व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुमच्या मुलांना इतरांचा आदर करण्यास शिकवा

तुमच्या मुलांना इतरांचा आदर करण्यास शिकवा

तुमच्या मुलांना इतरांचा आदर करण्यास शिकवा

जर्मन भाषेतील एक म्हण आहे: “ज्याची हॅट हातात असते, तो जगभर फिरू शकतो.” अनेक संस्कृतींमध्ये, एखाद्याच्या घरात जाताना किंवा एकमेकांना भेटताना आपली हॅट काढणे हे सभ्यतेचे लक्षण मानले जायचे. आणि असे करणाऱ्‍या व्यक्‍तीकडे लोक आदराने पाहायचे. म्हणून, सुरुवातीला उल्लेख केलेल्या म्हणीचा अर्थ असा होतो, की जे सभ्य असतात त्यांच्याशी लोक सहसा प्रेमळपणे व अधिक चांगले वागतात.

मुलांना सभ्यपणे वागताना पाहून किती सुखावह वाटते! वेगवेगळ्या वयोगटातील प्रचारकांसोबत घरोघरचे सेवाकार्य करणाऱ्‍या हाँड्युरसमधील एका विभागीय पर्यवेक्षकाने असे म्हटले: “बरेचदा मी असं पाहिलं आहे की माझ्या शब्दांपेक्षा, चांगले संस्कार झालेली व आदराने वागणारी मुले घरमालकावर जास्त प्रभाव पाडतात.”

आजच्या काळात अधिकाधिक लोक अनादराने वागत आहेत. तेव्हा इतरांशी कसे वागायचे हे जाणून घेणे व्यावहारिक आणि फायदेकारक आहे. शिवाय, “ख्रिस्ताच्या सुवार्तेस शोभेल असे आचरण ठेवा,” असा सल्ला बायबल आपल्याला देते. (फिलिप्पै. १:२७; २ तीम. ३:१-५) आपल्या मुलांना दुसऱ्‍यांचा आदर करण्यास शिकवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांनी फक्‍त वरवर सौजन्यशील असू नये, तर त्यांनी मनापासून इतरांचा आदर केला पाहिजे. पण, हे त्यांना कसे शिकवता येईल? *

उदाहरणावरून शिष्टाचार शिकवणे

मुले सहसा इतरांच्या उदाहरणांचे अनुकरण करून शिकतात. म्हणून, मुलांना सौजन्याने वागण्यास शिकवण्याचा एक मूलभूत मार्ग म्हणजे पालकांनी स्वतः सौजन्याने वागणे. (अनु. ६:६, ७) आपल्या मुलांसोबत सौजन्याबद्दल बोलणेच महत्त्वाचे नाही, तर त्यासोबतच त्यांच्यापुढे चांगले उदाहरण मांडणेही अत्यंत महत्त्वाचे आहे.

पॉलाचे उदाहरण लक्षात घ्या. * तिचे संगोपन एकपालकीय ख्रिस्ती कुटुंबात झाले होते. सर्वांना आदर दाखवणे हा तिच्या व्यक्‍तिमत्त्वाचा भागच बनला होता. का? ती म्हणते: “माझ्या आईनं माझ्यासमोर चांगलं उदाहरण मांडलं होतं, त्यामुळे आदरानं वागणं आम्हा मुलांमध्ये आपोआपच आलं.” वॉल्टर नामक एका ख्रिस्ती बांधवाने आपल्या मुलांना सत्यात नसलेल्या त्यांच्या आईचा आदर करण्यास शिकवले. तो म्हणतो: “माझ्या पत्नीशी केव्हाही वाईट न बोलण्याद्वारे मी माझ्या स्वतःच्या उदाहरणावरून मुलांना त्यांच्या आईचा आदर करण्यास शिकवलं.” वॉल्टर आपल्या मुलांना देवाच्या वचनातून मार्गदर्शन देत राहिला, आणि यहोवाच्या मदतीसाठी त्याला प्रार्थना करत राहिला. त्याच्या मुलांपैकी, एक जण यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा कार्यालयात सेवा करत आहे, आणि दुसरा, पायनियर या नात्याने सेवा करत आहे. त्याची मुले आपल्या आईवडिलांवर प्रेम करतात आणि त्यांचा आदर करतात.

बायबल म्हणते: “देव अव्यवस्था माजविणारा नाही; तर तो शांतीचा देव आहे.” (१ करिंथ. १४:३३) यहोवा सर्वकाही सुव्यवस्थितपणे करतो. ख्रिश्‍चनांनी देवाच्या या गुणाचे अनुकरण करून घरात सर्व काही नीटनेटके ठेवले पाहिजे. काही पालकांनी आपल्या मुलांना शाळेला जाण्याआधी दररोज आपला बिछाना आवरून ठेवण्यास, आपले कपडे जागच्या जागी ठेवण्यास आणि घरातील किरकोळ कामात मदत करण्यास शिकवले आहे. घरातील इतर खोल्या नीटनेटक्या व स्वच्छ असल्याचे मुले पाहतात, तेव्हा मुलेदेखील स्वतःची खोली आणि इतर वस्तू नीटनेटक्या व स्वच्छ ठेवण्याची जास्त शक्यता आहे.

तुमची मुले शाळेत जे शिकतात त्याबाबतीत त्यांचा दृष्टिकोन कसा आहे? त्यांचे शिक्षक त्यांच्यासाठी जे काही करतात त्याबद्दल ते कृतज्ञता व्यक्‍त करतात का? पालक या नात्याने तुम्ही स्वतः तशी कृतज्ञता व्यक्‍त करता का? तुम्ही जशी मनोवृत्ती बाळगता तशीच मनोवृत्ती तुमची मुले त्यांच्या शाळेच्या अभ्यासाप्रती आणि त्यांच्या शिक्षकांप्रती बाळगतील. तुम्ही त्यांना नियमितपणे आपल्या शिक्षकांचे आभार मानण्याचे उत्तेजन देऊ शकता. इतरांनी आपल्याला दिलेल्या सेवांबद्दल कृतज्ञता व्यक्‍त करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्यांचा आदर करणे, मग ती व्यक्‍ती शिक्षक असो, डॉक्टर असो, दुकानदार असो अथवा इतर कोणीही असो. (लूक १७:१५, १६) ख्रिस्ती मुले त्यांच्या सभ्यतेमुळे आणि चांगल्या वागणुकीमुळे त्यांच्या शाळासोबत्यांमध्ये उठून दिसतात. त्यासाठी त्यांची नक्कीच प्रशंसा केली जावी.

शिष्टाचाराचा प्रश्‍न येतो तेव्हा खऱ्‍या ख्रिश्‍चनांनी एक उत्तम उदाहरण मांडले पाहिजे. मंडळीतील मुले आपल्या बोलण्यात “प्लीज,” “थँक यू,” “आभारी आहे,” असे शब्द वापरून सौजन्याने वागतात ही किती चांगली गोष्ट आहे. सभेत यहोवाकडून मिळणाऱ्‍या शिक्षणाकडे प्रौढ जण लक्ष देण्याद्वारे यहोवाला आदर दाखवतात, तेव्हा मुलांना त्यांचे अनुकरण करण्याचे उत्तेजन मिळते. राज्य सभागृहात जे बंधुभगिनी सौजन्याने वागतात त्यांचे अनुकरण करून मुले आपल्या शेजाऱ्‍यांचा आदर करण्यास शिकू शकतात. उदाहरणार्थ, प्रौढ व्यक्‍तींच्या बाजूने जायचे झाल्यास, चार वर्षांचा अँड्रू आतापासूनच “एक्सक्यूझ मी” बोलायला शिकला आहे.

चांगल्या आचरणाच्या बाबतीत जे काही अपेक्षिले जाते ते आपल्या मुलांना शिकवण्यासाठी पालक आणखी काय करू शकतात? देवाच्या वचनात उल्लेख केलेल्या अनेक उदाहरणांवरून काय शिकता येण्यासारखे आहे हे मुलांना शिकवण्यासाठी पालक वेळ काढू शकतात; किंबहुना त्यांनी तो काढलाच पाहिजे.—रोम. १५:४.

बायबल उदाहरणांवरून शिकवणे

शमुवेलाच्या आईने बहुधा त्याला महायाजक एलीला नमन करण्यास आधीपासूनच शिकवले असावे. ती शमुवेलाला निवासमंडपात घेऊन गेली तेव्हा कदाचित तो केवळ तीन किंवा चार वर्षांचा होता. इतरांना भेटताना काय म्हणावे याचा सराव तुम्ही तुमच्या लहान मुलांबरोबर करू शकता का, जसे की “नमस्ते,” “गुड मॉर्निंग,” “गुड आफ्टरनून,” “गुड ईव्हनिंग”? बाळ शमुवेलाप्रमाणे, तुमच्या मुलांवरही ‘परमेश्‍वर व मानव प्रसन्‍न होतील.’—१ शमु. २:२६.

आदर आणि अनादर यातील फरक दाखवण्यासाठी तुम्ही बायबल उदाहरणांचा उपयोग करू शकता. उदाहरणार्थ, इस्राएलचा अविश्‍वासू राजा अहज्या याला एलीया संदेष्ट्याला भेटायचे होते तेव्हा त्याने “पन्‍नासांच्या एका नायकास पन्‍नास शिपाई देऊन” त्याला बोलावणे पाठवले. या नायकाने एलीयाला आपल्यासोबत येण्याची आज्ञा केली. अशा पद्धतीने देवाच्या प्रतिनिधीशी बोलणे उचित नव्हते. एलीयाने काय उत्तर दिले? “मी देवाचा माणूस असलो तर आकाशातून अग्नीचा वर्षाव होऊन तो तुला व तुझ्या पन्‍नास शिपायांस भस्म करो.” अगदी तसेच घडले. “आकाशातून अग्नीचा वर्षाव होऊन त्याने त्यास व त्याच्या पन्‍नास शिपायांस भस्म केले.”—२ राजे १:९, १०.

राजाने मग ५० शिपायांच्या दुसऱ्‍या एका नायकास एलीयाला आणण्यास पाठवले. त्यानेसुद्धा एलीयाला त्याच्यासोबत येण्याची आज्ञा केली. पुन्हा एकदा त्यांच्यावर स्वर्गातून अग्नीचा वर्षाव झाला. पण मग, ५० शिपायांचा एक तिसरा नायक एलीयाकडे आला. याने मात्र एलीयाला आदर दाखवला. एलीयाला आज्ञा करण्याऐवजी, त्याने एलीयापुढे गुडघे टेकले व अशी विनवणी केली: “अहो देवाचे माणूस, माझा प्राण व ह्‍या आपल्या पन्‍नास दासांचे प्राण आपल्या दृष्टीला मोलवान वाटोत; पाहा, आकाशातून अग्नीचा वर्षाव होऊन पहिले दोन नायक व त्यांचे पन्‍नास पन्‍नास शिपाई भस्म झाले, पण आता माझा प्राण आपल्या दृष्टीस मोलवान वाटो.” या नायकाने कदाचित भयभीत होऊन असे म्हटले असले, तरी तो एलीयाशी गाढ आदराने बोलला होता, मग देवाचा संदेष्टा त्याच्यावर अग्नीचा वर्षाव होण्याची विनंती करणार होता का? असा विचारसुद्धा आपण करू शकत नाही! उलट, यहोवाच्या दूताने एलीयाला त्या नायकासोबत जाण्यास सांगितले. (२ राजे १:११-१५) यावरून, आदर दाखवणे किती महत्त्वाचे आहे हे दिसून येत नाही का?

प्रेषित पौलाला मंदिरात रोमी अधिकाऱ्‍यांनी ताब्यात घेतले तेव्हा आपल्याला बोलण्याचा अधिकार आहे असे त्याने मानले नाही. त्याने आदराने अधिकाऱ्‍यास विचारले: “मला आपल्याबरोबर काही बोलावयाची परवानगी मिळेल का?” याचा परिणाम असा झाला की पौलाला स्वतःच्या बचावाकरता बोलण्याची संधी मिळाली.—प्रे. कृत्ये २१:३७-४०.

येशूची परीक्षा होत असताना त्याच्या थोबाडीत मारण्यात आले. पण, प्रतिकार कसा करावा हे त्याला माहीत होते. त्याने म्हटले: “मी वाईट रीतीने बोललो असलो तर कसे वाईट बोललो ते सिद्ध कर; योग्य रीतीने बोललो असलो तर मला का मारतोस?” येशू ज्या प्रकारे बोलला त्यात कोणीही खोट काढू शकत नव्हता.—योहा. १८:२२, २३.

आपल्याला ताडन दिले जाते तेव्हा आपण कसा प्रतिसाद दिला पाहिजे आणि गतकाळात केलेले गंभीर पाप किंवा आपल्याकडून झालेला हलगर्जीपणा आपण आदरपूर्वक कसा कबूल करावा याबाबतीतही बायबलमध्ये अनेक उदाहरणे दिली आहेत. (उत्प. ४१:९-१३; प्रे. कृत्ये ८:२०-२४) उदाहरणार्थ, अबीगईलचा पती नाबाल दाविदाशी उद्धटपणे वागला तेव्हा तिने त्याबद्दल दाविदाची माफी मागितली. माफी मागण्यासोबतच तिने दाविदाला उदारपणे काही खाण्यापिण्याच्या वस्तूही दिल्या. अबीगईलने जे काही केले त्यावरून, दावीद इतका प्रभावित झाला की नाबालाच्या मृत्यूनंतर त्याने तिला पत्नी करून घेतले.—१ शमु. २५:२३-४१.

कठीण परिस्थितीत आदर दाखवण्याचा प्रश्‍न असो अथवा निव्वळ सौजन्याने वागण्याचा प्रश्‍न असो, तुमच्या मुलांना इतरांशी आदराने वागण्यास शिकवा. अशा प्रकारे ‘लोकांसमोर आपला प्रकाश’ पाडल्याने ‘आपल्या स्वर्गातील पित्याचा गौरव होतो.’—मत्त. ५:१६.

[तळटीपा]

^ अर्थात, प्रौढांशी आदराने वागणे आणि दुष्ट हेतू असलेल्या एखाद्याच्या अधीन होणे यातील फरक पाहण्यास पालकांनी आपल्या मुलांना मदत केली पाहिजे.

^ काही नावे बदलण्यात आली आहेत.