व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

भग्नहृदयी लोकांना सांत्वन

भग्नहृदयी लोकांना सांत्वन

देवाच्या जवळ या

भग्नहृदयी लोकांना सांत्वन

‘यहोवा माझ्यावर कधीच प्रेम करू शकत नाही.’ आयुष्याच्या अर्धाधिक काळापासून नैराश्‍याशी झुंज देत असलेल्या एका ख्रिस्ती स्त्रीने असे म्हटले. तिने स्वतःची अशी समजूत घातली होती, की यहोवा तिच्यापासून दूर आहे. पण यहोवाचे जे उपासक निराश झाले आहेत त्यांच्यापासून तो खरेच दूर आहे का? या प्रश्‍नाचे सांत्वनदायक उत्तर आपल्याला, स्तोत्र ३४:१८ मध्ये, स्तोत्रकर्ता दावीद याने यहोवाच्या प्रेरणेने लिहिलेल्या स्तोत्रात वाचायला मिळते.

यहोवाचा एखादा विश्‍वासू उपासक जेव्हा पार खचून जातो तेव्हा त्याची मानसिक अवस्था काय होते, हे दाविदाला चांगल्या प्रकारे ठाऊक होते. दावीद तरुण होता तेव्हा शौल त्याला ठार मारण्याकरता त्याच्या मागे हात धुवून लागला होता; त्यामुळे आपला जीव वाचवण्यासाठी दाविदाला अनेकदा पळ काढावा लागला होता. असेच एकदा पळता पळता तो गाथ या पलिष्ट्यांच्या क्षेत्रात आला. हे तर शत्रूंचे शहर होते. पण इथे शौल आपल्याला पकडू शकणार नाही, असे दाविदाला वाटत होते. पण मग जेव्हा गाथच्या लोकांनी दाविदाला ओळखले तेव्हा त्याने वेडा असल्याचे नाटक केले आणि तेथूनही तो मरता मरता वाचला. देवानेच आपल्याला असे वागण्याची बुद्धी दिली म्हणून त्याने त्याचे आभार मानले आणि या अनुभवावर स्तोत्र ३४ चे लिखाण केले.

संकटात असताना, आपण एकटे आहोत किंवा देवाला आपली मुळीच काळजी नाही, असा विचार दाविदाच्या मनात आला का? तो लिहितो: “परमेश्‍वर भग्नहृदयी लोकांच्या सन्‍निध असतो; अनुतप्त मनाच्या लोकांचा तो उद्धार करितो.” (वचन ३४) दाविदाच्या या शब्दांतून आपल्याला सांत्वन आणि आशा कशी मिळू शकते ते आपण पाहू या.

यहोवा ‘परमेश्‍वर सन्‍निध असतो.’ हा वाक्यांश, “आपल्या लोकांना मदत करण्यासाठी व वाचवण्यासाठी प्रभू नेहमी सतर्क आणि सावध असतो,” याचे स्पष्ट वर्णन करतो, असे एका संदर्भ ग्रंथात म्हटले आहे. यहोवाचे आपल्या लोकांवर लक्ष आहे ही गोष्ट किती दिलासा देणारी आहे. या ‘शेवटल्या काळात’ त्यांना कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे व त्यामुळे त्यांच्या मनात कोणकोणत्या भावना येतात हे तो पाहतोय.—२ तीमथ्य ३:१; प्रेषितांची कृत्ये १७:२७.

‘भग्नहृदयी लोक.’ काही संस्कृतींमध्ये, एकतर्फी प्रेमामुळे येणाऱ्‍या निराशेचे वर्णन करण्याकरता, हृदय तुटणे हा शब्द वापरला जातो. पण स्तोत्रकर्त्याने वापरलेला “भग्नहृदयी” या शब्दाचा अर्थ मनातील इच्छा पूर्ण न होणे, या अर्थाने वापरलेला नाही. त्याने वापरलेल्या शब्दाचा अर्थ, “नेहमीचे दुःख व निराशा” याला सूचित करतो. तर, देवाच्या विश्‍वासू उपासकांनादेखील कधी न कधी तरी अशा संकटांचा सामना करावा लागतो ज्यामुळे त्यांचे हृदय तुटू शकते.

‘अनुतप्त मनाचे.’ निराश झालेले लोक, स्वतःच्याच नजरेतून इतके उतरतात की त्यांना पुढे कसलीच आशा दिसत नाही. बायबल भाषांतरकारांसाठी असलेल्या एका पुस्तकात म्हटले आहे, की या वाक्यांशाचे भाषांतर, “ज्यांच्याकडे भवितव्यात काहीही पाहण्यासारखे नाही,” असे करता येऊ शकेल.

‘भग्नहृदयी लोकांशी’ व ‘अनुतप्त मनाच्या लोकांशी’ यहोवा कसा वागतो? ते त्याचे प्रेम व काळजी मिळण्याच्या पात्रतेचे नाहीत असे समजून तो त्यांच्यापासून दूर राहतो का? मुळीच नाही. उलट अशा लोकांच्या तो अधिक समीप येतो. एका आजारी मुलाला जशी त्याची आई मांडीवर घेऊन त्याला प्रेमाने कुरवाळत असते तसेच मदतीसाठी यहोवाला विनंती करणाऱ्‍या त्याच्या उपासकांच्या तो जवळ असतो. त्यांच्या भग्न अर्थात निराश झालेल्या हृदयावर व अनुतप्त अर्थात दुःखी मनावर फुंकर घालण्यास तो उत्सुक असतो. त्यांच्यावर येणाऱ्‍या कोणत्याही परीक्षेचा सामना करण्यासाठी तो त्यांना बुद्धी व शक्‍ती देण्यास तयार असतो.—२ करिंथकर ४:७; याकोब १:५.

तेव्हा, अशा प्रेमळ देवाजवळ येण्यासाठी तुम्ही काय करू शकता, हे माहीत करून घ्या. हा दयाळू देव असे वचन देतो: “ज्याचे चित्त अनुतापयुक्‍त व नम्र आहे त्याच्या ठायीहि मी वसतो; येणेकरून नम्र जनांच्या आत्म्याचे मी संजीवन करितो व अनुतापी जनांचे हृदय उत्तेजित करितो.”—यशया ५७:१५. (w११-E ०६/०१)