व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पुरुषांनो, तुम्ही ख्रिस्ताच्या मस्तकपदाच्या अधीन राहता का?

पुरुषांनो, तुम्ही ख्रिस्ताच्या मस्तकपदाच्या अधीन राहता का?

पुरुषांनो, तुम्ही ख्रिस्ताच्या मस्तकपदाच्या अधीन राहता का?

“प्रत्येक पुरुषाचे मस्तक ख्रिस्त आहे.”—१ करिंथ. ११:३.

१. यहोवा सुव्यवस्थेचा देव आहे हे कशावरून दिसून येते?

 प्रकटीकरण ४:११ यात असे म्हटले आहे: “हे प्रभो, आमच्या देवा, गौरव, सन्मान व सामर्थ्य ह्‍यांचा स्वीकार करावयास तू योग्य आहेस; कारण तू सर्व काही निर्माण केले; तुझ्या इच्छेने ते झाले व अस्तित्वात आले.” यहोवा देवाने सृष्टीतील सर्व काही निर्माण केलेले असल्यामुळे, तो विश्‍वाचा सार्वभौम अधिपती आहे आणि सर्व सृष्टी त्याच्या अधिकाराखाली आहे. यहोवा देव हा “अव्यवस्था माजविणारा नाही; तर तो शांतीचा देव आहे.” ही गोष्ट, देवदूतांचा समावेश असलेल्या त्याच्या कुटुंबातील सुव्यवस्थेवरून दिसून येते.—१ करिंथ. १४:३३; यश. ६:१-३; इब्री १२:२२, २३.

२, ३. (क) यहोवाने सर्वप्रथम कोणाला निर्माण केले? (ख) पित्याच्या तुलनेत त्याच्या ज्येष्ठ पुत्राचे अधिकारपद काय आहे?

इतर कोणतीही गोष्ट निर्माण करण्याआधी यहोवा एकटाच अगणित युगांपासून अस्तित्वात होता. त्याने सर्वप्रथम एका आत्मिक प्राण्याची निर्मिती केली. त्या आत्मिक प्राण्याला “शब्द” म्हणण्यात आले कारण तो यहोवाचा प्रवक्‍ता होता. सृष्टीतील इतर सर्व गोष्टी या शब्दाद्वारेच अस्तित्वात आल्या. नंतर, तो एक परिपूर्ण मानव या नात्याने पृथ्वीवर आला आणि त्याला येशू ख्रिस्त म्हणून ओळखण्यात आले.योहान १:१-३, १४ वाचा.

देवाचे अधिकारपद व त्याच्या तुलनेत त्याच्या ज्येष्ठ पुत्राचे अधिकारपद याबद्दल बायबलमध्ये काय सांगण्यात आले आहे? देवाच्या प्रेरणेने लिहिताना प्रेषित पौल आपल्याला असे सांगतो: “प्रत्येक पुरुषाचे मस्तक ख्रिस्त आहे; स्त्रीचे मस्तक पुरुष आहे, आणि ख्रिस्ताचे मस्तक देव आहे, हे तुम्हाला समजावे अशी माझी इच्छा आहे.” (१ करिंथ. ११:३) ख्रिस्त हा आपल्या पित्याच्या मस्तकपदाच्या अधीन आहे. बुद्धिमान प्राण्यांमध्ये शांती व सुव्यवस्था राखण्यासाठी मस्तकपद व त्या मस्तकपदाच्या अधीन राहणे जरुरीचे आहे. ‘ज्याच्याद्वारे सर्व काही निर्माण झाले आहे’ त्याने देखील देवाच्या मस्तकपदाच्या अधीन राहिले पाहिजे अशी अपेक्षा त्याच्याकडून केली जाते.—कलस्सै. १:१६.

४, ५. यहोवाच्या अधिकारपदाच्या तुलनेत येशूला आपल्या भूमिकेबद्दल कसे वाटले?

यहोवाच्या मस्तकपदाच्या अधीन राहण्याबद्दल आणि पृथ्वीवर येण्याबद्दल येशूला कसे वाटले? बायबल सांगते: “देवाच्या स्वरूपाचा असूनहि देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे [ख्रिस्त येशूने] मानले नाही, तर त्याने स्वतःला रिक्‍त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले; आणि मनुष्यप्रकृतीचे असे प्रगट होऊन त्याने मरण, आणि तेहि वधस्तंभावरचे मरण सोसले; येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले.”—फिलिप्पै. २:५-८.

येशू नेहमी नम्रपणे आपल्या पित्याच्या इच्छेच्या अधीन राहिला. त्याने म्हटले: “मला स्वतः होऊन काही करिता येत नाही; . . . माझा निवाडा यथार्थ आहे; कारण मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे तर ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावयाला पाहतो.” (योहा. ५:३०) त्याने असेही म्हटले: “जे [माझ्या पित्याला] आवडते ते मी सर्वदा करितो.” (योहा. ८:२९) पृथ्वीवरील आपल्या जीवनाच्या शेवटल्या दिवसांत, येशूने पित्याला केलेल्या प्रार्थनेत असे म्हटले: “जे काम तू मला करावयास दिले ते पुरे करून मी पृथ्वीवर तुझे गौरव केले आहे.” (योहा. १७:४) यावरून हे स्पष्ट होते की येशूला देवाचे मस्तकपद मान्य करणे व त्या मस्तकपदाच्या अधीन राहणे कठीण वाटले नाही.

पित्याच्या अधीन राहिल्यामुळे पुत्राला आशीर्वाद लाभतात

६. येशूने कोणते उत्कृष्ट गुण प्रदर्शित केले?

पृथ्वीवर असताना, येशूने अनेक उत्कृष्ट गुण प्रदर्शित केले. त्यांपैकी एक म्हणजे त्याने आपल्या पित्याबद्दल दाखवलेले गाढ प्रेम. त्याने म्हटले: “मी पित्यावर प्रीति करितो.” (योहा. १४:३१) त्याने लोकांबद्दलही अपार प्रेम दाखवले. (मत्तय २२:३५-४० वाचा.) येशू दयाळू व विचारशील होता; कठोर किंवा जुलमी नव्हता. त्याने म्हटले: “अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जू आपणावर घ्या व माझ्यापासून शिका म्हणजे तुमच्या जिवास विसावा मिळेल; कारण माझे जू सोयीचे व माझे ओझे हलके आहे.” (मत्त. ११:२८-३०) सर्व वयोगटांतील मेढरांसमान लोकांना, खासकरून समाजातील तळागाळातील लोकांना त्याच्या प्रेमळ व्यक्‍तिमत्वातून व त्याच्या दिलासादायक संदेशातून सांत्वन मिळाले.

७, ८. मोशेच्या नियमशास्त्रानुसार, रक्‍तस्रावाने पीडित असलेल्या स्त्रीवर कोणते प्रतिबंध होते, पण येशू तिच्याशी कशा प्रकारे वागला?

येशू स्त्रियांशी कशा प्रकारे वागला याकडे लक्ष द्या. संपूर्ण इतिहास पाहिल्यास अनेक पुरुषांनी स्त्रियांना अतिशय वाईट वागणूक दिल्याचे आपल्याला दिसून येते. प्राचीन इस्राएलातील धर्मगुरू देखील स्त्रियांना अपमानास्पद वागणूक द्यायचे. पण, येशू मात्र स्त्रियांशी आदराने वागला. बारा वर्षांपासून रक्‍तस्रावाने पीडित असलेल्या एका स्त्रीशी तो ज्या प्रकारे वागला त्यावरून हे दिसून येते. या रोगातून बरे होण्यासाठी त्या स्त्रीने बऱ्‍याच वैद्यांच्या हातून ‘पुष्कळ हाल सोसले’ होते आणि आपल्याजवळ होते नव्हते ते सर्व खर्चून टाकले होते. हे सर्व करूनही, “तिचा रोग बळावला होता.” मोशेच्या नियमशास्त्रानुसार, अशा स्त्रीला अशुद्ध समजले जायचे. तिला स्पर्श करणाऱ्‍यांना देखील अशुद्ध समजले जायचे.—लेवी. १५:१९, २५.

येशू रोग्यांना बरे करत आहे हे ऐकून ती स्त्री देखील जमावात शिरली. तिने आपल्या मनात म्हटले: “केवळ ह्‍याच्या वस्त्रांना शिवले तरी मी बरी होईन.” तिने येशूला स्पर्श केला आणि ती लगेच बरी झाली. तिने आपल्या वस्त्रांना स्पर्श करणे योग्य नाही हे येशूला माहीत होते. तरीसुद्धा, त्याने तिला दटावले नाही. उलट, तो तिच्याशी दयाळूपणे वागला. इतकी वर्षे तिला किती त्रास सहन करावा लागला असेल हे त्याने समजून घेतले आणि तिला मदतीची नितांत गरज आहे हे ओळखले. येशूने कनवाळूपणे तिला म्हटले: “मुली, तुझ्या विश्‍वासाने तुला बरे केले आहे; शांतीने जा आणि तुझ्या पीडेपासून मुक्‍त हो.”—मार्क ५:२५-३४.

९. येशूच्या शिष्यांनी लहान मुलांना त्याच्याकडे येण्यास मनाई करण्याचा प्रयत्न केला तेव्हा येशूची प्रतिक्रिया काय होती?

येशूच्या सहवासात असणे लहान मुलांना देखील आवडायचे. एकदा, लोक आपल्या मुलांना त्याच्याकडे घेऊन आले, तेव्हा येशूला लहान मुलांमुळे त्रास होऊ नये असा विचार करून शिष्य लोकांना रागावले. पण, येशूने तसा विचार केला नाही. बायबलमधील अहवाल आपल्याला असे सांगतो: “ते पाहून येशूला फार वाईट वाटले; आणि तो [शिष्यांना] म्हणाला, ‘बाळकांस माझ्याजवळ येऊ द्या; त्यांना मनाई करू नका, कारण देवाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे.’” नंतर, “त्याने [मुलांना] कवटाळून व त्यांच्यावर हात ठेवून त्यांना आशीर्वाद दिला.” येशूला मुलांचा सहवास त्रासदायक वाटला नाही; उलट, त्याने त्यांचे स्वागतच केले.—मार्क १०:१३-१६.

१०. येशूने प्रदर्शित केलेले गुण त्याच्यात कोठून आले?

१० पृथ्वीवर असताना येशूने प्रदर्शित केलेले गुण त्याच्यात कोठून आले? मानव म्हणून पृथ्वीवर येण्याआधी, त्याने अनेक युगे आपल्या स्वर्गीय पित्याला जवळून पाहिले व त्याचे मार्ग आत्मसात केले. (नीतिसूत्रे ८:२२, २३, ३० वाचा.) यहोवा आपल्या सबंध सृष्टीच्या बाबतीत मस्तकपदाचा वापर किती प्रेमळपणे करतो हे त्याने स्वर्गात असताना पाहिले होते आणि त्यामुळे तो स्वतः देखील आपल्या मस्तकपदाचा वापर प्रेमळपणे करण्यास शिकला. येशू देवाच्या मस्तकपदाच्या अधीन नसता, तर त्याला हे जमले असते का? त्याला पित्याच्या अधीन राहणे आनंददायक वाटले, आणि यहोवा देखील आपल्या अधीन राहणाऱ्‍या पुत्रावर संतुष्ट होता. पृथ्वीवर असताना, येशूने आपल्या स्वर्गीय पित्याचे अद्‌भुत गुण तंतोतंत प्रतिबिंबित केले. देवाने आपल्या स्वर्गीय राज्याचा राजा म्हणून ज्याला नियुक्‍त केले त्या ख्रिस्ताच्या अधीन राहणे आपल्याकरता किती मोठा सुहक्क आहे!

ख्रिस्ताच्या गुणांचे अनुकरण करा

११. (क) कोणाचे अनुकरण करण्याचा आपण प्रयास केला पाहिजे? (ख) खासकरून मंडळीतील पुरुषांनी ख्रिस्ताचे अनुकरण करण्याचा प्रयत्न का केला पाहिजे?

११ ख्रिस्ती मंडळीतील सर्वांनीच आणि खासकरून पुरुषांनी, ख्रिस्ताच्या गुणांचे अनुकरण करण्याचा निरंतर प्रयास केला पाहिजे. आपण याआधी पाहिल्याप्रमाणे, बायबलमध्ये असे म्हटले आहे: “प्रत्येक पुरुषाचे मस्तक ख्रिस्त आहे.” ख्रिस्ताने जसे आपल्या मस्तकाचे म्हणजे खऱ्‍या देवाचे अनुकरण केले, तसेच ख्रिस्ती पुरुषांनी आपल्या मस्तकाचे म्हणजे ख्रिस्ताचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ख्रिस्ती बनल्यावर, प्रेषित पौलाने नेमके हेच केले. त्याने सहख्रिस्ती बांधवांना असे प्रोत्साहन दिले: “जसा मी ख्रिस्ताचे अनुकरण करणारा आहे, तसे तुम्हीहि माझे अनुकरण करणारे व्हा.” (१ करिंथ. ११:१) आणि प्रेषित पेत्राने असे म्हटले: “ह्‍याचकरिता तुम्हास पाचारण करण्यात आले आहे; कारण ख्रिस्तानेहि तुम्हासाठी दुःख भोगले आणि तेणेकरून तुम्ही त्याच्या पावलांवर पाऊल ठेवून चालावे म्हणून त्याने तुम्हाकरिता कित्ता घालून दिला आहे.” (१ पेत्र २:२१) ख्रिस्ताचे अनुकरण करण्याचा सल्ला खासकरून पुरुषांकरता उपयुक्‍त असण्याचे आणखी एक कारण आहे. आणि ते म्हणजे मंडळीत वडील आणि सेवा सेवक म्हणून त्यांनाच नियुक्‍त करण्यात येते. म्हणूनच, येशूने ज्या प्रकारे यहोवाचे अनुकरण करण्यात आनंद मानला, त्याच प्रकारे ख्रिस्ती पुरुषांनीही ख्रिस्ताचे व त्याच्या गुणांचे अनुकरण करण्यात आनंद मानला पाहिजे.

१२, १३. आपल्या देखरेखीखाली असलेल्या मेढरांशी वडिलांनी कसे वागले पाहिजे?

१२ ख्रिस्ती मंडळीतील वडिलांनी ख्रिस्तासारखे बनण्यास शिकले पाहिजे. असे करण्यास ते बाध्य आहेत. पेत्राने वडिलांना असा सल्ला दिला: “तुम्हामधील देवाच्या कळपाचे पालन करा; करावे लागते म्हणून नव्हे, तर देवाच्या इच्छेप्रमाणे संतोषाने त्याची देखरेख करा; द्रव्यलोभाने नव्हे तर उत्सुकतेने करा; तुमच्या हाती सोपविलेल्या लोकांवर धनीपण करणारे असे नव्हे, तर कळपाला कित्ते व्हा.” (१ पेत्र ५:१-३) ख्रिस्ती वडिलांनी हुकूम करणारे, सत्ता गाजवणारे, मनमानी करणारे किंवा कठोर असू नये. तर, त्यांनी ख्रिस्ताचे अनुकरण करण्याद्वारे त्यांच्या देखरेखीखाली असलेल्या कळपाशी प्रेमळपणे, विचारशीलतेने, नम्रतेने आणि दयाळूपणे वागले पाहिजे.

१३ मंडळीत पुढाकार घेणारे पुरुष अपरिपूर्ण असल्यामुळे, त्यांनी सतत आपल्या या मर्यादेची जाणीव बाळगली पाहिजे. (रोम. ३:२३) आणि या जाणिवेमुळे त्यांनी येशूबद्दल शिकण्यास उत्सुक असले पाहिजे व त्याच्या प्रेमाचे अनुकरण केले पाहिजे. देव आणि ख्रिस्त लोकांशी कशा प्रकारे व्यवहार करतात, यावर त्यांनी मनन केले पाहिजे आणि त्यांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पेत्र आपल्याला असा सल्ला देतो: “तुम्ही सर्व जण एकमेकांची सेवा करण्यासाठी नम्रतारूपी कमरबंद बांधा; कारण देव गर्विष्ठांना विरोध करितो, आणि लीनांवर कृपा करितो.”—१ पेत्र ५:५.

१४. वडिलांनी इतरांचा कितपत आदर केला पाहिजे?

१४ देवाच्या कळपाशी व्यवहार करताना, मंडळीतील नियुक्‍त पुरुषांनी उत्तम गुण प्रदर्शित केले पाहिजेत. रोमकर १२:१० यात असे म्हटले आहे: “बंधुप्रेमाच्या बाबतीत एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा; तुम्ही प्रत्येक जण दुसऱ्‍याला आदराने आपणापेक्षा थोर माना.” वडील व सेवा सेवक इतरांचा आदर करतात. मंडळीतील इतरांप्रमाणेच, त्यांनी ‘तट पाडण्याच्या अथवा पोकळ डौल मिरविण्याच्या बुद्धीने काहीहि करू नये, तर लीनतेने एकमेकांना आपणापेक्षा श्रेष्ठ मानावे.’ (फिलिप्पै. २:३) मंडळीत पुढाकार घेणाऱ्‍यांनी नक्कीच इतरांशी ते आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहेत असे समजून वागले पाहिजे. असे करण्याद्वारे मंडळीतील नियुक्‍त पुरुष पौलाच्या या सल्ल्याचे पालन करतात: “आपण जे सशक्‍त आहो त्या आपण आपल्याच सुखाकडे न पाहता अशक्‍तांच्या दुर्बलतेचा भार वाहिला पाहिजे. आपणापैकी प्रत्येक जणाने शेजाऱ्‍याची उन्‍नती होण्याकरिता त्याचे बरे करून त्याच्या सुखाकडे पाहावे. कारण ख्रिस्तानेहि स्वतःच्या सुखाकडे पाहिले नाही.”—रोम. १५:१-३.

“त्यांना मान द्या”

१५. पतींनी आपापल्या पत्नीशी कशा प्रकारे वागले पाहिजे?

१५ पेत्राने विवाहित पुरुषांना दिलेल्या सल्ल्याकडे आता लक्ष द्या. त्याने लिहिले: “पतींनो, तसेच तुम्हीहि आपल्या स्त्रियांबरोबर, त्या अधिक नाजूक व्यक्‍ति आहेत म्हणून सुज्ञतेने सहवास ठेवा; तुम्ही उभयता जीवनरूपी कृपादानाचे समाईक वतनदार आहा, म्हणून तुम्ही त्यांना मान द्या.” (१ पेत्र ३:७) एखाद्या व्यक्‍तीला मान देणे म्हणजे तिची कदर करणे. तुम्हाला त्या व्यक्‍तीची कदर असल्यास, तुम्ही तिची मते, गरजा आणि आवडीनिवडी विचारात घ्याल आणि तिची एखादी मागणी अमान्य करण्याचे कोणतेही रास्त कारण नसल्यास, ती मान्य कराल. एका पतीने आपल्या पत्नीशी अशाच प्रकारे वागले पाहिजे.

१६. आपल्या पत्नीला मान देण्याविषयी देवाच्या वचनात पतींना कोणती ताकीद देण्यात आली आहे?

१६ पतीने आपल्या पत्नीला मान द्यावा असे सांगताना, पेत्र एक ताकीदही देतो: “म्हणजे तुमच्या प्रार्थनांत व्यत्यय येणार नाही.” (१ पेत्र ३:७) पती आपल्या पत्नीला कशा प्रकारची वागणूक देतो याची यहोवा किती गांभीर्याने दखल घेतो हे यावरून स्पष्टपणे दिसून येते. होय, पतीने आपल्या पत्नीचा आदर न केल्यास त्याच्या प्रार्थनांमध्ये व्यत्यय येऊ शकतो. शिवाय, पती आपल्या पत्नीशी आदराने वागतो, तेव्हा सहसा पत्नीला त्याच्या अधीन राहणे सोपे जात नाही का?

१७. पतीने आपल्या पत्नीवर कितपत प्रेम केले पाहिजे?

१७ पत्नीवर प्रेम करण्याविषयी देवाचे वचन असा सल्ला देते: “पतींनी आपआपली पत्नी आपलेच शरीर आहे असे समजून तिच्यावर प्रीति करावी. . . . कोणी कधी आपल्या देहाचा द्वेष केलेला नाही, तर तो त्याचे पालनपोषण करितो, जसे ख्रिस्तहि मंडळीचे पालनपोषण करितो तसे तो करितो. . . . प्रत्येकाने जशी स्वत:वर तशी आपल्या पत्नीवर प्रीती करावी.” (इफिस. ५:२८, २९, ३३) तर मग, पतींनी आपल्या पत्नींवर कितपत प्रेम केले पाहिजे? पौलाने लिहिले: “पतींनो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीति केली तशी तुम्हीहि आपआपल्या पत्नीवर प्रीति करा, ख्रिस्ताने मंडळीवर प्रीति केली आणि स्वत:स तिच्यासाठी समर्पण केले.” (इफिस. ५:२५) होय, ज्याप्रमाणे येशूने इतरांसाठी आपले जीवन अर्पण केले, त्याचप्रमाणे पतीने देखील आपल्या पत्नीसाठी जीवही द्यायला तयार असले पाहिजे. एक ख्रिस्ती पती जेव्हा आपल्या पत्नीशी कोमलतेने, विचारशीलतेने, आणि नि:स्वार्थपणे व्यवहार करतो तेव्हा पत्नीला त्याच्या मस्तकपदाच्या अधीन राहणे सोपे जाते.

१८. वैवाहिक जीवनातील जबाबदाऱ्‍या पूर्ण करण्यासाठी पुरुषांना कोणती मदत उपलब्ध आहे?

१८ पतींनी आपल्या पत्नींना अशा प्रकारे मान द्यावा ही अपेक्षा करणे अवाजवी आहे का? नाही. कारण, हे त्यांच्या क्षमतेपलीकडे असते, तर यहोवाने त्यांच्याकडून अशी अपेक्षाच केली नसती. शिवाय, यहोवाच्या उपासकांना विश्‍वातील सर्वात सामर्थ्यशाली शक्‍तीची म्हणजेच देवाच्या पवित्र आत्म्याची मदत उपलब्ध आहे. येशूने म्हटले: “तुम्ही वाईट असताहि तुम्हाला आपल्या मुलांना चांगल्या देणग्या द्यावयाचे कळते, तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यास तो किती विशेषेकरून पवित्र आत्मा देईल!” (लूक ११:१३) तेव्हा, इतरांसोबत व आपल्या पत्नीसोबत योग्य प्रकारे व्यवहार करता यावा म्हणून पतीने पवित्र आत्म्याच्या मदतीसाठी यहोवाला प्रार्थना केली पाहिजे.प्रेषितांची कृत्ये ५:३२ वाचा.

१९. पुढच्या लेखात कशाबद्दल चर्चा करण्यात येईल?

१९ होय, ख्रिस्ताच्या अधीन राहण्यास शिकण्याची व त्याच्या मस्तकपदाचे अनुकरण करण्याची पुरुषांवर मोठी जबाबदारी आहे. पण, स्त्रियांबद्दल आणि खासकरून विवाहित स्त्रियांबद्दल काय म्हणता येईल? यहोवाच्या व्यवस्थेतील आपल्या भूमिकेबद्दल त्यांनी कोणता दृष्टिकोन बाळगला पाहिजे याबद्दल पुढच्या लेखात चर्चा करण्यात येईल.

तुम्हाला आठवते का?

• येशूच्या कोणत्या गुणांचे आपण अनुकरण केले पाहिजे?

• वडिलांनी मेंढरांशी कशा प्रकारे व्यवहार केला पाहिजे?

• पतीने आपल्या पत्नीशी कशा प्रकारे वागले पाहिजे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१० पानांवरील चित्रे]

इतरांना मान देण्याद्वारे येशूचे अनुकरण करा