व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आपल्या मुलांना लैंगिक शिक्षण द्या

आपल्या मुलांना लैंगिक शिक्षण द्या

कौटुंबिक सौख्यानंदाच्या गुरुकिल्ल्या

आपल्या मुलांना लैंगिक शिक्षण द्या

अपूर्वा * नावाची एक कुमारवयीन म्हणते: “कधीकधी मी, सेक्सबद्दलची काही माहिती जाणून घ्यायला उत्सुक असते, पण मला आईबाबांना त्याबद्दल विचारायला भीती वाटते. त्यांना वाटेल, की मी काहीतरी वाईट करणार आहे.”

अपूर्वाची आई, अलका म्हणते: “मला पुष्कळदा, अपूर्वाबरोबर निवांत बसून सेक्सविषयी तिला सांगावसं वाटतं. पण ती तिच्याच आयुष्यात व्यस्त दिसते. बोलत बसायची तिला सवड नाही, असं मला वाटतं.”

आज सेक्सविषयी अगदी खुल्लमखुल्ला बोलले जाते. टीव्हीवर, चित्रपटांमध्ये, जाहिरातींमध्ये सेक्सबद्दल दाखवले जाते. पण असे एक ठिकाण आहे जेथे सेक्सचा बागुलबुवा केला जातो. पालक व मुले यांच्यात सेक्सबद्दल काहीच संभाषण होत नाही. कॅनडातील मायकल नावाचा एक १६ वर्षीय तरुण म्हणतो: “आम्हा तरुणांना सेक्सविषयी बोलायला किती लाज वाटते, हे आमच्या आईबाबांना कळलं पाहिजे. त्यांच्यापेक्षा आम्हाला आमच्या मित्रांबरोबर बोलायला सोपं वाटतं.”

मुलांना जशी त्यांच्या आईबाबांबरोबर या विषयावर बोलायला लाज वाटते, तसेच आईबाबांनाही आपल्या मुलांबरोबर या विषयावर बोलायला लाज वाटते. आरोग्य शिक्षक डेब्रा डब्ल्यू. हाफ्नर, बियॉण्ड द बिग टॉक या आपल्या पुस्तकात म्हणतात: “पुष्कळ पालकांनी मला सांगितलं, की त्यांनी लैंगिकतेविषयी किंवा मग वयात आल्यावर काय-काय होत असतं याविषयावर असलेलं पुस्तक आपल्या मुलांच्या खोलीत जाऊन ठेवलं आणि पुन्हा त्यांच्याबरोबर त्यावर कसलीही चर्चा केली नाही.” हाफ्नर म्हणतात, यावरून पालक आपल्या मुलांना असा स्पष्ट संदेश देत असतात की “तुमच्या शरीराविषयी, सेक्सविषयी तुम्हाला माहिती मिळावी अशी आमची इच्छा आहे पण ती माहिती आम्ही तुम्हाला देणार नाही, तुमची तुम्हीच ती वाचून घ्या.”

तुम्हाला जर मुले असतील तर तुमचा दृष्टिकोन वर सांगितलेल्या पालकांसारखा नसावा. होय, तुम्ही स्वतः तुमच्या मुलांना सेक्सबद्दलची माहिती देणे अतिशय महत्त्वाचे आहे. हे का महत्त्वाचे आहे त्याच्या तीन कारणांचा विचार करा:

१. सेक्सबद्दल जगाची व्याख्या बदलली आहे. “आजकाल लोक, सेक्सची परिभाषा—नवरा-बायकोत असलेले संबंध, असा विचार करत नाहीत. कारण आज, मौखिक सेक्स, गुद सेक्स, सायबर सेक्स आहे; इतकेच नव्हे तर फोनवरूनही सेक्सबद्दलची माहिती मिळते,” असे २० वर्षांचा जयंत म्हणतो.

२. तुमच्या मुलांना कदाचित कोवळ्या वयातच सेक्सबद्दल चुकीची माहिती मिळेल. शिला नावाची एक आई म्हणते: “आपली मुलं शाळेत जायला लागल्यापासूनच सेक्सबद्दलच्या गोष्टी त्यांच्या कानावर पडू लागतात. आणि सेक्सबद्दलचा आपला जो दृष्टिकोन आहे तो त्यांना समजणार नाही.”

३. तुमच्या मुलांच्या मनात सेक्सबद्दल पुष्कळ प्रश्‍न असतील पण, बहुतेकदा ते स्वतःहून तुमच्याकडे याबद्दलची चर्चा करायला येणार नाहीत. “खरं सांगू का, सेक्सबद्दल मी आईबाबांबरोबर कसं बोलायला सुरुवात करू तेच मला कळत नाही,” असे ब्राझीलमधील १५ वर्षांची ॲना म्हणते.

पण, तुमच्या मुलांबरोबर सेक्सबद्दल बोलणे ही, देवाने तुमच्यावर सोपवलेल्या जबाबदारीपैकी एक आहे. (इफिसकर ६:४) हे खरे आहे, की हा विषयच असा आहे, की तुम्हाला व तुमच्या मुलांना यावर बोलायला संकोच वाटेल. पण या विषयावर बोलण्याची अनेक चांगली कारणे आहेत. अनेक युवकांना, दीपा नावाच्या एका १४ वर्षीय तरुणीप्रमाणे वाटते. ती म्हणते: “आम्हाला, कुठल्यातरी एखाद्या शिक्षकाकडून किंवा टीव्हीवरील कार्यक्रमातून नव्हे तर आमच्या आईबाबांनी सेक्सविषयी सांगितलेलं आवडेल.” मग, बोलायला संकोच वाटणाऱ्‍या परंतु महत्त्वाच्या विषयावर तुम्ही तुमच्या मुलांशी कसे बोलू शकाल? *

मुलाचे वय लक्षात घ्या

मुले जर पूर्णपणे एकाकी असतील तरच त्यांना सेक्सविषयी काहीही ऐकायला मिळणार नाही. अन्यथा, अगदी कोवळ्या वयापासूनच त्यांना सेक्सविषयीची माहिती मिळू लागते. भरीत भर म्हणजे, या ‘शेवटल्या काळात’ दुष्ट लोक वाईट कामे करण्यात ‘अधिक सरसावले’ आहेत. (२ तीमथ्य ३:१, १३) आणि दुःखाची गोष्ट म्हणजे पुष्कळ लहान मुलांचे अशा नराधमांकडून लैंगिक शोषण केले जाते.

त्यामुळे, तुमची मुले लहान आहेत तेव्हापासूनच तुम्ही त्यांना सेक्सबद्दलचे शिक्षण देणे अगत्याचे आहे. रन्येट नावाची जर्मनीतील एक आई म्हणते: “मुलं कुमारवयाची झाल्यावर त्यांच्याशी बोलू, असा विचार करून तुम्ही जर थांबून राहिलात तर, तुमची मुलं जेव्हा कुमारवयात येतात तेव्हा, गोंधळून टाकणाऱ्‍या मनःस्थितीमुळे ते तुमच्याशी या विषयावर खुल्या मनाने चर्चा करायला लाजतील.” यास्तव, मुलांचे वय लक्षात घेऊन त्यानुसार त्यांना माहिती द्या.

अद्याप शाळेत जात नसलेल्या मुलांना: जनेंद्रियांची योग्य नावे त्यांना सांगा व यांना कोणीही हात लावू नये, हे विशेष जोर देऊन सांगा. मेक्सिकोतील जुलिया नावाची एक आई म्हणते: “माझा मुलगा तीन वर्षांचा होता तेव्हापासूनच मी त्याला शिकवू लागले. माझा मुलगा, शिक्षकांपासून, पाळणाघर चालवणाऱ्‍यांपासून किंवा मोठ्या मुलांपासूनही सुरक्षित नाही, या विचारानेच मी शहारून जात होते. स्वतःचं संरक्षण कसं करायचं, हे त्याला माहीत असायलाच हवं.”

हे करून पाहा: कोणीही आपल्या जनेंद्रियांना हात लावायचा प्रयत्न करत असेल तर त्याचा प्रतिकार करायला आपल्या मुलांना शिकवा. जसे की, कोणीही तुमच्या मुलीच्या अथवा मुलाच्या गुप्तांगांना हात लावायचा प्रयत्न करत असेल तर जोरदार व मोठ्या आवाजात असे म्हणायला शिकवा: “थांबा! नाहीतर मी तुमचं नाव सांगेन!” आणि जर कधी कोणीही—मग त्या व्यक्‍तीने बक्षीस देण्याचे आमिष दाखवले असले किंवा धमकी दिली असली तरी, त्याबद्दल लगेच सांगणे बरोबर आहे, अशी आपल्या मुलांना खात्री द्या.

प्राथमिक शाळेतील मुलांना: या वयाच्या मुलांच्या ज्ञानात तुम्ही आणखी भर घालू शकता. प्रकाश नावाचा एक पिता म्हणतो: “कोणतेही बोलणे सुरू करण्याआधी खडा टाकून पाहा. तुमच्या मुलांना आधीपासूनच काय माहीत आहे, त्यांना आणखी माहिती हवी आहे का, ते पाहा. बळजबरीने विषय काढू नका. तुम्ही तुमच्या मुलांबरोबर नियमाने वेळ घालवला तर ते स्वतःहूनच या विषयावर बोलू लागतील.”

हे करून पाहा: एकदाच ‘मोठे संभाषण’ करण्याऐवजी, अनेकदा, लहानलहान चर्चा करा. (अनुवाद ६:६-९) अशाने तुम्ही तुमच्या मुलांना आवश्‍यकतेपेक्षा अधिक माहिती देणार नाही. शिवाय, ते जसजसे मोठे होत राहतील तसतसे त्यांच्या प्रौढतेनुसार त्यांच्याजवळ माहिती असेल.

कुमारवयाच्या मुलांना: आता तुम्ही सेक्सबद्दलच्या शारीरिक, भावनिक व नैतिक पैलूंची पुरेशी माहिती देऊ शकता. आधी उल्लेख करण्यात आलेल्या १५ वर्षीय ॲनाने म्हटले: “माझ्या शाळेतील कितीतरी मुलं-मुली लैंगिक संबंध ठेवतात. मी यहोवाची साक्षीदार असल्यामुळे मला या विषयाची माहिती असली पाहिजे. तसा हा विषय उघडपणे बोलला जात नाही, तरीपण मला याविषयी माहीत असणं महत्त्वाचं आहे.” *

सावधगिरीचा इशारा: आपण काही तरी चूक करतोय असा आपल्या पालकांना संशय येईल या भीतीने कुमारवयीन कदाचित प्रश्‍न विचारायला कचरतील. स्तवन नावाच्या एका पित्याच्या हे लक्षात आले. ते म्हणतात: “आमचा मुलगा सेक्सचा विषय काढला की मौन बाळगायचा. नंतर आम्हाला कळलं, की आम्हाला त्याच्या वागण्याचा संशय येत होता, अशी भीती वाटून तो काही बोलायचंच टाळत होता. मग आम्ही त्याला प्रेमानं हे स्पष्ट सांगितलं, की आम्हाला त्याचा संशय येतोय म्हणून नव्हे तर त्याच्या आजूबाजूच्या वाईट परिणामांचा त्याला योग्यरीतीने प्रतिकार करता यावा म्हणून आम्ही या विषयांची त्याच्याबरोबर चर्चा करू पाहत होतो.”

हे करून पाहा: सेक्सबद्दलच्या एखाद्या विषयावर आपल्या कुमारवयीन मुलाला अथवा मुलीला एकदम सरळ प्रश्‍न विचारण्याऐवजी, तिच्या किंवा त्याच्या वर्गातील मुला-मुलींचे या विषयावर काय मत आहे ते विचारा. तुम्ही म्हणू शकता: “पुष्कळ लोकांना आज, मौखिक सेक्स, खरोखर सेक्स वाटत नाही. तुझ्या वर्गातल्या मुलांना व मुलींनाही असंच वाटतं का?” जरा वळसा घेऊन विचारलेल्या प्रश्‍नांमुळे तुमचा किशोरवयीन मुलगा किंवा मुलगी खुलेल व निसंकोचपणे स्वतःचे मत व्यक्‍त करेल.

नाजूक विषयावर निसंकोचपणे बोला

सेक्स हा नाजूक विषय असल्यामुळे मुलांबरोबर त्याची चर्चा करणे तुम्हाला महाकठीण वाटेल, हे कबूल आहे. पण तुमचे प्रयत्न वाया जाणार नाहीत. दीक्षा नावाची एक आई म्हणते: “काही काळानंतर हा संकोच निघून जातो आणि तुमच्या मुलांबरोबर सेक्ससारख्या नाजूक विषयांवर खुल्या मनाने चर्चा केल्याने मुलं तुमच्या जवळ येतात आणि तुमच्यातला बंध आणखी मजबूत होतो.” आधी उल्लेखलेल्या स्तवन यांनाही हे पटते. ते म्हणतात: “कुटुंबात तुम्ही, अगदी कोणत्याही विषयावर चर्चा करायची सवय ठेवली, तर सेक्स सारख्या नाजूक विषयावरदेखील तुम्ही तुमच्या मुलांबरोबर चर्चा करू शकाल. तसा संकोच हा कायमचा निघून जाणार नाही, पण निरोगी ख्रिस्ती कुटुंबासाठी घरात खुले संभाषण हे असलेच पाहिजे!” (w१०-E ११/०१)

[तळटीपा]

^ या लेखातील नावे बदलण्यात आली आहेत.

^ तुमच्या मुलांबरोबर सेक्सबद्दल बोलणे महत्त्वाचे का आहे हे या लेखात सांगितले जाईल. या शृंखलेत पुढे येणाऱ्‍या लेखात, मुलांबरोबरच्या अशा चर्चांदरम्यान तुम्ही त्यांना नैतिक मूल्ये कशी शिकवू शकता, त्यावर चर्चा केली जाईल.

^ आपल्या कुमारवयीन मुलांबरोबर सेक्सविषयी बोलताना, यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले तरुणांचे प्रश्‍न—उपयुक्‍त उत्तरे पुस्तक तसेच सावध राहा! एप्रिल ८, १९९५, पृ. २३ वरील माहितीचा उपयोग करा.

[२२ पानांवरील चौकट/चित्र]

स्वतःला विचारा . . .

जगाच्या विविध भागांतील तरुणांनी मांडलेली मते वाचा आणि मग, सोबत दिलेले प्रश्‍न स्वतःला विचारा:

• “माझे आईबाबा मला, सेक्सबद्दलचे लेख वाचायला सांगतात आणि काही प्रश्‍न असतील तर आम्हाला विचार, असं म्हणतात. पण तेच जर या विषयावर माझ्याशी प्रत्यक्ष बोलले तर किती बरं होईल.”—ॲना, ब्राझील.

आपल्या मुलांना सेक्सबद्दलचे लेख देऊन मोकळे होण्याऐवजी तुम्ही जातीने त्यांच्याशी या विषयावर बोलणे का महत्त्वाचे आहे असे तुम्हाला वाटते?

• “सेक्सबद्दल मला पुष्कळ विकृत गोष्टी माहीत आहेत—अशा गोष्टी की ज्या कदाचित माझ्या बाबांनाही माहीत नसाव्यात. आणि या गोष्टींबद्दल मी जर त्यांना विचारलं ना, तर त्यांना धक्काच बसेल.”—केन, कॅनडा.

तुमच्या मुलाला अथवा मुलीला असलेल्या चिंतांबद्दल तुमच्याशी कसं बोलायचं, याबाबत त्याला किंवा तिला कोणती भीती वाटत असेल?

• “माझ्या मनात सेक्सबद्दल एक प्रश्‍न होता. मी कसंबसं माझं सर्व धैर्य एकवटून आईबाबांना तो प्रश्‍न विचारला आणि ते दोघंही माझ्यावर बरसले. ‘तू हा प्रश्‍न का विचारत आहेस? काही झालंय का?’ असं ते मला विचारू लागले.” —मासामी, जपान.

सेक्सबद्दल तुमचे मूल तुम्हाला एखादा प्रश्‍न विचारते तेव्हा, तुम्ही दाखवत असलेल्या प्रतिक्रियेमुळे कशा प्रकारे संभाषणाचे दार एकतर उघडू शकते किंवा मग बंद होऊ शकते?

• “माझ्या आईबाबांनी मला फक्‍त इतकं सांगितला ना, की ते माझ्या वयाचे असताना, त्यांनीही हेच प्रश्‍न विचारले होते त्यामुळे तू जे प्रश्‍न विचारतेस त्यात गैर काही नाही, तर माझ्या मनात चाललेली घालमेल कमी होईल.”—लिझेट, फ्रान्स.

तुमच्या मुलाला अथवा मुलीला सेक्सबद्दल बोलताना वाटणारा संकोच तुम्ही कसा घालवू शकता?

• “माझी आईच मला अगदी प्रेमळपणे सेक्सबद्दलचे काही प्रश्‍न विचारायची. मला वाटतं, हे खूप महत्त्वाचं आहे. कारण मग मुलांना असं वाटत नाही, की पालकांना त्यांचा संशय येतोय.”—जेराल्ड, फ्रान्स.

सेक्सबद्दल बोलताना तुमचा आवाज कसा असतो? तुम्हाला काही सुधारणा करण्याची गरज आहे का?