व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

येशू का मरण पावला?

येशू का मरण पावला?

येशू का मरण पावला?

“मनुष्याचा पुत्र . . . पुष्कळांच्या मुक्‍तीसाठी आपला जीव खंडणी म्हणून अर्पण करावयास आला.”—मार्क १०:४५.

आपले काय होणार आहे, हे येशूला माहीत होते. आपण शांतीने जगू शकणार नाही, हे त्याला समजले होते. तिशीत असतानाच आपल्याला मरण सोसावे लागणार आहे, याची त्याला पूर्ण जाणीव होती. त्यामुळे मरणाला सामोरे जाण्यास त्याची मानसिक तयारी झाली होती.

बायबलमध्ये येशूच्या मरणाला खूप महत्त्व देण्यात आले आहे. ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांमध्ये म्हणजे नवीन करारात, सुमारे १७५ वेळा येशूच्या मृत्यूचा थेट उल्लेख आल्याचे एका संदर्भ ग्रंथात म्हटले आहे. पण येशूला इतक्या यातना सोसून मरण का पत्करावे लागले? या प्रश्‍नाचे उत्तर आपण जाणून घेतलेच पाहिजे कारण याचा आपल्या जीवनावर गहिरा प्रभाव पडू शकतो.

येशूला काय माहीत होते? पृथ्वीवरील आपल्या जीवनाच्या शेवटल्या वर्षांदरम्यान, आपल्याला पुष्कळ यातना व मरण सोसावे लागणार आहे, याबद्दल येशूने आपल्या शिष्यांना अनेकदा पूर्वसूचना दिल्या होत्या. शेवटला वल्हांडणाचा सण साजरा करण्यासाठी जेरुसलेमला जाताना त्याने आपल्या १२ प्रेषितांना असे म्हटले: “मनुष्याच्या पुत्राला मुख्य याजक व शास्त्री ह्‍यांच्या स्वाधीन करण्यात येईल; ते त्याला देहान्त शिक्षा ठरवितील आणि परराष्ट्रीयांच्या स्वाधीन करतील; आणि ते त्याची थट्टा करतील, त्याच्यावर थुंकतील, त्याला फटके मारितील व त्याचा जीव घेतील.” * (मार्क १०:३३, ३४) त्याला काय होणार आहे, हे तो इतक्या ठामपणे का सांगू शकत होता?

आपले जीवन कसे समाप्त होईल याबद्दलच्या इब्री शास्त्रवचनांतील अनेक भविष्यवाण्या येशूला माहीत होत्या. (लूक १८:३१-३३) बायबलमधील या कोणत्या भविष्यवाण्या आहेत आणि त्या कशा पूर्ण झाल्या ते पुढे दाखवण्यात आले आहे.

▪ चांदीच्या तीस नाण्यांसाठी मशीहाचा विश्‍वासघात करण्यात येईल.—जखऱ्‍या ११:१२; मत्तय २६:१४-१६, सुबोध भाषांतर.

▪ मशीहाच्या गालावर मारले जाईल व त्याच्या तोंडावर थुंकले जाईल.—यशया ५०:६; मत्तय २६:६७; २७:२६, ३०.

▪ मशीहाला वधस्तंभावर लटकवण्यात येईल.—स्तोत्र २२:१६; मार्क १५:२४, २५.

▪ खांबावर लटकवल्यानंतर मशीहाची थट्टा केली जाईल.—स्तोत्र २२:७, ८; मत्तय २७:३९-४३.

▪ मशीहाला मरणदंड दिला जाईल, पण त्याचे एकही हाड मोडले जाणार नाही.—स्तोत्र ३४:२०; योहान १९:३३, ३६.

येशूने या आणि अशा अनेक भविष्यवाण्या पूर्ण केल्या. या भविष्यवाण्या त्याने स्वतःहून पूर्ण करणे शक्य नव्हते. तर, पूर्ण झालेल्या या सर्व भविष्यवाण्या सिद्ध करतात, की येशूला खरोखरच देवाने पाठवले होते. *

पण येशूला यातना सोसून मरण का पत्करावे लागले?

महत्त्वपूर्ण वाद सोडवण्याकरता येशूला मरण पत्करावे लागले एदेन बागेत जे वाद उभे राहिले होते त्याचा विश्‍वातल्या सर्वांवर परिणाम होणार होता. तर येशूला हे वाद ठाऊक होते. एका बंडखोर देवदूताचे ऐकून पहिला पुरुष आदाम व पहिली स्त्री हव्वा यांनी देवाची आज्ञा मोडली. या जोडप्याने बंड केल्यामुळे एक वाद उभा राहिला. तो हा, की देव त्याचा अधिकार उचितरीत्या चालवत आहे किंवा नाही? शिवाय, या जोडप्याने पाप केल्यामुळे हाही प्रश्‍न उभा राहिला, की कोणताही मानव परीक्षेत असताना देवाशी विश्‍वासू राहू शकेल किंवा नाही?—उत्पत्ति ३:१-६; ईयोब २:१-५.

यहोवाचा राज्य करण्याचा अधिकार आणि मानवाची एकनिष्ठा, या दोन्ही वादांना येशूने आपल्या वागण्याद्वारे चोख उत्तर दिले. ‘वधस्तंभावरचे मरण सोसून’ येशू देवाच्या पूर्णपणे अधीन राहिला आणि अशा प्रकारे त्याने देवाचा राज्य करण्याचा अधिकार उचित आहे हे दाखवून दिले. (फिलिप्पैकर २:८) परिपूर्ण मानवावर कितीही कडक परीक्षा आल्या तरीसुद्धा तो देवाशी एकनिष्ठ राहू शकतो, हेही येशूने सिद्ध करून दाखवले.

मानवजातीला सोडवण्यासाठी येशूने मरण पत्करले वचन दिलेल्या मशीहाने सोसलेल्या यातनांमुळे व मृत्यूमुळे, मानवांना त्यांच्या पापांची क्षमा मिळणार आहे, असे संदेष्टा यशया याने भाकीत केले होते. (यशया ५३:५, १०) येशूला हे चांगल्या प्रकारे समजले होते. म्हणूनच त्याने स्वेच्छेने, “पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण” केला. (मत्तय २०:२८) त्याच्या बलिदानरूपी मृत्यूने, अपरिपूर्ण मानवांना यहोवाबरोबर नातेसंबंध जोडण्याचा आणि पाप व मृत्यूतून सुटकेचा मार्ग मोकळा झाला. येशूच्या मृत्यूमुळे आपल्यापुढे, आदाम आणि हव्वेने जे गमावले ते पुन्हा प्राप्त करण्याची संधी, अर्थात परिपूर्ण परिस्थितीत सदासर्वकाळ जिवंत राहण्याची संधी खुली झाली. *प्रकटीकरण २१:३, ४.

तुम्ही काय करू शकता या लेखमालेत आपण, बायबलमध्ये येशूबद्दल काय सांगितलेले आहे, जसे की तो कोठून आला, पृथ्वीवरील त्याचे जीवन कसे होते, तो का मरण पावला, यासारखे विषय पाहिले. येशूबद्दलची ही सत्ये माहीत झाल्यावर तुमच्या मनात त्याच्याबद्दल असलेले अनेक गैरसमज दूर होऊ शकतात. आणि माहीत झालेल्या या गोष्टींनुसार कार्य केल्याने आपल्याला अनेक आशीर्वाद मिळू शकतात. जसे की, आता आपले जीवन सुधारू शकते आणि भवितव्यात आपल्याला सदासर्वकाळचे जीवन मिळू शकते. हे आशीर्वाद मिळण्याकरता आपण काय केले पाहिजे, ते बायबलमध्ये सांगितलेले आहे.

▪ येशू ख्रिस्ताबद्दल आणि यहोवाच्या उद्देशातील त्याच्या भूमिकेबद्दल अधिक जाणून घ्या.—योहान १७:३.

▪ येशूवर विश्‍वास ठेवा. तुम्ही त्याला तुमचा तारणकर्ता म्हणून स्वीकारले आहे हे तुमच्या जीवनावरून दाखवून द्या.—योहान ३:३६; प्रेषितांची कृत्ये ५:३१.

ज्याच्याद्वारे आपल्याला ‘सार्वकालिक जीवनाचे’ बक्षीस मिळणार आहे त्या देवाच्या ‘एकुलत्या एका पुत्राबद्दल’ अर्थात येशू ख्रिस्ताबद्दल अधिक शिकून घेण्यास यहोवाच्या साक्षीदारांना तुम्हाला मदत करण्यास आनंद वाटेल.—योहान ३:१६. (w११-E ०४/०१)

[तळटीपा]

^ येशूने स्वतःला बहुतेकदा ‘मनुष्याचा पुत्र’ असे संबोधले. (मत्तय ८:२०) या वाक्यांशावरून समजते, की तो पूर्ण मानव होता आणि बायबल भविष्यवाणींमध्ये ज्याचा उल्लेख ‘मानवपुत्र’ असा करण्यात आला आहे तो त्यालाच सूचित करतो.—दानीएल ७:१३, १४.

^ येशूबद्दल पूर्ण झालेल्या भविष्यवाण्यांची तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकातल्या परिशिष्टात, “येशू ख्रिस्त—भाकीत केलेला मशीहा” हा विषय पाहा.

^ येशूचा बलिदानरूपी मृत्यू किती अनमोल आहे याबद्दलच्या अधिक माहितीसाठी, बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकातला, “खंडणी—देवाची अमूल्य भेट” हा ५ वा अध्याय पाहा.