व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुमच्या सहविश्‍वासू बांधवांना कधीही त्यागू नका

तुमच्या सहविश्‍वासू बांधवांना कधीही त्यागू नका

तुमच्या सहविश्‍वासू बांधवांना कधीही त्यागू नका

“दहा वर्षं आम्ही व्यापारी दुनियेच्या झगमगाटीला भुलवलो गेलो होतो आणि ऐशआरामात जगत होतो. आम्ही सत्यात लहानाचे मोठे झालो असलो, तरी आम्ही सत्यापासून बहकलो होतो व पुन्हा सत्यात येण्याची ताकद आमच्यात उरली नव्हती,” असे यारोस्वाव व त्याची पत्नी बेआटा सांगतात. *

आणखी एक बांधव मॅरेक आठवून सांगतो: “पोलंडमधील सामाजिक व राजकीय बदलांमुळे माझ्या हातून एकापाठोपाठ एक कितीतरी नोकऱ्‍या सुटल्या. मी निराश झालो होतो. व्यवसायाची जास्त माहिती नसल्यामुळे, स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचं धाडस मला होत नव्हतं. शेवटी न राहवून मी एक व्यवसाय सुरू केला. या व्यवसायामुळे, माझ्या आध्यात्मिकतेवर कोणताही परिणाम होणार नाही व मला माझ्या कुटुंबाच्या गरजा चांगल्या प्रकारे भागवता येतील असं मला वाटलं होतं. पण, माझा हा विचार किती चुकीचा होता हे नंतर मला कळून चुकलं.”

हल्लीच्या जगात महागाई बेसुमार वाढत आहे व सोबतच बेकारीही सातत्याने वाढत आहे. त्यामुळे आज काही जण उतावळे होऊन चुकीचे निर्णय घेतात. अनेक बांधवांनी ओव्हरटाईम करण्याचे, हातात असलेल्या कामाव्यतिरिक्‍त आणखी काम घेण्याचे, किंवा अनुभव नसतानाही स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले आहे. त्यांना वाटते, की या अतिरिक्‍त मिळकतीचा आपल्या कुटुंबाला हातभार लागेल व आपल्या आध्यात्मिकतेला काहीच धोका होणार नाही. पण अनपेक्षित घटनांमुळे व अस्थिर अर्थव्यवस्थेमुळे, चांगल्या हेतूने आखलेल्या योजनादेखील असफल होऊ शकतात. परिणामस्वरूप, काही जण लोभाच्या जाळ्यात अडकले आहेत व भौतिक गोष्टी मिळवण्यासाठी त्यांनी यहोवासोबतच्या आपल्या नातेसंबंधाकडे दुर्लक्ष केले आहे.—उप. ९:११, १२.

काही बंधुभगिनी भौतिक गोष्टी मिळवण्यात इतके गर्क होऊन जातात, की त्यांच्याजवळ व्यक्‍तिगत अभ्यासासाठी, सभेला व प्रचाराला जाण्यासाठी वेळच उरत नाही. यामुळे साहजिकच, त्यांची आध्यात्मिकता व यहोवासोबतचा त्यांचा नातेसंबंध धोक्यात येऊ शकतो. यासोबतच, ते आणखी एका महत्त्वपूर्ण नातेसंबंधाचा अर्थात ‘विश्‍वासाने एका घरचे झालेल्यांच्या’ नातेसंबंधाचा त्याग करतात. (गलती. ६:१०) काही जण हळूहळू ख्रिस्ती बांधवांपासून स्वतःला दूर करून घेतात. या गोष्टीचा गंभीरतेने विचार करा.

सहविश्‍वासू बांधवांप्रती आपले कर्तव्य

बंधुभगिनी या नात्याने, एकमेकांना प्रेम दाखवण्याच्या अनेक संधी आपल्याला मिळतात. (रोम. १३:८) तुमच्या मंडळीत तुम्ही, ‘मदतीची याचना करणाऱ्‍या गरिबांना’ नक्कीच पाहिले असेल. (ईयो. २९:१२, मराठी कॉमन लँग्वेज भाषांतर) काही जण कदाचित स्वतःच्या मूलभूत गरजाही भागवू शकत नसतील. अशा लोकांना मदत करण्याच्या संधीविषयी प्रेषित योहानाने आपल्याला आठवण करून दिली आहे: “जवळ संसाराची साधने असून व आपला बंधु गरजवंत आहे हे पाहून जो स्वतःला त्याचा कळवळा येऊ देत नाही त्याच्या ठायी देवाची प्रीति कशी राहणार?”—१ योहा. ३:१७.

अशा लोकांची गरज समजून घेऊन तुम्ही कदाचित त्यांना हवी ती मदत उदारतेने दिली असेल. पण, आपल्या बांधवांविषयी आपल्याला वाटणारे प्रेम केवळ भौतिक साहाय्य पुरवण्याइतपतच मर्यादित नाही. काही जण कदाचित एकटेपणामुळे किंवा निराशेमुळे मदतीची याचना करत असतील. काहींना यहोवाची सेवा करण्यास आपण लायक नाही असे वाटत असेल. तर काही जण गंभीर आजाराने ग्रस्त असतील किंवा आपल्या प्रियजनाच्या मृत्यूमुळे दुःखी झालेले असतील. अशांना प्रोत्साहन देण्याचा एक मार्ग म्हणजे त्यांचे बोलणे ऐकून घेणे व त्यांच्याशी बोलणे. असे करण्याद्वारे आपण दाखवून देतो, की त्यांच्या भावनिक व आध्यात्मिक गरजांबद्दल आपण संवेदनशील आहोत. (१ थेस्सलनी. ५:१४) यामुळे सहसा आपल्या बांधवांसोबतचा आपला प्रेमळ नातेसंबंध आणखी दृढ होतो.

खासकरून, मंडळीतील वडील इतरांचे बोलणे सहानुभूतीने ऐकून, त्यांच्या भावना समजून घेऊन त्यांना प्रेमळपणे शास्त्रवचनीय सल्ला देऊ शकतात. (प्रे. कृत्ये २०:२८) असे करण्याद्वारे मंडळीतील पर्यवेक्षक प्रेषित पौलाचे अनुकरण करतात, ज्याला आपल्या बंधुभगिनींविषयी “कळकळ” होती.—१ थेस्सलनी. २:७, ८.

पण, एक ख्रिस्ती व्यक्‍ती कळपापासून दूर निघून जाते तेव्हा सहविश्‍वासू बांधवांप्रती असलेल्या तिच्या कर्तव्याचे काय होते? भौतिक गोष्टी प्राप्त करण्याच्या पाशात ख्रिस्ती पर्यवेक्षकदेखील पडू शकतात. अशा प्रलोभनाला, एक ख्रिस्ती व्यक्‍ती बळी पडल्यास काय होऊ शकते?

जीवनातील चिंतांमुळे दबून गेलेले

आपण आधी पाहिल्याप्रमाणे, कुटुंबाच्या मूलभूत भौतिक गरजा पुरवण्यासाठी कष्ट करताना आपण चिंतांनी ग्रासले जातो आणि त्यामुळे आध्यात्मिक मूल्यांप्रती असलेला आपला दृष्टिकोन कमकुवत होऊ शकतो. (मत्त. १३:२२) आधी उल्लेखिलेला मॅरेक असे म्हणतो: “माझा व्यवसाय बुडाला तेव्हा मी परदेशात जाऊन चांगल्या पगाराची नोकरी करण्याचं ठरवलं. सुरुवातीला मी फक्‍त तीन महिन्यांसाठी गेलो. मग आणखी तीन महिन्यांसाठी गेलो आणि पुढं हे असंच चालू राहिलं. यादरम्यान, अधूनमधून फक्‍त थोड्या दिवसांसाठी मी घरी यायचो. यामुळे, सत्यात नसलेल्या माझ्या पत्नीला भावनिक त्रास झाला.”

याचा केवळ कौटुंबिक जीवनावरच परिणाम झाला नाही. मॅरेक सांगतो: “मला तास न्‌ तास रखरखीत उन्हात काम करावं लागायचं. शिवाय, मला अतिशय वाईट चालीच्या लोकांबरोबर काम करावं लागायचं जे इतरांवर जुलूम करायचे. ते गुंडांसारखे वागायचे. यामुळे मी निराश व्हायचो व मला इतरांच्या वर्चस्वाखाली असल्यासारखं वाटायचं. स्वतःची काळजी घेण्यासाठीही वेळ मिळत नसल्यामुळे, मी इतरांची सेवा करू शकतो की नाही याविषयी मला शंका वाटू लागली.”

मॅरेकने घेतलेल्या निर्णयाचे दुष्परिणाम लक्षात घेता, आपल्याला विचार करण्याची प्रेरणा मिळाली पाहिजे. परदेशात जाऊन नोकरी केल्याने आपल्या आर्थिक समस्या सुटतील असे वाटत असले, तरी त्यामुळे इतर समस्या उद्‌भवणार नाहीत का? उदाहरणार्थ, अशा निर्णयामुळे आपल्या कुटुंबाच्या आध्यात्मिक व भावनिक स्वास्थ्याचे काय होऊ शकते? मंडळीसोबतचा आपला नातेसंबंध पूर्णपणे तुटेल का? सहविश्‍वासू बांधवांची सेवा करण्याचा जो बहुमान आपल्याला मिळाला आहे त्यापासून आपण वंचित होणार नाही का?—१ तीम. ३:२-५.

पण, तुम्हाला माहीतच असेल, की परदेशात जाऊन नोकरी केल्यानेच एक व्यक्‍ती आपल्या नोकरीव्यवसायात आकंठ बुडू शकते असे नाही. यारोस्वाव व बेआटा यांचा विचार करा. यारोस्वाव म्हणतो: “हे सगळं अगदी नकळत सुरू झालं, आम्ही नवदांपत्यांनी मिळून एका मोक्याच्या ठिकाणी हॉट-डॉगचं दुकान टाकलं. त्यात चांगला फायदा होत असल्यामुळे आम्ही आमचा व्यवसाय वाढवण्याचं ठरवलं. पण, यामुळे फार कमी वेळ उरायचा आणि म्हणून आम्ही ख्रिस्ती सभा चुकवू लागलो. काही काळातच, मी माझी पायनियर सेवा सोडून दिली व सेवा सेवक असल्याच्या माझ्या विशेषाधिकाराचा त्याग केला. व्यवसायात भरपूर नफा होत असल्याचं पाहून आम्ही सत्यात नसलेल्या एका व्यक्‍तीच्या भागीदारीत एक मोठं दुकान उघडलं. लवकरच मी परदेशात लाखो डॉलर्सचं कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी प्रवास करू लागलो. मी क्वचितच घरी असायचो आणि त्यामुळे माझी पत्नी व मुलगी यांच्यासोबतचा माझा नातेसंबंध कमकुवत होत गेला. शेवटी, भरभराटीच्या या व्यवसायामुळे आम्ही आध्यात्मिक रीत्या झोपी गेलो. मंडळीपासून दूर गेल्यामुळे, बंधुभगिनींचा विचारसुद्धा आमच्या मनात कधी आला नाही.”

यावरून आपण कोणता धडा शिकू शकतो? आपले स्वतःचे “नंदनवन” निर्माण करण्याची इच्छा एका ख्रिस्ती व्यक्‍तीसाठी पाश ठरू शकते. यामुळे ती आत्मसंतुष्ट होऊ शकते, इतकेच नव्हे तर आपली “वस्त्रे” म्हणजेच आपली ख्रिस्ती ओळख गमावू शकते. (प्रकटी. १६:१५) परिणामस्वरूप, आपण ज्या बांधवांना पूर्वी मदत करू शकत होतो त्यांच्यासोबतचा आपला नातेसंबंध पूर्णपणे तुटू शकतो.

प्रामाणिकपणे आत्मपरीक्षण करा

‘माझ्या बाबतीत असे कधीच घडणार नाही,’ असा कदाचित तुम्ही विचार कराल. पण, जीवनात खरोखर किती गोष्टींची गरज आहे याचा आपल्यापैकी प्रत्येकाने गांभीर्याने विचार केला पाहिजे. पौलाने लिहिले: “आपण जगात काही आणिले नाही, आपल्याला त्यातून काही नेता येत नाही; आपल्याला अन्‍नवस्त्र असल्यास तेवढ्यात तृप्त असावे.” (१ तीम. ६:७, ८) हे मान्य आहे, की लोकांचे राहणीमान प्रत्येक देशात वेगवेगळे असते. प्रगत देशांत ज्या गोष्टींना सर्वसाधारण समजले जाते त्या गोष्टींना कदाचित इतर देशांत चैनीच्या वस्तु समजले जाऊ शकते.

आपण जेथे राहतो तेथील राहणीमान कसेही असो, पौलाचे पुढील शब्द लक्षात घ्या: “जे धनवान होऊ पाहतात ते परीक्षेत, पाशांत आणि माणसांना नाशात व विध्वंसात बुडविणाऱ्‍या अशा मूर्खपणाच्या व बाधक वासनांत सापडतात.” (१ तीम. ६:९) पाश हा नेहमी लपवलेला असतो त्यामुळे भक्ष्याला तो दिसत नाही. त्याची रचनाच मुळात भक्ष्याला अचानक पकडण्यासाठी केलेली असते. मग, ‘बाधक वासनांच्या’ पाशात अडकण्याचे आपण कसे टाळू शकतो?

जीवनात कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यायचे हे ठरवल्यामुळे, वैयक्‍तिक अभ्यासासोबतच राज्याशी संबंधित कार्यांसाठीही वेळ काढणे आपल्याला शक्य होईल. प्रार्थनापूर्वक केलेल्या अभ्यासामुळे एक ख्रिस्ती व्यक्‍ती “पूर्ण होऊन” इतरांना मदत करण्यासाठी “सज्ज” होऊ शकते.—२ तीम. २:१५; ३:१७.

यारोस्वावला आध्यात्मिक रीत्या सुदृढ होण्यासाठी व त्याला उत्तेजन देण्यासाठी मंडळीतील प्रेमळ वडिलांनी काही वर्षांपर्यंत त्याची मदत दिली. त्यामुळे तो आपल्या जीवनात आमूलाग्र बदल करू शकला. तो म्हणतो: “एका महत्त्वाच्या संभाषणात वडिलांनी मला बायबलमधील एका श्रीमंत तरुणाचं उदाहरण सांगितलं, ज्याला सार्वकालिक जीवन तर हवं होतं, पण स्वतःच्या संपत्तीचा त्याग करायला मात्र तो तयार नव्हता. मग, ही माहिती मला लागू होऊ शकते का, असा त्यांनी कुशलतेनं प्रश्‍न केला. ते ऐकून तर माझे डोळेच उघडले!”—नीति. ११:२८; मार्क १०:१७-२२.

यारोस्वावने आपल्या परिस्थितीचे प्रामाणिकपणे परीक्षण केले आणि मोठ्या व्यवसायातील आपली भागीदारी बंद करण्याचा निर्णय घेतला. दोनच वर्षांत, तो आणि त्याचे कुटुंब आध्यात्मिक रीत्या पुन्हा सुदृढ झाले. तो आज मंडळीत एक वडील या नात्याने आपल्या बांधवांची सेवा करत आहे. यारोस्वाव म्हणतो: “आपल्या आध्यात्मिकतेकडे दुर्लक्ष होण्याइतपत बांधव आपल्या नोकरीव्यवसायत गुंतले आहेत हे मी पाहतो तेव्हा विश्‍वास न ठेवणाऱ्‍यांबरोबर संबंध जोडून विजोड होणं किती मूर्खपणाचं आहे, हे दाखवण्यासाठी मी त्यांना स्वतःचं उदाहरण सांगतो. आकर्षक प्रस्तावांना नाही म्हणणं व बेइमानी करण्यापासून दूर राहणं सोपं नाही.”—२ करिंथ. ६:१४.

मॅरेकही वाईट अनुभवांतून धडा शिकला. परदेशातील चांगल्या पगाराच्या नोकरीमुळे त्याच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारली असली, तरी देवासोबत व बांधवांसोबत असलेला त्याचा नातेसंबंध बिघडला होता. काही काळाने, त्याने आपल्या जीवनातील प्राधान्यक्रम बदलला. तो म्हणतो: “गेल्या अनेक वर्षांपर्यंत माझी स्थिती प्राचीन काळच्या बारूखसारखी झाली होती ज्याला ‘मोठ्या गोष्टींची वांच्छा’ होती. शेवटी, मी यहोवासमोर माझं मन मोकळं करून त्याला माझ्या चिंता सांगितल्या. आणि त्यामुळे मला असं वाटतं की मी आता आध्यात्मिक रीत्या स्थिर झालो आहे.” (यिर्म. ४५:१-५) मॅरेक सध्या मंडळीत ‘चांगले काम’ करणारा पर्यवेक्षक बनण्यासाठी प्रगती करत आहे.—१ तीम. ३:१.

जे लोक चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्यासाठी परदेशात जाण्याचा विचार करत असतील अशांना मॅरेक असा इशारा देतो: “परदेशात असताना, या दुष्ट जगाच्या पाशांत आपण अगदी सहजासहजी अडकू शकतो. स्थानिक भाषा येत नसल्यामुळे तुम्ही इतरांशी बोलू शकत नाही. तुम्ही भरपूर पैसा मिळवून घरी याल, पण तुम्हाला ज्या आध्यात्मिक जखमा होतील त्या भरून येण्यासाठी बराच काळ लागू शकतो.”

आपला नोकरीव्यवसाय व आपल्या बांधवांना मदत करण्याचे आपले कर्तव्य, यांत जर आपण समतोल साधला, तर आपल्याला यहोवाचे मन आनंदित करता येईल. आणि आपल्या स्वतःच्या उदाहरणावरून आपण इतरांना सुज्ञ निर्णय घेण्याची प्रेरणा देऊ शकतो. जीवनाच्या चिंतांमुळे दबून गेलेल्यांना आधाराची, सहानुभूतीची आणि त्यांच्या बंधुभगिनींच्या उत्तम उदाहरणांची गरज असते. मंडळीतील वडील व इतर प्रौढ जन आपल्या ख्रिस्ती बांधवांना समतोल राखण्यास व जीवनाच्या चिंतांनी ग्रासून न जाण्यास मदत करू शकतात.—इब्री १३:७.

होय, आपल्या नोकरीव्यवसायात बुडून जाऊन आपण आपल्या सहविश्‍वासू बांधवांना कधीही त्यागू नये. (फिलिप्पै. १:१०) याउलट, राज्याशी संबंधित कार्यांना जीवनात प्राधान्य देण्याद्वारे आपण “देवविषयक बाबतीत धनवान” बनू या.—लूक १२:२१.

[तळटीप]

^ काही नावे बदलण्यात आली आहेत.

[२१ पानांवरील चित्रे]

तुमच्या नोकरीव्यवसायामुळे तुम्हाला सभांना उपस्थित राहणे मुश्‍कील जाते का?

[२३ पानांवरील चित्रे]

तुमच्या आध्यात्मिक बंधुभगिनींना मदत करण्याच्या ज्या अनेक संधी तुम्हाला मिळतात त्यांची तुम्ही कदर करता का?