व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

नीतिमत्त्वावर मनापासून प्रेम करा

नीतिमत्त्वावर मनापासून प्रेम करा

नीतिमत्त्वावर मनापासून प्रेम करा

‘तुला नीतिमत्त्वाची आवड आहे.’—स्तो. ४५:७.

१. कोणती गोष्ट ‘नीतिमार्गांवर’ चालत राहण्यास आपल्याला मदत करू शकते?

 आज यहोवा त्याच्या वचनाद्वारे व पवित्र आत्म्याद्वारे त्याच्या लोकांना ‘नीतिमार्गांवर’ चालण्यास मार्गदर्शित करत आहे. (स्तो. २३:३) पण, आपण अपरिपूर्ण असल्यामुळे त्या मार्गावरून भरकटण्याची आपली प्रवृत्ती असते. आणि पुन्हा योग्य मार्गावर येण्यासाठी निश्‍चयपूर्वक प्रयत्न करावे लागतात. मग, कोणती गोष्ट आपल्याला यशस्वी होण्यास मदत करू शकते? त्यासाठी येशूप्रमाणेच आपल्यालासुद्धा योग्य ते करण्याची आवड असली पाहिजे.स्तोत्र ४५:७ वाचा.

२. ‘नीतिमार्ग’ काय आहेत?

हे ‘नीतिमार्ग’ काय आहेत? ते यहोवाच्या नीतिमान स्तरांवर आधारलेले लाक्षणिक ‘मार्ग’ आहेत. हिब्रू व ग्रीक भाषांमध्ये ‘नीतिमत्त्व’ हा शब्द जे “सरळ” आहे त्यास सूचित करतो आणि नैतिक तत्त्वांचे काटेकोर पालन करणे असा त्याचा अर्थ होतो. “नीति” हा यहोवाच्या “राजासनाचा पाया” असल्यामुळे कोणता मार्ग नैतिकदृष्ट्या सरळ आहे हे ठरवण्यासाठी त्याच्या उपासकांनी त्याचे मार्गदर्शन घेतले पाहिजे.—स्तो. ८९:१४.

३. आपण देवाच्या नीतिमत्त्वाविषयी अधिकाधिक कसे शिकू शकतो?

देवाच्या नीतिमान स्तरांचे मनापासून पालन करण्यासाठी झटल्यानेच आपल्याला पूर्णार्थाने त्याचे मन आनंदित करणे शक्य होईल. (अनु. ३२:४) त्यासाठी प्रथम आपण यहोवा देवाचे वचन बायबल यातून त्याच्याविषयी शक्य तितके शिकून घेतले पाहिजे. आपण जितके अधिक यहोवाविषयी शिकू व दररोज त्याच्या जवळ येऊ तितके अधिक आपल्याला त्याचे नीतिमत्त्व प्रिय वाटेल. (याको. ४:८) जीवनात महत्त्वाचे निर्णय घेतानासुद्धा आपण देवाच्या प्रेरित वचनाचे मार्गदर्शन स्वीकारले पाहिजे.

देवाचे नीतिमत्त्व मिळवण्यास झटा

४. देवाचे नीतिमत्त्व मिळवण्यास झटणे याचा काय अर्थ होतो?

मत्तय ६:३३ वाचा. देवाचे नीतिमत्त्व मिळवण्यास झटणे याचा अर्थ केवळ राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करण्यात वेळ खर्च करणे इतकेच नाही. यहोवाला आपली पवित्र सेवा स्वीकारार्ह वाटावी म्हणून आपण दररोज त्याच्या उच्च नीतिमान स्तरांनुसार वागलेबोलले पाहिजे. यहोवाचे नीतिमत्त्व मिळवण्यास झटणाऱ्‍या सर्वांनी काय केले पाहिजे? त्यांनी “सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्त्व व पवित्रता ह्‍यांनी युक्‍त असा देवसदृश निर्माण केलेला नवा मनुष्य धारण करावा.”—इफिस. ४:२४.

५. कोणती गोष्ट निराशेवर मात करण्यास आपल्याला मदत करू शकते?

आपण देवाच्या नीतिमान स्तरांनुसार जीवन जगण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्या स्वतःच्या कमतरतांमुळे कधीकधी आपण निराश होऊ शकतो. मग, अशा कमजोर करून टाकणाऱ्‍या निराशेवर मात करण्यास, तसेच नीतिमत्त्वावर प्रेम करण्यास व नीतिमत्त्वाचे आचरण करण्यास कोणती गोष्ट आपल्याला मदत करू शकते? (नीति. २४:१०) त्यासाठी आपण “खऱ्‍या अंतःकरणाने व विश्‍वासाच्या पूर्ण खातरीने” नियमितपणे यहोवाला प्रार्थना केली पाहिजे. (इब्री १०:१९-२२) आपण अभिषिक्‍त ख्रिस्ती असू अथवा पृथ्वीवरील जीवनाची आशा बाळगणारे असू, येशू ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानावर व आपला थोर महायाजक या नात्याने त्याच्या सेवेवर विश्‍वास प्रदर्शित करतो. (रोम. ५:८; इब्री ४:१४-१६) येशूने सांडलेले रक्‍त किती परिणामकारक आहे याचे स्पष्टीकरण या नियतकालिकाच्या सगळ्यात पहिल्या अंकात देण्यात आले होते. (१ योहा. १:६, ७) त्यात असे म्हटले होते: ‘प्रकाशात लाल रंगाच्या काचेतून एक किरमिजी रंगाची वस्तू पाहिली तर ती पांढरी दिसते ही एक वस्तुस्थिती आहे; त्याचप्रमाणे, आपण देवाच्या दृष्टिकोनातून अर्थात ख्रिस्ताच्या रक्‍तातून आपल्या पातकांकडे पाहतो तेव्हा ती पांढरी दिसतात. (जुलै १८७९, पृ ६) खरेच, यहोवाने आपल्या प्रिय पुत्राच्या खंडणी बलिदानाद्वारे आपल्यासाठी किती अद्‌भुत तरतूद केली आहे!—यश. १:१८.

तुमची आध्यात्मिक शस्त्रसामग्री तपासून पाहा

६. आपली आध्यात्मिक शस्त्रसामग्री तपासून पाहणे का महत्त्वाचे आहे?

“नीतिमत्त्वाचे उरस्त्राण” हा देवाकडून मिळालेल्या आध्यात्मिक शस्त्रसामग्रीचा एक महत्त्वपूर्ण भाग असल्यामुळे आपण तो सदैव धारण करायला हवा. (इफिस. ६:११, १४) आपण अलीकडेच यहोवाला आपले जीवन समर्पित केलेले असू अथवा अनेक दशकांपासून त्याची उपासना करत असू, आपण दररोज आपली आध्यात्मिक शस्त्रसामग्री तपासून पाहणे खूप महत्त्वाचे आहे. का? कारण दियाबलाला व त्याच्या दुरात्म्यांना पृथ्वीवर टाकण्यात आले आहे. (प्रकटी. १२:७-१२) सैतान अतिशय क्रोधाविष्ट असून त्याच्याकडे खूप कमी वेळ आहे हे त्याला माहीत आहे. त्यामुळे, तो देवाच्या लोकांवर जोरदार हल्ले करत आहे. तर मग, “नीतिमत्त्वाचे उरस्त्राण” धारण करणे किती महत्त्वाचे आहे याची जाणीव तुम्ही राखता का?

७. “नीतिमत्वाचे उरस्त्राण” धारण करण्याचे महत्त्व आपण ओळखले तर आपण कसे वागू?

उरस्त्राण हृदयाचे रक्षण करते. आपण अपूर्ण असल्यामुळे आपले लाक्षणिक हृदय सहसा कपटी व अविचारी असू शकते. (यिर्म. १७:९) आपल्या हृदयाचा कल वाईट गोष्टी करण्याकडे असल्यामुळे त्यास प्रशिक्षित करणे व शिस्त लावणे खूप जरुरीचे आहे. (उत्प. ८:२१) “नीतिमत्वाचे उरस्त्राण” सदैव धारण करणे किती महत्त्वाचे आहे हे जर आपण ओळखले, तर देवाला वीट आणणाऱ्‍या गोष्टींत रस घेण्याद्वारे; किंवा मग एखादे गैरकृत्य करण्याच्या स्वप्नरंजनाद्वारे आपण थोड्या वेळासाठीसुद्धा आपले उरस्त्राण काढून ठेवणार नाही. तासन्‌ तास टीव्ही पाहण्यात आपण आपला मौल्यवान वेळ वाया घालवणार नाही. उलट, यहोवाला आवडणाऱ्‍या गोष्टी करण्यास आपण सतत संघर्ष करत राहू. अनैतिक विचारसरणीला बळी पडून आपण एका क्षणासाठी अडखळलो, तरी यहोवाच्या मदतीने आपण नक्कीच पुन्हा सावरू.नीतिसूत्रे २४:१६ वाचा.

८. आपल्याला ‘विश्‍वासाच्या ढालीची’ आवश्‍यकता का आहे?

आपल्या आध्यात्मिक शस्त्रसामग्रीतील आणखी एक शस्त्र म्हणजे “विश्‍वासाची ढाल.” या शस्त्रामुळे आपल्याला ‘त्या दुष्टाचे सगळे जळते बाण विझवणे’ शक्य होते. (इफिस. ६:१६) परिणामस्वरूप, यहोवावरील आपला विश्‍वास आणि मनस्वी प्रेम आपल्याला नीतिमत्त्व आचरण्यास व सार्वकालिक जीवनाच्या वाटेवर चालत राहण्यास साहाय्य करेल. आपण जितके अधिक यहोवावर प्रेम करण्यास शिकू तितके अधिक त्याच्या नीतिमत्त्वाचे मोल आपल्याला समजेल. पण, आपल्या विवेकाबद्दल काय म्हणता येईल? नीतिमत्त्वावर प्रेम करण्याचा प्रयत्न करताना आपला विवेक आपल्याला कसा साहाय्य करतो?

शुद्ध विवेक बाळगा

९. शुद्ध विवेक बाळगल्यामुळे आपल्याला काय फायदा होतो?

आपल्या बाप्तिस्म्याच्या वेळी आपण यहोवाकडे एका “शुद्ध” विवेकाची विनंती केली होती. (१ पेत्र ३:२१) येशूच्या खंडणी बलिदानावर आपला विश्‍वास असल्यामुळे, त्याचे रक्‍त आपले पाप झाकून टाकते आणि परिणामस्वरूप यहोवाच्या नजरेत आपण एक शुद्ध भूमिका बाळगतो. पण, ही शुद्ध भूमिका टिकवून ठेवण्यासाठी आपण एक शुद्ध विवेकसुद्धा बाळगला पाहिजे. काही वेळा जर आपला विवेक आपल्याला दोषी ठरवत असेल आणि धोक्याची सूचना देत असेल, तर आपला विवेक उचितपणे कार्य करत आहे याबद्दल आपण धन्यता मानली पाहिजे. अशा प्रकारे आपला विवेक आपल्याला टोचतो त्यावरून यहोवाच्या नीतिमान मार्गांच्या बाबतीत तो असंवेदनशील झालेला नाही हे सूचित होते. (१ तीम. ४:२) पण, नीतिमत्त्वावर प्रेम करू इच्छिणाऱ्‍यांसाठी विवेक आणखी एक भूमिका बजावू शकतो.

१०, ११. (क) आपण आपल्या बायबल प्रशिक्षित विवेकाच्या आवाजाला प्रतिसाद का दिला पाहिजे याचा एक अनुभव सांगा. (ख) नीतिमत्त्वावर प्रेम केल्यामुळे आपल्याला विपुल आनंद का होऊ शकतो?

१० आपण एखादी चूक करतो तेव्हा आपला विवेक आपल्याला डिवचणी देऊ शकतो किंवा आपल्याला छळू शकतो. एक युवक नीतिमत्त्वाच्या मार्गांवरून भरकटला होता. त्याला पोर्नोग्राफीचे (अश्‍लील साहित्याचे) व्यसन जडले व तो गांजा ओढू लागला. तो सभांना जायचा तेव्हा त्याला फार अपराध्यासारखे वाटायचे, आणि क्षेत्र सेवेत जायचा तेव्हा त्याला ढोंग्यासारखे वाटायचे. त्यामुळे, त्याने या ख्रिस्ती कार्यांमध्ये सहभाग घेण्याचेच सोडून दिले. “पण,” त्याने म्हटले, “मी केलेल्या कृत्यांसाठी माझा विवेक मला नंतर दोष देईल याची कल्पनासुद्धा मी केली नव्हती.” त्याने पुढे असेही म्हटले: “अशा प्रकारचं व्यर्थ जीवन मी चार वर्षांपर्यंत जगत राहिलो.” मग तो सत्याकडे परतण्याचा विचार करू लागला. यहोवा आपली प्रार्थना ऐकणार नाही असे वाटत असतानाही त्याने प्रार्थना केली व देवाला क्षमा मागितली. प्रार्थना केल्याच्या दहा मिनिटांतच त्याची आई त्याला भेटायला आली आणि तिने त्याला सभांना येण्याचे उत्तेजन दिले. तो राज्य सभागृहात गेला व त्याने एका वडिलांना त्याच्यासोबत अभ्यास करायला सांगितले. काही काळानंतर त्याचा बाप्तिस्मा झाला, आणि आपले जीवन वाचवल्याबद्दल तो यहोवाचे आभार मानतो.

११ जीवनात योग्य ते केल्यामुळे किती आनंद होऊ शकतो हे आपण स्वतः अनुभवले नाही का? आपण नीतिमत्त्वावर प्रेम करण्यास शिकतो व पूर्णार्थाने त्याचे आचरण करतो तेव्हा आपला स्वर्गीय पिता संतुष्ट होईल अशा रीतीने वागण्यात आपल्याला अधिक आनंद होईल. आणि जरा विचार करा! तो दिवस लवकरच येत आहे जेव्हा मानवांना त्यांचा विवेक बोचणार नाही. उलट, त्यांच्या मनात नेहमी आनंदाच्याच भावना असतील; ते सर्व जण देवाचे प्रतिरूप प्रतिबिंबित करतील. तेव्हा, आपण आताच आपल्या हृदयात नीतिमत्त्वाविषयीचे प्रेम रुजवू या आणि यहोवाचे मन आनंदित करू या.—नीति. २३:१५, १६.

१२, १३. आपण आपला विवेक कसा प्रशिक्षित करू शकतो?

१२ आपल्या विवेकाला प्रशिक्षित करण्यासाठी आपण काय करू शकतो? शास्त्रवचनांचा व बायबलवर आधारित असलेल्या आपल्या प्रकाशनांचा अभ्यास करताना आपण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. ती म्हणजे, “धार्मिक मनुष्य विचार करून उत्तर देतो.” (नीति. १५:२८) ही गोष्ट, नोकरीच्या संदर्भात आपल्याला काही प्रश्‍न असल्यास कशी लाभदायक ठरू शकते याचा विचार करा. अमुक एक काम सरळसरळ शास्त्रवचनांच्या विरोधात असेल, तर आपल्यापैकी बहुतेक जण विश्‍वासू व बुद्धिमान दासाकडून मिळणाऱ्‍या मार्गदर्शनाचे तत्परतेने पालन करतात. पण, एखादी नोकरी शास्त्रवचनांच्या दृष्टीने योग्य आहे की नाही हे सुस्पष्ट नसते, तेव्हा त्या विषयावर बायबलची तत्त्वे काय आहेत याचे संशोधन करून आपण त्या गोष्टीचा प्रार्थनापूर्वक विचार केला पाहिजे. * यात इतरांच्या विवेकाला ठेच न पोहचवणे यासारखी तत्त्वे समाविष्ट आहेत. (१ करिंथ. १०:३१-३३) खासकरून देवासोबतच्या आपल्या नात्याशी संबंधित असलेली तत्त्वे आपण विचारात घेतली पाहिजेत. आपल्यासाठी यहोवा एक खरीखुरी व्यक्‍ती असल्यास आपण प्रथम स्वतःला असा प्रश्‍न विचारू, ‘मी हे एक काम केलं तर यहोवाला वाईट वाटेल का? त्याचं मन दुखावेल का?’—स्तो. ७८:४०, ४१.

१३ टेहळणी बुरूज अभ्यासाची किंवा मंडळीच्या पुस्तक अभ्यासाची तयारी करताना त्यात दिलेल्या माहितीवर मनन करणे किती जरुरीचे आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. अभ्यास करताना भरभर उत्तरे अधोरेखित करून पुढच्या परिच्छेदावर जाण्याची तुम्हाला घाई लागलेली असते का? अशा प्रकारच्या अभ्यासामुळे नीतिमत्त्वावरील आपले प्रेम आणखी गहिरे होण्याची किंवा एक संवेदनशील विवेक विकसित होण्याची शक्यता कमी आहे. नीतिमत्त्वावर प्रेम करायचे असल्यास आपण परिश्रमपूर्वक अभ्यास केला पाहिजे आणि देवाच्या लिखित वचनातून आपण जे काही शिकतो त्यावर मनन केले पाहिजे. नीतिमत्त्वावर मनापासून प्रेम करण्याचा कोणताही सोपा मार्ग नाही, त्यासाठी परिश्रम करावेच लागतील!

नीतिमत्त्वासाठी भुकेले व तान्हेले

१४. आपल्या पवित्र सेवेविषयी आपल्याला कसे वाटावे अशी यहोवा देव व येशू ख्रिस्त यांची इच्छा आहे?

१४ आपली पवित्र सेवा पार पाडत असताना आपण आनंदी असावे अशी यहोवा देव व येशू ख्रिस्त यांची इच्छा आहे. आपल्या या आनंदात कोणती गोष्ट भर घालू शकते? शंकाच नाही, नीतिमत्त्वावरील प्रेम! येशूने डोंगरावरील प्रवचनात म्हटले: “जे नीतिमत्त्वाचे भुकेले व तान्हेले ते धन्य, कारण ते तृप्त होतील.” (मत्त. ५:६) या शब्दांचा, नीतिमत्त्वावर प्रेम करू इच्छिणाऱ्‍यांसाठी काय अर्थ होतो?

१५, १६. आध्यात्मिक भूक व तहान कोणत्या मार्गांनी तृप्त केली जाऊ शकते?

१५ आपण राहत असलेल्या या दुष्ट जगावर सध्या सैतान राज्य करत आहे. (१ योहा. ५:१९) जगाच्या पाठीवर कोणत्याही देशाचे वर्तमानपत्र चाळले तर त्यात अभूतपूर्व प्रमाणात क्रूरतेचे व हिंसेचे वृत्त आपल्याला वाचायला मिळतात. एक मनुष्य दुसऱ्‍या मनुष्याचा अमानुष छळ करतो हा विचारसुद्धा एका नीतिमान व्यक्‍तीला सहन होत नाही. (उप. ८:९) आपण यहोवावर प्रेम करत असल्यामुळे नीतिमत्त्वाचे शिक्षण घेण्याची इच्छा बाळगणाऱ्‍या व्यक्‍तींची आध्यात्मिक भूक व तहान केवळ तोच भागवू शकतो याची आपल्याला जाणीव आहे. लवकरच सर्व अधर्मी लोकांचा नाश होईल. आणि नीतिमत्त्वावर प्रेम करणाऱ्‍यांना पुन्हा कधीच अधर्मी लोकांमुळे व त्यांच्या दुष्ट कृत्यांमुळे होणाऱ्‍या दुःखाचा अनुभव घ्यावा लागणार नाही. (२ पेत्र २:७, ८) किती हायसे वाटेल तेव्हा!

१६ यहोवाचे सेवक आणि येशू ख्रिस्ताचे अनुयायी या नात्याने आपल्याला याची जाणीव आहे की जे नीतिमत्त्वासाठी भुकेले व तान्हेले आहेत ते “तृप्त होतील.” “ज्यामध्ये नीतिमत्त्व वास करिते” अशा नव्या आकाशाची व नव्या पृथ्वीची व्यवस्था करून देव त्यांना तृप्त करेल. (२ पेत्र ३:१३) तेव्हा, सैतानाच्या या जगात नीतिमत्त्वाची जागा अत्याचाराने व हिंसाचाराने घेतली आहे म्हणून आपण निराश होऊ नये किंवा आपल्याला आश्‍चर्य वाटू नये. (उप. ५:८) जे काही घडत आहे त्याची सर्वश्रेष्ठ परमेश्‍वराला अर्थात यहोवाला पूर्ण कल्पना आहे आणि नीतिमत्त्वावर प्रेम करणाऱ्‍यांची तो लवकरच सुटका करेल.

नीतिमत्त्वावर प्रेम करण्याचे फायदे

१७. नीतिमत्त्वावर प्रेम केल्यामुळे कोणते काही फायदे मिळतात?

१७ स्तोत्र १४६:८ मध्ये, नीतिमत्त्वाच्या मार्गावर वाटचाल करत राहण्याच्या एका उल्लेखनीय फायद्यावर भर देण्यात आला आहे. त्यात स्तोत्रकर्त्याने असे गायिले: “परमेश्‍वर नीतिमानांवर प्रेम करितो.” जरा विचार करा! आपण नीतिमत्त्वावर प्रेम करत असल्यामुळे या विश्‍वाचा सार्वभौम सत्ताधारी आपल्यावर प्रेम करतो! यहोवाच्या या प्रेमामुळे आपल्याला याची खातरी आहे, की जीवनात राज्याशी संबंधित कार्यांना आपण प्राधान्य देतो तेव्हा तो आपल्या भौतिक गरजा तृप्त करेल. (स्तोत्र ३७:२५; नीतिसूत्रे १०:३ वाचा.) सरतेशेवटी, केवळ नीतिमत्त्वावर प्रेम करणारे लोकच या पृथ्वी ग्रहावर राहतील. (नीति. १३:२२) नीतिमत्त्वाचे आचरण केल्याबद्दल देवाच्या लोकांपैकी अनेकांना पृथ्वीवरील नंदनवनात अनंत काळ जीवन जगण्याचा अपार आनंद मिळेल. आजसुद्धा, देवाच्या नीतिमत्त्वावर प्रेम करणाऱ्‍यांना आंतरिक शांती मिळते ज्यामुळे त्यांच्या कुटुंबांतील व मंडळ्यांतील एकता वाढीस लागते.—फिलिप्पै. ४:६, ७.

१८. यहोवाच्या दिवसाची वाट पाहत असताना आपण कोणत्या सकारात्मक गोष्टी करू शकतो?

१८ यहोवाच्या मोठ्या दिवसाची वाट पाहत असताना आपण सतत धार्मिकतेचे अर्थात नीतिमत्त्वाचे अवलंबन केले पाहिजे. (सफ. २:२, ३) तेव्हा, यहोवा देवाच्या नीतिमान मार्गांविषयी आपण मनस्वी प्रेम प्रदर्शित करत राहू या. याचा अर्थ, आपल्या लाक्षणिक हृदयाचे रक्षण करण्यासाठी आपण सदैव “नीतिमत्त्वाचे उरस्त्राण” धारण केले पाहिजे. तसेच, आपण एक शुद्ध विवेक अर्थात असा विवेक बाळगला पाहिजे ज्यामुळे आपल्याला आनंद होईल व आपल्या देवाचे मनही आनंदित होईल.—नीति. २७:११.

१९. आपण काय करण्याचा निर्धार केला पाहिजे आणि पुढील लेखात कशाची चर्चा केली जाईल?

१९ जे “सात्विक चित्ताने” अर्थात मनापासून यहोवाशी वर्ततात ‘त्यांचे साहाय्य करण्यास आपले सामर्थ्य प्रगट करण्यासाठी त्याचे नेत्र अखिल पृथ्वीचे निरीक्षण करत असतात.’ (२ इति. १६:९) या त्रस्त जगातील वाढते अस्थैर्य, हिंसाचार आणि दुष्टाई यांचा सामना करत असताना, आपण योग्य ते करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा वरील वचनातील शब्द आपल्या मनाला किती दिलासा देतात! हे खरे आहे, की आपले नीतिमान मार्ग पाहून देवापासून दुरावलेल्या मानवजातीतील बहुतेक लोक चकित होतील. पण, यहोवाच्या नीतिमत्त्वाला जडून राहिल्यामुळे आपल्या स्वतःला खूप फायदा होतो. (यश. ४८:१७; १ पेत्र ४:४) तर मग, नीतिमत्त्वावर मनापासून प्रेम करून व त्याचे आचरण करून आपण सतत आनंद मिळवत राहण्याचा निर्धार करू या. असे पूर्ण अंतःकरणाने करण्यासाठी आपण स्वैराचाराचा द्वेष केला पाहिजे. याचा काय अर्थ होतो हे पुढील लेखात सांगितले जाईल.

[तळटीप]

^ नोकरीशी संबंधित प्रश्‍नांवर बायबलची तत्त्वे काय आहेत यावरील माहितीसाठी टेहळणी बुरूज, १५ एप्रिल १९९९, पृष्ठे २८-३० पाहा.

तुमचे उत्तर काय असेल?

• नीतिमत्त्वावर प्रेम करण्यासाठी खंडणीचे महत्त्व जाणणे का जरुरीचे आहे?

• सदैव “नीतिमत्त्वाचे उरस्त्राण” धारण करणे का महत्त्वाचे आहे?

• आपण आपला विवेक कसा प्रशिक्षित करू शकतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२६ पानांवरील चित्र]

बायबल प्रशिक्षित विवेक आपल्याला नोकरीशी संबंधित प्रश्‍न सोडवण्यास मदत करतो