व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवा आपला सार्वभौम प्रभू आहे!

यहोवा आपला सार्वभौम प्रभू आहे!

यहोवा आपला सार्वभौम प्रभू आहे!

“परमेश्‍वर अखिल पृथ्वीचा महान सार्वभौम राजा आहे.”—स्तो. ४७:२.

१. पहिले करिंथकर ७:३१ यात नमूद असलेल्या शब्दांतून, पौल बहुधा कशाचा उल्लेख करत होता?

 “या जगाचे दृश्‍य बदलत आहे,” असे प्रेषित पौलाने म्हटले. (१ करिंथ. ७:३१, NW) या ठिकाणी पौल बहुधा, या जगाची तुलना नाटकाच्या रंगमंचाशी करत होता, जेथे नाटकातील दृश्‍य बदलेपर्यंत त्यातील कलाकार आपापल्या चांगल्या किंवा वाईट भूमिका बजावतात.

२, ३. (क) यहोवाच्या सार्वभौमत्वाला करण्यात आलेल्या आव्हानाची तुलना कशाशी करता येईल? (ख) आपण कोणत्या प्रश्‍नांची चर्चा करणार आहोत?

आज, कितीतरी पटीने अधिक महत्त्वपूर्ण अशी एक स्थिती अस्तित्वात आहे जिची तुलना एका नाटकाशी केली जाऊ शकते. या नाटकात तुम्हीदेखील सामील आहात! ही स्थिती खासकरून यहोवा देवाचे सार्वभौमत्व सिद्ध केले जाण्याशी निगडित आहे. या स्थितीची तुलना एखाद्या देशात अस्तित्वात असलेल्या परिस्थितीशी केली जाऊ शकते, जेथे एकीकडे, यथोचितपणे स्थापित केलेले व सुव्यवस्था राखणारे सरकार आहे. तर, दुसरीकडे फसवणूक, हिंसा आणि खूनखराबा यांच्या जोरावर शासन चालवणारी एक गुन्हेगारी संघटना आहे. ही बेकायदेशीर संघटना तेथील सार्वभौम शासनाला आव्हान करते आणि त्या शासनाप्रती असलेल्या तेथील नागरिकांच्या एकनिष्ठेची परीक्षा घेते.

आज अशीच एक स्थिती विश्‍वपातळीवर अस्तित्वात आहे. एकीकडे, कायदेशीरपणे स्थापित केलेले “सार्वभौम प्रभू यहोवाचे” सरकार आहे. (स्तो. ७१:५, NW) तर दुसरीकडे, ‘त्या दुष्टाच्या’ अर्थात सैतानाच्या नेतृत्वाखाली एक गुन्हेगारी संघटना आहे जी मानवजातीच्या अस्तित्वाला धोका निर्माण करत आहे. (१ योहा. ५:१९) ही संघटना, यथोचितपणे स्थापित केलेल्या देवाच्या सरकारला आव्हान करत आहे आणि त्याच्या सार्वभौम शासनाप्रती असलेल्या सर्व लोकांच्या एकनिष्ठेची परीक्षा घेत आहे. ही स्थिती मुळात कशी निर्माण झाली? देवाने यास अनुमती का दिली? याबाबतीत आपण वैयक्‍तिकपणे काय करू शकतो?

नाटकाची वैशिष्ट्ये

४. टप्प्याटप्प्याने उलगडणाऱ्‍या विश्‍वपातळीवरील नाटकात एकमेकांशी जवळचा संबंध असलेले कोणते दोन विषय आहेत?

टप्प्याटप्प्याने उलगडणाऱ्‍या विश्‍वपातळीवरील या नाटकात एकमेकांशी जवळचा संबंध असलेले दोन विषय आहेत: यहोवाचे सार्वभौमत्व आणि मानवांची सचोटी. मूळ बायबल भाषांमध्ये यहोवाला अनेकदा “सार्वभौम प्रभू” असे म्हटले आहे. उदाहरणार्थ, स्तोत्रकर्त्याने यहोवावर असलेल्या पूर्ण भरवशाने असे गायिले: “परमेश्‍वर अखिल पृथ्वीचा महान सार्वभौम राजा आहे.” (स्तो. ४७:२) “सार्वभौमत्व” म्हणजे सत्ता किंवा शासन याबाबतीत सर्वश्रेष्ठता. एका सार्वभौम व्यक्‍तीच्या हातात सर्वाधिकार असतो. त्यामुळे, यहोवा देव परात्पर किंवा सार्वभौम आहे असे मानण्याची आपल्याजवळ अनेक उचित कारणे आहेत.—दानी. ७:२२.

५. आपण यहोवाच्या सार्वभौमत्वाचे समर्थन का केले पाहिजे?

निर्माणकर्ता या नात्याने यहोवा देव या पृथ्वीचा व संपूर्ण विश्‍वाचा सार्वभौम अधिपती आहे. (प्रकटीकरण ४:११ वाचा.) तसेच, यहोवा आपला न्यायाधीश, नियंता आणि राजा आहे. (यश. ३३:२२) देवामुळेच आपण अस्तित्वात आहोत आणि त्याच्यावर अवलंबून आहोत. त्यामुळे, आपण त्याला आपला सार्वभौम प्रभू मानले पाहिजे. “परमेश्‍वराने आपले राजासन स्वर्गांत स्थापिले आहे; त्याचे राज्य सर्वांवर आहे,” हे आपण नेहमी लक्षात ठेवल्यास त्याच्या सर्वोच्च पदाचे समर्थन करण्याची प्रेरणा आपल्याला मिळेल.—स्तो. १०३:१९; प्रे. कृत्ये ४:२४.

६. सचोटी म्हणजे काय?

यहोवाच्या सार्वभौमत्वाचे समर्थन करण्यासाठी, त्याच्याप्रती आपली सचोटी टिकवून ठेवणे आवश्‍यक आहे. “सचोटी” म्हणजे नैतिक शुद्धता किंवा पूर्णता. एखाद्या सरळ व सात्विक व्यक्‍तीला आपण सचोटी राखणारी व्यक्‍ती म्हणू शकतो. कुलपिता ईयोब अशाच प्रकारचा पुरुष होता.—ईयो. १:१.

नाटकाची सुरुवात कशी झाली?

७, ८. यहोवाच्या सार्वभौमत्वाला सैतानाने कशा प्रकारे आव्हान केले?

जवळजवळ ६,००० वर्षांपूर्वी, एका आत्मिक प्राण्याने यहोवाच्या सार्वभौमत्वाला आव्हान केले. आपली उपासना करण्यात यावी अशी स्वार्थी इच्छा या बंडखोराच्या शब्दांतून व कृतींतून व्यक्‍त झाली. त्याने पहिल्या मानवी जोडप्याला म्हणजे आदाम व हव्वा यांना देवाच्या सार्वभौमत्वाप्रती असलेल्या त्यांच्या एकनिष्ठेचा त्याग करण्यास प्रवृत्त केले. आणि यहोवा त्यांच्याशी खोटे बोलला असा दावा करून त्याने देवाच्या नावावर काळिमा फासण्याचा प्रयत्न केला. (उत्पत्ति ३:१-५ वाचा.) हा बंडखोर, देवाचा सगळ्यात मोठा शत्रू म्हणजे सैतान (विरोधक), दियाबल (निंदक), साप (फसवणूक करणारा) आणि अजगर (गिळंकृत करणारा) बनला.—प्रकटी. १२:९.

सैतानाने यहोवाच्या विरोधात आपले प्रतिस्पर्धी शासन स्थापित केले. या समस्येचे निराकरण करण्यासाठी सार्वभौम प्रभू यहोवा काय करणार होता? तो सैतान, आदाम आणि हव्वा या तिघा बंडखोरांचा लगेच नाश करणार होता का? असे करण्याचे सामर्थ्य यहोवाजवळ नक्कीच होते आणि त्याने जर असे केले असते तर सर्वसत्ताधिकारी कोण आहे हा प्रश्‍न कायमचा निकालात निघाला असता. तसेच, त्याच्या आज्ञेचे उल्लंघन केल्यास दंड मिळणार होता असे जे त्याने म्हटले होते ते खरे आहे हेदेखील सिद्ध झाले असते. मग, देवाने हे पाऊल का उचलले नाही?

९. सैतानाने कोणत्या विषयांवर सवाल उपस्थित केला?

सैतान खोटे बोलला आणि त्याने आदाम व हव्वा यांना देवाकडे पाठ फिरवण्यास भाग पाडले. असे करण्याद्वारे, मानवांनी आपल्याला आज्ञाधारक राहावे अशी अपेक्षा करण्याचा यहोवाला हक्क आहे का असा प्रश्‍न त्याने उपस्थित केला. शिवाय, पहिल्या मानवी जोडप्याला देवाच्या आज्ञेचे उल्लंघन करण्यास प्रवृत्त करण्याद्वारे, सैतानाने सर्व बुद्धिमान प्राण्यांच्या एकनिष्ठेबद्दलदेखील सवाल उपस्थित केला. यहोवाच्या सार्वभौमत्वाप्रती एकनिष्ठ असलेल्या ईयोबाच्या बाबतीत सैतानाने म्हटले त्याप्रमाणे सर्व मानवांना आपण देवाकडे पाठ फिरवण्यास लावू शकतो असा दावा त्याने केला.—ईयो. २:१-५.

१०. आपल्याला या विश्‍वावर आधिपत्य गाजवण्याचा हक्क आहे हे सिद्ध करण्याचे लांबणीवर टाकण्याद्वारे देवाने कशाची अनुमती दिली?

१० आपल्याला या विश्‍वावर आधिपत्य गाजवण्याचा हक्क आहे हे सिद्ध करण्याचे लांबणीवर टाकण्याद्वारे, यहोवाने सैतानाला त्याचा दावा शाबीत करण्यासाठी वेळ दिला. तसेच, त्याच्या सार्वभौमत्वाप्रती एकनिष्ठा प्रदर्शित करण्याची संधीदेखील त्याने मानवांना दिली. गेल्या अनेक शतकांदरम्यान काय घडले आहे? सैतानाने एक शक्‍तिशाली गुन्हेगारी संघटना स्थापित केली आहे. पण कालांतराने, यहोवा या संघटनेचा व दियाबलाचा नाश करेल आणि आपणच या विश्‍वाचे सार्वभौम आहोत हे जोरदारपणे सिद्ध करेल. या चांगल्या परिणामाची यहोवा देवाला इतकी खातरी होती की एदेन बागेत बंड झाला त्याच वेळी त्याने याबद्दल भाकीत केले होते.—उत्प. ३:१५.

११. यहोवाच्या सार्वभौमत्वाच्या बाबतीत अनेक जणांनी काय केले आहे?

११ यहोवाचे सार्वभौमत्व आणि त्याच्या नावाचे पवित्रीकरण यांबाबतीत अनेक जणांनी आपला विश्‍वास व्यक्‍त केला आहे आणि आपली सचोटी राखली आहे. यात हाबेल, हनोख, नोहा, अब्राहाम, सारा, मोशे, रूथ, दावीद, येशू, येशू ख्रिस्ताचे सुरुवातीचे शिष्य आणि आजच्या काळातील सचोटी राखणाऱ्‍या लाखो जणांचा समावेश होतो. देवाच्या सार्वभौमत्वाचे समर्थन करणारे हे लोक, सैतान खोटा आहे हे शाबीत करण्यात आणि सर्व मानवांना आपण देवाकडे पाठ फिरवण्यास लावू शकतो अशी बढाई मारण्याद्वारे सैतानाने यहोवाच्या नावावर लावलेला कलंक मिटवण्यात भाग घेतात.—नीति. २७:११.

नाटकाचा शेवट निश्‍चित

१२. देव कायम दुष्टाई सहन करणार नाही याची खातरी आपण कशी बाळगू शकतो?

१२ यहोवा कायम दुष्टाई सहन करणार नाही. शिवाय, आपण शेवटल्या काळात जगत आहोत हे आपल्याला माहीत आहे. त्यामुळे, यहोवा लवकरच आपले सार्वभौमत्व सिद्ध करेल याची आपण पक्की खातरी बाळगू शकतो. यहोवाने जलप्रलयाद्वारे दुष्टांचा नाश केला होता. त्याने सदोम व गमोरा आणि फारो व त्याच्या सैन्याचा नाश केला. सीसरा व त्याची सेना आणि सन्हेरीब व त्याची अश्‍शूरी सेना परात्पर देवासमोर टिकाव धरू शकले नाहीत. (उत्प. ७:१, २३; १९:२४, २५; निर्ग. १४:३०, ३१; शास्ते ४:१५, १६; २ राजे १९:३५, ३६) तेव्हा, आपण हा भरवसा बाळगू शकतो की यहोवा देव त्याच्या नावाचा अनादर व त्याच्या साक्षीदारांना दिली जाणारी गैरवागणूक कायम सहन करणार नाही. शिवाय, आज आपण येशूच्या उपस्थितीचे व या जगाच्या अंताचे चिन्ह स्पष्टपणे पाहत आहोत.—मत्त. २४:३.

१३. यहोवाच्या शत्रूंबरोबर आपला नाश होऊ नये म्हणून आपण काय केले पाहिजे?

१३ देवाच्या शत्रूंबरोबर आपला नाश होऊ नये म्हणून आपण यहोवाच्या सार्वभौमत्वाप्रती एकनिष्ठ आहोत हे दाखवून दिले पाहिजे. आपल्याला हे कसे करता येईल? सैतानाच्या गुन्हेगारी शासनापासून अलिप्त राहण्याद्वारे आणि त्याच्या प्रतिनिधींना न घाबरण्याद्वारे आपण असे करू शकतो. (यश. ५२:११; योहा. १७:१६; प्रे. कृत्ये ५:२९) आपण असे केले तरच आपल्याला आपल्या स्वर्गीय पित्याच्या सार्वभौमत्वाचे समर्थन करणे शक्य होईल. तसेच, यहोवाच्या नावावर लागलेला कलंक जेव्हा तो मिटवेल व तोच या विश्‍वाचा सार्वभौम अधिपती असल्याचे प्रदर्शित करेल, तेव्हा आपला बचाव होण्याची आशा आपण बाळगू शकतो.

१४. बायबलच्या वेगवेगळ्या भागांत काय प्रकट करण्यात आले आहे?

१४ मानवजातीबद्दल आणि यहोवाच्या सार्वभौमत्वाबद्दल तपशीलवार माहिती संपूर्ण बायबलमध्ये दिली आहे. बायबलच्या पहिल्या तीन अध्यायांत सृष्टीच्या निर्मितीबद्दल आणि मानवजात कशा प्रकारे पापात पडली याबद्दल सांगितले आहे. तर, शेवटच्या तीन अध्यायांत मानवांना पापातून कशा प्रकारे मुक्‍त करण्यात येईल याबद्दल सांगितले आहे. मानवजात, पृथ्वी आणि विश्‍व यांबद्दल असलेला आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी सार्वभौम प्रभू यहोवाने कोणती पावले उचलली आहेत याबद्दलची तपशीलवार माहिती बायबलच्या मधल्या भागात देण्यात आली आहे. सैतान व दुष्टाई यांचा या जगात कसा शिरकाव झाला हे उत्पत्तिमध्ये सांगितले आहे, तर प्रकटीकरणाच्या शेवटल्या भागात, कशा प्रकारे दुष्टाई कायमची नाहीशी केली जाईल, दियाबलाचा अंत करण्यात येईल आणि ज्याप्रमाणे स्वर्गात देवाची इच्छा पूर्ण केली जाते त्याप्रमाणे पृथ्वीवरदेखील त्याची इच्छा कशी पूर्ण होईल हे सांगितले आहे. होय, पाप आणि मृत्यू यांमागचे कारण काय हे बायबल प्रकट करते. तसेच, पृथ्वीवरून कशा प्रकारे पाप आणि मृत्यू कायमचा नाहीसा केला जाईल व सचोटी राखणाऱ्‍यांना आनंददायक वातावरणात अनंतकाळचे जीवन मिळेल हेदेखील बायबल दाखवते.

१५. सार्वभौमत्वाबद्दलचे नाटक संपेल तेव्हा वैयक्‍तिकपणे त्याचा लाभ घेण्यासाठी आपण काय केले पाहिजे?

१५ लवकरच या जगाचे दृश्‍य पूर्णपणे बदलून जाईल. अनेक शतकांपासून चालणाऱ्‍या सार्वभौमत्वाबद्दलच्या नाटकावर कायमचा पडदा पडेल. सैतानाला रंगमंचावरून काढून टाकून शेवटी त्याचा नाश करण्यात येईल आणि देवाची इच्छा नक्कीच पूर्ण होईल. पण, त्याचा लाभ घेण्यासाठी आणि देवाच्या वचनात सांगितलेले आशीर्वाद अनुभवण्यासाठी आपण आताच यहोवाच्या सार्वभौमत्वाचे समर्थन केले पाहिजे. आपण तटस्थ भूमिका घेऊ शकत नाही. “परमेश्‍वर माझ्या पक्षाचा आहे,” असे आपल्याला म्हणता यावे म्हणून आपण त्याचा पक्ष घेतला पाहिजे.—स्तो. ११८:६, ७.

आपण सचोटी राखू शकतो!

१६. देवाप्रती सचोटी टिकवून ठेवणे मानवांना शक्य आहे याची खातरी आपण का बाळगू शकतो?

१६ आपण यहोवाच्या सार्वभौमत्वाचे समर्थन करू शकतो आणि आपली सचोटी टिकवून ठेवू शकतो. कारण, प्रेषित पौलाने असे लिहिले: “मनुष्याला सहन करिता येत नाही अशी परीक्षा तुम्हावर गुदरली नाही; आणि देव विश्‍वसनीय आहे, तो तुमची परीक्षा तुमच्या शक्‍तीपलीकडे होऊ देणार नाही, तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपायहि करील, ह्‍यासाठी की, तुम्ही ती सहन करावयास समर्थ व्हावे.” (१ करिंथ. १०:१३) पौलाने उल्लेख केलेल्या परीक्षेचा उगम काय आहे आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग देव आपल्यासाठी कसा काढू शकतो?

१७-१९. (क) इस्राएल लोक अरण्यात कोणत्या प्रलोभनाला बळी पडले? (ख) यहोवाप्रती आपली सचोटी टिकवून ठेवणे आपल्याला का शक्य आहे?

१७ इस्राएल लोकांना अरण्यात आलेल्या अनुभवांवरून दिसते की “परीक्षा” किंवा प्रलोभन देवाच्या नियमांचे उल्लंघन करण्यास आपल्याला प्रवृत्त करू शकणाऱ्‍या परिस्थितीतून येते. (१ करिंथकर १०:६-१० वाचा.) इस्राएल लोक परीक्षेचा प्रतिकार करू शकले असते, पण जेव्हा यहोवाने त्यांच्याकरता एका महिन्यापर्यंत पुरतील एवढे लावे चमत्कारिक रीत्या पुरवले तेव्हा त्यांनी “वाईट गोष्टींचा” लोभ धरला. जरी इस्राएल लोकांनी काही काळापर्यंत मांस खाल्ले नसले, तरी देवाने त्यांना पुरेसा मान्‍ना खायला दिला होता. तरीसुद्धा, लावे गोळा करताना त्यांनी अनियंत्रित लोभ धरला आणि ते परीक्षेत पडले.—गण. ११:१९, २०, ३१-३५.

१८ याआधी, मोशेला जेव्हा सीनाय पर्वतावर नियमशास्त्र दिला जात होता तेव्हा इस्राएल लोकांनी वासराची उपासना व अनैतिक कार्ये केली आणि ते मूर्तिपूजक बनले. त्यांचा दृश्‍य पुढारी उपस्थित नव्हता तेव्हा ते प्रलोभनाला बळी पडले. (निर्ग. ३२:१, ६) इस्राएल लोक प्रतिज्ञात देशात प्रवेश करणारच होते, तेव्हा मवाबी स्त्रियांनी हजारो इस्राएली पुरुषांना मोहात पाडले आणि त्यांनी त्यांच्याशी अनैतिक कृत्ये केली. त्या प्रसंगी, आपल्या पापाबद्दल हजारो इस्राएली मरण पावले. (गण. २५:१, ९) काही वेळा, इस्राएल लोक बंडखोरपणे तक्रार करण्याच्या परीक्षेत पडले, आणि एके प्रसंगी तर ते मोशेविरुद्ध व देवाविरुद्धदेखील बोलले! (गण. २१:५) दुष्ट कोरह, दाथान, अबीराम आणि त्यांच्या साथीदारांच्या नाशानंतरदेखील, या बंडखोर लोकांना अन्यायीपणे मारण्यात आले असा चुकीचा तर्क करून इस्राएल लोकांनी कुरकूर केली. परिणामस्वरूप, देवाने पाठवलेल्या एका मरीमुळे १४,७०० इस्राएली मरण पावले.—गण. १६:४१, ४९.

१९ आतापर्यंत उल्लेख केलेल्या परीक्षांपैकी अशी कोणतीही परीक्षा नव्हती ज्याचा इस्राएल लोक प्रतिकार करू शकले नसते. ते लोक प्रलोभनाला बळी पडले कारण त्यांनी देवावरील आपला विश्‍वास गमावला व त्यांना यहोवाचा, त्याच्या प्रेमळ काळजीचा आणि त्याच्या नीतिमान मार्गांचा विसर पडला. इस्राएल लोकांवर आलेल्या परीक्षांप्रमाणेच, आपल्यावर येणाऱ्‍या परीक्षादेखील सर्वसामान्य स्वरूपाच्या असतात. त्यांचा प्रतिकार करण्यासाठी आपण आवश्‍यक प्रयत्न केले आणि देव आपला सांभाळ करेल असा भरवसा ठेवला, तर आपण आपली सचोटी टिकवून ठेवू शकतो. आपण याची खातरी बाळगू शकतो कारण “देव विश्‍वसनीय आहे” आणि तो ‘आपल्या शक्‍तीपलीकडे आपली परीक्षा होऊ देणार नाही.’ यहोवा कधीही आपला त्याग करणार नाही आणि आपल्याला त्याची इच्छा पूर्ण करणे अशक्य होईल अशी वेळ तो केव्हाही आपल्यावर येऊ देणार नाही.—स्तो. ९४:१४.

२०, २१. आपल्यावर परीक्षा येते तेव्हा त्यातून ‘निभावण्याचा उपाय’ देव कसा करेल?

२० आपल्याला प्रलोभनाचा प्रतिकार करण्यासाठी बळ देण्याद्वारे यहोवा त्यातून “निभावण्याचा उपायहि” करतो. उदाहरणार्थ, आपण आपल्या विश्‍वासाचा त्याग करावा या प्रयत्नात आपले विरोधक आपला शारीरिक छळ करतील. अशा वेळी, जास्त मारहाण किंवा छळ टाळण्यासाठी आणि कदाचित मृत्यू टाळण्यासाठी त्यांच्याशी तडजोड करण्याचा आपल्याला मोह होऊ शकतो. पण, १ करिंथकर १०:१३ यात नमूद असलेल्या आश्‍वासनाच्या आधारावर, आपल्याला माहीत आहे की आपल्याला मोहात पाडणारी अशा प्रकारची परिस्थिती केवळ तात्पुरती आहे. यहोवाला विश्‍वासू राहणे आपल्याला अशक्य होईल इतपत तो ही परीक्षा वाढू देणार नाही. देव आपला विश्‍वास दृढ करू शकतो आणि आपली सचोटी टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला आध्यात्मिक बळ देतो.

२१ यहोवा त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे आपला सांभाळ करतो. हा आत्मा आपल्याला प्रलोभनाचा प्रतिकार करता यावा यासाठी बायबलमधील विचारांची आपल्याला आठवणदेखील करून देतो. (योहा. १४:२६) त्यामुळे, आपली फसवणूक होऊन आपण चुकीच्या मार्गावर जात नाही. उदाहरणार्थ, यहोवाचे सार्वभौमत्व आणि मानवांची सचोटी या दोन विषयांचा एकमेकांशी किती जवळचा संबंध आहे हे आपल्याला माहीत आहे. या माहितीमुळे, अनेकांना मृत्यूपर्यंत देवाला विश्‍वासू राहण्यासाठी त्याच्याकडून मदत मिळाली आहे. पण, मृत्यूमुळे ते परीक्षेतून बाहेर पडले असे नाही; तर, यहोवाच्या मदतीमुळे त्यांना प्रलोभनाला बळी न पडता शेवटपर्यंत टिकून राहणे शक्य झाले आहे. तो आपल्याबाबतीतही तसेच करू शकतो. खरेतर, “ज्यांना वारशाने तारण मिळणार आहे त्यांच्या सेवेसाठी” तो आपल्या विश्‍वासू देवदूतांचादेखील वापर करतो. (इब्री १:१४) पुढील लेखात सांगितल्याप्रमाणे, केवळ देवाप्रती आपली सचोटी टिकवून ठेवणारेच सदासर्वकाळ त्याच्या सार्वभौमत्वाचे समर्थन करण्याची आनंददायक सुसंधी लाभण्याची आशा बाळगू शकतात. आपला सार्वभौम प्रभू या नात्याने आपण यहोवाला विश्‍वासू राहिलो, तर आपणही त्या लोकांपैकी एक असू.

तुमचे उत्तर काय असेल?

• आपण यहोवाला आपला सार्वभौम प्रभू का मानले पाहिजे?

• देवाप्रती आपली सचोटी टिकवून ठेवणे याचा काय अर्थ होतो?

• यहोवा लवकरच आपले सार्वभौमत्व सिद्ध करणार आहे हे आपण कशावरून म्हणू शकतो?

पहिले करिंथकर १०:१३ मध्ये सांगितल्यानुसार, सचोटी टिकवून ठेवणे का शक्य आहे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२४ पानांवरील चित्र]

सैतानाने आदाम आणि हव्वा यांना यहोवाकडे पाठ फिरवण्यास प्रवृत्त केले

[२६ पानांवरील चित्र]

यहोवाच्या सार्वभौमत्वाचे समर्थन करण्यास दृढनिश्‍चयी असा