व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मी अनेक चांगल्या गोष्टी अनुभवल्या आहेत

मी अनेक चांगल्या गोष्टी अनुभवल्या आहेत

मी अनेक चांगल्या गोष्टी अनुभवल्या आहेत

आर्थर बोनो यांच्याद्वारे कथित

सन १९५१ चं ते वर्ष होतं. मी आणि माझी बायको इडित एका प्रांतीय अधिवेशनाला गेलो होतो. अधिवेशनात अशी घोषणा करण्यात आली होती, की ज्यांना मिशनरी सेवा करायची इच्छा आहे अशांसाठी एक सभा आयोजित करण्यात आली आहे.

“चल जाऊ, पाहू काय आहे ते!” मी म्हणालो.

“आर्ट, आपल्याला नाही जमणार ते!” इडित म्हणाली.

“अगं, जाऊन पाहण्यात काय हरकत आहे?”

सभा संपल्यानंतर, गिलियड प्रशालेसाठी अर्ज वाटण्यात आले.

“चल अर्ज भरून टाकू,” असं मी आर्जवी स्वरात म्हणालो.

“पण आर्ट, आपल्या घरच्यांचं काय?” असा प्रश्‍न इडितनं केला.

त्या अधिवेशनाच्या दीडएक वर्षांनंतर, आम्ही गिलियड प्रशालेला उपस्थित राहिलो आणि आम्हाला दक्षिण अमेरिकेतील एक्वाडॉर इथं सेवा करण्यासाठी नियुक्‍त करण्यात आलं.

त्या अधिवेशनात, माझ्या आणि माझ्या बायकोच्या मध्ये जे संभाषण झालं त्यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल, की माझं व्यक्‍तिमत्त्व खूप प्रभावी होतं आणि जे ठरवलं ते करून दाखवण्याची जिद्द माझ्यात होती. इडित मात्र स्वभावानं खूप सौम्य व विनयशील होती. अमेरिकेतील पेन्सिल्वेनिया राज्यातील एलिझाबेथ नावाच्या एका छोट्याशा गावात लहानाची मोठी होत असताना ती कधीच घरापासून दूर गेली नव्हती किंवा दुसऱ्‍या एखाद्या देशातील व्यक्‍तीशीसुद्धा तिचा कधी संपर्क आला नव्हता. त्यामुळे कुटुंबाला सोडून राहणं तिच्यासाठी फार कठीण होतं. असं असलं, तरी परदेशात जाऊन सेवा करण्याची नेमणूक तिनं स्वखुशीनं स्वीकारली. १९५४ साली आम्ही एक्वाडॉरमध्ये आलो आणि तेव्हापासून आजपर्यंत आम्ही याच देशात मिशनरी या नात्यानं सेवा करत आहोत. या सबंध काळादरम्यान आम्ही अनेक चांगल्या गोष्टी अनुभवल्या. त्यांपैकी काही गोष्टींबद्दल जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल का?

चांगल्या आठवणी

आमची पहिली नेमणूक किटो या राजधानी शहरात झाली होती. अँडीज पर्वतांमध्ये वसलेलं हे शहर सुमारे ९,००० फूट उंचावर आहे. ग्वायाकिल या किनारपट्टीवरील शहरापासून किटोला जाण्यासाठी आम्हाला ट्रेननं आणि ट्रकनं दोन दिवस प्रवास करावा लागला. आज, तुम्ही अवघ्या ३० मिनिटांत विमानानं तिथं पोहचू शकता! किटोमध्ये आम्ही चार वर्षं सेवा केली. ते चार वर्षं आम्ही कधीच विसरू शकत नाही. मग, सन १९५८ मध्ये आणखी एक चांगली गोष्ट घडली: आम्हाला विभागीय कार्यात सेवा करण्याचं आमंत्रण मिळालं.

त्या वेळी, संपूर्ण देशात केवळ दोन लहान विभाग होते. त्यामुळे मंडळ्यांना भेटी देण्याव्यतिरिक्‍त वर्षातील अनेक आठवडे, एकही साक्षीदार नसलेल्या स्थानिक लोकांच्या गावांमध्ये आम्ही प्रचार कार्य करत असू. या गावांमधली घरं अतिशय लहान असून त्यांना एकही खिडकी नसायची. आणि त्या खोल्यांमध्ये, बिछान्याशिवाय आणखी काहीच नसायचं. आम्ही आमच्यासोबत एक लाकडी पेटी घेतली होती ज्यात रॉकेलवर चालणारा स्टोव्ह, एक कढई, काही ताटं, एक बादली, काही चादरी, एक मच्छरदाणी, कपडे, जुने वर्तमानपत्र आणि इतर काही वस्तू होत्या. उंदीर आत येऊ नयेत म्हणून भींतीतील बिळं बंद करण्यासाठी आम्ही वर्तमानपत्रांचा उपयोग करायचो, तरीसुद्धा काही वेळा ते आत यायचेच.

त्या खोल्या अतिशय अंधाऱ्‍या, कोंदटलेल्या असल्या, तरी तिथल्या अनेक चांगल्या आठवणी आमच्याजवळ आहेत. दररोज रात्री आम्ही दोघं बिछान्यात बसून गप्पा मारायचो व रॉकेलच्या स्टोव्हवर शिजवलेलं साधं अन्‍न खायचो. मी स्वभावानं उतावीळ असल्यामुळं अनेकदा विचार न करताच बोलायचो. रात्रीच्या त्या निवांत क्षणी, आम्ही भेट देत असलेल्या बांधवांशी मी अधिक विचारपूर्वक कसं बोलू शकतो हे काही वेळा माझी बायको मला समजावून सांगायची. तिचं म्हणणं ऐकल्यामुळे माझ्या भेटी अधिक प्रोत्साहनदायक ठरल्या. तसंच, मी अविचारीपणे इतरांविषयी काही वाईट बोलायचो तेव्हा ती मुळीच माझ्या बोलण्यात सामील व्हायची नाही. त्यामुळे माझ्या बांधवांबद्दल मी सकारात्मक दृष्टिकोन बाळगण्यास शिकलो. रात्रीच्या वेळी आमच्यात होणाऱ्‍या गप्पा या सहसा टेहळणी बुरूज अंकातील लेखांमधून शिकलेल्या मुद्यांविषयी आणि त्या दिवशी क्षेत्र सेवेत आलेल्या अनुभवांविषयी असायच्या. क्षेत्र सेवेत आम्हाला अनेक उत्तेजनात्मक अनुभव आले.

आम्हाला कारलोस कसा भेटला?

पश्‍चिम एक्वाडॉरमधील हिपीहापा या गावात आम्हाला, बायबलविषयी आस्था असलेल्या एका व्यक्‍तीचं फक्‍त नाव सांगण्यात आलं होतं, पण त्याचा पत्ता मात्र दिला नव्हता. कारलोस मेहीआ नावाच्या या व्यक्‍तीला शोधण्यासाठी आम्ही त्या दिवशी सकाळी घरातून निघालो. कुठून सुरुवात करावी तेच समजत नव्हतं, त्यामुळे आम्ही सरळ चालू लागलो. आदल्या रात्री पाऊस पडल्यामुळे, रस्त्यांवर खूप घाण झाली होती आणि आम्हाला चिखलाचे अनेक खड्डे चुकवून चालावं लागत होतं. मी पुढं चालत होतो आणि मागून अचानक “आर्ट” असा ओरडण्याचा आवाज आला. मी मागं वळून पाहिलं तर इडि गुडघ्यांइतक्या चिखलात अडकली होती. ते दृश्‍य इतकं मजेशीर होतं की मी इडिचा रडवेला चेहरा पाहिला नसता तर नक्कीच पोट धरून हसलो असतो.

मी कसंतरी तिला त्या चिखलातून बाहेर काढलं. पण, तिचे बूट मात्र चिखलात रुतून बसले होते. एक मुलगा व मुलगी हा सगळा प्रकार पाहत होते. मी त्यांना म्हणालो, की “तुम्ही जर हे बूट काढून दिले तर मी तुम्हाला पैसे देईन.” एका झटक्यात मुलांनी बूट काढून दिले. पण, आता हातपाय कुठं धुवावेत असा प्रश्‍न इडिला पडला. हे दृश्‍य पाहणाऱ्‍या त्या मुलांच्या आईनं आम्हाला घरात बोलावलं. तिनं माझ्या बायकोचे हातपाय धुण्यास मदत केली आणि मुलांनी चिखलानं माखलेले तिचे बूट धुवून काढले. तिथून निघण्याआधी एक चांगली गोष्ट घडली. मी त्या स्त्रीला कारलोस मेहीआ या मनुष्याचा पत्ता विचारला तेव्हा ती आश्‍चर्यचकित होऊन म्हणाली, की “ते तर माझे पती आहेत.” काही काळातच, त्या कुटुंबासोबत बायबल अभ्यास सुरू झाला आणि शेवटी त्या कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांचा बाप्तिस्मा झाला. अनेक वर्षांनंतर, कारलोस, त्याची बायको व त्यांची दोन मुले खास पायनियर सेवक बनले.

खडतर प्रवास—आनंददायक पाहुणचार

विभागीय कार्यात प्रवास करणं सोपं नव्हतं. आम्ही बसनं, ट्रेननं, ट्रकनं, छोट्या नावांतून आणि लहान विमानांतून प्रवास करायचो. एकदा आमचे प्रांतीय पर्यवेक्षक जॉन मॅक्लेनकन आणि त्यांची बायको डॉरथी आमच्यासोबत कोलंबियाच्या सीमेजवळ असलेल्या कोळी वाड्यांमध्ये प्रचारासाठी आले. आम्ही, झाडाच्या बुंध्याला कोरून तयार केलेल्या एका होडीतून प्रवास करत होते. होडीची मोटार बाहेरच्या भागावर बसवलेली होती. आमच्या होडीइतके मोठे शार्क मासे चक्क आमच्याबाजूनेच पोहत होते! इतके मोठे शार्क पाहून होडी चालवणाऱ्‍या त्या अनुभवी नाविकालाही धक्का बसला आणि त्यानं होडी पटकन किनाऱ्‍याला घेतली.

विभागीय कार्य करत असताना आम्ही ज्या खडतर प्रसंगांना तोंड दिलं त्याचं नक्कीच सार्थक झालं. अनेक प्रेमळ, आतिथ्यशील बंधुभगिनींशी आमची ओळख झाली. अनेकदा आम्ही ज्या बंधुभगिनींच्या घरी राहायचो ते दिवसातून एकदाच जेवायचे, पण आम्हाला मात्र ते तिन्ही वेळ जेवायचा आग्रह करायचे. किंवा मग, त्यांच्या घरात असलेल्या एकमात्र खाटेवर ते आम्हाला झोपायला सांगायचे आणि ते स्वतः जमिनीवर झोपायचे. माझी बायको नेहमी म्हणायची, “जगण्यासाठी खरं किती कमी गोष्टींची गरज असते हे पाहण्यास हे प्रिय बंधुभगिनी मला मदत करतात.”

आम्ही स्वतःला वंचित ठेवू इच्छित नाही”

सन १९६० मध्ये आम्ही आणखी एक चांगली गोष्ट अनुभवली—आम्हाला ग्वायाकिल शाखा कार्यालयात सेवा करण्याचं आमंत्रण मिळालं. शाखा कार्यालयात मी प्रशासकीय काम हाताळायचो, तर इडित जवळच्याच मंडळीत सेवाकार्य करायची. मी आयुष्यात कधीच ऑफिसचं काम केलं नव्हतं, त्यामुळे हे काम करण्यास मी योग्य नाही असं मला वाटत होतं. पण, इब्री लोकांस १३:२१ मध्ये सांगितल्यानुसार, ‘देवाच्या इच्छेप्रमाणे करण्यास तो आपल्याला प्रत्येक चांगल्या कामात सिद्ध करतो.’ दोन वर्षांनंतर, मला न्यूयॉर्कच्या ब्रुकलिन बेथेलमध्ये दहा महिन्यांच्या गिलियड वर्गाला उपस्थित राहण्याचं आमंत्रण मिळालं. त्या वेळी, गिलियड वर्गाला उपस्थित राहणाऱ्‍या बांधवांच्या पत्नी त्यांच्यासोबत जाऊ शकत नव्हत्या; त्यांना मागे राहून आपापल्या नेमणुका पार पाडायच्या होत्या. माझ्या बायकोला ब्रुकलिनवरून एक पत्र आलं. पत्रात म्हटलं होतं, की त्या दहा महिन्यांदरम्यान तिला आपल्या पतीशिवाय राहणं जमेल की नाही याचा तिनं काळजीपूर्वक विचार करून कळवावं.

पत्राचं उत्तर देताना इडितनं लिहिलं: “माझ्यासाठी हे नक्कीच सोपं असणार नाही, पण आमच्यासमोर ज्या काही अडचणी येतील त्यांचा सामना करण्यास यहोवा नक्कीच आमची मदत करेल हे आम्हाला माहीत आहे. . . . आम्हाला जे काही विशेषाधिकार मिळतील किंवा आमच्यावर सोपवलेल्या जबाबदाऱ्‍या पार पाडण्यास अधिक कार्यक्षम बनण्यासाठी जी संधी मिळेल त्यापासून आम्ही स्वतःला वंचित ठेवू इच्छित नाही.” मी ब्रुकलिनमध्ये होतो त्या काळादरम्यान माझी बायको दर आठवडी मला एक पत्र लिहायची.

विश्‍वासू बंधुभगिनींच्या सोबतीनं सेवा करणं

सन १९६६ मध्ये, आरोग्य समस्यांमुळे मला आणि इडितला परत किटोला जावं लागलं. याच ठिकाणी, स्थानिक बंधुभगिनींसोबत कार्य करून आम्ही आमची मिशनरी सेवा सुरू केली होती. सचोटी राखण्याच्या बाबतीत त्या बंधुभगिनींनी किती उत्तम आदर्श मांडला होता!

एका विश्‍वासू बहिणीचा सत्यात नसलेला पती वारंवार तिला मारहाण करायचा. एकदा, सकाळी सहा वाजता कुणीतरी आम्हाला सांगितलं, की त्यानं पुन्हा एकदा तिला खूप मारलं आहे. मी त्या बहिणीच्या घरी धाव घेतली. मी तिला पाहिलं तेव्हा माझा माझ्या डोळ्यांवर विश्‍वासच बसत नव्हता. ती बिछान्यावर पडली होती, तिचं अंग सुजलेलं होतं आणि संपूर्ण अंगावर वळ उठले होते. तिच्या नवऱ्‍यानं, झाडूच्या दांड्याचे दोन तुकडे होईपर्यंत तिला मारलं होतं. त्याच दिवशी नंतर, मला तिचा पती घरी भेटला तेव्हा त्यानं जे केलं ते किती नामर्दपणाचं होतं हे मी त्याला सांगितलं. त्यावर त्यानं मनापासून क्षमा मागितली.

सन १९७० च्या सुरुवातीला मी आजारातून बरा झालो आणि आम्ही आमचं विभागीय कार्य पुन्हा सुरू केलं. ईबारा शहर हे आमच्याच विभागात होतं. सन १९५० च्या अखेरीस आम्ही त्या शहराला भेट दिली तेव्हा तिथं केवळ दोन साक्षीदार होते; एक मिशनरी आणि एक स्थानिक बांधव. त्यामुळे मंडळीत आलेल्या अनेक नवीन लोकांना भेटण्यास आम्ही खूप आतुर होतो.

तिथं आम्ही उपस्थित राहिलेल्या पहिल्या सभेत बंधू रोड्रिगो वाका यांनी व्यासपीठावर उभं राहून श्रोत्यांसोबत चर्चा असलेला एक भाग हाताळला. ते प्रश्‍न विचारायचे तेव्हा श्रोत्यांमधले लोक उत्तर देण्यासाठी हात वर करण्याऐवजी “यो, यो!” (“मी, मी!”) असं म्हणायचे. मी आणि इडित चकित होऊन एकमेकांकडे पाहतच राहिलो. “हा काय प्रकार आहे?” मी विचार केला. नंतर आम्हाला समजलं, की बंधू वाका हे अंध आहेत, तरीसुद्धा ते मंडळीतील बंधुभगिनींचे आवाज अचूक ओळखतात. ते खरोखरच, आपल्या मेंढरांना ओळखणारे मेंढपाळ आहेत! त्यावरून, एकमेकांना चांगल्या प्रकारे ओळखणाऱ्‍या उत्तम मेढपाळाबद्दल व त्याच्या मेंढरांबद्दल येशूने योहान १०:३, ४, १४ मध्ये जे काही म्हटले त्याची आठवण होते. आज ईबारामध्ये सहा स्पॅनिश भाषिक मंडळ्या, एक केचुआ भाषिक मंडळी आणि एक सांकेतिक भाषिक मंडळी आहे. आजवर बंधू वाका एक ख्रिस्ती वडील व खास पायनियर या नात्यानं विश्‍वासूपणे तिथं सेवा करत आहेत. *

यहोवाच्या चांगुलपणाबद्दल आभारी

सन १९७४ मध्ये, आम्हाला आणखी एकदा यहोवाच्या चांगुलपणाचा प्रत्यय आला. त्यावर्षी आम्हाला पुन्हा बेथेलमध्ये सेवा करण्याचं आमंत्रण मिळालं. बेथेलमध्ये मला पुन्हा प्रशासकीय कार्य करण्याची नेमणूक मिळाली आणि नंतर शाखा समितीचा सदस्य म्हणून माझी नेमणूक झाली. इडितनं सुरुवातीला किचनमध्ये काम केलं, नंतर ती ऑफिसमध्ये काम करू लागली. आजपर्यंत ती टपाल हाताळण्याचं काम करते.

गेल्या कित्येक वर्षांदरम्यान आम्हाला, ख्रिस्ती मंडळ्यांच्या आध्यात्मिक वाढीला व आवेशाला हातभार लावणाऱ्‍या शेकडो गिलियड प्रशिक्षित मिशनऱ्‍यांना भेटण्याची सुसंधी लाभली आहे. तसंच, या देशात सेवा करण्यासाठी जगभरातील ३० हून अधिक देशांमधून आलेल्या हजारो बंधुभगिनींना पाहूनही आम्हाला खूप उत्तेजन मिळतं. त्यांचा स्वार्थ-त्यागी आत्मा पाहून आम्ही किती प्रभावित होतो! राज्य प्रचारकांची नितांत गरज असलेल्या क्षेत्रांत सेवा करण्यासाठी काही जण आपली घरेदारे व नोकरी-व्यवसाय सोडून इथं आले आहेत. दूरच्या क्षेत्रांत प्रचार करण्यासाठी त्यांनी वाहनं विकत घेतली, नवनवीन मंडळ्यांची स्थापना केली आणि राज्य सभागृहे बांधण्यास मदत केली. परदेशातून असंख्य अविवाहित बहिणीदेखील पायनियर सेवा करण्यासाठी इथं आल्या आहेत. त्यांच्या आवेशाची आणि कर्तृत्वाची नक्कीच दाद दिली पाहिजे!

खरंच, देवाची सेवा करत असताना मी अनेक चांगल्या गोष्टी अनुभवल्या. त्यांपैकी सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे यहोवासोबतचा माझा नातेसंबंध. तसंच, मला एक “अनुरूप साहाय्यक” दिल्याबद्दलही मी यहोवाचा आभारी आहे. (उत्प. २:१८) पती-पत्नी या नात्यानं आम्ही दोघांनी एकत्र घालवलेल्या ६९ पेक्षा अधिक वर्षांकडे मागं वळून पाहताना मला नीतिसूत्रे १८:२२ (NW) या वचनाची आठवण होते, जे म्हणते: “ज्याला चांगली पत्नी मिळाली आहे, त्याला चांगली गोष्ट मिळाली आहे.” माझ्या पत्नीनं अनेक मार्गांनी मला मदत केली आहे. आम्ही एक्वाडॉरला आलो तेव्हापासून ते १९९० मध्ये तिची आई वयाच्या ९७ व्या वर्षी वारली तोपर्यंत ती दर आठवडी आपल्या आईला पत्र लिहित असे. अशा प्रकारे, तिनं एक प्रेमळ मुलगी असल्याचंही दाखवून दिलं आहे.

आज मी ९० वर्षांचा आणि इडित ८९ वर्षांची आहे. जवळजवळ ७० लोकांना यहोवाविषयीचं सत्य शिकवण्याचा जो आनंद आम्हाला लाभला तो आम्ही मौल्यवान समजतो. ६० वर्षांपूर्वी आम्ही गिलियड प्रशालेसाठी अर्ज भरले याचा आम्हाला नक्कीच खूप आनंद होतो. त्या निर्णयामुळे आम्ही आमच्या जीवनात अनेक चांगल्या गोष्टी अनुभवल्या.

[तळटीप]

^ सावध राहा! नियतकालिकाच्या ८ सप्टेंबर १९८५ च्या (इंग्रजी) अंकात बंधू वाका यांची जीवनकथा आली होती.

[२९ पानांवरील चित्र]

आमच्या गिलियड वर्गातील इतर मिशनऱ्‍यांसोबत न्यूयॉर्कच्या यांकी स्टेडियममध्ये, १९५८ साली

[३१ पानांवरील चित्र]

सन १९५९ मध्ये विभागीय कार्यात एका साक्षीदार कुटुंबाला भेट देताना

[३२ पानांवरील चित्र]

सन २००२ मध्ये एक्वाडॉरच्या शाखा कार्यालयात