व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्ही पहिल्याने “त्याचे नीतिमत्त्व” मिळवण्यास झटा

तुम्ही पहिल्याने “त्याचे नीतिमत्त्व” मिळवण्यास झटा

तुम्ही पहिल्याने “त्याचे नीतिमत्त्व” मिळवण्यास झटा

“तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळविण्यास झटा म्हणजे त्यांच्याबरोबर ह्‍याहि सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील.”—मत्त. ६:३३.

१, २. देवाचे नीतिमत्त्व काय आहे, आणि ते कशावर आधारित आहे?

 “पहिल्याने त्याचे राज्य मिळविण्यास झटा.” (मत्त. ६:३३) येशूने डोंगरावरील प्रवचनात दिलेल्या या सल्ल्याशी आज यहोवाचे साक्षीदार सुपरिचित आहेत. जीवनाच्या प्रत्येक पैलूतून आपण हे दाखवण्याचा प्रयत्न करतो की या राज्य शासनावर आपले प्रेम आहे आणि आपण त्याला एकनिष्ठ राहू इच्छितो. पण, “त्याचे नीतिमत्त्व” मिळवण्यास झटा असे जे वरील वाक्यांशाच्या दुसऱ्‍या भागात म्हटले आहे तेदेखील आपण लक्षात ठेवले पाहिजे. देवाचे नीतिमत्त्व म्हणजे काय आणि पहिल्याने ते मिळवण्यास झटणे याचा काय अर्थ होतो?

“नीतिमत्त्व” असे भाषांतरित केलेल्या मूळ भाषेतील शब्दाचे भाषांतर “न्यायीपणा” किंवा “सात्त्विकता” असेही केले जाऊ शकते. त्याअर्थी, देवाचे नीतिमत्त्व म्हणजे त्याच्या स्वतःच्या स्तरांनुसार आणि मूल्यांनुसार असलेली सात्त्विकता. सृष्टिकर्ता या नात्याने, यहोवाला चांगले-वाईट व योग्य-अयोग्य याविषयीचे स्तर ठरवण्याचा हक्क आहे. (प्रकटी. ४:११) पण देवाचे नीतिमत्त्व म्हणजे रूक्ष, कडक कायद्यांची किंवा नीतिनियमांची अंतहीन यादी नव्हे. याउलट, देवाचे नीतिमत्त्व त्याच्या व्यक्‍तिमत्वावर आणि न्याय या त्याच्या प्रमुख गुणावर आधारित आहे. त्याच्या या गुणाला त्याचे इतर प्रमुख गुण अर्थात प्रेम, बुद्धी आणि शक्‍ती यांचीही जोड आहे. तर मग, देवाच्या नीतिमत्त्वाचा त्याच्या इच्छेशी व उद्देशाशी जवळचा संबंध आहे. यामध्ये, त्याची सेवा करण्याची इच्छा बाळगणाऱ्‍यांकडून तो काय अपेक्षितो हेदेखील समाविष्ट आहे.

३. (क) पहिल्याने देवाचे नीतिमत्त्व मिळवण्यास झटणे याचा काय अर्थ होतो? (ख) आपण यहोवाच्या परिपूर्ण स्तरांचे पालन का करतो?

पहिल्याने देवाचे नीतिमत्त्व मिळवण्यास झटणे याचा काय अर्थ होतो? सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास, देवाला संतुष्ट करण्याच्या उद्देशाने त्याची इच्छा पूर्ण करणे असा त्याचा अर्थ होतो. त्याचे नीतिमत्त्व मिळवण्यास झटणे यात, आपल्या स्वतःच्या स्तरांनुसार आणि मूल्यांनुसार नव्हे, तर देवाच्या मूल्यांनुसार व त्याच्या परिपूर्ण स्तरांनुसार जीवन जगणे समाविष्ट आहे. (रोमकर १२:२ वाचा.) अशा प्रकारच्या जीवनाचा यहोवासोबतच्या आपल्या नात्याशी जवळचा संबंध आहे. देव आपल्याला शिक्षा करेल या भीतीपोटी आपण त्याच्या नियमांचे पालन करत नाही. तर, देवाबद्दल आपल्याला प्रेम वाटत असल्यामुळे आपण त्याला संतुष्ट करण्याचा प्रयत्न करतो. हे आपण आपले स्वतःचे स्तर बनवण्याद्वारे नव्हे, तर देवाच्या स्तरांचे पालन करण्याद्वारे करतो. असे करणे योग्यच आहे हे आपण मान्य करतो; किंबहुना, त्यासाठीच आपली रचना करण्यात आली आहे. देवाच्या राज्याचा राजा, येशू ख्रिस्त याच्याप्रमाणे आपणही देवाच्या नीतिमत्त्वावर किंवा न्यायावर प्रेम केले पाहिजे.—इब्री १:८, ९.

४. देवाचे नीतिमत्त्व मिळवण्यास झटणे का महत्त्वाचे आहे?

यहोवाचे नीतिमत्त्व मिळवण्यास झटणे किती महत्त्वाचे आहे? या वस्तुस्थितीकडे लक्ष द्या: चांगले-वाईट याबद्दल स्तर ठरवण्याचा यहोवाला अधिकार आहे. यहोवाच्या या अधिकाराचा आदाम व हव्वा स्वीकार करतील की नाही यावर एदेन बागेतील मूळ परीक्षा आधारलेली होती. (उत्प. २:१७; ३:५) पण, आदाम व हव्वा यांनी हा अधिकार स्वीकारला नाही, त्यामुळे त्यांचे वंशज या नात्याने आपल्यावर दुःख व मृत्यू ओढवला. (रोम. ५:१२) दुसरीकडे पाहता, देवाचे वचन असे म्हणते: “जो धार्मिकता व दया यांस अनुसरून वर्ततो, त्याला जीवन, धार्मिकता व सन्मान ही प्राप्त होतात.” (नीति. २१:२१) होय, पहिल्याने देवाचे नीतिमत्त्व मिळवण्यास झटल्याने, आपण यहोवासोबत सलोख्याचा नातेसंबंध जोडतो आणि त्यामुळे आपले तारण शक्य होते.—रोम. ३:२३, २४.

स्वतःला नीतिमान ठरवण्याचे धोके

५. आपण कोणता धोका टाळला पाहिजे?

पहिल्याने देवाचे नीतिमत्त्व मिळवण्यात यशस्वी होण्यासाठी आपण सर्वांनी एक धोका टाळला पाहिजे. रोममधील ख्रिश्‍चनांना लिहिताना प्रेषित पौलाने या धोक्याबद्दल सांगितले. पौलाच्या काळातील यहुद्यांबद्दल बोलताना त्याने म्हटले: “मी त्यांच्याविषयी साक्ष देतो की, त्यांना देवाविषयी आस्था आहे, परंतु ती यथार्थ ज्ञानाला अनुसरून नाही. कारण त्यांना देवाच्या नीतिमत्त्वाची जाणीव नसल्यामुळे व ते आपलेच नीतिमत्त्व स्थापावयास पाहत असल्यामुळे देवाच्या नीतिमत्त्वाला ते वश झाले नाहीत.” (रोम. १०:२, ३) पौलाच्या म्हणण्यानुसार, हे उपासक आपले स्वतःचे नीतिमत्त्व स्थापन करण्यात इतके व्यस्त होते की देवाचे नीतिमत्त्व काय आहे हे त्यांनी समजून घेतले नाही. *

६. आपण कोणती प्रवृत्ती टाळली पाहिजे आणि का?

आपण देवाच्या सेवेकडे स्पर्धात्मक दृष्टिकोनातून पाहतो आणि इतरांसोबत स्वतःची तुलना करतो, तेव्हा आपण या पाशात पडण्याची शक्यता आहे. अशा प्रवृत्तीमुळे आपण सहजासहजी आपल्या क्षमतांबद्दल फाजील आत्मविश्‍वास बाळगू लागतो. पण, असे वागल्यामुळे आपण खरेतर यहोवाच्या नीतिमत्त्वाकडे दुर्लक्ष करत असतो. (गलती. ६:३, ४) यहोवावरील प्रेमामुळे आपल्याला चांगले ते करण्याची प्रेरणा मिळते. त्यामुळे, स्वतःचे नीतिमत्त्व सिद्ध करण्याचा कोणताही प्रयत्न, यहोवावर आपले प्रेम आहे हा दावा खोटा ठरवू शकतो.लूक १६:१५ वाचा.

७. स्वतःला नीतिमान ठरवण्याची लोकांची समस्या येशूने कशा प्रकारे हाताळली?

“आपण धार्मिक आहो असा जे कित्येक स्वतःविषयी भरवसा धरून इतर सर्वांस तुच्छ मानीत होते,” अशा लोकांविषयी येशूला चिंता वाटली. स्वतःला नीतिमान ठरवण्याची लोकांची ही समस्या येशूने एक दृष्टान्त देऊन हाताळली: “एक परूशी व एक जकातदार असे दोघे जण प्रार्थना करावयास वर मंदिरात गेले, परूश्‍याने उभे राहून स्वतःशी अशी प्रार्थना केली: ‘हे देवा, इतर माणसे लुबाडणारी, अधर्मी, व्यभिचारी आहेत, त्यांच्यासारखा किंवा ह्‍या जकातदारासारखाहि मी नाही, म्हणून मी तुझे आभार मानितो. मी आठवड्यातून दोनदा उपास करितो; जे मला मिळते त्या सर्वांचा दशांश देतो.’ जकातदार तर दूर उभा राहून वर स्वर्गाकडे दृष्टि लावण्यासदेखील न धजता आपला ऊर बडवीत म्हणाला, ‘हे देवा मज पाप्यावर दया कर.’” येशूने शेवटी म्हटले: “मी तुम्हांस सांगतो, त्या दुसऱ्‍यापेक्षा हा नीतिमान्‌ ठरून खाली आपल्या घरी गेला; कारण जो कोणी आपणाला उंच करतो तो नमविला जाईल, आणि जो कोणी आपणाला नमवितो तो उंच केला जाईल.”—लूक १८:९-१४.

आणखी एक धोका—“फाजील धार्मिक” असणे

८, ९. “फाजील धार्मिक” असणे याचा काय अर्थ आहे, आणि फाजील धार्मिक असल्यामुळे काय होऊ शकते?

उपदेशक ७:१६ मध्ये आणखी एका धोक्याबद्दल सांगितले आहे जो आपण टाळला पाहिजे. तेथे असे म्हटले आहे: “फाजील धार्मिक होऊ नको; मर्यादेबाहेर शहाणपणा मिरवू नको; तू आपला नाश का करून घ्यावा?” अशा प्रकारची मनोवृत्ती टाळणे का आवश्‍यक आहे याचे कारण बायबलचा ईश्‍वरप्रेरित लेखक २० व्या वचनात सांगतो: “सदाचाराने वागणारा व पाप न करणारा असा धार्मिक पुरुष पृथ्वीवर आढळणार नाही.” “फाजील धार्मिक” असलेली व्यक्‍ती नीतिमत्त्वाच्या बाबतीत स्वतःचे स्तर बनवते आणि त्या स्तरांनुसार इतरांचा न्याय करते. पण, ती हे मान्य करण्यास चुकते की असे करण्याद्वारे आपण स्वतःच्या स्तरांना देवाच्या स्तरांपेक्षा श्रेष्ठ ठरवत असतो आणि देवाच्या नजरेत अनीतिमान ठरतो.

“फाजील धार्मिक” असल्यामुळे किंवा इतर काही बायबल भाषांतरांमध्ये म्हटल्याप्रमाणे “अतिधार्मिक” किंवा “जास्तच धार्मिक” असल्यामुळे, यहोवा ज्या प्रकारे गोष्टी हाताळतो त्यावर सवाल करण्यास आपण प्रवृत्त होऊ शकतो. पण, आपण हे आठवणीत ठेवले पाहिजे की यहोवाचे निर्णय कितपत योग्य किंवा न्याय्य आहेत यावर आपण सवाल केला, तर वास्तवात आपण यहोवाच्या स्तरांपेक्षा आपल्या स्वतःच्या स्तरांना जास्त महत्त्व देत असतो. असे करणे म्हणजे यहोवाला आरोपीच्या पिंजऱ्‍यात उभे करून चांगल्या-वाइटाबद्दल असलेल्या आपल्या स्तरांनुसार त्याचा न्याय करण्यासारखे आहे. पण, नीतिमत्त्वाचे स्तर ठरवण्याचा हक्क आपल्याला नव्हे, तर यहोवाला आहे.—रोम. १४:१०.

१०. कोणत्या गोष्टीमुळे आपणही ईयोबाप्रमाणे देवाचा न्याय करण्यास प्रवृत्त होऊ शकतो?

१० आपल्यापैकी कोणीही जाणूनबुजून यहोवाचा न्याय करू इच्छिणार नाही; पण आपल्या अपरिपूर्ण वृत्तीमुळे आपण असे करण्यास प्रवृत्त होऊ शकतो. एखादी गोष्ट आपल्या दृष्टीने अन्यायकारक आहे असे आपल्याला वाटते किंवा आपल्यावर संकट ओढवते तेव्हा सहजपणे असे होऊ शकते. विश्‍वासू पुरुष ईयोब यानेही ही चूक केली. ईयोबाबद्दल असे वर्णन करण्यात आले आहे की तो सुरुवातीला “सात्विक व सरळ होता; तो देवाला भिऊन वागे व पापापासून दूर राही.” (ईयो. १:१) पण नंतर, ईयोबावर एकापाठोपाठ एक संकटे आली आणि आपल्यावर अन्याय होत आहे असे त्याला वाटले. यामुळे, त्याने “देवाला निर्दोषी ठरविण्याचे सोडून स्वतःस निर्दोषी ठरवावयास पाहिले.” (ईयो. ३२:१, २) पण, ईयोबाला आपला दृष्टिकोन बदलण्याची गरज होती. म्हणून, ईयोबासोबत घडले तसे आपल्याही बाबतीत घडते तेव्हा आपल्याला आश्‍चर्य वाटू नये. पण तसे घडल्यास, आपला दृष्टिकोन सुधारण्यास कोणती गोष्ट आपल्याला मदत करेल?

आपल्याला नेहमीच सर्व गोष्टी माहीत नसतात

११, १२. (क) एखादी गोष्ट आपल्याला अन्यायकारक वाटल्यास आपण काय लक्षात ठेवले पाहिजे? (ख) येशूने दिलेल्या दाखल्यातील घरधनी अन्यायी आहे असे एखाद्याला का वाटू शकते?

११ सर्वप्रथम आपण ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपल्याला नेहमीच सर्व गोष्टी माहीत नसतात. नेमकी हीच गोष्ट ईयोबाच्या बाबतीत घडली. स्वर्गात भरलेल्या देवदूतांच्या सभांमध्ये सैतानाने ईयोबावर खोटे आरोप लावले होते. या सभांबद्दल ईयोबाला माहीत नव्हते. (ईयो. १:७-१२; २:१-६) आपल्यावर संकटे आणणारा मुळात सैतान आहे याची ईयोबाला जाणीव नव्हती. खरेतर, सैतान नेमका कोण आहे हे ईयोबाला माहीत होते की नाही हेदेखील आपण निश्‍चितपणे सांगू शकत नाही! म्हणून, आपल्यावर संकटे आणणारा देव आहे असा त्याचा चुकीचा ग्रह झाला. होय, आपल्याला सर्व गोष्टी माहीत नसतात तेव्हा आपण सहजपणे चुकीच्या निष्कर्षावर पोहचू शकतो.

१२ उदाहरणार्थ, येशूने द्राक्षमळ्यातील कामकऱ्‍यांबद्दल जो दाखला दिला तो विचारात घ्या. (मत्तय २०:८-१६ वाचा.) या दाखल्यात येशू एका घरधन्याविषयी सांगतो जो आपल्या सर्व कामकऱ्‍यांना एकसारखाच मोबदला देतो; मग, त्यांनी दिवसभर काम केलेले असो किंवा फक्‍त एकच तास. याबद्दल तुम्हाला कसे वाटते? हा अन्याय आहे असे तुम्हाला वाटते का? तुम्हाला कदाचित, दिवसभर रखरखीत उन्हात काम केलेल्या कामकऱ्‍यांचे लगेच वाईट वाटेल. त्यांना जास्त पैसे मिळायलाच पाहिजे होते! या निष्कर्षाच्या आधारावर, तो घरधनी निर्दयी व अन्यायी आहे असे आपल्याला वाटू शकते. आपल्यावर अन्याय झाल्याची तक्रार करणाऱ्‍या कामकऱ्‍यांना त्याने जे उत्तर दिले, त्यावरूनही त्याने आपल्या अधिकाराचा गैरवापर केला असे आपल्याला वाटू शकते. पण, आपल्याला सर्व गोष्टींची माहिती आहे का?

१३. द्राक्षमळ्यातील कामकऱ्‍यांच्या बाबतीत येशूने दिलेल्या दाखल्याबद्दल आपण आणखी कोणता दृष्टिकोन विचारात घेऊ शकतो?

१३ या दाखल्याचे आपण आणखी एका दृष्टिकोनातून परीक्षण करू या. कामकऱ्‍यांना आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याची गरज आहे याची दाखल्यातील घरधन्याला जाणीव होती यात काही शंका नाही. येशूच्या काळात, शेतातील कामकरी रोजंदारीवर काम करायचे. त्यांच्या रोजच्या मजुरीवरच त्यांच्या कुटुंबांचे भागत असे. ही गोष्ट ध्यानात ठेवून, त्या कामकऱ्‍यांचा विचार करा जे घरधन्याला उशिरा सापडले आणि त्यामुळे त्यांनी शेवटचा एकच तास काम केले. केवळ एका तासाच्या मजुरीवर कदाचित त्या कामकऱ्‍यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह झाला नसता. पण, त्यांनी काम करण्याची तयारी दाखवली होती आणि कोणीतरी आपल्याला कामावर घेईल या आशेने ते दिवसभर वाट पाहत राहिले होते. (मत्त. २०:१-७) त्यांना पूर्ण दिवस काम करण्याची संधी मिळाली नाही हा त्यांचा दोष नव्हता. त्यांनी जाणूनबुजून काम करायचे टाळले असे कोणतेही चिन्ह दिसत नाही. अशी कल्पना करा की तुम्हाला मिळणार असलेल्या रोजंदारीवर कुटुंबातील सदस्य विसंबून आहेत याची जाणीव बाळगून तुम्ही काम मिळण्याची दिवसभर वाट पाहत आहात. अशा वेळी तुम्हाला एखादे काम मिळाले तर तुम्हाला किती कृतज्ञता वाटेल—आणि तुमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होईल इतके पैसे मिळाल्याबद्दल तुम्ही किती चकित व्हाल!

१४. द्राक्षमळ्याच्या दाखल्यावरून आपण कोणता मौल्यवान धडा शिकू शकतो?

१४ आता आपण घरधन्याने जे केले त्याचे पुन्हा परीक्षण करू या. त्याने कोणालाही कमी पैसे दिले नाहीत. त्याउलट, सर्व कामकऱ्‍यांना आपल्या व आपल्या कटुंबांच्या उदरनिर्वाहासाठी पैसे मिळवण्याचा हक्क आहे हे लक्षात ठेवून त्याने त्यांच्याशी व्यवहार केला. बाजारात कामकऱ्‍यांची कमतरता नव्हती; त्यामुळे स्वस्तात कामकरी मिळवण्यासाठी घरधनी या कामकऱ्‍यांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊ शकला असता. पण, त्याने तसे केले नाही. त्याचे सर्व कामकरी आपापल्या कुटुंबांचे भरणपोषण करण्यास पुरतील इतके पैसे घेऊन घरी परतले. ही अतिरिक्‍त माहिती विचारात घेतल्यास घरधन्याने जे केले त्याबद्दल आपला दृष्टिकोन बदलू शकतो. त्याने प्रेमळपणाने निर्णय घेतला होता; आपल्या अधिकाराचा त्याने गैरवापर केला नाही. यावरून आपण कोणता धडा शिकू शकतो? हाच की एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला केवळ अर्धवट माहिती असल्यास आपण चुकीच्या निष्कर्षावर पोहचू शकतो. देवाचे नीतिमत्त्व कायदेकानूनांवर, तसेच ते मिळवण्यास मनुष्य पात्र आहे की नाही केवळ यावर आधारित नाही. त्याअर्थी, देवाचे नीतिमत्त्व किती श्रेष्ठ आहे यावर हा दाखला भर देतो.

आपला दृष्टिकोन चुकीचा किंवा मर्यादित असू शकतो

१५. न्याय-अन्याय याच्या बाबतीत आपला दृष्टिकोन चुकीचा किंवा मर्यादित का असू शकतो?

१५ एखाद्या बाबतीत अन्याय झाला आहे असे आपल्याला वाटत असल्यास, आपण आणखी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. ती म्हणजे आपला दृष्टिकोन चुकीचा किंवा मर्यादित असू शकतो. अपरिपूर्णता, पूर्वग्रह किंवा सांस्कृतिक पार्श्‍वभूमी यांमुळे आपण चुकीचा दृष्टिकोन बाळगू शकतो. लोकांचे हेतू आणि त्यांच्या मनात नेमके काय आहे हे जाणून घेण्यास आपण असमर्थ असल्यामुळेदेखील आपला दृष्टिकोन मर्यादित असतो. त्याउलट, अशा कुठल्याच मर्यादा यहोवा आणि येशू यांना नाहीत.—नीति. २४:१२; मत्त. ९:४; लूक ५:२२.

१६, १७. दाविदाने बथशेबेशी व्यभिचार केला तेव्हा यहोवाने स्वतः व्यभिचाराबद्दल दिलेल्या नियमाची त्याने अंमलबजावणी का केली नसेल?

१६ दाविदाने बथशेबेशी केलेल्या व्यभिचाराच्या अहवालाचे आपण परीक्षण करू या. (२ शमु. ११:२-५) मोशेच्या नियमशास्त्रानुसार ते दोघेही मृत्यूदंडास पात्र होते. (लेवी. २०:१०; अनु. २२:२२) यहोवाने त्यांना शिक्षा सुनावली, पण स्वतः घालून दिलेल्या नियमाची त्याने अंमलबजावणी केली नाही. असे करण्याद्वारे यहोवा अन्यायीपणे वागला का? दाविदाची बाजू घेऊन त्याने आपल्याच नीतिमान स्तरांचे उल्लंघन केले का? काही बायबल वाचकांना तसे वाटले आहे.

१७ पण, व्यभिचाराबद्दल असलेला नियम यहोवाने अपरिपूर्ण न्यायाधीशांना दिला होता, जे इतरांच्या मनात काय आहे हे ओळखू शकत नव्हते. असे असले, तरी या नियमामुळे त्यांना सुसंगतपणे न्याय करणे शक्य झाले होते. दुसरीकडे पाहता यहोवा लोकांच्या मनात काय आहे हे पाहू शकतो. (उत्प. १८:२५; १ इति. २९:१७) तेव्हा, यहोवाने अपरिपूर्ण न्यायाधीशांकरता घालून दिलेल्या नियमाचे पालन करण्यास तो बाध्य आहे अशी अपेक्षा आपण करू नये. अशी अपेक्षा करणे म्हणजे सदोष दृष्टी असलेल्या व्यक्‍तीची दृष्टी सुधारण्याकरता बनवण्यात आलेला चष्मा, उत्तम दृष्टी असलेल्या व्यक्‍तीला लावण्यास बळजबरी करण्यासारखे होणार नाही का? दावीद व बथशेबा यांच्या मनात काय आहे हे यहोवा ओळखू शकत होता आणि त्यांनी मनापासून केलेला पश्‍चात्ताप तो पाहू शकत होता. ही गोष्ट लक्षात घेऊन, यहोवाने त्यांचा न्याय दयाळूपणे व प्रेमळपणे केला.

नेहमी यहोवाचे नीतिमत्त्व मिळवण्यास झटत राहा

१८, १९. कोणती गोष्ट आपल्याला नीतिमत्त्वाच्या आपल्या स्वतःच्या स्तरांच्या आधारावर यहोवाबद्दल मत न बनवण्यास मदत करेल?

१८ तर मग, एखाद्या गोष्टीच्या बाबतीत यहोवा अन्यायीपणे वागला असे कधी आपल्याला वाटल्यास—मग आपण ते बायबलमधील एखाद्या वृत्तान्तात वाचलेले असो किंवा आपण आपल्या वैयक्‍तिक जीवनात ते अनुभवलेले असो—आपण कधीही नीतिमत्त्वाच्या आपल्या स्वतःच्या स्तरांच्या आधारावर देवाबद्दल मत बनवू नये. हे आठवणीत असू द्या की आपल्याला नेहमीच सर्व गोष्टी माहीत नसतात आणि आपला दृष्टिकोन चुकीचा किंवा मर्यादित असू शकतो. “माणसाच्या रागाने देवाच्या नीतिमत्त्वाचे कार्य घडत नाही,” हे कधीही विसरू नका. (याको. १:१९, २०) असे केल्यास, आपले मन कधीही “परमेश्‍वरावर रुष्ट” होणार नाही.—नीति. १९:३.

१९ येशूप्रमाणे, आपणही हे मान्य करू या की केवळ यहोवालाच नीतिमान काय व चांगले काय याबद्दल स्तर बनवण्याचा अधिकार आहे. (मार्क १०:१७, १८) तेव्हा, यहोवाच्या स्तरांबद्दल ‘यथार्थ ज्ञान’ किंवा ‘खरेपणाचे ज्ञान’ घेण्यास प्रयत्नशील असा. (रोम. १०:२; २ तीम. ३:७, पं.र.भा.) यहोवाचे स्तर स्वीकारण्याद्वारे व त्याच्या इच्छेनुसार जीवन जगण्याद्वारे आपण पहिल्याने “त्याचे नीतिमत्त्व” मिळवण्यास झटत आहोत हे आपण दाखवतो.—मत्त. ६:३३.

[तळटीप]

^ परि. 5 एका विद्वानानुसार, “स्थापन करणे” असे भाषांतर केलेल्या मूळ भाषेतील शब्दाचा अर्थ, “स्मारक उभा करणे” असादेखील होऊ शकतो. त्याअर्थी, ते यहुदी, देवाच्या स्तुतीसाठी नव्हे, तर स्वतःच्याच स्तुतीसाठी एक लाक्षणिक स्मारक उभा करत होते.

तुम्हाला आठवते का?

• यहोवाचे नीतिमत्त्व मिळवण्यास झटणे का महत्त्वाचे आहे?

• कोणते दोन धोके आपण टाळले पाहिजेत?

• आपण पहिल्याने देवाचे नीतिमत्त्व मिळवण्यास कसे झटू शकतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[९ पानांवरील चित्र]

मंदिरात प्रार्थना करणाऱ्‍या दोन माणसांबद्दल येशूने दिलेल्या दृष्टान्तातून आपण कोणता धडा शिकतो?

[१० पानांवरील चित्र]

शेवटचा एक तास काम करणाऱ्‍यांनाही दिवसभर कामकरणाऱ्‍यांइतकीच मजुरी देणे हा अन्याय होता का?