व्हिडिओ पाहण्यासाठी

बायबलने बदललं जीवन

बायबलने बदललं जीवन

बायबलने बदललं जीवन

“मी मनातून भेदभावपण काढून टाकला”​—हाफेनी दामा

वय: ३४

देश: झांबिया

पार्श्‍वभूमी: रास्ताफेरियन गटाचा सदस्य

माझं आधीचं जीवन: माझा जन्म झांबियामध्ये एका शरणार्थी शिबिरात झाला. युद्धामुळे माझी आई नामिबियातून झांबियात पळून आली होती. इथे आल्यावर ती साऊथ वेस्ट आफ्रिका पीपल्स ऑर्गनायझेशन (SWAPO) या संघटनेची सदस्य बनली. ही संघटना त्या वेळी नामिबियात सत्तेवर असलेल्या दक्षिण आफ्रिकी शासनाचा विरोध करत होती.

१५ वर्षांचा होईपर्यंत मी वेगवेगळ्या शरणार्थी शिबिरांमध्ये राहिलो. SWAPO शिबिरांमध्ये लहान मुलांना मुक्‍ती आंदोलनासाठी तयार केलं जायचं. संघटनेच्या विचारांचा आमच्यावर प्रभाव पाडण्यासाठी आम्हाला सतत त्याबद्दल शिकवलं जायचं. तसंच, गोऱ्‍या लोकांचा द्वेष करायलाही आम्हाला शिकवलं जायचं.

शिबिरात एक चर्च होतं. ते रोमन कॅथलिक, लूथरन, अँग्लिकन आणि इतर पंथांनी मिळून बनलेलं होतं. मी जेव्हा ११ वर्षांचा होतो तेव्हा मला या चर्चमध्ये ख्रिस्ती धर्माचा स्वीकार करायची इच्छा होती. पण, मी ज्या पाळकाशी बोललो त्याने मला असं न करण्याचा सल्ला दिला. तेव्हापासून मी नास्तिक बनलो. मी १५ वर्षांचा झालो तेव्हा मला रेगे संगीताचं वेड लागलं. तसंच, काळ्या वर्णाच्या आफ्रिकन लोकांना जो अन्याय सहन करावा लागत होता त्यापासून त्यांना मुक्‍त करण्याची इच्छा मला होती. यामुळे मी रास्ताफेरियन आंदोलनात सामील झालो. या गटाचे लोक आपले केस वाढवायचे आणि त्यांचे केस जटांसारखे आणि वळलेल्या दोरीसारखे दिसायचे. या हेअरस्टाईलला ड्रेडलॉक्स म्हणतात. मग मीसुद्धा त्यांच्यासारखेच केस वाढवले. तसंच मी गांजा ओढू लागलो, मांस खायचं सोडून दिलं आणि काळ्या लोकांच्या मुक्‍तीचं समर्थन करू लागलो. पण, त्याच वेळी मी खूप अनैतिक जीवन जगत होतो, हिंसक चित्रपट पाहत होतो आणि माझी भाषाही खूप घाणेरडी होती.

बायबलने जीवन कसं बदललं? मग १९९५ मध्ये, जेव्हा मी वीसेक वर्षांचा झालो तेव्हा मी माझ्या भविष्याबद्दल गांभीर्याने विचार करू लागलो. रास्ताफेरियन लोकांच्या सगळ्या प्रकाशनांचा मी खोलवर अभ्यास करत होतो. यांपैकी काही पुस्तकांत बायबलच्या वचनांचा उल्लेख केला होता. पण त्यांत दिलेली स्पष्टीकरणं मला तितकी काही पटली नाहीत. म्हणून मी स्वतःहूनच बायबल वाचायचं ठरवलं.

नंतर रास्ताफेरियन गटाचा सदस्य असलेल्या माझ्या एका मित्राने मला एक छोटंसं पुस्तक दिलं. ते पुस्तक यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलं होतं. मी या पुस्तकाचा स्वतःहूनच अभ्यास केला. त्यात दिलेली बायबलमधली वचनंही मी उघडून पाहिली. नंतर, मी यहोवाच्या साक्षीदारांना भेटून त्यांच्यासोबत हा बायबल अभ्यास सुरू ठेवला.

बऱ्‍याच प्रयत्नांनंतर मी गांजा ओढायचं आणि खूप दारू प्यायचं सोडून दिलं. (२ करिंथकर ७:१) मी माझे लांब केस कापून टाकले आणि व्यवस्थित राहू लागलो. यासोबतच मी अश्‍लील साहित्य आणि हिंसक चित्रपट पाहायचं, तसंच घाणेरडी भाषा बोलायचं सोडून दिलं. (इफिसकर ५:३, ४) हळूहळू, गोऱ्‍या लोकांबद्दल मी मनातून भेदभावपण काढून टाकला. (प्रेषितांची कार्यं १०:३४, ३५) हे बदल करण्यासाठी मला पूर्वी आवडणारं संगीत ऐकायचंही सोडून द्यावं लागलं, कारण ते जातीयवाद आणि भेदभावाला बढावा देणारं होतं. शिवाय, माझे जुने मित्र मला माझ्या आधीच्या जीवनशैलीकडे परत जायचं प्रोत्साहन द्यायचे. त्यामुळे मी त्यांच्याशीही संबंध तोडून टाकला.

स्वतःमध्ये हे बदल केल्यानंतर, मी यहोवाच्या साक्षीदारांचं राज्य सभागृह शोधत शोधत तिथे गेलो आणि त्यांना सांगितलं की मलाही यहोवाचा साक्षीदार व्हायचंय. तेव्हा त्यांनी माझ्यासोबत बायबल अभ्यास करायची व्यवस्था केली. पुढे मी यहोवाचा साक्षीदार म्हणून बाप्तिस्मा घ्यायचं ठरवलं, तेव्हा माझ्या घरच्यांना ते बिलकूल आवडलं नाही. माझ्या आईने तर मला सांगितलं, की दुसरा कोणताही “ख्रिस्ती” पंथ निवड पण साक्षीदार बनू नकोस. माझ्या आईकडून असलेले एक नातेवाईक मोठे सरकारी अधिकारी होते. मी साक्षीदार बनायचं ठरवलंय हे कळल्यावर ते सतत माझी टीका करायचे.

पण येशू लोकांशी कसा वागायचा हे जाणून घेतल्यामुळे आणि तसं वागायचा प्रयत्न केल्यामुळे, मला थट्टेचा आणि विरोधाचा सामना करायला मदत झाली. साक्षीदार जे शिकवतात त्याची बायबलमध्ये सांगितलेल्या गोष्टींशी तुलना करून पाहिल्यावर मला पक्की खातरी पटली की मला खरा धर्म सापडलाय. उदाहरणार्थ, बायबलमध्ये दिलेल्या आज्ञेप्रमाणे साक्षीदार लोकांना प्रचार करतात. (मत्तय २८:१९, २०; प्रेषितांची कार्यं १५:१४) तसंच ते राजकारणातही भाग घेत नाहीत.​—स्तोत्र १४६:३, ४; योहान १५:१७, १८.

मला झालेला फायदा: बायबलच्या स्तरांप्रमाणे जगल्यामुळे मला बरेच फायदे झाले आहेत. जसं की, गांजाची सवय सोडून दिल्यामुळे दर महिन्यात माझी शेकडो डॉलरची बचत होते. तसंच, मी नशा करायचो तेव्हा जसे मला भास व्हायचे तसे आता होत नाहीत आणि माझं मानसिक आणि शारीरिक आरोग्यही सुधारलंय.

तरुणपणापासूनच मला वाटायचं की जीवनाला एक दिशा असली पाहिजे आणि एक निश्‍चित ध्येय असलं पाहिजे. आज मला ती दिशा आणि ध्येय सापडलंय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, मी देवाशी एक जवळचं नातं जोडू शकलोय.​—याकोब ४:८.