व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

खऱ्‍या उपासनेसाठी आवेशी असा

खऱ्‍या उपासनेसाठी आवेशी असा

खऱ्‍या उपासनेसाठी आवेशी असा

“पीक फार आहे खरे, पण कामकरी थोडे आहेत.”—मत्त. ९:३७.

१. तातडी म्हणजे काय?

 तुम्हाला एका महत्त्वाच्या कागदपत्रावर एका व्यक्‍तीची तातडीने सही हवी आहे. तुम्ही काय कराल? तुम्ही त्याच्यावर “अर्जंट!” अशी खूण कराल. तुम्ही एका महत्त्वाच्या कामासाठी निघाला आहात, पण तुम्हाला उशीर झाला आहे. तुम्ही काय कराल? तुम्ही ड्रायव्हरला म्हणाल, “उशीर झालाय, जरा लवकर!” होय, तुम्हाला एखादे काम उरकायचे असते व तुमच्या हातात फार थोडा वेळ असतो तेव्हा तुमच्या मनावर ताण येतो व तुम्ही अस्वस्थ होता. तुमच्या हृदयाचे ठोके वाढू लागतात आणि ते काम लवकरात लवकर उरकण्यासाठी तुम्ही जोमाने कामाला लागता. यालाच तातडी म्हणतात!

२. आज खऱ्‍या ख्रिश्‍चनांकरता सर्वात जास्त तातडीचे काम कोणते आहे?

आज खऱ्‍या ख्रिश्‍चनांकरता, राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करणे व सर्व राष्ट्रांतील लोकांना शिष्य बनवणे यापेक्षा इतर कोणतेही काम तातडीचे नाही. (मत्त. २४:१४; २८:१९, २०) येशूचे शब्द उद्धृत करत मार्क या शिष्याने लिहिले की हे कार्य “प्रथम,” म्हणजे, अंत येण्याआधी केले पाहिजे. (मार्क १३:१०) अर्थात, हे योग्यच आहे. येशूने म्हटले: “पीक फार आहे खरे, पण कामकरी थोडे आहेत.” कापणीचे काम लांबणीवर टाकता येत नाही, तर कापणीचा हंगाम संपायच्या आत पीक गोळा करावे लागते.—मत्त. ९:३७.

३. तातडीने प्रचार करण्याची गरज लक्षात घेऊन अनेकांनी काय केले आहे?

प्रचाराचे कार्य इतके महत्त्वाचे असल्यामुळेच, आपण या कार्याकरता आपल्याकडून होईल तितका वेळ, शक्‍ती आणि लक्ष दिले पाहिजे. आनंदाची गोष्ट म्हणजे आज अनेक जण नेमके हेच करत आहेत. पायनियर, मिशनरी किंवा जगभरात असलेल्या एखाद्या बेथेलगृहात सेवा करता यावी म्हणून काहींनी आपल्या संसाराचा व्याप कमी केला आहे. या कार्यांत ते खूप व्यस्त आहेत. त्यांनी कदाचित अनेक त्याग केले असतील. शिवाय, त्यांच्यापुढे अनेक आव्हानेदेखील आहेत. तरीही, यहोवाने त्यांना भरपूर आशीर्वाद दिले आहेत. त्यांच्याबद्दल आपल्याला आनंद वाटतो. (लूक १८:२८-३० वाचा.) इतर जणांना पूर्ण वेळचे प्रचारक म्हणून सेवा करता येत नसली, तरी ते या जीवनरक्षक कार्याकरता जमेल तितका वेळ देतात. या कार्यात, आपल्या मुलांचा बचाव होण्यासाठी त्यांना मदत करणेदेखील सामील आहे.—अनु. ६:६, ७.

४. काही जणांना तातडीची भावना टिकवून ठेवणे का कठीण वाटते?

आपण पाहिल्याप्रमाणे, तातडीची भावना ही सहसा मर्यादित वेळ किंवा अंतिम तारीख किंवा एखाद्या गोष्टीचा शेवट याच्याशी जुळलेली असते. आज आपण शेवटच्या काळात जगत आहोत. आणि हे सिद्ध करण्यासाठी आपल्याजवळ अनेक शास्त्रवचनीय व ऐतिहासिक पुरावे आहेत. (मत्त. २४:३, ३३; २ तीम. ३:१-५) तरीसुद्धा, अंत कधी येईल याची नेमकी वेळ आपल्यापैकी कोणालाही माहीत नाही. ‘ह्‍या युगाच्या समाप्तीच्या चिन्हाबद्दल’ तपशीलवारपणे सांगताना, येशूने विशेषकरून असे म्हटले: “त्या दिवसाविषयी व त्या घटकेविषयी पित्याशिवाय कोणालाच ठाऊक नाही, स्वर्गातील दिव्यदूतांस नाही, पुत्रालाहि नाही.” (मत्त. २४:३६) त्यामुळे, वर्षोनुवर्षे तातडीची भावना टिकवून ठेवणे काहींना कठीण वाटू शकते, खासकरून ते अनेक वर्षांपासून असे करत आले असतील तर त्यांना हे कठीण जाऊ शकते. (नीति. १३:१२) तुम्हालाही कधीकधी तसे वाटते का? यहोवा देवाने व येशू ख्रिस्ताने आज आपल्यावर जे काम सोपवले आहे ते करण्यासाठी तातडीची भावना विकसित करण्यास किंवा टिकवून ठेवण्यास आपल्याला कोणती गोष्ट मदत करेल?

आपला आदर्श असलेल्या येशूचा विचार करा

५. सेवाकार्याबद्दल येशूच्या मनात तातडीची भावना होती हे त्याने कोणत्या मार्गांनी दाखवले?

देवाची सेवा तातडीच्या भावनेने केलेल्यांपैकी, येशू नक्कीच सर्वात उत्तम उदाहरण आहे. याचे एक कारण म्हणजे, केवळ साडेतीन वर्षांच्या काळात त्याला पुष्कळ काही साध्य करायचे होते. तरीसुद्धा, येशूने खऱ्‍या उपासनेकरता इतर कोणाहीपेक्षा जास्त केले. त्याने आपल्या पित्याचे नाव व उद्देश इतरांना कळवला, राज्याच्या सुवार्तेचा प्रचार केला, धार्मिक पुढाऱ्‍यांच्या ढोंगीपणाचा व त्यांच्या खोट्या शिकवणींचा पर्दाफाश केला आणि मृत्यूपर्यंत देवाला विश्‍वासू राहून त्याने यहोवाचे सार्वभौमत्व उंचावले. त्याने सर्वत्र फिरून लोकांना शिकवण्यात, त्यांना मदत करण्यात आणि त्यांचे रोग बरे करण्यात कोणतीच कसूर केली नाही. (मत्त. ९:३५) एवढ्या कमी वेळात याआधी कोणीही इतके साध्य केले नाही. येशूने इतकी मेहनत केली की त्याच्याप्रमाणे कोणीही करू शकले नाही.—योहा. १८:३७.

६. येशूने कोणत्या गोष्टीवर आपले लक्ष केंद्रित केले होते?

कोणत्या गोष्टीने येशूला आपले सेवाकार्य अथकपणे करण्यास प्रवृत्त केले? यहोवाच्या वेळापत्रकानुसार आपले कार्य पूर्ण करण्यास किती वेळ आहे हे येशूला दानीएलाच्या भविष्यवाणीवरून समजले होते. (दानी. ९:२७) अशा प्रकारे, त्या भविष्यवाणीत सांगितल्याप्रमाणे त्याचे पृथ्वीवरील सेवाकार्य, ‘अर्ध सप्तकाच्या’ शेवटी किंवा साडेतीन वर्षांनी संपुष्टात येणार होते. सा.यु. ३३ च्या वसंत ऋतूत जेरूसलेममध्ये विजयोत्स्वाने प्रवेश केल्याच्या काही काळानंतर, त्याने असे म्हटले: “मनुष्याच्या पुत्राचे गौरव होण्याची वेळ आली आहे.” (योहा. १२:२३) लवकरच आपला मृत्यू होणार आहे हे येशूला माहीत होते. पण, केवळ या गोष्टीला त्याने आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू किंवा सेवाकार्यात परिश्रम करण्याचे प्रमुख कारण बनवले नाही. तर याउलट, आपल्या पित्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी व इतरांना प्रेम दाखवण्यासाठी प्रत्येक संधीचा उपयोग करण्यावर त्याने आपले लक्ष केंद्रित केले. त्या प्रेमामुळे प्रवृत्त होऊन येशूने शिष्यांना एकत्र केले, त्यांना प्रशिक्षण दिले आणि प्रचार मोहिमेकरता त्यांना पाठवले. त्याने हे अशासाठी केले जेणेकरून त्याने सुरू केलेले कार्य त्यांनी पुढे चालू ठेवावे व त्याच्याहीपेक्षा मोठ्या प्रमाणावर हे कार्य करावे.योहान १४:१२ वाचा.

७, ८. येशूने मंदिराचे शुद्धिकरण केले तेव्हा त्याच्या शिष्यांची प्रतिक्रिया काय होती आणि येशूने तसे का केले?

खऱ्‍या उपासनेकरता येशूला किती आवेश होता हे त्याच्या जीवनातील एका घटनेवरून जोरदारपणे सिद्ध होते. ही घटना येशूच्या सेवाकार्याच्या सुरुवातीला, सा.यु. ३० च्या वल्हांडण सणादरम्यान घडली होती. येशू आणि त्याचे शिष्य जेरूसलेममध्ये आले तेव्हा त्यांनी मंदिरात “गुरे, मेंढरे व कबुतरे विकणारे आणि सराफ हे बसलेले” पाहिले. हे पाहून येशूने कशी प्रतिक्रिया दाखवली आणि त्याच्या शिष्यांवर याचा कोणता प्रभाव पडला?योहान २:१३-१७ वाचा.

त्या प्रसंगी येशूने जे केले व जे म्हटले त्यावरून त्याच्या शिष्यांना अगदी उचितपणे दाविदाच्या एका स्तोत्रातील भविष्यवाणीचे शब्द आठवले: “तुझ्या मंदिराविषयीच्या आवेशाने मला ग्रासून टाकिले आहे.” (स्तो. ६९:९) का? कारण येशूने जे केले होते त्यात मोठी जोखीम व धोका होता. शेवटी, पैसा कमावण्याच्या या निंदास्पद व्यापारामागे मंदिरातील अधिकारी म्हणजे याजक, शास्त्री आणि अशा इतर लोकांचा हात होता. त्यांच्या या धूर्त योजनांचा पर्दाफाश करण्याद्वारे व ती मोडीत काढण्याद्वारे येशूने स्वतःला त्या काळच्या मंदिरातील अधिकाऱ्‍यांचा शत्रू बनवले. येशूच्या शिष्यांनी अचूकपणे ताडल्याप्रमाणे, त्याचा ‘मंदिराविषयीचा आवेश,’ किंवा खऱ्‍या उपासनेकरता असलेला आवेश स्पष्टपणे दिसून आला. पण, आवेश म्हणजे काय? आवेश आणि तातडीची भावना यात काही फरक आहे का?

तातडीची भावना आणि आवेश यातील फरक

९. आवेशाचे वर्णन कसे करता येईल?

एक शब्दकोश, “आवेश” या शब्दाची व्याख्या “एखादी गोष्ट साध्य करण्याची उत्सुकता आणि उत्कट इच्छा” अशी करतो, आणि आसक्‍ती, जोश, जोम आणि उत्साह हे त्याचे समानार्थी शब्द असल्याचे तो शब्दकोश सांगतो. होय, या सर्व शब्दांतून येशूच्या सेवाकार्याचे वर्णन करता येऊ शकते. म्हणूनच, मराठी कॉमन लँग्वेज भाषांतर त्या वचनाचा अनुवाद असा करते: “तुझ्या मंदिराविषयीच्या आवेशाने मी पेटलो आहे.” लक्ष देण्याजोगी गोष्ट म्हणजे, पूर्वेकडील काही भाषांमध्ये “आवेश” हा शब्द दोन भागांनी मिळून बनलेला आहे, ज्याचा शब्दशः अर्थ “ज्वलंत-हृदय,” जणू हृदय पेटलेले आहे असा होतो. त्यामुळेच, येशूने मंदिरात जे केले ते पाहून त्याच्या शिष्यांना दाविदाचे शब्द आठवले याचे आपल्याला नवल वाटू नये. पण, कोणत्या गोष्टीमुळे येशूचे हृदय जणू पेटून उठले होते आणि तसे वागण्यासाठी कोणत्या गोष्टीने त्याला प्रवृत्त केले?

१०. बायबलमध्ये वापरण्यात आलेल्या “आवेश” या शब्दाचा काय अर्थ होतो?

१० दाविदाच्या स्तोत्रात “आवेश” असे भाषांतर केलेल्या मूळ हिब्रू शब्दाचे भाषांतर बायबलमध्ये इतरत्र सहसा “ईर्ष्यावान” किंवा “ईर्ष्या” असे करण्यात आले आहे. नवे जग भाषांतर यात कधीकधी याचा अनुवाद ‘एकनिष्ठ भक्‍तीची मागणी करणे’ असा करण्यात आला आहे. (निर्ग. २०:५; ३४:१४; यहो. २४:१९, NW) एका बायबल शब्दकोशानुसार हा शब्द, “सहसा वैवाहिक नातेसंबंधाच्या बाबतीत वापरला जातो. . . . ज्याप्रमाणे पती-पत्नी त्यांच्यातील सकारात्मक ईर्ष्येमुळे अशी हक्काची मागणी करतात, की त्यांच्या विवाहसोबत्याने त्यांना विश्‍वासू राहावे, त्याचप्रमाणे देवाच्या सेवकांनी एकनिष्ठपणे त्याची भक्‍ती केली पाहिजे अशी हक्काची मागणी देव त्यांच्याकडून करतो व आपल्या या हक्काचे तो समर्थन करतो.” (मार्क १२:२८-३०; लूक ४:८ वाचा.) अशा रीतीने, बायबलमध्ये वापरण्यात आलेल्या आवेश या शब्दाचा अर्थ, एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी दाखवण्यात आलेल्या उत्साहापुरताच मर्यादित नाही. उदाहरणार्थ, एखाद्या खेळाचे चाहते त्यांच्या आवडत्या खेळाबद्दल जो उत्साह व जोश दाखवतात एवढाच त्याचा अर्थ होत नाही. दाविदाने दाखवलेला आवेश, सकारात्मक प्रकारची ईर्ष्या होती. म्हणजे, यहोवाबद्दल त्याला इतकी गाढ आस्था होती, की तो यहोवाची निंदा सहन करू शकत नव्हता. उलट, देवाचे उत्तम नाव जपण्याची किंवा त्याच्या नावावर लावलेला कलंक दूर करण्याची त्याला प्रबळ इच्छा होती.

११. येशूला आवेशाने परिश्रम करण्यास कोणत्या गोष्टीने प्रेरित केले?

११ येशूने मंदिरात जे केले ते पाहून त्याच्या शिष्यांनी दाविदाच्या शब्दांचा संबंध येशूच्या कार्याशी जोडला ते अगदी अचूक होते. येशूने परिश्रम केले ते केवळ ठरावीक वेळेच्या आत त्याला आपले कार्य संपवायचे होते म्हणून नव्हे, तर त्याला आपल्या पित्याच्या नावासाठी आणि खऱ्‍या उपासनेसाठी आवेश किंवा ईर्ष्या होती म्हणून. देवाचे नाव कशा प्रकारे कलंकित करण्यात आले व त्याच्या नावाची किती निंदा करण्यात आली हे पाहून, तो कलंक व निंदा दूर करण्यासाठी त्याने उचित आवेश व ईर्ष्या दाखवली. नम्र लोकांवर जुलूम होत असल्याचे व धार्मिक पुढारी त्यांचा गैरफायदा घेत असल्याचे येशूने पाहिले, तेव्हा त्या परिस्थितीतून त्यांना सोडवण्यासाठी व त्या जुलुमी धार्मिक पुढाऱ्‍यांचा धिक्कार करण्यासाठी त्याच्या आवेशामुळे त्याला प्रेरणा मिळाली.—मत्त. ९:३६; २३:२, ४, २७, २८, ३३.

खऱ्‍या उपासनेसाठी आवेशी असा

१२, १३. आज ख्रिस्ती धर्मजगतातील धार्मिक पुढाऱ्‍यांनी (क) देवाच्या नावाबद्दल (ख) देवाच्या राज्याबद्दल काय केले आहे?

१२ आज आपल्या काळातील धार्मिक परिस्थिती अगदी येशूच्या काळातील परिस्थितीसारखीच आहे. उदाहरणार्थ, तुम्हाला आठवत असेल की येशूने त्याच्या शिष्यांना सर्वात आधी देवाच्या नावासाठी प्रार्थना करण्यास शिकवले होते: “तुझे नाव पवित्र मानिले जावो.” (मत्त. ६:९) आज आपण धार्मिक पुढाऱ्‍यांना, खासकरून ख्रिस्ती धर्मजगतातील पाळकांना, देवाच्या नावाबद्दल लोकांना शिकवताना आणि त्या नावाच्या पवित्रीकरणाबद्दल किंवा त्याचा सन्मान करण्याबद्दल शिकवताना पाहतो का? त्याच्या अगदी उलट त्यांनी त्रैक्य, मानवी प्राणाचे अमरत्व आणि नरकाग्नी यांसारख्या शिकवणींद्वारे देव रहस्यमयी, गूढ, क्रूर व निष्ठुर आहे असे सांगून त्याच्याबद्दल खोटी माहिती दिली आहे. आपल्या अनैतिक कृत्यांद्वारे आणि ढोंगीपणाद्वारेदेखील त्यांनी देवाच्या नावाला काळिमा फासला आहे. (रोमकर २:२१-२४ वाचा.) याशिवाय, देवाचे वैयक्‍तिक नाव लपवण्यासाठी त्यांनी होईल तितके प्रयत्न केले आहेत. त्यांनी तर त्यांच्या बायबल भाषांतरांमधून देवाचे नावदेखील काढून टाकले आहे. अशा प्रकारे, ते लोकांना देवाजवळ येण्यास व त्याच्यासोबत जवळचा नातेसंबंध विकसित करण्यास अडथळा निर्माण करत आहेत.—याको. ४:७, ८.

१३ येशूने आपल्या अनुयायांना देवाच्या राज्यासाठीदेखील प्रार्थना करण्यास शिकवले: “तुझे राज्य येवो. जसे स्वर्गांत तसे पृथ्वीवरहि तुझ्या इच्छे प्रमाणे होवो.” (मत्त. ६:१०) ख्रिस्ती धर्मजगतातील पाळक ही प्रार्थना दररोज करत असले, तरी त्यांनी आपल्या लोकांना राजकीय व इतर मानवी संघटनांचे समर्थन करण्यास आर्जवले आहे. शिवाय, जे देवाच्या राज्याचा प्रचार करतात व त्याची साक्ष देतात त्यांना ते तुच्छ लेखतात. परिणामस्वरूप, ख्रिस्ती असल्याचा दावा करणाऱ्‍यांपैकी अनेक जण देवाच्या राज्यावर विश्‍वास ठेवणे तर दूरच, त्याबद्दल चर्चासुद्धा करत नाहीत.

१४. ख्रिस्ती धर्मजगताच्या पाळकांनी कशा प्रकारे देवाच्या वचनाला तुच्छ लेखले आहे?

१४ देवाला प्रार्थना करताना येशूने अगदी स्पष्टपणे असे म्हटले: “तुझे वचन हेच सत्य आहे.” (योहा. १७:१७) आणि स्वर्गात जाण्याआधी, येशूने असे सांगितले होते की आपल्या लोकांना आध्यात्मिक अन्‍न पुरवण्यासाठी तो ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासाची’ नेमणूक करेल. (मत्त. २४:४५) ख्रिस्ती धर्मजगताचे पाळक, देवाच्या वचनाचे कारभारी असल्याचा दावा करण्यात सर्वात पुढे असले, तरी धन्याने त्यांच्यावर सोपवलेले काम पूर्ण करण्यात ते विश्‍वासू ठरले आहेत का? नाही. बायबलमध्ये सांगितलेल्या गोष्टी निव्वळ काल्पनिक कथा आहेत असे ते सहसा सांगतात. आपल्या लोकांना आध्यात्मिक अन्‍न पुरवण्याद्वारे त्यांचे सांत्वन करण्याऐवजी व त्यांना खरे ज्ञान देण्याऐवजी, त्यांनी मानवी तत्त्वज्ञान शिकवण्याद्वारे त्यांना खूश केले आहे. त्यासोबतच, त्यांनी आपल्या अनुयायांचे मन राखण्यासाठी त्यांच्या अनैतिक कृत्यांचे समर्थन केले आहे आणि अशा प्रकारे त्यांनी देवाच्या नैतिक स्तरांना तुच्छ लेखले आहे.—२ तीम. ४:३, ४.

१५. ख्रिस्ती धर्मजगतातील पाळकांनी देवाच्या नावाने केलेल्या गैरकृत्यांबद्दल तुम्हाला कसे वाटते?

१५ बायबलमध्ये सांगितलेल्या देवाच्या नावाने अनेक वाईट गोष्टी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक प्रामाणिक मनाचे लोक निराश झाले आहेत किंवा देवावरून व बायबलवरून त्यांचा विश्‍वास पूर्णपणे उडाला आहे. ते सैतानाला व त्याच्या दुष्ट जगाला बळी पडले आहेत. दररोज अशा गोष्टी घडत असल्याचे तुम्ही पाहता व ऐकता तेव्हा तुम्हाला कसे वाटते? देवाचे नाव कलंकित करण्यात आले आहे व त्याची निंदा करण्यात आली आहे हे तुम्ही पाहता तेव्हा त्याचे सेवक या नात्याने, त्याच्या नावावर लावण्यात आलेला कलंक व निंदा दूर करण्यासाठी तुम्ही प्रवृत्त होणार नाही का? प्रामाणिक व नम्र मनाच्या लोकांची फसवणूक केली जात असल्याचे व त्यांचा गैरफायदा घेतला जात असल्याचे तुम्ही पाहता, तेव्हा अशा अत्याचारपीडित लोकांचे सांत्वन करण्यास तुम्ही प्रवृत्त होणार नाही का? येशूच्या काळातील लोक ‘मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे गांजलेले व पांगलेले असल्याचे’ त्याने पाहिले तेव्हा त्याला त्यांच्याबद्दल फक्‍त दया वाटली नाही. तर, तो “त्यांना बऱ्‍याच गोष्टींविषयी शिक्षण देऊ लागला.” (मत्त. ९:३६; मार्क ६:३४) येशूप्रमाणेच, आज आपल्याजवळही आवेशी असण्याची बरीच कारणे आहेत.

१६, १७. (क) सेवाकार्यात परिश्रम करण्यासाठी कोणत्या गोष्टीने आपल्याला प्रवृत्त केले पाहिजे? (ख) पुढील लेखात आपण कशाची चर्चा करणार आहोत?

१६ आपण आपले सेवाकार्य आवेशाने करतो, तेव्हा १ तीमथ्य २:३, ४ यातील प्रेषित पौलाचे शब्द गहिरा अर्थ घेतात. (वाचा.) आपण शेवटल्या काळात जगत आहोत केवळ हे माहीत असल्यामुळेच आपण सेवाकार्यात जास्त परिश्रम घेतो असे नाही, तर देव आपल्याकडून तशी अपेक्षा करतो याची जाणीव असल्यामुळेदेखील आपण सेवाकार्यात जास्त परिश्रम घेतो. देवाची इच्छा आहे, की लोकांनी सत्याबद्दलचे ज्ञान घेऊन त्याची उपासना व सेवा करण्यास शिकावे आणि त्याचे आशीर्वाद मिळवावेत. केवळ कमी वेळ उरलेला आहे या प्रमुख कारणामुळे आपण सेवाकार्यात आवेशाने भाग घेत नाही, तर आपण देवाचे नाव सन्मानित करू इच्छितो आणि लोकांना त्याच्या इच्छेबद्दल जाणून घेण्यास मदत करू इच्छितो. होय, आपण खऱ्‍या उपासनेकरता आवेशी आहोत.—१ तीम. ४:१६.

१७ आपण यहोवाचे लोक असल्यामुळे, मानवजातीबद्दल व या पृथ्वीबद्दल त्याचा उद्देश काय आहे याबद्दलचे सत्य शिकवून त्याने आपल्याला आशीर्वादित केले आहे. या ज्ञानाच्या बळावर आपण लोकांना जीवनात सुखसमाधान व भविष्यासाठी एक खातरीलायक आशा मिळवण्यास मदत करू शकतो. सैतानाच्या जगावर नाश ओढवेल तेव्हा त्यातून सुरक्षितपणे बचावण्याचा मार्ग आपण त्यांना दाखवू शकतो. (२ थेस्सलनी. १:७-९) यहोवाच्या दिवसाला अजूनही विलंब होत आहे असे वाटून निराश किंवा निरुत्साही होण्याऐवजी, खऱ्‍या उपासनेकरता आवेशी असण्यासाठी आपल्याजवळ अजूनही वेळ आहे याचा आपल्याला आनंद झाला पाहिजे. (मीखा ७:७; हब. २:३) पण, आपण अशा प्रकारचा आवेश कसा विकसित करू शकतो? याची चर्चा आपण पुढच्या लेखात करणार आहोत.

तुम्ही स्पष्ट करू शकता का?

• येशूला त्याच्या सेवाकार्यादरम्यान अथक परिश्रम घेण्यास कोणत्या गोष्टीने प्रवृत्त केले?

• बायबलमध्ये वापरण्यात आलेल्या “आवेश” या शब्दाचा काय अर्थ होतो?

• आज घडत असलेल्या कोणत्या गोष्टींमुळे आपण खऱ्‍या उपासनेकरता आवेशी असण्यास प्रवृत्त झालो पाहिजे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[८ पानांवरील चित्र]

येशूने आपल्या पित्याची इच्छा पूर्ण करण्यावर व इतरांना प्रेम दाखवण्यावर आपले लक्ष केंद्रित केले

[१० पानांवरील चित्र]

खऱ्‍या उपासनेकरता आवेशी असण्याची अनेक कारणे आपल्याजवळ आहेत