व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

नंदनवनातील जीवन कंटाळवाणे असेल का?

नंदनवनातील जीवन कंटाळवाणे असेल का?

वाचक विचारतात . . .

नंदनवनातील जीवन कंटाळवाणे असेल का?

▪ पृथ्वीवर नंदनवनात आपण सदासर्वकाळ जिवंत राहू शकतो, अशी आशा बायबलमध्ये दिलेली आहे. (स्तोत्र ३७:२९; लूक २३:४३, मराठी कॉमन लँग्वेज भाषांतर) मग सदासर्वकाळचे हे जीवन कंटाळवाणे असेल का?

हा खरोखरच महत्त्वाचा प्रश्‍न आहे. दीर्घकाळपर्यंत कंटाळा राहिला तर एखादी व्यक्‍ती, चिंतातूर, निराश व स्वतःला धोक्यात घालण्यास प्रवृत्त होण्याची शक्यता आहे, असे संशोधकांना त्यांच्या पाहणीत दिसून आले. ज्या लोकांना त्यांच्या जीवनात कोणताच उद्देश दिसत नाही किंवा दैनंदिन जीवनाला थकून जातात त्यांना सहसा कंटाळा येतो. पण नंदनवनात जे लोक राहतील त्यांचे उद्देशहीन जीवन असेल का? त्यांचे दैनंदिन जीवन रटाळवाणे असेल का?

सर्वात आधी हे लक्षात ठेवा की, सदासर्वकाळ जीवन देण्याची आशा ही, बायबल ज्याने लिहून घेतले त्या यहोवा देवाने दिली आहे. (योहान ३:१६; २ तीमथ्य ३:१६) आणि यहोवा देवाचा प्रमुख गुण प्रेम आहे. (१ योहान ४:८) यहोवाचे आपल्यावर नितांत प्रेम आहे आणि आपण उपभोगू शकतो अशा सर्व गोष्टी त्याने आपल्याला दिल्या आहेत.—याकोब १:१७.

आनंदी होण्याकरता आपल्याजवळ उद्देशपूर्ण काम असले पाहिजे, हे आपल्या निर्माणकर्त्याला माहीत आहे. (स्तोत्र १३९:१४-१६; उपदेशक ३:१२) त्यामुळे नंदनवनात काम करणाऱ्‍या लोकांना, रोबोटसारखे अर्थात यंत्रमानवासारखे वाटणार नाही. ते जे काही काम करतील त्याचा त्यांना स्वतःला आणि त्यांच्या प्रिय जनांना फायदा होईल. (यशया ६५:२२-२४) तुमच्याजवळ समजा एखादे कठीण, पूर्ण वेळेचे परंतु तुमच्या आवडीचे काम असेल तर तुम्हाला जीवन कंटाळवाणे वाटेल का?

तसेच, यहोवा देव नंदनवनात असेच कोणालाही राहू देणार नाही. तर तो फक्‍त अशाच लोकांना सदासर्वकाळचे जीवन देणार आहे जे त्याचा पुत्र येशू याचे अनुकरण करतात. (योहान १७:३) पृथ्वीवर असताना, येशूला यहोवाची इच्छा पूर्ण करण्यास आनंद वाटत होता. येशूने आपल्या बोलण्याद्वारे आणि स्वतःच्या उदाहरणाद्वारे त्याच्या अनुयायांना दाखवून दिले, की घेण्यापेक्षा देण्यात जास्त आनंद मिळतो. (प्रेषितांची कृत्ये २०:३५) यहोवा देव जेव्हा या पृथ्वीचे पुन्हा एकदा नंदनवन बनवेल तेव्हा, सर्व जण, देवावर प्रेम करा आणि शेजाऱ्‍यांवर प्रेम करा या दोन मोठ्या आज्ञा पाळतील. (मत्तय २२:३६-४०) कल्पना करा, तुमच्या आजूबाजूला फक्‍त असेच लोक असतील जे तुमच्यावर प्रेम करतात आणि ज्यांना त्यांचे काम आवडते! अशा लोकांच्या संगतीत असताना तुमचे जीवन कंटाळवाणे होईल का?

नंदनवनात आणखी काय काय असेल? दररोज आपण आपल्या निर्माणकर्त्याबद्दल काहीतरी नवीन शिकू. यहोवाने बनवलेल्या सृष्टीबद्दल संशोधकांनी विलक्षण शोध लावले आहेत. (रोमकर १:२०) पण यहोवाच्या सृष्टीविषयी संशोधकांनी आजवर लावलेले शोध तुटपुंजेच आहेत. यहोवाच्या एका विश्‍वासू मनुष्याने अर्थात ईयोबने हजारो वर्षांपूर्वी सृष्टीबद्दल त्याला जितके माहीत होते त्याची उजळणी करून जो निष्कर्ष काढला तो आजही खरा आहे. तो म्हणतो: ‘देवाच्या करणीची ही नुसती चुणूक आहे. त्याची केवळ चाहूल ऐकू येते. त्याच्या महान कर्तृत्वाची कोणाला कल्पना?’—ईयोब २६:१४, मराठी कॉमन लँग्वेज भाषांतर.

आपण सदासर्वकाळ जगलो तरीसुद्धा आपल्याला, यहोवा देवाबद्दल आणि त्याच्या कार्यांबद्दल कधीही पूर्णपणे माहीत होणार नाही. देवाने आपल्या हृदयात अनंतकाळ जगण्याची इच्छा घातली आहे, असे बायबलमध्ये म्हटले आहे. तरीसुद्धा, ‘देवाचा आदिपासून अंतापर्यंतचा कार्यक्रम मनुष्याला उमगणार नाही,’ असेही बायबलमध्ये म्हटले आहे. (उपदेशक ३:१०, ११) मग निर्माणकर्त्याबद्दल नवनवीन गोष्टी शिकताना कंटाळा येईल, असे तुम्हाला वाटते का?

आतासुद्धा, इतरांचा फायदा होईल अशी कामे करण्यात व देवाचा गौरव होणारी कार्ये करण्यात गुंग असलेल्यांना जीवन कंटाळवाणे वाटत नाही. मग आपण ही खात्री बाळगू शकतो, की अशीच कामे करण्यात आपण जर स्वतःला व्यस्त ठेवले तर आपले जीवन, मग आपण सदासर्वकाळ जिवंत राहिलो तरीसुद्धा कधीही कंटाळवाणे होणार नाही. (w११-E ०५/०१)

[२२ पानावरील चित्राचे श्रेय]

पृथ्वी: Image Science and Analysis Laboratory, NASA-Johnson Space Center; आकाशगंगा: The Hubble Heritage Team (AURA/STScl/NASA)