व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

दररोज देवाचा गौरव करा

दररोज देवाचा गौरव करा

दररोज देवाचा गौरव करा

“प्रात:काळी तुझ्या वात्सल्याचे शब्द मला ऐकू दे; . . . ज्या मार्गाने मी चालावे तो मला कळीव,” अशी स्तोत्रकर्ता दाविदाने यहोवाला प्रार्थना केली. (स्तो. १४३:८) एक नवीन दिवस दाखवल्याबद्दल दररोज यहोवाचे आभार मानताना, दिवसभरात योग्य निर्णय घेण्यासाठी व योग्य पाऊल उचलण्यासाठी त्याने आपले मार्गदर्शन करावे, अशी दाविदाप्रमाणे तुम्हीसुद्धा त्याला विनंती करता का? नक्कीच करत असाल.

यहोवाचे समर्पित सेवक असल्यामुळे, आपण ‘खातो, पितो किंवा जे काही करितो ते सर्व देवाच्या गौरवासाठी’ करण्याचा प्रयत्न करतो. (१ करिंथ. १०:३१) आपण दररोज ज्या प्रकारे जीवन जगतो त्यामुळे यहोवाचा एकतर सन्मान होतो किंवा अपमान होतो. तसेच, देवाचे वचन म्हणते, की सैतान ख्रिस्ताच्या अभिषिक्‍त बांधवांवर, किंबहुना देवाच्या सर्व सेवकांवर “रात्रंदिवस” दोषारोप लावतो. (प्रकटी. १२:१०) त्यामुळे सैतानाच्या या खोट्या आरोपांना प्रत्युत्तर देण्याचा आणि आपल्या स्वर्गीय पित्याची “अहोरात्र” पवित्र सेवा करून त्याचे मन आनंदित करण्याचा आपण पक्का निर्धार करतो.—प्रकटी. ७:१५; नीति. २७:११.

आपण दररोज देवाचा गौरव कसा करू शकतो याचे दोन महत्त्वपूर्ण मार्ग आपण थोडक्यात पाहू या. पहिला मार्ग, जीवनात योग्य प्राधान्यक्रम राखणे आणि दुसरा इतरांचा विचार करणे.

समर्पणाला जागणे

आपण यहोवाला आपले जीवन समर्पित करण्याद्वारे आपल्याला मनापासून त्याची सेवा करण्याची इच्छा असल्याचे दाखवून दिले आहे. तसेच, आपण यहोवाच्या मार्गांचे “दररोज” अथवा सदासर्वकाळ अनुसरण करण्याचेही वचनही दिले आहे. (स्तो. ६१:५, ८, सुबोध भाषांतर) तर मग, आपण यहोवाला दिलेल्या वचनाला कसे जागतो? यहोवाबद्दल वाटणारे मनस्वी प्रेम आपण दररोज कसे व्यक्‍त करतो?

आपण कोणत्या जबाबदाऱ्‍या पूर्ण कराव्यात हे यहोवाने आपल्या वचनात अगदी सुस्पष्टपणे सांगितले आहे. (अनु. १०:१२, १३) याविषयी “देवाकडून मिळालेल्या जबाबदाऱ्‍या” या पृष्ठ २२ वरील चौकटीत सांगितले आहे. या सर्व जबाबदाऱ्‍या देवाने दिलेल्या असल्यामुळे त्या महत्त्वपूर्ण आहेत. पण, एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्‍या पार पाडाव्या लागतात तेव्हा कोणत्या जबाबदारीला प्राधान्य द्यावे हे आपण कसे ठरवू शकतो?

आपल्या पवित्र सेवेला अर्थात बायबल अभ्यास, प्रार्थना, ख्रिस्ती सभा व सेवाकार्य या गोष्टींना आपण प्राधान्य देतो. (मत्त. ६:३३; योहा. ४:३४; १ पेत्र २:९) अर्थात, आपण अख्खा दिवस आध्यात्मिक गोष्टींना देऊ शकत नाही, कारण आपल्याला नोकरी, शाळा आणि घरातली इतर कामेही करावी लागतात. असे असले तरी आपण प्रापंचिक नोकरी आणि इतर कामांची आखणी अशा रीतीने करतो ज्यामुळे या गोष्टी आपल्या पवित्र सेवेच्या आड येणार नाहीत. उदाहरणार्थ, सुटीला जाण्याचा बेत करताना विभागीय पर्यवेक्षकांची भेट, खास संमेलन दिन, विभागीय संमेलन किंवा प्रांतीय अधिवेशन चुकणार नाही याची आपण काळजी घेतो. कधीकधी आपण काही कामांची आखणी अशा रीतीने करू शकतो जेणेकरून आपल्याला दोन जबाबदाऱ्‍या एकाच वेळी पूर्ण करता येतील. जसे की, कुटुंबीयांसोबत वेळ घालवता यावा म्हणून संपूर्ण कुटुंब मिळून राज्य सभागृहाची स्वच्छता करण्याचा बेत तुम्ही आखू शकता, अथवा कामाच्या ठिकाणी किंवा शाळेत जेवणाच्या सुटीत सहकर्मींना किंवा शाळा सोबत्यांना साक्ष देऊ शकता. अर्थात, जीवनात आपल्याला निरनिराळ्या गोष्टींसंबंधी निवड करावी लागते जसे की, कोणती नोकरी करावी, शाळा कोणती निवडावी किंवा कोणाशी मैत्री करावी. हे ठरवताना आपला प्रेमळ पिता यहोवा याला ध्यानात ठेवूनच आपण हे निर्णय घेतले पाहिजे कारण त्याची उपासना हीच आपल्या जीवनातील सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.—उप. १२:१३.

इतरांचा विचार करा

आपण नेहमी दुसऱ्‍यांचा विचार करावा व त्यांचे भले करावे अशी यहोवा आपल्याकडून अपेक्षा करतो. पण, दुसरीकडे पाहता सैतान स्वार्थी प्रवृत्तीला बढावा देतो. त्याचे जग “स्वार्थी, धनलोभी” तसेच ‘देहस्वभावासाठी पेरणाऱ्‍या’ लोकांनी भरलेले आहे. (२ तीम. ३:१-५; गलती. ६:८) आपल्या कृतीचा इतरांवर काय परिणाम होऊ शकतो याचा फार कमी लोक विचार करतात. आपल्या सभोवार “देहाची कर्मे” करणारे लोक सर्रास पाहायला मिळतात.—गलती. ५:१९-२१.

पण, यहोवाच्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार चालणाऱ्‍या लोकांची मनोवृत्ती किती वेगळी आहे! इतरांशी वागताना ते प्रीती, ममता आणि चांगुलपणा असे गुण प्रदर्शित करतात. (गलती. ५:२२) स्वतःचा विचार करण्याआधी आपण इतरांचा विचार करावा अशी शिकवण बायबल आपल्याला देते. त्यामुळे आपण आपल्या कृतीतून इतरांबद्दल आत्मीयता दाखवतो. पण, त्याच वेळी त्यांच्या खासगी आयुष्यात न डोकावण्याची दक्षताही बाळगतो. (१ करिंथ. १०:२४, ३३; फिलिप्पै. २:३, ४; १ पेत्र ४:१५) आपल्या ख्रिस्ती बांधवांकडे तर आपण विशेष लक्ष देतोच. पण, सत्यात नसलेल्या लोकांनाही मदत करण्यास आपण झटले पाहिजे. (गलती. ६:१०) दिवसभरात निदान एका तरी व्यक्‍तीला मदत करण्याची संधी तुम्ही शोधता का?—“अशा लोकांचा विचार करा,” ही पृष्ठ २३ वरील चौकट पाहा.

आपण केवळ ठराविक वेळी किंवा ठराविक प्रसंगीच इतरांचा विचार करू नये. (गलती. ६:२; इफिस. ५:२; १ थेस्सलनी. ४:९, १०) तर आपण दररोज इतरांच्या गरजा जाणून घेण्याचा प्रयत्न करतो व आपली गैरसोय होत असली तरी त्या पूर्ण करण्याची तत्परता दाखवतो. आपल्याजवळ जे काही असेल म्हणजे आपला वेळ, आपली भौतिक संपत्ती, अनुभव आणि बुद्धी यांचा उदार मनाने इतरांसाठी वापर करतो. आपण उदारता दाखवल्यास यहोवा आपल्याला उदारता दाखवेल असे आश्‍वासन तो आपल्याला देतो.—नीति. ११:२५; लूक ६:३८.

“अहोरात्र” पवित्र सेवा करा

यहोवाची “अहोरात्र” पवित्र सेवा करणे खरोखरच शक्य आहे का? होय, आपल्या उपासनेशी संबंधित सर्व कार्ये नियमितपणे व प्रामाणिकपणे करून आपण असे करू शकतो. (प्रे. कृत्ये २०:३१) देवाच्या वचनाचे दररोज वाचन व मनन करण्याद्वारे, निरंतर प्रार्थना करण्याद्वारे, सर्व सभांना उपस्थित राहण्याचा प्रयत्न करण्याद्वारे व साक्ष देण्याच्या प्रत्येक संधीचा फायदा घेण्याद्वारे आपण आपले जीवन पवित्र सेवेने समृद्ध करू शकतो.—स्तो. १:२; लूक २:३७; प्रे. कृत्ये ४:२०; १ थेस्सलनी. ३:१०; ५:१७.

आपण वैयक्‍तिकपणे यहोवाला पवित्र सेवा सादर करत आहोत का? करत असल्यास, आपल्या दैनंदिन जीवनाच्या हरएक पैलूतून, यहोवाचे मन आनंदित करण्याची व सैतानाच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्याची आपली इच्छा दिसून येईल. आपण काहीही करत असलो किंवा कोणत्याही परिस्थितीत असलो तरी, यहोवाचा गौरव करण्यास आपण झटतो. आपण त्याच्या तत्त्वांनुसार वागण्याबोलण्याचा प्रयत्न करतो व त्याच्या तत्त्वांवर आधारितच निर्णय घेतो. त्याच्यावर पूर्ण भरवसा ठेवून आणि त्याची सेवा करण्यात आपल्या शक्‍तीचा उपयोग करून आपल्याला त्याच्या प्रेमळ काळजीबद्दल व तो देत असलेल्या मदतीबद्दल कदर असल्याचे आपण दाखवून देतो. तसेच, अपरिपूर्ण असल्यामुळे आपल्या हातून त्याच्या दर्जांचे उल्लंघन होते तेव्हा आपल्याला दिलेला सल्ला व ताडन आपण नम्रपणे स्वीकारतो.—स्तो. ३२:५; ११९:९७; नीति. ३:२५, २६; कलस्सै. ३:१७; इब्री ६:११, १२.

तर मग, आपण दररोज देवाचा गौरव करू या. असे केल्याने आपल्याला तजेला मिळेल व सदासर्वकाळ आपल्या स्वर्गीय पित्याच्या प्रेमळ काळजीचा उपभोग घेता येईल.—मत्त. ११:२९; प्रकटी. ७:१६, १७.

[२२ पानांवरील चौकट/चित्रे]

देवाकडून मिळालेल्या जबाबदाऱ्‍या

• नियमितपणे प्रार्थना करा.—रोम. १२:१२.

• बायबलचे वाचन व अभ्यास करा आणि शिकलेल्या गोष्टी जीवनात लागू करा.—स्तो. १:२; १ तीम. ४:१५.

• मंडळीमध्ये यहोवाची उपासना करा. —स्तो. ३५:१८; इब्री १०:२४, २५.

• कुटुंबाच्या भौतिक, आध्यात्मिक व भावनिक गरजा पूर्ण करा.—१ तीम. ५:८.

• राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करा व शिष्य बनवा.—मत्त. २४:१४; २८:१९, २०.

• स्वतःच्या शारीरिक, आध्यात्मिक व भावनिक गरजा पूर्ण करा. यात हितकर मनोरंजनाचाही समावेश करा.—मार्क ६:३१; २ करिंथ. ७:१; १ तीम. ४:८, १६.

• मंडळीच्या जबाबदाऱ्‍या काळजीपूर्वक पार पाडा.—प्रे. कृत्ये २०:२८; १ तीम. ३:१.

• तुमचे घर व राज्य सभागृह सुस्थितीत राहावे म्हणून त्यांची देखभाल करा.—१ करिंथ. १०:३२.

[२३ पानांवरील चौकट/चित्र]

अशा लोकांचा विचार करा

• मंडळीतील वयस्क बंधू किंवा भगिनी. —लेवी. १९:३२.

• शारीरिक आजाराने अथवा भावनिक समस्यांनी पीडित असलेल्या व्यक्‍ती. —नीति. १४:२१.

• मंडळीतील गरजू सदस्य. —रोम. १२:१३.

• तुमच्या कुटुंबातील सदस्य. —१ तीम. ५:४, ८.

• विवाहसोबती गमावलेला बंधू किंवा भगिनी.—१ तीम. ५:९.

• मंडळीतील मेहनती वडील. —१ थेस्सलनी. ५:१२, १३; १ तीम. ५:१७.