व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देव तुम्हाला मार्गदर्शित करत असल्याचा पुरावा तुम्ही पाहता का?

देव तुम्हाला मार्गदर्शित करत असल्याचा पुरावा तुम्ही पाहता का?

देव तुम्हाला मार्गदर्शित करत असल्याचा पुरावा तुम्ही पाहता का?

इस्राएली लोकांनी किंवा इजिप्शियन लोकांनी यापूर्वी कधीच हे पाहिले नव्हते. इस्राएली लोक इजिप्तमधून बाहेर पडले तेव्हा एक मेघस्तंभ त्यांच्याजवळ वर तरंगत असे व दिवसामागून दिवस त्यांच्यासोबत असे. रात्री तो अग्नीचा स्तंभ बनत असे. किती विस्मयकारक! पण हा स्तंभ कोठून आला? त्याचा उद्देश काय होता? आणि इस्राएली लोकांनी या ‘अग्नीच्या व मेघाच्या स्तंभाकडे’ ज्या दृष्टिकोनातून पाहिले त्यापासून आज ३,५०० वर्षांनंतर आपण काय शिकू शकतो?—निर्ग. १४:२४.

या स्तंभाचा मूळ उगम आणि उद्देश काय होता हे देवाचे वचन प्रकट करते. ते असे म्हणते: “त्यांनी रात्रंदिवस चालावे म्हणून परमेश्‍वर दिवसा त्यांना मार्ग दाखविण्यासाठी मेघस्तंभातून आणि रात्री त्यांना उजेड देण्यासाठी अग्निस्तंभातून त्यांच्या पुढे चालत असे.” (निर्ग. १३:२१, २२) यहोवाने आपल्या लोकांना इजिप्तमधून बाहेर आणण्यासाठी व अरण्यात त्यांना मार्ग दाखवण्यासाठी अग्निस्तंभाचा व मेघस्तंभाचा उपयोग केला. स्तंभाच्या मागेमागे जाण्यासाठी त्यांना नेहमी तयार राहण्याची गरज होती. देवाच्या लोकांचा पिच्छा करणारी इजिप्तची सेना त्यांच्यावर हल्ला करणार होती तेव्हा इस्राएली लोकांचे संरक्षण करण्यासाठी तो स्तंभ इजिप्तची सेना आणि इस्राएलची सेना यांच्या मध्ये आला. (निर्ग. १४:१९, २०) या स्तंभाने इस्राएली लोकांना सगळ्यात जवळची वाट दाखवली नसली, तरीसुद्धा केवळ त्याच्या मागेमागे गेल्यानेच इस्राएली लोकांना प्रतिज्ञात देशात प्रवेश मिळणे शक्य होणार होते.

स्तंभाच्या उपस्थितीमुळे देवाच्या लोकांना याची खातरी मिळायची की यहोवा त्यांच्यासोबत आहे. या स्तंभाने यहोवाचे प्रतिनिधित्व केले आणि काही वेळा यहोवा त्याच्यातून बोलला. (गण. १४:१४; स्तो. ९९:७) याशिवाय, राष्ट्राचे नेतृत्व करण्यासाठी यहोवाने मोशेला नेमले आहे हे या मेघस्तंभाने दाखवून दिले. (निर्ग. ३३:९) मोशेनंतर इस्राएल राष्ट्राचे नेतृत्व करण्यासाठी यहोवाने यहोशवाची नेमणूक केली होती हेदेखील त्याने स्तंभाद्वारे दाखवून दिले. मेघस्तंभ दिसल्याचा हा शेवटला नमूद असलेला अहवाल आहे. (अनु. ३१:१४, १५) इजिप्तमधून बाहेर पडून यशस्वी रीत्या प्रतिज्ञात देशात प्रवेश करण्यासाठी इस्राएली लोकांनी देवाच्या मार्गदर्शनाचा पुरावा पाहणे आणि मग त्याचे अनुसरण करणे अत्यंत महत्त्वाचे होते.

पुराव्यांकडे त्यांनी डोळेझाक केली

इस्राएली लोकांनी पहिल्यांदा मेघस्तंभ पाहिला तेव्हा ते नक्कीच चकीत झाले असतील. पण, दुःखाची गोष्ट म्हणजे, सतत डोळ्यांपुढे होणारा हा अद्‌भुत चमत्कार पाहूनसुद्धा इस्राएली लोकांनी यहोवावर कायमस्वरूपी भरवसा ठेवला नाही. कितीतरी वेळा त्यांनी देवाच्या मार्गदर्शनासंबंधी सवाल उपस्थित केला. इजिप्तच्या सेनेने त्यांचा पाठलाग केला, तेव्हा यहोवा आपल्याला वाचवू शकतो यावर त्यांनी भरवसा ठेवला नाही. या उलट, मोशे आपल्याला मरायला घेऊन जात आहे असा आरोप त्यांनी देवाचा सेवक मोशे यावर केला. (निर्ग. १४:१०-१२) तांबडा समुद्र सुखरूप पार केल्यानंतर इस्राएली लोकांनी आपल्याला अन्‍नपाणी मिळत नाही अशी तक्रार करून मोशे, अहरोन आणि यहोवा यांच्याविरुद्ध कुरकूर केली. (निर्ग. १५:२२-२४; १६:१-३; १७:१-३, ७) याच्या काही आठवड्यांनंतर त्यांनी अहरोनावर, सोन्याचे वासरू बनवण्याचा दबाव आणला. जरा कल्पना करा! इस्राएली लोकांनी छावणीच्या एका बाजूला अग्निस्तंभ व मेघस्तंभ पाहिला, म्हणजे ज्याने त्यांना इजिप्त देशातून बाहेर काढले होते त्याचा अद्‌भुत पुरावा पाहिला आणि छावणीपासून थोड्याच दूर, ते एका निर्जीव मूर्तीची उपासना करू लागले व म्हणू लागले: “हे इस्राएला, ज्या देवांनी तुला मिसर देशातून आणिले आहे तेच हे तुझे देव.” किती ‘संताप आणणारी कामे’ होती ही!—निर्ग. ३२:४; नहे. ९:१८.

इस्राएली लोकांनी जी बंडखोर कृत्ये केली ती दाखवून देतात की त्यांनी यहोवाच्या मार्गदर्शनाला उघडउघड तुच्छ लेखले. त्यांची समस्या त्यांच्या शारीरिक दृष्टीसंबंधी नव्हे, तर आध्यात्मिक दृष्टीसंबंधी होती. त्यांनी तो मेघस्तंभ पाहिला पण त्याचा काय अर्थ होता याची त्यांना कदर राहिली नाही. त्यांनी आपल्या कृत्यांद्वारे “इस्राएलाच्या पवित्र प्रभूस चिडविले,” तरीसुद्धा, इस्राएल राष्ट्र प्रतिज्ञात देशात पोहचेपर्यंत यहोवा दयाळूपणे या मेघस्तंभाद्वारे त्यांचे मार्गदर्शन करत राहिला.—स्तो. ७८:४०-४२, ५२-५४; नहे. ९:१९.

आज देव देत असलेल्या मार्गदर्शनाचा पुरावा पाहा

आधुनिक काळातसुद्धा, यहोवा आपल्या लोकांना स्पष्ट मार्गदर्शन पुरवतो. इस्राएली लोकांनी प्रतिज्ञात देशात जाण्याचा मार्ग स्वतः शोधावा अशी यहोवाने त्यांच्याकडून अपेक्षा केली नव्हती. त्याचप्रमाणे आज, प्रतिज्ञा केलेल्या नव्या जगात प्रवेश करण्यासाठी आपण स्वतःहून मार्ग शोधावा असे आपल्याला तो सांगत नाही. येशू ख्रिस्ताला मंडळीचा पुढारी म्हणून नियुक्‍त करण्यात आले आहे. (मत्त. २३:१०; इफिस. ५:२३) त्याने, आत्म्याने अभिषिक्‍त असलेल्या ख्रिश्‍चनांनी मिळून बनलेल्या एका विश्‍वासू दास वर्गाला काही अधिकार दिला आहे. हा दास वर्ग मग ख्रिस्ती मंडळीत पर्यवेक्षकांची नेमणूक करतो.—मत्त. २४:४५-४७; तीत १:५-९.

या विश्‍वासू दास किंवा कारभारी वर्गाला आपण खातरीने कसे ओळखू शकतो? येशू स्वतः त्याचे वर्णन कसे करतो याकडे लक्ष द्या. तो म्हणतो: “आपल्या परिवाराला योग्य वेळी शिधासामुग्री द्यावयास धनी ज्याला नेमील असा विश्‍वासू व विचारशील कारभारी कोण? त्याचा धनी येईल तेव्हा जो दास तसे करताना आढळेल तो धन्य.”—लूक १२:४२, ४३.

यावरून दिसून येते की कारभारी वर्ग “विश्‍वासू” आहे. तो कधीही यहोवाचा, येशूचा, व देवाच्या लोकांचा विश्‍वासघात करत नाही व बायबलमधील सत्यांचा त्याग करत नाही. हा कारभारी वर्ग “विचारशील” आहे, त्याअर्थी ‘राज्याच्या सुवार्तेचा’ प्रचार करण्याच्या व “सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य” बनवण्याच्या सर्वात महत्त्वाच्या कामाचे मार्गदर्शन करताना तो उत्तम निर्णयशक्‍ती प्रदर्शित करतो. (मत्त. २४:१४; २८:१९, २०) कारभारी वर्ग “योग्य वेळी” आज्ञाधारकपणे सकस व पौष्टिक आध्यात्मिक अन्‍न पुरवतो. खऱ्‍या उपासकांच्या वाढीवर असलेला यहोवाचा आशीर्वाद, महत्त्वाचे निर्णय घेताना मिळणारे त्याचे मार्गदर्शन, बायबल सत्यांबद्दल आपल्याला मिळणारी अधिक चांगली समज, शत्रूंच्या हातून नाश होण्यापासून तो करत असलेले आपले संरक्षण, आणि आपल्याला मिळणारी मनाची शांती या सर्वांतून दास वर्गाला यहोवाची मान्यता आहे हे दिसून येते.—यश. ५४:१७. फिलिप्पै. ४:७.

देवाच्या मार्गदर्शनाला प्रतिसाद द्या

देव देत असलेल्या मार्गदर्शनाची आपण कदर करतो हे आपण कसे दाखवू शकतो? प्रेषित पौलाने असे म्हटले: “आपल्या अधिकाऱ्‍यांच्या आज्ञेत राहा व त्यांच्या अधीन असा.” (इब्री १३:१७) असे करणे नेहमीच सोपे नसेल. उदाहरणार्थ, स्वतःला मोशेच्या दिवसांतील एका इस्राएली व्यक्‍तीच्या जागी ठेवा. अशी कल्पना करा, तुम्ही काही वेळ चालल्यानंतर मेघस्तंभ एका ठिकाणी थांबतो. तो किती वेळ या ठिकाणी थांबेल? एक दिवस? एक आठवडा? अनेक महिने? तुम्हाला प्रश्‍न पडतो, ‘बांधलेले सर्व सामान पुन्हा बाहेर काढावे का?’ सुरुवातीला कदाचित तुम्ही फक्‍त गरजेच्या वस्तू बाहेर काढाल. पण काही दिवसांनंतर, तुम्हाला लागणारी प्रत्येक वस्तू बांधलेल्या सामानातून तुम्हाला शोधून काढावी लागते; त्यामुळे अगदी वैतागून बांधलेले सर्व सामान तुम्ही बाहेर काढता. पण तेवढ्यात, मेघस्तंभ वर उठत असल्याचे तुम्हाला दिसते आणि पुन्हा एकदा तुम्हाला सर्व सामान बांधावे लागते! असे करणे नक्कीच इतके सोपे व सोयीचे नसेल. तरीसुद्धा, “जेव्हा जेव्हा त्या तंबूवरून मेघ वर जाई तेव्हा तेव्हा इस्राएल लोक कूच करीत.”—गण. ९:१७-२२.

तर मग, आपल्याला देवाकडून मार्गदर्शन मिळते तेव्हा आपण कशी प्रतिक्रिया दाखवतो? आपण लगेच त्याचे पालन करतो का? की आपण आपल्या जुन्या सवयींप्रमाणेच सर्व गोष्टी करत राहतो? गृह बायबल अभ्यास संचालित करणे, परदेशी भाषा बोलणाऱ्‍या लोकांना प्रचार करणे, नियमितपणे कौटुंबिक उपासनेत सहभाग घेणे, इस्पितळ संपर्क समितीला सहकार्य करणे आणि अधिवेशनांत आपले आचरण योग्य ठेवणे या सगळ्या बाबतींत आपल्याला ज्या नवीन मार्गदर्शक सूचना मिळतात त्यांच्याशी आपण परिचित आहोत का? आपल्याला दिलेला सल्ला आपण स्वीकारतो तेव्हादेखील आपण दाखवून देतो, की देवाकडून मिळणाऱ्‍या मार्गदर्शनाची आपल्याला कदर आहे. आपल्यासमोर महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा आपण स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहत नाही, तर यहोवा व त्याच्या संघटनेद्वारे मिळणाऱ्‍या मार्गदर्शनावर आपण अवलंबून राहतो. एखादे मोठे वादळ येते तेव्हा एक मूल संरक्षणासाठी जसे आपल्या पालकांकडे धाव घेते, तसेच या जगातील समस्यांच्या मोठ्या वादळाचा तडाखा आपल्याला बसतो तेव्हा आपण यहोवाच्या संघटनेत संरक्षण मिळवतो.

अर्थात, देवाच्या संघटनेच्या पृथ्वीवरील भागात पुढाकार घेणारे बांधव परिपूर्ण नाहीत. पण मोशेसुद्धा परिपूर्ण नव्हता. तरीसुद्धा, मोशेला देवाने नियुक्‍त केले होते व त्याला देवाची मान्यता होती या गोष्टीचा मेघस्तंभाने सतत पुरावा दिला. आणखी एक गोष्ट लक्षात घ्या. पुढच्या प्रवासाला केव्हा निघायचे हे ज्याने त्याने ठरवायचे नव्हते. तर, “परमेश्‍वराने मोशेच्या द्वारे त्यांना आज्ञा केली त्याप्रमाणे” इस्राएली लोक वागायचे. (गण. ९:२३) यावरून दिसून येते की देवाच्या मार्गदर्शनाचे माध्यम असलेला मोशे बहुधा पुढील प्रवासाला निघण्याची सूचना लोकांना द्यायचा.

आज, जेव्हा जेव्हा पुढे वाटचाल करण्याची वेळ येते तेव्हा तेव्हा यहोवाचा कारभारी वर्ग आपल्याला स्पष्ट सूचना देतो. कारभारी वर्ग हे कसे करतो? टेहळणी बुरूजआमची राज्य सेवा यांतील लेखांद्वारे, नवीन प्रकाशनांद्वारे आणि संमेलने व अधिवेशने यांत दिल्या जाणाऱ्‍या भाषणांद्वारे. तसेच, प्रवासी पर्यवेक्षकांद्वारे किंवा पत्रांद्वारे किंवा मंडळीत जबाबदाऱ्‍या सांभाळणाऱ्‍या बांधवांना दिल्या जाणाऱ्‍या प्रशिक्षणाद्वारेदेखील मंडळ्यांना मार्गदर्शक सूचना दिल्या जातात.

देवाकडून मिळणाऱ्‍या मार्गदर्शनाचा स्पष्ट पुरावा तुम्ही पाहता का? एका भयंकर ‘अरण्याप्रमाणे’ असलेल्या सैतानाच्या या दुष्ट जगाच्या शेवटल्या दिवसांत वाटचाल करत असताना यहोवा त्याच्या संघटनेद्वारे आपले अर्थात त्याच्या लोकांचे मार्गदर्शन करतो. त्यामुळेच आपण एकता, प्रेम आणि सुरक्षितता अनुभवतो.

इस्राएली लोक प्रतिज्ञात देशात पोहचले तेव्हा यहोशवा म्हणाला: “तुम्ही सर्व जण मनात विचार करा आणि लक्षात घ्या की, आपला देव परमेश्‍वर ह्‍याने तुमच्याबाबतीत हिताच्या ज्या गोष्टी सांगितल्या त्यांतली एकहि निष्फळ झाली नाही; तुमच्याबाबतीत त्या सर्व सिद्धीस गेल्या.” (यहो. २३:१४) त्याचप्रमाणे, आज देवाचे लोक प्रतिज्ञा केलेल्या नव्या जगात जरूर जातील. पण, आपण स्वतः तेथे असू की नाही हे, आपण देवाचे मार्गदर्शन किती नम्रपणे स्वीकारतो यावर जास्त अवलंबून आहे. तेव्हा, आपण सर्व जण देवाकडून मिळणाऱ्‍या मार्गदर्शनाचा पुरावा सतत पाहत राहू या!

[५ पानांवरील चित्रे]

आज आपण देवाच्या संघटनेद्वारे मार्गदर्शित केले जात आहोत

अधिवेशनात नवीन साहित्याचे प्रकाशन

ईश्‍वरशासित प्रशिक्षण

क्षेत्र सेवेच्या सभांमध्ये दिले जाणारे प्रशिक्षण