व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“तुमचा पुढारी एकच आहे, तो ख्रिस्त आहे”

“तुमचा पुढारी एकच आहे, तो ख्रिस्त आहे”

“तुमचा पुढारी एकच आहे, तो ख्रिस्त आहे”

“आपणांस पुढारी म्हणवून घेऊ नका, कारण तुमचा पुढारी एकच आहे, तो ख्रिस्त आहे.”—मत्त. २३:१०, पं.र.भा.

१. यहोवाचे साक्षीदार कोणाला आपला पुढारी मानतात आणि का?

 ख्रिस्ती धर्मजगतातील चर्चेस मानवांना आपले पुढारी मानतात. उदाहरणार्थ, रोमन कॅथलिक चर्च पोपला, ईस्टर्न ऑर्थोडॉक्स चर्च पेट्रिआर्क व मेट्रोपॉलीटन यांना आणि इतर पंथ आपल्या धर्मगुरूंना आपले पुढारी मानतात. पण, यहोवाचे साक्षीदार मात्र कोणत्याही मानवाला आपला पुढारी मानत नाहीत. ते कोणत्याही मनुष्याचे शिष्य किंवा अनुयायी नाहीत. हे यहोवाने आपल्या पुत्राबद्दल जे पूर्वभाकीत केले होते त्याच्या सामंजस्यात आहे: “पाहा, मी त्यास राष्ट्रांचा साक्षी, राष्ट्रांचा नेता व शास्ता नेमिले आहे.” (यश. ५५:४) यहोवाच्या साक्षीदारांच्या आंतरराष्ट्रीय मंडळीतील अभिषिक्‍त ख्रिस्ती व त्यांचे साथीदार असलेली “दुसरी मेंढरे,” यहोवाने त्यांच्याकरता नेमलेल्या पुढाऱ्‍याव्यतिरिक्‍त इतर कोणालाही आपला पुढारी मानत नाहीत. (योहा. १०:१६) येशूने जे म्हटले होते त्यास ते आपली संमती दर्शवतात: “तुमचा पुढारी एकच आहे, तो ख्रिस्त आहे.”—मत्त. २३:१०.

इस्राएलाचा आत्मिक अधिपती

२, ३. इस्राएल लोकांच्या काळात देवाच्या पुत्राची कोणती सक्रिय भूमिका होती?

ख्रिस्ती मंडळीची स्थापना होण्याच्या कितीतरी शतकांआधी, यहोवाने आपले लोक इस्राएल यांच्यावर एक आत्मिक पुढारी नेमला होता. इस्राएल लोकांना इजिप्तमधून बाहेर आणल्यावर यहोवाने त्यांना असे सांगितले: “पाहा, वाटेने तुला संभाळण्याकरिता आणि मी तयार केलेल्या स्थानात तुला पोचविण्याकरिता मी एक दूत तुझ्यापुढे पाठवीत आहे. त्याच्यासमोर सावधगिरीने राहा आणि त्याचे म्हणणे ऐक; त्याची अवज्ञा करू नको; कारण तो तुमचा अपराध माफ करणार नाही, कारण त्याच्या ठायी माझे नाव आहे.” (निर्ग. २३:२०, २१) या देवदूताच्या ‘ठायी [यहोवाचे] नाव आहे.’ त्याअर्थी, तो देवदूत देवाचा एकुलता एक पुत्र आहे असे आपण रास्तपणे म्हणू शकतो.

मानव म्हणून पृथ्वीवर जन्म होण्याआधी, देवाच्या पुत्राचे नाव मीखाएल होते. दानीएलाच्या पुस्तकात मीखाएलाला इस्राएलाचा म्हणजे “[दानीएलाच्या लोकांचा] अधिपति” असे म्हटले आहे. (दानी. १०:२१) दानीएलाच्या कितीतरी काळाआधी, इस्राएल लोकांच्या व्यवहारांत मीखाएलाने सक्रिय भूमिका निभावल्याचे यहूदा नावाच्या शिष्याने सूचित केले. मोशेचा मृत्यू झाल्यानंतर सैतानाने बहुधा मोशेच्या मृतदेहाचा कोणत्यातरी मार्गाने वापर करून—कदाचित इस्राएल लोकांना मूर्तिपूजा करायला लावून—आपला स्वार्थी हेतू साध्य करण्याचा प्रयत्न केला. असे होऊ नये म्हणून मीखाएलाने लगेच पाऊल उचलले. यहूदा सांगतो: “आद्यदेवदूत मीखाएल ह्‍याने जेव्हा मोशेच्या शरीरासंबंधाने सैतानाला विरोध करून त्याच्याशी वाद घातला, तेव्हा त्याला दोषी ठरवून त्याची निंदा करावयास तो धजला नाही; तर प्रभु तुला धमकावो एवढेच तो म्हणाला.” (यहू. ९) याच्या काही काळानंतर, इस्राएल लोकांनी यरीहो शहर हस्तगत करण्याआधी, यहोशवाला देवाचा पाठिंबा आहे असे आश्‍वासन त्याला देण्यासाठी जो पुरुष त्याच्यासमोर उभा होता, तो नक्कीच “परमेश्‍वराचा सेनापति,” मीखाएल होता. (यहोशवा ५:१३-१५ वाचा.) दानीएल संदेष्ट्याला महत्त्वाचा संदेश देण्यासाठी एक देवदूत येत असताना सैतानाच्या एका अधिपतीने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आद्यदेवदूत मीखाएल त्या देवदूताच्या मदतीस आला.—दानी. १०:५-७, १२-१४.

पूर्वभाकीत पुढाऱ्‍याचे आगमन

४. मशीहाच्या आगमनाबद्दल कोणती भविष्यवाणी करण्यात आली होती?

या घटनेच्या आधी, यहोवाने ‘अभिषिक्‍त नेत्याच्या’ आगमनाबद्दलची एक भविष्यवाणी दानीएल संदेष्ट्याला कळवण्यासाठी गब्रीएल नावाच्या आपल्या दूताला पाठवले होते. (दानी. ९:२१-२५, मराठी कॉमन लँग्वेज भाषांतर) * भविष्यवाणीत सांगितल्याप्रमाणे अगदी वेळेवर, म्हणजे सा.यु. २९ च्या शरदऋतूत योहानाने येशूला बाप्तिस्मा दिला. येशूवर पवित्र आत्मा ओतण्यात आला आणि तो अभिषिक्‍त म्हणजे ख्रिस्त किंवा मशीहा बनला. (मत्त. ३:१३-१७; योहा. १:२९-३४; गलती. ४:४) मशीहा या नात्याने तो एक अतुलनीय पुढारी होणार होता.

५. पृथ्वीवरील आपल्या सेवा कार्यादरम्यान ख्रिस्ताने कशा प्रकारे पुढाकार घेतला?

पृथ्वीवरील आपल्या सेवा कार्याच्या सुरुवातीपासूनच येशूने सिद्ध केले की तो ‘अभिषिक्‍त नेता’ आहे. सेवा कार्य सुरू केल्याच्या काही दिवसांतच त्याने शिष्यांना एकत्र करायला सुरुवात केली आणि आपला पहिला चमत्कार केला. (योहा. १:३५–२:११) राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करण्यासाठी त्याने देशभर प्रवास केला तेव्हा त्याचे शिष्यदेखील त्याच्यासोबत होते. (लूक ८:१) प्रचार कार्य कसे करायचे हे त्याने त्यांना शिकवले आणि प्रचाराच्या व शिकवण्याच्या कार्यात स्वतः पुढाकार घेऊन त्याने त्यांच्याकरता उत्तम उदाहरण मांडले. (लूक ९:१-६) याबाबतीत आज ख्रिस्ती वडिलांनी येशूचे अनुकरण केले पाहिजे.

६. आपण मेंढपाळ व पुढारी आहोत हे ख्रिस्ताने कशा प्रकारे दाखवून दिले?

पुढारी या नात्याने आणखी एका पैलूकडे लक्ष वेधण्यासाठी येशूने स्वतःची तुलना एका प्रेमळ मेंढपाळाशी केली. पूर्वेकडील देशांमध्ये मेंढपाळ खरोखरच आपल्या कळपांच्या पुढे चालतात. द लॅन्ड ॲण्ड द बुक या पुस्तकात डब्ल्यू. एम. थॉम्सन यांनी असे लिहिले: “मेंढपाळ कळपाच्या पुढे चालतो ते केवळ त्यांना वाट दाखवण्यासाठी नव्हे, तर ती वाट सुरक्षित आहे व त्यावरून ते सहज चालू शकतात याची खातरी करण्यासाठी तो असे करतो. . . . तो आपल्या काठीने त्यांच्यावर नियंत्रण ठेवतो आणि कळपाला हिरव्यागार कुरणांत घेऊन जातो. तसेच, सर्व धोक्यांपासूनही तो त्यांचे संरक्षण करतो.” आपण खऱ्‍या अर्थाने मेंढपाळ व पुढारी आहोत हे दाखवण्यासाठी येशूने म्हटले: “मीच उत्तम मेंढपाळ आहे; उत्तम मेंढपाळ मेंढरांकरिता आपला प्राण देतो. माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात; मी त्यांना ओळखतो व ती माझ्यामागे येतात.” (योहा. १०:११, २७) येशू खरोखरच आपल्या शब्दाला जागला, कारण आपल्या मेंढरांकरता त्याने आपले जीवन बलिदान केले. पण, यहोवाने ‘त्याला नेता आणि मुक्‍तिदाता म्हणून मानाचे स्थान दिले.’—प्रे. कृत्ये ५:३१, मराठी कॉमन लँग्वेज भाषांतर; इब्री १३:२०.

ख्रिस्ती मंडळीवर देखरेख करणारा

७. येशू कशाच्या द्वारे ख्रिस्ती मंडळीचे मार्गदर्शन करतो?

पुनरुत्थान झालेल्या येशूने, स्वर्गात जाण्याच्या काही दिवसांआधी आपल्या शिष्यांना असे सांगितले: “स्वर्गांत आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे.” (मत्त. २८:१८) यहोवाने येशूच्या शिष्यांचा विश्‍वास बळकट करण्यासाठी त्यांच्यावर पवित्र आत्मा ओतण्याचा अधिकार येशूला दिला. (योहा. १५:२६) सा.यु. ३३ च्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी येशूने सुरुवातीच्या ख्रिश्‍चनांवर पवित्र आत्मा ओतला. (प्रे. कृत्ये २:३३) पवित्र आत्मा ओतण्यात आला तेव्हा ख्रिस्ती मंडळीची स्थापना झाली. यहोवाने आपल्या पुत्राला स्वर्गातून पृथ्वीवरील मंडळीचे नेतृत्व करण्याचा अधिकार दिला. (इफिसकर १:२२; कलस्सैकर १:१३, १८ वाचा.) येशू, यहोवाच्या पवित्र आत्म्याद्वारे ख्रिस्ती मंडळीचे मार्गदर्शन करतो आणि त्याच्या सेवेत तत्पर असणारे ‘देवदूत त्याच्या स्वाधीन’ आहेत.—१ पेत्र ३:२२.

८. पहिल्या शतकात ख्रिस्ताने आपल्या शिष्यांचे नेतृत्व करण्यासाठी कोणत्या माध्यमाचा वापर केला आणि आज तो कोणाचा वापर करत आहे?

ख्रिस्ताने पवित्र आत्म्याद्वारे मंडळीला मानवरूपी “देणग्या” देखील दिल्या आहेत. यांपैकी काही “पाळक व शिक्षक” आहेत. (इफिस. ४:८, ११) प्रेषित पौलाने ख्रिस्ती पर्यवेक्षकांना असे आर्जवले: “तुम्ही स्वतःकडे व ज्या कळपात पवित्र आत्म्याने तुम्हास अध्यक्ष करून ठेवले त्या सर्वांकडे लक्ष द्या, ह्‍यासाठी की, देवाची जी मंडळी . . . तिचे पालन तुम्ही करावे.” (प्रे. कृत्ये २०:२८) ख्रिस्ती मंडळीची सुरुवात झाली तेव्हा हे सर्व पर्यवेक्षक आत्म्याने अभिषिक्‍त असलेले पुरुष होते. जेरूसलेम मंडळीतील प्रेषित आणि वडील, नियमन मंडळ म्हणून कार्य करत होते. आणि या माध्यमाद्वारे ख्रिस्ताने पृथ्वीवरील आपल्या अभिषिक्‍त ‘बांधवांच्या’ संपूर्ण गटाचे नेतृत्व केले. (इब्री २:११; प्रे. कृत्ये १६:४, ५) या शेवटल्या काळात, ख्रिस्ताने आपले “सर्वस्व”—राज्याशी संबंधित पृथ्वीवरील सर्व गोष्टी—आपल्या ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासाच्या’ आणि त्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्‍या नियमन मंडळाच्या म्हणजे अभिषिक्‍त ख्रिस्ती पुरुषांच्या एका गटाच्या हातात सोपवले आहे. (मत्त. २४:४५-४७) अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना व त्यांचे साथीदार असलेल्या त्यांच्या दुसऱ्‍या मेंढरांना याची जाणीव आहे की आधुनिक दिवसांतील नियमन मंडळाचे नेतृत्व स्वीकारण्याद्वारे ते खरेतर आपल्या पुढाऱ्‍याचे म्हणजे ख्रिस्ताचे नेतृत्व स्वीकारतात.

ख्रिस्त प्रचार कार्यात पुढाकार घेतो

९, १०. राज्याच्या सुवार्तेचा प्रसार करण्यासंबंधी ख्रिस्ताने कोणते मार्गदर्शन दिले?

येशूने अगदी सुरुवातीपासून जगभरातील प्रचाराच्या व शिकवण्याच्या कार्याचे स्वतः नेतृत्व केले. पृथ्वीवरील सर्व लोकांपर्यंत राज्याची सुवार्ता कशी पोहचवावी याचा क्रम त्याने स्थापित करून दिला. आपल्या सेवा कार्यादरम्यान त्याने आपल्या प्रेषितांना अशी सूचना दिली: “परराष्ट्रीयांकडे जाणाऱ्‍या वाटेने जाऊ नका व शोमरोन्यांच्या कोणत्याहि नगरात प्रवेश करू नका; तर इस्राएलाच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांकडे जा. जात असताना अशी घोषणा करीत जा की, स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.” (मत्त. १०:५-७) येशूच्या शिष्यांनी खासकरून सा.यु. ३३ च्या पेन्टकॉस्टनंतर यहुद्यांना व यहुदी मतानुसाऱ्‍यांना आवेशाने सुवार्ता सांगितली.—प्रे. कृत्ये २:४, ५, १०, ११; ५:४२; ६:७.

१० नंतर, येशूने पवित्र आत्म्याद्वारे राज्याची सुवार्ता शोमरोन्यांना आणि त्यानंतर यहुदीतरांना सांगण्याची व्यवस्था केली. (प्रे. कृत्ये ८:५, ६, १४-१७; १०:१९-२२, ४४, ४५) सर्व राष्ट्रांमध्ये सुवार्तेचा प्रसार करण्याच्या उद्देशाने येशूने स्वतः तार्साचा शौल याला ख्रिस्ती बनण्याची प्रेरणा दिली. येशूने आपला शिष्य हनन्या याला असे सांगितले: “उठून नीट नावाच्या रसत्यावर जा आणि यहूदाच्या घरी तार्सकर शौल नावाच्या मनुष्याचा शोध कर; . . . जा; कारण परराष्ट्रीय, राजे व इस्राएलाची संतति ह्‍यांच्यासमोर माझे नाव घेऊन जाण्याकरिता तो माझे निवडलेले पात्र आहे.” (प्रे. कृत्ये ९:३-६, १०, ११, १५) हा ‘मनुष्य’ प्रेषित पौल बनला.—१ तीम. २:७.

११. ख्रिस्ताने पवित्र आत्म्याद्वारे कशा प्रकारे प्रचाराचे कार्य आणखी विस्तारित केले?

११ राज्याच्या सुवार्तेचा प्रसार यहुदीतर राष्ट्रांत करण्याची वेळ आली, तेव्हा पवित्र आत्म्याने पौलाला आशिया मायनर आणि युरोप या भागांत मिशनरी दौरे करण्याचे मार्गदर्शन दिले. प्रेषितांची कृत्ये यातील लूकच्या अहवालात असे म्हटले आहे: “ते [सिरीयन अंत्युखिया या मंडळीतील ख्रिस्ती संदेष्टे व शिक्षक] प्रभूची सेवा व उपास करीत असता पवित्र आत्मा म्हणाला की, बर्णबा व शौल ह्‍यांना ज्या कार्यासाठी मी बोलाविले आहे त्यासाठी त्यांना माझ्याकरिता वेगळे करून ठेवा. तेव्हा त्यांनी उपास व प्रार्थना करून आणि त्यांच्यावर हात ठेवून त्यांची रवानगी केली.” (प्रे. कृत्ये १३:२, ३) राष्ट्रांना आपले नाव कळवण्यासाठी येशूने स्वतः तार्सकर शौलाला आपले “पात्र” म्हणून ‘निवडले’ होते. त्यामुळे साक्षकार्याला ही नवीन गती, ख्रिस्ताकडून म्हणजे मंडळीच्या पुढाऱ्‍याकडून मिळाली होती. साक्षकार्य करण्याचे मार्गदर्शन येशू पवित्र आत्म्याद्वारे करत आहे हे पौलाच्या दुसऱ्‍या मिशनरी दौऱ्‍यादरम्यान अचूकपणे स्पष्ट झाले. अहवालात म्हटले आहे की पौलाने व त्याच्या सहकाऱ्‍यांनी केव्हा व कोठे प्रचार कार्य करावे याचे मार्गदर्शन “येशूच्या आत्म्याने” म्हणजे, पवित्र आत्म्याद्वारे येशूने दिले आणि एका दृष्टान्ताद्वारे त्यांना युरोपात जाण्यासाठी सांगण्यात आले.प्रेषितांची कृत्ये १६:६-१० वाचा.

येशू आपल्या मंडळीचे नेतृत्व करतो

१२, १३. प्रत्येक मंडळीत काय चालले आहे यावर ख्रिस्ताचे बारीक लक्ष असते हे प्रकटीकरणाच्या पुस्तकातून कसे दिसून येते?

१२ पहिल्या शतकातील आपल्या अभिषिक्‍त अनुयायांच्या मंडळ्यांमध्ये काय चालले आहे यावर येशूचे बारीक लक्ष होते. त्याला प्रत्येक मंडळीच्या आध्यात्मिक स्थितीची पूर्ण जाणीव होती. प्रकटीकरण अध्याय २ आणि ३ वाचल्यास हे आपल्याला स्पष्टपणे समजते. तो आशिया मायनरमधील सात मंडळ्यांचा नावाने उल्लेख करतो. (प्रकटी. १:११) तर मग, आपण पूर्ण भरवसा बाळगू शकतो की त्या काळात अस्तित्वात असलेल्या आपल्या अनुयायांच्या इतर मंडळ्यांच्या आध्यात्मिक स्थितीचीही त्याला चांगली जाणीव होती.प्रकटीकरण २:२३ वाचा.

१३ येशूने काही मंडळ्यांची, त्यांनी दाखवलेल्या धीराबद्दल, परीक्षांत विश्‍वासू राहिल्याबद्दल, त्याच्या वचनाला एकनिष्ठ राहिल्याबद्दल आणि धर्मत्यागी बनलेल्यांचा धिक्कार केल्याबद्दल प्रशंसा केली. (प्रकटी. २:२, ९, १३, १९; ३:८) दुसरीकडे पाहता, त्याने अनेक मंडळ्यांना कडक सल्ला दिला. कारण, त्यांचे येशूबद्दलचे प्रेम थंड पडले होते; तसेच, त्यांनी मूर्तिपूजा, जारकर्म आणि गटबाजी खपवून घेतली होती. (प्रकटी. २:४, १४, १५, २०; ३:१५, १६) येशूने ज्यांना कडक सल्ला दिला होता अशांनासुद्धा एक प्रेमळ आध्यात्मिक पर्यवेक्षक या नात्याने त्याने म्हटले: “जितक्यांवर मी प्रेम करितो तितक्यांचा निषेध करून त्यांना शिक्षा करितो; म्हणून आस्था बाळग आणि पश्‍चात्ताप कर.” (प्रकटी. ३:१९) येशू स्वर्गात असला, तरी तो पवित्र आत्म्याद्वारे पृथ्वीवरील आपल्या शिष्यांच्या मंडळ्यांचे नेतृत्व करत होता. त्या मंडळ्यांना दिलेल्या संदेशांच्या शेवटी त्याने असे म्हटले: “आत्मा मंडळ्यांस काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको.”—प्रकटी. ३:२२.

१४-१६. (क) यहोवाच्या पृथ्वीवरील सेवकांचा धाडसी नेता असल्याचे येशूने कशा प्रकारे शाबीत केले आहे? (ख) येशू ‘युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस’ आपल्या शिष्यांच्या ‘बरोबर’ असल्याचा काय परिणाम झाला आहे? (ग) आपण पुढील लेखात कशाची चर्चा करणार आहोत?

१४ मीखाएल (येशू) इस्राएलाचा एक शूर आत्मिक पुढारी असल्याचे त्याने शाबीत केले हे आपण पाहिले. नंतर येशू, सुरुवातीच्या आपल्या शिष्यांचा धाडसी पुढारी व प्रेमळ मेंढपाळ होता. पृथ्वीवरील आपल्या सेवा कार्यादरम्यान येशूने प्रचार कार्यात पुढाकार घेतला. आणि त्याच्या पुनरुत्थानानंतर, राज्याच्या सुवार्तेच्या प्रसारावर त्याने बारीक लक्ष दिले.

१५ पवित्र आत्म्याद्वारे, येशू कालांतराने पृथ्वीच्या कानाकोपऱ्‍यात साक्षकार्याचा प्रसार करणार होता. स्वर्गात जाण्याआधी येशूने आपल्या शिष्यांना असे सांगितले: “पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल, आणि यरुशलेमेत, सर्व यहूदीयात, शोमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल.” (प्रे. कृत्ये १:८; १ पेत्र १:१२ वाचा.) पहिल्या शतकात, ख्रिस्ताच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात साक्ष देण्यात आली होती.—कलस्सै. १:२३.

१६ पण येशूने स्वतः सूचित केले होते की साक्ष देण्याचे कार्य शेवटल्या काळातही चालू राहील. येशूने आपल्या शिष्यांवर सर्व राष्ट्रांतील लोकांना प्रचार करण्याची व शिष्य बनवण्याची कामगिरी सोपवल्यावर त्यांना असे वचन दिले: “युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे.” (मत्त. २८:१९, २०) १९१४ मध्ये राज्याधिकार मिळाल्यापासून, ख्रिस्त पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने अधिक आपल्या शिष्यांच्या ‘बरोबर’ आहे आणि सक्रियपणे त्यांचे नेतृत्व करत आहे. १९१४ पासून तो किती आवेशाने कार्य करत आहे याबद्दल पुढील लेखात चर्चा केली जाईल.

[तळटीप]

^ परि. 4 या भविष्यवाणीच्या तपशीलवार माहितीसाठी, दानीएलाच्या भविष्यवाणीकडे लक्ष द्या! (हिंदी) या पुस्तकातील अध्याय ११ पाहा.

उजळणी

• देवाचा पुत्र इस्राएलाचा सक्रिय पुढारी असल्याचे त्याने कसे सिद्ध केले?

• ख्रिस्त कशाच्या द्वारे पृथ्वीवरील आपल्या मंडळीचे नेतृत्व करतो?

• सुवार्तेचा प्रसार करण्यासाठी ख्रिस्ताने कशा प्रकारे मार्गदर्शन केले?

• प्रत्येक मंडळीच्या आध्यात्मिक स्थितीकडे ख्रिस्ताचे बारीक लक्ष आहे हे कशावरून दिसून येते?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२१ पानांवरील चित्र]

“मी एक दूत तुझ्यापुढे पाठवीत आहे”

[२३ पानांवरील चित्र]

गतकाळाप्रमाणेच आजही कळपाचे पालन करण्यासाठी ख्रिस्त मानवरूपी ‘देणग्यांचा’ वापर करतो