व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“तुला उत्कंठा लागेल”

“तुला उत्कंठा लागेल”

देवाच्या जवळ या

“तुला उत्कंठा लागेल”

आपले प्रियजन त्रास सहन करून मरण पावतात तेव्हा आपले मन खूप हळहळते. त्यांना गमावून आपण साहजिकच दुःखी होतो. पण आपला निर्माणकर्ता यहोवा देव याला आपल्या दुःखांची जाणीव आहे हे खरेच आपल्यासाठी सांत्वनदायक आहे. याव्यतिरिक्‍त, मृत पावलेल्या लोकांना आपल्या असीम शक्‍तीद्वारे पुन्हा जिवंत करण्यास तो अगदी आतुर आहे. बायबलमधील ईयोब १४:१३-१५ यातील ईयोबाच्या शब्दांतून व्यक्‍त होणाऱ्‍या आशेचा विचार करा.

ही वचने कोणत्या परिस्थितीत लिहिली होती त्यावर थोडा विचार करूया. उल्लेखनीय विश्‍वास असलेल्या ईयोबाला अनेक संकटे सोसावी लागली होती. त्याची आर्थिक परिस्थिती ढासळते, त्याची सर्व प्रिय मुले मरण पावतात आणि त्याला एक गंभीर आजार जडतो. अत्यंत दुःखाने तो देवाला म्हणतो: ‘तू मला अधोलोकात [मानवजातीच्या सर्वसाधारण कबरेत] लपव.’ (वचन १३) अधोलोकात गेल्याने दुःखांतून आपली सुटका होईल, असे ईयोबाला वाटत होते. अधोलोक अर्थात मानवजातीची सर्वसाधारण कबर, देवाने लपवून ठेवलेल्या खजिन्याप्रमाणे आहे जेथे कसल्याही प्रकारचे दुःख किंवा वेदना होत नाहीत, असे ईयोबाला वाटत होते. *

पण ईयोब नेहमीसाठीच अधोलोकात राहणार होता का? ईयोबाचा तर तसा विश्‍वास नव्हता. देवाला त्याच्या प्रार्थनेत तो पुढे म्हणतो: “तू . . . माझी मुदत नियमित करून मग माझी आठवण करिशील तर किती बरे होईल!” ईयोबाला पक्की खात्री होती की तो अधोलोकात तात्पुरताच राहणार आहे आणि यहोवा त्याला कधीच विसरणार नाही. अधोलोकात त्याला थांबून राहाव्या लागणाऱ्‍या काळाची तुलना तो ‘कष्टमय सेवेशी’ करतो; हा असा काळ होता ज्यामधून सुटण्यासाठी त्याला वाट पाहावी लागणार होती. पण, त्याला किती वेळपर्यंत थांबून राहावे लागणार होते? “माझी सुटका होईपर्यंत” असे तो म्हणतो. (वचन १४) दुसऱ्‍या शब्दांत, देव त्याला पुन्हा जिवंत करेपर्यंत थांबून राहावे लागणार होते त्यानंतरच अधोलोकातून त्याची सुटका होणार होती.

आपली सुटका नक्की होईल अशी ईयोबाला पक्की खात्री का होती? कारण आपल्या प्रेमळ निर्माणकर्त्याला त्याच्या मरण पावलेल्या विश्‍वासू सेवकांबद्दल कसे वाटते हे त्याला माहीत होते. ईयोब म्हणतो: “तू मला हाक मारिशील व मी तुला उत्तर देईन; मी जो तुझ्या हातची कृति त्या मजविषयी तुला उत्कंठा लागेल.” (वचन १५) आपण देवाच्या हातची कृति आहोत हे ईयोब कबूल करतो. गर्भाशयात ईयोबाच्या जीवनाची चमत्कारिक सुरुवात करणारा यहोवा देव, ईयोबाचा मृत्यू झाला तरी त्याला नक्कीच पुन्हा जिवंत करू शकतो.—ईयोब १०:८, ९; ३१:१५.

ईयोबाने काढलेल्या उद्‌गारांवरून आपण, यहोवा किती प्रेमळ आहे हा धडा शिकतो. ईयोबाप्रमाणे जे लोक स्वतःला देवाच्या हवाली करतात, त्याच्या दृष्टीत योग्य लोक बनण्याकरता जे त्याला घडवू व आकार लावू देतात अशा लोकांबद्दल त्याला जास्त आपुलकी वाटते. (यशया ६४:८) यहोवाचे विश्‍वासू सेवक त्याच्यासाठी मौल्यवान खजिन्याप्रमाणे आहेत. त्याची सेवा विश्‍वासूपणे करत असताना मरण पावलेल्या सेवकांना पुन्हा जिवंत करण्याची त्याला “उत्कंठा” लागली आहे. “उत्कंठा” असे भाषांतरीत केलेल्या हिब्रू शब्दाचा अर्थ, ‘मनापासून असलेली अगदी उत्कट इच्छा’ असा होतो, असे एक विद्वान म्हणतात. होय, यहोवा आपल्या सेवकांना फक्‍त लक्षातच ठेवत नाही तर त्यांना पुन्हा जीवन देण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहे.

बायबलमधील सर्वात आधी लिहिण्यात आलेल्या पुस्तकांमध्ये ईयोब नावाच्या पुस्तकाचा समावेश होतो. आणि या पुस्तकात मृत लोकांना पुन्हा जिवंत करण्याचा आपला उद्देश प्रकट करणे यहोवाला उचित वाटले, ही किती आनंदाची गोष्ट आहे. * तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्‍तीला पुन्हा भेटावे, अशी त्याची इच्छा आहे. हे समजल्यावर आता, तुमच्या प्रिय व्यक्‍तीचा मृत्यू झाल्यामुळे तुम्हाला होणारे दुःख थोडे कमी झाल्यासारखे वाटत असेल, नाही का? मग, अशा प्रेमळ देवाबद्दल तुम्ही आणखी शिकून घेऊ शकता आणि स्वतःला त्याच्या हवाली करू शकता जेणेकरून तो तुम्हाला त्याला योग्य वाटणाऱ्‍या व्यक्‍तीप्रमाणे आकार देऊ शकेल. आणि मग तुम्हीही, त्याचा उद्देश पूर्ण होताना पाहणाऱ्‍यांपैकी एक होऊ शकाल. (w११-E ०३/०१)

[तळटीपा]

^ एक संदर्भग्रंथ म्हणतो, की ‘मला लपव’ या ईयोबाच्या शब्दांचा अर्थ, “मौल्यवान ठेवीप्रमाणे [मला] सुरक्षित ठेव,” असा होऊ शकतो. दुसऱ्‍या एका संदर्भग्रंथानुसार, ईयोबाच्या शब्दांचा अर्थ, “एखाद्या खजिन्याप्रमाणे मला लपवून ठेव” असाही होऊ शकतो.

^ येणाऱ्‍या नीतिमान जगात, मृत लोकांना पुन्हा जिवंत करण्याविषयी बायबलमध्ये असलेल्या अभिवचनाबद्दल तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर, यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले, बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकातील अध्याय ७ पाहा.