व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्ही देवाच्या आत्म्याला तुमचे मार्गदर्शन करू देत आहात का?

तुम्ही देवाच्या आत्म्याला तुमचे मार्गदर्शन करू देत आहात का?

तुम्ही देवाच्या आत्म्याला तुमचे मार्गदर्शन करू देत आहात का?

“तुझा उत्तम आत्मा मला सरळ मार्गावर नेवो.”—स्तो. १४३:१०.

१, २. (क) अशा काही प्रसंगांचा उल्लेख करा जेव्हा यहोवाने आपल्या सेवकांच्या बाबतीत पवित्र आत्म्याचा उपयोग केला? (ख) पवित्र आत्मा केवळ विशिष्ट प्रसंगीच कार्य करतो का? स्पष्ट करून सांगा.

 तुम्ही पवित्र आत्म्याच्या कार्याचा विचार करता तेव्हा तुमच्या मनात काय येते? तुमच्या डोळ्यांसमोर गिदोन व शमशोन यांनी केलेल्या पराक्रमी कृत्यांचे चित्र उभे राहते का? (शास्ते ६:३३, ३४; १५:१४, १५) तुमच्या मनात कदाचित, सुरुवातीच्या ख्रिश्‍चनांनी दाखवलेले धैर्य किंवा न्यायसभेसमोर उभा असलेल्या स्तेफनाच्या चेहऱ्‍यावरील शांत भाव येत असतील. (प्रे. कृत्ये ४:३१; ६:१५) आधुनिक काळात, आपल्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनांमध्ये ओसंडून वाहणारा आनंद, ख्रिस्ती तटस्थतेमुळे तुरुंगात टाकलेल्या आपल्या बांधवांची एकनिष्ठा आणि प्रचार कार्याची उल्लेखनीय वाढ यांच्याविषयी काय म्हणता येईल? ही सर्व उदाहरणे, पवित्र आत्म्याच्या कार्याचा पुरावा आहेत.

पवित्र आत्मा केवळ विशिष्ट प्रसंगीच किंवा खास परिस्थितींतच कार्य करतो का? नाही. देवाचे वचन असे म्हणते, की खरे ख्रिस्ती ‘आत्म्याच्या प्रेरणेने चालतात,’ ‘आत्म्याच्या प्रेरणेने चालविलेले आहेत’ आणि ‘आत्म्याच्या सामर्थ्याने जगतात.’ (गलती. ५:१६, १८, २५) या वाक्यांशांवरून दिसून येते, की पवित्र आत्मा आपल्या जीवनावर सतत प्रभाव पाडू शकतो. तेव्हा, यहोवाने त्याच्या आत्म्याद्वारे आपले विचार, बोलणे आणि वागणे मार्गदर्शित करावे म्हणून आपण दररोज त्याला विनवणी केली पाहिजे. (स्तोत्र १४३:१० वाचा.) पवित्र आत्म्याला आपल्या जीवनात मुक्‍तपणे कार्य करू दिल्याने आपल्यामध्ये असे फळ उत्पन्‍न होईल ज्यामुळे इतरांना तजेला मिळेल व देवाची स्तुती होईल.

३. (क) पवित्र आत्म्याला आपले मार्गदर्शन करू देणे का महत्त्वाचे आहे? (ख) आपण कोणते प्रश्‍न विचारात घेणार आहोत?

पवित्र आत्म्याला आपले मार्गदर्शन करू देणे का महत्त्वाचे आहे? कारण आपल्यावर, पवित्र आत्म्याच्या कार्याविरुद्ध काम करणारी आणखी एक शक्‍ती वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करते. त्या शक्‍तीला शास्त्रवचनांत “देहवासना” असे म्हटले असून ती आपल्या पापी शरीराच्या पापपूर्ण प्रवृत्तीला म्हणजेच आदामाचे वंशज या नात्याने आपल्याला वारशाने मिळालेल्या अपरिपूर्णतेला सूचित करते. (गलतीकर ५:१७ वाचा.) तर मग, देवाच्या आत्म्याला आपले मार्गदर्शन करू देणे यात कोणकोणत्या गोष्टी समाविष्ट आहेत? आपल्या पापी प्रवृत्तीवर मात करण्यासाठी आपण काही व्यावहारिक पावले उचलू शकतो का? या प्रश्‍नांची उत्तरे, पवित्र आत्म्याच्या फळाच्या उर्वरित सहा पैलूंची चर्चा करताना आपण पाहू या. ते सहा पैलू आहेत: “सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्‍वासूपणा, सौम्यता, इंद्रियदमन.”—गलती. ५:२२, २३.

सौम्यता आणि सहनशीलता मंडळीतील शांती वाढीस लावतात

४. सौम्यता व सहनशीलता मंडळीतील शांतीला कसा हातभार लावतात?

कलस्सैकर ३:१२, १३ वाचा. मंडळीतील शांती वाढीस लावण्यासाठी सौम्यता आणि सहनशीलता एकत्र कार्य करतात. आत्म्याच्या फळाचे हे दोन्ही पैलू आपल्याला इतरांशी दयाळूपणे वागण्यास, चेतवले गेले तरी शांत राहण्यास आणि इतर जण आपल्याशी वाईट वागतात किंवा बोलतात तरी त्यांना जशास तशी वागणूक न देण्यास मदत करतात. एखाद्या सहविश्‍वासू बंधू किंवा बहिणीबरोबर काही मतभेद झाल्यास, सहनशीलता किंवा धीर आपल्याला त्यांचा त्याग न करण्यास आणि आपसातील मतभेद मिटवून टाकण्यासाठी शक्य ते करण्यास साहाय्य करेल. मंडळीत सौम्यता व सहनशीलता यांची खरोखरच गरज आहे का? होय, कारण आपण सर्व अपरिपूर्ण आहोत.

५. पौल आणि बर्णबा यांच्यात काय झाले आणि यावरून कोणती गोष्ट स्पष्टपणे दिसून येते?

पौल आणि बर्णबा यांच्यात काय झाले याचा विचार करा. सुवार्तेचा प्रसार करण्यासाठी त्या दोघांनी कितीतरी वर्षे एकमेकांच्या सोबतीने कार्य केले होते. त्या दोघांमध्ये अनेक उत्तम गुण होते. तरीसुद्धा, एके प्रसंगी त्यांच्यामध्ये “तीव्र मतभेद उपस्थित होऊन ते एकमेकांपासून वेगळे झाले.” (प्रे. कृत्ये १५:३६-३९) या घटनेवरून हे स्पष्टपणे दिसून येते, की काही वेळा देवाच्या समर्पित सेवकांमध्येसुद्धा मतभेद निर्माण होऊ शकतात. एका ख्रिस्ती व्यक्‍तीचे आपल्या बंधू किंवा बहिणीबरोबर काही बिनसले, तर त्याचे रूपांतर मोठ्या भांडणात होऊन त्यांच्या नातेसंबंधात कायमची दरी निर्माण होऊ नये म्हणून ती व्यक्‍ती काय करू शकते?

६, ७. (क) चर्चेचे रूपांतर बाचाबाचीत होऊ नये म्हणून आपण कोणत्या शास्त्रवचनीय सल्ल्याचे पालन करू शकतो? (ख) ‘ऐकावयास तत्पर, बोलावयास धीमे, रागास मंद’ असण्याचे काय फायदे आहेत?

स्पष्टच आहे, की पौल आणि बर्णबा यांच्यात एकाएकी मतभेद निर्माण झाला होता व तो तीव्र होता. आपसातील मतभेद मिटवताना आपला राग अनावर होत आहे हे एखाद्या ख्रिस्ती व्यक्‍तीला जाणवते तेव्हा तिने याकोब १:१९, २० मध्ये दिलेल्या सल्ल्याचे पालन करणे सुज्ञपणाचे ठरेल: “प्रत्येक माणूस ऐकावयास तत्पर, बोलावयास धीमा, रागास मंद असावा; कारण माणसाच्या रागाने देवाच्या नीतिमत्वाचे कार्य घडत नाही.” परिस्थिती लक्षात घेऊन ती ख्रिस्ती व्यक्‍ती विषय बदलू शकते, नंतर कधीतरी त्या विषयावर चर्चा करू शकते किंवा चर्चेचे रूपांतर बाचाबाचीत होण्याआधी तेथून आदरपूर्वक निघून जाऊ शकते.—नीति. १२:१६; १७:१४; २९:११.

या सल्ल्याचे पालन करण्याचे काय फायदे आहेत? आपला राग शांत करण्याद्वारे, त्या विषयाबद्दल प्रार्थना करण्याद्वारे आणि कधी व कसे उत्तर द्यावे याचा विचार करण्याद्वारे एक ख्रिस्ती व्यक्‍ती देवाच्या आत्म्याला स्वतःचे मार्गदर्शन करू देते. (नीति. १५:१, २८) आत्म्याच्या प्रभावाखाली, ती व्यक्‍ती सौम्यता व सहनशीलता दाखवू शकते. असे करण्याद्वारे ती इफिसकर ४:२६, २९ मधील सल्ल्याचे पालन करण्यास तयार असते: “तुम्ही रागावा, परंतु पाप करू नका, . . . तुमच्या मुखातून कसलेच कुजके भाषण न निघो, पण गरजेप्रमाणे उन्‍नतीकरिता जे चांगले तेच मात्र निघो, ह्‍यासाठी की, तेणेकडून ऐकणाऱ्‍यांना कृपादान प्राप्त व्हावे.” खरेच, आपण सौम्यता व सहनशीलता धारण करतो तेव्हा आपण मंडळीतील शांतीला व एकतेला हातभार लावतो.

ममता आणि चांगुलपणा यांद्वारे आपल्या कुटुंबाला तजेला द्या

८, ९. ममता आणि चांगुलपणा यांचा काय अर्थ होतो, आणि त्यांचा कुटुंबातील वातावरणावर कसा प्रभाव पडतो?

इफिसकर ४:३१, ३२; ५:८, ९ वाचा. उन्हाळ्याच्या दिवसांत मंद झुळूक व थंड पेय यांमुळे जसा तजेला मिळतो, त्याचप्रमाणे ममता व चांगुलपणा हे गुणदेखील तजेला देतात. कौटुंबिक वर्तुळात ते एका प्रसन्‍न वातावरणाला हातभार लावतात. ममता हा एक प्रिय गुण असून इतरांबद्दल वाटणाऱ्‍या मनस्वी आस्थेमुळे तो उत्पन्‍न होतो. ही आस्था आपल्या प्रेमळ कृत्यांतून व विचारशील शब्दांतून झळकते. ममतेप्रमाणेच, चांगुलपणा हादेखील एक सद्‌गुण असून इतरांसाठी उदार मनाने केलेल्या चांगल्या कृत्यांतून तो व्यक्‍त होतो. (प्रे. कृत्ये ९:३६, ३९; १६:१४, १५) चांगुलपणात आणखी बरेच काही गोवलेले आहे.

चांगुलपणा हा एक उत्कृष्ट नैतिक गुण आहे. त्यात, आपण काय करतो केवळ एवढेच नव्हे, तर सर्वात मुख्य म्हणजे आपण कसे आहोत हे गोवलेले आहे. अशी कल्पना करा की एक स्त्री आपल्या कुटुंबासाठी फळ कापत आहे. प्रत्येक फोड कापत असताना फळ आतून-बाहेरून खराब नाही आणि ते पूर्णपणे पिकलेले व गोड आहे याची ती खातरी करते. त्याचप्रमाणे, पवित्र आत्म्याद्वारे उत्पन्‍न होणारा चांगुलपणा एका ख्रिस्ती व्यक्‍तीच्या संपूर्ण जीवनक्रमावरून दिसून येतो.

१०. आत्म्याचे फळ विकसित करण्यास कौटुंबिक सदस्यांना मदत करण्यासाठी काय केले जाऊ शकते?

१० कोणती गोष्ट ख्रिस्ती कुटुंबातील सदस्यांना एकमेकांशी ममतेने वागण्यास व एकमेकांना चांगुलपणा दाखवण्यास मदत करू शकते? या बाबतीत देवाच्या वचनाचे अचूक ज्ञान महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. (कलस्सै. ३:९, १०) काही कुटुंबप्रमुख आपल्या साप्ताहिक कौटुंबिक उपासनेच्या संध्याकाळी आत्म्याच्या फळाचा अभ्यास करतात. असे करणे मुळीच कठीण नाही. संशोधन करण्यासाठी तुमच्या भाषेत उपलब्ध असलेल्या साधनांचा उपयोग करून आत्म्याच्या फळाच्या प्रत्येक पैलूवर माहिती गोळा करा. दर आठवडी, केवळ काही परिच्छेदांवर चर्चा करून तुम्ही एकाच पैलूविषयी अनेक आठवड्यांपर्यंत चर्चा करू शकता. सदर माहितीचा अभ्यास करत असताना उल्लेखित शास्त्रवचने वाचून त्यांची चर्चा करा. अभ्यासातून शिकलेल्या गोष्टी तुम्ही प्रत्यक्षपणे कशा लागू करू शकता याचा विचार करा आणि त्या लागू करण्यासाठी तुम्ही करत असलेले प्रयत्न यहोवाने आशीर्वादित करावेत म्हणून त्याला प्रार्थना करा. (१ तीम. ४:१५; १ योहा. ५:१४, १५) अशा अभ्यासामुळे, कौटुंबिक सदस्यांच्या वागण्याबोलण्यात खरेच काही फरक पडू शकतो का?

११, १२. ममतेच्या विषयावर अभ्यास केल्याने दोन ख्रिस्ती जोडप्यांना कसा फायदा झाला?

११ एका तरुण जोडप्याने, आपल्या वैवाहिक जीवनात यशस्वी होण्यासाठी आत्म्याच्या फळाचा सखोल अभ्यास करण्याचे ठरवले. याचा त्यांना काय फायदा झाला? पत्नी म्हणते: “ममता दाखवणं यात विश्‍वासूपणा आणि एकनिष्ठा या दोन्ही गोष्टी समाविष्ट आहेत हे शिकल्यामुळे एकमेकांसोबतच्या आमच्या वागण्याबोलण्यात खूप फरक पडला आहे. या अभ्यासामुळे आम्ही नमतं घेण्यास व क्षमा करण्यास शिकलो आहोत. तसंच, उचित असतं तेव्हा ‘आभारी आहे’ आणि ‘माझं चुकलं’ असं म्हणण्यास मदत मिळाली आहे.”

१२ आपल्या वैवाहिक जीवनात समस्यांचा सामना करत असलेल्या आणखी एका ख्रिस्ती जोडप्याच्या लक्षात आले, की त्यांच्या नातेसंबंधात ममतेचा अभाव होता. त्यांनी ममतेच्या विषयावर एकत्र अभ्यास करण्याचे ठरवले. याचा काय परिणाम झाला? पती आठवून सांगतो: “ममतेच्या विषयावर अभ्यास केल्यामुळे, एकमेकांवर उगाच संशय घेण्याऐवजी एकमेकांवर भरवसा ठेवणं, एकमेकांमधले चांगले गुण पाहणं किती गरजेचं आहे हे शिकण्यास आम्हाला मदत मिळाली. आम्ही एकमेकांच्या गरजांकडे अधिक लक्ष देऊ लागलो. ममता दाखवण्यात, माझ्या पत्नीच्या मनात जे काही आहे ते तिला मनमोकळेपणानं बोलण्यास सांगणं आणि ती जे काही म्हणेल ते मनाला लावून न घेणं समाविष्ट होतं. याचाच अर्थ, मला माझा अहंकार बाजूला ठेवावा लागला. आम्ही आमच्या वैवाहिक जीवनात ममतेचा गुण लागू करू लागलो तेव्हा आपलंच खरं करण्याची आमची प्रवृत्ती कमी होऊ लागली. आम्हाला खूप मोकळं मोकळं वाटू लागलं.” आत्म्याच्या फळाचा अभ्यास केल्याने तुमच्याही कुटुंबाला फायदा होऊ शकतो का?

एकटे असताना विश्‍वास प्रदर्शित करा

१३. आपल्या आध्यात्मिकतेला घातक असणाऱ्‍या कोणत्या धोक्यापासून आपण स्वतःचे रक्षण केले पाहिजे?

१३ ख्रिश्‍चनांनी चारचौघांत असताना तसेच एकटे असतानादेखील देवाच्या आत्म्याला आपले मार्गदर्शन करू दिले पाहिजे. आज सैतानाच्या जगात अश्‍लील चित्रांचा व खालच्या दर्जाच्या मनोरंजनाचा सुळसुळाट झाला आहे. यामुळे आपल्या आध्यात्मिकतेला धोका पोहचू शकतो. मग, एका ख्रिस्ती व्यक्‍तीने काय करावे? देवाचे वचन आपल्याला असा सल्ला देते: “सर्व मलिनता व उचंबळून आलेला दुष्टभाव सोडून, तुमच्या जिवाचे तारण करावयास समर्थ असे मुळाविलेले वचन सौम्यतेने स्वीकारा.” (याको. १:२१) आत्म्याच्या फळाचा आणखी एक पैलू अर्थात विश्‍वास कशा प्रकारे आपल्याला यहोवाच्या नजरेत शुद्ध राहण्यास मदत करू शकतो ते आपण पाहू या.

१४. विश्‍वासाच्या अभावामुळे वाईट कृत्य कसे होऊ शकते?

१४ आपण विश्‍वास करतो म्हणजे मुळात आपण असे मानतो की आपल्यासाठी यहोवा एक खरीखुरी व्यक्‍ती आहे. देव आपल्यासाठी खरा नसेल, तर आपण सहजासहजी वाईट कृत्य करू शकतो. प्राचीन काळी, देवाच्या लोकांमध्ये काय झाले याचा विचार करा. लोक गुप्तपणे घृणित कृत्ये करत असल्याचे यहोवाने यहेज्केल संदेष्ट्याला प्रकट केले. यहोवाने म्हटले: “मानवपुत्रा, इस्राएल घराण्याचा प्रत्येक वडील आपल्या मूर्तिगृहात अंधारामध्ये काय करीत आहे हे तुला दिसते ना? ते तर म्हणतात की परमेश्‍वर आम्हास पाहत नाही; परमेश्‍वराने देशाचा त्याग केला आहे.” (यहे. ८:१२) ते कशामुळे असे वागत होते हे तुमच्या लक्षात आले का? आपण काय करत आहोत हे यहोवा पाहत आहे हे ते मानत नव्हते. त्यांच्यासाठी यहोवा एक खरीखुरी व्यक्‍ती नव्हता.

१५. यहोवावरील दृढ विश्‍वासामुळे आपले संरक्षण कसे होते?

१५ याच्या अगदी उलट, योसेफाचे उदाहरण विचारात घ्या. तो आपल्या कुटुंबापासून व आपल्या लोकांपासून दूर होता. असे असले, तरी त्याने पोटीफरच्या पत्नीसोबत व्यभिचार करण्यास साफ नकार दिला. का? त्याने म्हटले: “एवढी मोठी वाईट गोष्ट करून मी देवाच्या विरुद्ध पाप कसे करू?” (उत्प. ३९:७-९) होय, त्याच्यासाठी यहोवा खराखुरा देव होता. आपल्यासाठीदेखील देव खरा असेल, तर आपण अश्‍लील मनोरंजन पाहणार नाही किंवा ज्यामुळे देव नाखूश होतो असे कोणतेही कृत्य आपण गुप्तपणे करणार नाही. आपला निर्धारदेखील स्तोत्रकर्त्याप्रमाणेच असेल ज्याने असे गायिले: “मी आपल्या घरी सरळ अंतःकरणाने वागेन. मी अनुचित गोष्ट आपल्या नेत्रांसमोर येऊ देणार नाही.”—स्तो. १०१:२, ३.

इंद्रियदमनाद्वारे आपल्या अंतःकरणाचे रक्षण करा

१६, १७. (क) नीतिसूत्रे पुस्तकात वर्णन केल्यानुसार एक “बुद्धीहीन तरूण पुरुष” कशा प्रकारे पापाच्या जाळ्यात अडकतो? (ख) पृष्ठ २६ वर दाखवल्यानुसार, हीच गोष्ट कोणत्याही वयोगटातील व्यक्‍तीसोबत कशी होऊ शकते?

१६ आत्म्याच्या फळाचा शेवटचा पैलू इंद्रियदमन असून तो आपल्याला, देवाला नापसंत असलेल्या गोष्टी नाकारण्यास साहाय्य करतो. आपल्या अंतःकरणाचे रक्षण करण्यास तो आपल्याला मदत करू शकतो. (नीति. ४:२३) नीतिसूत्रे ७:६-२३ यामध्ये दिलेल्या दृश्‍याचा विचार करा. त्यात, एक “बुद्धीहीन तरूण पुरुष” कशा प्रकारे एका वेश्‍येच्या जाळ्यात अडकतो याचे वर्णन करण्यात आले आहे. “तिच्या घराच्या कोनाजवळून जाणाऱ्‍या आळीतून” फिरल्यानंतर तो भुलवला जातो. त्याने कदाचित निव्वळ जिज्ञासेपोटी तिच्या घराजवळ जाण्याचे धाडस केले असावे. पण, लवकरच तो हे विसरतो, की आपण ‘जीव घेणाऱ्‍या’ वाईट मार्गाकडे निरवले जात आहोत.

१७ तो तरुण पुरुष हा जीवघेणा मार्ग कसा टाळू शकला असता? “तिच्या वाटांनी जाऊन बहकू नको,” या इशाऱ्‍याचे पालन करण्याद्वारे तो हा मार्ग टाळू शकला असता. (नीति. ७:२५) यातून आपण एक धडा शिकतो: देवाच्या आत्म्याने आपले मार्गदर्शन करावे अशी जर आपली इच्छा असेल, तर आपल्याला चुकीची कृत्ये करण्याचे प्रलोभन होईल अशी परिस्थिती आपण टाळली पाहिजे. एक व्यक्‍ती उगाचच टीव्हीचे चॅनेल्स बदलत असेल किंवा इंटरनेट सर्फिंग करत असेल, तर ती त्या ‘बुद्धीहीन तरुण पुरुषाप्रमाणे’ वाईट मार्गावर जाण्याची शक्यता आहे. असे ती हेतूपूर्वक करत असो अगर नसो, असे करत असताना लैंगिक वासना उत्तेजित करणारी दृश्‍ये तिच्यासमोर झळकण्याची दाट शक्यता आहे. हळूहळू तिला पोर्नोग्राफी (अश्‍लील साहित्य) पाहण्याची घाणेरडी सवय लागू शकते आणि त्यामुळे तिचा विवेक डागाळला जाऊ शकतो व देवासोबतचा तिचा नातेसंबंध धोक्यात येऊ शकतो. ही सवय खरोखरच जीवघेणी ठरू शकते.—रोमकर ८:५-८ वाचा.

१८. एक ख्रिस्ती व्यक्‍ती आपल्या अंतःकरणाचे रक्षण करण्यासाठी कोणती पावले उचलू शकते, आणि यात इंद्रियदमनाची काय भूमिका आहे?

१८ अर्थात, लैंगिक वासना उत्तेजित करणारी दृश्‍ये आपल्यासमोर आल्यास आपण त्वरित पाऊल उचलून इंद्रियदमन करू शकतो; किंबहुना आपण तसे केलेच पाहिजे. पण, त्यापेक्षा अशी परिस्थितीच टाळणे किती बरे! (नीति. २२:३) याबाबतीत काही उपाय योजून त्यांचे कटाक्षाने पालन करण्यासाठी इंद्रियदमन करावे लागते. उदाहरणार्थ, घरात सर्वांना दिसेल अशा ठिकाणी कॉम्प्युटर ठेवल्याने वाईट गोष्टी पाहण्याचा मोह आपण टाळू शकतो. काहींना, इतरांच्या देखत कॉम्प्युटरचा वापर करणे किंवा टीव्ही पाहणे उचित वाटते. तर इतर काहींनी, इंटरनेटचा मुळीच वापर न करण्याचे ठरवले आहे. (मत्तय ५:२७-३० वाचा.) आपले व आपल्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी आपण आवश्‍यक ती पावले उचलू या, जेणेकरून आपल्याला ‘शुद्ध अंतःकरणाने, चांगल्या विवेकभावाने व निष्कपट विश्‍वासाने’ यहोवाची उपासना करणे शक्य होईल.—१ तीम. १:५.

१९. पवित्र आत्म्याला आपले मार्गदर्शन करू देण्याचे काय फायदे आहेत?

१९ पवित्र आत्म्याच्या कार्यामुळे निष्पन्‍न होणाऱ्‍या फळाचे अनेक फायदे आहेत. सौम्यता व सहनशीलता हे गुण मंडळीतील शांतीला हातभार लावतात. ममता व चांगुलपणा यांमुळे कुटुंबातील आनंद वाढीस लागतो. विश्‍वास आणि इंद्रियदमन आपल्याला यहोवाच्या जवळ राहण्यास आणि त्याच्या नजरेत एक शुद्ध भूमिका राखण्यास मदत करतात. शिवाय, गलतीकर ६:८ आपल्याला असे आश्‍वासन देते: “जो आत्म्यासाठी पेरतो त्याला आत्म्यापासून सार्वकालिक जीवन हे पीक मिळेल.” होय, जे पवित्र आत्म्याला आपले मार्गदर्शन करू देतात अशांना यहोवा देव आपल्या आत्म्याचा उपयोग करून ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानाच्या आधारावर अनंत जीवन बहाल करेल.

तुमचे उत्तर काय असेल?

• सौम्यता व सहनशीलता यांमुळे मंडळीतील शांती कशी वाढीस लागते?

• ख्रिश्‍चनांना आपल्या कुटुंबात ममता व चांगुलपणा दाखवण्यास काय मदत करू शकते?

• विश्‍वास व इंद्रियदमन हे गुण एका ख्रिस्ती व्यक्‍तीला आपल्या अंतःकरणाचे रक्षण करण्यास कशी मदत करतात?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२४ पानांवरील चित्र]

मतभेद मिटवताना चर्चेचे रूपांतर भांडणात होऊ नये म्हणून तुम्ही काय करू शकता?

[२५ पानांवरील चित्र]

पवित्र आत्म्याच्या फळाचा अभ्यास केल्याने तुमच्या कुटुंबाला फायदा होऊ शकतो

[२६ पानांवरील चित्र]

विश्‍वास राखण्याद्वारे व इंद्रियदमन करण्याद्वारे आपण कोणते धोके टाळतो?