व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवाचे स्तवन करू या!

यहोवाचे स्तवन करू या!

यहोवाचे स्तवन करू या!

“मला अस्तित्व आहे तोपर्यंत मी माझ्या देवाचे स्तोत्र गाईन.”—स्तो. १४६:२.

१. तरुण दाविदाला स्तोत्रगीते रचण्याची प्रेरणा कशामुळे मिळाली?

 तरुण असताना दाविदाने बेथलेहेमच्या आसपासच्या कुरणांमध्ये आपल्या पित्याच्या कळपांची राखण करण्यात कितीतरी वेळ घालवला होता. मेढरांची राखण करताना त्याला यहोवाच्या अद्‌भुत सृष्टिकार्यांचे, उदाहरणार्थ तारकामय आकाश, “वनपशु,” व “आकाशातील पाखरे” यांचे निरीक्षण करण्याची संधी मिळाली. त्याने जे काही पाहिले त्याचा त्याच्या मनावर गहिरा प्रभाव पडला—इतका की या विस्मयकारक गोष्टी पाहून त्यांच्या रचनाकाराची स्तुती करण्यासाठी हृदयस्पर्शी गीते रचण्याची प्रेरणा त्याला मिळाली. दाविदाने रचलेल्या गीतांपैकी कितीतरी गीते स्तोत्रसंहिता पुस्तकात आढळतात. *स्तोत्र ८:३, ४, ७-९ वाचा.

२. (क) एखाद्याच्या मनावर संगीताचा काय प्रभाव पडू शकतो? एक उदाहरण द्या. (ख) स्तोत्र ३४:७, ८ व १३९:२-८ या वचनांतून, यहोवासोबत असलेल्या दाविदाच्या नातेसंबंधाविषयी आपण काय शिकू शकतो?

बहुधा याच काळादरम्यान, दावीद एक संगीतकार या नात्याने अधिकाधिक कुशल होत गेला. किंबहुना, तो इतका तरबेज झाला की त्याला शौल राजासाठी वीणा वाजवण्याकरता बोलावण्यात आले. (नीति. २२:२९) ज्याप्रमाणे एखादे मधुर संगीत ऐकून मन सहसा हलके होते, त्याचप्रमाणे दाविदाच्या संगीतानेदेखील शौल राजाच्या दुखावलेल्या मनावर फुंकर घातली होती. दावीद जेव्हा जेव्हा आपली वीणा वाजवायचा, तेव्हा तेव्हा “शौलास चैन पडून बरे वाटत असे.” (१ शमु. १६:२३) या देवभीरू संगीतकाराने व गीतकाराने रचलेली गीते आजही तितकीच मोलाची आहेत. जरा विचार करा! दाविदाचा जन्म होऊन आज ३,००० हून अधिक वर्षे उलटली आहेत. तरीसुद्धा, आजदेखील निरनिराळ्या पार्श्‍वभूमीचे व जगातील निरनिराळ्या भागांतील लाखो लोक सांत्वन व आशा मिळवण्यासाठी नियमितपणे दाविदाची स्तोत्रे वाचतात.—२ इति. ७:६; स्तोत्र ३४:७, ८; १३९:२-८ वाचा; आमो. ६:५.

खऱ्‍या उपासनेत संगीताला मानाचे स्थान

३, ४. दाविदाच्या दिवसांत पवित्र संगीत सादर करण्यासाठी कोणती व्यवस्था करण्यात आली होती?

दाविदाच्या हातात कला होती आणि या कलेचा त्याने सगळ्यात चांगल्या गोष्टीसाठी अर्थात यहोवाचा गौरव करण्यासाठी उपयोग केला. इस्राएलचा राजा बनल्यानंतर दाविदाने, निवासमंडपात केल्या जाणाऱ्‍या निरनिराळ्या सेवांमध्ये मधुर संगीताचादेखील समावेश केला. निवासमंडपात सेवा करणाऱ्‍या एकूण लेव्यांपैकी एक दशांश म्हणजे ४,००० लेव्यांना “परमेश्‍वराचे स्तवन करण्यासाठी,” नेमण्यात आले होते व त्यांपैकी दोनशे अठ्ठ्यांयशी लेवी “परमेश्‍वराप्रीत्यर्थ गाण्याचे शिक्षण मिळून तरबेज” झालेले असे होते.—१ इति. २३:३, ५; २५:७.

लेव्यांनी सादर केलेली अनेक गीते खुद्द दाविदाने रचली होती. दाविदाची स्तोत्रे गायिली जायची त्या प्रसंगी ज्या इस्राएल लोकांना उपस्थित राहण्याची सुसंधी मिळाली होती त्यांची मने ती गीते ऐकून हेलावून गेली असतील. नंतर, कराराचा कोश जेरूसलेममध्ये आणला गेला तेव्हा, “दाविदाने लेव्यांच्या प्रमुखास आज्ञा केली की सतार, वीणा व झांजा अशी वाद्ये वाजवून आनंदाने उच्चस्वरे गायन करितील असे तुमच्या भाऊबंदांतले नायक नेमा.”—१ इति. १५:१६.

५, ६. (क) दाविदाच्या राजवटीत संगीताला इतके महत्त्व का देण्यात आले होते? (ख) प्राचीन इस्राएलच्या काळात देवाच्या उपासनेत संगीताला महत्त्वाचे स्थान देण्यात आले होते हे आपल्याला कशावरून समजते?

दाविदाच्या काळात, संगीताला इतके महत्त्व का देण्यात आले होते? दावीद स्वतः एक संगीतकार होता केवळ या कारणासाठी संगीताला महत्त्व देण्यात आले होते का? नाही. त्याचे आणखीही एक कारण होते. ते कोणते, हे अनेक शतकांनंतर हिज्कीया राजाने मंदिरातील सेवा पुनःस्थापित केली तेव्हा प्रकट करण्यात आले. २ इतिहास २९:२५ यात आपण असे वाचतो: “[हिज्कीयाने] दावीद व राजाचा द्रष्टा गाद आणि नाथान संदेष्टा यांच्या आज्ञेप्रमाणे झांजा, सारंग्या व वीणा वाजविण्यासाठी लेव्यांस परमेश्‍वराच्या मंदिरात उभे केले; ही आज्ञा परमेश्‍वराने आपल्या संदेष्ट्यांच्या द्वारे केली होती.”

होय, खुद्द यहोवाने आपल्या संदेष्ट्यांद्वारे अशी आज्ञा दिली, की त्याच्या उपासकांनी गीत गाऊन त्याची स्तुती करावी. लेवी वंशातील जे गायक होते त्यांना संगीतरचना करण्यासाठी व बहुधा रियाज करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून इतर लेव्यांना ज्या सेवा करणे बंधनकारक होते त्यांपासून या गायकांना मुक्‍त करण्यात आले होते.—१ इति. ९:३३.

७, ८. आपली राज्यगीते गाण्याचा प्रश्‍न येतो तेव्हा कौशल्यापेक्षा कोणती गोष्ट अधिक महत्त्वाची आहे?

तुम्ही कदाचित असे म्हणाल, “चांगलं गाण्याचा प्रश्‍न येतो तेव्हा मी हे खातरीनं म्हणू शकतो, की निवासमंडपात संगीत सादर करणाऱ्‍या तरबेज गायकांमध्ये मला कधीच स्थान मिळालं नसतं!” पण, लेवी संगीतकारांपैकी सर्वच जण उत्तम संगीतकार होते असे नाही. १ इतिहास २५:८ नुसार त्यांच्यामध्ये ‘शिष्य’ किंवा शिकणारेदेखील होते. लक्षात घेण्याजोगी आणखी एक खास गोष्ट म्हणजे इस्राएलच्या इतर वंशांमध्येसुद्धा काही कुशल संगीतकार व गीतकार असतील. पण संगीताचे सादरीकरण करण्यासाठी केवळ लेव्यांना नियुक्‍त करण्यात आले होते. त्या सर्व विश्‍वासू लेव्यांनी—मग ते कुशल गायक असोत अथवा शिकणारे असोत—अगदी तल्लीन होऊन गीत गायिले असावे हे आपण खातरीने म्हणू शकतो.

दाविदाचे संगीतावर खूप प्रेम होते आणि तो एक कुशल संगीतकारदेखील होता. पण, देवाच्या नजरेत केवळ कौशल्याला महत्त्व असते का? स्तोत्र ३३:३ (NW) मध्ये दाविदाने लिहिले: “विणेवर उच्चस्वरात आनंदाने गाण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा.” यावरून स्पष्टपणे दिसून येते की, यहोवाची स्तुती करण्यासाठी आपण ‘सर्वतोपरी प्रयत्न करतो’ की नाही ही गोष्ट त्याच्या नजरेत सगळ्यात महत्त्वाची आहे.

दाविदाच्या काळानंतर संगीताने बजावलेली भूमिका

९. शलमोनाच्या राजवटीदरम्यान तुम्ही मंदिराच्या उद्‌घाटनप्रसंगी उपस्थित राहिला असता तर तुम्ही काय पाहिले व ऐकले असते त्याचे वर्णन करा.

शलमोनाच्या राजवटीदरम्यान खऱ्‍या उपासनेत संगीताने प्रमुख भूमिका बजावली. मंदिराच्या उद्‌घाटनप्रसंगी एका व्यापक ऑर्केस्ट्राची (वृंदवादनाची) व्यवस्था करण्यात आली होती व त्यात कर्णे वाजवणारे एकशेवीस जण होते. (२ इतिहास ५:१२ वाचा.) बायबल आपल्याला सांगते, की “कर्णे वाजविणारे व गाणारे [जे सर्व याजक होते] एका सुराने परमेश्‍वराची स्तुति व धन्यवाद करू लागले, . . . ‘तो उत्तम आहे, त्याची दया सनातन आहे.’” ते मोठ्या आनंदाने व उच्चस्वराने गाऊ लागले त्याच क्षणी “परमेश्‍वराचे मंदिर मेघाने व्यापिले.” यावरून, यहोवा त्यांच्यावर प्रसन्‍न झाल्याचे दिसून आले. एकाच वेळी सर्व कर्णे वाजली तेव्हा हजारो गायकांनी एका सुरात गायन केल्यामुळे जो निनाद झाला तो ऐकणे खरोखर किती रोमांचक व चित्तथरारक असले असेल!—२ इति. ५:१३.

१०, ११. सुरुवातीच्या ख्रिश्‍चनांनी आपल्या उपासनेत संगीताचा उपयोग केला हे कशावरून दिसून येते?

१० सुरुवातीच्या ख्रिश्‍चनांनीदेखील आपल्या उपासनेत संगीताचा उपयोग केला. अर्थात, पहिल्या शतकातील उपासक उपासनेसाठी निवासमंडपात किंवा मंदिरात नव्हे, तर बांधवांच्या घरांत एकत्र येत असत. पण, छळामुळे व इतर कारणांमुळे परिस्थिती फारशी चांगली नसली, तरीही त्या ख्रिश्‍चनांनी गीत गाऊन देवाची स्तुती केली.

११ प्रेषित पौलाने कलस्सै येथील बांधवांना असा सल्ला दिला: “गीते व स्तोत्रे व आत्मिक गाणी यांनी तुम्ही एकमेकांस . . . बोध करा.” (कलस्सै. ३:१६, पं.र.भा.) पौल व सीला यांना तुरुंगात डांबण्यात आले तेव्हा त्यांच्याजवळ कोणतेही गीत पुस्तक नव्हते. तरीसुद्धा, ते ‘प्रार्थना व गाणे गाऊन देवाची स्तुति’ करू लागले. (प्रे. कृत्ये १६:२५) तुम्हाला कधी तुरुंगात डांबण्यात आले तर आपल्या राज्यगीतांपैकी किती गाणी तुम्ही तोंडपाठ गाऊ शकाल?

१२. आपल्या राज्यगीतांबद्दल आपल्याला कृतज्ञता वाटते हे आपण कसे दाखवू शकतो?

१२ आपल्या उपासनेत संगीताला मानाचे स्थान असल्यामुळे आपण स्वतःला असा प्रश्‍न विचारला पाहिजे: ‘संगीताविषयी मला कृतज्ञता वाटते हे मी दाखवतो का? मी सभा, संमेलने व अधिवेशने यांस वेळेवर जातो का, जेणेकरून इतर बंधुभगिनींसह मला सुरुवातीचे गीत गाता येईल? आणि मग मी जिवेभावे गातो का? ईश्‍वरशासित सेवा प्रशाला व सेवा सभा यांच्या मध्ये किंवा जाहीर भाषण व टेहळणी बुरूज अभ्यास यांच्या मध्ये गीत गायिले जाते ती वेळ विनाकारण जागेवरून उठण्याची व पाय मोकळे करून येण्याची मधली सुटी नाही हे मी माझ्या मुलांना शिकवतो का? गीत गाणे हा आपल्या उपासनेचाच एक भाग आहे. होय, आपण गीत गाण्यात तरबेज असोत अथवा शिकणारे असोत, यहोवाची स्तुती करण्यासाठी आपण सर्व एकजुटीने गीत गाऊ शकतो, किंबहुना आपण गायिलेच पाहिजे.—२ करिंथकर ८:१२ पडताळून पाहा.

काळानुसार गरजा बदलतात

१३, १४. मंडळीच्या सभांमध्ये पूर्ण मनाने गीत गाणे का महत्त्वाचे आहे? उदाहरण द्या.

१३ आपली राज्यगीते इतकी महत्त्वाची का आहेत याचे एक कारण १०० हून अधिक वर्षांपूर्वी झायन्स वॉच टावर या नियतकालिकात सांगितले होते. त्यात म्हटले होते: “सत्यावर आधारित असलेले गीत गाणे, हा आपल्या मनात व अंतःकरणात सत्य बिंबवण्याचा एक उत्तम मार्ग आहे.” आपल्या गीतांचे अनेक बोल शास्त्रवचनांवर आधारित आहेत. तेव्हा, कमीतकमी काही गाण्यांचे तरी शब्द शिकणे हा आपल्या हृदयात सत्य रुजवण्याचा सर्वोत्तम मार्ग असू शकतो. बरेचदा, मंडळीने गायिलेली हृदयस्पर्शी गीते ऐकून, आपल्या सभांना पहिल्यांदा उपस्थित राहणारे भारावून गेले आहेत.

१४ सन १८६९ मध्ये एके दिवशी संध्याकाळी सी. टी. रस्सल आपले काम संपवून घरी जात असताना त्यांना एका तळघरातील सभागृहातून गाण्याचा आवाज ऐकू आला. खरेतर आयुष्याच्या त्या वळणावर, आपल्याला देवाबद्दलचे सत्य समजेल ही आशाच त्यांनी सोडून दिली होती. त्यामुळे त्यांनी स्वतःला आपल्या उद्योगधंद्यात झोकून देण्याचे ठरवले. त्यांनी असा विचार केला, आपण लोकांना देवाबद्दलचे सत्य शिकवू शकत नसलो, तरी थोडाफार पैसा कमावून निदान त्यांच्या भौतिक गरजा तरी भागवू शकतो. बंधू रस्सल, धुळीने माखलेल्या त्या अस्वच्छ सभागृहात गेले आणि तेथे प्रार्थनासभा चालू असल्याचे त्यांच्या लक्षात आले. ते तेथे बसून ऐकू लागले. त्याबद्दल त्यांनी नंतर असे लिहिले, की ‘बायबल हे ईश्‍वरप्रेरित वचन आहे यावरील त्यांचा विश्‍वास कमकुवत होत चालला होता. पण, त्या रात्री देवाच्या मार्गदर्शनामुळे त्यांनी जे काही ऐकले ते त्यांचा कमकुवत होत चाललेला विश्‍वास बळकट करण्यास पुरेसे होते.’ लक्षात घ्या, की बंधू रस्सल यांना सर्वात प्रथम गाण्यानेच त्या सभेकडे आकर्षित केले होते.

१५. शास्त्रवचनांवरील कोणत्या सुधारित स्पष्टीकरणांमुळे गीतपुस्तकात सुधारणा करणे आवश्‍यक झाले आहे?

१५ काळाच्या ओघात, आपल्याला शास्त्रवचनांवर सुधारित समज देण्यात येते. नीतिसूत्रे ४:१८ म्हणते: “धार्मिकांचा मार्ग मध्यान्हापर्यंत उत्तरोत्तर वाढणाऱ्‍या उदयप्रकाशासारखा आहे.” बायबल सत्यावर आणखी प्रकाश टाकला जातो तेव्हा साहजिकच आपल्या राज्यगीतांमध्येही सुधारणा करणे आवश्‍यक असते. गेल्या २५ वर्षांपासून, अनेक देशांतील यहोवाच्या साक्षीदारांनी यहोवाचे गुणगान करा * या गीतपुस्तकाचा मोठ्या आनंदाने उपयोग केला आहे. ते पुस्तक प्रकाशित झाले त्यानंतरच्या वर्षांमध्ये बायबलच्या अनेक विषयांवर अधिकाधिक प्रकाश टाकण्यात आला आहे व त्या गीतपुस्तकात वापरण्यात आलेले काही वाक्यांश आता कालबाह्‍य झाले आहेत. उदाहरणार्थ, आता आपण यहोवाचे नाव “उंचावले जाईल” असे म्हणत नाही, तर यहोवाचे नाव “पवित्र केले जाईल” असे म्हणतो. यावरून स्पष्टच आहे, की हे तात्त्विक बदल लक्षात घेता आपले गीतपुस्तक अद्ययावत करणे गरजेचे होते.

१६. आपले नवीन गीतपुस्तक आपल्याला इफिसकर ५:१९ मधील पौलाच्या सल्ल्याचे पालन करण्यास कसे मदत करेल?

१६ या व इतर कारणांमुळे नियमन मंडळाने यहोवाचे स्तवन करू या असे शीर्षक असलेल्या नवीन गीतपुस्तकाचे प्रकाशन करण्याची अनुमती दिली आहे. इंग्रजी भाषेतील या नवीन गीतपुस्तकातील गीतांची संख्या कमी करून १३५ इतकी करण्यात आली आहे. मराठी भाषेत ५५ गीतांचे नवीन गीत माहितीपत्रक लवकरच उपलब्ध होईल. यांपैकी निदान काही नवीन गीतांचे बोल तोंडपाठ करण्याचे प्रोत्साहन आम्ही तुम्हाला देतो. ही गोष्ट, पौलाने इफिसकर ५:१९ (वाचा.) यात जो सल्ला दिला त्याच्या एकवाक्यतेत आहे.

तुम्हाला किती कृतज्ञता वाटते ते दाखवा

१७. मंडळीत गीत गाण्याचा प्रश्‍न येतो तेव्हा इतर जण आपल्या गाण्यावर हसतील या भीतीवर मात करण्यासाठी कोणते विचार आपली मदत करू शकतात?

१७ आपल्या गाण्यावर इतर जण हसतील या भीतीमुळे आपण ख्रिस्ती सभांमध्ये उत्साहाने गीत गाण्याचे सोडून द्यावे का? याचा विचार करा: बोलण्याचा प्रश्‍न येतो तेव्हा “आपण सगळेच पुष्कळ चुका करितो” हे खरे नाही का? (याको. ३:२) तरीसुद्धा, घरोघरच्या कार्यात सहभाग घेऊन आपण यहोवाची स्तुती करण्याचे सोडून देत नाही. तर मग, आपल्याला नीट गाता येत नाही म्हणून गाणे गाऊन देवाची स्तुती करण्याचे आपण का सोडून द्यावे? माणसाचे तोंड बनवणारा यहोवाच असल्यामुळे त्याची स्तुती करण्यासाठी आपण आपल्या आवाजाचा उपयोग करतो तेव्हा त्याला आनंद होतो.—निर्ग. ४:११.

१८. गीतांचे बोल शिकण्यासाठी तुम्ही काय करू शकता ते सांगा.

१८ सिंग टू जेहोवा—वोकल रेंडिशन्स * या शीर्षकाच्या सीडी अनेक भाषांमध्ये उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यात अतिशय सुरेल असा ऑर्केस्ट्रा (वृंदवादन) व कोरस (गायकवृंद) यांचा प्रयोग करून नवीन गाणी सादर करण्यात आली आहेत. त्यामुळे ते संगीत ऐकणे खरोखर एक आनंददायक अनुभव आहे. तेव्हा, वारंवार ते ऐका; त्यामुळे आपल्या नवीन गाण्यांपैकी निदान काही गाण्यांचे तरी बोल तुम्ही लवकरच शिकाल. अनेक गीतांचे बोल अशा रीतीने रचण्यात आले आहेत, की तुम्ही एक ओळ गायिली तर पुढची ओळ काय असेल याचा तुम्ही सहज अंदाज बांधू शकता. त्यामुळे, तुम्ही सीडीवर ही गाणी ऐकता तेव्हा कोरससोबत ती गाण्याचा प्रयत्न करा. तुम्ही घरीच गाण्याच्या बोलांशी व चालीशी परिचित झालात, तर राज्य सभागृहात तुम्ही नक्कीच अधिक आत्मविश्‍वासाने गाऊ शकाल.

१९. ऑर्केस्ट्राच्या साहाय्याने आपली राज्यगीते सादर करण्यासाठी काय काय केले जाते?

१९ खास संमेलन दिन, विभागीय संमेलने व प्रांतीय अधिवेशने यांत सादर केल्या जाणाऱ्‍या संगीताकडे आपले दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. हे संगीत तयार करण्यासाठी खूप मेहनत घेतली जाते. सर्वात प्रथम संगीताची निवड केली जाते. मग, वॉचटावर ऑर्केस्ट्राच्या ६४ सदस्यांसाठी ऑर्केस्ट्राची पद्धतशीर जुळणी काळजीपूर्वक लिहिली जाते. त्यानंतर संगीतकार अगणित तास या संगीताचा अभ्यास व सराव करतात आणि शेवटी न्यू यॉर्कमधील पॅटरसन येथे असलेल्या स्टुडिओमध्ये ते ध्वनिमुद्रित केले जाते. या संगीतकारांपैकी दहा बंधुभगिनी अमेरिकेच्या बाहेर राहतात. आपल्या ईश्‍वरशासित कार्यक्रमांसाठी मधुर संगीत तयार करण्यात सहभागी होणे हा एक बहुमान आहे असे ते सर्व जण मानतात. त्यांच्या या प्रेमळ प्रयत्नांबद्दल आपण कृतज्ञता दाखवू शकतो. संमेलने व अधिवेशने यांत कार्यक्रमाचे अध्यक्ष विनंती करतात तेव्हा आपण लगेच आपापल्या जागी बसून अतिशय प्रेमाने तयार केलेले संगीत शांतपणे ऐकू या.

२०. तुम्ही काय करण्याचा निर्धार केला आहे?

२० यहोवा आपली स्तुतिगीते खूप लक्षपूर्वक ऐकतो. त्याच्यासाठी ती फार महत्त्वाची आहेत. आपण उपासनेसाठी एकत्र येतो तेव्हा पूर्ण मनाने राज्यगीते गाऊन यहोवाचे मन आनंदित करू शकतो. होय, आपण कुशल गायक असू किंवा शिकाऊ असू, आपण सर्व जण यहोवाचे स्तवन करू या!—स्तो. १०४:३३.

[तळटीपा]

^ परि. 1 दाविदाचा मृत्यू झाला त्याच्या दहा शतकांनंतर स्वर्गातील असंख्य देवदूतांनी मशीहाच्या जन्माची बातमी मेंढपाळांना जाहीर केली. आस्थेची गोष्ट म्हणजे, त्या वेळी हे मेंढपाळ बेथलेहेमच्या जवळपासच्या कुरणांत आपल्या कळपांची राखण करत होते.—लूक २:४, ८, १३, १४.

^ परि. 15 २२५ गीतांचे हे पुस्तक १०० पेक्षा अधिक भाषांमध्ये उपलब्ध होते. २९ गाणी असलेले मराठी भाषेतील गीत माहितीपत्रक १६ वर्षांपूर्वी प्रकाशित करण्यात आले होते.

^ परि. 18 मराठीत उपलब्ध नाही.

तुम्हाला काय वाटते?

• संगीताला आपल्या उपासनेत महत्त्वाचे स्थान आहे हे बायबल काळातील कोणत्या उदाहरणांवरून दिसून येते?

मत्तय २२:३७ यात नमूद केलेल्या येशूच्या आज्ञेचे पालन करण्याचा व पूर्ण मनाने राज्यगीते गाण्याचा काय संबंध आहे?

• आपल्या राज्यगीतांबद्दल आपल्याला कृतज्ञता वाटते हे दाखवण्याचे काही मार्ग कोणते?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२३ पानांवरील चित्र]

गीत गायिले जाते तेव्हा तुम्ही तुमच्या मुलांना विनाकारण जागेवरून उठण्यापासून रोखता का?

[२४ पानांवरील चित्र]

आपल्या राज्यगीतांचे बोल तुम्ही घरी शिकत आहात का?