व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देव करतोय तरी काय?

देव करतोय तरी काय?

देव करतोय तरी काय?

“हे यहोवा, तू का दूर उभा राहतोस? संकटसमयी तू आपणास का लपवतोस?” *स्तोत्र १०:१, पंडिता रमाबाई भाषांतर.

आजच्या ठळक बातम्यांवर आपण फक्‍त एक ओझरती नजर टाकली तरीसुद्धा आपली खात्री पटते, की आपण “संकटसमयी” जगत आहोत. आणि संकट जेव्हा आपल्या घरावरच कोसळते, म्हणजे, आपणच जेव्हा गुन्हेगारीचे बळी ठरतो, आपला जीवघेणा अपघात होतो किंवा आपल्याच एखाद्या प्रिय व्यक्‍तीचा मृत्यू होतो तेव्हा आपल्या मनात प्रश्‍नांचे काहूर माजते, जसे की माझ्यावर आलेले हे संकट देवाने पाहिले का? त्याला माझी काळजी आहे का? पण असं करायला तो अस्तित्वात तरी आहे का?

पण, देवाबद्दलच्या आपल्या अपेक्षा कदाचित एका चुकीच्या विचारधारणेवर आधारित असतील, ही शक्यता तुम्ही विचारात घेतली आहे का? उदाहरणार्थ: एक लहान मुलगा, त्याचे वडील कामाला गेल्यामुळे नाराज आहे. त्याला त्यांची खूप आठवण येत असते, त्यांनी लवकर घरी यावे, असे त्याला वाटते. बाबा मला सोडून तर गेले नाही ना, असा विचार त्याच्या मनात येतो. म्हणून दिवसभर तो, “बाबा कुठं आहेत?” असे विचारत राहतो.

त्या मुलाची विचारसरणी चुकीची आहे, हे आपण सहजरीत्या सांगू शकतो. कारण, त्याचे बाबा कुटुंबाचे भरणपोषण करण्यासाठी कामाला गेले आहेत. तेव्हा, आपणही जेव्हा, “कुठं आहे देव?” असे विचारत असतो तेव्हा कदाचित त्या लहान मुलाप्रमाणेच आपल्याही विचारसरणीत दोष असू शकतो, नाही का?

जसे की, काही जण विचार करतील की देवाने एका दंडाधिकाऱ्‍यासारखे असले पाहिजे; त्यांच्याविरुद्ध कोणी काही वाईट केले तर देवाने ताबडतोब त्या व्यक्‍तीला मृत्यूदंड दिला पाहिजे. हेच देवाचे प्रमुख काम आहे. काहींना देव सांता क्लॉजसारखा वाटतो; सांता क्लॉज जसा बक्षिसे वाटत फिरत असतो तसेच देवाने पण त्यांना एक चांगली नोकरी द्यावी, एक चांगला जोडीदार द्यावा किंवा लॉटरी लावून द्यावी.

वर उल्लेखण्यात आलेल्या दोन्ही प्रकारच्या लोकांना वाटते की जर देव लगेच कारवाई करत नाही किंवा आपण मागितलेली गोष्ट आपल्याला देत नाही तर त्याचा अर्थ, आपल्यावर जे काही संकट ओढवते त्याबद्दल त्याला काही घेणे-देणे नाही आणि आपल्याला काय हवे आहे याची त्याला जाणीव नाही. पण, सत्य परिस्थिती तर वेगळीच आहे. वास्तविक पाहता, अगदी या क्षणाला देखील यहोवा देव संपूर्ण मानवजातीसाठी काही तरी करत आहे. अर्थात, बहुतेक लोक अपेक्षा करत असलेल्या मार्गांनी नव्हे तर एका वेगळ्या मार्गाने तो मानवजातीसाठी काही तरी करत आहे.

तो नेमके काय करत आहे? या प्रश्‍नाचे उत्तर मिळण्याकरता आधी आपल्याला, मानव इतिहासाच्या सुरुवातीला जावे लागेल जेव्हा मानवाचा देवाबरोबर असलेला नातेसंबंध खरोखरच बिघडला होता. परंतु याचा अर्थ असा होत नाही, की हा नातेसंबंध कायमचाच बिघडला होता.

पापाचे हानीकारक परिणाम

कल्पना करा: खूप वर्षांपासून एक घर पडीक अवस्थेत आहे. घराचे छप्पर कोसळले आहे, दारे बिजागरीतून निखळली आहेत आणि आतल्या सामानाची मोडतोड झाली आहे. एकेकाळी हे घर चांगल्या अवस्थेत होते—पण आता त्याची दुर्दशा झाली आहे. झालेली हानी पाहिल्यावर कळते, की या घराला पुन्हा पहिल्यासारखे बनवणे तोंडची गोष्ट नाही; एका रात्रीत या घराचा कायापालट होणे तर शक्यच नाही.

सुमारे ६,००० वर्षांपूर्वी एका देवदूताने जो नंतर सैतान बनला त्याने आदाम आणि हव्वेला देवाविरुद्ध बंड करायला लावून मानवजातीची जी हानी केली आहे तिचा आता विचार करा. हे सर्व होण्याआधी, आदाम आणि हव्वा यांचे आरोग्य परिपूर्ण होते. त्यांना तसेच त्यांना होणाऱ्‍या मुलांना पृथ्वीवर कायम जगण्याची आशा होती. (उत्पत्ति १:२८) पण पाप केल्यानंतर आदाम व हव्वेने जणू काय, त्यांच्या पोटी जन्माला येणाऱ्‍या मानवी परिवाराची नासधूस केली.

त्यांनी केलेल्या नासधूशीच्या परिणामांना क्षुल्लक समजू नका. बायबल त्याविषयी असे म्हणते: “एका माणसाच्या द्वारे [आदामाद्वारे] पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले.” (रोमकर ५:१२) आदाम आणि हव्वेच्या पापामुळे मानवजातीवर मृत्यू ओढवला, तसेच निर्माणकर्त्याबरोबर असलेला आपला नातेसंबंध बिघडला आणि शारीरिक रीत्या, मानसिक रीत्या व भावनिक रीत्या वाईट परिणाम झाला. आपली अवस्था त्या पडीक घरासारखी झाली आहे. ईयोब नावाच्या एका धार्मिक व्यक्‍तीने अगदी मोजक्याच शब्दांत मानवाच्या अवस्थेचे अचूक वर्णन केले. त्याने म्हटले, की “मनुष्य थोड्या दिवसांचा व कष्टाने भरलेला आहे.”—ईयोब १४:१, पंडिता रमाबाई भाषांतर.

पण मग, आदामाने आणि हव्वेने पाप केल्यानंतर देवाने मानवांना वाऱ्‍यावर सोडून दिले का? मुळीच नाही. उलट, तेव्हापासून आत्तापर्यंत आपला स्वर्गीय पिता मानवजातीसाठी काही तरी करत आहे. तो नेमके काय करत आहे हे आपल्याला चांगल्या प्रकारे समजावे म्हणून आपण त्या घराच्या उदाहरणाचा पुन्हा एकदा विचार करूया. ते पडीक घर जर पुन्हा उभे करायचे असेल तर तीन गोष्टी कराव्या लागतील. आणि या तीन गोष्टींचा संबंध, मानवजातीला पुन्हा उभे करण्यासाठी देवाने काय केले आहे त्याच्याशी कसा लागतो ते आपण पाहू या.

१ पडलेले घर पाहून घरमालकाला ठरवावे लागेल, की त्या घराची फक्‍तच डागडूजी करायची की ते पाडून त्याच्याऐवजी दुसरे घर बांधायचे.

एदेन बागेतील बंडाळीनंतर लगेचच, यहोवा देवाने मानवजातीला पुन्हा पहिल्या सारख्या स्थितीत आणण्याचा आपला उद्देश प्रकट केला. आदाम आणि हव्वेला बंडाळी करण्यास प्रवृत्त करणाऱ्‍या सैतानाला देवाने म्हटले: “तू व स्त्री, तुझी संतति व तिची संतति यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन; ती तुझे डोके फोडील, व तू तिची टाच फोडिशील.”—उत्पत्ति ३:१५.

या शब्दांद्वारे यहोवाने, एदेन बागेत बंडाळीची सुरुवात करणाऱ्‍याचा कायमचा नाश करण्याचे वचन दिले. (रोमकर १६:२०; प्रकटीकरण १२:९) तसेच, पापापासून मानवजातीची सुटका करणारी एक “संतति” उत्पन्‍न होईल, असेही त्याने भाकीत केले. (१ योहान ३:८) अशा प्रकारे यहोवाने, तो काय करणार आहे हे जाहीर केले: त्याच्या सृष्टीचा नाश नव्हे तर तिची डागडूजी अर्थात तिला पहिल्यासारखे बनवण्याचे त्याने वचन दिले. पण हे सर्व करण्यासाठी वेळ लागणार होता.

२ इमारतीचे नकाशे काढणारा, संपूर्ण घराच्या रचनेचे तपशीलवार वर्णन एका कागदावर तयार करतो, म्हणजेच एक ब्लूप्रिंट तयार करतो.

यहोवा देवाने इस्राएल लोकांना एक नियमावली दिली होती आणि त्याच्या उपासनेसाठी त्यांना एक मंदिर बनवायला सांगितले होते व त्या मंदिराची रचना कशी असली पाहिजे हेही सांगितले होते. बायबलमध्ये म्हटले आहे: “ह्‍या बाबी पुढे होणाऱ्‍या गोष्टींच्या छाया आहेत.” (कलस्सैकर २:१७) एका ब्लूप्रिंटप्रमाणे ही नियमावली व ते मंदिर महान गोष्टीला सूचित करत होते.

उदाहरणार्थ, इस्राएल लोक पापांची क्षमा मिळावी म्हणून प्राण्यांचे अर्पण करत असत. (लेवीय १७:११) इस्राएल लोकांची ही प्रथा, अनेक शतकांनंतर दिल्या जाणाऱ्‍या एका महान अर्पणाला पूर्वसूचित करत होती. या महान अर्पणामुळे मानवजातीची खरी सुटका होणार होती. * इस्राएल लोक जिथे उपासना करायचे त्या निवासमंडपाची व मंदिराची रचना, भविष्यात प्रकट होणाऱ्‍या मशीहाला अर्थात त्याचा बलिदानरूपी मृत्यू झाल्यापासून ते स्वर्गात जाईपर्यंत तो जे काही करणार होता त्यांस पूर्वसूचित करत होती.—पृष्ठ ७ वरील तक्‍ता पाहा.

३ ब्लूप्रिंटनुसार घराची पुनर्बांधणी करण्यासाठी एक बिल्डर निवडला जातो.

येशू हा प्रतिज्ञात मशीहा होता. तो, इस्राएल लोक करत असलेल्या बलिदानांद्वारे मांडण्यात आलेल्या रचनेनुसार वागणार होता आणि मानवजातीची सुटका करण्यासाठी स्वतःचे जीवन अर्पण करणार होता. म्हणूनच तर, बाप्तिस्मा करणाऱ्‍या योहानाने येशूला “जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा” असे संबोधले. (योहान १:२९) देवाने दिलेले काम येशूने हसत हसत स्वीकारले. त्याने म्हटले: “मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे, तर ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून स्वर्गातून उतरलो आहे.”—योहान ६:३८.

देवाची अशी इच्छा होती, की येशूने “पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण” करावा तसेच त्याच्या अनुयायांबरोबर राज्याचा एक करारही करावा. (मत्तय २०:२८; लूक २२:२९, ३०) या राज्याकरवी देव मानवजातीसाठी असलेला त्याचा उद्देश पूर्ण करणार आहे. देवाच्या राज्याबद्दलच्या संदेशाला “सुवार्ता” म्हटले जाते. ही एक चांगली वार्ता आहे कारण देव, स्वर्गामध्ये एक सरकार स्थापन करून पृथ्वीवरचा सर्व कारभार आपल्या हाती घेणार आहे.—मत्तय २४:१४; दानीएल २:४४. *

सुधरण्याचे काम सुरू होते

स्वर्गात जाण्याआधी येशूने आपल्या अनुयायांना अशी आज्ञा दिली: “सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा; त्यांस पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या; . . . आणि पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे.”—मत्तय २८:१९, २०.

याचा अर्थ, येशूचा मृत्यू झाल्यानंतर मानवजातीला सुधरवण्याचे काम संपणार नव्हते. तर ते “युगाच्या समाप्तीपर्यंत” अर्थात, देवाचे राज्य पृथ्वीवरचा ताबा घेण्याची वेळ येईपर्यंत चालणार होते. ती वेळ जवळ आली आहे. आपण असे म्हणतो, कारण ‘युगाच्या समाप्तीबद्दल’ येशूने दिलेली चिन्हलक्षणे आजघडीला पूर्ण होत आहेत. *मत्तय २४:३-१४; लूक २१:७-११; २ तीमथ्य ३:१-५.

आज, यहोवाचे साक्षीदार २३६ देशांत देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करून येशूने दिलेल्या आज्ञेचे पालन करत आहेत. खरे तर, तुम्ही वाचत असलेले हे नियतकालिक तुम्हाला, त्या राज्याबद्दल व त्या राज्याद्वारे काय काय साध्य होणार आहे याबद्दल अधिक शिकण्याकरता बनवण्यात आले आहे. टेहळणी बुरूज नियतकालिकाच्या प्रत्येक अंकाच्या दुसऱ्‍या पानावर तुम्हाला ही टिपणी वाचायला मिळेल: “देवाचे राज्य स्वर्गात असलेले एक खरोखरचे सरकार आहे आणि ते लवकरच सर्व दुष्टाईचा अंत करून या पृथ्वीचे एका सुंदर नंदनवनात रूपांतर करेल, या आनंददायक वार्तेने हे नियतकालिक लोकांचे सांत्वन करते. मानवांना सार्वकालिक जीवन मिळावे म्हणून ज्याने आपल्या जीवनाचे बलिदान दिले आणि आता जो देवाच्या राज्याचा राजा या नात्याने शासन करत आहे त्या येशू ख्रिस्तावर विश्‍वास ठेवण्यास हे नियतकालिक लोकांना उत्तेजन देते.”

आताही कदाचित तुम्हाला, दहशतवादी हल्ल्यांच्या किंवा नैसर्गिक आपत्तींच्या बातम्या ऐकायला मिळतील किंवा तुमच्यावर कदाचित एखादे संकट कोसळेल. पण, बायबलचा अभ्यास केल्याने तुमची खात्री पटेल, की देवाने मानवजातीला वाऱ्‍यावर सोडून दिलेले नाही. उलट, “तो आपल्यापैकी कोणापासूनहि दूर नाही.” (प्रेषितांची कृत्ये १७:२७) आपल्या पहिल्या आईवडिलांनी जे गमावले ते पुन्हा मिळवून देण्याची त्याने दिलेली प्रतिज्ञा निश्‍चित्तच पूर्ण होईल!यशया ५५:११. (w१०-E ०५/०१)

[तळटीपा]

^ परि. 2 बायबलमध्ये देवाचे नाव यहोवा असे दिले आहे.

^ परि. 19 अधिक माहितीकरता, यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले, बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकाचा पाचवा अध्याय पाहा.

^ परि. 22 देवाचे राज्य काय आहे याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर, बायबल नेमके काय शिकवते? पुस्तकाचा आठवा अध्याय पाहा.

^ परि. 25 अधिक माहिती करता, बायबल नेमके काय शिकवते? पुस्तकाचा नववा अध्याय पाहा.

[७ पानांवरील तक्‍ता/ चित्रे]

(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)

“खऱ्‍या गोष्टीचे प्रतिरूप” निवासमंडपाचे प्रतिरूप

वेदी

येशूचे अर्पण स्वीकारायची देवाची तयारी.—इब्री लोकांस १३:१०-१२.

प्रमुख याजक

येशू.—इब्री लोकांस ९:११.

प्रायश्‍चित्ताच्या दिवशी, प्रमुख याजक सर्व लोकांच्या पापांसाठी बलिदान अर्पण करायचा.—लेवीय १६:१५, २९-३१.

सा.यु. ३३ च्या निसान १४ रोजी, येशूने त्याचे जीवन आपल्यासाठी अर्पण केले.—इब्री लोकांस १०:५-१०; १ योहान २:१, २.

पवित्र

पृथ्वीवर असताना, देवाचा आत्मिक पुत्र म्हणून येशूचा पुन्हा जन्म झाला.—मत्तय ३:१६, १७; रोमकर ८:१४-१७; इब्री लोकांस ५:४-६.

पडदा

येशूचे हाडामांसाचे शरीर हे अंतरपटासारखे होते; जे पृथ्वीवरील जीवन व स्वर्गातील जीवन वेगळे करते.—१ करिंथकर १५:४४, ५०; इब्री लोकांस ६:१९, २०; १०:१९, २०.

परमपवित्र आणि पवित्र यांना वेगळे करणारा अंतरपट पार करून प्रमुख याजक दुसऱ्‍या बाजूला जात असे.

येशूला पुन्हा जिवंत केल्यानंतर, त्याने “आपल्यासाठी देवासमोर उभे राहण्यास” प्रत्यक्ष स्वर्गात जाण्याद्वारे ‘अंतरपट पार केले व तो दुसऱ्‍या बाजूला’ गेला.—इब्री लोकांस ९:२४-२८.

परमपवित्र

स्वर्ग.—इब्री लोकांस ९:२४.

परमपवित्र स्थानात असताना, प्रमुख याजक अर्पण केलेल्या प्राण्याचे काही रक्‍त कराराच्या कोशापुढे शिंपडायचा.—लेवीय १६:१२-१४.

अर्पण केलेले स्वतःचे रक्‍त देवापुढे सादर करून येशूने मानवांना पापांपासून खरी मुक्‍ती दिली.—इब्री लोकांस ९:१२, २४; १ पेत्र ३:२१, २२.