व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आपण तर यहोवाप्रती आपली सचोटी टिकवून ठेवू!

आपण तर यहोवाप्रती आपली सचोटी टिकवून ठेवू!

आपण तर यहोवाप्रती आपली सचोटी टिकवून ठेवू!

“मी तर सात्विकपणे वागेन.”—स्तो. २६:११.

१, २. ईयोबाने आपल्या सात्विकतेबद्दल काय म्हटले, आणि ईयोबाच्या पुस्तकातील ३१ व्या अध्यायातून त्याच्याविषयी काय सूचित होते?

 आजच्याप्रमाणेच पुरातन काळीदेखील, वस्तूंचे मोजमाप करण्यासाठी सहसा तराजू वापरला जात असे. ज्या वस्तूचे वजन करायचे, ते एका पारड्यात घालून दुसऱ्‍या पारड्यात वजन ठेवले जायचे. देवाच्या लोकांनी तराजू व वजने वापरण्याच्या बाबतीत प्रामाणिक असणे फार जरुरीचे होते.—नीति. ११:१.

देवभीरू पुरुष ईयोब, सैतानाच्या हल्ल्यांमुळे दुःख सोसत होता तेव्हा त्याने म्हटले: “[यहोवाने] मला न्यायाच्या ताजव्यात तोलावे; देवाला माझी सात्विकता कळून येऊ द्या.” (ईयो. ३१:६) या संदर्भात, ईयोबाने अशा अनेक प्रसंगांचा उल्लेख केला ज्यांत एका व्यक्‍तीच्या सात्विकतेची किंवा सचोटीची परीक्षा होऊ शकते. पण, ईयोबावर आलेल्या परीक्षेतून तो यशस्वी रीत्या पार पडला. ही गोष्ट, ईयोबाच्या पुस्तकातील ३१ व्या अध्यायात असलेल्या त्याच्या शब्दांवरून सूचित होते. त्याच्या उत्तम उदाहरणावरून आपल्याला त्याच्यासारखे वागण्याची आणि स्तोत्रकर्त्या दाविदाप्रमाणे आत्मविश्‍वासाने असे म्हणण्याची प्रेरणा मिळू शकते: “मी तर सात्विकपणे वागेन.”—स्तो. २६:११.

३. लहान-मोठ्या सर्वच गोष्टींत देवाला विश्‍वासू राहणे का महत्त्वाचे आहे?

ईयोबाची अगदी कसून परीक्षा घेण्यात आली होती, तरीसुद्धा तो शेवटपर्यंत देवाला विश्‍वासू राहिला. काहींच्या मते तर, ईयोबाने त्याच्यावर आलेल्या पराकोटीच्या परीक्षांचा एका शूरविराप्रमाणे सामना केला होता. त्याच्यावर ज्या परीक्षा आल्या तशा प्रकारच्या परीक्षांचा आज आपल्याला सामना करावा लागत नाही. तरीसुद्धा, यहोवाप्रती आपली सचोटी टिकवून ठेवणारे आणि त्याच्या सार्वभौमत्वाचे समर्थन करणारे या नात्याने अधिक खंबीर भूमिका घेण्यासाठी आपण लहान-मोठ्या सर्वच गोष्टींत देवाला विश्‍वासू राहिले पाहिजे.लूक १६:१० वाचा.

नैतिकतेच्या बाबतीत सचोटी राखणे आवश्‍यक

४, ५. सचोटी राखणारा या नात्याने ईयोबाने काय करण्याचे टाळले?

यहोवाप्रती आपली सचोटी टिकवून ठेवण्यासाठी आपण ईयोबाप्रमाणेच देवाच्या नैतिक स्तरांचे पालन केले पाहिजे. ईयोबाने म्हटले: “मी तर आपल्या डोळ्यांशी करार केला आहे; मी कोणा कुमारीवर नजर कशी जाऊ देऊ? . . . माझे मन कोणा स्त्रीला पाहून लंपट झाले असले, मी आपल्या शेजाऱ्‍याच्या दाराशी टपून बसलो असलो, तर माझी स्त्री दुसऱ्‍याचे दळणकांडण करो; परके तिला ओणवी करोत.”—ईयो. ३१:१, ९, १०.

ईयोबाने देवाप्रती आपली सचोटी टिकवून ठेवण्याचा दृढनिश्‍चय केला होता, त्यामुळे त्याने कोणत्याही स्त्रीकडे कामुक नजरेने पाहण्याचे कटाक्षाने टाळले. ईयोब एक विवाहित पुरुष होता. तो कोणत्याही अविवाहित स्त्रीच्या भावनांशी खेळला नाही किंवा परपुरुषाच्या पत्नीकडे त्याने प्रणयभावनेने पाहिले नाही. येशूने डोंगरावरील प्रवचनात लैंगिक अनैतिकतेविषयी एक जोरदार विधान केले होते. देवाप्रती आपली सचोटी टिकवून ठेवणाऱ्‍या सर्वांनी नक्कीच लक्षात ठेवावा असाच तो मुद्दा आहे.मत्तय ५:२७, २८ वाचा.

कपट मार्गांचा अवलंब करू नका

६, ७. (क) ईयोबाप्रमाणेच आपणही खरोखर सचोटी राखणारे आहोत की नाही हे पाहण्यासाठी देव कशाचा उपयोग करतो? (ख) आपण कपटी किंवा कुटिल का असू नये?

आपली गणना सचोटी राखणाऱ्‍यांमध्ये व्हावी असे वाटत असल्यास आपण कधीही कपट मार्गांचा अवलंब करू नये. (नीतिसूत्रे ३:३१-३३ वाचा.) ईयोबाने म्हटले: “मी असत्याची सोबत केली असली, माझ्या पायांनी कपटाकडे धाव घेतली असली तर त्याने मला न्यायाच्या ताजव्यात तोलावे; देवाला माझी सात्विकता कळून येऊ द्या.” (ईयो. ३१:५, ६) यहोवा सर्व मानवजातीला “न्यायाच्या ताजव्यात” तोलतो. देवाचे समर्पित सेवक या नात्याने ईयोबाप्रमाणे आपणही खरोखर सचोटी राखणारे आहोत की नाही हे पाहण्यासाठी तो त्याच्या परिपूर्ण न्यायी स्तराचा उपयोग करतो.

आपल्या मनात कपट किंवा कुटिलता असल्यास आपल्याला देवाप्रती आपली सचोटी टिकवून ठेवता येणार नाही. कारण सचोटी राखणाऱ्‍यांनी ‘लाजिरवाण्या गुप्त गोष्टी वर्ज्य केलेल्या असतात,’ व ते ‘कपटाने चालत नाहीत.’ (२ करिंथ. ४:१, २) पण, आपल्या कपटी वागण्याबोलण्यामुळे एखाद्या बंधू किंवा भगिनीचे मन दुखावले आणि त्याबद्दल त्याने किंवा तिने मदतीसाठी यहोवाकडे धावा केला तर काय? तर, याचे परिणाम नक्कीच खूप वाईट होतील! स्तोत्रकर्त्याने म्हटले, “मी संकटात असता परमेश्‍वराचा धावा केला, आणि त्याने माझे ऐकले. हे परमेश्‍वरा, लबाडी करणाऱ्‍या ओठापासून व कपटी जिभेपासून माझा जीव सोडीव.” (स्तो. १२०:१, २) हे नेहमी लक्षात असू द्या, की आपण खरोखर सचोटी राखणारे आहोत की नाही हे पाहण्यासाठी देव आपली ‘मने व अंतःकरणे पारखू’ शकतो.—स्तो. ७:८, ९.

इतरांशी वागण्याच्या बाबतीत आदर्श मांडा

८. ईयोब इतरांशी नेहमी कसा वागला?

आपली सचोटी टिकवून ठेवण्यासाठी आपण ईयोबाप्रमाणे न्याय्य, नम्र आणि इतरांचा विचार करणारे असले पाहिजे. त्याने म्हटले: “माझा दास व दासी मजशी वाद करीत असता, मी त्यांचा हक्क तुच्छ लेखिला असता, तर देव माझा न्याय करावयास उठल्यास मी काय केले असते? त्याने झाडा घेतला असता तर मी काय जाब दिला असता? ज्याने मला गर्भाशयात निर्माण केले त्याने त्यालाहि नाही का केले? आम्हा दोघांसहि गर्भाशयात एकानेच नाही का घडिले?”—ईयो. ३१:१३-१५.

९. आपल्या सेवकांशी वागताना ईयोबाने कोणते गुण प्रदर्शित केले, आणि याबाबतीत आपण कसे वागले पाहिजे?

ईयोबाच्या काळात, कायदेविषयक प्रकरणे हाताळण्याच्या किचकट पद्धती अस्तित्वात नव्हत्या. सर्व प्रकरणे अगदी सुव्यवस्थितपणे हाताळली जायची आणि गुलामांनासुद्धा न्यायालयात आपला दावा मांडण्याची परवानगी होती. ईयोब आपल्या सेवकांशी न्यायाने व दयेने वागला. आज आपल्याला आपली सचोटी टिकवून ठेवायची असल्यास आपण सर्वांनी आणि विशेषकरून ख्रिस्ती मंडळीत वडील या नात्याने सेवा करणाऱ्‍या बांधवांनी असे गुण प्रदर्शित केले पाहिजे.

लोभी असू नका, उदार असा

१०, ११. (क) ईयोब उदार मनाचा व इतरांना मदत करणारा होता हे आपण कशावरून म्हणू शकतो? (ख) ईयोब ३१:१६-२५ या शास्त्रवचनावरून आपल्याला बायबलच्या कोणत्या सल्ल्याची आठवण होऊ शकते?

१० ईयोब हा स्वार्थी किंवा लोभी नव्हता. उलट, तो उदार मनाचा व इतरांना मदत करणारा होता. त्याने म्हटले: ‘मी विधवेचे डोळे शिणविले असले, मी आपला भाकरतुकडा एकट्यानेच खाल्ला असला, त्यातला काही पोरक्यास दिला नसला, कोणी वस्त्रावाचून मरत आहे, कोणा दरिद्र्‌यास पांघरूण नाही हे पाहून, वेशीवर कोणी आपल्या पक्षाचा आहे हे पाहून मी पोरक्यावर आपला हात उचलिला असला; तर माझी खवाटे पाठीतून निखळून पडोत, माझे हात खांद्यांच्या सांध्यांतून मोडून पडोत.’ आणि “तुजवर माझी भिस्त आहे” असे त्याने सोन्याला म्हटले असते, तर तो आपली सचोटी टिकवून ठेवू शकला नसता.—ईयो. ३१:१६-२५.

११ अशा काव्यात्मक शब्दांवरून आपल्याला कदाचित शिष्य याकोबाच्या शब्दांची आठवण होईल. त्याने म्हटले: “देवपित्याच्या दृष्टीने शुद्ध व निर्मळ धर्माचरण म्हणजे अनाथांचा व विधवांचा त्यांच्या संकटात समाचार घेणे, व स्वतःला जगापासून निष्कलंक ठेवणे हे आहे.” (याको. १:२७) तसेच, येशूने दिलेल्या इशारेवजा संदेशाचीही कदाचित आपल्याला आठवण होईल: “सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा; कारण कोणाजवळ पुष्कळ संपत्ति असली तर ती त्याचे जीवन होते असे नाही.” येशूने मग, एका लोभी माणसाचा दृष्टान्त दिला जो त्याच्या मृत्यूच्या वेळी ‘देवविषयक बाबतीत धनवान नव्हता.’ (लूक १२:१५-२१) आपल्याला आपली सचोटी टिकवून ठेवायची असल्यास आपण लोभाच्या किंवा हव्यासाच्या पापाला बळी पडू नये. लोभ खरेतर मूर्तिपूजाच आहे, कारण हव्यासापोटी एका लोभी व्यक्‍तीचे लक्ष यहोवावरून विचलित होते व लोभ त्याचे दैवत बनते. (कलस्सै. ३:५) सचोटी आणि लोभ या दोन गोष्टींचा केव्हाही मिलाफ होऊ शकत नाही!

खऱ्‍या उपासनेला जडून राहा

१२, १३. मूर्तिपूजेपासून दूर राहण्याच्या बाबतीत ईयोबाने कोणते उदाहरण मांडले?

१२ सचोटी राखणारे, खऱ्‍या उपासनेपासून बहकत नाहीत. ईयोब केव्हाही बहकला नाही, कारण त्याने म्हटले: “जर सूर्यास प्रकाशताना पाहून, चंद्रास थाटाने भ्रमण करिताना पाहून, माझे मन गुप्तपणे मोहित झाले असते, आणि आपल्या हाताचे चुंबन घेऊन मी त्यांस नमन केले असते, तर हाहि न्यायाधीशापुढे नेण्याजोगा गुन्हा झाला असता; अशाने ऊर्ध्वलोकीच्या देवाशी मी दगा केला असे झाले असते.”—ईयो. ३१:२६-२८.

१३ ईयोबाने कोणत्याही निर्जीव गोष्टींची उपासना केली नाही. त्याचे मन आकाशातील ग्रहताऱ्‍यांना, उदाहरणार्थ चंद्राला पाहून गुप्तपणे मोहीत झाले असते आणि त्याने आपल्या ‘हाताचे चुंबन घेऊन’ त्यास नमन केले असते तर तो देवाला नाकारणारा मूर्तिपूजक बनला असता. (अनु. ४:१५, १९) तर मग, देवाप्रती आपली सचोटी टिकवून ठेवण्यासाठी आपण सर्व प्रकारच्या मूर्तिपूजेपासून दूर राहिले पाहिजे.१ योहान ५:२१ वाचा.

सूड उगवणारे किंवा ढोंगी असू नका

१४. ईयोब मत्सरी नव्हता असे आपण का म्हणू शकतो?

१४ ईयोब मत्सरी किंवा निष्ठुर नव्हता. त्याच्यामध्ये हे दुर्गुण असते तर तो सचोटी राखू शकला नसता हे त्याला माहीत होते. त्याने म्हटले: “माझ्या द्वेष्टयाचा नाश झालेला पाहून मला आनंद वाटला असता, त्याजवर अरिष्ट आले हे पाहून मला उल्हास वाटला असता, (त्याचा प्राणनाश व्हावा असा शाप मागून मी आपल्या जिव्हेस पाप करू दिले नाही.)”—ईयो. ३१:२९, ३०.

१५. आपला द्वेष करणाऱ्‍यांवर संकट कोसळते तेव्हा आपण खूष का होऊ नये?

१५ सरळ मनाच्या ईयोबाचा द्वेष करणाऱ्‍या एखाद्या व्यक्‍तीवर संकट कोसळले तेव्हा तो कधीच खूष झाला नाही. नंतर लिहिलेले एक नीतिसूत्र असा इशारा देते: “तुझा वैरी पडला तर त्याबद्दल आनंद मानू नको, तो जमीनदोस्त झाल्याने तुझे मन उल्लासू नये; उल्लासले तर ते परमेश्‍वर पाहील आणि त्याला ते आवडणार नाही आणि तो त्याच्यापासून आपला क्रोध फिरवील.” (नीति. २४:१७, १८) यहोवा आपल्या अंतःकरणात डोकावू शकतो, त्यामुळे इतरांवर आलेल्या संकटामुळे आपण मनोमन खूष होत असू, तर तो ते पाहू शकतो आणि अशी वृत्ती त्याला मुळीच आवडत नाही. (नीति. १७:५) आपण तसे केल्यास, त्यानुसार तो आपल्याशी व्यवहार करेल, कारण “सूड घेणे व उसने फेडणे हे माझ्याकडे आहे” असे तो म्हणतो.—अनु. ३२:३५.

१६. आपण श्रीमंत नसलो तरीही आतिथ्य कसे करू शकतो?

१६ ईयोब आतिथ्यशील होता. (ईयो. ३१:३१, ३२) आपण श्रीमंत नसलो तरीही आपण इतरांचे “आतिथ्य” करू शकतो. (रोम. १२:१३) “पोसलेल्या बैलाची मेजवानी देऊन मनात द्वेष वागविणे, यापेक्षा प्रेमाची भाजीभाकरी बरी” हे लक्षात ठेवून आपण इतरांना साध्याशा जेवणाचे आमंत्रण देऊ शकतो. (नीति. १५:१७) आपल्याप्रमाणे सचोटी राखणाऱ्‍यांसोबत प्रेमळ वातावरणात साध्याशा जेवणाचा आस्वाद घेणे खरोखरच अतिशय सुखावह व उभारणीकारक असू शकते.

१७. आपल्या हातून गंभीर पाप घडल्यास आपण ते लपवण्याचा प्रयत्न का करू नये?

१७ ईयोब ढोंगी नव्हता, त्यामुळे त्याच्या सहवासात इतरांना नक्कीच आध्यात्मिक उत्तेजन मिळाले असेल. पहिल्या शतकात ख्रिस्ती मंडळीत चोरून शिरलेल्या व आपल्या ‘लाभासाठी तोंडपुजेपणा करणाऱ्‍या’ अधार्मिक पुरुषांसारखा तो नव्हता. (यहू. ३, ४, १६) इतरांना आपले अपराध समजल्यास ते आपला धिक्कार करतील या भीतीने ईयोबाने आपल्या अपराधांवर पांघरूण घातले नाही किंवा ते “मनातल्या मनात लपविले” नाही. तो देवाला आपल्या अंतःकरणाचे परीक्षण करू देण्यास व त्याच्याजवळ आपले अपराध कबूल करण्यास तयार होता. (ईयो. ३१:३३-३७) आपल्या हातून कधी गंभीर पाप घडल्यास आपण लोकांना तोंड दाखवायच्या लायकीचे राहणार नाहीत या भीतीने आपण आपले पाप लपवण्याचा कधीच प्रयत्न करू नये. याबाबतीत, आपण आपली सचोटी टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत हे आपण कसे दाखवू शकतो? आपले अपराध कबूल करण्याद्वारे, पश्‍चात्ताप करण्याद्वारे, ख्रिस्ती वडिलांची मदत घेण्याद्वारे आणि आपली चूक सुधारण्यासाठी आवश्‍यक पावले उचलण्याद्वारे आपण हे दाखवू शकतो.—नीति. २८:१३; याको. ५:१३-१५.

सचोटी राखणाऱ्‍याची चौकशी होते

१८, १९. (क) ईयोबाने कधीही कोणावर जुलूम केला नाही असे आपण का म्हणू शकतो? (ख) ईयोब दोषी असल्याचे सिद्ध झाल्यास, त्याने काय करण्याची तयारी दाखवली?

१८ ईयोब प्रामाणिक व सरळ मनाचा होता. त्यामुळेच, तो असे म्हणू शकला: “माझ्या शेताने मजविरुद्ध गाऱ्‍हाणे केले असेल, त्याच्या सर्व तासांनी मिळून आक्रोश केला असेल, मोबदला दिल्यावाचून त्यातले पीक मी खाल्ले असेल, त्याच्या मालकाच्या प्राणोत्क्रमणास कारण झालो असेन, तर त्यात गव्हाच्या ऐवजी काटेधोतरे, जवाच्या ऐवजी कुसळे उगवोत.” (ईयो. ३१:३८-४०) ईयोबाने केव्हाही दुसऱ्‍याची जमीन बळकावली नाही की आपल्या कामकऱ्‍यांवर जुलूम केला नाही. ईयोबाप्रमाणे आपणही लहानमोठ्या सर्वच बाबतीत यहोवाप्रती आपली सचोटी टिकवून ठेवली पाहिजे.

१९ ईयोब कशा प्रकारचे जीवन जगला याविषयी तो त्याच्या तीन मित्रांसमोर व अलीहूसमोर बोलला होता. त्याने जणू आपल्या जीवनक्रमावर स्वतः “दस्तखत” केले आणि त्याच्याविरुद्ध कोणाला आरोप लावायचा असल्यास तो लावू शकतो असे त्याने सुचवले. ईयोब दोषी असल्याचे सिद्ध झाल्यास, तो शिक्षा भोगण्यास तयार होता. त्यामुळे त्याने देवाच्या न्यायालयात आपला दावा मांडला आणि सुनावणीची वाट पाहत राहिला. अशा प्रकारे, “येथे ईयोबाचे भाषण समाप्त झाले.”—ईयो. ३१:३५, ४०.

तुम्ही सचोटी टिकवून ठेवू शकता

२०, २१. (क) ईयोबाला सचोटी टिकवून ठेवणे का शक्य झाले? (ख) आपण देवाबद्दल प्रेम कसे वाढवू शकतो?

२० ईयोब आपली सात्विकता किंवा सचोटी टिकवून ठेवू शकला, कारण त्याचे देवावर प्रेम होते आणि यहोवानेसुद्धा त्याच्यावर प्रेम केले व त्याला मदत केली. ईयोबाने म्हटले: “तू मला जीवन आणि प्रेमदया दिली आहे, तुझ्या पाहणीने माझा आत्मा राखला आहे.” (ईयो. १०:१२, पं.र.भा.) शिवाय, जो कोणी इतरांना प्रेम दाखवत नाही तो सर्वसमर्थ देवाबद्दल असलेले श्रद्धायुक्‍त भय सोडून देईल याची ईयोबाला जाणीव असल्यामुळे त्याने इतरांना प्रेम दाखवले. (ईयो. ६:१४) होय, सचोटी राखणारे देवावर व आपल्या शेजाऱ्‍यांवर प्रेम करतात.—मत्त. २२:३७-४०.

२१ बायबलचे वाचन करण्याद्वारे आणि त्यात देवाबद्दल जे काही सांगितले आहे त्यावर मनन करण्याद्वारे आपण देवाबद्दलचे आपले प्रेम वाढवू शकतो. आपण आपल्या मनस्वी प्रार्थनेत, यहोवाची स्तुती करू शकतो आणि त्याने आपल्यासाठी केलेल्या सर्व चांगल्या गोष्टींसाठी त्याचे आभार मानू शकतो. (फिलिप्पै. ४:६, ७) आपण यहोवासाठी स्तुतिगीते गाऊ शकतो आणि त्याच्या लोकांसह नियमितपणे सहवास करण्याचा लाभ घेऊ शकतो. (इब्री १०:२३-२५) तसेच, आपण सेवाकार्यात सहभाग घेतो व “त्याने केलेल्या तारणाची घोषणा” करतो तेव्हा त्याच्यावरील आपले प्रेम आणखीन वाढेल. (स्तो. ९६:१-३) असे केल्याने, स्तोत्रकर्त्याप्रमाणेच आपण आपली सचोटी टिकवून ठेवू शकतो. त्याने म्हटले: “देवाजवळ जाणे ह्‍यातच माझे कल्याण आहे; मी प्रभु परमेश्‍वराला आपले आश्रयस्थान केले आहे.”—स्तो. ७३:२८.

२२, २३. यहोवाच्या सार्वभौमत्वाचे समर्थन करणारे या नात्याने आज आपल्या व पूर्वीच्या काळातील सचोटी राखणाऱ्‍यांच्या कार्यांची तुलना कशी करता येईल?

२२ यहोवाने अनेक शतकांदरम्यान सचोटी राखणाऱ्‍यांना निरनिराळ्या प्रकारच्या कितीतरी जबाबदाऱ्‍या दिल्या आहेत. उदाहरणार्थ, नोहाने एक तारू बांधले आणि तो “नीतिमत्त्वाचा उपदेशक” होता. (२ पेत्र २:५) तर, यहोशवाने इस्राएल लोकांना प्रतिज्ञात देशात घेऊन जाण्यास त्यांचे नेतृत्व केले. त्याने ‘नियमशास्त्राच्या ग्रंथाचे रात्रंदिवस’ वाचन केले व त्याचे पालन केले होते, त्यामुळे तो हे कार्य यशस्वी रीत्या पार पाडू शकला. (यहो. १:७, ८) पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांनी शिष्य बनवण्याचे काम केले आणि शास्त्रवचनांचा अभ्यास करण्यासाठी ते नियमितपणे एकत्र आले.—मत्त. २८:१९, २०.

२३ आज आपण नीतिमत्त्वाचा प्रचार करण्याद्वारे, शिष्य बनवण्याद्वारे, बायबलचा सल्ला आपल्या जीवनात लागू करण्याद्वारे आणि सभा, संमेलने व अधिवेशने यांत आपल्या सहविश्‍वासू बंधुभगिनींसह एकत्र येण्याद्वारे यहोवाच्या सार्वभौमत्वाचे समर्थन करतो व त्याच्याप्रती आपली सचोटी टिकवून ठेवतो. अशा कार्यांमुळे आपल्याला धैर्य एकवटण्यास, आध्यात्मिक रीत्या सुदृढ राहण्यास आणि देवाची इच्छा यशस्वीपणे पूर्ण करण्यास साहाय्य मिळते. आपल्या स्वर्गीय पित्याचे आणि त्याच्या पुत्राचे पाठबळ असल्यामुळे आपल्याला हे शक्य होते. (अनु. ३०:११-१४; १ राजे ८:५७) शिवाय, आपल्याप्रमाणेच यहोवाप्रती सचोटी राखणारा व आपला सार्वभौम प्रभू म्हणून त्याचा सन्मान करणारा जगभरातील ‘बंधुवर्गदेखील’ आपल्या पाठीशी आहे.—१ पेत्र २:१७.

तुमचे उत्तर काय असेल?

• आपण यहोवाच्या नैतिक स्तरांकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे?

• ईयोबाचे कोणते गुण तुम्हाला विशेष आवडले?

ईयोब ३१:२९-३७ यात सांगितल्यानुसार ईयोब कसा वागला?

• देवाप्रती आपली सचोटी टिकवून ठेवणे आपल्याला का शक्य आहे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२९ पानांवरील चित्र]

ईयोबाने यहोवाप्रती आपली सचोटी टिकवून ठेवली. त्याअर्थी आपणही ती टिकवून ठेवू शकतो!

[३२ पानांवरील चित्र]

आपण यहोवाप्रती आपली सचोटी टिकवून ठेवू शकतो!