व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सभास्थाने येशू आणि त्याच्या शिष्यांनी तेथे प्रचार केला

सभास्थाने येशू आणि त्याच्या शिष्यांनी तेथे प्रचार केला

सभास्थाने येशू आणि त्याच्या शिष्यांनी तेथे प्रचार केला

“नंतर येशू यहूदी लोकांच्या सभास्थानांत सुवार्तेची घोषणा करीत व राज्याची सुवार्ता गाजवीत . . . गालीलभर फिरला.”—मत्तय ४:२३.

येशू सभास्थानात होता, असा उल्लेख शुभवर्तमान अहवालांमध्ये अनेकदा आला आहे. येशू लहानाचा मोठा झाला ते नासरेथ गाव असो किंवा मग नंतर तो राहायला गेला ते कफर्णहूम शहर असो किंवा साडेतीन वर्षांच्या त्याच्या परिश्रमी सेवेदरम्यान त्याने भेट दिलेली इतर शहरे किंवा गावे असोत; प्रचार करण्यासाठी व लोकांना देवाच्या राज्याविषयी शिकवण्यासाठी येशू नेहमी सभास्थानच निवडायचा. खरेतर, आपल्या सेवेविषयी सांगताना येशूने असे म्हटले देखील, “सभास्थानात व मंदिरात सर्व यहूदी जमतात तेथे मी नेहमी शिक्षण दिले.”—योहान १८:२०.

तसेच, येशूचे प्रेषित व आरंभीचे इतर ख्रिश्‍चन देखील सहसा यहुदी सभास्थानांत शिकवत असत. पण यहुदी लोक सभास्थानांत उपासनेसाठी कसे काय जाऊ लागले? आणि येशूच्या दिवसांतील ही उपासना स्थळे कशी होती? चला पाहू या.

यहुदी लोकांच्या जीवनातील प्रमुख गोष्ट यहुदी पुरुष, जेरूसलेमच्या पवित्र मंदिरात होणाऱ्‍या सणांसाठी वर्षातून तीन वेळा जेरूसलेमचा प्रवास करायचे. पण, पॅलेस्टाईनमध्ये राहणारे यहुदी असोत किंवा पॅलेस्टाईनच्या बाहेर असलेल्या यहुदी वसाहतींमध्ये राहणारे यहुदी असोत, त्यांच्या दररोजच्या उपासनेसाठी सभास्थाने बनवण्यात आली होती.

सभास्थानांचा वापर केव्हा सुरू झाला? यहुदी लोकांना बॅबिलोनला बंदिवान म्हणून नेण्यात आले तेव्हापासून (सा.यु.पू. ६०७-५३७) म्हणजे, यहोवाच्या मंदिराचा नाश करण्यात आला त्या काळात सभास्थानांचा वापर सुरू झाला असे काहींचे म्हणणे आहे. किंवा कदाचित, यहुदी लोक बंदिवासातून सुटून आल्यानंतर लगेचच जेव्हा एज्रा याजकाने त्याच्या लोकांना देवाच्या नियमशास्त्राचे अधिक ज्ञान व समज प्राप्त करण्यास आर्जवले तेव्हा झाला असावा.—एज्रा ७:१०; ८:१-८; १०:३.

सुरुवातीला “सभास्थान” याचा अर्थ, “सभा,” किंवा “मंडळी” असा होता. इब्री शास्त्रवचनांचे ग्रीक भाषांतर सेप्टुआजिंट यात त्याचा याच अर्थाने वापर करण्यात आला आहे. पण कालांतराने तो शब्द, लोक उपासनेसाठी जमत असलेल्या इमारतीला लागू होऊ लागला. सा.यु. पहिल्या शतकापर्यंत, येशू ज्या ज्या गावी गेला त्या त्या गावी सभास्थान होते; शहरांमध्ये तर बरीच सभास्थाने होती आणि जेरूसलेममध्येही अनेक होती. दिसायला कशी होती ही सभास्थाने?

उपासनेचे एक साधेसे ठिकाण सभास्थान बांधण्याकरता यहुदी लोक सहसा उंचवटा असलेले ठिकाण निवडायचे आणि मग ते ती इमारत अशा प्रकारे बांधायचे की तिचे प्रवेशद्वार (१) जेरूसलेमकडे तोंड करून असेल. यहुद्यांच्या या अटी तशा पाहिल्या तर सोप्या होत्या पण सर्वच प्रसंगी त्या पूर्ण करता येत नव्हत्या.

बांधलेले सभास्थान बहुतेकदा साधेच असायचे; आतमध्ये सामानही फार कमी असायचे. एक मुख्य गोष्ट जी आतमध्ये असायची ती म्हणजे एक पेटी (२) ज्यात यहुदी लोक त्यांची अमानत म्हणजे पवित्र शास्त्रवचनांच्या गुंडाळ्या ठेवायचे. हलवता येणारी ती पेटी सभांच्या वेळी योग्य ठिकाणी ठेवली जायची आणि मग सभा संपल्यानंतर ती एका खोलीत (३) सुरक्षित ठेवली जायची.

पेटीजवळ आणि मंडळीच्या समोर असलेली मुख्य आसने (४) सभास्थानाच्या अधिकाऱ्‍यांसाठी किंवा कोणा बड्या व्यक्‍तींसाठी असायची. (मत्तय २३:५, ६) सभागृहाच्या मध्यभागी एक उंचावलेला मंच असायचा व त्यावर एक स्टॅण्ड आणि वक्त्यासाठी एक खुर्ची (५) असायची. मंचासमोरच्या तिन्ही बाजूला मंडळीसाठी आसने (६) असायची.

सभास्थान सहसा स्थानिक मंडळीतील सदस्य चालवायचे व तेथे होणाऱ्‍या सभांना यायचे. श्रीमंत आणि गरीब अशा दोन्ही लोकांनी दिलेल्या वर्गण्यांमुळे, इमारतीची देखभाल करून तिला सुस्थितीत ठेवले जायचे. पण, सभास्थानांमध्ये कशा प्रकारे सभा व्हायच्या?

सभास्थानांत होणारी उपासना सभास्थानांतील उपासना कार्यक्रमात स्तुतीगीते, प्रार्थना, शास्त्रवचनांचे वाचन तसेच शिकवणे व प्रचार कार्य यांचा समावेश होता. विश्‍वासाची कबूली अर्थात शेमा नावाच्या प्रार्थनेने मंडळीच्या कार्यक्रमाला सुरुवात व्हायची. या प्रार्थनेचे शेमा हे नाव, “हे इस्राएला, श्रवण [शेमा] कर, आपला देव परमेश्‍वर हा अनन्य परमेश्‍वर आहे,” या प्रार्थनेच्या अगदी सुरुवातीला म्हटल्या जाणाऱ्‍या ओळीतल्या तिसऱ्‍या शब्दानुसार पडले.—अनुवाद ६:४.

या प्रार्थनेनंतर, मोशेने लिहिलेल्या बायबलच्या पहिल्या पाच पुस्तकांचे अर्थात तोरहचे वाचन केले जायचे आणि मग वाचलेला भाग समजावून सांगितला जायचा. (प्रेषितांची कृत्ये १५:२१) यानंतर, संदेष्ट्यांच्या लिखाणांतल्या (हफतोहरा) काही भागांचे वाचन व्हायचे, वाचलेला भाग समजावून सांगितला जायचा आणि जीवनात त्याचे अनुकरण कसे करायचे तेही सांगितले जायचे. कधीकधी, पाहुणे वक्‍ते लूक ४:१६-२१ येथे सांगितल्याप्रमाणे जसे येशूने केले तसे कार्यक्रमातला हा भाग हाताळायचे.

पण येशूला सभेच्या वेळी दिलेल्या त्या गुंडाळीत, आज आपल्या आधुनिक बायबलमध्ये जसे अध्याय आणि वचने असतात तशी नव्हती. त्यामुळे आपण कल्पना करू शकतो, की येशू त्याच्या डाव्या हाताने ती गुंडाळी उघडत आहे आणि जोपर्यंत त्याला हवा असलेला भाग सापडत नाही तोपर्यंत उजव्या हाताने तो ती गुंडाळत आहे. वाचन झाल्यावर ती गुंडाळी पुन्हा पहिल्यासारखी गुंडाळून ठेवली जायची.

सहसा ही लिखाणे मूळ इब्री भाषेतून वाचली जायची आणि मग अरेमिक भाषेत त्याचे भाषांतर केले जायचे. ग्रीक भाषिक मंडळ्यांमध्ये, सेप्टुआजिंटचे वाचन केले जायचे.

दैनंदिन जीवनातला महत्त्वपूर्ण भाग यहुदी लोकांच्या जीवनात सभास्थानांना इतके महत्त्व होते, की सभास्थानाच्या इमारतीला लागूनच किंवा त्याच आवारात वेगवेगळ्या उद्देशांसाठी इतर इमारती असायच्या. या इमारतींमध्ये कधीकधी न्यायालयाच्या सुनावणींचे काम चालायचे, सामाजिक सभा भरवल्या जायच्या तसेच संमेलनेही व्हायची जेथे, इमारतींनाच लागून असलेल्या भोजनगृहात भोजनाची व्यवस्था केली जायची. आणि कधीकधी, सभागृहाच्या आवारात असलेल्या खोल्यांमध्ये प्रवाशांची राहण्याची सोय देखील केली जायची.

जवळजवळ सर्वच गावांतील सभास्थानात म्हणजे सहसा त्याच इमारतीत एक शाळा देखील असायची. एका खोलीत, मेणाच्या पाटीवर शिक्षकाने लिहिलेली मोठी अक्षरे शिकत असलेले लहान विद्यार्थी बसल्याची आपण कल्पना करू शकतो. शाळांना इतके महत्त्व दिले जायचे म्हणूनच तर प्राचीन यहुदी समाज साक्षर होता; अगदी सर्वसामान्य लोकांनाही शास्त्रवचनांचे ज्ञान होते.

परंतु सभास्थानाचा मुख्य हेतू लोकांसाठी नियमित उपासनेची सोय करणे हा होता. त्यामुळेच तर पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांच्या सभा आणि यहुदी सभास्थानांत होणाऱ्‍या सभा यांत बरीच साम्यता होती. ख्रिस्ती सभांचा उद्देश प्रार्थना, स्तुतीगीते आणि देवाच्या वचनाचे वाचन व चर्चा यांद्वारे यहोवाची उपासना करणे हा होता. पण इतक्याच साम्यता नव्हत्या. उपासनेच्या दोन्ही ठिकाणी, विविध गरजा व खर्च ऐच्छिक वर्गण्यांद्वारे चालवला जायचा; देवाच्या वचनाचे वाचन व त्यावर चर्चा करण्याची जबाबदारी फक्‍त पाळक वर्गालाच नव्हती; दोन्ही ठिकाणांच्या बाबतीत पाहता, सभांचा कार्यक्रम जबाबदार वडील जन आयोजित करून तो चालवायचे.

यहोवाचे साक्षीदार आज, येशूने व त्याच्या पहिल्या शतकातील अनुयायांनी घालून दिलेल्या आदर्शाचे पालन करण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच त्यांच्या राज्य सभागृहात होणाऱ्‍या सभांतील काही कार्यक्रम, प्राचीन सभास्थानांत भरवल्या जाणाऱ्‍या सभांप्रमाणेच आहेत. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, सत्यावर प्रेम करणारे लोक ज्या हेतूने एकत्र जमायचे त्याच हेतूने साक्षीदारही सभांसाठी एकत्र येतात. त्या सर्वांचा हेतू ‘देवाजवळ येणे’ हा होता व तोच हेतू आजही आहे.—याकोब ४:८. (w१०-E ०४/०१)

[१६ पानांवरील चित्र]

पुन्हा बांधलेली ही इमारत, पहिल्या शतकातील गमला या ठिकाणाच्या सभास्थानाच्या नकाशावर आधारित आहे

[१८ पानांवरील चित्र]

सभास्थानाच्या शाळांमध्ये ६ ते १३ वयोगटातील मुलांना शिकवले जायचे