व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आजारी मित्राला कशी मदत कराल?

आजारी मित्राला कशी मदत कराल?

आजारी मित्राला कशी मदत कराल?

खूप आजारी असलेल्या तुमच्या एखाद्या मित्राला तुम्ही भेटायला जाता पण तिथे गेल्यावर काय बोलायचे हेच तुम्हाला सुचत नाही, असे कधी तुमच्या बाबतीत झाले आहे का? जर होय, तर निराश होऊ नका. तुम्ही या परिस्थितीवर मात करू शकता. ती कशी? याबाबतीत खरे तर असे काही नियम वगैरे नाहीत. आणि संस्कृती-संस्कृतीत फरक असू शकतो. लोकांच्या व्यक्‍तिमत्त्वातही फरक असू शकतो. त्यामुळे, एखाद्या आजारी व्यक्‍तीला एक गोष्ट बरी वाटेल, पण तीच गोष्ट कदाचित दुसऱ्‍या आजारी व्यक्‍तीला तितकीशी आवडणार नाही. शिवाय, आजारी व्यक्‍तीची परिस्थिती, तिच्या भावना यांत, दररोज काही न्‌ काही फरक असू शकेल.

यास्तव, तुम्ही स्वतःला आजारी व्यक्‍तीच्या ठिकाणी ठेवून, तिला किंवा त्याला तुमच्याकडून नेमकी कोणत्या प्रकारची मदत हवी आहे हे पाहणे महत्त्वाचे आहे. हे तुम्ही कसे करू शकाल? पुढे काही गोष्टी सुचवल्या आहेत ज्या बायबलच्या तत्त्वांवर आधारित आहेत.

लक्ष देऊन ऐका

बायबलची तत्त्वे:

“प्रत्येक माणूस ऐकावयास तत्पर, बोलावयास धीमा, रागास मंद असावा.”याकोब १:१९.

“मौन धरण्याचा समय व बोलण्याचा समय असतो.”उपदेशक ३:१, ७.

◼ खूप आजारी असलेल्या एखाद्या मित्राला तुम्ही भेटायला जाता तेव्हा त्याचे बोलणे लक्ष देऊन ऐका व खऱ्‍या मनाने त्याला सहानुभूती दाखवा. लगेच त्याला सल्ला द्यायला सुरू करू नका किंवा असे वाटून घेऊ नका, की तुम्ही त्याला काही न काही उपाय सांगितलाच पाहिजे. या गडबडीत तुम्ही अजाणतेत काहीतरी असे बोलून जाल ज्यामुळे तुमच्या मित्राच्या भावना दुखावल्या जातील. तुमच्या आजारी मित्राला उपाय नकोत; तर त्याला कोणीतरी असा हवा असतो जो त्याचे बोलणे मनमोकळेपणाने व लक्षपूर्वक ऐकेल.

त्याला त्याच्या मनातील भावना मुक्‍तपणे बोलून दाखवू द्या. मधेमधे बोलून त्याची परिस्थिती क्षुल्लक लेखू नका. अनिकेत * म्हणतो: “मला बुरशीजन्य मेंदूचा विकार झाला होता आणि त्यामुळे माझी दृष्टी गेली. कधीकधी मी खूप हताश होतो आणि माझे मित्र मला असं बोलून सांत्वन देतात की ‘या जगात काय फक्‍त तुलाच समस्या आहेत? असे कितीतरी लोक आहेत ज्यांची परिस्थिती तुझ्याहूनही बेकार आहे.’ पण माझ्या या मित्रांना एक कळत नाही, की माझी परिस्थिती क्षुल्लक लेखल्याने मला काहीच फायदा होत नाही. उलट, त्याचा माझ्यावर विपरीत परिणाम होतो. मी आणखी निराश होतो.”

तुमच्या मित्राला ही खात्री असली पाहिजे, की त्याने त्याच्या भावना बोलून दाखवल्यावर आपण त्याची टीका करणार नाही. त्याने जर म्हटले, की त्याला भीती वाटते, तर भ्यायचे काही कारण नाही, असे त्याला सांगण्याऐवजी, अशी भीती वाटणे साहजिक आहे, हे मान्य करा. अपूर्वाला कॅन्सर झाला आहे. ती म्हणते: “तब्येतीचं टेन्शन घेऊन जेव्हा मी रडू लागते तेव्हा त्याचा अर्थ असा होत नाही, की देवावरचा माझा भरवसा उडाला आहे.” तुमचा मित्र जसा आहे तसा त्याला स्वीकारायचा प्रयत्न करा, तुम्हाला जसा हवा आहे तसा त्याला बनवायचा प्रयत्न करू नका. त्याचे मन जरा हळवे झाले असेल. त्यामुळे तुम्ही त्याला काहीही सांगितले तर त्याला कदाचित लगेच वाईट वाटू शकेल, तो पहिल्यासारखा वागत नाहीए, या सर्व गोष्टी विचारात घ्या. सहनशील असा. तो एकच गोष्ट सारखी-सारखी सांगत असला तरीपण ती ऐकून घ्या. (१ राजे १९:९, १०, १३, १४) त्याला नेमके काय होत आहे हे त्याने तुम्हाला सांगितलेच पाहिजे, असे कदाचित त्याला वाटत असेल.

दुसऱ्‍याचे दुःख समजून घ्या व विचारी असा

बायबलची तत्त्वे:

“आनंद करणाऱ्‍यांबरोबर आनंद करा आणि शोक करणाऱ्‍यांबरोबर शोक करा.”रोमकर १२:१५.

“लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्ही त्यांच्याशी वागा.”मत्तय ७:१२.

◼ स्वतःला आपल्या मित्राच्या जागी ठेवा. त्याचे जर ऑपरेशन होणार असेल, तो एखादा उपचार घेत असेल किंवा टेस्टचा रिपोर्ट त्याला मिळणार असेल तर तो निश्‍चित्तच टेन्शनमध्ये असेल आणि जरा हळवा झाला असेल. हे तुम्हाला ताडता आले पाहिजे. आणि मग त्या कलेने तुम्ही त्याच्याशी बोलू शकता. त्याच्यावर प्रश्‍नांची विशेषकरून खासगी प्रश्‍नांची सरबत्ती करण्याची ही वेळ नाही.

ॲना कॅटालिफोज या वैद्यकीय मानसोपचारतज्ज्ञ म्हणतात: “रुग्णांना जेव्हा जेव्हा त्यांच्या आजारपणाविषयी बोलावेसे वाटते तेव्हा तेव्हा त्यांना बोलू द्या. त्यांना तुमच्याबरोबर ज्या विषयावर गप्पा मारायच्या असतात त्या विषयावर तुम्हीही त्यांच्याशी गप्पा मारा. पण त्यांना जेव्हा बोलायची इच्छा नसते तेव्हा तुम्ही शांत बसून राहा. आणि अशा वेळी फक्‍त त्यांचा हात आपल्या हातात घ्या आणि बघा किती उत्तम फरक पडतो तो. तुम्हाला जाणवेल, की त्यांना रडायाचे असते तेव्हा फक्‍त कोणीतरी त्यांना शेजारी हवं असतं.”

आपल्या मित्राच्या जीवनात ढवळाढवळ करू नका. रोझान कलिक नावाची एक लेखिका जिला दोनदा कॅन्सर झाला होता, ती असे लिहिते: “आजारी असलेल्या तुमच्या मित्राने तुम्हाला जे काही सांगितले असेल तर ते गोपनीय आहे, असे समजा. जोपर्यंत तुम्हाला तुमच्या मित्राच्या कुटुंबाच्या वतीने बोलण्यास सांगितले जात नाही तोपर्यंत तुम्हाला समजलेली माहिती तुमच्याजवळच ठेवा. इतरांना कोणती माहिती सांगितली पाहिजे, हे रुग्णालाच विचारा.” अनिल यांना कॅन्सर झाला होता; पण आता ते बरे आहेत. ते म्हणतात: “माझ्या एका मित्रानं सगळीकडं बोभाटा केला, की मला कॅन्सर झाला आहे आणि मी जास्त दिवस जगणार नाहीए. तेव्हा माझं नुकतंच ऑपरेशन झालं होतं. मला कॅन्सर आहे हे माहीत होतं पण मी बायोपसीच्या रिपोर्ट्‌ससाठी थांबलो होतो. कॅन्सर पसरवणाऱ्‍या गाठी सापडल्या नव्हत्या. पण बोभाटा केल्याने व्हायची ती हानी झाली होती. लोकांच्या अविचारी बोलण्यामुळे व प्रश्‍नांमुळे माझी बायको उद्‌ध्वस्त झाली.”

कोणते उपचार घ्यायचे या विचारात तुमचा मित्र असेल तर, तुम्ही जर त्याच्या जागी असता तर कोणता उपचार घेतला असता, हे पटकन्‌ बोलून मोकळे होऊ नका. लोरी होप नावाच्या आणखी एका लेखिकेला कॅन्सर झाला होता, ती असे म्हणते: “एखाद्या कॅन्सर रुग्णाला किंवा ज्यांचा कॅन्सर बरा झाला आहे अशा व्यक्‍तीला कोणतेही लेख किंवा छापून आलेल्या बातम्या पाठवण्याआधी, त्यांना विचारा, की त्यांना ते लेख वाचायला आवडतील का. नाहीतर, तुम्ही द्याल चांगल्या हेतूने पण तुमच्या मित्राला ते आवडणार नाहीत व तो कदाचित तसे बोलूनही दाखवणार नाही.” आणि सगळ्यांनाच, विविध वैद्यकीय उपचारांबद्दलची भरमसाठ माहिती वाचायला आवडतेच असे नाही.

आजारी व्यक्‍ती तुमचा जवळचा मित्र असला तरी, तुम्ही त्याला भेटायला जाता तेव्हा जास्त वेळ तेथे थांबू नका. तुमच्या मित्राला कदाचित, तुम्ही त्याला भेटायला आलात म्हणून आनंद वाटेल, पण त्याला तुमच्याबरोबर जास्त वेळ घालवण्याची इच्छा नसेल. त्याला कदाचित थकवा जाणवत असेल व त्यामुळे तुमच्याबरोबर जास्त वेळ तो बोलू शकणार नाही किंवा तुमच्या गोष्टी ऐकत बसू शकणार नाही. शिवाय, तुम्ही त्याला भेटायला जाता तेव्हा, तुम्ही फार घाईत आहात आणि तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत निघाले पाहिजे, असे वागू नका. तुम्हाला तुमच्या मित्राची खरोखरच काळजी आहे हे त्याला जाणवले पाहिजे.

विचारी असण्यामध्ये, संतुलन राखणे व समंजसपणा दाखवणे समाविष्ट आहे. जसे की, तुमच्या मित्रासाठी तुम्ही जर जेवण बनवणार असाल तर तुम्ही, त्याला काय खायला आवडेल, किंवा त्याला पथ्य वगैरे काही आहे का, असे विचारू शकता. आणि तुम्हाला जर बरे वाटत नसेल, कदाचित तुम्हाला सर्दी झाली असेल तर तुमची सर्दी बरी होईपर्यंत तुम्ही त्याला भेटायला न जाणे उचित ठरेल.

प्रोत्साहनदायक बोला

बायबलची तत्त्वे:

“सुज्ञांची जिव्हा आरोग्यदायी आहे.”नीतिसूत्रे १२:१८.

“तुमचे बोलणे सर्वदा कृपायुक्‍त, मिठाने रुचकर केल्यासारखे असावे.”कलस्सैकर ४:६.

◼ तुमच्या आजारी मित्राबद्दल तुम्ही सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर तुमचे बोलणे व तुमची कार्येही सकारात्मक असतील. तुम्ही सुरुवातीला ज्या गुणांमुळे या मित्राकडे आकर्षित झाला होता तेच गुण तुमच्या मित्रामध्ये आजही आहेत, तो तोच मित्र आहे हा विचार करा. फरक इतकाच आहे, की आता तो आजारी पडला आहे; पण यामुळे तुमची मैत्री कमी झाली पाहिजे, असे नाही. म्हणून एका असहाय व्यक्‍तीप्रमाणे जर तुम्ही तुमच्या मित्राशी बोलू लागला तर तोही स्वतःला असहायच समजू लागेल. ऋतुजाला जन्मापासूनच हाडांचा एक दुर्मिळ आजार झाला आहे. ती म्हणते: “मला एका सर्वसामान्य माणसाप्रमाणे वागवा. मी जरी अपंग असले तरी, माझीसुद्धा काही मते आहेत, इच्छा आहेत. माझ्याकडे तुम्ही दयेने बघू नका. मी बावळट आहे, असे समजून माझ्याशी बोलू नका.”

तुम्ही जे काही बोलता फक्‍त तेच नव्हे तर ज्या प्रकारे बोलता त्यानेही फरक पडतो, ही गोष्ट लक्षात ठेवा. बोलताना तुमचा आवाज कसा आहे हेही महत्त्वाचे आहे. अमित यांना कॅन्सर असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यावर तेव्हा परदेशात राहणाऱ्‍या त्यांच्या एका मित्राने लगेचच त्यांना फोन करून म्हटले: “तुला कॅन्सर झाला आहे, यावर मला विश्‍वासचं बसत नाहीए!” यावर अमित म्हणतो: “‘तुला कॅन्सर झाला आहे’ असं माझ्या मित्राचं बोलणं ऐकून मला धक्काच बसला आणि माझ्या पोटात गोळा आला.”

लेखिका लोरी होप आणखी एक उदाहरण देतात. “‘कशी आहे तब्येत?’ असा प्रश्‍न तुम्ही एखाद्या रुग्णाला विचारल्यास, तो त्याचे विविध अर्थ काढू शकतो. प्रश्‍न विचारणाऱ्‍याचा आवाज, त्याचे हावभाव, रुग्णाबरोबरचे त्याचे संबंध शिवाय त्या दोघांतील जवळीक आणि प्रश्‍नाची वेळ, यामुळे रुग्णाला एकतर बरे वाटू शकते, वाईट वाटू शकते किंवा त्याच्या मनात असलेली भीती जागृत होऊ शकते.”

लोकांनी आपली काळजी घ्यावी, आपल्याला समजून घ्यावे, आपला आदर करावा, असे आजारी मित्राला वाटणे साहजिक आहे. त्यामुळे, तुम्ही त्याला ही खातरी द्या, की तुमच्या नजरेत तो मोलाचा आहे आणि त्याला मदत करायला तुम्ही सदैव तयार आहात. ब्रेन-ट्यूमर झालेल्या रजनी म्हणतात: “माझे मित्रमैत्रिणी मला सांगायचे, की त्यांचं माझ्यावर प्रेम आहे आणि काहीही झालं तरी ते माझ्यामागं खंबीरपणे उभं राहतील. हे ऐकून मला खूप प्रोत्साहन मिळालं.”—नीतिसूत्रे १५:२३; २५:११.

मदत करण्यात पुढाकार घ्या

बायबलचे तत्त्व:

“आपल्या शब्दांनी किंवा जिभेने नव्हे, तर कृतीने व सत्याने आपण प्रीति करावी.”१ योहान ३:१८.

◼ तुमच्या मित्राला नेमका कोणता आजार आहे हे डॉक्टरांनी त्याला एकदा सांगितल्यानंतर तो जेव्हा उपचार घ्यायला सुरुवात करेल तेव्हा त्याला वेगळ्या गोष्टींची आवश्‍यकता भासेल. त्याला मदतीची गरज भासेल. अशा वेळी, “तुला काही हवं असेल तर मला जरूर सांग हं,” असे फक्‍त औपचारिकपणे बोलण्याऐवजी, त्याला नेमकी कोणती मदत हवी आहे ते स्पष्ट विचारा. स्वयंपाक, घराची साफसफाई, धुणी-भांडी, इस्त्री, बाहेरची कामे, बाजारहाट, त्याला दवाखान्यात किंवा हॉस्पिटलमध्ये नेणे-आणणे यांसारखी कामे करण्यास मदत करून तुम्ही दाखवू शकता, की तुम्हाला त्याची खरोखरच काळजी आहे. त्याला असे जाणवले पाहिजे, की तो तुमच्यावर भरवसा ठेवू शकतो; तसेच, वेळेच्या बाबतीतही वक्‍तशीरपणा दाखवा. तुमच्या मित्राला तुम्ही जर काही करण्याचे वचन दिले असेल तर ते पाळा.—मत्तय ५:३७.

“रुग्णासाठी काहीही केले तरी, मग ते मोठे काम असो अथवा लहान, रुग्णाला त्याचा फायदा होतो. कारण, त्याची तब्येत बरी असतानाची परिस्थिती आणि आताची परिस्थिती यांत बराच फरक असतो. तर तुमच्या या मदतीमुळे त्याला हा फरक जाणवत नाही,” असे लेखिका रोझान कलिक म्हणतात. दोनदा कॅन्सर झालेल्या शैलजाला लेखिकेचे म्हणणे पटते. त्या म्हणतात: “दरदिवशी माझे वेगवेगळे मित्र मला, रेडिएशनसाठी शहरात घेऊन जायचे तेव्हा खूप बरं आणि दिलासादायक वाटायचं! आम्ही वेगवेगळ्या विषयांवर बोलायचो आणि उपचार घेऊन घरी येत असताना एका कॉफी शॉपमध्ये कॉफी प्यायला थांबायचो. यामुळे, मी आजारी नव्हे तर चार-चौघींसारखीच आहे असं मला वाटायचं.”

पण, तुमच्या मित्राला नेमके काय हवे आहे हे तुम्हाला पक्के माहीत आहे, असा ग्रह करून घेऊ नका. कलिक याबाबतीत म्हणतात: “काहीही मदत करायच्या आधी विचारा, नव्हे विचारत राहा. मदत करण्याच्या नादात सर्व गोष्टी आपल्याच हातात घेऊ नका. याचा कधीकधी फायदा होत नाही, आणि रुग्णाला कदाचित तुमचा राग येऊ लागेल. तुम्ही जर रुग्णाला काहीही करू दिले नाही तर तुम्ही कदाचित त्याला हा संदेश द्याल, की आता तो काहीही करू शकत नाही. याऐवजी, तोही काही कामे स्वतः करू शकतो, असे त्याला जाणवू द्या. तो असहाय आहे, असे त्याला भासवू नका. त्याला जे काही करता येते, ते करायला तुम्ही फक्‍त त्याला मदत करा.”

तुमच्या मित्राला फक्‍त मानसिक आधाराची गरज असते; तो स्वतःची कामे स्वतः करू शकतो, असा भरवसा त्याला हवा असतो. आदित्यला एड्‌स आहे. तो म्हणतो: “तुम्ही आजारी असता तेव्हा लोकांनी तुम्हाला, तुम्ही आता काही कामाचे नाहीत किंवा तुम्ही काहीच करू शकत नाही असे समजून सोडून द्यावे, असे वाटत नाही. लहान-सहान कामं का होईनात, पण तुम्ही काही तरी मदत करू इच्छिता. तुम्ही अजूनही काम करू शकता, ही जाणीवच खूप आनंद देवून जाते. यामुळे जगण्याची नवी उमेद मिळते. मला असे लोक आवडतात जे मला निर्णय घेऊ देतात आणि मी घेतलेल्या निर्णयांचा आदर करतात. आजारी असल्यामुळे आपण आपली जबाबदारी म्हणजे, वडील यानात्याने, आई या नात्याने किंवा इतर कोणतीही जबाबदारी पार पाडू शकत नाही, असे नाही.”

आजारी मित्राच्या निकट राहा

बायबलचे तत्त्व:

“मित्र सर्व प्रसंगी प्रेम करितो, आणि विपत्कालासाठी तो बंधु म्हणून निर्माण झालेला असतो.”नीतिसूत्रे १७:१७.

◼ लांब असल्यामुळे किंवा इतर कारणामुळे तुम्ही तुमच्या मित्राला वारंवार भेटू शकत नसला तर फोनवर, पत्राद्वारे किंवा ई-मेलद्वारे तुम्ही त्याच्याशी गप्पा मारू शकता. काय लिहू शकता तुम्ही? शोकग्रस्त लोकांना सल्ला देणारे ॲलन डी. वुलफेल्ट असे सुचवतात: “तुम्ही व तुमच्या मित्राने एकत्र मिळून घालवलेल्या त्या मजेशीर काळाबद्दल लिहा. तुम्ही पुन्हा लिहाल . . . आणि तेही लवकरात लवकर लिहाल, असे त्याला वचन द्या आणि मग ते वचन पाळा.”

तुम्ही काही तरी चुकीचे बोलाल किंवा वाईट वाटेल अशा गोष्टी करून बसाल या भीतीने आपल्या आजारी मित्राला मदत देण्यापासून मागे हटू नका. पुष्कळदा, फक्‍त तुमच्या उपस्थितीमुळेच तुमच्या मित्राला जाणवेल, की तुम्ही त्याला मदत करायला तिथे आहात. लोरी होप आपल्या पुस्तकात असे लिहितात: “आपण सर्वच जण कधीकधी अशा गोष्टी बोलतो किंवा करतो ज्याचा चुकीचा अर्थ लावला जातो किंवा तुमच्या नकळत त्या गोष्टींमुळे इतरांना वाईट वाटते. असे झाले तरी चिंता करण्याचे काही कारण नाही. पण तुमच्या हातून चुका होतील म्हणून जर तुम्ही गरजू व्यक्‍तीपासून दूर राहाल तर मग मात्र ही चिंतेची बाब आहे.”

खूप आजारी असलेल्या एखाद्या मित्राला तुमची पहिल्यापेक्षा अधिक गरज असेल. तेव्हा, तुम्ही एक ‘जिवलग मित्र’ आहात हे दाखवून द्या. तुमच्या मदतीने त्याचे दुःखणे कदाचित नाहीसे होणार नाही तरी, तुमच्या प्रिय व्यक्‍तीला तुम्ही तिच्यावर आलेला बिकट प्रसंग सहन करायला निदान मदत तरी करू शकता. (w१०-E ०७/०१)

[तळटीप]

^ काही नावे बदलण्यात आली आहेत.