व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तो आपल्या धन्याकडून क्षमा करण्याचा धडा शिकतो

तो आपल्या धन्याकडून क्षमा करण्याचा धडा शिकतो

त्यांच्या विश्‍वासाचे अनुकरण करा

तो आपल्या धन्याकडून क्षमा करण्याचा धडा शिकतो

पेत्राची नजर येशूच्या नजरेला भिडली तो क्षण तो कधीच विसरला नसावा. येशूच्या नजरेतून त्याला नाराजी किंवा राग दिसून आला का? याविषयी आपल्याला नक्की सांगता येणार नाही. ईश्‍वरप्रेरणेने लिहिलेल्या लिखाणांत फक्‍त असे म्हटले आहे, की “प्रभूने वळून पेत्राकडे दृष्टि लावली.” (लूक २२:६१) पण येशूच्या फक्‍त त्या एकाच नजरेतून पेत्राला, आपण काय घोडचूक केली आहे याची जाणीव झाली. मी माझ्या प्रिय धन्याला कधीच नाकारणार नाही, अशी बढाई पेत्र मारत होता. पण पेत्र त्याला नाकारेल अशी येशूने भविष्यवाणी केली होती. पेत्राने अगदी हेच केले. हा त्याच्या जीवनातल्या सर्वात बिकट दिवसातला अतिशय बिकट क्षण होता.

तरीपण वेळ गेलेली नव्हती. पेत्र खूप विश्‍वासू होता. त्यामुळे आपल्या चुकांतून सावरण्याची व येशूने शिकवलेल्या सर्वात मोठ्या धड्यातून शिकण्याची संधी अजूनही त्याच्याजवळ होती. येशूने त्याला क्षमा करण्याच्या बाबतीत धडा शिकवला होता. आपल्यापैकी प्रत्येकाला हा धडा शिकण्याची गरज आहे. पेत्र हा खडतर धडा कसा शिकला ते आपण पाहू या.

ज्याच्याकडून पुष्कळ शिकता येते असा मनुष्य

सुमारे सहा महिन्यांआधी कफर्णहूम या आपल्या गावी असताना, पेत्राने येशूजवळ येऊन त्याला असे विचारले: “प्रभुजी, माझ्या भावाने किती वेळा माझा अपराध केला असता मी त्याला क्षमा करावी? सात वेळा काय?” आपण खूप मोठ्या मनाचे आहोत, असे पेत्राला वाटत होते. कारण त्याच्या दिवसांतील धार्मिक नेते लोकांना असे शिकवत होते, की आपण एखाद्याला फक्‍त तीनच वेळा क्षमा केली पाहिजे. येशूने पेत्राला उत्तर दिले: “सात वेळा . . . नाही, तर साताच्या सत्तर वेळा.”—मत्तय १८:२१, २२.

येशू पेत्राला असे सांगत होता का, की त्याने इतरांच्या चुका मोजत राहिले पाहिजे? नाही. पेत्राच्या सात ह्‍या संख्येपुढे आणखी एक सात लावून येशू त्याला हे सांगत होता, की क्षमा करण्यासाठी सीमा नाही. येशूने पेत्राला दाखवून दिले, की त्याच्या मनावर त्या दिवसांत सर्रासपणे दिसत असलेल्या कठोर व क्षमा न करण्याच्या प्रवृत्तीचा प्रभाव झाला होता. हिशेबांचे काम करणारा जसे, जमाखर्चाच्या वहीत पैशांच्या सर्व बारीकसारीक व्यवहारांची नोंद ठेवतो तसे आपल्याविरुद्ध पाप करणाऱ्‍या व्यक्‍तीची सर्व बारीकसारीक पापे जणू काय आपल्या मनाच्या वहीत लिहून ठेवून त्यानुसार त्या व्यक्‍तीला क्षमा करण्याची प्रवृत्ती पेत्राच्या दिवसांमध्ये प्रचलित होती. परंतु देवाच्या दर्जांनुसार क्षमा दाखवण्याच्या बाबतीत उदार असणे आवश्‍यक होते.

पेत्राने येशूबरोबर हुज्जत घातली नाही. पण येशूने शिकवलेल्या धड्याचा त्याच्या मनावर काही परिणाम झाला का? लोकांनी आपल्याला क्षमा करावी असे जेव्हा आपल्याला अगदी मनापासून वाटत असते तेव्हा खरेतर, आपण इतरांना क्षमा का केली पाहिजे याचे महत्त्व आपल्याला कळते. येशूच्या मृत्यूआधी घडलेल्या घटनांचा पुन्हा एकदा विचार करू या. त्या कठीण प्रसंगी पेत्राच्या धन्याने त्याला अनेक गोष्टींबद्दल क्षमा केली.

क्षमा करण्याची नितांत गरज

येशूच्या पृथ्वीवरील जीवनाची ती शेवटली संध्याकाळ अविस्मरणीय होती. येशूला आपल्या प्रेषितांना आणखी खूप काही शिकवायचे होते, जसे की नम्रता. लोकांचे पाय धुण्याचे काम घरातल्या एखाद्या नोकराला दिले जायचे. येशूने आपल्या शिष्यांचे पाय धुवून त्यांच्यापुढे नम्रतेचा एक आदर्श मांडला. येशू जेव्हा पेत्राचे पाय धुवू लागला तेव्हा पेत्राला प्रश्‍न पडला की येशू हे काय करत आहे. त्याने त्याला पहिल्यांदा अडवले. पण नंतर तो येशूला म्हणू लागला, की फक्‍त माझे पायच नव्हे तर माझे हात व डोकेही धुवा! तेव्हा येशू त्याच्यावर चिडला नाही तर तो जे काही करत होता त्याचे महत्त्व आणि त्याचा अर्थ अगदी शांतपणे त्याने समजावून सांगितला.—योहान १३:१-१७.

पण या घटनेच्या थोड्याच काळानंतर येशूचे प्रेषित पुन्हा एकदा, त्यांच्यापैकी कोण मोठा आहे यावर वाद घालू लागले. गर्विष्ठपणा दाखवण्याच्या या निर्लज्ज कार्यात पेत्रही सामील होता. तरीपण येशूने या सर्वांना अगदी दयाळूपणे समजावले. इतकेच नव्हे तर ते आपल्या धन्याशी विश्‍वासूपणे राहिल्याबद्दल येशूने त्यांची प्रशंसा देखील केली. पण ते सर्व त्याला सोडून जातील असे त्याने भाकीत केले. मला मरावे लागले तरी मी तुला सोडणार नाही, असे पेत्र त्याला म्हणाला. पण येशू त्याला म्हणाला, की त्या रात्री कोंबडा दोन वेळा आरवण्याआधी तो तीन वेळा आपल्या धन्याला नाकारेल. तेव्हा पेत्राने येशूचे बोलणे फक्‍त खोडूनच काढले नाही तर अशीही बढाई मारली की तो इतर प्रेषितांपेक्षाही अधिक विश्‍वासू राहील!—मत्तय २६:३१-३५; मार्क १४:२७-३१; लूक २२:२४-२८.

आता तरी येशू पेत्रावर चिडला का? नाही. उलट, या खडतर काळातही येशू आपल्या अपरिपूर्ण प्रेषितांच्या चांगल्या गुणांकडेच पाहत होता. पेत्र त्याला नाकारेल हे येशूला माहीत होते तरीपण तो त्याला म्हणाला: “तुझा विश्‍वास ढळू नये म्हणून तुझ्यासाठी मी विनंती केली आहे; आणि तू वळलास म्हणजे तुझ्या भावांस स्थिर कर.” (लूक २२:३२) अशा प्रकारे येशूने हा विश्‍वास दाखवला, की पेत्राला त्याच्या चुकांची जाणीव होईल आणि तो पुन्हा एकदा विश्‍वासूपणे सेवा करेल. क्षमा दाखवण्याची किती ही दयाळू मनोवृत्ती!

नंतर, गेथशेमाने बागेत येशूला पेत्रास पुन्हा सुधारावे लागले. येशूने पेत्राला, तसेच याकोब व योहान यांनाही तो प्रार्थना करत असताना जागृत राहायला सांगितले. येशूला मानसिक यातना होत होत्या, त्याला त्याच्या शिष्यांचा आधार हवा होता. पण पेत्र आणि बाकीचे प्रेषित सारखे झोपत होते. त्यांना पाहून येशूला त्यांची सहानुभूती वाटली व त्यांना क्षमा करत त्याने म्हटले: “आत्मा उत्सुक आहे खरा, तरी देह अशक्‍त आहे.”—मार्क १४:३२-३८.

थोड्याच वेळात, हातात मशाली, तलवारी व सोटे घेऊन लोकांचा एक घोळका आला. सावधगिरी व समंजसपणा दाखवण्याची ही वेळ होती. पण पेत्र उतावळ्यासारखा वागला. त्याने प्रमुख याजकाच्या मल्ख नावाच्या दासावर तलवारीने प्रहार करुन त्याचा कान छाटून टाकला. या वेळीसुद्धा येशूने अगदी शांतपणे पेत्राची सुधारणा केली, मल्खची जखम बरी केली आणि अहिंसेचे तत्त्व शिकवले ज्याचा अवलंब आजही त्याचे अनुयायी करतात. (मत्तय २६:४७-५५; लूक २२:४७-५१; योहान १८:१०, ११) पेत्राने आतापर्यंत पुष्कळ चुका केल्या होत्या व त्याच्या धन्याने त्याला प्रत्येक वेळी क्षमा केली होती. यावरून आपल्याला आठवते, की “आपण सगळेच पुष्कळ चुका करितो.” (याकोब ३:२) आपल्यापैकी कोण असा आहे ज्याला दररोज देवाची क्षमा मागावी लागत नाही? पेत्राची गोष्ट मात्र इथेच संपत नाही. त्याने पुढे एक घोडचूक केली.

पेत्राची घोडचूक

लोकांचा हा घोळका येशूला पकडायला आला होता तेव्हा त्याने त्यांना म्हटले, की जर ते त्याला शोधत आहेत तर त्यांनी बाकीच्यांना म्हणजे आपल्या प्रेषितांना जाऊ द्यावे. ते लोक येशूला बांधत होते तेव्हा पेत्र फक्‍त बघत राहिला. त्यानंतर इतर प्रेषितांप्रमाणे पेत्रही येशूला सोडून पळून गेला.

पण पेत्र आणि योहान मग पूर्वीचा महायाजक हन्‍ना याच्या वाड्याजवळ थांबले कारण येशूला पहिल्यांदा उलटतपासणीसाठी तेथे नेण्यात आले होते. येशूला तेथून दुसरीकडे नेले जात असताना पेत्र आणि योहान “दुरून” त्याच्या मागे मागे चालत गेले. (मत्तय २६:५८; योहान १८:१२, १३) यावरून कळते, की पेत्र भित्रा नव्हता. येशूच्या मागे मागे जाण्यासाठी धैर्याची गरज होती. कारण, येशूला धरून आणलेल्या लोकांच्या हातात हत्यारे होती आणि पेत्राने तर आधीच एकाला जखमी केले होते. तरीपण, पेत्राच्या वागण्यावरून अजूनतरी आपल्याला, त्याच्या धन्याबद्दलचे एकनिष्ठ प्रेम दिसून येत नाही; धन्यासाठी मला माझा जीव जरी द्यावा लागला तरी मी तो द्यायला तयार आहे, अशी पेत्राने फक्‍त बढाई मारली होती. कार्यात मात्र हे प्रेम दाखवले नव्हते.—मार्क १४:३१.

पेत्राप्रमाणे आजही अनेक जण ‘दुरुनच’ म्हणजे नावापुरते, कोणाला दिसणार नाही अशा प्रकारे ख्रिस्ताच्या मागे मागे चालतात. पण पेत्रानेच नंतर लिहिल्याप्रमाणे, ख्रिस्ताचे योग्य रीतीने अनुकरण करणे म्हणजे, होता होईल तितके त्याच्या जवळ राहणे आणि काहीही झाले तरी सर्व गोष्टींमध्ये त्याचे अनुकरण करणे.—१ पेत्र २:२१.

पेत्र दबकत दबकत येशूला धरून नेणाऱ्‍या लोकांच्या मागे मागे थेट जेरूसलेमच्या एका अगदी मोठ्या वाड्याच्या फाटकापर्यंत जातो. हा कयफा नावाच्या एका धनाढ्य व वट असलेल्या महायाजकाचा वाडा आहे. अशा वाड्यांना एक फाटक असायचे आणि वाड्याच्या समोर सहसा मोठे अंगण असायचे. पेत्र फाटकापर्यंत जातो पण त्याला आत जाऊ दिले जात नाही. योहान जो आधीच आत गेला होता तो फाटकापाशी उभ्या असलेल्या रक्षकाला, पेत्राला आत येऊ देण्यास सांगतो. असे दिसते, की पेत्र योहानासोबत राहिला नव्हता, किंवा आपल्या धन्याच्या बाजूला उभे राहण्याकरता त्याने वाड्याच्या आत जायचाही प्रयत्न केला नव्हता. तो अंगणातच राहिला जेथे, काही दास व सेवक रात्रीच्या गारठ्यात शेकोटी पेटवून शेकत बसले होते. येशूविरुद्ध खोटी साक्ष देण्यासाठी एकेक जण आत जाऊन बाहेर येत होता तेव्हा पेत्र हे सर्व अंगणातूनच पाहत होता.—मार्क १४:५४-५७; योहान १८:१५, १६, १८.

पेत्राला फाटकातून आत सोडणारी एक मुलगी, त्याला शेकोटीच्या उजेडात चांगल्या प्रकारे पाहू शकत होती. ती त्याला ओळखायची. ती त्याला म्हणाली: “तूहि गालीली येशूबरोबर होतास.” आपल्याला इथे कोणी ओळखणार नाही असा पेत्राचा ग्रह होता, पण या मुलीने त्याला ओळखल्यानंतर त्याने लगेच, तो येशूला ओळखत नाही असे म्हटले. तो एवढ्यावरच थांबला नाही. त्याने म्हटले, की ही मुलगी काय म्हणतेय ते मला कळत नाही. मग तो फाटकापाशी जातो. तिथे त्याला कोणी ओळखणार नाही, असे त्याला वाटते. पण तिथेही आणखी एक मुलगी त्याला ओळखते आणि त्याच्याकडे बोट दाखवत म्हणते: “हा नासोरी येशूबरोबर होता.” पेत्र शपथ वाहून म्हणतो: “मी त्या मनुष्याला ओळखत नाही.” (मत्तय २६:६९-७२) येशूला नाकारण्याची पेत्राची कदाचित ही दुसरी वेळ असावी. तेवढ्यात तो एका कोंबड्याला आरवताना ऐकतो. पण, तो इतका गोंधळून गेलेला असतो, की येशूने काही तासांपूर्वीच त्याच्याविषयी केलेली भविष्यवाणी त्याला त्या प्रसंगी आठवत नाही.

पेत्र अजूनही लोकांच्या नजरांपासून लपण्याचा प्रयत्न करत होता. पण अंगणात घोळका करून उभे असलेले काही लोक त्याच्याजवळ येतात. त्यांपैकी एक जण, पेत्राने ज्याचा कान कापला होता त्या मल्खचा नातेवाईक असतो. तो पेत्राला म्हणतो: “मी तुला त्याच्याबरोबर बागेत नाही का पाहिले?” तुम्ही ज्याच्याविषयी बोलत आहात तो मी नव्हेच, हे पटवून द्यायचा पेत्र खूप प्रयत्न करतो. तो तर शपथही घेतो आणि म्हणतो मी जर खोटे बोलत असेन तर माझ्यावर शाप येऊ दे. त्याच्या तोंडून हे शब्द बाहेर पडतात न्‌ पडतात तोच, कोंबडा आरवतो. त्या रात्री पेत्र दुसऱ्‍यांदा कोंबड्याची बांग ऐकतो.—योहान १८:२६, २७; मार्क १४:७१, ७२.

त्याच वेळेला येशू गच्चीत येतो आणि अंगणात उभ्या असलेल्या लोकांकडे पाहतो. अगदी त्याच प्रसंगी, लेखाच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे त्याची नजर पेत्राच्या नजरेशी भिडते. त्या क्षणी पेत्राला जाणवते, की आपण आपल्या धन्याचे किती मन मोडले आहे. त्याला स्वतःची खूप लाज वाटते आणि तो अंगणातून बाहेर जातो. रात्रीच्या चंद्रप्रकाशात शहराकडे जाणाऱ्‍या रस्त्यावरून तो चालू लागतो. त्याच्या डोळ्यांपुढे तेच तेच दृश्‍य सारखे येत राहते. त्याच्या भावनांचा बांध फुटतो आणि तो अगदी हमसून हमसून रडू लागतो.—मार्क १४:७२; लूक २२:६१, ६२.

आपण केलेली चूक किती मोठी आहे, याची जाणीव जेव्हा एखाद्या व्यक्‍तीला होते तेव्हा, आता क्षमा मिळणे शक्य नाही, अशा भावना तिच्या मनात येणे साहजिकच आहे. पेत्रालाही कदाचित असेच वाटले असावे. पेत्राला क्षमा मिळणे शक्य होते का?

पेत्राचे पाप अक्षम्य होते का?

दुसरा दिवस उजाडल्यानंतर आदल्या दिवशी ज्या घटना घडल्या त्याबद्दल पेत्राला किती वाईट वाटले असावे, याचा कदाचित आपण अंदाजही बांधू शकणार नाही. या दुसऱ्‍या दिवशी ज्या घटना घडणार होत्या त्या त्याच्या जखमेवर मीठ चोळण्याप्रमाणे ठरणार होत्या. अनेक तासांच्या यातनेनंतर येशू जेव्हा त्या दुपारी मरण पावला तेव्हा पेत्राने स्वतःला किती दोष दिला असावा! मानव म्हणून आपल्या धन्याच्या शेवटल्या दिवशी आपण त्याच्या दुःखात किती भर घातली होती याचा विचार जेव्हा जेव्हा पेत्राच्या मनात आला असावा तेव्हा तेव्हा त्याला वाईट वाटले असावे. पेत्राला खूप दुःख झाले असले तरी, त्याने निराश होऊन हार मानली नाही. आपण असे म्हणू शकतो कारण तो लगेचच त्याच्या भावांबरोबर होता, असे अहवालात म्हटले आहे. (लूक २४:३३) त्या काळरात्री आपण कसे वागलो होतो याची सर्वच प्रेषितांना लाज वाटली असावी; त्यांनी लगेचच एकमेकांचे सांत्वन केले.

आता आपण पेत्राला, सुज्ञपणे वागताना पाहतो. देवाच्या एखाद्या सेवकाच्या हातून जेव्हा पाप घडते तेव्हा त्याने किती गंभीर पाप केले आहे हे महत्त्वाचे नाही तर त्या पापातून सावरून सुधारण्याचा त्याने किती पक्का निश्‍चय केला आहे, हे महत्त्वाचे आहे. (नीतिसूत्रे २४:१६) पेत्र निराश होता तरीपण त्याने आपल्या बांधवांबरोबर संगती करण्याचे सोडून दिले नाही. आपण जेव्हा निराश होतो किंवा आपल्या हातून पाप घडल्याचा आपल्याला पस्तावा होतो तेव्हा ख्रिस्ती बंधुभगिनींपासून दूर राहण्याचा आपल्याला मोह होतो; पण हा मोह घातक ठरू शकतो. (नीतिसूत्रे १८:१) आपल्या ख्रिस्ती बंधुभगिनींजवळ राहून देवाची सेवा करत राहण्याची शक्‍ती पुन्हा मिळवण्यातच शहाणपण आहे.—इब्री लोकांस १०:२४, २५.

आपल्या आध्यात्मिक बंधुभगिनींच्या जवळ राहिल्यामुळेच तर पेत्राला, येशूचे शरीर कबरेत नसल्याची खळबळजनक बातमी समजते. येशूला ज्या कबरेत ठेवले होते व तिच्या तोंडाजवळ एक मोठा धोंडा ठेवला होता तेथे पेत्र आणि योहान पळत जातात. योहान पेत्रापेक्षा वयाने लहान असल्यामुळे कबरेजवळ पहिला पोचतो. कबरेचे दार उघडे असल्यामुळे तो आत जायला धजत नाही. पण पेत्राला पळत आल्यामुळे दम लागलेला असतो तरी तो सरळ कबरेच्या आत शिरतो. आणि पाहतो तर काय, कबर रिकामी!—योहान २०:३-९.

येशूला जिवंत करण्यात आले होते यावर पेत्राने विश्‍वास ठेवला का? सुरुवातीला नाही. येशूला पुन्हा जिवंत करण्यात आले आहे असे आपल्याला देवदूतांनी सांगितले असल्याचे काही विश्‍वासू स्त्रियांनी म्हटल्यावरही पेत्राचा त्यांच्यावर विश्‍वास बसला नाही. (लूक २३:५५–२४:११) पण संध्याकाळपर्यंत, पेत्राच्या मनातील सर्व दुःख व शंका नाहीशा झाल्या होत्या. येशू आता एक शक्‍तिशाली आत्मिक प्राणी म्हणून जिवंत झाला होता. त्याने त्याच्या सर्व प्रेषितांना दर्शन दिले. पण याआधी तो फक्‍त एकालाच भेटला होता. त्याविषयी प्रेषितांनी म्हटले: “प्रभु खरोखर उठला आहे व शिमोनाच्या दृष्टीस पडला आहे.” (लूक २४:३४) तसेच, येशू “केफाला, मग बारा जणांना दिसला,” असे नंतर प्रेषित पौलानेही लिहिले. (१ करिंथकर १५:५) केफा आणि शिमोन ही पेत्राचीच आणखी नावे आहेत. पेत्र एकटा असताना येशूने त्याला दर्शन दिले.

त्या दर्शनप्रसंगी त्यांच्यात काय बोलणे झाले त्याची तपशीलवार माहिती त्या दोघांतच राहिली; बायबल याविषयी काही सांगत नाही. आपल्या प्रिय प्रभूला पुन्हा जिवंत झालेले पाहून व पेत्राला स्वतःवर गुदरलेले दुःख आणि नंतर त्याला झालेला पश्‍चात्ताप व्यक्‍त करण्याची संधी मिळाल्यावर तो किती भारावून गेला असावा याची आपण फक्‍त कल्पनाच करू शकतो. त्याला आपल्या प्रभूकडून दुसरे काही नाही तर फक्‍त क्षमा हवी होती. येशूने त्याला निश्‍चितच अगदी मोठ्या मनाने क्षमा केली असावी! ज्यांच्या हातून गंभीर पाप घडते अशा ख्रिश्‍चनांनी आज पेत्राच्या उदाहरणाचा विचार केला पाहिजे. देव आपल्याला कधीच क्षमा करणार नाही असा ग्रह आपण मुळीच करून घेऊ नये. “भरपूर क्षमा” करणाऱ्‍या आपल्या पित्याचे येशूने हुबेहूब अनुकरण केले.—यशया ५५:७.

क्षमा केल्याचा आणखी पुरावा

येशूने आपल्या प्रेषितांना गालीलला जाण्यास सांगितले. तेथे तो त्यांना भेटणार होता. तेथे गेल्यावर पेत्र गालील समुद्रात मासे पकडायला जातो. इतर बरेच जण त्याच्याबरोबर जातात. पेत्राने आपले अर्धेअधिक आयुष्य जेथे घालवले होते त्या तलावाजवळ तो पुन्हा येतो. नावेचा तो कर्रकर्र आवाज, नावेवर हळूवार येऊन धडकणाऱ्‍या लाटांचा आवाज, हाताला खरबरीत वाटणारे ते जाळे, हे सर्व पाहून त्याला त्याचे जुने दिवस आठवले असावेत. येशूची पृथ्वीवरील सेवा तर संपली आहे तेव्हा मी माझ्या जीवनाचे काय केले पाहिजे, हा प्रश्‍न त्याच्या मनात त्या रात्री आला असावा का? मच्छीमाराचे ते जीवन त्याला साद घालत होते का? त्या रात्री, कोणालाही मासे मिळाले नाहीत, एवढे मात्र खरे.—मत्तय २६:३२; योहान २१:१-३.

पण तांबडे फुटल्यावर कोणीतरी त्यांना किनाऱ्‍यावरून हाक मारतो आणि नावेच्या दुसऱ्‍या बाजूला पाण्यात जाळे टाकण्यास सांगतो. ते त्याचे बोलणे ऐकून जाळे टाकतात आणि त्यांच्या जाळ्यात १५३ माशांचा घोळका अडकतो! असे करण्यास सांगणारा मनुष्य कोण आहे हे पेत्राला लगेच कळते. तो ताडकन नावेतून उडी टाकतो आणि पोहत पोहत किनाऱ्‍यावर येतो. किनाऱ्‍यावर येशू त्यांना, कोळशावर भाजलेले मासे खाऊ घालतो. येशूचे लक्ष पेत्राकडे आहे.

पकडलेल्या माशांकडे बोट दाखवत येशू पेत्राला विचारतो: “ह्‍यांच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीति करितोस काय?” मच्छीमारी की ख्रिस्ती सेवा—अशी पेत्राची द्विधा मनःस्थिती झाली का? पेत्राने आधी आपल्या प्रभूला तीन वेळा नाकारले होते. पण आता येशू त्याला, त्याच्यावर त्याचे किती प्रेम आहे हे त्याच्या मित्रांसमोर कबूल करण्याची तीनदा संधी देतो. पेत्राने तीनदा कबूल केल्यानंतर, हे प्रेम कार्यात कसे दाखवायचे ते येशू त्याला सांगतो. पवित्र सेवेला जीवनात प्राधान्य देण्याद्वारे, ख्रिस्ताच्या विश्‍वासू अनुयायांना अर्थात त्याच्या कळपाला चारण्याद्वारे व त्यांना सांभाळण्याद्वारे पेत्राला हे प्रेम आपल्या कार्यातून दाखवायचे होते. आणि पेत्राने तसे करूनही दाखवले.—योहान २१:४-१७.

अशा प्रकारे येशूने दाखवून दिले की पेत्र अजूनही त्याच्या व त्याच्या पित्याच्या कामी येऊ शकतो. ख्रिस्ताच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या मंडळीत पेत्र महत्त्वाची भूमिका निभावणार होता. येशूने त्याला क्षमा केल्याचा हा किती मोठा पुरावा होता! येशूने त्याला दाखवलेली दया पेत्राच्या अंतःकरणाला भिडते आणि तो येशूचे म्हणणे गांभीर्याने घेतो.

पेत्राने त्याला मिळालेली नेमणूक अनेक वर्षांपर्यंत विश्‍वासूपणे पूर्ण केली. येशूने आपल्या मृत्यूच्या आदल्या रात्री आज्ञा दिल्याप्रमाणे पेत्राने आपल्या बांधवांना आध्यात्मिक रीत्या मजबूत केले. ख्रिस्ताच्या अनुयायांना आध्यात्मिक अन्‍न देण्याची व त्यांचा सांभाळ करण्याची जबाबदारी पेत्राने दयाळूपणे व सहनशीलतेने पार पाडली. शिमोन नावाचा हा मनुष्य, येशूने त्याला दिलेल्या, पेत्र किंवा खडक या नावाप्रमाणे जगला. ख्रिस्ती मंडळीत त्याचा प्रभाव चांगला होता; त्याच्यामुळे बंधुभगिनी आध्यात्मिक रीत्या स्थिर व मजबूत झाले. स्वतः पेत्राने लिहिलेल्या दोन प्रेमळ पत्रांवरून याची प्रचिती येते. ही पत्रे बायबलच्या अमूल्य पुस्तकांपैकी आहेत. क्षमा करण्याबद्दल शिकलेला धडा पेत्र कधीच विसरला नाही हेही त्याच्या पत्रांवरून दिसून येते.—१ पेत्र ३:८, ९; ४:८.

आपणही तो धडा शिकला पाहिजे. आपल्याकडून होत असलेल्या चुकांबद्दल आपणही दररोज देवाकडे क्षमा मागतो का? आणि मग, देवाने आपल्याला क्षमा केली आहे व या क्षमा केलेल्या पापांबद्दल आपण स्वतःला विनाकारण दोषी किंवा अपात्र समजू नये, आपण शुद्ध होऊ शकतो, असा भरवसा आपण बाळगतो का? तसेच आपल्या सभोवती असलेल्यांना आपण क्षमा करतो का? असल्यास, आपण पेत्राच्या विश्‍वासाचे आणि त्याच्या धन्याच्या दयेचे अनुकरण करू. (w१०-E ०४/०१)

[२२ संक्षिप्त आशय]

पेत्राच्या धन्याने त्याला पुष्कळ गोष्टींबद्दल क्षमा केली; पण आपल्यापैकी कोण असा आहे ज्याला दररोज देवाची क्षमा मागावी लागत नाही?

[२३ पानांवरील चित्र]

“प्रभूने वळून पेत्राकडे दृष्टि लावली”

[२४ पानांवरील चित्र]

“प्रभु . . . शिमोनाच्या दृष्टीस पडला”