व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

बल्गेरिया देशातील खास मोहीम यशस्वी ठरते

बल्गेरिया देशातील खास मोहीम यशस्वी ठरते

बल्गेरिया देशातील खास मोहीम यशस्वी ठरते

“पीक फार आहे खरे, पण कामकरी थोडे आहेत; ह्‍यास्तव पिकाच्या धन्याने आपल्या कापणीस कामकरी पाठवून द्यावेत म्हणून त्याची प्रार्थना करा.” —मत्त. ९:३७, ३८.

येशूचे हे शब्द दक्षिणपूर्व युरोपातील बल्गेरिया या सुंदर बाल्कन देशाच्या बाबतीत किती खरे ठरले आहेत! त्या देशातील ७० लाखांपेक्षा जास्त रहिवाशांना सुवार्ता पोहचवण्यासाठी अधिक कामकऱ्‍यांची नितांत गरज आहे. बल्गेरियात सुमारे १,७०० राज्य प्रचारक आहेत. पण, त्यांना संपूर्ण क्षेत्र उरकणे शक्य नाही. त्यामुळे, २००९ मध्ये एका खास मोहिमेत भाग घेण्यासाठी नियमन मंडळाने युरोपमधील अनेक देशांतून बल्गेरियन भाषा बोलणाऱ्‍या साक्षीदारांना बोलावण्याची मंजुरी दिली. उन्हाळ्यातील सात आठवड्यांदरम्यान ही मोहीम राबवली गेली आणि ऑगस्ट १४-१६, २००९ दरम्यान सोफिया शहरात भरलेल्या “जागृत राहा!” या प्रांतीय अधिवेशनाने मोहिमेची सांगता झाली.

उदंड प्रतिसाद

या आमंत्रणाला फ्रान्स, जर्मनी, ग्रीस, इटली, पोलंड आणि स्पेन या देशांतून किती जण प्रतिसाद देतील याविषयी सोफिया शाखा कार्यालयातील बांधवांना शंका होती. कारण, बल्गेरियाला येऊन प्रचार करण्यासाठी बांधवांना सुटी काढून व स्वतःचा खर्च करून यावे लागणार होते. पण, बल्गेरियाला जाण्यासाठी अर्ज करणाऱ्‍यांची संख्या प्रत्येक आठवडी उत्तरोत्तर वाढत जाऊन शेवटी २९२ इतकी झाली हे पाहणे खरोखर किती आनंददायक होते! इतक्या भरघोस प्रतिसादामुळे, या स्वयंसेवकांना बल्गेरियातील तीन वेगवेगळ्या शहरांमध्ये म्हणजे कॉझानलक, सॉन्डान्स्‌की आणि सिलिस्ट्रा या शहरांमध्ये पाठवणे शक्य झाले. बल्गेरियातील विभागीय पर्यवेक्षकांनी तेथील स्थानिक पायनियरांना आणि प्रचारकांनाही या मोहिमेत सहभाग घेण्यासाठी बोलावले. अशा प्रकारे, ज्या क्षेत्रांत क्वचितच प्रचार कार्य करण्यात आले होते त्या क्षेत्रांत ३८२ स्वयंसेवक आवेशाने प्रचार करत होते.

बाहेरून येणाऱ्‍या बांधवांच्या राहण्याची सोय करण्यासाठी आसपासच्या मंडळ्यांतील बांधवांना आधीच सांगण्यात आले होते. त्यांनी भाड्याने घरे घेतली व स्वस्त दरांत हॉटेल्स बुक केले. बाहेरून येणाऱ्‍या स्वयंसेवकांच्या राहण्याची सोय करण्यासाठी व त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी स्थानिक बांधवांनी दिवसरात्र एक केला. या तिन्ही शहरांत सभा भरवण्यासाठी भाड्याने जागा घेण्यात आली आणि पाहुणे म्हणून आलेल्या बांधवांद्वारे सभा चालवण्याची व्यवस्था करण्यात आली. ज्या ठिकाणी आधी एकही साक्षीदार राहत नव्हता, अशा ठिकाणी यहोवाची स्तुती करण्यासाठी ५० प्रचारक सभेला उपस्थित राहत असल्याचे पाहणे खरोखर किती रोमांचक होते!

मोहिमेत भाग घेण्याकरता इतर देशांतून आलेल्या स्वयंसेवकांचा आवेश पाहण्यासारखा होता. उन्हाळ्याच्या दिवसांत बल्गेरियातील तापमान ४० अंश सेल्सियसच्या वर जाऊ शकते. असे असले, तरी कोणतीही गोष्ट या उत्साही बंधुभगिनींना रोखू शकत नव्हती. डॅन्यूब नदीकाठी असलेल्या सिलिस्ट्रा शहरातील ५०,००० पेक्षा जास्त रहिवाशांना मोहिमेच्या पहिल्या तीन आठवड्यांतच अगदी पूर्णपणे साक्ष देण्यात आली. परिणामस्वरूप, बांधवांनी जवळपासच्या खेड्यांमध्ये प्रचार केला. इतकेच काय, तर त्यांनी सिलिस्ट्राच्या पश्‍चिमेस ५५ किलोमीटरवर असलेल्या टुट्राकॉनमध्येदेखील प्रचार केला. हे बांधव सहसा सकाळी साडेनऊ वाजता सेवा कार्य सुरू करायचे व दुपारच्या जेवणानंतर अनेक वेळा संध्याकाळी सात वाजेपर्यंत किंवा त्यानंतरही प्रचार करत राहायचे. त्याच प्रकारे, या स्वयंसेवकांच्या उल्लेखनीय आवेशामुळे, कॉझानलक आणि सॉन्डान्स्‌कीतील प्रचार मोहीम आसपासच्या गावांत व शहरांतही राबवण्यात आली.

कोणते परिणाम मिळाले?

या सात आठवड्यांदरम्यान खूप मोठ्या प्रमाणात साक्ष देण्यात आली. प्रेषितांच्या दिवसांत जसे म्हणण्यात आले होते, तशाच प्रकारे या शहरांतील रहिवासीही असे म्हणू शकत होते: ‘तुम्ही आपल्या शिकवणीने आमचे शहर भरून टाकले आहे.’ (प्रे. कृत्ये ५:२८) मोहिमेत भाग घेणाऱ्‍या साक्षीदारांनी जवळजवळ ५०,००० मासिके लोकांना दिली आणि ४८२ बायबल अभ्यास सुरू केले. आनंदाची गोष्ट म्हणजे, १ सप्टेंबर २००९ पर्यंत, सिलिस्ट्रात एका मंडळीची आणि कॉझानलक व सॉन्डान्स्‌कीमध्ये अनेक गटांची स्थापना करण्यात आली. या मोहिमेदरम्यान ज्यांनी पहिल्यांदाच सुवार्ता ऐकली होती, ते चांगली आध्यात्मिक प्रगती करत आहेत हे पाहून खरोखर खूप आनंद होतो.

मोहिमेच्या पहिल्या आठवड्यात, स्पेनहून आलेल्या बल्गेरियन भाषा बोलणाऱ्‍या एका खास पायनियर बहिणीने सिलिस्ट्रात रस्त्यावर वर्तमानपत्र विकणाऱ्‍या करीना नावाच्या एका स्त्रीला सुवार्ता सांगितली. करीनाने आस्था दाखवली आणि ती एका सभेला आली. तिने लगेच बायबल अभ्यास करण्याचीही तयारी दाखवली. पण, तिचा पती नास्तिक असल्यामुळे, तिने एका बागेत बायबल अभ्यास करण्याची विनंती केली. बायबल अभ्यासाला तिच्या दोन मुलीदेखील बसायच्या. तिची मोठी मुलगी डॅन्येला हिने बायबल सत्यांबद्दल विलक्षण आवड दाखवली. तिने एकाच आठवड्यात बायबल शिकवते पुस्तक वाचून काढले आणि उपासनेत मूर्तींचा वापर न करण्याबद्दल बायबल जे सांगते ते तिने लगेच अंमलात आणले. नंतर तिने बायबलमधील सत्यांबद्दल आपल्या मित्रमैत्रिणींना सांगायला सुरुवात केली. ती मंडळीच्या सभांनादेखील उपस्थित राहू लागली आणि तीनच आठवड्यांनंतर तिने बायबल अभ्यास चालवणाऱ्‍या साक्षीदार बहिणीला असे म्हटले: “मला असं वाटतं की मी तुमच्यापैकीच एक आहे. मलादेखील प्रचार कार्यात भाग घ्यायचा असेल, तर मी काय केलं पाहिजे?” सध्या डॅन्येला, तिची आई व धाकटी बहीण चांगली आध्यात्मिक प्रगती करत आहेत.

मोहिमेत सहभागी होण्यासाठी बल्गेरियन भाषा बोलणारा ऑर्लिन नावाचा बांधव इटलीहून कॉझानलकमध्ये आला होता. एकदा सेवा कार्य संपवून तो आपल्या राहण्याच्या ठिकाणी परत जात असताना त्याने बागेतील बाकावर बसलेल्या दोन तरुणांना साक्ष दिली. त्याने त्यांना बायबल शिकवते पुस्तकाची एक प्रत दिली आणि दुसऱ्‍या दिवशी पुन्हा भेटण्याची व्यवस्था केली. ऑर्लिन त्यांना पुन्हा भेटला त्या दिवशी त्याने त्या दोघांपैकी स्वेटोमिर नावाच्या तरुणासोबत बायबल अभ्यास सुरू केला. त्याच्या दुसऱ्‍या दिवशीदेखील त्यांनी अभ्यास केला. अशा प्रकारे, नऊ दिवसांत ऑर्लिनने स्वेटोमिरसोबत आठ वेळा अभ्यास केला. स्वेटोमिरने म्हटले: “तुम्हाला भेटण्याच्या दोन दिवसांआधी, मी देवाला अशी प्रार्थना केली होती की त्याला जाणून घेण्यास त्यानं माझी मदत करावी आणि त्यानं मला मदत केली तर मी आजीवन त्याची सेवा करीन असं वचन मी देवाला दिलं होतं.” ऑर्लिन इटलीला परत गेल्यावर, स्थानिक बांधव स्वेटोमिरसोबत बायबलचा अभ्यास करू लागले. स्वेटोमिर जे काही शिकत आहे ते तो आपल्या जीवनात लागू करत आहे.

त्याग करणाऱ्‍यांना भरपूर आशीर्वाद मिळाले

सुवार्तेचा प्रचार करण्यासाठी सुटी घेऊन स्वतःच्या खर्चाने दुसऱ्‍या देशात गेलेल्या या बंधुभगिनींना कसे वाटते? स्पेनमधील एका वडिलांनी असे लिहिले: “या मोहिमेमुळे, स्पेनमधील बल्गेरियन भाषा बोलणाऱ्‍या क्षेत्रात प्रचार करणारे बंधुभगिनी एकत्र आले. मोहिमेत सहभागी झालेल्या बंधुभगिनींवर याचा गहिरा प्रभाव पडला.” इटलीतील एका दांपत्याने असे लिहिले: “आमच्या आयुष्यातला हा सगळ्यात चांगला महिना होता!” त्यांनी पुढे असे म्हटले: “या मोहिमेमुळे आमचं जीवन पार बदलून गेलं! आमचा एकंदरित दृष्टिकोनच बदलला.” हे दांपत्य प्रचारकांची जास्त गरज असलेल्या ठिकाणी सेवा करण्याच्या हेतूने बल्गेरियात स्थायिक होण्याचा गंभीरपणे विचार करू लागले. स्पेनमधील करीना नावाच्या एका अविवाहित सामान्य पायनियर बहिणीनेदेखील सिलिस्ट्रा शहरातील मोहिमेत भाग घेतला होता. त्यानंतर तिने स्पेनमधील आपली नोकरी सोडली आणि सिलिस्ट्रातील नव्या मंडळीला मदत करण्यासाठी ती बल्गेरियाला राहायला गेली. बल्गेरियात एक वर्ष राहता येईल इतके पैसे तिने जमवले होते. आपल्या निर्णयाबद्दल करीना असे म्हणते: “यहोवानं मला बल्गेरियात येऊन सेवा करणं शक्य केल्याबद्दल मला खूप आनंद होतो आणि मी आशा करते की मला इथं जास्त काळ राहणं शक्य होईल. माझ्याजवळ आत्ताच पाच बायबल अभ्यास आहेत, आणि यांच्यापैकी तीन जण सभांना येतात.”

इटलीतील एका बहिणीला या मोहिमेत भाग घेण्याची इच्छा होती. पण, ती नुकतीच एका ठिकाणी कामाला लागल्यामुळे तिच्याजवळ एकही सुटी नव्हती. तरीसुद्धा, तिने सरळ आपल्या मालकाजवळ एका महिन्याची बिनपगारी रजा मिळण्याची विनंती केली आणि रजा न मिळाल्यास नोकरी सोडण्याचीही तयारी दाखवली. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे तिच्या मालकाने तिला म्हटले: “ठीक आहे, पण एका अटीवर: तुला बल्गेरियाहून मला एक पोस्टकार्ड पाठवावं लागेल.” यहोवाने नक्कीच आपली प्रार्थना ऐकली असे या बहिणीला वाटले.

बल्गेरियातील वॉरना या शहरात राहणारी स्टानिस्लावा नावाची एक तरुण बहीण चांगल्या पगाराची पूर्ण वेळ नोकरी करत होती. सिलिस्ट्रातील मोहिमेत भाग घेण्यासाठी तिने कामावरून सुटी घेतली. आपल्या देशात सुवार्ता प्रचार करण्यासाठी दुरून आलेल्या पायनियरांच्या चेहऱ्‍यावरील आनंद पाहून तिच्या डोळ्यांत अश्रू आले. ‘करियर करण्याच्या मागे लागून आपण आपल्या आयुष्याचं काय करत आहोत,’ असा विचार ती करू लागली. दोन आठवड्यांनंतर ती घरी परतली तेव्हा तिने आपली नोकरी सोडून दिली आणि सामान्य पायनियर सेवा करू लागली. तरुणपणात आपल्या सृष्टिकर्त्याचे स्मरण करत असल्याबद्दल तिला आता खरोखर आनंद वाटतो.—उप. १२:१.

यहोवाच्या सेवेत सक्रियपणे भाग घेणे हा किती मोठा सुहक्क आहे! सुवार्तेचा प्रचार करण्याच्या व शिकवण्याच्या कार्यात आपला वेळ व शक्‍ती खर्च करणे यापेक्षा इतर कोणतेही कार्य महत्त्वपूर्ण नाही. प्रचार करण्याच्या जीवन-रक्षक कार्यातील आपला वाटा तुम्ही आणखी इतर मार्गांनी वाढवू शकता का? तुमच्या देशातच असे काही क्षेत्र असतील जेथे प्रचारकांची जास्त गरज आहे. अशा एखाद्या क्षेत्रात तुम्ही राहायला जाऊ शकता का? किंवा मग, बायबल सत्यासाठी आसूसलेल्या तुमच्याच देशातील लोकांना मदत करण्यासाठी तुम्ही त्यांची भाषा शिकून घेण्याचा विचार करू शकता का? सेवेतील आपला सहभाग वाढवण्यासाठी तुम्ही आपल्या जीवनात जे काही बदल कराल, त्याबद्दल यहोवा तुम्हाला भरपूर आशीर्वाद देईल याची खातरी तुम्ही बाळगू शकता.—नीति. १०:२२.

[३२ पानांवरील चौकट/ चित्र]

एक अविस्मरणीय दिवस

बल्गेरियातील खास मोहिमेत भाग घेण्यासाठी युरोपमधील इतर देशांतून आलेल्या बंधुभगिनींपैकी अनेक जणांनी सोफियात भरणाऱ्‍या “जागृत राहा!” प्रांतीय अधिवेशनाला उपस्थित राहण्याची योजना केली. विविध देशांतून आलेल्या अनेक पाहुण्यांना भेटणे स्थानिक बंधुभगिनींकरता खूप प्रोत्साहनदायक होते. नियमन मंडळाचे सदस्य बंधू जेफ्री जॅक्सन यांनी बल्गेरियन भाषेतील पवित्र शास्त्रवचनांचे नवे जग भाषांतर प्रकाशित केले, तेव्हा उपस्थित असलेले २,०३९ जण किती रोमांचित झाले होते! त्या शुक्रवारी तेथे उपस्थित असलेल्या सर्वांनी कितीतरी वेळ मोठ्या उत्साहाने टाळ्यांचा गडगडाट करून मनापासून कदर व्यक्‍त केली. अनेकांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. समजण्यास सोपे असलेले बल्गेरियन भाषेतील हे भाषांतर नम्र मनाच्या बल्गेरियन लोकांना यहोवाला जाणून घेण्यास नक्कीच मदत करेल.

[३०, ३१ पानांवरील नकाशा]

(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)

बल्गेरिया

सोफिया

सॉन्डान्स्‌की

सिलिस्ट्रा

कॉझानलक

[३१ पानांवरील चित्रे]

त्या सात आठवड्यांदरम्यान उल्लेखनीय रीत्या साक्ष देण्यात आली