व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

येशू त्याचे जीवन कसे होते?

येशू त्याचे जीवन कसे होते?

येशू त्याचे जीवन कसे होते?

“ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे व त्याचे कार्य सिद्धीस न्यावे हेच माझे अन्‍न आहे.”—योहान ४:३४.

ज्या परिस्थितीत येशूने वरील शब्द उद्‌गारले त्यावरून, जीवनात त्याने कोणत्या गोष्टींना प्राधान्य दिले ते आपल्याला कळते. येशूने आणि त्याच्या शिष्यांनी संपूर्ण सकाळ शोमरोनाचा डोंगराळ भाग पालथा घातला होता. (योहान ४:६) येशूला भूक लागली असेल, असे शिष्यांना वाटल्यामुळे त्यांनी त्याला काहीतरी खाऊन घ्या, असा आग्रह केला. (योहान ४:३१-३३) येशूने त्यांना दिलेल्या उत्तरात, त्याच्या जीवनाच्या उद्देशाचा सारांश सांगितला. त्याला, खाण्यापेक्षा देवाचे काम पूर्ण करणे जास्त महत्त्वाचे वाटत होते. तर येशूने आपल्या बोलण्याद्वारे व कार्यांद्वारे दाखवून दिले, की तो देवाची त्याच्याबद्दलची इच्छा पूर्ण करण्यासाठी जगत होता. यात काय काय गोवलेले होते?

येशूने देवाच्या राज्याचा प्रचार केला व लोकांना शिकवले येशूने त्याच्या जीवनकाळात केलेल्या कार्यांबद्दल बायबलमध्ये असे म्हटले आहे: “येशू . . . सुवार्तेची घोषणा करीत व राज्याची सुवार्ता गाजवीत . . . गालीलभर फिरला.” (मत्तय ४:२३) येशूने लोकांना फक्‍त देवाच्या राज्याचा प्रचार किंवा घोषणा केली नाही तर, त्याने त्यांना शिकवलेदेखील. देवाचे राज्य काय आहे, हे त्याने त्यांना समजावून सांगितले, त्यांच्याबरोबर तर्कवितर्क करून त्यांना खात्री देऊन पटवले. देवाचे राज्य हाच येशूच्या संदेशाचा मुख्य विषय होता.

त्याने आपल्या सेवेदरम्यान लोकांना देवाचे राज्य काय आहे आणि ते काय करणार आहे, हे सांगितले. राज्याबद्दलची कोणती सत्ये त्याने लोकांना सांगितली आणि बायबलमधील कोणत्या वचनांत येशूचे हे बोल आहेत ते पुढे सांगितलेले आहे.

▪ देवाचे राज्य एक स्वर्गीय सरकार आहे, आणि यहोवाने येशूला या राज्याचा राजा बनण्यास नियुक्‍त केले आहे.—मत्तय ४:१७; योहान १८:३६.

▪ हे राज्य देवाचे नाव पवित्र करेल आणि जशी स्वर्गात देवाची इच्छा पूर्ण होत आहे तशीच पृथ्वीवरही पूर्ण करेल.—मत्तय ६:९, १०.

▪ देवाच्या राज्यात संपूर्ण पृथ्वी एका सुंदर बागेसारखी अर्थात नंदनवनासारखी होईल.—लूक २३:४२, ४३, मराठी कॉमन लँग्वेज भाषांतर.

▪ लवकरच देवाचे राज्य येणार आहे आणि पृथ्वीबद्दल देवाची जी इच्छा आहे ती पूर्ण होईल. *मत्तय २४:३, ७-१२.

येशूने चमत्कार केले येशूला लोक सहसा “गुरू” किंवा शिक्षक म्हणून ओळखत असत. (योहान १३:१३) पण साडे तीन वर्षांच्या त्याच्या सेवेदरम्यान त्याने अनेक चमत्कारही केले. यामुळे दोन गोष्टी साध्य झाल्या. पहिली गोष्ट, या चमत्कारांमुळे हे सिद्ध झाले, की येशूला खरोखर देवानेच पाठवले होते. (मत्तय ११:२-६) दुसरी गोष्ट, या चमत्कारांमुळे हे प्रकट झाले, की भविष्यात येशू देवाच्या राज्याचा राजा म्हणून याच गोष्टी मोठ्या प्रमाणावर करेल. त्याने कोणकोणते चमत्कार केले त्याबद्दल पाहू या.

▪ त्याने खवळलेल्या समुद्राला आणि सुसाट्याने वाहणाऱ्‍या वाऱ्‍याला शांत केले.—मार्क ४:३९-४१.

▪ त्याने रोग्यांना, अंधळ्यांना, बहिऱ्‍यांना आणि लंगड्यांनासुद्धा बरे केले.—लूक ७:२१, २२.

▪ त्याने चमत्कार करून थोडेसे अन्‍न मुबलक केले आणि भुकेलेल्या समुदायाला खाऊ घातले.—मत्तय १४:१७-२१; १५:३४-३८.

▪ तीन प्रसंगी तरी त्याने मेलेल्यांना जिवंत केले.—लूक ७:११-१५; ८:४१-५५; योहान ११:३८-४४.

अशा शक्‍तिशाली राजाच्या राजवटीत पृथ्वीवरील जीवन किती सुखा-समाधानाचे असेल याची कल्पना करा!

यहोवा देव कसा आहे हे येशूने आपल्या वागण्यावरून दाखवून दिले यहोवाचा स्वतःचा पुत्र, येशू ख्रिस्त याच्याशिवाय दुसरा कोणीही आपल्याला यहोवा देवाबद्दलची योग्य माहिती देऊ शकत नाही. येशू “सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ” असल्यामुळे पृथ्वीवर येण्याआधी इतर कोणत्याही देवदूतापेक्षा तो यहोवासोबत स्वर्गात जास्त काळ होता. (कलस्सैकर १:१५) आपल्या पित्याची विचारसरणी, त्याची इच्छा, त्याचे दर्जे, त्याचे मार्ग यांबद्दल शिकण्याची किती संधी येशूला मिळाली असेल!

म्हणूनच तो असे म्हणू शकला: “पुत्र कोण आहे हे पित्यावाचून कोणाला ठाऊक नाही; आणि पिता कोण आहे हे पुत्रावाचून व ज्याला तो प्रगट करावयाची पुत्राची इच्छा असेल त्याच्यावाचून कोणाला ठाऊक नाही.” (लूक १०:२२) पृथ्वीवर मानव म्हणून असताना येशूने स्वेच्छेने आणि उत्सुकतेने आपल्या पित्याचे गुण प्रकट केले. एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन अनोखा होता. त्यामुळे, स्वर्गात परमप्रधान देवाच्या सान्‍निध्यात असताना त्याने त्याच्याकडून शिकलेल्या गोष्टी आठवणीत ठेवल्या आणि त्याच प्रकारे त्याने लोकांना शिकवले.—योहान ८:२८.

येशूने आपल्या पित्याचे गुण लोकांना कसे प्रकट केले ते समजण्याकरता आपण, विजेचा दाब बदलणाऱ्‍या साधनाचा म्हणजे इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मरचा विचार करू या. हे साधन, उच्च दाबाच्या विद्युत प्रवाहाचे रुपांतर कमी दाबात करते म्हणजे हाय व्होल्टेजचे लो व्होल्टेजमध्ये रुपांतर करते. या लो व्होल्टेजमुळे मग आपण ट्यूबलाईट, फॅन, मिक्सरसारख्या उपकरणांचा उपयोग करू शकतो. तसेच येशूने, तो स्वर्गात असताना आपल्या पित्याकडून शिकलेल्या हाय व्होल्टेजसारख्या गहन गोष्टी पृथ्वीवरील साध्या-सुध्या माणसांना लो व्होल्टेजमध्ये करून म्हणजे सोप्या करून शिकवल्या. यामुळे लोकांना या गोष्टी लगेच समजल्या व ते त्यानुसार कार्य करू शकले.

येशूने आपल्या पित्याचे गुण लोकांना कसे प्रकट केले त्याचे दोन महत्त्वपूर्ण मार्ग पुढे दिले आहेत त्यांचा आपण विचार करू या.

▪ येशूने यहोवाबद्दल अर्थात त्याचे नाव, त्याचा उद्देश, त्याचे मार्ग यांबद्दलचे सत्य लोकांना शिकवले.—योहान ३:१६; १७:६, २६.

▪ आपल्या कार्यांद्वारे येशूने यहोवाच्या व्यक्‍तिमत्त्वाचे सुंदर पैलू लोकांसमोर उलगडले. त्याने आपल्या पित्याचे व्यक्‍तिमत्त्व अगदी हुबेहूब प्रतिबिंबित केले. त्यामुळे तो असे म्हणू शकला, ‘माझा पिता कसा हे जर तुम्हाला माहीत करून घ्यायचे असेल तर माझ्याकडे पाहा.’—योहान ५:१९; १४:९.

येशूने व्यतीत केलेले जीवन पाहून आपल्याला खूप आश्‍चर्य वाटेल. पण तो का मरण पावला याचे जर आपण परीक्षण करून बघितले आणि परिक्षणानंतर शिकलेल्या गोष्टींनुसार जर आपण जगलो तर आपला खूप फायदा होईल. (w११-E ०४/०१)

[तळटीप]

^ देवाच्या राज्याबद्दल आणि ते लवकर येणार आहे हे आपल्याला कसे कळते, याबद्दलची अधिक माहिती तुम्हाला हवी असेल तर, यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकाचा, “देवाचे राज्य काय आहे?” हा ८ वा अध्याय आणि “आपण ‘शेवटल्या काळात’ जगत आहोत का?” हा ९ वा अध्याय पाहा.