व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कोणाच्या व कशाच्या नावाने बाप्तिस्मा?

कोणाच्या व कशाच्या नावाने बाप्तिस्मा?

कोणाच्या व कशाच्या नावाने बाप्तिस्मा?

“तेव्हा तुम्ही जाऊन . . . शिष्य करा; त्यांस पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या.”—मत्त. २८:१९.

१, २. (क) सा.यु. ३३ च्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी जेरूसलेममध्ये काय घडले? (ख) लोकसमुदायातील अनेक जण कशामुळे बाप्तिस्मा घेण्यास प्रवृत्त झाले?

 जेरूसलेम शहर अनेक देशांतून आलेल्या लोकांनी गजबजलेले होते. सा.यु. ३३ चा पेन्टेकॉस्टचा तो दिवस होता. एक महत्त्वाचा सण साजरा केला जात होता आणि देशोदेशीचे लोक त्यात सहभागी झाले होते. पण तेव्हा एक असामान्य घटना घडली व त्यानंतर, प्रेषित पेत्राने दिलेल्या हृदयस्पर्शी भाषणामुळे एक आश्‍चर्यकारक परिणाम घडून आला. पेत्राचे शब्द जवळजवळ ३,००० यहुद्यांच्या व यहुदी मतानुसाऱ्‍यांच्या अंतःकरणाला भिडले आणि त्यांनी आपल्या पापांबद्दल पश्‍चात्ताप करून पाण्यात बाप्तिस्मा घेतला. अशा रीतीने, अलीकडेच स्थापन झालेल्या ख्रिस्ती मंडळीत त्यांची भर पडली. (प्रे. कृत्ये २:४१) जेरूसलेममधील हौदांत व पाणवठ्यांवर एवढ्या मोठ्या संख्येने लोकांचा बाप्तिस्मा झाल्यामुळे शहरात चांगलीच खळबळ माजली असेल!

पण इतक्या लोकांना बाप्तिस्मा घेण्यास प्रवृत्त करणारी ती असामान्य घटना काय होती? त्याच दिवशी काही वेळाअगोदर “अकस्मात मोठ्या वाऱ्‍याच्या सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला.” एका घराच्या वरच्या मजल्यावर जमलेले येशूचे जवळजवळ १२० शिष्य पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले. त्यानंतर अनेक भक्‍तिमान स्त्रीपुरुष एकत्र जमले आणि जेव्हा त्यांनी या शिष्यांना “निरनिराळ्या भाषांतून” बोलताना ऐकले तेव्हा त्यांना खूप आश्‍चर्य वाटले. पेत्राचे भाषण व त्यात त्याने येशूच्या मृत्यूविषयी केलेली मर्मभेदी विधाने ऐकल्यावर अनेकांच्या “अंतःकरणास चुटपुट लागली.” आम्ही काय करावे असे ते प्रेषितांना विचारू लागले. तेव्हा पेत्राने त्यांना उत्तर दिले: “पश्‍चात्ताप करा आणि . . . तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या; म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल.”—प्रे. कृत्ये २:१-४, ३६-३८.

३. पेन्टेकॉस्टच्या दिवशी पश्‍चात्तापी यहुद्यांनी व यहुदी मतानुसाऱ्‍यांनी काय करण्याची गरज होती?

पेत्राचे भाषण ऐकणाऱ्‍या त्या यहुद्यांच्या व यहुदी मतानुसाऱ्‍यांच्या धार्मिक पार्श्‍वभूमीचा विचार करा. ते आधीपासूनच यहोवाला देव मानत होते. शिवाय इब्री शास्त्रवचनांतून त्यांना पवित्र आत्म्याबद्दल, अर्थात निर्मितीच्या वेळी व त्यानंतर देवाने उपयोगात आणलेल्या त्याच्या कार्यशील शक्‍तीबद्दलही माहीत होते. (उत्प. १:२; शास्ते १४:५, ६; १ शमु. १०:६; स्तो. ३३:६) पण, एवढे पुरेसे नव्हते. मानवांच्या तारणासाठी देवाने ज्याची तरतूद केली होती, त्या मशीहाबद्दल म्हणजेच येशूबद्दल त्यांनी जाणून घेणे व त्याचा स्वीकार करणे अगत्याचे होते. म्हणूनच, त्यांनी ‘येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घेण्याची’ गरज आहे यावर पेत्राने विशेष भर दिला. काही दिवसांअगोदर, पुनरुत्थान झालेल्या येशूने पेत्राला व इतरांना, शिष्य बनवून त्यांना “पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या,” अशी आज्ञा दिली होती. (मत्त. २८:१९, २०) पहिल्या शतकात ही आज्ञा अतिशय अर्थसूचक होती आणि आजही आहे. असे का म्हणता येईल?

पित्याच्या नावाने

४. यहोवासोबत नातेसंबंध ठेवण्याच्या संदर्भात कोणता बदल घडून आला होता?

याआधी सांगितल्यानुसार, पेत्राच्या भाषणाला ज्यांनी प्रतिसाद दिला ते यहोवाचे उपासक होते आणि आधीपासूनच त्याच्यासोबत त्यांचा नातेसंबंध होता. यहोवाच्या नियमशास्त्राचे पालन करण्याचा ते प्रयत्नही करत होते. म्हणूनच तर त्यांच्यापैकी अनेक जण इतर देशांतून जेरूसलेमला आले होते. (प्रे. कृत्ये २:५-११) पण, देवाने मानवांसोबतच्या आपल्या व्यवहारांत नुकताच एक महत्त्वाचा बदल केला होता. त्याने पूर्वी आपली खास प्रजा असलेल्या यहुद्यांचा अव्हेर केला होता. आता केवळ नियमशास्त्राचे पालन करून त्यांना देवाची संमती मिळवणे शक्य होणार नव्हते. (मत्त. २१:४३; कलस्सै. २:१४) यहोवासोबत आपला नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी त्या लोकांना आणखी काहीतरी करणे गरजेचे होते.

५, ६. पहिल्या शतकातील अनेक यहुद्यांना व यहुदी मतानुसाऱ्‍यांना देवासोबत नातेसंबंध ठेवण्याकरता काय करण्याची गरज होती?

अर्थात, त्यांनी यहोवाकडे, आपल्या जीवनदात्याकडे आता पाठ फिरवावी असे मुळीच सुचवण्यात आले नव्हते. (प्रे. कृत्ये ४:२४) उलट, पेत्राच्या सविस्तर भाषणाला प्रतिसाद देणाऱ्‍यांना, यहोवा किती उदार व प्रेमळ पिता आहे हे अधिकच स्पष्टपणे कळले होते. त्यांना तारण मिळावे म्हणून देवाने मशीहाला पाठवले होते. आणि तो त्या सर्वांना क्षमा करण्यास तयार होता; अगदी अशा लोकांनासुद्धा ज्यांच्याविषयी पेत्राने म्हटले: “इस्राएलाच्या सर्व घराण्याने हे निश्‍चयपूर्वक समजून घ्यावे की, ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले त्याला देवाने प्रभु व ख्रिस्त असे करून ठेवले आहे.” तेव्हा, पेत्राच्या भाषणाला प्रतिसाद देणाऱ्‍यांना आणखीनच स्पष्टपणे हे समजणार होते, की देवासोबत नातेसंबंध जोडण्यास इच्छुक असलेल्यांकरता त्याने किती अद्‌भुत तरतुदी केल्या आहेत!प्रेषितांची कृत्ये २:३०-३६ वाचा.

त्या यहुद्यांना व यहुदी मतानुसाऱ्‍यांना खरोखर आता हे कळून चुकले होते की यहोवासोबत नातेसंबंध ठेवण्यासाठी, तो मानवजातीच्या तारणासाठी तरतूद करणारा देव असून हे तारण तो येशूच्याद्वारे घडवून आणेल हे ओळखणे गरजेचे होते. म्हणूनच, त्यांनी आपल्या पापांबद्दल पश्‍चात्ताप केला. कारण, येशूला जिवे मारण्यासाठी कळत-नकळत आपण सर्वच जबाबदार आहोत हे त्यांनी ओळखले होते. आणि म्हणूनच, पुढचे काही दिवस ते ‘प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात तत्पर’ राहिले. (प्रे. कृत्ये २:४२) आता त्यांना ‘धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाणे’ शक्य झाले होते आणि असे करण्याची त्यांची मनस्वी इच्छा होती.—इब्री ४:१६.

७. आज अनेकांनी देवाविषयीचा आपला दृष्टिकोन कशा प्रकारे बदलला आहे आणि पित्याच्या नावाने बाप्तिस्मा घेतला आहे?

आज निरनिराळ्या पार्श्‍वभूमींच्या लाखो लोकांनी बायबलमधून यहोवाबद्दलचे सत्य शिकून घेतले आहे. (यश. २:२, ३) यांपैकी काही जण पूर्वी नास्तिक होते, तर काही देववादी मताचे * होते. पण, एक निर्माणकर्ता खरोखर अस्तित्वात असून त्याच्यासोबत अर्थपूर्ण नातेसंबंध जोडणे शक्य आहे याची त्यांना खातरी पटली. इतर जण त्रिएक देवाची अथवा निरनिराळ्या मूर्तींची उपासना करत होते. पण, आता त्यांना यहोवा हा एकच सर्वसमर्थ देव आहे हे शिकायला मिळाले आणि ते देवाच्या खास नावाने त्याला संबोधतात. आपल्या शिष्यांचा पित्याच्या नावाने बाप्तिस्मा झाला पाहिजे असे जे येशूने म्हटले होते, त्यात या गोष्टी समाविष्ट आहेत.

८. आदामाकडून मिळालेल्या पापाच्या वारशाबद्दल माहीत नसलेल्यांनी पित्याबद्दल काय जाणून घेणे अगत्याचे होते?

त्यांना हेही शिकायला मिळाले, की आपल्याला आदामापासून पापाचा वारसा मिळाला आहे. (रोम. ५:१२) ही त्यांच्यासाठी एक नवीन गोष्ट होती जी त्यांना सत्य म्हणून स्वीकारावी लागली. अशा लोकांची तुलना एका आजारी माणसाशी करता येईल ज्याला आपल्या आजाराची कल्पना नसते. कदाचित अधूनमधून होणारी वेदना व यासारखी काही लक्षणे त्याला दिसून आली असावीत. पण, कोणत्याही विशिष्ट आजाराचे निदान झालेले नसल्यामुळे आपले आरोग्य ठाकठीक आहे असे कदाचित त्याला वाटत असेल. पण मुळात वस्तूस्थिती तशी नसते. (१ करिंथकर ४:४ पडताळून पाहा.) या मनुष्याच्या आजाराचे अचूक निदान झाल्यास त्याने काय केले पाहिजे? त्याने आपल्या आजारावर परिणामकारक असलेला शास्त्रशुद्ध उपचार शोधणे व तो घेणे, हेच शहाणपणाचे ठरणार नाही का? त्याच प्रकारे, आदामाकडून वारशाने मिळालेल्या पापाबद्दल सत्य समजल्यावर, अनेकांनी बायबलचे हे “निदान” स्वीकारून त्यावर देवाने देऊ केलेल्या “उपायाबद्दल” समजून घेतले आहे. होय, पित्यापासून दुरावलेल्या स्थितीत असलेल्या सर्वांनी, त्यांच्या आजारावर “उपाय” करणाऱ्‍याकडे वळले पाहिजे.—इफिस. ४:१७-१९.

९. मानवांना यहोवासोबत नातेसंबंध जोडणे शक्य व्हावे म्हणून त्याने काय केले?

जर तुम्ही आधीच यहोवाला आपले जीवन समर्पित करून बाप्तिस्मा घेतलेली ख्रिस्ती व्यक्‍ती असाल, तर त्याच्यासोबत एक नातेसंबंध असणे हा किती आनंददायक अनुभव आहे हे तुम्हाला माहीतच असेल. आपला पिता यहोवा किती प्रेमळ आहे हे आता तुम्ही समजू शकता. (रोमकर ५:८ वाचा.) आदाम व हव्वेने देवाविरुद्ध पाप केले तरीसुद्धा देवाने त्यांच्या वंशजांना—ज्यात आपलाही समावेश होतो—त्याच्यासोबत एक चांगला नातेसंबंध जोडणे शक्य व्हावे म्हणून स्वतःहून पहिले पाऊल उचलले. यासाठी देवाला आपल्या प्रिय पुत्राचा वेदनादायी मृत्यू होताना पाहण्याचे दुःख अनुभवावे लागले. हे समजल्यावर, आपल्याला प्रेमापोटी देवाचा अधिकार स्वीकारून त्याच्या आज्ञांचे पालन करण्यास मदत मिळत नाही का? जर तुम्ही अद्याप देवाला समर्पण करून बाप्तिस्मा घेतला नसेल, तर असे करण्याची अनेक कारणे तुमच्याजवळ आहेत.

पुत्राच्या नावाने

१०, ११. (क) आपण येशूचे कृतज्ञ का असले पाहिजे? (ख) मानवांकरता खंडणी देण्यासाठी येशू मरण पावला याविषयी तुम्हाला कसे वाटते?

१० पेत्राने लोकसमुदायाला काय म्हटले हे पुन्हा लक्षात घ्या. त्याने येशूला स्वीकारण्यावर भर दिला आणि हेच “पुत्राच्या” नावाने बाप्तिस्मा घेण्याशी थेटपणे संबंधित आहे. पुत्राच्या नावाने बाप्तिस्मा घेणे तेव्हा का आवश्‍यक होते आणि आज ते का आवश्‍यक आहे? येशूला स्वीकारून त्याच्या नावाने बाप्तिस्मा घेणे म्हणजे निर्माणकर्त्या देवासोबत आपल्या नातेसंबंधात येशूची काय भूमिका आहे हे ओळखणे. यहुद्यांवर नियमशास्त्राने आणलेला शाप मिटवण्यासाठी येशूला वधस्तंभावर टांगण्यात आले. पण, त्याच्या मृत्यूमुळे आणखीही महत्त्वाचे असे काहीतरी साध्य झाले. (गलती. ३:१३) त्याच्या मृत्यूमुळे सबंध मानवजातीला आवश्‍यक असलेली खंडणी पुरवण्यात आली. (इफिस. २:१५, १६; कलस्सै. १:२०; १ योहा. २:१, २) हे साध्य करण्यासाठी, येशूला अन्याय, निंदानालस्ती, यातना व शेवटी मृत्यूला सामोरे जावे लागले. तुम्हाला त्याच्या या बलिदानाबद्दल कितपत कृतज्ञता वाटते? अशी कल्पना करा, की तुम्ही टायटॅनिक जहाज, ज्याची १९१२ साली समुद्रात दुर्घटना झाली होती, त्यात प्रवास करणारा एक १२ वर्षांचा मुलगा आहात. जहाज बुडत आहे. तुम्ही एका जीवनरक्षक नौकेत उडी मारण्याचा प्रयत्न करता, पण ती लोकांनी खचाखच भरली आहे. तेवढ्यात नौकेत असलेला एक मनुष्य आपल्या प्रिय पत्नीचा शेवटचा निरोप घेऊन पुन्हा जहाजावर उडी घेतो आणि तुम्हाला नौकेत चढवतो. तुम्हाला कसे वाटेल? नक्कीच तुम्ही त्या मनुष्याचे शतशः आभार मानाल. एका १२ वर्षांच्या मुलाला खरोखरच हा अनुभव आला होता. * त्याच्या भावना तुम्ही समजू शकता, नाही का? पण येशूने तुमच्यावर यापेक्षा कितीतरी पटीने मोठा उपकार केला आहे. तुम्हाला सर्वकाळ जगता यावे म्हणून तो तुमच्यासाठी मरण पावला.

११ देवाच्या पुत्राने तुमच्याकरता जे केले, त्याविषयी समजल्यावर तुम्हाला कसे वाटले? (२ करिंथकर ५:१४, १५ वाचा.) कदाचित तुम्हाला मनापासून कृतज्ञ वाटले असेल. आणि यामुळे तुम्हाला आपले जीवन देवाला समर्पित करून ‘पुढे स्वतःकरिता नव्हे तर तुमच्यासाठी जो मेला त्याच्याकरिता जगण्याची’ प्रेरणा मिळाली असेल. पुत्राच्या नावाने बाप्तिस्मा घेण्याचा अर्थ, येशूने तुमच्याकरता जे केले आहे ते ओळखून ‘जीवनाचा अधिपती’ म्हणून त्याचा अधिकार स्वीकारणे. (प्रे. कृत्ये ३:१५; ५:३१) पूर्वी निर्माणकर्त्या देवासोबत तुमचे नाते नव्हते आणि खरे पाहता तुमच्याजवळ कोणतीही खरी आशा नव्हती. पण येशू ख्रिस्ताच्या सांडलेल्या रक्‍तावर विश्‍वास ठेवून बाप्तिस्मा घेतल्यामुळे आता तुमचा पित्यासोबत नातेसंबंध जुळला आहे. (इफिस. २:१२, १३) प्रेषित पौलाने लिहिले, “जे तुम्ही पूर्वी परके व दुष्कर्मे करीत मनाने वैरी झाला होता, त्या तुमचा आता [येशूच्या] रक्‍तमांसाच्या देहात मरणाच्या द्वारे [देवाने] समेट केला आहे, ह्‍यासाठी की त्याने तुम्हास पवित्र, निष्कलंक व निर्दोष असे आपणासमोर उभे करावे.”—कलस्सै. १:२१, २२ NW.

१२, १३. (क) एखादी व्यक्‍ती तुमचे मन दुखावते तेव्हा, पुत्राच्या नावाने बाप्तिस्मा घेतला असल्यामुळे तुमची काय प्रतिक्रिया असेल? (ख) येशूच्या नावाने बाप्तिस्मा घेतलेली ख्रिस्ती व्यक्‍ती या नात्याने तुमचे काय कर्तव्य आहे?

१२ पुत्राच्या नावाने बाप्तिस्मा झाला असला, तरीसुद्धा आपल्या स्वतःच्या पापी प्रवृत्तींची तुम्हाला जाणीव असेलच. ही जाणीव असणे आपल्या दैनंदिन जीवनात फायदेकारक ठरू शकते. उदाहरणार्थ कोणी तुमचे मन दुखावल्यास, तुम्ही दोघेही चुकणारे आहात हे तुम्ही आठवणीत ठेवता का? तुम्हा दोघांनाही देवाच्या क्षमेची गरज आहे आणि तुम्ही दोघांनीही क्षमा करण्यास तयार असले पाहिजे. (मार्क ११:२५) यावर भर देण्यासाठी येशूने एक दृष्टान्त सांगितला: एका मालकाने आपल्या दासाचे लक्षावधी रुपयांचे कर्ज माफ केले. नंतर मात्र याच दासाने दुसऱ्‍या एका दासाला आपले शंभर रुपये परत केले नाहीत म्हणून तुरुंगात डांबून ठेवले. दृष्टान्ताच्या शेवटी येशूने असे सांगितले: जो आपल्या भावाला क्षमा करत नाही त्याला यहोवा देखील क्षमा करणार नाही. (मत्त. १८:२३-३५) त्याअर्थी, पुत्राच्या नावाने बाप्तिस्मा घेण्याचा असा अर्थ होतो, की आपण येशूचा आपल्यावरील अधिकार कबूल करून त्याच्या आदर्शाचे व शिकवणींचे पालन करण्याचा प्रयत्न करतो, ज्यात इतरांना क्षमा करण्यास तयार असणे देखील समाविष्ट आहे.—१ पेत्र २:२१; १ योहा. २:६.

१३ अपरिपूर्ण असल्यामुळे, तुम्ही साहजिकच येशूचे पूर्णपणे अनुकरण करू शकत नाही. तरीसुद्धा, देवाला पूर्ण मनाने समर्पण केले असल्यामुळे तुम्हाला होताहोईल तितके येशूचे अनुकरण करण्याची इच्छा आहे. यासाठी तुम्ही जुने व्यक्‍तिमत्त्व टाकून देण्याचा आणि नवीन व्यक्‍तिमत्त्व धारण करण्याचा सतत प्रयत्न केला पाहिजे. (इफिसकर ४:२०-२४ वाचा.) जेव्हा तुम्ही एखाद्या मित्राचा आदर करू लागता, तेव्हा तुम्ही त्याच्या चांगल्या गुणांचे अनुकरण करण्याचाही प्रयत्न करता. त्याच प्रकारे तुम्ही ख्रिस्तापासून शिकले पाहिजे व त्याचे अनुकरण केले पाहिजे.

१४. स्वर्गीय राजा या नात्याने येशूचा अधिकार तुम्ही कबूल करता हे तुम्ही कसे दाखवू शकता?

१४ पुत्राच्या नावाने बाप्तिस्मा घेण्यात कोणत्या गोष्टी समाविष्ट आहेत याची तुम्हाला जाणीव असल्याचे तुम्ही आणखी एका मार्गाने दाखवू शकता. देवाने “सर्व काही [येशूच्या] पायाखाली ठेवले, आणि त्याने सर्वांवर मस्तक असे व्हावे म्हणून त्यास मंडळीला दिले.” (इफिस. १:२२) त्यामुळे, यहोवाला समर्पित असलेल्या लोकांचे मार्गदर्शन करण्यासाठी येशू ज्यांचा उपयोग करतो त्यांचा तुम्ही आदर केला पाहिजे. प्रत्येक मंडळीत ख्रिस्त अपरिपूर्ण मानवांचा उपयोग करत आहे. विशेषतः आध्यात्मिक दृष्टीने अनुभवी असणाऱ्‍या नियुक्‍त वडिलांचा तो उपयोग करत आहे. वडिलांची ही तरतूद कशासाठी करण्यात आली आहे? “ह्‍यासाठी की, त्यांनी पवित्र जनांस सेवेच्या कार्याकरिता व ख्रिस्ताच्या शरीराची रचना पूर्णतेस नेण्याकरिता सिद्ध करावे.” (इफिस. ४:११, १२) एखाद्या अपरिपूर्ण मनुष्याकडून चूक झाली तरीसुद्धा स्वर्गीय राज्याचा राजा या नात्याने येशूला योग्य वाटेल त्या वेळी व त्याला योग्य वाटेल त्या पद्धतीने तो ती समस्या हाताळण्यास समर्थ आहे. तुम्हाला यावर भरवसा आहे का?

१५. जर तुमचा अद्याप बाप्तिस्मा झालेला नसेल, तर बाप्तिस्म्यानंतर तुम्ही कोणते आशीर्वाद मिळण्याची अपेक्षा करू शकता?

१५ काही जणांनी अद्यापही यहोवाला स्वतःचे समर्पण करून बाप्तिस्मा घेतलेला नाही. जर तुम्हीही त्यांच्यापैकी असाल, तर वरील माहितीवरून तुमच्या हे लक्षात आले का, की पुत्रास ओळखणे हे तुमच्याकरता योग्य आहे व याद्वारे तुम्ही त्याच्याप्रती आपली कृतज्ञता दाखवू शकता? पुत्राच्या नावाने बाप्तिस्मा घेतल्याने तुम्ही अनेक अद्‌भुत आशीर्वादांचे मानकरी व्हाल.योहान १०:९-११ वाचा.

पवित्र आत्म्याच्या नावाने

१६, १७. पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा घेण्याचा काय अर्थ होतो?

१६ पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा घेण्याचा काय अर्थ होतो? याआधी सांगितल्याप्रमाणे, पेन्टेकॉस्टच्या दिवशी ज्यांनी पेत्राचे भाषण ऐकले त्यांना आधीपासूनच पवित्र आत्म्याबद्दल माहीत होते. किंबहुना, देव अजूनही पवित्र आत्म्याचा उपयोग करत आहे याचा पुरावा ते प्रत्यक्ष पाहत होते. जे ‘पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन निरनिराळ्या भाषांतून बोलू लागले’ होते, त्यांच्यापैकी पेत्रही एक होता. (प्रे. कृत्ये २:४, ८) “नावाने” असे म्हणताना नेहमीच एका व्यक्‍तीच्या नावाने असा अर्थ होत नाही. आज “सरकारच्या नावाने” बऱ्‍याच गोष्टी केल्या जातात. सरकार एक व्यक्‍ती नाही. तेव्हा सरकारच्या नावाने असे म्हणताना सरकारच्या अधिकाराने असा त्याचा अर्थ होतो. त्याच प्रकारे, पवित्र आत्म्याच्या नावाने ज्याचा बाप्तिस्मा होतो, तो हे ओळखतो की पवित्र आत्मा एक व्यक्‍ती नसून यहोवाची कार्यशील शक्‍ती आहे. तसेच देवाच्या उद्देशाच्या पूर्णतेत पवित्र आत्म्याची काय भूमिका आहे हे देखील तो ओळखतो.

१७ बायबलच्या अभ्यासातून तुम्हाला पवित्र आत्म्याबद्दल समजलेले नाही का? उदाहरणार्थ, बायबल हे पवित्र आत्म्याच्याच प्रेरणेने लिहिण्यात आले हे तुम्हाला समजले आहे. (२ तीम. ३:१६) आध्यात्मिकदृष्ट्या तुम्ही प्रगती केली तसतसे तुम्हाला अधिक स्पष्टपणे हे समजले की ‘स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यांस तो पवित्र आत्मा देतो.’ तुम्हालाही तो आपला आत्मा देऊ शकतो. (लूक ११:१३) कदाचित तुम्ही आपल्या जीवनात पवित्र आत्म्याचा प्रभाव अनुभवलाही असेल. दुसरीकडे पाहता, जर तुमचा अद्यापही पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा झाला नसेल, तर पिता त्याच्याकडे मागणाऱ्‍यांना पवित्र आत्मा देतो, या येशूच्या शब्दांतून तुम्हाला हे आश्‍वासन मिळते की तुम्हाला हा आत्मा मिळाल्यावर भविष्यात अनेक आशीर्वाद अनुभवता येतील.

१८. जे पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा घेतात त्यांना कोणते आशीर्वाद मिळतात?

१८ आजही यहोवा पवित्र आत्म्याच्या द्वारे ख्रिस्ती मंडळीचे मार्गदर्शन व नेतृत्व करत आहे हे दिसून येते. तसेच, हा आत्मा आपल्या प्रत्येकाला दैनंदिन जीवनात साहाय्य पुरवतो. पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा घेतला असल्यामुळे आपण आपल्या जीवनात त्याची भूमिका ओळखली पाहिजे आणि कृतज्ञतेने त्याला सहकार्य केले पाहिजे. पण काही जण कदाचित विचारतील की यहोवाला समर्पण केल्यानंतर कशा प्रकारे आपण या समर्पणानुसार जीवन जगू शकतो आणि यासाठी पवित्र आत्मा कशा प्रकारे आपले साहाय्य करतो? याविषयी आपण पुढील लेखात पाहू.

[तळटीपा]

^ परि. 7 देववादी मताचे लोक देवाचे अस्तित्व मानतात, पण त्याला आपल्या निर्मितीबद्दल आस्था आहे असे ते मानत नाहीत.

^ परि. 10 सावध राहा! ऑक्टोबर २२, १९८१ (इंग्रजी) अंकातील पृष्ठे ३-८ पाहा.

तुम्हाला आठवते का?

• पित्याच्या नावाने बाप्तिस्मा घेण्याचा तुमच्याकरता काय अर्थ होतो?

• पुत्राच्या नावाने बाप्तिस्मा घेण्याचा काय अर्थ होतो?

• पित्याच्या व पुत्राच्या नावाने बाप्तिस्मा घेण्याचा अर्थ तुम्हाला समजला आहे हे तुम्ही कसे दाखवू शकता?

• पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा घेण्याचा काय अर्थ होतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१० पानांवरील चित्रे]

सा.यु. ३३ च्या पेन्टेकॉस्टनंतर नव्या शिष्यांचा पित्यासोबत कोणता नातेसंबंध जुळला?

[चित्राचे श्रेय]

By permission of the Israel Museum, Jerusalem