व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“तो तुला प्राप्त होईल”

“तो तुला प्राप्त होईल”

देवाच्या जवळ या

“तो तुला प्राप्त होईल”

१ इतिहास २८:९

तुम्हाला देव कोण आहे माहीत आहे? या प्रश्‍नाचे उत्तर वाटते तितके सोपे नाही. देवाला खरोखर ओळखणे म्हणजे त्याची इच्छा व त्याचे मार्ग यांच्याशी चांगल्या प्रकारे परिचित होणे. आपण त्याच्या इतके जवळ येतो, की आपल्या संपूर्ण जीवनावर त्याचा खोलवर प्रभाव पडतो. पण देवाबरोबर असे सख्य जोडणे खरोखरच शक्य आहे का? आणि आहे तर मग कसे? दाविदाने आपला पुत्र शलमोन याला जो सल्ला दिला त्यात या प्रश्‍नाचे उत्तर आहे. १ इतिहास २८:९ या वचनात हा सल्ला आहे.

आपल्या डोळ्यांसमोर हे चित्र उभे करा. दावीद जवळजवळ ४० वर्षांपासून इस्राएल राष्ट्रावर राज्य करत आहे आणि त्याच्या कारकीर्दित राष्ट्राची भरभराट झाली आहे. दाविदानंतर सिंहासनावर त्याचा मुलगा शलमोन बसणार आहे. पण तो अजूनही लहान आहे. (१ इतिहास २९:१) मरणशय्येवर असताना दावीद शलमोनाला कोणता सल्ला देतो?

दाविदाने आयुष्यभर देवाची सेवा केली. त्याच्या स्वतःच्या या प्रगल्भ अनुभवावरून तो त्याला म्हणतो: “हे माझ्या पुत्रा, शलमोना तू आपल्या बापाच्या देवाला ओळख.” देवाला ओळख, असे जेव्हा दाविदाने शलमोनाला सांगितले, तेव्हा त्याला असे म्हणायचे नव्हते, की देवाबद्दलचे फक्‍त पुस्तकी ज्ञान घे. कारण, शलमोनही दाविदाप्रमाणे यहोवाची उपासना करायचा. शिवाय, इब्री शास्त्रवचनांचे सुमारे एकतृतीयांश लिखाण पूर्ण झाले होते; त्यामुळे या पवित्र लिखाणांमध्ये देवाबद्दल जे काही सांगण्यात आले होते, ते शलमोनाला नक्कीच माहीत असावे. “ओळख” असे भाषांतर करण्यात आलेला इब्री शब्द, “दाट परिचय” यास सूचित करतो, असे एका विद्वानाने म्हटले. होय, आपल्या पुत्रानेही आपल्याप्रमाणेच, देवाबरोबर दाट परिचय करून घ्यावा, अशी दाविदाची इच्छा होती. यहोवाबरोबरचे हे घनिष्ठ नाते दाविदाने खूप जपून ठेवले होते.

शलमोनाने यहोवाबरोबर अशी जवळीक वाढवली तर जीवनाकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन आणि त्याचे संपूर्ण जीवन पार बदलेल. दावीद आपल्या मुलाला असे आर्जवतो: “सात्विक चित्ताने व मनोभावे त्याची [देवाची] सेवा कर.” * देवाशी दाट परिचय झाल्यानंतरच त्याची सेवा करण्याची आज्ञा दावीद शलमोनाला देतो. होय, देवाला जवळून ओळखल्यानंतरच आपण त्याची सेवा करू लागू. पण त्याची सेवा आपण अर्ध्या मनाने, द्वीधा मनाने किंवा दुटप्पीपणे करू नये. (स्तोत्र १२:२; ११९:११३) दावीद आपल्या मुलाला देवाची सेवा सात्विक चित्ताने म्हणजे स्वेच्छेने व मनोभावे करण्याची विनंती करतो.

पण दावीद आपल्या मुलाला, योग्य हेतूने व विचाराने यहोवाची उपासना करण्यास का आर्जवतो? कारण, “परमेश्‍वर सर्वांची मने पारखितो आणि त्यात जे काही विचार व कल्पना उत्पन्‍न होतात त्या त्यास समजतात,” असे दावीदच सांगतो. दाविदाला खूष करण्यासाठी शलमोनाने यहोवाची उपासना करू नये. ज्या लोकांना देवाची सेवा करण्याची मनापासून ओढ आहे केवळ अशाच लोकांना देव शोधतो.

शलमोन आपल्या पित्याच्या उदाहरणाचे अनुकरण करून यहोवाच्या जवळ येणार होता का? हे सर्वस्वी शलमोनावरच अवलंबून होते. दावीद त्याला म्हणतो: “तू त्याच्या भजनी लागशील तर तो तुला प्राप्त होईल, पण तू त्याला सोडिले तर तो तुझा कायमचा त्याग करील.” देवाशी घट्ट नाते जोडून त्याचा उपासक बनण्याकरता शलमोनाने यहोवाला जाणून घेण्याकरता बरेच प्रयत्न करणे आवश्‍यक होते. *

दाविदाने एका बापाप्रमाणे दिलेल्या या सल्ल्यावरून आपल्याला ही खात्री मिळते, की आपण यहोवाशी जवळीक साधावी, अशी खुद्द यहोवाचीच इच्छा आहे. पण त्याला जवळून ओळखण्याकरता आपण “त्याचा शोध” [पं.र.भा.] घेतला पाहिजे. दुसऱ्‍या शब्दांत बायबलमध्ये त्याच्याबद्दलची माहिती खोदून खोदून पाहिली पाहिजे. त्याच्याशी दाट परिचय वाढल्यावरच आपण त्याची सेवा पूर्ण मनाने व स्वेच्छेने करण्यास प्रवृत्त होऊ. आपण अशी सेवा करावी, अशी यहोवाची इच्छा आहे. आणि त्याने आपल्याकडून अशी अपेक्षा बाळगणे अगदी रास्त आहे.—मत्तय २२:३७. (w१०-E ११/०१)

[तळटीपा]

^ काही भाषांतरांमध्ये हे वचन असे आहे: “पूर्ण हृदयाने व उत्सुक मनाने त्याची सेवा कर.”

^ शलमोनाने देवाची सेवा पूर्ण मनाने करण्यास सुरुवात केली खरी, पण तो शेवटपर्यंत विश्‍वासू राहिला नाही.—१ राजे ११:४.