व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पृथ्वीसाठी देवाचा काय उद्देश आहे?

पृथ्वीसाठी देवाचा काय उद्देश आहे?

देवाच्या वचनातून शिका

पृथ्वीसाठी देवाचा काय उद्देश आहे?

तुमच्या मनात उद्‌भवलेले प्रश्‍न आणि या प्रश्‍नांची उत्तरे तुम्हाला बायबलमध्ये कोठे पाहायला मिळतील हे या लेखात सांगण्यात आले आहे. यहोवाच्या साक्षीदारांना तुमच्याबरोबर या उत्तरांची चर्चा करण्यास आनंद होईल.

१. पृथ्वीसाठी देवाचा काय उद्देश आहे?

पृथ्वी ही मानवजातीचे घर आहे. स्वर्गात राहण्यासाठी देवदूतांना बनवल्यानंतर देवाने, पृथ्वीवरील जीवनाचा आनंद घेण्यासाठी मानवाला बनवले. (ईयोब ३८:४, ७) अशा प्रकारे, यहोवाने सर्वात पहिल्या मानवाला एदेन नावाच्या एका सर्वोत्तम बागेत अर्थात नंदनवनात ठेवले आणि त्याला व त्याच्या मुलाबाळांना पृथ्वीवर कायमचे जीवन जगण्याची आशा दिली.—उत्पत्ति. २:१५-१७; स्तोत्र ११५:१६ वाचा.

पृथ्वीवरील छोट्या भागात हे नंदनवन होते. सर्वात पहिले मानवी जोडपे आदाम आणि हव्वा यांना मुले होणार होती आणि जसजशी मानवांची वाढ होणार होती तसतसे त्यांना या पृथ्वीची देखरेख करून तिला नंदनवन बनवायचे होते. (उत्पत्ति १:२८) पृथ्वी कधीही नाश केली जाणार नाही.—स्तोत्र १०४:५ वाचा.

२. पृथ्वी आता नंदनवनासारखी का नाही?

आदाम व हव्वेने यहोवाच्या आज्ञेचे पालन केले नाही आणि त्यांना एदेन बागेतून काढून टाकण्यात आले. अशा प्रकारे त्यांनी नंदनवन गमावले आणि आज कोणत्याही मानवात पृथ्वीला परत नंदनवन करण्याचे सामर्थ्य नाही. बायबल म्हणते: “पृथ्वी दुष्टाच्या हाती दिली आहे.”—ईयोब ९:२४; उत्पत्ति ३:२३, २४ वाचा.

पण मानवजातीसाठी असलेला मुख्य उद्देश यहोवा विसरलेला नाही, आणि तो उद्देश यहोवा नक्कीच पूर्ण करेल. (यशया ४५:१८) त्याला जशी हवी होती तशी मानवजात तो या पृथ्वीवर पुन्हा वाढू देणार आहे.—स्तोत्र ३७:११ वाचा.

३. यहोवा पुन्हा या पृथ्वीवर शांती कशी आणणार आहे?

मानवांना शांती मिळावी यासाठी देवाने आधी दुष्ट लोकांचा नाश करणे गरजेचे आहे. हर्मगिदोनाच्या लढाईत यहोवाचे देवदूत त्याच्या विरोधात असणाऱ्‍या सर्वांचा नाश करणार आहेत. सैतानाला १,००० वर्षांसाठी कैद करण्यात येईल, पण ज्यांचे देवावर प्रेम आहे ते लोक या पृथ्वीवरील नंदनवनात कायम राहतील.—प्रकटीकरण १६:१४, १६; २०:१-३; २१:३, ४ वाचा.

४. दुःखाचा अंत कधी होईल?

एक हजार वर्षांदरम्यान, येशू स्वर्गातून या पृथ्वीवर राज्य करील आणि या पृथ्वीला पुन्हा नंदनवनाचे स्वरूप देईल. आणि जे लोक यहोवावर प्रेम करतात त्यांचे पाप नाहीसे करेल. अशा प्रकारे येशू आजारपण, वृद्धापकाळ आणि मृत्यू काढून टाकील.—यशया ११:९; २५:८; ३३:२४; ३५:१ वाचा.

पण देव पृथ्वीवरून दुष्टाईचा नाश कधी करील? येशूने अंत जवळ आल्याची काही ‘चिन्हे’ दिली आहेत. आजच्या भयानक परिस्थितीमुळे मानवांना आपण जगू की मरू अशी भीती वाटते. यावरून सिद्ध होते, की आपण ‘युगाच्या समाप्तीत’ जगत आहोत.—मत्तय २४:३, ७-१४, २१, २२; २ तीमथ्य ३:१-५ वाचा.

५. येणाऱ्‍या नंदनवनात कोण राहणार आहेत?

येशूने त्याच्या अनुयायांना, लोकांना शिष्य बनवण्यास व त्यांना देवाच्या प्रेमळ मार्गदर्शनाबद्दल शिकवण्यास सांगितले. (मत्तय २८:१९, २०) नवीन जगात जगण्यासाठी यहोवा जगभरातील कोट्यवधी लोकांना तयार करत आहे. (सफन्या २:३) यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्य सभागृहात, लोकांना शिकवले जात आहे की ते एक चांगला पती व वडील आणि एक चांगली पत्नी व आई कशी बनू शकतात. मुले व आई-वडील एकत्र मिळून, येणाऱ्‍या चांगल्या भविष्यावर विश्‍वास ठेवण्यास शिकत आहेत.—मीखा ४:१-४ वाचा.

राज्य सभागृहात तुम्हाला असे लोक भेटतील जे देवावर प्रेम करतात आणि त्याची स्तुती करण्याची इच्छा बाळगतात.—इब्री लोकांस १०:२४, २५ वाचा. (w११-E ०४/०१)

जास्त माहितीसाठी यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेल्या या पुस्तकातील अध्याय ३ पाहा. बायबल नेमके काय शिकवते?