व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

उपकारी मनोवृत्ती बाळगा

उपकारी मनोवृत्ती बाळगा

रहस्य ३

उपकारी मनोवृत्ती बाळगा

बायबल काय शिकवते? “प्रत्येक गोष्टीत उपकारस्तुती करा.”—१ थेस्सलनीकाकर ५:१८, पं.र.भा.

समस्या? आपल्या चारही बाजूला, गर्विष्ठ व उपकाराची जाणीव नसलेले लोक आहेत. आणि त्यांच्या या मनोवृत्तीचा आपल्यावर सहज परिणाम होऊ शकतो. (२ तीमथ्य ३:१, २) तसेच, आधीच धावपळीचे आपले जीवन कदाचित आपण आणखी क्लिष्ट बनवू. समस्यांच्या ओझ्याखाली आपण इतके दबून जाऊ किंवा स्वतःच्या गोष्टी करण्यात इतके गढून जाऊ की आपल्याजवळ जे काही आहे त्याबद्दल किंवा इतर जण आपल्यासाठी करत असलेल्या गोष्टींबद्दल कृतज्ञता दाखवण्यासाठी आपल्याकडे वेळच उरणार नाही.

तुम्ही काय करू शकता? तुम्ही उपभोगत असलेल्या चांगल्या गोष्टींवर मनन करण्यासाठी वेळ काढा. कबूल आहे, की समस्यांच्या ओझ्याखाली तुम्हाला दबून गेल्यासारखे वाटेल. पण, राजा दाविदाच्या उदाहरणाचा विचार करा. कधीकधी तो खूप निराश होत असे, त्याच्यावर आलेल्या परीक्षांमुळे त्याचे अंतःकरण बधीर होत असे. असे असूनही त्याने देवाला अशी प्रार्थना केली: “मी . . . तुझ्या सर्व कृत्यांचे मनन करितो; तुझ्या हातच्या कृतीचे चिंतन करितो.” (स्तोत्र १४३:३-५) परीक्षाप्रसंगीदेखील दाविदाने उपकारी मनोवृत्ती टिकवून ठेवली व आहे त्यात तो समाधानी राहिला.

इतरांनी तुमच्यासाठी जे काही केले आहे त्यावर विचार करा आणि त्यांच्या प्रयत्नांबद्दल त्यांचे आभार माना. येशूने याबाबतीत एक सुरेख उदाहरण मांडले. एकदा, मरीया नावाच्या त्याच्या एका स्नेहीने त्याच्या डोक्यावर व पायांवर महागडे तेल ओतले तेव्हा काहींनी त्याला असे विचारले: “ह्‍या सुगंधी तेलाची अशी नासाडी कशासाठी केली?” * ज्यांनी हा आक्षेप घेतला होता त्यांना असे वाटत होते, की हे महागडे तेल विकून आलेले पैसे गोरगरिबांमध्ये वाटता आले असते. पण येशूने या लोकांना उत्तर दिले: “हिच्या वाटेस जाऊ नका, हिला त्रास का देता? हिने माझ्यासाठी एक सत्कृत्य केले आहे.” (मार्क १४:३-८; योहान १२:३) मरीयेने जे केले नाही त्यावर लक्ष केंद्रित न करता, तिने जे केले त्याची त्याने प्रशंसा केली.

काही लोक, घरातल्या सदस्यांची, मित्रांची किंवा त्यांना मिळालेल्या आशीर्वादांची कदर, ते गेल्यानंतर करतात. पण सध्या तुम्ही उपभोगत असलेल्या चांगल्या गोष्टींचा विचार करून हा दुःखद परिणाम टाळू शकता. तुम्हाला ज्या विशिष्ट गोष्टींबद्दल कृतज्ञता वाटते त्यांचा तुम्ही विचार करू शकता, कदाचित तुम्ही त्यांची यादी बनवू शकता.

“प्रत्येक उत्तम देणगी” देवाकडून येत असल्यामुळे, आपण प्रार्थनेत त्याला याबद्दल कृतज्ञता व्यक्‍त करू शकतो. (याकोब १:१७) आपण नियमित प्रार्थनेद्वारे देवाचे आभार मानले तर उपकारी मनोवृत्ती टिकवून ठेवू शकू व जीवनात संतुष्ट राहू.—फिलिप्पैकर ४:६, ७. (w१०-E ११/०१)

[तळटीप]

^ पहिल्या शतकात, घरी आलेल्या पाहुण्याच्या डोक्यावर तेल ओतून आदरातिथ्य दाखवण्याची एक प्रथा होती; आणि पायांवर तेल ओतणे हे नम्रता दर्शवणारे कार्य होते.

[६ पानांवरील चित्र]

इतर जण तुमच्यासाठी जे काही करतात त्याबद्दल तुम्ही त्यांचे आभार मानता का?