व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

निर्णय घ्यायचे स्वातंत्र्य देऊन तो आपला आदर करतो

निर्णय घ्यायचे स्वातंत्र्य देऊन तो आपला आदर करतो

देवाच्या जवळ या

निर्णय घ्यायचे स्वातंत्र्य देऊन तो आपला आदर करतो

२ राजे १८:१-७

पालकांनी आपल्या मुलांपुढे एक चांगला कित्ता घातला पाहिजे. पालकांच्या चांगल्या उदाहरणामुळे मुलांमध्ये लोभस गुण विकसित होतात व जीवनात ते योग्य निर्णय घेऊ शकतात. पण पुष्कळ पालक याबाबतीत कमी पडतात. याचा अर्थ मग, अशी मुले जीवनात कधीच यशस्वी होऊ शकत नाहीत, असा होतो का? या प्रश्‍नाचे उत्तर, निर्णय घ्यायचे स्वातंत्र्य देऊन यहोवा देव आपल्या प्रत्येकाचा आदर करतो या वस्तुस्थितीत दडले आहे. दुसरे राजे १८:१-७ वचनात हिज्कियाबद्दल सांगितले आहे. चला त्याच्याबद्दलची माहिती आपण घेऊ यात.

हिज्किया ‘यहूदाचा राजा आहाज’ याचा मुलगा होता. (वचन १) आहाजने त्याच्या राज्यातील लोकांना यहोवाच्या शुद्ध उपासनेपासून दूर नेले होते. या दुष्ट राजाने बआल उपासना चालवली होती; ज्यात नरबळी दिला जायचा. त्याने हिज्कियाला सोडून पोटच्या एक किंवा अधिक मुलांचा नरबळी दिला होता. आहाजने देवाच्या मंदिराची दारे बंद केली होती आणि “यरुशलेमेच्या कानाकोपऱ्‍यातून वेद्या बांधिल्या” होत्या. अशा प्रकारे त्याने यहोवा “परमेश्‍वर यास संतप्त केले.” (२ इतिहास २८:३, २४, २५) हिज्कियाचा बाप खरोखरच किती दुष्ट होता. पण, हिज्किया आपल्या बापाने केलेल्या चुका टाळू शकला का?

आहाजानंतर राजा बनलेल्या हिज्कियाने आपल्या कार्यांद्वारे दाखवून दिले, की तो त्याच्या बापाच्या वाईट उदाहरणानुसार मुळीच चालणार नाही. हिज्कियाने यहोवा “परमेश्‍वराच्या दृष्टीने जे ठीक” होते तेच केले. (वचन ३) हिज्कियाचा यहोवावर खूप भरवसा होता. “यहूदाच्या सर्व राजांमध्ये त्याच्या तोडीचा कोणी होऊन गेला नाही.” (वचन ५) त्याच्या कारकीर्दीच्या पहिल्याच वर्षी त्याने खऱ्‍या उपासनेची एक मोहीम हाती घेतली. या मोहिमेत त्याने, मूर्तिपूजक दैवतांप्रीत्यर्थ बांधलेली उच्च स्थाने काढून टाकली. मग त्याने यहोवाच्या मंदिराची दारे पुन्हा उघडली आणि अशा प्रकारे खऱ्‍या उपासनेस पुन्हा सुरुवात झाली. (वचन ४; २ इतिहास २९:१-३, २७-३१) “तो परमेश्‍वराला धरून राहिला; . . . यास्तव परमेश्‍वर त्याच्याबरोबर होता.”—वचन ६, ७.

कोणत्या गोष्टीमुळे हिज्किया त्याच्या बापाच्या वाईट उदाहरणानुसार चालला नाही? त्याची आई अबी—जिच्याविषयी बायबलमध्ये फार कमी माहिती दिली आहे—हिने कदाचित त्याला यहोवावर प्रेम करण्याचे धडे दिले असण्याची शक्यता आहे का? किंवा, हिज्कियाचा जन्म व्हायच्या आधीच भविष्यवाणी करण्याचे काम सुरू करणाऱ्‍या यशयाची, हिज्कियाच्या बाल मनावर चांगली छाप पडली असावी का? * बायबल याबद्दल काही सांगत नाही. तरीपण एक गोष्ट मात्र स्पष्ट होती; ती ही, की हिज्कियाने त्याच्या बापाच्या वाईट उदाहरणाचे अनुकरण केले नाही.

पालकांच्या वाईट वागणुकीमुळे ज्यांचे दुःखद बालपण गेले अशा मुलांसाठी हिज्कियाचे उदाहरण प्रोत्साहनदायक आहे. झालेल्या गोष्टींना आपण बदलवू शकत नाही; आपल्याला आलेल्या वाईट अनुभवांच्या आठवणी आपण आपल्या मनांतून खोडून काढू शकत नाही. तरीपण, या अनुभवांमुळे आपण भविष्यात अयशस्वी ठरू असा याचा अर्थ होत नाही. आपण आता अशा निवडी करू शकतो ज्यांचा भवितव्यात आपल्याला आनंद होईल. हिज्कियाप्रमाणे आपण खरा देव यहोवा याच्यावर प्रेम करण्याची, त्याची उपासना करण्याची निवड करू शकतो. या निवडीमुळे आपण आताही समाधानकारक जीवन जगू शकतो आणि देवाच्या नवीन जगात आपल्याला सदासर्वकाळ जिवंत राहण्याची आशा मिळू शकते. (२ पेत्र ३:१३; प्रकटीकरण २१:३, ४) तेव्हा, ज्याने आपल्याला निर्णय घ्यायच्या स्वातंत्र्याची बहुमूल्य देणगी देऊन आपला आदर केला आहे त्या प्रेमळ देवाचे आपण किती आभार मानले पाहिजेत! (w१०-E ०९/०१)

[तळटीप]

^ यशयाने, सा.यु.पू. ७७८ पासून कदाचित सा.यु.पू. ७३२ पर्यंत भविष्यवाणी करण्याचे काम केले. हिज्कियाने वयाच्या २५ व्या वर्षापासून, म्हणजे सा.यु.पू. ७४५ पासून राज्य करायला सुरुवात केली.