व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मुलांनो—देवाच्या वचनाच्या मार्गदर्शनानुसार चाला

मुलांनो—देवाच्या वचनाच्या मार्गदर्शनानुसार चाला

मुलांनो—देवाच्या वचनाच्या मार्गदर्शनानुसार चाला

“बुद्धी संपादन कर, समजशक्‍ती संपादन कर.”—नीति. ४:५, NW.

१, २. (क) कोणत्या गोष्टीने प्रेषित पौलाला त्याच्यातील संघर्षावर मात करण्यास मदत केली? (ख) तुम्ही बुद्धी व समजशक्‍ती कशी प्राप्त करू शकता?

 “जो मी सत्कर्म करू इच्छितो त्या माझ्याजवळ वाईट आहेच.” हे शब्द कोणाचे आहेत तुम्हाला माहीत आहे का? प्रेषित पौलाचे. पौलाचे यहोवावर प्रेम असले, तरी काही वेळा जीवनात योग्य ते करण्यासाठी त्याला संघर्ष करावा लागला होता. या आंतरिक संघर्षाविषयी त्याला कसे वाटले? त्याविषयी लिहिताना पौलाने म्हटले: “किती मी कष्टी माणूस!” (रोम. ७:२१-२४) पौलाच्या भावना तुम्ही समजू शकता का? तुम्हालाही कधीकधी योग्य ते करण्यासाठी संघर्ष करावा लागतो का? यामुळे तुम्हालाही पौलाप्रमाणे खचून गेल्यासारखे वाटते का? तसे असल्यास निराश होऊ नका. पौलाने त्याच्यासमोर आलेल्या आव्हानांवर यशस्वी रीत्या मात केली. त्याअर्थी, तुम्हीदेखील तुमच्यासमोर येणाऱ्‍या आव्हानांवर यशस्वी रीत्या मात करू शकता.

पौल आपल्या संघर्षात यशस्वी झाला कारण त्याने ‘सुवचनांनुसार’ चालण्याचा प्रयत्न केला. (२ तीम. १:१३, १४) परिणामस्वरूप, आव्हानांवर मात करण्यासाठी व योग्य निर्णय घेण्यासाठी आवश्‍यक असलेली बुद्धी व समजशक्‍ती त्याने प्राप्त केली. यहोवा देव तुम्हालासुद्धा बुद्धी व समजशक्‍ती प्राप्त करण्यास मदत करू शकतो. (नीति. ४:५) त्यासाठी त्याने आपल्या वचनात अर्थात बायबलमध्ये सगळ्यात उत्तम मार्गदर्शन पुरवले आहे. (२ तीमथ्य ३:१६, १७ वाचा.) आपल्या पालकांशी वागताना, पैसे हाताळताना आणि एकटे असताना शास्त्रवचनांत दिलेली तत्त्वे तुम्हाला कशी मदत करू शकतात याचा विचार करा.

कुटुंबात

३, ४. पालकांच्या नियमांचे पालन करणे तुम्हाला कठीण का वाटू शकते, पण पालक मुलांवर बंधने का घालतात?

पालकांच्या बंधनात राहणे तुम्हाला कठीण वाटते का? तुम्हाला असे का वाटत असावे? एक कारण म्हणजे तुम्हाला कदाचित अधिक स्वातंत्र्य हवे असेल. असे वाटणे स्वाभाविक आहे. किंबहुना, प्रौढतेप्रत जाण्याचा हा एक टप्पाच आहे. पण, तुम्ही पालकांसोबत एका घरात राहता तोपर्यंत त्यांच्या आज्ञेत राहणे हे तुमचे कर्तव्य आहे.—इफिस. ६:१-३.

पालकांनी घालून दिलेल्या नियमांकडे व त्यांच्या अपेक्षांकडे योग्य दृष्टिकोनातून पाहिल्यास, त्यांच्या नियमांचे पालन करणे व त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणे तुम्हाला अधिक सोपे जाऊ शकते. काही वेळा तुम्हालाही कदाचित ब्रीएल * नावाच्या तरुणीसारखे वाटेल. अठरा वर्षांच्या या तरुणीने आपल्या आईवडिलांविषयी म्हटले: “तेसुद्धा माझ्या वयातून गेले आहेत ही गोष्ट ते पूर्णपणे विसरून गेले आहेत. ते मला बोलूच देत नाहीत किंवा मला माझे निर्णय घेऊ देत नाहीत; ते मला अजूनही लहान समजतात.” ब्रीएलप्रमाणे तुम्हालासुद्धा असे वाटू शकते की तुमचे पालक तुमच्या स्वातंत्र्यावर जरा जास्तच बंधने घालत आहेत. पण, तुमचे पालक मुळात यासाठी तुमच्यावर बंधने घालतात कारण त्यांना तुमची काळजी वाटते. याशिवाय, ख्रिस्ती पालकांना याची जाणीव असते, की ते तुमच्यावर जे संस्कार घडवतात त्याविषयी त्यांना यहोवाला जाब द्यावा लागेल.—१ तीम. ५:८.

५. पालकांच्या आज्ञांचे पालन करण्याचा काय फायदा होऊ शकतो?

खरेतर, पालकांच्या नियमांचे पालन करणे हे बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासारखे आहे. तुम्ही जितक्या तत्परतेने बँकेचे हफ्ते भराल तितके अधिक तुम्हाला कर्ज देण्यास बँक उत्सुक असेल. त्याचप्रमाणे, तुम्हीदेखील आदर व आज्ञाधारकतेच्या बाबतीत तुमच्या पालकांचे ऋणी आहात. (नीतिसूत्रे १:८ वाचा.) तुम्ही जितके अधिक त्यांच्या आज्ञेत राहाल तितके अधिक ते तुम्हाला स्वातंत्र्य देण्याची शक्यता आहे. (लूक १६:१०) याउलट, तुम्ही सतत त्यांच्या आज्ञेविरुद्ध वागलात, तर ते तुमच्या स्वातंत्र्यावर मर्यादा घालतील किंवा तुम्हाला मुळीच स्वातंत्र्य देणार नाहीत.

६. पालक आपल्या मुलांना आज्ञाधारक राहण्यास कशी मदत करू शकतात?

पालक आपल्या स्वतःच्या उदाहरणावरून मुलांना आपल्या नियमांचे पालन करण्यास मदत करू शकतात. पालक स्वतः यहोवाच्या नियमांचे स्वेच्छेने पालन करतात तेव्हा ते दाखवतात की देवाचे नियम वाजवी आहेत. यामुळे पालकांनी घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे उचित आहे हे मुलांना समजेल. (१ योहा. ५:३) तसेच, बायबलमध्ये अशी अनेक उदाहरणे आहेत जेव्हा यहोवाने आपल्या सेवकांना विशिष्ट विषयांवर आपली मते व्यक्‍त करण्याची संधी दिली. (उत्प. १८:२२-३२; १ राजे २२:१९-२२) पालकसुद्धा आपल्या मुलांना विविध विषयांवर आपले विचार व्यक्‍त करण्याची संधी देऊ शकतात का?

७, ८. (क) काही मुलांना कोणत्या समस्येचा सामना करावा लागतो? (ख) कोणती गोष्ट लक्षात घेतल्यास पालकांच्या शिस्तीचा तुम्हाला लाभ होऊ शकतो?

मुलांसमोर आणखी एक मोठी समस्या असू शकते. आपले पालक उठसूठ आपल्या चुका काढतात असे त्यांना वाटू शकते. काही वेळा तुम्हालादेखील क्रेग नावाच्या तरुणासारखे वाटले असेल. त्याने म्हटले: “माझी आई माझ्या चुका पकडण्यासाठी एका पोलीस डिटेक्टीव्हसारखी सतत माझ्यावर पाळत ठेवायची.”

आपल्याला आपली चूक दाखवली जाते तेव्हा आपली टीका केली जात आहे असे आपल्याला वाटू शकते. अगदी योग्य कारणासाठी शिस्त लावलेली असली तरी ती स्वीकारणे कठीण असते ही गोष्ट बायबलदेखील मान्य करते. (इब्री १२:११) तर मग, कोणती गोष्ट पालकांच्या शिस्तीचा लाभ घेण्यास तुम्हाला मदत करू शकते? त्यासाठी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवणे जरुरीचे आहे. ती म्हणजे, तुमच्या पालकांचे तुमच्यावर प्रेम आहे त्यामुळे ते तुम्हाला शिस्त लावतात. (नीति. ३:१२) तुम्हाला कोणत्याही वाईट सवयी लागू नयेत आणि तुमच्यावर चांगले संस्कार घडावेत या हेतूने ते तुम्हाला शिस्त लावतात. पालकांना याची जाणीव असते, की तुम्हाला योग्य वळण न लावणे हे जणू तुमचा द्वेष करण्यासारखेच आहे! (नीतिसूत्रे १३:२४ वाचा.) शिवाय, ही गोष्टदेखील लक्षात असू द्या, की तुम्ही आपल्या चुकांतून शिकत असता. त्यामुळे, तुम्ही कोठे चुकता हे तुम्हाला सांगितले जाते तेव्हा त्यामागे दडलेली बुद्धी विचारात घ्या. बायबल म्हणते: “[“बुद्धीचा,” NW] सौदा रुप्याच्या सौद्यापेक्षा, व त्याचा लाभ उत्कृष्ट सोन्यापेक्षा उत्तम आहे.”—नीति. ३:१३, १४.

९. आपल्यावर अन्याय झाला आहे असे समजून त्यावर विचार करत बसण्याऐवजी मुले काय करू शकतात?

पण, चुका पालकांच्या हातूनही होतात. (याको. ३:२) तुम्हाला शिस्त लावताना ते काही वेळा कदाचित अविचारीपणे बोलतील. (नीति. १२:१८) पण, कशामुळे तुमचे पालक तुमच्याशी असे वागत असतील? कदाचित ते तणावाखाली असतील किंवा तुमच्या चुकांकडे पाहून तुमच्यावर चांगले संस्कार करण्यात आपण कमी पडलो ही गोष्ट त्यांना सलत असेल. आपल्यावर अन्याय झाला आहे असे समजून सतत त्यावर विचार करत बसण्याऐवजी तुम्हाला मदत करण्याच्या त्यांच्या मनस्वी इच्छेची तुम्ही कदर करू शकता. शिस्त स्वीकारण्याची तुमची ही वृत्ती मोठे झाल्यानंतरही तुम्हाला फायदेकारक ठरेल.

१०. पालकांच्या नियमांना व त्यांनी दिलेल्या शिस्तीला तुम्ही आणखी चांगला प्रतिसाद कसा देऊ शकता?

१० पालकांच्या नियमांना व त्यांनी दिलेल्या शिस्तीला आणखी चांगला प्रतिसाद देण्याची तुमची इच्छा आहे का? असल्यास, तुम्हाला तुमचे संवादकौशल्य वाढवावे लागेल. तुम्हाला हे कसे करता येईल? त्यासाठी आवश्‍यक असलेली पहिली गोष्ट म्हणजे ऐकणे. बायबल म्हणते: ‘ऐकावयास तत्पर, बोलावयास धीमा, रागास मंद असा.’ (याको. १:१९) आपलेच खरे करण्याचा उतावळेपणा करण्याऐवजी, आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा आणि तुमचे पालक काय सांगतात ते ऐकून घेण्याचा प्रयत्न करा. ते कसे बोलले त्याकडे नव्हे, तर ते काय बोलले त्याकडे लक्ष द्या. मग, तुमची चूक आदरपूर्वक मान्य करा व ते जे काही बोलले ते तुम्हाला समजले आहे हे त्यांना दाखवा. त्यावरून त्यांना याचे आश्‍वासन मिळेल की तुम्ही त्यांचे बोलणे नीट ऐकले आहे. पण, आपण असे का बोललो किंवा असे का वागलो याचे तुम्हाला स्पष्टीकरण द्यायचे झाल्यास काय? बहुतेक वेळा, तुमच्या पालकांच्या म्हणण्याप्रमाणे करेपर्यंत तुम्ही ‘आपली वाणी स्वाधीन ठेवणे शहाणपणाचे’ आहे. (नीति. १०:१९) एकदा का तुमच्या पालकांच्या लक्षात आले की तुम्ही त्यांचे म्हणणे ऐकले आहे, मग तुमचे म्हणणे ऐकून घेण्यास ते अधिक उत्सुक असतील. अशा प्रकारे, तुम्ही त्यांच्याशी प्रौढपणे वागता तेव्हा तुम्ही दाखवून देत असता की तुम्ही देवाच्या वचनाच्या मार्गदर्शनानुसार चालत आहात.

पैसे हाताळताना

११, १२. (क) पैशाच्या बाबतीत देवाचे वचन आपल्याला काय करण्याचा सल्ला देते, आणि का? (ख) पैशाचे उत्तम नियोजन करण्यास तुमचे पालक कशा प्रकारे तुम्हाला मदत करू शकतात?

११ ‘पैसा आश्रय देणारा आहे,’ असे बायबल म्हणते. पण, हेच वचन असेही सांगते, की बुद्धी किंवा शहाणपण पैशापेक्षा कितीतरी पटीने अधिक मौल्यवान आहे. (उप. ७:१२) देवाचे वचन आपल्याला पैशावर प्रेम करण्याचा नव्हे, तर पैशाबद्दल योग्य दृष्टिकोन बाळगण्याचा सल्ला देते. तुम्ही पैशावर प्रेम का करू नये? हे उदाहरण विचारात घ्या: एका कुशल आचाऱ्‍यासाठी एक धारदार सुरी खूप उपयुक्‍त असू शकते. पण, तीच सुरी एका बेपर्वा व्यक्‍तीने हाताळल्यास गंभीर दुखापत होऊ शकते. त्याचप्रमाणे, पैशाचा सुज्ञपणे उपयोग केल्यास आपल्याला फायदा होऊ शकतो. पण, “जे धनवान होऊ पाहतात” ते सहसा आपले मैत्रीसंबंध, कौटुंबिक नातेसंबंध आणि इतकेच नव्हे तर देवासोबतचा नातेसंबंधही तोडून टाकतात. परिणामी, ते “पुष्कळशा खेदांनी” स्वतःला भोसकून घेतात.१ तीमथ्य ६:९, १० वाचा.

१२ तुम्ही पैशाचा सुज्ञपणे उपयोग कसा करू शकता? आपल्या खर्चाचे नियोजन कसे करावे याविषयी आपल्या पालकांचा सल्ला घ्या. “ज्ञानी पुरुषाने ऐकावे, त्याचे ज्ञान वाढावे; बुद्धिमानाने सुविचार प्राप्त करून घ्यावा,” असे शलमोनाने लिहिले. (नीति. १:५) ॲना नावाच्या एका तरुणीने याबाबतीत आपल्या पालकांचे उत्तम मार्गदर्शन घेतले. ती म्हणते, “खर्चाचं अंदाजपत्रक कसं बनवायचं हे माझ्या वडिलांनी मला शिकवलं. तसंच, आपल्या पैशाचा डोळसपणे उपयोग कसा करावा, पैशाचा हिशोब कसा ठेवावा हेदेखील त्यांनी मला शिकवलं.” त्याचप्रमाणे ॲनाच्या आईनेदेखील तिला काही व्यावहारिक गोष्टी शिकवल्या. “कोणतीही गोष्ट विकत घेण्याआधी चार ठिकाणी त्याच्या किंमतीची चौकशी करणे किती फायदेकारक असते हे तिनं मला शिकवलं,” असे ॲना म्हणते. याचा ॲनाला काय फायदा झाला? ती म्हणते: “आता मी स्वतः माझ्या पैशाचं नियोजन करू शकते. मी खूप विचारपूर्वक खरेदी करते. अशानं मी अनावश्‍यक कर्जाच्या फंदात पडत नाही आणि त्यामुळे मी तणावमुक्‍त राहते.”

१३. पैसे खर्च करण्याच्या बाबतीत तुम्ही स्वतःला शिस्त कशी लावू शकता?

१३ तुम्ही अविचारीपणे किंवा निव्वळ मित्रांवर छाप पाडण्यासाठी खरेदी केली तर तुमच्यावर लवकरच कर्जबाजारी होण्याची वेळ येऊ शकते. अशा पाशांपासून कोणती गोष्ट तुमचे संरक्षण करू शकेल? पैसे खर्च करण्याचा प्रश्‍न येतो तेव्हा तुम्ही स्वतःला शिस्त लावली पाहिजे. वीस वर्षांची एलिना असेच करते. ती म्हणते: “मी मित्रमैत्रिणींसोबत बाहेर जाते तेव्हा किती खर्च करायचा हे मी आधीच ठरवते. . . . तसंच, जे मित्रमैत्रिणी काळजीपूर्वक खर्च करतात आणि कोणतीही गोष्ट पाहताच क्षणी खरेदी न करता आधी चार ठिकाणी त्या वस्तूच्या किंमतीची चौकशी करून खरेदी करण्याचं मला उत्तेजन देतात अशांसोबतच खरेदी करायला जाणं मी पसंत करते.”

१४. आपण ‘द्रव्याच्या मोहापासून’ सावध का असले पाहिजे?

१४ पैसा कमावणे आणि पैशाचे नियोजन करणे हा आपल्या जीवनातील एक महत्त्वाचा भाग आहे. पण, जे “आपल्या आध्यात्मिक गरजांची जाणीव” राखतात केवळ अशांनाच खरा आनंद मिळतो असे येशूने म्हटले. (मत्त. ५:३, NW) त्याने असा इशारा दिला की ‘द्रव्याच्या मोहासारख्या’ गोष्टींमुळे एका व्यक्‍तीचे आध्यात्मिक गोष्टींवरून लक्ष विचलित होऊ शकते. (मार्क ४:१९) तेव्हा, देवाच्या वचनातील मार्गदर्शनानुसार चालणे आणि पैशाबद्दल संतुलित दृष्टिकोन बाळगणे किती महत्त्वाचे आहे!

एकटे असताना

१५. देवाप्रती असलेल्या तुमच्या एकनिष्ठेची परीक्षा होण्याची सगळ्यात जास्त शक्यता केव्हा असते?

१५ तुम्हाला काय वाटते? देवाप्रती असलेल्या तुमच्या एकनिष्ठेची परीक्षा होण्याची सगळ्यात जास्त शक्यता केव्हा असते? तुम्ही चारचौघांत असता तेव्हा, की एकटे असता तेव्हा? शाळेत किंवा कामाच्या ठिकाणी असताना तुम्ही सहसा संभाव्य आध्यात्मिक धोक्यांचा प्रतिकार करण्यास जागरूक असता. पण, एखाद्या विरंगुळ्याच्या क्षणी तुम्ही अगदी निवांत असता तेव्हा तुमच्या नैतिक स्तरांवर हल्ला होण्याची सगळ्यात जास्त शक्यता असते.

१६. तुम्ही एकटे असतानादेखील यहोवाच्या आज्ञांचे पालन का केले पाहिजे?

१६ तुम्ही एकटे असता तेव्हादेखील यहोवाच्या आज्ञांचे पालन का केले पाहिजे? एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्या: तुम्ही एकतर यहोवाच्या भावना दुखावू शकता किंवा त्याचे मन आनंदित करू शकता. (उत्प. ६:५, ६; नीति. २७:११) तुमच्या प्रत्येक कृतीचा यहोवावर परिणाम होतो कारण त्याला “तुमची काळजी” आहे. (१ पेत्र ५:७) देवाच्या आज्ञांचे पालन केल्याने तुम्हाला फायदा होऊ शकतो, त्यामुळे तुम्ही त्याच्या आज्ञांकडे लक्ष द्यावे अशी त्याची इच्छा आहे. (यश. ४८:१७, १८) प्राचीन इस्राएल राष्ट्रातील यहोवाच्या काही सेवकांनी देवाच्या या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले तेव्हा त्याचे मन खूप दुखावले. (स्तो. ७८:४०, ४१) याउलट, दानीएल संदेष्ट्याविषयी यहोवाच्या मनात अतीव प्रेम दाटून आले. म्हणूनच, देवाच्या एका दूताने त्याला ‘परमप्रिय पुरुष’ असे म्हटले. (दानी. १०:११) दानीएलाविषयी देवाला असे का वाटले? कारण दानीएल केवळ चारचौघांतच नव्हे, तर एकटा असतानादेखील देवाला एकनिष्ठ राहिला.दानीएल ६:१० वाचा.

१७. मनोरंजनाची निवड करताना तुम्ही स्वतःला कोणते प्रश्‍न विचारू शकता?

१७ एकटे असताना देवाला एकनिष्ठ राहायचे असल्यास “चांगले आणि वाईट” यात फरक करण्यासाठी तुम्ही आपली समजशक्‍ती वाढवली पाहिजे आणि जे योग्य आहे ते “वहिवाटीने” करण्याद्वारे आपली समजशक्‍ती प्रशिक्षित केली पाहिजे. (इब्री ५:१४) उदाहरणार्थ, कोणत्या प्रकारचे संगीत ऐकावे, कोणते चित्रपट पाहावेत किंवा इंटरनेटवर कोणत्या साईट्‌स पाहाव्यात याबाबतीत योग्य निवड करण्यासाठी आणि चुकीच्या गोष्टी टाळण्यासाठी पुढील प्रश्‍न तुम्हाला मदत करतील. स्वतःला असे प्रश्‍न विचारा: ‘या गोष्टींमुळे मला इतरांबद्दल प्रेम व सहानुभूती दाखवण्याचे प्रोत्साहन मिळेल का, की ‘दुसऱ्‍याच्या विपत्तीवर’ खूष होण्याचे उत्तेजन मिळेल?’ (नीति. १७:५) ‘त्या गोष्टी मला ‘बऱ्‍याची आवड धरण्यास’ मदत करतील का, की त्यांमुळे ‘वाइटाचा द्वेष करणे’ मला कठीण जाईल?’ (आमो. ५:१५) एकटे असताना तुम्ही जे काही करता त्यावरून तुमच्या जीवनात तुम्ही खरोखर कोणत्या मूल्यांना सगळ्यात जास्त महत्त्व देता हे दिसून येईल.—लूक ६:४५.

१८. तुम्ही गुप्तपणे एखादे वाईट कृत्य करत असल्यास तुम्ही काय केले पाहिजे आणि का?

१८ एखादे कृत्य चुकीचे आहे हे माहीत असूनही तुम्ही गुप्तपणे ते करत असल्यास तुम्ही काय केले पाहिजे? हे नेहमी लक्षात असू द्या: “जो आपले दोष झाकितो त्याचे बरे होत नाही, जो ते कबूल करून सोडून देतो त्याजवर दया होते.” (नीति. २८:१३) असे वाईट कृत्य करत राहून ‘देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्‍न करणे’ किती निर्बुद्धपणाचे आहे! (इफिस. ४:३०) देवाजवळ व तुमच्या पालकांजवळ आपली चूक कबूल करणे हे तुमचे कर्तव्य आहे. यामुळे तुम्हाला स्वतःलाच फायदा होईल. याबाबतीत, ‘मंडळीचे वडील’ तुमची खूप मदत करू शकतात. शिष्य याकोब म्हणतो: “त्यांनी प्रभूच्या नावाने [अपराध करणाऱ्‍याला] तेल लावावे व त्याच्यावर ओणवून प्रार्थना करावी. विश्‍वासाची प्रार्थना दुःखणाइतास वाचवील आणि प्रभु त्याला उठवील, आणि त्याने पापे केली असली तर त्याला क्षमा होईल.” (याको. ५:१४, १५) हे कबूल आहे, की यामुळे तुम्हाला काहीसे लाजिरवाणे वाटू शकते व केल्या कृत्याचे अनिष्ट परिणामही कदाचित तुम्हाला भोगावे लागतील. पण, तुम्ही धैर्य एकवटून मदत मागितली तर आणखी नुकसान होण्याचे तुम्ही टाळू शकता व पुन्हा एकदा शुद्ध विवेक लाभल्यामुळे तुम्हाला हायसे वाटेल.—स्तो. ३२:१-५.

यहोवाचे मन आनंदित करा

१९, २०. तुमच्या बाबतीत यहोवाची काय इच्छा आहे, पण त्यासाठी तुम्ही काय केले पाहिजे?

१९ यहोवा एक आनंदी देव आहे आणि तुम्हीसुद्धा आनंदी असावे अशी त्याची इच्छा आहे. (१ तीम. १:११) त्याला तुमच्याबद्दल खूप आपुलकी वाटते. जीवनात योग्य ते करण्यासाठी तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांची कोणीही दखल घेतली नाही तरी देव नक्कीच दखल घेतो. यहोवाच्या नजरेतून कोणतीच गोष्ट सुटत नाही. त्याची नजर सतत तुमच्यावर असते, तुमच्यातील चुका शोधण्यासाठी नव्हे, तर चांगले ते करण्यास तुम्हाला पाठबळ देण्यासाठी. “परमेश्‍वराचे नेत्र अखिल पृथ्वीचे निरीक्षण करीत असतात, जे कोणी सात्विक चित्ताने त्याच्याशी वर्ततात त्यांचे साहाय्य करण्यात तो आपले सामर्थ्य प्रगट करितो.”—२ इति. १६:९.

२० तेव्हा, देवाच्या वचनाचे मार्गदर्शन स्वीकारा व सतत त्यानुसार चालण्याचा प्रयत्न करा. असे केल्यास, खडतर प्रसंगांचा सामना करण्यास व जीवनात योग्य निर्णय घेण्यास आवश्‍यक असलेली देवाची बुद्धी व समजशक्‍ती तुम्हाला प्राप्त होईल. यामुळे तुम्ही तुमच्या पालकांचे व यहोवाचे मन तर आनंदी करालच, पण त्यासोबतच खऱ्‍या अर्थाने सुखीसमाधानी जीवन जगाल.

[तळटीप]

^ परि. 4 नावे बदलण्यात आली आहेत.

तुमचे उत्तर काय असेल?

• पालकांचे नियम व शिस्त स्वीकारण्यासाठी व त्यापासून लाभ घेण्यासाठी मुले काय करू शकतात?

• पैशाच्या बाबतीत संतुलित दृष्टिकोन बाळगणे का महत्त्वाचे आहे?

• एकटे असतानासुद्धा तुम्ही देवाला एकनिष्ठ कसे राहू शकता?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[६ पानांवरील चित्र]

तुम्ही एकटे असतानाही देवाला एकनिष्ठ राहाल का?