी होऊ.

१९. यहोवाच्या कृपेमुळेच आपण त्याचे होऊ शकतो असे का म्हणता येईल?

१९ आपण मुळात पापी असल्यामुळे एका परिपूर्ण देवाचे होण्याची खरे तर आपली लायकी नाही. पण, केवळ देवाच्या कृपेमुळे ते शक्य होते. (२ तीम. १:९) म्हणूनच पौलाने लिहिले: “जर आपण जगतो तर प्रभूकरिता जगतो, आणि जर आपण मरतो तर प्रभूकरिता मरतो; म्हणून आपण जगलो किंवा मेलो तरी आपण प्रभूचेच आहो.” (रोम. १४:८) यहोवाला समर्पण करून त्याच्या खास लोकांमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतल्यास आयुष्यात कधीच आपल्याला पस्तावा होणार नाही.

तुमचे उत्तर काय असेल?

• यहोवाला समर्पण केल्यामुळे आपल्याला कोणते फायदे होतात?

• देव आपल्याकडून ज्या अपेक्षा करतो त्या पूर्ण करणे अशक्य का नाही?

• यहोवा कशा प्रकारे आपल्या सेवकांचे संरक्षण करतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[८ पानांवरील चित्रे]

यहोवाला समर्पण केल्यामुळे कोणकोणते फायदे झाले याविषयी इतरांना विचारा

[१० पानांवरील चित्र]

यहोवा कोणकोणत्या मार्गांनी आपले संरक्षण करतो?