व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मुलांनो—तुम्ही जीवनात काय कराल?

मुलांनो—तुम्ही जीवनात काय कराल?

मुलांनो—तुम्ही जीवनात काय कराल?

‘मी मुष्टियुद्ध करितो, म्हणजे वाऱ्‍यावर मुष्टिप्रहार करत नाही.’—१ करिंथ. ९:२६.

१, २. प्रौढतेकडे जाण्याचा तुमचा प्रवास यशस्वी होण्यासाठी तुम्हाला काय करणे जरुरीचे आहे?

 तुम्ही एका अनोळखी रस्त्यावरून प्रवास करणार असाल तर तुम्ही बहुधा एक नकाशा व कंपास (होकायंत्र) सोबत घ्याल. नकाशावरून तुम्ही नेमके कोठे आहात हे तुम्हाला समजेल. तसेच, मुक्कामस्थळी पोहचण्यासाठी कोणता मार्ग निवडावा हे ठरवण्यासदेखील नकाशा तुम्हाला मदत करेल. तर, कंपास तुम्हाला योग्य दिशेने वाटचाल करत राहण्यास साहाय्य करेल. पण, तुम्हाला नेमके कोठे जायचे आहे हेच जर निश्‍चित नसेल, तर नकाशा आणि कंपास या दोन्ही गोष्टींचा काहीच उपयोग होणार नाही. तुम्ही तुमच्या मार्गावरून भरकटू नये म्हणून तुम्हाला नेमके कोठे जायचे आहे हे निश्‍चित करणे जरुरीचे आहे.

प्रौढतेकडे जाण्याचा तुमचा प्रवासदेखील असाच आहे. या प्रवासात तुमची मदत करण्यासाठी एक भरवशालायक नकाशा आणि कंपास या दोन्ही गोष्टी तुमच्याजवळ आहेत. जीवनात कोणता मार्ग निवडावा हे ठरवण्यासाठी बायबल एका नकाशाप्रमाणे तुम्हाला मदत करेल. (नीति. ३:५, ६) आणि तुमचा बायबल प्रशिक्षित विवेक जीवनाच्या योग्य मार्गावरून वाटचाल करत राहण्यास तुम्हाला साहाय्य करेल. (रोम. २:१५) एका कंपासप्रमाणे तो सदैव तुम्हाला योग्य दिशा दाखवेल. पण, तुम्हाला तुमच्या जीवनप्रवासात यशस्वी व्हायचे असेल तर तुमचे मुक्कामस्थळ निश्‍चित करणे अर्थात डोळ्यांसमोर निश्‍चित ध्येये ठेवणे जरुरीचे आहे.

३. जीवनात ध्येये ठेवण्याच्या कोणत्या फायद्यांचा पौलाने १ करिंथकर ९:२६ मध्ये उल्लेख केला आहे?

जीवनात ध्येये ठेवणे व ती गाठण्यासाठी प्रयत्न करणे किती फायदेकारक आहे हे प्रेषित पौलाने थोडक्यात सांगितले. त्याने म्हटले: “मीहि तसाच धावतो, म्हणजे अनिश्‍चितपणे धावत नाही. तसेच मुष्टियुद्धहि करितो, म्हणजे वाऱ्‍यावर मुष्टिप्रहार करीत नाही.” (१ करिंथ. ९:२६) तुमच्यासमोर ध्येये असतील तर तुम्ही निश्‍चयाने धावू शकता. लवकरच तुम्हाला तुमच्या जीवनात काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील, जसे की उपासना, नोकरीव्यवसाय, विवाह आणि कुटुंब यांसंबंधी. काही वेळा तुमच्यासमोर इतके पर्याय असतील की कोणता पर्याय निवडावा हे तुम्हाला समजणार नाही. पण, देवाच्या वचनात असलेल्या सत्यांच्या व तत्त्वांच्या आधारे निर्णय घेऊन तुम्ही आधीच योग्य मार्ग निवडला, तर चुकीच्या मार्गावर जाण्याचा मोह तुम्हाला होणार नाही.—२ तीम. ४:४, ५.

४, ५. (क) जीवनात तुम्ही ध्येये ठेवली नाही तर काय होण्याची शक्यता आहे? (ख) जीवनात कोणतीही निवड करताना नेहमी देवाचे मन आनंदित करण्याची तुमची इच्छा का असली पाहिजे?

तुम्ही स्वतः ध्येये ठेवली नाहीत, तर तुमच्या मित्रांच्या व शिक्षकांच्या दृष्टीने तुमच्यासाठी काय योग्य आहे ते ठरवण्यास ते तुमच्यावर प्रभाव पाडण्याची शक्यता आहे. अर्थात, तुमच्यासमोर तुमची ध्येये स्पष्ट असली तरीसुद्धा काही जण या बाबतीत तुम्हाला सल्ला देतील. ते तुम्हाला असा सल्ला देतात तेव्हा स्वतःला असे विचारा, ‘जी ध्येयं ठेवण्यास ते मला सुचवत आहेत त्यांमुळे मला माझ्या तारुण्यात माझ्या निर्माणकर्त्याचं स्मरण करण्यास मदत होईल का, की असं करण्यापासून मी परावृत्त होईन?’—उपदेशक १२:१ वाचा.

जीवनात कोणतीही निवड करताना नेहमी देवाचे मन आनंदित करण्याची तुमची इच्छा का असली पाहिजे? एक कारण म्हणजे, आपल्याजवळ असलेली प्रत्येक चांगली गोष्ट यहोवानेच आपल्याला दिली आहे. (याको. १:१७) खरेच, त्याबद्दल आपण सर्वच यहोवाचे किती ऋणी असले पाहिजे! (प्रकटी. ४:११) त्यामुळे, तुम्ही यहोवाला लक्षात ठेवून जीवनात ध्येये राखता तेव्हा त्याच्याबद्दल तुम्हाला किती कृतज्ञता वाटते हे तुम्ही दाखवता. तर मग, साध्य करता येतील अशी कोणती ध्येये तुम्ही जीवनात ठेवावीत व ती गाठण्यासाठी तुम्ही काय केले पाहिजे हे आता आपण पाहू या.

तुम्ही कोणती ध्येये ठेवू शकता?

६. तुम्ही कोणते मूलभूत ध्येय ठेवू शकता, आणि का?

याआधीच्या लेखात सांगितल्याप्रमाणे, बायबलमध्ये जे काही म्हटले आहे ते खरे आहे याविषयी स्वतःला खातरी पटवून देणे हे महत्त्वपूर्ण व मूलभूत ध्येय तुम्ही ठेवू शकता. (रोम. १२:२; २ करिंथ. १३:५) तुमच्या मित्रांचा उत्क्रांतिवादावर व विविध खोट्या धार्मिक सिद्धान्तांवर विश्‍वास असेल, कारण इतरांनी त्यांना त्यांवर विश्‍वास ठेवण्यास सांगितलेले असते. तुम्ही मात्र, इतर जण सांगतात म्हणून एखाद्या गोष्टीवर विश्‍वास ठेवू नये. नेहमी लक्षात असू द्या, की तुम्ही पूर्ण मनाने यहोवाची सेवा करावी अशी त्याची इच्छा आहे. (मत्तय २२:३६, ३७ वाचा.) तुम्ही स्वतः सर्व गोष्टींची खातरी करून आपला विश्‍वास दृढ करावा अशी आपल्या स्वर्गीय पित्याची इच्छा आहे.—इब्री ११:१.

७, ८. (क) कोणती छोटी-छोटी ध्येये ठेवल्याने तुमचा विश्‍वास दृढ होऊ शकतो? (ख) तुम्ही ठेवलेली काही छोटी ध्येये साध्य केल्यानंतर तुम्हाला कसे वाटेल?

तुमचा विश्‍वास आणखी दृढ करण्यासाठी तुम्ही छोटी-छोटी ध्येये ठेवू शकता. उदाहरणार्थ, तुम्ही दररोज प्रार्थना करण्याचे ध्येय ठेवू शकता. तुमच्या प्रार्थना रटाळ नसाव्या व त्यात नेमकेपणा असावा म्हणून, दिवसभरात घडलेल्या विशिष्ट घटनांची तुम्ही मनातल्या मनात नोंद करू शकता किंवा त्या लिहून काढू शकता. प्रार्थनेत केवळ आपल्या समस्यांचा उल्लेख करू नका, तर दिवसभरात तुम्ही ज्या आनंददायक गोष्टी अनुभवल्या त्यांचाही आवर्जून उल्लेख करा. (फिलिप्पै. ४:६) दुसरे एक ध्येय म्हणजे दररोज बायबलचे वाचन करणे. तुम्ही दररोज केवळ चार पाने वाचली तरी वर्षभरात तुम्ही संपूर्ण बायबल वाचून काढाल. * स्तोत्र १:१, २ म्हणते: “जो पुरुष . . . परमेश्‍वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करितो, तो धन्य.”

तिसरे छोटे ध्येय म्हणजे प्रत्येक ख्रिस्ती सभेत एक उत्तर देण्यासाठी आधीच तयारी करणे. सुरुवातीला तुम्ही वाचून उत्तर देऊ शकता किंवा एखादे शास्त्रवचन वाचू शकता. नंतर, तुम्ही स्वतःच्या शब्दांत उत्तरे देण्याचे ध्येय ठेवू शकता. खरेतर, तुम्ही उत्तरे देता त्या प्रत्येक वेळी तुम्ही यहोवाला एक भेट अर्पण करत असता. (इब्री १३:१५) एकदा का यांपैकी काही ध्येये तुम्ही साध्य केली की तुमचा आत्मविश्‍वास वाढेल व त्यासोबतच यहोवाबद्दलची तुमची कृतज्ञताही वाढेल आणि तुम्ही दीर्घकालीन ध्येये ठेवण्यास तयार असाल.

९. तुम्ही अद्याप राज्य प्रचारक नसल्यास तुम्ही कोणती दीर्घकालीन ध्येये ठेवू शकता?

तुम्ही कोणती दीर्घकालीन ध्येये ठेवू शकता? तुम्ही अद्याप जाहीरपणे सुवार्तेची घोषणा करण्यास सुरुवात केली नसेल, तर राज्य प्रचारक बनण्याचे ध्येय तुम्ही ठेवू शकता. हे सन्माननीय ध्येय गाठल्यानंतर, तुम्ही सेवेत गेला नाही असा एकही महिना जाऊ न देता हे कार्य नियमितपणे व परिणामकारक रीत्या करत राहण्याचा तुम्ही प्रयत्न करू शकता. सेवाकार्यात बायबलचा उपयोग करण्याचे ध्येयही तुम्ही ठेवू शकता. तुम्ही असे करता तेव्हा प्रचार कार्यातील तुमचा आनंद द्विगुणित होत असल्याचे तुम्हाला जाणवेल. त्यानंतर, तुम्ही घरोघरच्या कार्यात खर्च करत असलेला वेळ वाढवू शकता किंवा बायबल अभ्यास चालवण्याचा प्रयत्नही करू शकता. बाप्तिस्मा न झालेले प्रचारक असल्यामुळे बाप्तिस्म्यासाठी आवश्‍यक असलेली पात्रता मिळवून यहोवा देवाचे समर्पित व बाप्तिस्माप्राप्त साक्षीदार बनण्याचे उत्तम ध्येय तुम्ही ठेवू शकता.

१०, ११. बाप्तिस्माप्राप्त युवक कोणती दीर्घकालीन ध्येये ठेवू शकतात?

१० तुम्ही यहोवाचे बाप्तिस्माप्राप्त सेवक असल्यास, तुम्ही पुढील दीर्घकालीन ध्येये गाठण्याचा विचार करू शकता. क्वचितच कार्य केलेल्या क्षेत्रात जाऊन प्रचार कार्य करण्यास तुम्ही अधूनमधून मंडळ्यांना मदत करू शकता. तुम्ही साहाय्यक किंवा सामान्य पायनियर सेवा करण्यास तुमच्या शक्‍तीचा व चांगल्या आरोग्याचा उपयोग करण्याचाही विचार करू शकता. हजारो आनंदी पायनियर तुम्हाला सांगतील, की पूर्ण वेळची सेवा करणे हा तुमच्या तारुण्यात तुमच्या निर्माणकर्त्याचे स्मरण करण्याचा एक फलदायी मार्ग आहे. ही अशी ध्येये आहेत जी तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत राहत असताना गाठू शकता. शिवाय, ही ध्येये गाठल्यामुळे तुमच्या मंडळीलाही नक्कीच फायदा होईल.

११ इतर काही दीर्घकालीन ध्येये गाठण्यासाठी तुम्हाला कदाचित तुमच्या मंडळीपासून दूर जावे लागेल. उदाहरणार्थ, प्रचारकांची जास्त गरज असलेल्या एखाद्या ठिकाणी किंवा देशात जाऊन सेवा करण्याची योजना तुम्ही करू शकता. परदेशात जाऊन राज्य सभागृहे किंवा शाखा कार्यालये बांधण्याच्या कामाला तुम्ही हातभार लावू शकता. तसेच, तुम्ही बेथेल सेवा किंवा मिशनरी सेवा करण्याचाही विचार करू शकता. पण, वर उल्लेखिलेली बहुतेक दीर्घकालीन ध्येये गाठण्याआधी तुम्ही एक महत्त्वाचे ध्येय गाठले पाहिजे. ते म्हणजे बाप्तिस्मा घेण्याचे ध्येय. तुमचा अद्याप बाप्तिस्मा झालेला नसेल, तर तुमच्या जीवनातील हे महत्त्वपूर्ण ध्येय गाठण्यासाठी काय करणे गरजेचे आहे ते विचारात घ्या.

बाप्तिस्म्याचे ध्येय गाठणे

१२. काही जण कोणत्या कारणांमुळे बाप्तिस्मा घेतात, आणि ही कारणे पुरेशी नाहीत असे का म्हणता येईल?

१२ बाप्तिस्मा घेण्याचे उद्दिष्ट काय, या प्रश्‍नाचे तुम्ही काय उत्तर द्याल? बाप्तिस्मा घेतल्याने पाप करण्यापासून आपले संरक्षण होईल असा काही जण कदाचित विचार करतील. इतर काहींना वाटेल की मंडळीतील आपल्या मित्रांनी बाप्तिस्मा घेतला म्हणून आपणही घेतला पाहिजे. काही मुले आपल्या आईवडिलांना खूष करण्यासाठी बाप्तिस्मा घेतात. पण बाप्तिस्मा हा, गुप्तपणे करावेसे वाटणारे पाप करण्यापासून तुम्हाला रोखणाऱ्‍या एका कराराप्रमाणे नाही. किंवा मग, इतरांच्या दबावामुळे तुम्ही बाप्तिस्मा घेऊ नये. यहोवाचे साक्षीदार बनण्याचा अर्थ काय हे पूर्णपणे समजल्यानंतर व बाप्तिस्म्यासोबत येणारी जबाबदारी पेलण्यास तुम्ही तयार व इच्छुक आहात अशी तुमची स्वतःची खातरी झाल्यानंतर तुम्ही बाप्तिस्मा घेतला पाहिजे.—उप. ५:४, ५.

१३. तुम्ही बाप्तिस्मा का घेतला पाहिजे?

१३ बाप्तिस्मा घेण्याचे एक कारण म्हणजे येशूने त्याच्या अनुयायांना, ‘शिष्य करण्याची व बाप्तिस्मा देण्याची’ आज्ञा दिली आहे. त्याने स्वतः बाप्तिस्मा घेऊन आपल्यापुढे एक आदर्श मांडला. (मत्तय २८:१९, २०; मार्क १:९ वाचा.) शिवाय, ज्यांना या जगाच्या अंतातून वाचायचे आहे अशांकरता बाप्तिस्मा घेणे हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. नोहाने तारू बांधले आणि जलप्रलयाच्या वेळी तो व त्याचे कुटुंब त्या तारवात राहिल्यामुळे वाचले याचा उल्लेख केल्यानंतर प्रेषित पेत्र म्हणतो: “त्याच्या लाक्षणिक अर्थाने आता बाप्तिस्मा येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या द्वारे तुमचे तारण करीत आहे.” (१ पेत्र ३:२०, २१) पण, बाप्तिस्मा हा दुर्घटनेच्या वेळी उपयोगी पडणाऱ्‍या विमा पॉलिसीसारखा नाही. त्याउलट, तुमचे यहोवावर प्रेम आहे व तुम्ही संपूर्ण मनाने, जिवाने, बुद्धीने व शक्‍तीने त्याची सेवा करू इच्छिता त्यामुळे तुम्ही बाप्तिस्मा घेता.—मार्क १२:२९, ३०.

१४. काही जण बाप्तिस्मा घेण्यापासून माघार का घेत असतील, पण तुम्हाला कोणते आश्‍वासन देण्यात आले आहे?

१४ पुढेमागे कधीतरी आपल्याला बहिष्कृत केले जाईल या भीतीपोटी काही जण बाप्तिस्मा घेण्यापासून माघार घेत असतील. तुम्हालाही अशीच भीती वाटते का? असे वाटणे चांगलेच आहे. कारण त्यावरून हे दिसून येते, की यहोवाचे साक्षीदार बनण्यासोबत येणाऱ्‍या गंभीर जबाबदारीची तुम्हाला जाणीव आहे. पण, बाप्तिस्मा न घेण्याचे दुसरेही काही कारण असू शकते का? कदाचित, देवाच्या स्तरांनुसार जीवन जगणे हाच सगळ्यात उत्तम मार्ग आहे याची तुम्हाला अजून खातरी पटली नसेल. तसे असल्यास, बायबलच्या स्तरांचे उल्लंघन करणाऱ्‍यांना जीवनात कोणते परिणाम भोगावे लागतात याचा तुम्ही विचार केला तर योग्य निर्णय घेण्यास तुम्हाला मदत मिळेल. किंवा मग असेही असू शकते, की देवाच्या स्तरांवर तुम्ही प्रेम करत असाल, पण ते स्तर तुम्हाला गाठता येतील की नाही याविषयी तुमचा स्वतःवर भरवसा नसेल. असे वाटणे खरेतर चांगले आहे, कारण त्यावरून तुम्ही एक नम्र व्यक्‍ती आहात हे दिसून येते. शेवटी बायबलसुद्धा हेच म्हणते की सर्व अपरिपूर्ण मानवांचे हृदय कपटी असते. (यिर्म. १७:९) पण, सदैव देवाच्या “वचनानुसार” चालत राहिल्यास तुम्ही यशस्वी होऊ शकता. (स्तोत्र ११९:९ वाचा.) बाप्तिस्मा न घेण्याची तुमची कारणे कोणतीही असोत, अशा कारणांचे व शंकांचे तुम्ही निरसन केले पाहिजे. *

१५, १६. तुम्ही बाप्तिस्मा घेण्यासाठी तयार आहात की नाही हे तुम्ही कसे सांगू शकता?

१५ तुम्ही बाप्तिस्म्यासाठी तयार आहात की नाही हे तुम्ही कसे सांगू शकता? त्यासाठी स्वतःला पुढील प्रश्‍न विचारा: ‘बायबलच्या मूलभूत शिकवणी मी इतरांना समजावून सांगू शकतो का? माझे आईवडील सेवाकार्याला जात नसले तरी मी जातो का? मी सर्व ख्रिस्ती सभांना उपस्थित राहण्याचा प्रयत्न करतो का? मित्रांच्या दबावाचा प्रतिकार केल्याचे काही विशिष्ट प्रसंग मला आठवतात का? माझ्या आईवडिलांनी व मित्रांनी यहोवाची सेवा करण्याचे सोडून दिले तरी मी मात्र देवाची सेवा करत राहीन का? देवासोबतच्या माझ्या नातेसंबंधाविषयी मी प्रार्थना केली आहे का? आणि मी पूर्ण मनाने प्रार्थनेत यहोवाला माझे जीवन समर्पित केले आहे का?’

१६ बाप्तिस्मा हा तुमचे जीवन बदलून टाकणारा प्रसंग आहे. तेव्हा, त्यास कमी लेखू नका. बाप्तिस्म्याचे हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यास तुम्ही पुरेसे प्रौढ आहात का? केवळ व्यासपीठावरून चांगली भाषणे दिल्याने किंवा सभांमध्ये चांगली उत्तरे दिल्याने एक व्यक्‍ती प्रौढ बनते असे नाही. तर, तिला बायबलची तत्त्वे समजून घेऊन त्यांच्या आधारावर निर्णय घेता आले पाहिजे. (इब्री लोकांस ५:१४ वाचा.) तुम्ही असे करण्याच्या टप्प्यावर पोहचला असाल, तर तुम्हाला सगळ्यात मोठा बहुमान लाभेल. तो म्हणजे, यहोवाची जिवेभावे सेवा करणे आणि तुम्ही खरोखर त्याला आपले जीवन समर्पित केले आहे अशा रीतीने जीवन जगणे.

१७. तुमच्या बाप्तिस्म्यानंतर तुमच्यासमोर येणाऱ्‍या परीक्षांचा सामना करण्यास कोणती गोष्ट तुम्हाला मदत करेल?

१७ तुमचा बाप्तिस्मा झाल्या झाल्या तुम्ही कदाचित जोमाने यहोवाची सेवा करण्यास प्रवृत्त व्हाल. पण, काही काळातच तुमच्यासमोर तुमच्या विश्‍वासाची व निर्धाराची परीक्षा पाहणारे प्रसंग येऊ शकतात. (२ तीम. ३:१२) पण, या प्रसंगांचा तुम्हाला एकट्यानेच सामना करावा लागेल असा विचार करू नका. तुमच्या आईवडिलांचा सल्ला घ्या. मंडळीतील आध्यात्मिक रीत्या प्रौढ असलेल्या बंधुभगिनींची मदत घ्या. तुमच्या पाठीशी उभे राहतील अशांसोबत मैत्री करा. हे कधीही विसरू नका, की यहोवाला तुमची काळजी आहे आणि जीवनात उद्‌भवणाऱ्‍या कोणत्याही परीक्षेचा सामना करण्याचे बळ तो अवश्‍य तुम्हाला देईल.—१ पेत्र ५:६, ७.

तुम्ही तुमची ध्येये कशी गाठू शकता?

१८, १९. तुम्ही जीवनात कोणत्या गोष्टींना प्राधान्य देता याचे परीक्षण केल्याने तुम्हाला फायदा कसा होऊ शकतो?

१८ तुमचे हेतू कितीही प्रामाणिक असले, तरी तुम्ही जे करू इच्छिता किंवा तुम्ही जे केले पाहिजे त्यासाठी तुमच्याजवळ वेळच नाही असे तुम्हाला वाटते का? तसे असल्यास, तुम्ही जीवनात कोणत्या गोष्टींना प्राधान्य देता याचे तुम्ही परीक्षण केले पाहिजे. उदाहरणार्थ, एक प्लास्टिकची बादली घ्या आणि त्यात अनेक मोठे दगड भरा. मग, त्यात वाळू टाका. तुम्हाला दिसून येईल की बादली पूर्णपणे दगडांनी व वाळूने भरून गेली आहे. आता बादली रिकामी करा आणि त्यात तीच वाळू आधी भरा आणि नंतर दगड टाका. दगडांसाठी जाग उरेल का? नाही, कारण बादलीत तुम्ही आधी वाळू भरली आहे.

१९ अशीच समस्या, वेळेचे नियोजन करताना तुम्हाला जाणवेल. करमणुकीसारख्या गोष्टींना तुम्ही जीवनात पहिले स्थान दिले, तर महत्त्वाच्या गोष्टींसाठी अर्थात आध्यात्मिक गोष्टींसाठी तुमच्याजवळ वेळच उरत नसल्याचे तुम्हाला जाणवेल. पण, जीवनात जे अधिक महत्त्वाचे आहे त्याची खातरी आपण केली, तर राज्याशी संबंधित कार्यांसाठी तसेच थोडीफार करमणूक करण्यासाठीदेखील तुमच्या हातात वेळ असल्याचे तुम्हाला दिसेल.—फिलिप्पै. १:१०.

२०. तुमची ध्येये गाठताना तुमच्या मनात भीती व शंका निर्माण झाल्यास तुम्ही काय केले पाहिजे?

२० तुम्ही बाप्तिस्म्याच्या ध्येयासोबतच इतर ध्येये गाठण्याचा प्रयत्न करता तेव्हा काही वेळा तुमच्या मनात भीती व शंका निर्माण होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास, ‘तुमचा भार परमेश्‍वरावर टाका म्हणजे तो तुमचा पाठिंबा होईल.’ (स्तो. ५५:२२) सध्या मानव इतिहासातील सगळ्यात आनंददायक व महत्त्वपूर्ण कार्यात अर्थात संबंध जगभरात प्रचाराच्या आणि शिक्षण देण्याच्या कार्यात सहभाग घेण्याची संधी तुम्हाला आहे. (प्रे. कृत्ये १:८) या कार्यात तुम्ही बघ्याची भूमिका निभावून इतरांचे कार्य पाहण्याची निवड करू शकता, किंवा मग त्यात सक्रीय सहभाग घेऊ शकता. राज्याशी संबंधित कार्यांना चालना देण्यासाठी आपल्या कौशल्यांचा उपयोग करण्यास मागेपुढे पाहू नका. ‘तुमच्या तारुण्याच्या दिवसांत तुमच्या निर्माणकर्त्याची’ सेवा केल्याचा तुम्हाला कधीही पस्तावा होणार नाही.—उप. १२:१.

[तळटीपा]

^ परि. 7 टेहळणी बुरूज, जानेवारी-मार्च २०१०, पृष्ठे २३-२६ पाहा.

^ परि. 14 यावरील अधिक माहितीसाठी तरुणांचे प्रश्‍न—उपयुक्‍त उत्तरे (इंग्रजी), खंड २, अध्याय ३४ पाहा.

तुमचे उत्तर काय असेल?

• तुम्ही जीवनात ध्येये का ठेवली पाहिजेत?

• साध्य करण्याजोगी काही ध्येये कोणती आहेत?

• बाप्तिस्म्याचे ध्येय गाठण्यासाठी काय करण्याची गरज आहे?

• तुम्ही जीवनात कोणत्या गोष्टींना प्राधान्य देता याचे परीक्षण केल्याने तुम्हाला तुमची ध्येये गाठण्यास मदत कशी होऊ शकते?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१३ पानांवरील चित्र]

दररोज बायबलचे वाचन करण्याचे ध्येय तुम्ही ठेवले आहे का?

[१५ पानांवरील चित्र]

कोणती गोष्ट बाप्तिस्म्याचे ध्येय गाठण्यास तुम्हाला मदत करेल?

[१६ पानांवरील चित्र]

या उदाहरणावरून तुम्ही काय शिकता?