व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

‘नीतिमान सूर्यासारखे प्रकाशतील’

‘नीतिमान सूर्यासारखे प्रकाशतील’

‘नीतिमान सूर्यासारखे प्रकाशतील’

“तेव्हा नीतिमान्‌ आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे प्रकाशतील.”—मत्त. १३:४३.

१. देवाच्या राज्याचे कोणकोणते पैलू स्पष्ट करण्यासाठी येशूने दृष्टान्तांचा वापर केला?

 येशू ख्रिस्ताने देवाच्या राज्याचे वेगवेगळे पैलू स्पष्ट करण्यासाठी अनेक दृष्टान्तांचा किंवा दाखल्यांचा वापर केला. “सर्व गोष्टी येशूने दाखल्यांनी लोकसमुदायांना सांगितल्या आणि दाखल्यावाचून तो त्यांच्याबरोबर काही बोलला नाही.” (मत्त. १३:३४) राज्याचे बी पेरण्याबद्दलच्या दृष्टान्तांत, येशूने राज्याचा संदेश स्वीकारण्यात एका व्यक्‍तीच्या मनोवृत्तीची काय भूमिका असते, व आध्यात्मिक वाढ घडवून आणण्यात यहोवाची काय भूमिका असते यावर भर दिला. (मार्क ४:३-९, २६-२९) तसेच, येशूने राज्य संदेशाला प्रतिसाद देणाऱ्‍यांच्या संख्येत विलक्षण वाढ होईल आणि सुरुवातीला ही वाढ नेहमीच स्पष्टपणे दिसून येणार नाही हे देखील दृष्टान्तांच्या साहाय्याने स्पष्ट केले. (मत्त. १३:३१-३३) यासोबतच, त्याने हेही सांगितले की राज्याचा संदेश स्वीकारणारे सर्वच जण राज्याची प्रजा या नात्याने योग्य असतातच असे नाही.—मत्त. १३:४७-५०. *

२. गहू व निदणाच्या दृष्टान्तात, चांगले बी कशास सूचित करते?

पण, येशूच्या एका दृष्टान्तात, त्याच्या राज्यात त्याच्यासोबत शासन करणाऱ्‍यांना एकत्र करण्याबद्दल खासकरून सांगण्यात आले आहे. मत्तयाच्या १३ व्या अध्यायात असलेल्या या दृष्टान्ताला गहू व निदणाचा दृष्टान्त म्हटले जाते. दुसऱ्‍या एका दृष्टान्तात, पेरलेले बी हे “राज्याचे वचन” आहे असे येशू आपल्याला सांगतो. पण, या विशिष्ट दृष्टान्तात म्हणजे, गहू व निदणाच्या दृष्टान्तात तो आपल्याला सांगतो की चांगले बी हे ‘राज्याच्या पुत्रांना’ सूचित करते. (मत्त. १३:१९, ३८) ते राज्याचे प्रजाजन नाहीत, तर राज्याचे “पुत्र” किंवा वारस आहेत.—रोम. ८:१४-१७; गलतीकर ४:६, ७ वाचा.

गहू व निदणाचा दृष्टान्त

३. दृष्टान्तातील मनुष्यासमोर कोणती समस्या येते व तो ती समस्या कशा प्रकारे हाताळतो ते स्पष्ट करा.

गहू व निदणाचा दृष्टान्त असा आहे: “कोणा एका मनुष्याने आपल्या शेतात चांगले बी पेरले त्याच्यासारखे स्वर्गाचे राज्य आहे. लोक झोपेत असताना त्याचा वैरी येऊन गव्हामध्ये निदण पेरून गेला; पण जेव्हा पाला फुटला व दाणे आले तेव्हा निदणहि दिसले. तेव्हा घरधन्याच्या दासांनी येऊन त्याला म्हटले, ‘महाराज, आपण आपल्या शेतामध्ये चांगले बी पेरले ना? तर मग त्यात निदण कोठून आले?’ तो त्यांना म्हणाला, ‘हे काम कोणा वैऱ्‍याचे आहे.’ दासांनी त्याला म्हटले, ‘तर आम्ही जाऊन ते जमा करावे अशी आपली इच्छा आहे काय?’ तो म्हणाला, ‘नाही. तुम्ही निदण गोळा करिताना त्याबरोबर कदाचित्‌ गहूहि उपटाल. कापणीपर्यंत दोन्ही बरोबर वाढू द्या; मग कापणीच्या वेळेस मी कापणाऱ्‍यांस सांगेन की, पहिल्याने निदण गोळा करा व जाळण्यासाठी त्याच्या पेंढ्या बांधा; परंतु गहू माझ्या कोठारात साठवा.’”—मत्त. १३:२४-३०.

४. (क) दृष्टान्तातील मनुष्य कोण आहे? (ख) येशूने कधी व कशा प्रकारे बी पेरण्यास सुरुवात केली?

शेतात चांगले बी पेरणारा मनुष्य कोण आहे? याचे उत्तर येशू आपल्या शिष्यांना दृष्टान्ताचा अर्थ स्पष्ट करताना देतो: “चांगले बी पेरणारा हा मनुष्याचा पुत्र आहे.” (मत्त. १३:३७) ‘मनुष्याच्या पुत्राने’ म्हणजे येशूने पृथ्वीवर आपल्या साडेतीन वर्षांच्या सेवाकार्यादरम्यान पेरणी करण्यासाठी शेतजमीन तयार केली. (मत्त. ८:२०; २५:३१; २६:६४) नंतर, सा.यु. ३३ च्या पेन्टेकॉस्टपासून त्याने चांगले बी म्हणजे ‘राज्याच्या पुत्रांची’ पेरणी करायला सुरुवात केली. यहोवाचा प्रतिनिधी या नात्याने येशूने आपल्या शिष्यांवर देवाचे पुत्र होण्यासाठी पवित्र आत्मा ओतण्यास सुरुवात केली तेव्हा हे घडले. * (प्रे. कृत्ये २:३३) चांगले बी वाढून पीक तयार झाले. त्याअर्थी, येशूसोबत त्याच्या राज्यात राज्य करणाऱ्‍या सर्व सहवारसांना कालांतराने एकत्र करून त्यांची संख्या पूर्ण करणे हा चांगले बी पेरण्यामागचा उद्देश होता.

५. दृष्टान्तातील शत्रू कोण आहे आणि निदण कोणाला सूचित करते?

दृष्टान्तात सांगितलेला शत्रू कोण आहे, आणि निदण कोण आहेत? शत्रू हा “सैतान” आहे असे येशू आपल्याला सांगतो. निदण हे “त्या दुष्टाचे पुत्र आहेत.” (मत्त. १३:२५, ३८, ३९) येशूने सांगितलेले निदण हे शेतात उगवणारे एक विशिष्ट प्रकारचे रानगवत होते. हे विषारी गवत सुरुवातीला गव्हाच्या रोपासारखेच दिसते. राज्याचे पुत्र असण्याचा दावा करणाऱ्‍या, पण चांगले फळ उत्पन्‍न न करणाऱ्‍या नकली ख्रिश्‍चनांचे किती अचूक वर्णन! ख्रिस्ताचे अनुयायी असण्याचा दावा करणारे हे ढोंगी ख्रिश्‍चन खरेतर दियाबल सैतानाची “संतति” आहेत.—उत्प. ३:१५.

६. निदण दिसून येण्यास केव्हा सुरुवात झाली आणि त्या वेळी लोक कोणत्या अर्थाने “झोपेत” होते?

निदणासारखे असलेले हे ख्रिस्ती कधी दिसून आले? येशू सांगतो: “लोक झोपेत असताना.” (मत्त. १३:२५) हे कधी घडले? याचे उत्तर पौलाने इफिसच्या वडिलांना लिहिलेल्या पत्रात आपल्याला मिळते. त्याने लिहिले: “मी गेल्यावर कळपाची दयामाया न करणारे क्रूर लांडगे तुम्हामध्ये शिरतील, हे मी जाणून आहे. तुम्हापैकीहि काही माणसे उठून शिष्यांना आपल्यामागे ओढून घेण्यासाठी विपरीत गोष्टी बोलतील.” (प्रे. कृत्ये २०:२९, ३०) त्याने त्या वडिलांना आध्यात्मिक रीत्या जागृत राहण्याचा सल्ला दिला. पण, धर्मत्यागाला “प्रतिबंध” ठरलेल्या प्रेषितांचा एकेक करून मृत्यू होऊ लागला आणि या अर्थाने ते झोपी गेले, त्यानंतर अनेक ख्रिस्ती आध्यात्मिक अर्थाने झोपी गेले. (२ थेस्सलनीकाकर २:३, ६-८ वाचा.) अशा रीतीने मोठ्या धर्मत्यागास सुरुवात झाली.

७. गव्हापैकीच काही रोपांचे रूपांतर निदणात झाले होते का? स्पष्ट करा.

येशूने गव्हाचे रूपांतर निदणात होईल असे म्हटले नव्हते; तर, गव्हामध्ये निदण पेरण्यात आले असे त्याने म्हटले. त्यामुळे या दृष्टान्तात सत्याचा मार्ग सोडून देणाऱ्‍या खऱ्‍या ख्रिश्‍चनांबद्दल सांगण्यात आलेले नाही. तर, सैतानाने कशा प्रकारे जाणूनबुजून दुष्ट लोकांना ख्रिस्ती मंडळीत आणले आणि मंडळीला भ्रष्ट करण्याचा प्रयत्न केला याकडे हा दृष्टान्त लक्ष वेधतो. सर्वात शेवटचा प्रेषित योहान वयोवृद्ध झाला तोपर्यंत हा धर्मत्याग स्पष्टपणे दिसू लागला होता.—२ पेत्र २:१-३; १ योहा. २:१८.

“कापणीपर्यंत दोन्ही बरोबर वाढू द्या”

८, ९. (क) धन्याने आपल्या सेवकांना दिलेल्या सूचना येशूच्या श्रोत्यांना योग्यच का वाटल्या असतील? (ख) या दृष्टान्ताच्या पूर्णतेत, गहू व निदण कशा प्रकारे एकत्र वाढले?

धन्याचे सेवक समस्येबद्दल त्याला सांगतात आणि विचारतात: “तर आम्ही जाऊन [निदण] जमा करावे अशी आपली इच्छा आहे काय?” (मत्त. १३:२७, २८) तो त्यांना गहू व निदण कापणीपर्यंत एकत्र वाढू द्या असे सांगतो. धन्याचे हे उत्तर ऐकून कदाचित आपल्याला आश्‍चर्य वाटेल. पण, येशूच्या शिष्यांना धन्याची ती आज्ञा योग्यच वाटली असेल. कारण, येशू ज्या निदणाबद्दल बोलत होता त्याच्यात व गव्हात फरक करणे किती कठीण असते हे त्यांना माहीत असेल. ज्यांना शेतकामाचे थोडेफार ज्ञान आहे त्यांनाही कदाचित याची कल्पना असेल की सहसा रानगवताची मुळे गव्हाच्या मुळांशी गुंतलेली असतात. * तेव्हा, धनी आपल्या सेवकांना कापणीपर्यंत वाट पाहण्यास सांगतो ते योग्यच नाही का?

त्याचप्रमाणे अनेक शतकांदरम्यान, ख्रिस्ती धर्मजगताच्या अनेक पंथांनी—आधी रोमन कॅथलिक व ऑर्थोडॉक्स चर्चेसमध्ये आणि नंतर प्रोटेस्टंट धर्मात उगम झालेल्या अनेक पंथांमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात निदण उत्पन्‍न केले आहे. त्याच वेळी, जगाच्या शेतात शुद्ध गव्हाचे काही बी देखील पेरण्यात आले होते. दृष्टान्तातील धन्याने गहू व निदण वाढत असलेल्या दीर्घ काळादरम्यान आणि त्यामानाने कमी अवधीचा असलेला कापणीचा काळ येईपर्यंत धीराने वाट पाहिली.

दीर्घ काळ वाट पाहिलेला कापणीचा काळ

१०, ११. (क) कापणीची वेळ केव्हा येते? (ख) लाक्षणिक गहू कशा प्रकारे यहोवाच्या कोठारात आणला जात आहे?

१० येशू आपल्याला सांगतो: “कापणी ही युगाची समाप्ति आहे; आणि कापणारे हे देवदूत आहेत.” (मत्त. १३:३९) या जगाच्या शेवटल्या दिवसांत गहू व निदण यांना वेगळे करण्याचे काम केले जाते. राज्याच्या पुत्रांना गोळा करून निदणासारख्या लोकांपासून वेगळे केले जाईल. याबाबतीत प्रेषित पेत्र आपल्याला असे सांगतो: “देवाच्या घरापासून न्यायनिवाड्यास आरंभ होण्याची वेळ आली आहे; आणि तो आरंभ प्रथम आपल्यापासून झाला, तर देवाच्या सुवार्तेचा अवमान करणाऱ्‍यांचा शेवट काय होईल?”—१ पेत्र ४:१७.

११ शेवटले दिवस किंवा “युगाची समाप्ति” सुरू झाल्यानंतर लवकरच, खरे ख्रिस्ती असण्याचा दावा करणाऱ्‍यांचा, मग ते “राज्याचे पुत्र” असोत किंवा “त्या दुष्टाचे पुत्र” असोत, न्यायनिवाडा सुरू झाला. “पहिल्याने,” मोठ्या बाबेलचे पतन झाले, आणि त्यानंतर कापणीच्या सुरुवातीला राज्याच्या पुत्रांना गोळा करण्यात आले. (मत्त. १३:३०) पण, आता लाक्षणिक गहू कशा प्रकारे यहोवाच्या कोठारात आणला जात आहे? हे गोळा केलेले लोक एकतर पुनःस्थापित ख्रिस्ती मंडळीचे भाग बनले, जेथे ते देवाचा अनुग्रह व संरक्षण अनुभवतात, किंवा त्यांना आपले स्वर्गीय प्रतिफळ मिळाले.

१२. कापणी किती काळ सुरू राहते?

१२ न्यायनिवाडा किती काळ चालतो? येशूने कापणीची ‘वेळ’ असे म्हटले होते, यावरून असे दिसते की कापणी काही काळापर्यंत चालू राहते. (प्रकटी. १४:१५, १६) अभिषिक्‍त जनांपैकी प्रत्येक सदस्याचा न्यायनिवाडा शेवटल्या दिवसांदरम्यान सुरू राहतो. त्यांच्यावर अंतिम शिक्का मारून होईपर्यंत हा न्यायनिवाडा सुरू राहील.—प्रकटी. ७:१-४.

१३. निदणासारखे असलेले कशा प्रकारे अडखळणाचे कारण ठरतात आणि ते कशा प्रकारे अनाचार करत आहेत?

१३ राज्यातून कोणाला जमा करून बाहेर काढले जाईल आणि ते कशा प्रकारे अडखळणाचे कारण ठरतात व अनाचार करतात? (मत्त. १३:४१) ख्रिस्ती धर्मजगतातील निदणासारख्या असलेल्या पाळकांनी अनेक शतकांदरम्यान लाखो लोकांची दिशाभूल केली आहे. नरकाग्नीतील अनंत काळ यातना व गोंधळात टाकणारे रहस्यमय त्रैक्य यांसारख्या, देवाचा अनादर करणाऱ्‍या व ‘अडखळविणाऱ्‍या’ शिकवणींद्वारे त्यांनी असे केले आहे. अनेक धर्मपुढाऱ्‍यांनी या जगाशी मैत्री करून जारकर्म करण्याद्वारे आणि काहींनी तर उघडउघड अनैतिक आचरण करण्याद्वारे आपल्या कळपांकरता वाईट उदाहरण मांडले आहे. (याको. ४:४) त्यासोबतच, ख्रिस्ती धर्मजगत आपल्या सदस्यांचे अनैतिक आचरण अधिकाधिक प्रमाणात खपवून घेऊ लागले आहे. (यहूदा ४ वाचा.) आणि इतके असूनही, ते धार्मिक व देवभीरू असल्याचा दिखावा करत राहतात. अशा निदणासारख्या प्रभावांपासून आणि अडखळवणाऱ्‍या शिकवणींपासून वेगळे केले असल्यामुळे राज्याच्या पुत्रांना किती धन्य वाटते!

१४. निदणासारखे असलेले कोणत्या अर्थाने रडतात व दात खातात?

१४ निदणासारखे असलेले कोणत्या अर्थाने रडतात व दात खातात? (मत्त. १३:४२) ‘राज्याच्या पुत्रांनी’ निदणासारख्या असलेल्यांच्या आध्यात्मिक रीत्या विषारी प्रभावाचा व शिकवणींचा पर्दाफाश केल्यामुळे या ‘दुष्टाच्या पुत्रांना’ यातना होतात. तसेच, चर्च सदस्यांकडून मिळणारा पाठिंबा दिवसेंदिवस कमी होत चालल्यामुळे व त्यासोबतच सामान्य लोकांवरील आपले नियंत्रण कमी झाल्यामुळे ते शोक करतात.यशया ६५:१३, १४ वाचा.

१५. निदणासारखे असलेल्यांना जाळण्यात येते याचा काय अर्थ होतो?

१५ निदण गोळा केले जाते व जाळले जाते यावरून काय सूचित होते? (मत्त. १३:४०) यावरून निदणाचे सरतेशेवटी काय होईल हे सूचित होते. निदणाला लाक्षणिक रीत्या अग्नीच्या भट्टीत टाकले जाते याचा अर्थ ते कायमचे नष्ट केले जाईल. (प्रकटी. २०:१४; २१:८) निदणासारखे असलेल्या ढोंगी, नकली ख्रिश्‍चनांचा ‘मोठ्या संकटादरम्यान’ पूर्णपणे नाश केला जाईल.—मत्त. २४:२१.

ते “सूर्यासारखे प्रकाशतील”

१६, १७. देवाच्या मंदिराबद्दल मलाखीने काय भाकीत केले आणि कशा प्रकारे त्याची पूर्तता होण्यास सुरुवात झाली?

१६ गव्हासारखे असलेले केव्हा “सूर्यासारखे प्रकाशतील”? (मत्त. १३:४३) मलाखीने देवाचे मंदिर शुद्ध करण्याबद्दल असे भाकीत केले: “‘ज्या प्रभूला तुम्ही शोधिता तो एकाएकी आपल्या मंदिरात येईल; पाहा, करार घेऊन येणाऱ्‍या निरोप्याची तुम्ही अपेक्षा करीत आहा, तो येत आहे,’ असे सेनाधीश परमेश्‍वर म्हणतो. ‘त्याच्या आगमनाच्या दिवशी कोण निभावेल? तो प्रगट होईल तेव्हा कोण टिकेल? कारण तो धातु गाळणाऱ्‍याच्या अग्नीसारखा, परटाच्या खारासारखा आहे; रुपे गाळून शुद्ध करणाऱ्‍यासारखा तो बसेल, व लेवीच्या वंशजांस शुद्ध करील; त्यांस सोन्यारुप्याप्रमाणे शुद्ध करील, मग ते धर्माने परमेश्‍वराला बलि अर्पण करितील.’”—मला. ३:१-३.

१७ आधुनिक काळात ही भविष्यवाणी १९१८ मध्ये पूर्ण होण्यास सुरुवात झाली जेव्हा यहोवाने ‘करार घेऊन येणाऱ्‍या निरोप्यासोबत’ म्हणजे येशू ख्रिस्तासोबत आध्यात्मिक मंदिराची पाहणी केली. हे शुद्धीकरणाचे काम पूर्ण झाल्यावर काय घडते याबद्दल मलाखी आपल्याला सांगतो: “तुम्ही वळाल आणि धार्मिक व दुष्ट यांच्यातला आणि देवाची सेवा करणारा व सेवा न करणारा यांच्यातला भेद तुम्हाला कळेल.” (मला. ३:१८) त्या काळात पुन्हा क्रियाशील झालेल्या खऱ्‍या ख्रिश्‍चनांच्या कार्यात एकाएकी जी उल्लेखनीय वाढ झाली त्यावरून कापणीचा काळ सुरू झाल्याचे दिसून येते.

१८. आज आपल्या दिवसांत काय घडणार असल्याचे दानीएलाने पूर्वभाकीत केले?

१८ “जे सुज्ञ असतील ते अंतराळीच्या प्रकाशासारखे झळकतील; पुष्कळ लोकांस धार्मिकतेकडे वळविणारे लोक युगानुयुग ताऱ्‍यांप्रमाणे चमकतील,” असे संदेष्टा दानीएलाने भाकीत केले तेव्हा तो आजच्या आपल्या काळाबद्दल बोलत होता. (दानी. १२:३) इतक्या तेजस्वीपणे प्रकाशणारे हे लोक कोण आहेत? अर्थातच, हे अभिषिक्‍त ख्रिस्ती आहेत, ज्यांची येशूने गहू व निदणाच्या दृष्टान्तात गव्हाच्या पिकाशी तुलना केली. निदणासारखे असलेल्या नकली ख्रिश्‍चनांना आगीत टाकण्यासाठी ‘जमा केले’ जात आहे हे दिवसेंदिवस वाढत चाललेल्या मेंढरांसमान लोकांच्या मोठ्या समुदायाने स्पष्टपणे ओळखले आहे. आणि आत्मिक इस्राएलच्या शेष जनांची सोबत धरण्याद्वारे, राज्याची ही भावी प्रजा देखील या अंधकारमय जगात आपला प्रकाश पाडत आहे.—जख. ८:२३; मत्त. ५:१४-१६; फिलिप्पै. २:१५.

१९, २०. राज्याचे पुत्र आतुरतेने कशाची वाट पाहत आहेत आणि पुढील लेखात आपण कशाबद्दल चर्चा करणार आहोत?

१९ आज, “राज्याचे पुत्र” त्यांना मिळणार असलेल्या गौरवशाली स्वर्गीय प्रतिफळाची मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. (रोम. ८:१८, १९; १ करिंथ. १५:५३; फिलिप्पै. १:२१-२४) पण, तोपर्यंत त्यांनी देवाला विश्‍वासू राहून तेजस्वीपणे प्रकाशण्याद्वारे ‘दुष्टाच्या पुत्रांपेक्षा’ वेगळे असल्याचे दाखवले पाहिजे. (मत्त. १३:३८; प्रकटी. २:१०) आज आपल्या काळात निदण लाक्षणिक रीत्या “जमा करून” बाहेर काढल्यामुळे झालेले परिणाम पाहण्याची संधी मिळाल्याबद्दल आपण किती आनंदित होऊ शकतो!

२० पण, राज्याचे पुत्र आणि पृथ्वीवर सदासर्वकाळ जगण्याची आशा बाळगणाऱ्‍या त्या राज्याची प्रजा असलेल्यांचा दिवसेंदिवस वाढत चाललेला मोठा लोकसमुदाय यांच्यात काय संबंध आहे? पुढील लेखात या प्रश्‍नाचे उत्तर देण्यात येईल.

[तळटीपा]

^ परि. 1 या दृष्टान्तांच्या तपशीलवार माहितीसाठी टेहळणी बुरूज, जुलै १५, २००८, यातील पृष्ठे १२-२१ पाहा.

^ परि. 4 या दृष्टान्तातील बी पेरणे हे प्रचाराच्या व शिष्य बनवण्याच्या कार्याला सूचित करत नाही, ज्यामुळे नवीन लोक राज्य संदेश स्वीकारून अभिषिक्‍त ख्रिस्ती बनणार होते. शेतात पेरलेल्या चांगल्या बीबद्दल बोलताना येशूने, [“हे राज्याचे पुत्र बनतील” असे न म्हणता] “हे राज्याचे पुत्र आहेत” असे म्हटले. तेव्हा, बी पेरणे हे प्रचाराच्या व शिष्य बनवण्याच्या कार्याला नव्हे, तर जगाच्या शेतात राज्याच्या या पुत्रांना अभिषिक्‍त केले जाण्यास सूचित करते.

^ परि. 8 येशू ज्या विशिष्ट प्रकारच्या रानगवताबद्दल सांगत होता त्याची मुळे गव्हाच्या मुळांशी इतकी गुंतलेली असतात की कापणीपूर्वी ते उपटून काढल्यास गव्हाच्या उत्पन्‍नात घट होऊ शकते.—शास्त्रवचनांवरील सूक्ष्मदृष्टी, खंड १ (इंग्रजी), पृष्ठ ११७८ पाहा.

तुम्हाला आठवते का?

येशूने दिलेल्या गहू व निदणाच्या दृष्टान्तातील खालील गोष्टींचा काय अर्थ होतो?

• चांगले बी

• बी पेरणारा मनुष्य

• बी पेरणे

• शत्रू

• निदण

• कापणीची वेळ

• कोठार

• रडणे व दात खाणे

• अग्नीची भट्टी

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२० पानांवरील चित्रे]

चांगले बी पेरण्याची सुरुवात सा.यु. ३३ च्या पेन्टेकॉस्टपासून झाली

[२३ पानांवरील चित्र]

आज लाक्षणिक गहू यहोवाच्या कोठारात आणले जात आहे

[चित्राचे श्रेय]

Pictorial Archive (Near Eastern History) Est.