व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आव्हानांना तोंड देण्यास तुमच्या मुलांना साहाय्य करा

आव्हानांना तोंड देण्यास तुमच्या मुलांना साहाय्य करा

आव्हानांना तोंड देण्यास तुमच्या मुलांना साहाय्य करा

हल्ली आपली मुले प्रचंड दबावाखाली वावरत आहेत. त्यांना सैतानाच्या दुष्ट जगाच्या प्रभावाचा सामना करावा लागतो. त्यासोबतच, ‘तरुणपणाच्या वासनांशी’ देखील त्यांना संघर्ष करावा लागतो. (२ तीम. २:२२; १ योहा. ५:१९) शिवाय, ते ‘आपल्या निर्माणकर्त्याला स्मरण्याचा’ आटोकाट प्रयत्न करत असल्यामुळे त्यांना थट्टा, इतकेच नव्हे तर छळाचाही सामना करावा लागतो. (उप. १२:१) विन्सेंट नावाच्या एका बांधवाला आपले लहानपणचे दिवस आठवतात. तो म्हणतो: “एक साक्षीदार असल्यामुळे मला सतत कोणी ना कोणी छळायचं, माझ्यावर दादागिरी करायचं किंवा काही ना काही खोड काढून माझ्याशी भांडायचं. बरेचदा हे इतकं अति व्हायचं की मला शाळाच नकोशी वाटायची.” *

सैतानाच्या जगातून येणाऱ्‍या या दबावांव्यतिरिक्‍त आपल्या लेकरांना, सोबत्यांसारखे वागण्या-बोलण्याच्या स्वतःच्या इच्छेविरुद्धही लढत द्यावी लागते. कॅथलीन नावाची एक किशोरवयीन बहीण म्हणते: “इतरांपेक्षा वेगळं वागणं सोपं नसतं.” ॲलन नावाचा एक तरुण बांधव कबूल करतो: “शनिवार-रविवार आला की माझे शाळेतले मित्र मला नेहमी त्यांच्याबरोबर फिरायला बोलवायचे. आणि मलाही त्यांच्याबरोबर जाण्याचा अनावर मोह व्हायचा.” या शिवाय, शाळेतील खेळांमध्ये सहभाग घेण्याची इच्छाही मुलांमध्ये फार प्रबळ असू शकते. पण, यामुळे ते सहज वाईट संगतीच्या जाळ्यात फसू शकतात. टानिया नावाची एक तरुण बहीण म्हणते: “खेळ माझा जीव की प्राण आहे. शाळेतल्या प्रत्येक कोचला वाटायचं की मी त्यांच्या संघात खेळावं. अशा वेळी नाही म्हणणं फार कठीण व्हायचं.”

तुमच्या मुलांच्या जीवनात येणाऱ्‍या अशा असंख्य आव्हानांवर मात करण्यास तुम्ही त्यांना कशी मदत करू शकता? पालकांनी आपल्या मुलाबाळांचे मार्गदर्शन करावे अशी आज्ञा यहोवाने त्यांना दिली आहे. (नीति. २२:६; इफिस. ६:४) आपल्या मुलांच्या मनात देवाच्या आज्ञा पाळण्याची इच्छा उत्पन्‍न करणे, हेच देवभीरू पालकांचे ध्येय आहे. (नीति. ६:२०-२३) असे केल्यास आईवडिलांच्या नजरेआड असताना देखील मुले दबावांचा प्रतिकार करण्यास प्रवृत्त होतील.

कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे, मुलांचे संगोपन करणे आणि मंडळीची कार्ये हाताळणे या सगळ्या गोष्टी एकाच वेळी करत असताना पालकांची अगदी दमछाक होते. यांपैकी काहींना या सर्व जबाबदाऱ्‍या एकट्यानेच पार पाडाव्यात लागतात किंवा सत्यात नसलेल्या विवाहसोबत्याच्या विरोधाचा सामना करत त्या हाताळाव्या लागतात. तरीसुद्धा, आपल्या मुलांवर चांगले संस्कार करण्यासाठी पालकांनी वेळ काढावा अशी यहोवा त्यांच्याकडून अपेक्षा करतो. तर मग, तुमच्या मुलांना दररोज तोंड द्याव्या लागणाऱ्‍या मित्रांच्या दबावांपासून, प्रलोभनांपासून व छळापासून स्वतःचे संरक्षण करण्यास तुम्ही त्यांना कशी मदत करू शकता?

यहोवासोबत वैयक्‍तिक नातेसंबंध

सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे, यहोवा एक खरीखुरी व्यक्‍ती आहे याची मुलांना जाणीव होणे गरजेचे आहे. ‘जो अदृश्‍य आहे त्याला पाहण्यास’ मुलांना मदत करणे जरुरीचे आहे. (इब्री ११:२७) आधी उल्लेख करण्यात आलेल्या विन्सेंटला आठवते, की कशा प्रकारे त्याच्या आईवडिलांनी त्याला यहोवासोबत एक वैयक्‍तिक नातेसंबंध विकसित करण्यास मदत केली. तो म्हणतो: “प्रार्थना किती महत्त्वपूर्ण आहे हे त्यांनी मला शिकवलं. मला आठवतं अगदी लहानपणापासून दररोज रात्री झोपायच्या आधी मी यहोवाला प्रार्थना करायचो. यहोवा एक खरीखुरी व्यक्‍ती आहे याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नव्हती.” तुम्ही तुमच्या मुलांसोबत प्रार्थना करता का? त्यांच्या वैयक्‍तिक प्रार्थनेत ते यहोवाशी काय बोलतात ते लक्षपूर्वक ऐका. प्रार्थनेत मुले तेच ते शब्द वारंवार उच्चारतात का? यहोवाविषयी त्यांना स्वतःला कसे वाटते हे ते प्रार्थनेतून व्यक्‍त करतात का? यावरून यहोवासोबतचा त्यांचा नातेसंबंध किती गहिरा आहे याचा तुम्हाला अंदाज येईल.

दररोज स्वतःहून बायबल वाचण्याची सवय लावल्यानेही मुलांना यहोवाशी जवळीक साधण्यास मदत मिळू शकते. आधी उल्लेख करण्यात आलेली कॅथलीन म्हणते: “लहान वयातच संपूर्ण बायबलचं वाचन केल्यामुळे मला खूप फायदा झाला. यामुळे मला हा भरवसा मिळाला की सगळे लोक जरी माझ्याविरुद्ध असले तरी यहोवा माझ्या पाठीशी आहे.” तुमच्या मुलांचासुद्धा संपूर्ण बायबल वाचून काढण्याचा स्वतःचा असा नित्यक्रम आहे का?—स्तो. १:१-३; ७७:१२.

हे खरे की पालकांच्या मार्गदर्शनाला सर्वच मुले एकसारखा प्रतिसाद देणार नाहीत. शिवाय, त्यांची आध्यात्मिक प्रगतीसुद्धा वयानुसार वेगवेगळी असू शकते. पण, मुलांना मार्गदर्शनच मिळाले नाही तर यहोवा एक खरी व्यक्‍ती आहे हे समजण्यास त्यांना कठीण जाईल. तेव्हा, पालकांनी मुलांच्या मनावर देवाची वचने बिंबवली पाहिजेत. त्यामुळे अमुक एक विषयावर देवाचा काय दृष्टिकोन आहे हे समजण्यास त्यांना नेहमी मदत मिळेल. (अनु. ६:६-९) यहोवाला व्यक्‍तिशः माझी काळजी आहे ही जाणीव तुमच्या मुलांना झाली पाहिजे.

अर्थपूर्ण संवाद कसा साधावा?

तुमच्या मुलांना मदत करण्याचा आणखी एक अत्यंत महत्त्वपूर्ण मार्ग म्हणजे त्यांच्याशी संवाद करणे. अर्थात, मुलांशी सुसंवाद करण्यासाठी त्यांच्याशी फक्‍त बोलणेच पुरेसे नाही. तर त्यांना प्रश्‍न विचारणे व त्यांनी दिलेली उत्तरे लक्षपूर्वक ऐकणे या गोष्टीही त्यात समाविष्ट आहेत. मग, त्यांनी दिलेली उत्तरे तुमच्या अपेक्षेच्या अगदी उलट असली तरीही ती नीट ऐकून घ्या. दोन मुलांची आई असलेली ॲन म्हणते: “मुलांच्या मनात नेमकं काय चाललंय, त्यांच्या जीवनात ते कोणत्या समस्यांचा सामना करत आहेत हे मला समजेपर्यंत मी त्यांना प्रश्‍न विचारते.” तुमच्या मुलांचे बोलणे तुम्ही लक्षपूर्वक ऐकता असे त्यांना वाटते का? आधी उल्लेखलेली टानिया म्हणते: “माझे आईवडील माझं बोलणं अगदी लक्षपूर्वक ऐकायचे आणि आमच्यात काय बोलणं झालं हे देखील ते लक्षात ठेवायचे. माझ्या शाळेतल्या मित्रमैत्रिणींची नावंही त्यांना माहीत होती. ते त्यांची विचारपूस करायचे आणि पूर्वी आम्ही ज्या घटनांबद्दल बोललो होतो त्याबद्दलही ते विचारायचे.” खरोखर, मुलांसोबत अर्थपूर्ण संभाषण करण्यासाठी त्यांचे बोलणे नीट ऐकणे आणि ते लक्षात ठेवणे या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.

अर्थपूर्ण संवाद साधण्यासाठी जेवणाची वेळ सगळ्यात चांगली असल्याचे अनेक कुटुंबांनी अनुभवले आहे. विन्सेंट म्हणतो: “कुटुंबातल्या सगळ्यांनी एकत्र बसून जेवणं ही गोष्ट आमच्या कुटुंबात महत्त्वाची होती. जेवणाच्या वेळी शक्यतो सगळ्यांनी एकत्र यावं अशी प्रत्येकाकडून अपेक्षा केली जायची. या वेळी टीव्ही पाहणं, रेडिओ ऐकणं किंवा वाचन करणं या गोष्टी कटाक्षानं टाळल्या जायच्या. दररोज जेवताना सहसा इकडच्या-तिकडच्या गप्पा होत असल्यामुळे मन थोडंफार शांत व्हायचं आणि त्यामुळे शाळेतल्या ताणतणावाचा सामना करण्यास मदत मिळायची.” पुढे तो म्हणतो: “जेवताना आईवडिलांशी गप्पा मारायच्या या सवयीमुळे अधिक गंभीर समस्यांबद्दलही मी अगदी निःसंकोचपणे त्यांच्याशी बोलायचो.”

तर मग, स्वतःला असे प्रश्‍न विचारा: ‘आठवड्यातून किती वेळा आम्ही संपूर्ण कुटुंब मिळून जेवण करतो?’ या बाबतीत काही सुधारणा केल्याने तुमच्या मुलांशी आणखी अर्थपूर्ण संवाद साधण्याची संधी मिळेल असे तुम्हाला वाटते का?

सराव करणे का महत्त्वाचे आहे?

आठवड्यातला कौटुंबिक उपासनेचा दिवसही, कुटुंबातील सर्वांना मनमोकळेपणे संवाद करण्यास तसेच मुलांना काही विशिष्ट समस्यांचा सामना करण्यास मदतदायी ठरू शकतो. या आधी उल्लेख केलेला ॲलन म्हणतो: “कौटुंबिक अभ्यासाच्या वेळी आईवडील आम्हाला बोलतं करायचा प्रयत्न करायचे. आम्ही ज्या समस्यांचा सामना करत होतो सहसा अशाच विषयांवर ते चर्चा करायचे.” ॲलनची आई म्हणते: “कौटुंबिक अभ्यासाचा काही वेळ आम्ही सरावासाठी राखून ठेवायचो. या सरावांमुळे आपल्या विश्‍वासाचं समर्थन कसं करावं आणि आपण विश्‍वास करत असलेल्या गोष्टी खऱ्‍या आहेत हे कसं पटवून द्यावं हे शिकण्यास आमच्या मुलांना मदत मिळाली. यामुळे त्यांच्या जीवनात येणाऱ्‍या आव्हानांचा सामना करण्याचं धैर्य त्यांना मिळालं.”

अर्थात, मित्रमैत्रिणींच्या दबावाला तोंड देत असताना मुलांनी केवळ नकार देऊन तेथून काढता पाय घेणे पुरेसे नाही. तर अमुक एक गोष्ट ते का करतात किंवा का करत नाहीत अशा प्रश्‍नांची उत्तरेही त्यांना देता आली पाहिजेत. तसेच, त्यांच्या ख्रिस्ती विश्‍वासामुळे त्यांची थट्टा केली जाते तेव्हा काय करावे हे त्यांना नक्की ठाऊक असले पाहिजे. आपल्या विश्‍वासांचे ते समर्थन करू शकले नाहीत तर खऱ्‍या उपासनेसंबंधी ते खंबीर भूमिका घेऊ शकणार नाहीत. पण, सराव सत्रांमुळे त्यांना आवश्‍यक असणारे धैर्य मिळू शकते.

पृष्ठ १८ वरील चौकटीत काही प्रसंग दिले आहेत ज्यांचे आपल्या कौटुंबिक उपासनेत तुम्ही नाट्यरूपांतर करू शकता. या सराव सत्रांत तुमची मुले जी काही उत्तरे देतील त्यांवर आक्षेप घ्या किंवा त्यांना आणखी उलटसुलट प्रश्‍न विचारून त्यास वास्तविक स्वरूप द्या. सराव सत्रांसोबतच बायबलमधील व्यक्‍तीरेखांकडून आपल्याला कोणता व्यावहारिक बोध घेता येईल याचाही विचार करा. घरात मिळणाऱ्‍या या प्रशिक्षणामुळे शाळेत किंवा इतर ठिकाणी मुलांना ज्या आव्हानांना तोंड द्यावे लागते त्यासाठी ते नक्कीच सज्ज होतील.

सुरक्षित घरटे?

तुमची मुले दररोज शाळा सुटल्यानंतर घरी परतण्यास आतूर असतात का? घरातील सुरक्षित वातावरणामुळे मुलांना दररोज समस्यांचा सामना करण्यास मदत मिळेल. सध्या बेथेल कुटुंबाची सदस्य असलेली एक बहीण म्हणते: “मी लहान असताना, घरातील सुरक्षित वातावरणाची मला सगळ्यात जास्त मदत झाली. शाळेत माझा दिवस कितीही वाईट गेला तरी घरी आल्यावर सर्वकाही नीट होईल याची मला खातरी असायची.” तुमच्या घरातले वातावरण कसे आहे? तुमच्या घरात नेहमीच “मत्सर, राग [व] तट” या गोष्टी घडत असतात का, की “प्रीति, आनंद [व] शांति” यांनी तुमचे घर भरलेले असते? (गलती. ५:१९-२३) तुमच्या घरचे वातावरण सहसा अशांत असते का? असल्यास, मुलांना घरात अधिक सुरक्षित वाटावे म्हणून आवश्‍यक ते बदल करण्याचा तुम्ही आटोकाट प्रयत्न करता का?

आव्हानांवर मात करण्यास मुलांना मदत देण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे उत्तेजन देणाऱ्‍या लोकांचा सहवास त्यांना मिळावा यासाठी पुढाकार घेणे. उदाहरणार्थ, कुटुंबाच्या मनोरंजनासाठी काही कार्यक्रमांची आखणी करताना मंडळीतील आध्यात्मिक मनोवृत्तीच्या बंधुभगिनींना देखील तुम्ही त्यात सामील करता का? किंवा मग, प्रवासी पर्यवेक्षकांना अथवा पूर्ण वेळेच्या सेवकांना तुम्ही साध्याशा जेवणाचे आमंत्रण देऊ शकता का? तुम्हाला मिशनरी सेवेतील किंवा बेथेल कुटुंबातील काही बंधुभगिनी माहीत आहेत का ज्यांच्यासोबत तुमची मुले पत्रांद्वारे, ई-मेलद्वारे किंवा अधूनमधून फोन करण्याद्वारे मैत्री करू शकतात? अशा प्रकारच्या मैत्रीमुळे मुले सरळ मार्गाला लागून जीवनात आध्यात्मिक ध्येये ठेवण्यास त्यांना मदत मिळू शकेल. तरुण तीमथ्यावर प्रेषित पौलाच्या संगतीचा किती सकारात्मक प्रभाव पडला याचा विचार करा. (२ तीम. १:१३; ३:१०) पौलाच्या निकट सहवासात राहिल्यामुळे तीमथ्याला आपल्या आध्यात्मिक ध्येयांवर लक्ष केंद्रित करायला मदत मिळाली.—१ करिंथ. ४:१७.

मुलांची प्रशंसा करा

सैतानाच्या जगातून असंख्य दबाव येत असतानाही मुले जीवनात योग्य ते करण्याचा निर्णय घेतात हे पाहून यहोवाचे मन नक्कीच आनंदित होते. (स्तो. १४७:११; नीति. २७:११) जीवनात मुलांना योग्य मार्ग निवडताना पाहून तुम्हालाही आनंद होत असेल यात शंका नाही. (नीति. १०:१) मुलांबद्दल तुमच्या काय भावना आहेत याची त्यांना जाणीव करून द्या व त्यांचे तोंडभरून कौतुक करा. याबाबतीत पालकांसाठी यहोवाने एक उत्तम उदाहरण मांडले. उदाहरणार्थ, येशूच्या बाप्तिस्म्याच्या वेळी यहोवाने म्हटले: “तू माझा पुत्र, मला परमप्रिय आहेस, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे.” (मार्क १:११) आपल्या पित्याच्या या आश्‍वासनामुळे, पुढे येणाऱ्‍या आव्हानांचा सामना करण्यासाठी येशूला किती मनोधैर्य मिळाले असेल! त्याचप्रमाणे, तुमचे तुमच्या मुलांवर प्रेम आहे याची त्यांना जाणीव करून द्या आणि ते जे काही साध्य करत आहेत त्याबद्दल त्यांची प्रशंसा करा.

हे मान्य आहे की दबाव, छळ व थट्टा यांपासून तुम्ही आपल्या मुलांचे पूर्णपणे संरक्षण करू शकत नाही. तरीसुद्धा, त्यांच्या मदतीसाठी तुम्ही खूप काही करू शकता. तुम्हाला हे कसे करता येईल? त्यांना यहोवासोबत वैयक्‍तिक नातेसंबंध जोडण्यास मदत करा. घरातले वातावरण असे ठेवा ज्यामुळे अर्थपूर्ण संवादाला वाव मिळेल. तुमची कौटुंबिक उपासना व्यावहारिक बनवा आणि घरात मुलांना सुरक्षित वाटेल असे वातावरण तयार करा. तुम्ही असे केल्यास, आव्हानांवर मात करण्यास तुमची मुले नक्कीच सज्ज होतील.

[तळटीप]

^ परि. 2 नावे बदलली आहेत.

[१८ पानांवरील चौकट/चित्र]

सराव सत्रे कशी मदत करू शकतात?

आपल्या मुलांना सहसा सामना करावा लागतो अशा काही प्रसंगांचा येथे उल्लेख करण्यात आला आहे. यांचा आपल्या कौटुंबिक उपासनेत आवर्जून सराव करावा.

▸ शाळेतील कोच तुमच्या मुलीला त्यांच्या खेळ संघात सामील होण्यास सांगतात.

▸ शाळेतून घरी परतताना तुमच्या मुलाला त्याचे मित्र सिगारेट ओढायला देतात.

▸ ‘पुन्हा प्रचार करताना दिसलास तर तुझी खैर नाही’ अशी धमकी काही मुले तुमच्या मुलाला देतात.

▸ तुमची मुलगी घरोघरचे प्रचार कार्य करत असताना अचानक तिची शाळेतील मैत्रीण दारावर येते.

▸ तुमची मुलगी झेंडावंदन का करत नाही असे तिला संबंध वर्गासमोर विचारले जाते.

▸ तुमचा मुलगा साक्षीदार असल्यामुळे एक जण सतत त्याची टिंगल करतो.

[१७ पानांवरील चित्र]

तुमच्या मुलांचासुद्धा संपूर्ण बायबल वाचून काढण्याचा नित्यक्रम आहे का?

[१९ पानांवरील चित्र]

कुटुंबाच्या मनोरंजन कार्यक्रमांत आध्यात्मिक मनोवृत्तीच्या बंधुभगिनींना तुम्ही सामील करता का?