व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जीवनातील बदलांना सामोरे जाताना देवाच्या अनुग्रहात टिकून राहणे

जीवनातील बदलांना सामोरे जाताना देवाच्या अनुग्रहात टिकून राहणे

जीवनातील बदलांना सामोरे जाताना देवाच्या अनुग्रहात टिकून राहणे

सध्या तुमच्या जीवनात अनेक बदल घडत आहेत का? या बदलांशी जुळवून घेणे तुम्हाला कठीण जात आहे का? आपल्यापैकी अनेकांना असा अनुभव आला आहे किंवा पुढे येण्याची शक्यता आहे. याबाबतीत उपयुक्‍त ठरतील असे गुण विकसित करण्यास प्राचीन काळातील काही वास्तविक व्यक्‍तींची उदाहरणे आपल्याला साहाय्यक ठरतील.

दाविदाचेच उदाहरण विचारात घ्या. त्यालाही जीवनात अनेक बदलांना तोंड द्यावे लागले होते. इस्राएलचा भावी राजा म्हणून शमुवेलाने त्याचा अभिषेक केला त्या वेळी तो एक साधा मेंढपाळ मुलगा होता. त्याने अगदी लहान वयात गल्याथ नावाच्या एका महाकाय पलिष्टी योद्ध्‌याशी लढण्याचे आव्हान स्वतःहून स्वीकारले. (१ शमु. १७:२६-३२, ४२) नंतर त्याला शौल राजाच्या राजमहालात राहण्याचे आमंत्रण मिळाले आणि एक सेनाधिपती म्हणून त्याची नेमणूक करण्यात आली. आपल्या जीवनात इतके बदल घडून येतील याची दाविदाने कल्पनासुद्धा केली नसावी. किंवा भविष्यात आपल्यासाठी काय वाढून ठेवले आहे याचाही अंदाज त्याने बांधला नसावा.

दाविदाच्या व शौलाच्या नातेसंबंधात तणाव निर्माण झाला व तो वाढतच गेला. (१ शमु. १८:८, ९; १९:९, १०) शौलापासून आपला जीव वाचवण्यासाठी दाविदाला कितीतरी वर्षे निराश्रितासारखे जीवन जगावे लागले. इस्राएल राष्ट्रावर राज्य करत असताना देखील त्याच्या जीवनात अशा काही घटना घडल्या ज्यांमुळे त्याचे जीवन पार बदलून गेले. खासकरून, त्याने व्यभिचार केल्यानंतर आणि हे पाप झाकण्यासाठी एका मनुष्याची हत्या केल्यानंतर असे घडले. दाविदाने केलेल्या पापांमुळे त्याच्याच घराण्यातून त्याच्यावर अनेक संकटे आली. उदाहरणार्थ, त्याचा स्वतःचा पुत्र अबशालोम याने त्याच्याविरुद्ध विद्रोह केला. (२ शमु. १२:१०-१२; १५:१-१४) असे असले तरी, आपण केलेल्या व्यभिचाराबद्दल व खुनाबद्दल दाविदाने पश्‍चात्ताप केला तेव्हा यहोवाने त्याला क्षमा केली आणि त्याला पुन्हा एकदा यहोवाचा अनुग्रह प्राप्त झाला.

तुमच्याही जीवनात बदल घडू शकतात. आरोग्याच्या समस्या, आर्थिक समस्या किंवा कुटुंबातील समस्या यांमुळे, किंवा मग तुमच्या स्वतःच्या कृत्यांमुळे जीवनात तुम्हाला अनेक बदलांना तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे. जीवनातील या आव्हानांना यशस्वीपणे तोंड देण्यास कोणते गुण तुमची मदत करू शकतील?

नम्रतेमुळे आपल्याला मदत होते

नम्रता या गुणामध्ये अधीनता दाखवण्याचा अर्थ गोवला आहे. आपण खरोखर नम्र असल्यास आपण स्वतःकडे आणि इतरांकडेही एका वास्तविक दृष्टिकोनातून पाहू. इतरांमधील चांगले गुण, त्यांना मिळणारे यश हे काही विशेष नाही असे न मानता त्यांची दखल घेतल्यास आपण त्यांची व त्यांच्या कार्याची अधिक कदर करू. त्याचप्रमाणे, आपल्या जीवनात अमुक एक गोष्ट का घडली आणि तिचा सामना कसा करावा हे जाणून घेण्यास नम्रता आपली मदत करू शकेल.

याबाबतीत शौलाचा पुत्र योनाथान याने उत्तम उदाहरण मांडले. त्याच्या जीवनात अशा काही घटना घडल्या ज्यांवर त्याचे काहीच नियंत्रण नव्हते. आणि या घटनांमुळे त्याला जीवनात अनेक बदलांना तोंड द्यावे लागले. उदाहरणार्थ, शमुवेलाने जेव्हा शौलाला सांगितले की यहोवा त्याचा राज्याधिकार त्याच्याकडून काढून घेईल तेव्हा, त्याच्यानंतर योनाथान राजा बनेल असे काहीही त्याने म्हटले नव्हते. (१ शमु. १५:२८; १६:१, १२, १३) इस्राएलचा भावी राजा म्हणून देवाने दाविदाची निवड केली तेव्हा योनाथानाला डावलण्यात आले. एका अर्थाने शौलाच्या अवज्ञाकारी वागणुकीचा नकारात्मक परिणाम योनाथानाला भोगावा लागला. यात खरेतर योनाथानाचा काहीही दोष नव्हता. तरीसुद्धा त्याच्या पित्याच्या नंतर राजपद त्याला मिळणार नव्हते. (१ शमु. २०:३०, ३१) याप्रती योनाथानाची काय प्रतिक्रिया होती? ही संधी आपल्याला मिळाली नाही याचा राग त्याने मनात बाळगला का? आपल्याऐवजी ही संधी दाविदाला मिळाल्याबद्दल त्याने दाविदाचा मत्सर केला का? नाही. योनाथान दाविदापेक्षा वयाने मोठा होता. शिवाय, दाविदापेक्षा तो जास्त अनुभवीही होता. तरीसुद्धा, त्याने विश्‍वासूपणे दाविदाला पाठिंबा दिला. (१ शमु. २३:१६-१८) योनाथान नम्र होता आणि या गुणामुळे देवाचा आशीर्वाद कोणावर आहे हे तो समजू शकला. त्याने ‘आपल्या योग्यतेपेक्षा स्वतःला अधिक मानले नाही.’ (रोम. १२:३) आणि यहोवाची आपल्याकडून काय अपेक्षा आहे हे ओळखून योनाथानाने याबाबतीत यहोवाचा निर्णय स्वीकारला.

अर्थात, जीवनात बदल घडून येतात तेव्हा बहुतेक वेळा त्यासोबत कोणत्या ना कोणत्या अडचणीही निर्माण होतात. जसे की, योनाथानाच्या जीवनात एक अशी वेळ आली होती जेव्हा त्याला अत्यंत प्रिय असलेल्या दोन पुरुषांशी एकाच वेळी व्यवहार करावा लागला. एकीकडे त्याचा मित्र दावीद होता, ज्याला खुद्द यहोवाने इस्राएलचा भावी राजा म्हणून नियुक्‍त केले होते. तर दुसरीकडे त्याचा पिता शौल होता, ज्याला यहोवाने नाकारले होते व जो अजूनही राजा म्हणून राज्य करत होता. अशा परिस्थितीत यहोवासोबतचा आपला नातेसंबंध टिकवून ठेवण्याच्या प्रयत्नात योनाथानाला खूप मनस्ताप झाला असेल. योनाथानाप्रमाणेच, जीवनात होणाऱ्‍या बदलांमुळे आपल्याही मनात चिंता किंवा भीती निर्माण होऊ शकते. पण, अशा वेळी यहोवाचा दृष्टिकोन जाणून घेण्याचा प्रयत्न केल्याने आपल्याला विश्‍वासूपणे त्याची सेवा करणे व जीवनातील बदलांशी जुळवून घेणे शक्य होईल.

मर्यादशील असणे महत्त्वाचे

मर्यादशील असणे म्हणजे आपल्या मर्यादांची जाणीव राखणे. मर्यादशीलता आणि नम्रता या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. उदाहरणार्थ, एक व्यक्‍ती नम्र असेल पण तिला स्वतःच्या मर्यादांची कदाचित पूर्ण जाणीव नसेल.

दाविदाला आपल्या मर्यादांची जाणीव होती. यहोवाने त्याला राजा म्हणून नियुक्‍त केले होते तरीसुद्धा कितीतरी वर्षे परिस्थितीमुळे त्याला राज्याधिकार हाती घेणे शक्य नव्हते. या विलंबाचे कारण काय होते याबद्दल यहोवाने दाविदाला स्पष्टीकरण दिल्याचे बायबलमध्ये कोठेही सांगितलेले नाही. अशा परिस्थितीत कोणीही निराश झाला असता. पण, दावीद मात्र निराश झाला नाही. त्याला आपल्या मर्यादांची जाणीव होती आणि त्याने हे समजून घेतले की यहोवाने आपल्यावर ही परिस्थिती येऊ दिली आहे व त्याचे निरसन करण्यास तो समर्थ आहे. त्यामुळेच स्वतःचा जीव वाचवण्यासाठी देखील तो शौलाचा वध करण्यास तयार झाला नाही. उलट, त्याचा मित्र अबीशय याने तसे करण्याचा प्रयत्न केला तेव्हा दाविदाने त्याला रोखले.—१ शमु. २६:६-९.

कधीकधी ख्रिस्ती मंडळीत अशी परिस्थिती उद्‌भवते जी आपण समजू शकत नाही किंवा ती योग्य अथवा सुनियोजित पद्धतीने हाताळलेली नाही असे आपल्याला वाटते. मग अशा वेळी आपल्या मर्यादांची जाणीव राखून आपण हे मान्य करू का, की येशू हा ख्रिस्ती मंडळीचे मस्तक असून मंडळीत पुढाकार घेण्यास नियुक्‍त केलेल्या वडीलवर्गामार्फत तो कार्य करतो? यहोवाच्या अनुग्रहात टिकून राहायचे असेल तर तो मंडळीतील ही स्थिती येशू ख्रिस्तामार्फत हाताळेपर्यंत आपण धीर धरला पाहिजे हे ओळखून आपण मर्यादशीलता दाखवू का? असे करणे इतके सोपे नसले तरीसुद्धा आपण आपल्या मर्यादेत राहून वाट पाहू का?

लीनतेमुळे सकारात्मक दृष्टिकोन बाळगणे शक्य होते

लीनता म्हणजे सौम्य वृत्ती. आपल्याविरुद्ध अन्याय झाला असेल तर लीनता आपल्याला सहनशीलतेने आणि मनात चीड, राग किंवा सुडाची भावना न बाळगता त्याचा सामना करण्यास मदत करते. लीनता विकसित करणे इतके सोपे नाही. म्हणूनच, बायबलच्या एका वचनात ‘सर्व लीन जनांना लीनता विकसित करण्याचे’ प्रोत्साहन देण्यात आले आहे. (सफ. २:३, NW) लीनतेचा नम्रतेशी व मर्यादशीलतेशी जवळचा संबंध असला तरी त्यात चांगुलपणा व सौम्यता यांसारखे गुण देखील समाविष्ट आहेत. लीन व्यक्‍तीला आध्यात्मिक प्रगती करणे शक्य होते कारण ती शिकून घेण्यास व सुधारणा करण्यास तयार असते.

जीवनातील नवीन वळणांना तोंड देण्यास लीनता आपली मदत कशी करू शकते? तुमच्या पाहण्यात आले असेल की बरेच लोक जीवनातील बदलांकडे नकारात्मक दृष्टिकोनातून पाहतात. पण, वास्तवात अशा बदलांमुळे यहोवाकडून आणखी प्रशिक्षण प्राप्त करण्याची सुसंधी आपल्याला लाभू शकते. ही गोष्ट मोशेच्या उदाहरणावरून स्पष्ट होते.

मोशे ४० वर्षांचा असताना त्याच्या व्यक्‍तिमत्त्वात आधीपासूनच अनेक उत्कृष्ट गुण होते. जसे की, देवाच्या लोकांच्या गरजांची त्याला जाणीव होती आणि तो निःस्वार्थ देखील होता. (इब्री ११:२४-२६) पण, इजिप्तमधून इस्राएल लोकांना बाहेर आणण्यासाठी यहोवाकडून नियुक्‍त केले जाण्याआधी मोशेला अनेक बदलांना सामोरे जावे लागले, ज्यांमुळे अधिक मोठ्या प्रमाणात लीनतेचा गुण विकसित करण्याची संधी त्याला मिळाली. त्याला इजिप्तमधून पळून जाऊन तब्बल ४० वर्षे मिद्यान देशात राहावे लागले. तेथे प्रसिद्धीच्या वलयापासून दूर राहून त्याला मेंढपाळाचे काम करावे लागले. याचा परिणाम काय झाला? या बदलामुळे त्याचे व्यक्‍तिमत्त्व अधिकच उजळले. (गण. १२:३) जीवनात स्वतःच्या इच्छेपेक्षा यहोवाच्या इच्छेला प्राधान्य देण्यास तो शिकला.

मोशेच्या लीनतेचे एक उदाहरण पाहू या. इस्राएल राष्ट्राच्या अवज्ञेमुळे यहोवाने या राष्ट्राला नाकारून मोशेपासून एक मोठे व प्रबळ राष्ट्र निर्माण करण्याची इच्छा व्यक्‍त केली. तेव्हा मोशेने काय केले? (गण. १४:११-२०) त्याने इस्राएल राष्ट्राच्या वतीने यहोवाला विनवणी केली. तो यहोवाशी जे काही बोलला त्यावरून त्याला स्वतःची नव्हे तर देवाच्या नावाची आणि आपल्या बांधवांच्या कल्याणाची चिंता होती हे दिसून येते. इस्राएल राष्ट्राचे नेतृत्व व त्यांच्या वतीने मध्यस्थी करण्यासाठी एका लीन व्यक्‍तीची गरज होती आणि ही लीनता मोशेमध्ये होती. अहरोन आणि मिर्याम यांनी मोशेविरुद्ध कुरकुर केली, तरीसुद्धा त्याने लीनतेचा गुण प्रदर्शित करून सर्व अपमान सहन केला असे बायबलच्या अहवालावरून दिसते. (गण. १२:१-३, ९-१५) मोशे लीन नसता तर काय घडले असते याची कल्पना करू शकता का तुम्ही?

आणखी एका प्रसंगी, यहोवाचा आत्मा काही पुरुषांवर उतरला आणि ते भविष्यवाणी करू लागले तेव्हा हे इस्राएली अनुचितपणे वागत आहेत असे मोशेचा साहाय्यक यहोशवा याला वाटले. पण, मोशे लीन असल्यामुळे त्याने या गोष्टीकडे यहोवाच्या नजरेतून पाहिले. त्याला आपला अधिकार गमावण्याची चिंता नव्हती. (गण. ११:२६-२९) मोशे लीन नसता तर यहोवाच्या व्यवस्थेतील हा बदल त्याने स्वीकारला असता का?

लीनतेमुळेच मोशेवर सोपवण्यात आलेल्या मोठा अधिकाराचा आणि देवाने त्याला नियुक्‍त केलेल्या भूमिकेचा तो चांगल्या प्रकारे उपयोग करू शकला. यहोवाने त्याला होरेब पर्वतावर येण्यास व इस्राएल लोकांसमोर उभे राहण्यास सांगितले. तेथे यहोवा एका देवदूतामार्फत मोशेशी बोलला व नियमशास्त्राच्या कराराचा मध्यस्थ म्हणून त्याची नेमणूक केली. लीनतेमुळे अधिकारातील हा मोठा बदल स्वीकारणे आणि त्याच वेळी यहोवाचा अनुग्रह गमवावा लागेल असे काहीही करण्याचे टाळणे मोशेला शक्य झाले.

आपल्या बाबतीत काय? आपल्या प्रत्येकाच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी लीनता अत्यावश्‍यक आहे. देवाच्या लोकांमध्ये ज्यांच्यावर विशेषाधिकार व जबाबदारी सोपवण्यात आली आहे अशा सर्वांनी लीन असणे फार जरुरीचे आहे. जीवनात बदल घडून येतात तेव्हा लीनता आपल्याला गर्विष्ठपणे न वागता योग्य मनोवृत्तीने या बदलांना तोंड देण्यास मदत करते. यात महत्त्वाची आहे ती आपली प्रतिक्रिया. आपण हे बदल स्वीकारण्यास तयार होऊ का? आपल्या व्यक्‍तिमत्त्वात सुधारणा करण्याची एक संधी म्हणून आपण त्यांकडे पाहू का? तसे केल्यास, लीनता विकसित करण्याची ही एक उत्तम संधी ठरू शकेल!

आपल्या जीवनात बदल हे घडतच राहतील. कधीकधी काही गोष्टी का घडतात हे आपल्याला समजणार नाही. शिवाय, आपल्या वैयक्‍तिक कमतरतांमुळे व भावनिक तणावामुळे या बदलांकडे यहोवाच्या दृष्टिकोनातून पाहणे आपल्याला नेहमीच शक्य होणार नाही. तरीसुद्धा नम्रता, मर्यादशीलता आणि लीनता यांसारखे गुण जीवनातील बदल स्वीकारण्यास आणि देवाच्या अनुग्रहात टिकून राहण्यास आपल्याला मदत करतील.

[४ पानांवरील संक्षिप्त आशय]

आपण खरोखर नम्र असल्यास स्वतःकडे एका वास्तविक दृष्टिकोनातून पाहू

[५ पानांवरील संक्षिप्त आशय]

आपल्या प्रत्येकाच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी लीनता अत्यावश्‍यक आहे

[५ पानांवरील चित्र]

मोशेला अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागले ज्यांमुळे अधिक मोठ्या प्रमाणात लीनता विकसित करण्याची संधी त्याला मिळाली