व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“आत्म्याच्याद्वारे निष्पन्‍न होणारे फळ” देवाचा गौरव करते

“आत्म्याच्याद्वारे निष्पन्‍न होणारे फळ” देवाचा गौरव करते

“आत्म्याच्याद्वारे निष्पन्‍न होणारे फळ” देवाचा गौरव करते

“तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचे गौरव होते.”—योहा. १५:८.

१, २. (क) आपल्याजवळ इतरांना प्रोत्साहन देण्याचे कोणते अवसर आहेत? (ख) यहोवाकडून मिळणाऱ्‍या कोणत्या देणगीमुळे त्याची सेवा करण्याची आपली क्षमता वाढते?

 आपल्या डोळ्यांपुढे दोन दृश्‍ये आणा: पहिल्या दृश्‍यात, एक तरुण बहीण कुठल्यातरी चिंतेने ग्रस्त असल्याचे एक ख्रिस्ती बहीण पाहते. ती तिच्यासोबत क्षेत्र सेवेत कार्य करण्याची योजना करते. क्षेत्र सेवेत एकत्र कार्य करत असताना, ती तरुण बहीण त्या प्रौढ बहिणीजवळ आपले मन मोकळे करू लागते. त्या दिवशी रात्री प्रार्थना करताना, त्या प्रौढ बहिणीने आपल्याविषयी दाखवलेल्या आत्मीयतेबद्दल ती तरुणी यहोवाचे आभार मानते. त्याचीच तर तिला गरज होती. आता दुसरे दृश्‍य डोळ्यांपुढे आणा. एक ख्रिस्ती दांपत्य, नुकतेच दूरच्या क्षेत्रात पायनियर सेवा करून परतले आहे. मित्रपरिवाराच्या एका मेळाव्यात, हे दांपत्य आपल्या अनुभवांविषयी भरभरून बोलत असताना एक तरुण बांधव शांतचित्ताने त्यांचे बोलणे ऐकत असतो. काही वर्षांनंतर, हा तरुण बांधव स्वतः एका दूरच्या क्षेत्रात पायनियर सेवा करण्याच्या आपल्या नेमणुकीची तयारी करत असताना त्याला त्या दांपत्याची व त्याच्या मनात पायनियर सेवा करण्याची इच्छा जागृत करणाऱ्‍या त्यांच्या संभाषणाची आठवण होते.

हे प्रसंग, कदाचित तुम्हाला त्या व्यक्‍तीची आठवण करून देतील जिने तुमच्या जीवनाला एक नवे वळण दिले, किंवा तुमच्यामुळे ज्यांच्या जीवनाला एक नवे वळण लागले. अर्थात, फार क्वचित असे घडते की केवळ एका संभाषणामुळे एखाद्याचे संपूर्ण जीवन बदलून जाते. असे असले, तरी इतरांना प्रोत्साहन देण्याचे व इतरांचे मनोबल वाढवण्याचे अनेक अवसर दररोज आपल्याला मिळतात. तुमच्या बंधुभगिनींना अधिक लाभदायक ठरतील व देवाच्या सेवेत अधिक उपयुक्‍त ठरतील अशा क्षमता व गुण वाढवणारे काहीतरी असते तर? तर किती बरे झाले असते! खरेतर, यहोवा आपल्याला अशीच एक देणगी अर्थात त्याचा पवित्र आत्मा देतो. (लूक ११:१३) देवाचा आत्मा आपल्या जीवनात कार्य करतो तेव्हा तो आपल्यामध्ये उत्कृष्ट गुण उत्पन्‍न करतो आणि या गुणांमुळे देवाच्या सेवेतील प्रत्येक पैलू वाढीस लागतो. खरेच, किती अद्‌भुत देणगी!गलतीकर ५:२२, २३ वाचा.

३. (क) “आत्म्याच्याद्वारे निष्पन्‍न होणारे फळ” विकसित केल्याने देवाचा गौरव कसा होतो? (ख) आपण कोणते प्रश्‍न विचारात घेणार आहोत?

पवित्र आत्मा जे गुण उत्पन्‍न करतो ते खरेतर त्या आत्म्याचा उगम असलेल्या व्यक्‍तिमत्त्वाचे अर्थात यहोवा देवाचे प्रतिबिंब आहे. (कलस्सै. ३:९, १०) ख्रिश्‍चनांनी देवाचे अनुकरण करण्यास का झटले पाहिजे याचे प्रमुख कारण येशूने आपल्या शिष्यांशी बोलताना सांगितले. त्याने म्हटले: “तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचे गौरव होते.” * (योहा. १५:८) आपण “आत्म्याच्याद्वारे निष्पन्‍न होणारे फळ” विकसित करतो तेव्हा आपल्या वागण्याबोलण्यातून ते स्पष्टपणे दिसून येते; आणि त्यामुळे मग, आपल्या देवाची स्तुती होते. (मत्त. ५:१६) आत्म्याचे फळ आणि सैतानाच्या जगाची गुणलक्षणे यांत काय फरक आहे? आपण आत्म्याचे फळ कसे उत्पन्‍न करू शकतो? असे करणे आपल्यासाठी कठीण का असू शकते? या प्रश्‍नांची उत्तरे, आत्म्याच्या फळाच्या तीन पैलूंची चर्चा करताना आपण पाहू. ते तीन पैलू आहेत: प्रेम, आनंद आणि शांती.

उच्च तत्त्वावर आधारलेले प्रेम

४. येशूने आपल्या अनुयायांना कोणत्या प्रकारचे प्रेम दाखवण्यास शिकवले?

पवित्र आत्म्याद्वारे निष्पन्‍न होणारे प्रेम आणि जगात सर्वसामान्यपणे पाहायला मिळणारे प्रेम यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. तो कसा? पवित्र आत्म्याद्वारे निष्पन्‍न होणारे प्रेम हे एका उच्च तत्त्वावर आधारित आहे. हा फरक, येशूने डोंगरावरील आपल्या प्रवचनात ठळकपणे दाखवून दिला. (मत्तय ५:४३-४८ वाचा.) त्याने म्हटले, की इतर जण आपल्याशी जसे वागतात तसेच त्यांच्याशी वागण्याची प्रवृत्ती पापी लोकांमध्येसुद्धा असते. असे प्रेम म्हणजे निव्वळ उपकारांची परतफेड असते, त्यात खरा आत्मत्याग गोवलेला नसतो. पण, आपल्याला जर “आपल्या स्वर्गांतील पित्याचे पुत्र” होण्याची इच्छा असेल, तर आपण इतरांपेक्षा वेगळे असले पाहिजे. इतर जण आपल्याशी जसे वागतात तसेच त्यांच्याशी वागण्याऐवजी आपण इतरांना यहोवाच्या नजरेतून पाहिले पाहिजे व तो इतरांशी जसा वागतो तसेच आपणही त्यांच्याशी वागले पाहिजे. पण, येशूने दिलेल्या आज्ञेनुसार आपल्याला आपल्या वैऱ्‍यांवर प्रेम करणे कसे शक्य आहे?

५. आपल्या छळ करणाऱ्‍यांवर आपण प्रेम कसे करू शकतो?

बायबलमधील एक उदाहरण विचारात घ्या. फिलिप्पै येथे प्रचार करत असताना पौल व सीला यांना अटक करून बेदम मारण्यात आले. मग, त्यांना आतल्या बंदिखान्यात डांबून त्यांचे पाय खोड्यांत अडकवण्यात आले. या प्रसंगादरम्यान, कदाचित बंदिखान्याच्या नायकानेसुद्धा त्यांना वाईट वागणूक दिली असावी. पण, भूकंपामुळे पौल व सीला यांची अनपेक्षितपणे सुटका झाली तेव्हा त्या नायकाचा सूड घेण्याच्या आशेने ते दोघे मनोमन सुखावले का? नाही. उलट, त्याच्या हितासाठी त्यांनी दाखवलेल्या मनस्वी कळकळीने—त्यांच्या निःस्वार्थ प्रेमाने प्रवृत्त होऊन त्यांनी त्वरित पाऊल उचलले, जेणेकरून त्या नायकाला व त्याच्या संपूर्ण घराण्याला देवाचे उपासक बनणे शक्य झाले. (प्रे. कृत्ये १६:१९-३४) त्याचप्रमाणे, आजही आपल्या अनेक बांधवांनी त्यांचा ‘छळ करणाऱ्‍यांना आशीर्वाद देण्याचा’ मार्ग अनुसरला आहे.—रोम. १२:१४.

६. आपण कोणकोणत्या मार्गांनी आपल्या बांधवांबद्दल निःस्वार्थ प्रेम दाखवू शकतो? (पृष्ठ २१ वरील चौकट पाहा.)

पण, आपल्या सहउपासकांवरील आपले प्रेम एवढ्यावरच संपत नाही. आपण ‘आपल्या बंधूंकरिता स्वतःचा प्राण अर्पण’ करण्यास बांधील आहोत. (१ योहान ३:१६-१८ वाचा.) पण, अनेकदा लहानसहान मार्गांनीसुद्धा आपण प्रेम दाखवू शकतो. उदाहरणार्थ, आपण जर एखाद्या बांधवाचे मन दुखावले असेल, तर आपण स्वतः पुढाकार घेऊन त्याच्याशी शांती प्रस्थापित करू शकतो. (मत्त. ५:२३, २४) पण, जर कोणी आपले मन दुखावले असेल तर? तर आपण लगेच त्याला ‘क्षमा’ करतो का की मनात अढी बाळगतो? (स्तो. ८६:५) पवित्र आत्म्याद्वारे निष्पन्‍न होणारे एकनिष्ठ प्रेम, आपल्याला लहानसहान चुकांवर पांघरूण घालण्यास आणि यहोवाने जशी उदारपणे आपल्याला “क्षमा केली” तशी उदारपणे इतरांना क्षमा करण्यास प्रवृत्त करेल.—कलस्सै. ३:१३, १४; १ पेत्र ४:८.

७, ८. (क) लोकांवरील प्रेम आणि देवावरील प्रेम यांचा एकमेकांशी काय संबंध आहे? (ख) यहोवावरील आपले प्रेम आपण आणखी गहिरे कसे करू शकतो? (खालील चित्र पाहा.)

आपल्या बांधवांबद्दल आपण निःस्वार्थ प्रेम कसे विकसित करू शकतो? देवावर अधिकाधिक प्रेम करण्याद्वारे. (इफिस. ५:१, २; १ योहा. ४:९-११, २०, २१) बायबलचे वाचन करण्यासाठी, मनन करण्यासाठी आणि प्रार्थना करण्यासाठी आपण व्यक्‍तिगतपणे जो वेळ खर्च करतो त्यामुळे आपल्या अंतःकरणाचे पोषण होते व आपल्या स्वर्गातील पित्यावरील आपले प्रेम आणखी गहिरे होते. पण, देवाच्या समीप जाण्यासाठी आपण वेळ काढला पाहिजे.

उदाहरणार्थ, अशी कल्पना करा की दररोज एका ठरावीक वेळीच आपल्याला देवाच्या वचनाचे वाचन करणे, त्यावर मनन करणे आणि यहोवाला प्रार्थना करणे शक्य आहे. तुम्ही व्यक्‍तिगतपणे यहोवाच्या सहवासात घालवत असलेल्या त्या ठरावीक वेळेत कुठलीच गोष्ट आड येऊ नये म्हणून सावधगिरी बाळगणार नाही का? अर्थात, यहोवाला प्रार्थना करण्यापासून आपल्याला कोणीच रोखू शकत नाही. तसेच, आपल्यापैकी अनेक जण वाटेल तेव्हा बायबलचे वाचन करू शकतात. तरीसुद्धा, आपण देवासाठी राखून ठेवलेल्या वेळात दैनंदिन जीवनातील गोष्टींनी अतिक्रमण करू नये म्हणून आपल्याला कदाचित कडक पावले उचलण्याची गरज असेल. तर मग, यहोवाच्या समीप जाण्यासाठी तुम्ही दररोज शक्य तितका वेळ काढता का?

‘पवित्र आत्म्याचा आनंद’

९. पवित्र आत्म्याद्वारे निष्पन्‍न होणाऱ्‍या आनंदाचे वैशिष्ट्य काय आहे?

पवित्र आत्म्याच्या फळाचे एक उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे सर्व परिस्थितीत टिकून राहण्याची क्षमता. आपण आत्म्याच्या फळाच्या ज्या दुसऱ्‍या पैलूची अर्थात आनंदाची चर्चा करणार आहोत त्यातून ही गोष्ट स्पष्टपणे दिसून येते. आनंद हा अशा एका रोपट्यासारखा आहे ज्याची वाइटातल्या वाईट वातावरणातही जोमाने वाढ होऊ शकते. जगभरात देवाच्या अनेक सेवकांनी ‘फार संकटात पवित्र आत्म्याच्या आनंदाने वचन स्वीकारले’ आहे. (१ थेस्सलनी. १:६) इतर काहींना अनेक हालअपेष्टांना तोंड द्यावे लागते व जीवनावश्‍यक गोष्टींपासून वंचित राहावे लागते. असे असले, तरी त्यांना ‘सर्व प्रकारचा धीर व सहनशक्‍ती ही आनंदासह प्राप्त व्हावी’ म्हणून यहोवा त्याच्या आत्म्याद्वारे त्यांना सामर्थ्यवान करतो. (कलस्सै. १:११) या आनंदाचा स्रोत काय आहे?

१०. आपल्या आनंदाचा स्रोत काय आहे?

१० सैतानाच्या जगातील ‘चंचल धनाच्या’ अगदी उलट यहोवाकडून आपल्याला मिळालेल्या आध्यात्मिक धनाला स्थायी मोल आहे. (१ तीम. ६:१७; मत्त. ६:१९, २०) यहोवाने आपल्यासमोर एका अनंत भवितव्याची आनंददायक आशा ठेवली आहे. तसेच, आपल्याला एका जगव्याप्त ख्रिस्ती बंधुसमाजाचा भाग बनण्याचा आनंद आहे. सर्वात मुख्य म्हणजे आपला आनंद हा देवासोबतच्या आपल्या नातेसंबंधावर आधारलेला आहे. आपल्याही भावना दाविदासारख्याच आहेत. दाविदाला परागंदा होऊन जगावे लागले तरी त्याने स्तोत्र गाऊन यहोवाची स्तुती केली. त्याने म्हटले: “तुझे वात्सल्य जीवनाहून उत्तम आहे; माझे ओठ तुझे स्तवन करितील. मी जिवंत आहे तोपर्यंत तुझा धन्यवाद असाच करीन.” (स्तो. ६३:३, ४) आपल्याला संकटांना तोंड द्यावे लागले, तरीही आपले मन यहोवाची स्तुती करण्यास प्रवृत्त होते.

११. यहोवाची सेवा आनंदाने करणे का महत्त्वाचे आहे?

११ प्रेषित पौलाने ख्रिश्‍चनांना असे आर्जवले: “प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा; पुन्हा म्हणेन, आनंद करा.” (फिलिप्पै. ४:४) ख्रिश्‍चनांनी यहोवाची सेवा आनंदाने करणे महत्त्वाचे का आहे? कारण सैतानाने यहोवाच्या सार्वभौमत्वासंबंधी एक वादविषय उपस्थित केला आहे. सैतान असा दावा करतो, की कोणीही मनुष्य स्वेच्छेने देवाची सेवा करत नाही. (ईयो. १:९-११) आपण निव्वळ कर्तव्य म्हणून, पण नाखुशीने यहोवाची सेवा केली असती, तर आपला स्तुतीचा यज्ञ अपूर्ण असता. तेव्हा, आपण स्तोत्रकर्त्याच्या सल्ल्याचे पालन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याने म्हटले: “हर्षाने परमेश्‍वराची सेवा करा; गीत गात त्याच्यापुढे या.” (स्तो. १००:२) आनंदाने व स्वेच्छेने केलेल्या सेवेमुळे देवाचा गौरव होतो.

१२, १३. नकारार्थी विचारांवर मात करण्यासाठी आपण काय करू शकतो?

१२ पण वस्तुस्थिती ही आहे, की यहोवाच्या समर्पित सेवकांच्या जीवनातसुद्धा असे प्रसंग येतील जेव्हा ते खचून जातील व एक सकारात्मक दृष्टिकोन राखण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागेल. (फिलिप्पै. २:२५-३०) अशा वेळी कोणती गोष्ट आपली मदत करू शकेल? इफिसकर ५:१८, १९ म्हणते: “आत्म्याने परिपूर्ण व्हा, स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक प्रबंध ही एकमेकांना म्हणून दाखवा, आपल्या अंतःकरणात प्रभूला गायनवादन करा.” या सल्ल्याचे आपण पालन कसे करू शकतो?

१३ आपल्या मनात नकारार्थी विचार घर करतात तेव्हा आपण प्रार्थनेत यहोवाला मदतीची याचना करू शकतो आणि प्रशंसनीय गोष्टींवर मनन करण्याचा प्रयत्न करू शकतो. (फिलिप्पैकर ४:६-९ वाचा.) काहींनी असे अनुभवले आहे, की आपली ध्वनिमुद्रित राज्य गीते ऐकताना ती गीते गुणगुणल्याने त्यांच्या मनाला उभारी मिळते आणि सकारात्मक गोष्टींवर आपले मन केंद्रित करण्यास मदत मिळते. एका बांधवाला एका खडतर प्रसंगाचा सामना करावा लागला. त्यामुळे तो नेहमी खूप निराश व्हायचा व खचून जायचा. त्या प्रसंगाची आठवण करून तो म्हणतो: “नियमितपणे मनापासून प्रार्थना करण्यासोबतच मी काही राज्य गीतेदेखील तोंडपाठ केली होती. मोठ्या आवाजात किंवा मनातल्या मनात यहोवासाठी गायिलेल्या या मधुर स्तुती गीतांमुळे माझ्या मनाला खूप शांती मिळायची. तसंच, त्याच काळादरम्यान देवाच्या जवळ या (इंग्रजी) हे पुस्तक प्रकाशित झालं होतं. त्याच्या पुढच्याच वर्षी मी दोन वेळा ते पुस्तक वाचून काढलं. त्या पुस्तकानं जणू माझ्या दुःखी मनावर फुंकर घातली. मला पक्कं ठाऊक आहे, यहोवानं माझे प्रयत्न आशीर्वादित केले.”

शांतीच्या बंधनाचे ऐक्य’

१४. पवित्र आत्म्याच्याद्वारे निष्पन्‍न होणाऱ्‍या शांतीचे एक उल्लेखनीय वैशिष्ट्य काय आहे?

१४ आपल्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनांमध्ये निरनिराळ्या पार्श्‍वभूमीतून आलेले बंधुभगिनी ख्रिस्ती सहवासाचा मनसोक्‍त आनंद घेतात. अशा दृश्‍यांतून, आज देवाचे लोक अनुभवत असलेल्या शांतीचे एक वैशिष्ट्य ठळकपणे दिसून येते. ते म्हणजे आपली जगव्याप्त एकता. जे लोक एरवी एकमेकांच्या जिवावर उठले असते तेच लोक ‘आत्म्याच्याद्वारे घडून आलेले ऐक्य शांतीच्या बंधनाने राखावयास झटतात,’ तेव्हा पाहणारेही बरेचदा अवाक होतात. (इफिस. ४:३) लोकांना जे काही सोसावे लागले आहे ते लक्षात घेता ही एकता नक्कीच खूप उल्लेखनीय आहे.

१५, १६. (क) पेत्राची पार्श्‍वभूमी काय होती, आणि त्यामुळे त्याला कोणत्या समस्येला सामोरे जावे लागले? (ख) यहोवाने पेत्राला त्याची मनोवृत्ती बदलण्यास कशी मदत केली?

१५ निरनिराळ्या पार्श्‍वभूमीच्या लोकांमध्ये एकता प्रस्थापित करणे हे सोपे नाही. अशी एकता प्रस्थापित करण्यासाठी कशावर मात करण्याची गरज आहे याची गहन समज प्राप्त करण्यासाठी आपण पहिल्या शतकातील एक उदाहरण विचारात घेऊ या. ते उदाहरण आहे प्रेषित पेत्राचे. सुंता न झालेल्या परराष्ट्रीय लोकांविषयी त्याचा दृष्टिकोन कसा होता हे त्याच्याच पुढील शब्दांतून दिसून येते: “तुम्हाला ठाऊकच आहे की, यहूदी मनुष्याने अन्य जातीच्या मनुष्याबरोबर निकट संबंध ठेवणे किंवा त्याच्याकडे जाणेयेणे ठेवणे हे त्याच्या रितीरिवाजाविरुद्ध आहे; तथापि कोणाहि मनुष्याला निषिद्ध किंवा अशुद्ध म्हणू नये असे देवाने मला दाखविले आहे.” (प्रे. कृत्ये १०:२४-२९; ११:१-३) आपण केवळ आपल्या यहुदी बांधवांवरच प्रेम करावे अशी नियमशास्त्र आपल्याकडून अपेक्षा करते असे त्या काळी सर्वसामान्यपणे मानले जायचे. पेत्रसुद्धा बहुधा याच धारणेवर विश्‍वास ठेवून लहानाचा मोठा झाला असावा. आणि म्हणून, परराष्ट्रीय लोक आपले वैरी असून आपण त्यांचा द्वेष केला पाहिजे असे मानण्यात त्याला काहीच वावगे वाटले नसावे. *

१६ पेत्राने कर्नेल्याच्या घरात पाऊल टाकले तेव्हा त्याला किती अवघडल्यासारखे वाटले असेल याची कल्पना करा. ज्या मनुष्याने पूर्वी परराष्ट्रीय लोकांविषयी नकारार्थी दृष्टिकोन बाळगला होता तो कधी त्यांच्याशी ‘जुळवून घेऊन’ त्यांच्यासोबत ‘शांतीच्या बंधनात एक’ होऊ शकत होता का? (इफिस. ४:३, १६) होय, कारण काही दिवसांपूर्वीच देवाच्या आत्म्याने पेत्राचे अंतःकरण खुले केले होते आणि त्याला हळूहळू आपल्या मनोवृत्तीत बदल करण्यास व आपल्या मनातील पूर्वग्रहावर मात करण्यास मदत केली होती. यहोवाने एका दृष्टान्ताद्वारे त्याला स्पष्टपणे हे दाखवून दिले, की लोकांबद्दलचा त्याचा दृष्टिकोन ते कोणत्या जातीचे किंवा देशाचे आहेत यावर अवलंबून नाही. (प्रे. कृत्ये १०:१०-१५) म्हणूनच पेत्र कर्नेल्याला असे सांगू शकला: “देव पक्षपाती नाही, हे मला पक्के ठाऊक आहे; तर प्रत्येक राष्ट्रात जो त्याची भीति बाळगतो व ज्याची कृत्ये नैतिक आहेत तो त्याला मान्य आहे.” (प्रे. कृत्ये १०:३४, ३५) पेत्राने आपली विचारसरणी बदलली आणि खऱ्‍या अर्थाने तो आपल्या ‘बंधुवर्गाशी’ एकरूप झाला.—१ पेत्र २:१७.

१७. देवाचे लोक अनुभवत असलेली एकता कोणत्या अर्थी उल्लेखनीय आहे?

१७ आज देवाच्या लोकांमध्ये जे उल्लेखनीय परिवर्तन पाहायला मिळते ते समजण्यास पेत्राचा अनुभव आपल्याला मदत करतो. (यशया २:३, ४ वाचा.) ‘सर्व राष्ट्रे, वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणाऱ्‍या’ लक्षावधी लोकांनी ‘देवाच्या उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छेनुसार’ आपल्या विचारसरणीत बदल केला आहे. (प्रकटी. ७:९; रोम. १२:२) यांपैकी अनेक जण एकेकाळी द्वेषभाव, वैरभाव आणि सैतानाच्या जगातील संघर्षांमध्ये आकंठ बुडालेले होते. पण, देवाच्या वचनाच्या अभ्यासामुळे व पवित्र आत्म्याच्या साहाय्याने ते आता ‘शांतीला पोषक होणाऱ्‍या गोष्टींच्या मागे लागण्यास’ शिकले आहेत. (रोम. १४:१९) यापासून निष्पन्‍न होणाऱ्‍या एकतेमुळे देवाची स्तुती होते.

१८, १९. (क) आपल्यापैकी प्रत्येक जण मंडळीच्या शांतीला व एकतेला हातभार कसा लावू शकतो? (ख) पुढील लेखात आपण कशाची चर्चा करणार आहोत?

१८ आपल्यापैकी प्रत्येक जण, देवाच्या लोकांमध्ये पाहायला मिळणाऱ्‍या शांतीला व एकतेला कसा हातभार लावू शकतो? अनेक मंडळ्यांमध्ये, परदेशातून स्थलांतर केलेले लोक असतात. यांपैकी काहींचे रीतिरिवाज वेगळे असतील किंवा त्यांना आपली भाषा नीट बोलता येत नसेल. मग अशांना आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो का? देवाचे वचन नेमके हेच करण्याचे आपल्याला प्रोत्साहन देते. रोमच्या मंडळीत यहुदी आणि परराष्ट्रीय असे दोन्ही प्रकारचे बंधुभगिनी होते. त्या मंडळीला लिहिताना पौलाने म्हटले: “देवाच्या गौरवाकरिता ख्रिस्ताने तुमचाआमचा स्वीकार केला तसा तुम्हीहि एकमेकांचा स्वीकार करा.” (रोम. १५:७) तुमच्या मंडळीत असा कोणी आहे का, ज्याला तुम्ही आणखी चांगल्या प्रकारे जाणून घेऊ शकता?

१९ पवित्र आत्म्याने आपल्या जीवनात कार्य करावे म्हणून आपण आणखी काय करू शकतो? या प्रश्‍नाचे उत्तर, पुढील लेखात, आत्म्याच्या फळाच्या इतर पैलूंची चर्चा करताना आपण पाहू या.

[तळटीपा]

^ येशूने उल्लेख केलेल्या फळात, “आत्म्याच्याद्वारे निष्पन्‍न होणारे फळ” आणि खरे ख्रिस्ती राज्य प्रचार कार्याद्वारे देवाला अर्पण करत असलेले “ओठांचे फळ,” या दोन्ही गोष्टी समाविष्ट आहेत.—इब्री १३:१५.

^ लेवीय १९:१८ म्हणते: “सूड उगवू नको किंवा आपल्या भाऊबंदांपैकी कोणाचा दावा धरू नको, तर तू आपल्या शेजाऱ्‍यावर स्वतःसारखी प्रीति कर.” यहुदी धर्मगुरूंची अशी धारणा होती की ‘भाऊबंद’ आणि ‘आपला शेजारी’ हे शब्द केवळ यहुदी लोकांनाच लागू होतात. इस्राएल लोकांनी स्वतःला इतर राष्ट्रांपासून वेगळे ठेवावे अशी अपेक्षा नियमशास्त्र त्यांच्याकडून करत होते. पण, सर्व गैर-यहुदी आपले वैरी असून त्या प्रत्येकाचा आपण द्वेष केला पाहिजे या पहिल्या शतकातील धर्मगुरूंच्या विचारसरणीला मात्र नियमशास्त्राने संमती दिली नाही.

तुमचे उत्तर काय असेल?

• आपल्या बांधवांबद्दल आपण निःस्वार्थ प्रेम कसे दाखवू शकतो?

• देवाची सेवा आनंदाने करणे का महत्त्वाचे आहे?

• आपण मंडळीतील शांतीला व एकतेला कसा हातभार लावू शकतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२१ पानांवरील चौकट]

“हेच खरे ख्रिस्ती आहेत”

बिट्‌वीन रेसिस्टन्स ॲण्ड मार्टरडमजेहोवाज विटनेसेस इन द थर्ड राइक या पुस्तकात एका तरुण यहुदी कैद्याचे विचार नमूद करण्यात आले आहेत. त्यात, नोइनगाम छळ छावणीत यहोवाच्या साक्षीदारांसोबत पहिल्यांदाच झालेल्या त्याच्या भेटीचे तो वर्णन करतो:

“डाकाउ येथून आलेले आम्ही यहुदी लोक छळ छावणीत आलो तसे इतर यहुदी लोक त्यांच्याजवळ असलेल्या सर्व वस्तू पटापट लपवू लागले. आम्ही त्यांच्या वस्तू वापरू नयेत म्हणून ते असं करत होते. . . . [छळ छावणीच्या] बाहेर असताना आम्ही एकमेकांच्या मदतीला धावून आलो होतो. पण इथं, जीवन-मरणाच्या परिस्थितीत असताना जो तो स्वतःची कातडी वाचवण्याचा प्रयत्न करत होता. त्याला दुसऱ्‍याची काहीएक पर्वा नव्हती. पण, बायबल विद्यार्थी काय करत होते त्याचा विचार करा. त्या वेळी, ते कुठलीतरी जलवाहिनी दुरुस्त करत असल्यामुळे त्यांना खूप मेहनतीचं काम करावं लागत होतं. खूप थंडी असल्यामुळे त्यांना दिवसभर अतिशय थंड पाण्यात उभं राहून काम करावा लागत होतं. हे सगळं ते कसं सहन करू शकत होते हे कुणालाच समजत नव्हतं. ते म्हणायचे की यहोवा त्यांना शक्‍ती देतो. आमच्याप्रमाणेच तेदेखील खूप भुकेले होते आणि त्यांनाही अन्‍नाची गरज असायची. पण, त्यांनी काय केलं? त्यांच्याजवळ असलेलं सर्व अन्‍न त्यांनी गोळा केलं. त्यातलं अर्ध त्यांनी स्वतःसाठी ठेवलं आणि अर्ध, नुकतेच डाकाउ येथून आलेल्या त्यांच्या सहविश्‍वासू बांधवांमध्ये वाटलं. त्यांनी आनंदानं आपल्या बांधवांचं स्वागत केलं व त्यांना प्रेमानं जवळ घेतलं. जेवणाआधी त्यांनी प्रार्थना केली. नंतर, ते सर्व तृप्त व आनंदी होते. ते म्हणाले, आता आम्हाला मुळीच भूक नाही. त्या वेळी मला असं वाटलं: हेच खरे ख्रिस्ती आहेत.”

[१९ पानांवरील चित्रे]

यहोवाच्या समीप जाण्यासाठी तुम्ही दैनंदिन गोष्टींतून वेळ काढता का?