व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सर्वांसाठी एक निमंत्रण!

सर्वांसाठी एक निमंत्रण!

सर्वांसाठी एक निमंत्रण!

कशाचे निमंत्रण? यहोवाच्या साक्षीदारांच्या एखाद्या शाखा कार्यालयाला भेट देण्याचे. या कार्यालयांना बेथेल म्हणून ओळखले जाते. जगातील वेगवेगळ्या भागांत अशी ११८ कार्यालये आहेत. बेथेलला भेट देणारे अनेक जण तेथे जे काही पाहतात त्याबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्‍त करतात.

मेक्सिकोतील शाखा कार्यालयात आनंदाने यहोवाची सेवा करणाऱ्‍या मेहनती कामकऱ्‍यांना पाहून प्रभावित झालेल्या एका तरुण बायबल विद्यार्थ्याने असे विचारले: “मलाही इथं येऊन काम करायचं असेल तर मी काय केलं पाहिजे?” त्याला असे सांगण्यात आले: “सर्वात आधी तुला बाप्तिस्मा घ्यावा लागेल. नंतर, पायनियर सेवा म्हणजे पूर्ण वेळचा राज्य प्रचारक म्हणून सेवा केली तर खूपच उत्तम.” या तरुणाने या सल्ल्याचे पालन केले. आणि दोन वर्षांनंतर त्याला मेक्सिको बेथेलमध्ये सेवा करण्यासाठी बोलावण्यात आले. तेथे तो गेल्या २० वर्षांपासून सेवा करत आहे.

बेथेल काय आहे?

इब्री भाषेत, “बेथेल” म्हणजे “देवाचे घर.” (उत्प. २८:१९) जगातील विविध शाखा कार्यालयांतील सुविधांचा उपयोग बायबल आणि बायबलवर आधारित असलेल्या साहित्याची छपाई व वितरण करण्यासाठी आणि जगभरातील १,००,००० च्या वर असलेल्या यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळ्यांना आध्यात्मिक साहाय्य पुरवण्यासाठी केला जातो. बेथेलमध्ये काम करणारे जवळजवळ २०,००० स्त्री-पुरुष वेगवेगळ्या सामाजिक व सांस्कृतिक पार्श्‍वभूमीचे असून, ते सर्व निःस्वार्थ वृत्तीने यहोवाची व त्यांच्या आध्यात्मिक बंधुभगिनींची पूर्ण वेळ सेवा करतात. या ख्रिस्ती कार्यात अनेक वर्षे खर्च केलेले बंधुभगिनी उत्साही तरुणांसोबत खांद्याला खांदा लावून काम करतात. बेथेल कुटुंबाचे सदस्य संध्याकाळच्या वेळी व शनिवार-रविवारच्या दिवशी यहोवाच्या साक्षीदारांच्या जवळपासच्या मंडळ्यांमध्ये सभांसाठी व ख्रिस्ती सेवाकार्यात सहभाग घेण्यासाठी एकत्र येतात. तसेच, बायबल अभ्यास, मनोरंजन व इतर वैयक्‍तिक कामे यांसाठी ते आपल्या फावल्या वेळेचा उपयोग करतात.

बेथेल कुटुंबाच्या सदस्यांना, त्यांच्या वैयक्‍तिक खर्चासाठी दरमहा एक छोटीशी रक्कम दिली जाते. बेथेलमध्ये ते रुचकर व पौष्टिक अन्‍नाचा आस्वाद घेतात. तसेच, त्यांच्या राहण्याच्या खोल्या स्वच्छ व आरामदायी असतात. बेथेल गृहांची रचना, ऐशआरामाचे जीवन जगण्यासाठी केलेली नसते. तरीसुद्धा, ती अतिशय सोयीस्कर असतात. बेथेलला भेट देणारे लोक तेथील सुबक इमारती, नीटनेटका परिसर व सुव्यवस्थिपणे चाललेले काम पाहूनच प्रभावित होतात असे नाही. तर, बेथेलमधील प्रेमळ व सहकार्याचे वातावरण पाहून देखील ते प्रभावित होतात. सगळेच जण मेहनतीने काम करत असले, तरी ते इतरांची आवर्जून विचारपूस करतात. बेथेलमध्ये कोणताही सामाजिक भेदभाव दिसून येत नाही. तसेच, आपल्या कामामुळे आपण इतरांपेक्षा श्रेष्ठ आहोत अशी भावना देखील पाहायला मिळत नाही. तेथे केले जाणारे प्रत्येक काम महत्त्वाचे आहे; मग ते साफसफाईचे काम असो, बागकाम असो, स्वयंपाक करण्याचे काम असो, छापखाण्यातील काम असो किंवा कार्यालयातील काम असो. बेथेलमध्ये काम करणाऱ्‍यांना बेथेलाइट्‌स म्हणूनही ओळखले जाते. यहोवाच्या साक्षीदारांच्या सेवाकार्याला हातभार लावण्यासाठी ते एकमेकांसोबत मिळूनमिसळून काम करतात.—कलस्सै. ३:२३.

काही बेथेलाइट्‌सशी बोलू या!

या आंतरराष्ट्रीय कुटुंबाचे सदस्य असलेल्या काही सदस्यांचा आपण परिचय करून घेऊ या. त्यांना कशामुळे बेथेलमध्ये येऊन सेवा करण्याची प्रेरणा मिळाली? मारयोचे उदाहरण विचारात घ्या. मारयो यहोवाचा साक्षीदार बनला तेव्हा तो जर्मनीतील एका नामांकित मोटार कंपनीत खूप चांगली नोकरी करत होता. शिवाय, या कंपनीत पुढे त्याला बढती मिळण्याचीही सुसंधी होती. त्याचा बाप्तिस्मा झाल्यानंतर काही दिवसांनी त्याने आपल्या देशातील बेथेलमध्ये स्वयंसेवक म्हणून आठवडाभर काम केले. तेथे त्याला छापखान्यात मदत करण्यास नेमण्यात आले. बेथेलमधील कर्मचारी व आपल्या नोकरीच्या ठिकाणी असलेले कर्मचारी यांच्यात किती फरक आहे हे त्याच्या लक्षात आल्याशिवाय राहिले नाही. त्यामुळे, त्याने पूर्ण वेळ बेथेल सेवा करण्यासाठी अर्ज केला. त्याने घेतलेला हा निर्णय त्याच्या नातेवाइकांना व सहकर्मचाऱ्‍यांना मुळीच पटला नव्हता. पण, आज मारयो जर्मनीतील बेथेलमध्ये आनंदाने सेवा करत आहे.

बेथेलमध्ये येणारे सर्वच जण काही खास शिक्षण किंवा कौशल्य घेऊन येतात असे नाही. ही गोष्ट, गेल्या १५ वर्षांपासून मेक्सिको बेथेलमध्ये सेवा करणाऱ्‍या आबेलच्या बाबतीत खरी आहे. तो म्हणतो: “बेथेलमध्ये मला खूप काही शिकायला मिळालं. इथं मी अत्याधुनिक छपाई यंत्र चालवायला शिकलो. मला माहीत आहे, की या ज्ञानाच्या बळावर मी बेथेलच्या बाहेर भरपूर पैसा कमावला असता. पण, व्यापारी जगतातील कटकटीच्या व चढाओढीच्या कामाऐवजी, मी इथं खूप शांतिदायक व समाधानकारक जीवन जगत आहे. मला वाटतं, की इथं मला उत्कृष्ट दर्जाचं शिक्षण मिळालं आहे. यामुळे, माझ्या ज्ञानात भर पडली आणि आध्यात्मिक विकास करण्यास मला मदत मिळाली आहे. अशा प्रकारचे आध्यात्मिक फायदे मला सर्वात चांगल्या विद्यापीठातही मिळाले नसते.”

बेथेलची भेट प्रोत्साहनदायक ठरू शकते

बेथेलला फक्‍त भेट दिल्याने देखील एका व्यक्‍तीवर आध्यात्मिक रीत्या सकारात्मक प्रभाव पडू शकतो. मेक्सिकोतील ओमारच्या बाबतीत असेच घडले. त्याच्या आईने त्याला बायबलमधील सत्ये शिकवली होती. पण वयाच्या १७ व्या वर्षी, त्याने ख्रिस्ती सभांना जाण्याचे व सेवा कार्यात भाग घेण्याचे थांबवले. शेवटी, त्याला वाईट सवयी लागल्या व तो चैनबाजीचे जीवन जगू लागला. नंतर, तो एका दूरसंचार कंपनीमध्ये काम करत असताना त्या कंपनीचे प्रतिनिधी मेक्सिको बेथेलमध्ये काही यंत्रांचे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी आले. त्या वेळी ओमार देखील त्यांच्यासोबत होता. ओमार म्हणतो: “प्रात्यक्षिक दाखवून झाल्यावर आमच्या यजमानांनी आम्हाला बेथेल दाखवलं. मी तिथं जे काही पाहिलं आणि मला जी प्रेमळ वागणूक मिळाली त्यामुळे, यहोवापासून दूर जाऊन मी कशा प्रकारचं जीवन जगत आहे याबद्दल विचार करण्यास मी प्रवृत्त झालो. मी लगेच सभांना जाण्यास व बायबल अभ्यास करण्यास सुरुवात केली. बेथेलला भेट दिल्याच्या सहा महिन्यांनंतर, मी बाप्तिस्मा घेतला. बेथेलला भेट दिल्यामुळे मला जे प्रोत्साहन मिळालं त्याबद्दल मी यहोवाचा खूप खूप आभारी आहे.”

जपानमधील मासाहीकोसुद्धा साक्षीदारांच्या कुटुंबात लहानाचा मोठा झाला होता. पण, ख्रिस्ती जीवन जगणे म्हणजे बंधनात अडकल्यासारखे आहे असा तो विचार करू लागला. शालेय कार्यक्रमांत तो इतका गुरफटून गेला की त्याने सभांना जाणे व प्रचार कार्यात भाग घेणे सोडून दिले. मासाहीको आठवून सांगतो: “एकदा आमच्या घरच्यांनी व काही ख्रिस्ती मित्रांनी बेथेल पाहायला जाण्याचं ठरवलं. घरच्यांनी आग्रह केल्यामुळे मी त्यांच्यासोबत गेलो. बेथेल फिरून पाहत असताना मला कधी नव्हे इतका उत्साह वाटला. या भेटीदरम्यान इतर ख्रिश्‍चनांच्या सहवासात मला जो आनंद झाला, तसा आनंद साक्षीदार नसलेल्या मित्रांच्या सहवासात मला कधीही झाला नाही. माझ्यात ख्रिस्ती जीवन जगण्याची इच्छा निर्माण झाली आणि मी बायबल अभ्यास करण्याचं ठरवलं.” आज मासाहीको त्याच्या मंडळीत पूर्ण वेळचा सेवक या नात्याने सेवा करत आहे.

एक साक्षीदार बहीण कामानिमित्त फ्रान्सहून मॉस्कोला गेली. तेथे यहोवाच्या साक्षीदारांबरोबर तिचा संपर्क तुटला व ती आध्यात्मिक रीत्या कमजोर झाली. ती वाईट कामे करू लागली आणि शेवटी साक्षीदार नसलेल्या एका माणसाशी तिने लग्न केले. नंतर, एक साक्षीदार बहीण फ्रान्सहून तिला भेटण्यासाठी आली आणि त्या दोघींनी रशियातील सेंट पीटर्सबर्गमध्ये असलेल्या बेथेल गृहाला भेट दिली. ती लिहिते: “बेथेलमध्ये आमचं मनापासून स्वागत करण्यात आलं. ही गोष्ट मला खूप भावली. तिथलं वातावरण अतिशय शांत होतं. तिथं यहोवाचा आत्मा काम करत असल्याचं मला जाणवलं. यहोवाच्या संघटनेपासून दूर जाण्याची चूक माझ्याकडून झालीच कशी? बेथेलला भेट दिल्यानंतर, मी मदतीसाठी यहोवाला प्रार्थना केली व पुन्हा निर्धार करून मी माझ्या मुलींना बायबलमधील सत्ये शिकवण्यास सुरुवात केली.” एके काळी आध्यात्मिक रीत्या कमजोर असलेल्या या साक्षीदार बहिणीला आध्यात्मिक रीत्या साहाय्य तर मिळालेच. पण, त्यासोबतच बेथेलला भेट दिल्यामुळे ती आध्यात्मिक रीत्या खूप बळकट झाली व नंतर तिने चांगली प्रगती केली.

यहोवाच्या साक्षीदारांविषयी माहिती नसलेल्या लोकांवर बेथेलला भेट दिल्याने कोणता प्रभाव पडू शकतो? राजकारणात पूर्णपणे गुंतलेल्या आलबर्टो नावाच्या एका मनुष्याचेच उदाहरण घ्या. सन १९८८ मध्ये त्याने ब्राझीलमधील बेथेलला भेट दिली, तेव्हा तेथील स्वच्छता, सुव्यवस्था आणि खासकरून उघडपणे केले जाणारे काम पाहून तो खूपच प्रभावित झाला. बेथेलला भेट देण्याच्या काही काळाआधी, आलबर्टोने चर्चच्या एका सेमिनरीला भेट दिली होती, जेथे त्याचा मेहुणा पाळक या नात्याने सेवा करत होता. पण, बेथेल पाहिल्यावर आलबर्टोला सेमिनरीमधील व बेथेलमधील फरक लगेच जाणवला. त्याने म्हटले: “सेमिनरीमध्ये सर्व कामं गुप्तपणे केली जात होती.” बेथेलला भेट दिल्यानंतर थोड्या दिवसांनी, आलबर्टोने बायबल अभ्यास स्वीकारला, राजकारण सोडून दिले आणि आता तो एका मंडळीत वडील या नात्याने सेवा करत आहे.

बेथेल पाहण्यासाठी या!

आपल्या देशातील शाखा कार्यालयाला भेट देण्यासाठी अनेकांनी विशेष प्रयत्न केले आहेत. ब्राझीलमध्ये राहणाऱ्‍या पाउलो व ऑझेनया यांचे उदाहरण पाहा. बेथेल पाहण्यासाठी दोन दिवसांचा, ३,००० किलोमीटरचा बस प्रवास करता यावा म्हणून त्यांनी चार वर्षे पैसे वाचवले. ते म्हणतात: “आमच्या प्रयत्नांचे नक्कीच सार्थक झाले. आता यहोवाच्या संघटनेबद्दलचा आमचा दृष्टिकोन अधिक रुंदावला आहे. बेथेलमध्ये केल्या जाणाऱ्‍या कार्याबद्दल आम्ही आमच्या बायबल विद्यार्थ्यांना सांगतो, तेव्हा ते आम्हाला कधीकधी विचारतात, ‘तुम्ही कधी तिथं गेलात का?’ आता आम्ही त्यांना ‘हो’ असे म्हणू शकतो.”

तुमच्या देशात किंवा शेजारच्या एखाद्या देशात शाखा कार्यालय आणि बेथेल गृह आहे का? बेथेल पाहायला येण्याचे आम्ही तुम्हाला मनापासून आमंत्रण देत आहोत. तेथे तुमचे हार्दीक स्वागत केले जाईल याची तुम्ही खातरी बाळगू शकता. शिवाय, बेथेलला भेट दिल्यामुळे तुम्हाला आध्यात्मिक रीत्याही नक्कीच खूप फायदा होईल.

[१८ पानांवरील चित्र]

मारयो

[१८ पानांवरील चित्र]

आबेल

[१८ पानांवरील चित्र]

जर्मनी

[१८ पानांवरील चित्र]

जपान

[१८ पानांवरील चित्र]

ब्राझील