व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

‘तुम्हामध्ये जे श्रम करतात त्यांचा सन्मान करा’

‘तुम्हामध्ये जे श्रम करतात त्यांचा सन्मान करा’

‘तुम्हामध्ये जे श्रम करतात त्यांचा सन्मान करा’

“तुम्हामध्ये जे श्रम करितात, प्रभूमध्ये तुम्हावर असतात [“अध्यक्षता करतात,” NW] व तुम्हास बोध करितात त्यांचा तुम्ही सन्मान करावा.”—१ थेस्सलनी. ५:१२.

१, २. (क) पौलाने थेस्सलनीका मंडळीला आपले पहिले पत्र लिहिले तेव्हा त्या मंडळीची स्थिती कशी होती? (ख) पौलाने थेस्सलनीकाकरांना काय करण्याचे उत्तेजन दिले?

 अशी कल्पना करा, की पहिल्या शतकात युरोपमध्ये स्थापिलेल्या सगळ्यात पहिल्या मंडळ्यांपैकी एक असलेल्या थेस्सलनीका मंडळीचे तुम्ही सदस्य आहात. या मंडळीतील बांधवांचा विश्‍वास दृढ करण्यासाठी प्रेषित पौलाने भरपूर वेळ खर्च केला होता. त्याने इतर मंडळ्यांप्रमाणेच, या मंडळीतसुद्धा नेतृत्व करण्यासाठी बांधवांना नियुक्‍त केले असावे. (प्रे. कृत्ये १४:२३) पण, मंडळीची स्थापना झाल्यानंतर पौल व सीला यांना शहराबाहेर घालवून देण्यासाठी तेथील यहुद्यांनी घोळका जमवला. त्यामुळे, त्या मंडळीतील ख्रिश्‍चनांना वाऱ्‍यावर सोडून दिल्यासारखे वाटले असावे; त्यांना कदाचित भीतीही वाटली असावी.

म्हणूनच, थेस्सलनीका शहर सोडल्यानंतर, नव्यानेच स्थापन झालेल्या या मंडळीची पौलाला इतकी काळजी का वाटत होती हे आपण समजू शकतो. त्याने पुन्हा त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण ‘सैतानाने त्यास अडवले.’ त्यामुळे, त्या मंडळीला उत्तेजन देण्यासाठी त्याने तीमथ्याला तेथे पाठवले. (१ थेस्सलनी. २:१८; ३:२) तीमथ्याने त्या मंडळीबद्दल चांगले वृत्त आणले तेव्हा पौल थेस्सलनीकाकरांस पत्र लिहिण्यास प्रवृत्त झाला. पत्रात पौलाने त्यांना इतर गोष्टींसोबतच ‘त्यांच्यावर अध्यक्षता करणाऱ्‍यांचा सन्मान करण्याचेही’ उत्तेजन दिले.१ थेस्सलनीकाकर ५:१२, १३ वाचा.

३. थेस्सलनीका मंडळीतील ख्रिश्‍चनांनी आपल्या वडिलांना अत्यंत मान का द्यायचा होता?

थेस्सलनीका मंडळीचे नेतृत्व करणारे बांधव पौलाइतके व त्याच्या प्रवासी सोबत्यांइतके अनुभवी नव्हते; किंवा त्यांच्याजवळ जेरूसलेममधील वडिलांसारखा समृद्ध आध्यात्मिक वारसाही नव्हता. कारण, या मंडळीची स्थापना होऊन एक वर्षसुद्धा झाले नव्हते! तरीसुद्धा, मंडळीतील सदस्यांनी त्यांच्यामध्ये ‘श्रम करणाऱ्‍या,’ ‘त्यांच्यावर अध्यक्षता करणाऱ्‍या’ व बांधवांना ‘बोध करणाऱ्‍या’ वडिलांबद्दल कृतज्ञ असणे योग्यच होते. होय, त्यांनी ‘[वडिलांना] प्रीतीने अत्यंत मान देणे’ उचित होते. वडिलांना मान देण्याची विनंती केल्यानंतर, पौलाने त्यांना असा सल्ला दिला: “तुम्ही आपसात शांतीने राहा.” (१ थेस्सलनी. ५:१२, १३) तुम्ही जर थेस्सलनीका मंडळीचे सदस्य असता, तर तेथील वडील मंडळीसाठी करत असलेल्या मेहनतीबद्दल तुम्ही मनस्वी कृतज्ञता व्यक्‍त केली असती का? देवाने ख्रिस्ताच्या द्वारे तुमच्या मंडळीला ज्या “मानवरूपी देणग्या” दिल्या आहेत त्यांच्याकडे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहता?—इफिस. ४:८, NW.

“श्रम करितात”

४, ५. पौलाच्या दिवसांतील वडिलांना मंडळीला शिक्षण देण्यासाठी श्रम का घ्यावे लागले, आणि आजसुद्धा ख्रिस्ती वडिलांना श्रम का घ्यावे लागतात?

पौल व सीला यांना बिरुयास पाठवल्यानंतर, थेस्सलनीका मंडळीचे वडील कोणत्या अर्थी ‘श्रम करत’ होते? पौलाप्रमाणे त्यांनी शास्त्रवचनांचा उपयोग करून मंडळीला शिकवले असेल यात शंका नाही. तुम्हाला कदाचित प्रश्‍न पडेल, ‘थेस्सलनीका मंडळीतील ख्रिश्‍चनांना देवाच्या वचनाबद्दल गुणग्राहकता होती का?’ कारण, बायबल असे म्हणते, की बिरुयातील लोक “थेस्सलनीकांतल्या लोकांपेक्षा मोठ्या मनाचे होते; . . . ते शास्त्रात दररोज शोध करीत गेले.” (प्रे. कृत्ये १७:११) पण, पौलाने ही तुलना, थेस्सलनीकातील ख्रिश्‍चनांसोबत नव्हे, तर तेथील सर्वसामान्य यहुदी लोकांसोबत केली होती. जे ख्रिस्ती बनले त्यांनी “देवाचे वचन स्वीकारले ते माणसांचे म्हणून नव्हे तर देवाचे म्हणून स्वीकारले.” (१ थेस्सलनी. २:१३) अशांच्या आध्यात्मिक गरजा तृप्त करण्यासाठी त्या मंडळीतील वडिलांनी खूप श्रम घेतले असावेत.

आज विश्‍वासू व बुद्धिमान दास वर्ग देवाच्या कळपाला “यथाकाळी” अन्‍न पुरवत आहे. (मत्त. २४:४५) दास वर्गाच्या निर्देशनाखाली, स्थानिक मंडळीतील वडील आपल्या बांधवांचे आध्यात्मिक रीत्या भरणपोषण करण्यासाठी खूप श्रम घेतात. मंडळीतील सदस्यांकडे बायबलवर आधारित मुबलक साहित्य असेल, आणि काही भाषांमध्ये वॉच टावर पब्लिकेशन्स इंडेक्स व सीडी-रॉमवर वॉचटावर लायब्ररी यांसारखी साधने असतील. मंडळीच्या आध्यात्मिक गरजा तृप्त करण्यासाठी ख्रिस्ती वडील, सभांमध्ये नेमून दिलेल्या आपल्या भागांची तयारी करण्यासाठी कितीतरी वेळ खर्च करतात, जेणेकरून त्यांना ही माहिती अर्थपूर्ण रीत्या सादर करता येईल. सभा, संमेलने व अधिवेशने यांत वडिलांना नेमून दिलेल्या भागांची तयारी करण्यासाठी ते किती वेळ खर्च करतात याचा कधी तुम्ही विचार केला आहे का?

६, ७. (क) पौलाने थेस्सलनीका मंडळीतील वडिलांसमोर कोणते उदाहरण मांडले होते? (ख) आज ख्रिस्ती वडिलांना पौलाच्या उदाहरणाचे अनुकरण करणे आव्हानात्मक का वाटू शकते?

कळपाचे पालन करण्याच्या बाबतीत पौलाने घालून दिलेले उत्तम उदाहरण थेस्सलनीका मंडळीतील वडिलांच्या लक्षात होते. पौलाने हे काम केवळ करावे लागते म्हणून किंवा यांत्रिकपणे केले नाही. तर आधीच्या लेखात चर्चा केल्यानुसार, ‘आपल्या मुलाला दूध पाजणाऱ्‍या व काळजी घेणाऱ्‍या आईप्रमाणे’ पौल “सौम्य” होता. (१ थेस्सलनीकाकर २:७, ८ वाचा. *) कळपासाठी तो “स्वतःचे जीवनसुद्धा देण्यास” तयार होता! कळपाचे पालन करताना, वडिलांनी पौलासारखे असायला हवे होते.

आज ख्रिस्ती मेंढपाळ, प्रेमळपणे आपल्या कळपाची काळजी घेतात व असे करण्याद्वारे ते पौलाचे अनुकरण करतात. काही मेंढरे स्वभावाने फारशी प्रेमळ किंवा मैत्रीपूर्ण नसली, तरी वडील समजबुद्धी दाखवून त्यांच्यातील चांगले गुण पाहण्याचा प्रयत्न करतात. हे खरे आहे, की अपरिपूर्ण असल्यामुळे प्रत्येक व्यक्‍तीकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्यासाठी एखाद्या वडिलाला कदाचित खूप प्रयत्न करावे लागतील. असे असले, तरी वडील सर्वांशी सौम्यतेने वागण्याचा होईल तितका प्रयत्न करतात, तेव्हा ख्रिस्ताच्या हाताखाली चांगले मेंढपाळ बनण्यासाठी ते करत असलेल्या प्रयत्नांबद्दल आपण त्यांची प्रशंसा करू नये का?

८, ९. आज कोणत्या काही मार्गांनी ख्रिस्ती वडील ‘आपल्या जिवांची राखण करतात?’

आपण सर्वांनी ख्रिस्ती वडिलांच्या ‘अधीन असले’ पाहिजे. पौलाने लिहिले त्याप्रमाणे, ‘ते आपल्या जिवांची राखण करतात.’ (इब्री १३:१७) हा वाक्यांश आपल्याला खरोखरच्या मेंढपाळाची आठवण करून देतो, जो आपल्या कळपाचे रक्षण करण्यासाठी जागरण करतो. त्याचप्रमाणे आज ख्रिस्ती वडिलांनादेखील, आजारी असलेल्या किंवा भावनिक अथवा आध्यात्मिक समस्या असलेल्या बंधुभगिनींना मदत करण्यासाठी आपल्या झोपेचा त्याग करावा लागू शकतो. उदाहरणार्थ, एकाएकी उद्‌भवणारी वैद्यकीय परिस्थिती हाताळण्यासाठी, इस्पितळ संपर्क समितीवर काम करणाऱ्‍या बांधवांना रात्री-अपरात्री झोपेतून उठावे लागले आहे. आपल्यावर अशी परिस्थिती ओढवते तेव्हा आपल्या मदतीला धावून येणाऱ्‍या या वडिलांबद्दल आपल्याला खरोखर किती कृतज्ञता वाटते!

प्रादेशिक बांधकाम समितीवर आणि मदतकार्य समितीवर कार्य करणारे वडील आपल्या बांधवांची मदत करण्यासाठी जिवापाड परिश्रम करतात. ते नक्कीच, आपल्या मनःपूर्वक सहयोगास पात्र आहेत! २००८ मध्ये म्यानमार देशाला नर्गिस वादळाचा तडाखा बसल्यानंतर तेथे केलेल्या मदतकार्याचा विचार करा. वादळाचा सर्वाधिक तडाखा इरावदी नदीच्या मुखप्रदेशाला बसला होता. तेथील बोथिंगोन गावातील एका मंडळीपर्यंत पोहचण्यासाठी मदतकार्य करणाऱ्‍या गटाने, उद्‌ध्वस्त झालेल्या प्रदेशातून व सर्वत्र पसरलेल्या मृतदेहांच्या मधून वाट काढत प्रवास केला. बोथिंगोनला पोहचणाऱ्‍या पहिल्या मदतकार्य गटात आपल्या पूर्वीच्या विभागीय पर्यवेक्षकांना पाहून स्थानिक बांधवांना इतका आनंद झाला की ते ओरडून म्हणाले: “पाहा! आपले विभागीय पर्यवेक्षकसुद्धा आले आहेत! यहोवानं खरंच आपल्याला वाचवलंय!” ख्रिस्ती वडील दिवसरात्र जे परिश्रम करतात त्याची तुम्ही कदर करता का? काही वडिलांना गंभीर न्यायिक समस्या हाताळण्यासाठी खास समित्यांवर सेवा करण्यास नियुक्‍त केले जाते. या वडिलांनी जे काही साध्य केले त्याची ते फुशारकी मारत नाहीत; पण, ज्यांना त्यांच्या सेवेचा लाभ होतो त्यांना या वडिलांबद्दल खरोखर कृतज्ञता वाटते.—मत्त. ६:२-४.

१०. मंडळीतील वडील अशी कोणती कामे करतात जी सहसा इतरांना माहीत नसतात?

१० अनेक वडिलांना कागदपत्रांचेही काम करावे लागते. उदाहरणार्थ वडील वर्गाचे संयोजक, साप्ताहिक सभांचा आराखडा तयार करतात. मंडळीचे सचिव, क्षेत्र सेवेचा मासिक व वार्षिक अहवाल तयार करतात. प्रशाला पर्यवेक्षक, विचारपूर्वक प्रशालेचा आराखडा तयार करतात. दर तीन महिन्यांनंतर, मंडळीच्या जमाखर्च अहवालांची तपासणी केली जाते. मंडळीचे वडील, शाखा कार्यालयाकडून येणारी पत्रे वाचतात आणि त्यात दिलेल्या सूचनांचे पालन करतात, जेणेकरून विश्‍वासाच्या बाबतीत एकता राखण्यास मंडळीला मदत मिळते. (इफिस. ४:३, १३) अशा परिश्रमी वडिलांच्या प्रयत्नांमुळे मंडळीत ‘सर्व काही शिस्तवार व व्यवस्थितपणे होते.’—१ करिंथ. १४:४०.

“तुम्हावर अध्यक्षता करतात”

११, १२. मंडळीवर कोण अध्यक्षता करतात आणि असे करण्यात काय गोवलेले आहे?

११ पौलाने थेस्सलनीका मंडळीतील परिश्रमी वडिलांचे वर्णन, मंडळीवर जे “अध्यक्षता करतात” असे केले. मूळ ग्रीक भाषेत, ‘अध्यक्षता करणे’ या शब्दांचा अर्थ “समोर उभे राहणे,” असा असून त्याचे भाषांतर “निर्देशन करणे; नेतृत्व करणे” असे केले जाऊ शकते. (१ थेस्सलनी. ५:१२) पौलाने याच वडिलांबद्दल म्हटले की ते “श्रम करितात.” तो केवळ एका ‘अध्यक्षीय पर्यवेक्षकाबद्दल’ नव्हे, तर मंडळीतील सर्व वडिलांविषयी बोलत होता. आज बहुतेक सर्व वडील मंडळीसमोर उभे राहून सभा संचालित करतात. म्हणूनच, अलीकडे एक फेरबदल करण्यात आला होता. त्यानुसार, मंडळीतील “अध्यक्षीय पर्यवेक्षक” यांना आता “वडील वर्गाचे संयोजक” असे म्हटले जावे असे सांगण्यात आले होते. यावरून, मंडळीतील सर्व वडील एकाच संयुक्‍त वर्गाचे सदस्य आहेत या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे पाहण्यास आपल्याला मदत मिळते.

१२ मंडळीवर ‘अध्यक्षता करणे’ यात केवळ शिक्षण देणे इतकेच नव्हे, तर बरेच काही गोवलेले आहे. याच अर्थाचा शब्द, मूळ भाषेत १ तीमथ्य ३:४ मध्ये वापरण्यात आला आहे. तेथे पौलाने म्हटले, की पर्यवेक्षकाचे काम करणारा बांधव, “आपल्या घरची व्यवस्था चांगली ठेवणारा, आपल्या मुलाबाळांना भीडमर्यादेचे वळण लावून त्यांना स्वाधीन ठेवणारा असा असावा.” या ठिकाणी, ‘व्यवस्था ठेवणे’ असे जे म्हटले आहे त्यात केवळ आपल्या मुलाबाळांना शिक्षण देणे इतकेच नव्हे, तर कुटुंबाचे नेतृत्व करणे आणि आपल्या मुलांना ‘स्वाधीन ठेवणे’ हेदेखील गोवलेले आहे. होय, ख्रिस्ती वडील मंडळीचे नेतृत्व करतात आणि असे करण्याद्वारे ते सर्वांना यहोवाच्या अधीन राहण्यास मदत करतात.—१ तीम. ३:५.

१३. वडिलांच्या सभेमध्ये एखादा निर्णय घेण्यासाठी वेळ का लागू शकतो?

१३ कळपावर चांगल्या प्रकारे अध्यक्षता करता यावी म्हणून, ख्रिस्ती वडील मंडळीच्या गरजांची आणि मंडळीला कशा प्रकारे मदत करता येईल याची आपसात चर्चा करतात. एकाच वडिलाने सर्व निर्णय घेणे कदाचित अधिक परिणामकारक असू शकते. पण, पहिल्या शतकातील नियमन मंडळाच्या उदाहरणाचे अनुकरण करून आधुनिक काळातील वडील वर्ग, ख्रिस्ती मंडळीशी संबंधित बाबींची मनमोकळेपणे चर्चा करतात आणि शास्त्रवचनांचे मार्गदर्शन घेतात. स्थानिक मंडळीच्या गरजा भागवण्यासाठी शास्त्रवचनातील तत्त्वे लागू करणे हे त्यांचे ध्येय असते. हे अधिक परिणामकारक रीत्या करता यावे म्हणून मंडळीतील प्रत्येक वडील, शास्त्रवचने आणि विश्‍वासू व बुद्धिमान दास वर्गाने पुरवलेल्या मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन वडिलांच्या सभांसाठी तयारी करतात. अर्थात, त्यासाठी वेळ द्यावा लागतो. पहिल्या शतकातील नियमन मंडळातील वडिलांमध्ये सुंतेविषयी चर्चा करताना मतभेद झाला तसा मतभेद आज वडिलांमध्ये होतो तेव्हा शास्त्रवचनांच्या आधारे एका मतावर पोहचण्यासाठी अधिक वेळ देण्याची व संशोधन करण्याची गरज असेल.—प्रे. कृत्ये १५:२, ६, ७, १२-१४, २८.

१४. मंडळीतील सर्व वडील एक संयुक्‍त वर्ग या नात्याने कार्य करतात याची तुम्हाला कदर वाटते का? तुम्हाला असे का वाटते?

१४ एखादे वडील आपल्याच मतावर अडून राहिले किंवा त्यांनी स्वतःचेच विचार पुढे आणण्याचा प्रयत्न केला तर काय होऊ शकते? किंवा पहिल्या शतकातील ‘दियत्रफेसाप्रमाणे’ कोणी मंडळीत कलह निर्माण केला तर काय? (३ योहा. ९, १०) त्यामुळे नक्कीच संपूर्ण मंडळीला त्रास होऊ शकतो. सैतानाने पहिल्या शतकातील मंडळीत खळबळ माजवण्याचा प्रयत्न केला होता, त्याअर्थी तो आजही मंडळीची शांती भंग करू इच्छितो असे आपण खातरीने म्हणू शकतो. तो स्वार्थी मानवी प्रवृत्तींना खतपाणी घालण्याचा प्रयत्न करू शकतो, जसे की तो वडिलांमध्ये सत्ता-प्रतिष्ठेची इच्छा उत्पन्‍न करू शकतो. तेव्हा, वडिलांनी नम्रता विकसित केली पाहिजे आणि एक संयुक्‍त वर्ग या नात्याने कार्य केले पाहिजे. एक वर्ग या नात्याने एकमेकांना सहकार्य करणाऱ्‍या नम्र वडिलांची आपण खरोखर खूप कदर करतो.

“तुम्हास बोध करितात”

१५. एखाद्या बंधू किंवा भगिनीला बोध करण्यामागे वडिलांचा हेतू काय असतो?

१५ पौलाने नंतर, वडिलांच्या एका कठीण, परंतु महत्त्वाच्या कार्यावर भर दिला. ते म्हणजे, कळपाला बोध करणे. ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांत, केवळ पौलाने “बोध” असे भाषांतर केलेल्या ग्रीक शब्दाचा उपयोग केला. हा शब्द, सडेतोड सल्ल्याला सूचित करू शकत असला, तरी त्यातून वैरभाव सूचित होत नाही. (प्रे. कृत्ये २०:३१; २ थेस्सलनी. ३:१५) उदाहरणार्थ, पौलाने करिंथकरांना असे लिहिले: “तुम्हाला लाजविण्यासाठी मी हे लिहीत नाही, तर माझ्या प्रिय मुलांप्रमाणे तुम्हास बोध करण्यासाठी लिहितो.” (१ करिंथ. ४:१४) त्याला त्यांच्याविषयी प्रेमळ कळकळ वाटत असल्यामुळे त्याने त्यांना बोध केला.

१६. इतरांना बोध करताना ख्रिस्ती वडील कोणती गोष्ट लक्षात ठेवतात?

१६ ख्रिस्ती वडील इतरांना कशा प्रकारे बोध करतात ही बाब अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे ते त्याकडे लक्ष देतात. बोध करताना ते पौलाप्रमाणे दयाळू, प्रेमळ व मदतशील असण्याचा प्रयत्न करतात. (१ थेस्सलनीकाकर २:११, १२ वाचा.) अर्थात, ख्रिस्ती वडील ‘विश्‍वसनीय वचनाला धरून राहतात जेणेकरून सुशिक्षणाने बोध करावयास ते समर्थ असतील.’—तीत १:५-९.

१७, १८. एखादे वडील तुम्हाला बोध करत असतील, तर तुम्ही काय लक्षात ठेवले पाहिजे?

१७ अर्थात, ख्रिस्ती वडील अपरिपूर्ण आहेत आणि त्यामुळे ते असे काही बोलून जाण्याची शक्यता आहे ज्याचा नंतर त्यांना पस्तावा होतो. (१ राजे ८:४६; याको. ३:८) तसेच, वडिलांना माहीत असते, की सल्ला स्वीकारणे हे आपल्या आध्यात्मिक बंधुभगिनींना ‘आनंदाचे नव्हे, उलट खेदाचे वाटते.’ (इब्री १२:११) म्हणूनच, एखाद्या व्यक्‍तीला बोध करण्याआधी वडील सहसा त्या गोष्टीविषयी बराच विचार व प्रार्थना करतात. तेव्हा, तुम्हाला जर एखाद्या वडिलांनी बोध केला असेल, तर त्यांच्या प्रेमळ काळजीची तुम्ही कदर करता का?

१८ असे समजा की तुम्हाला एखादी आरोग्य समस्या आहे. पण ती समस्या नेमकी काय आहे हे तुम्ही सांगू शकत नाही. म्हणून तुम्ही डॉक्टरकडे जाता आणि डॉक्टर तुमच्या आजाराचे अचूक निदान करतो. पण, त्याने जे निदान केले ते स्वीकारणे तुम्हाला फार कठीण वाटते. तुम्ही त्या डॉक्टरविषयी मनात राग बाळगाल का? नाही! त्याने जरी तुम्हाला शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला, तरी तुम्ही तयार व्हाल; कारण त्यामुळे आपल्यालाच फायदा होणार आहे असा तुम्ही विश्‍वास बाळगता. डॉक्टरांनी ज्या प्रकारे तुम्हाला ती माहिती सांगितली त्याचा कदाचित तुमच्या भावनांवर परिणाम होऊ शकतो, पण त्याचा तुम्ही तुमच्या निर्णयावर परिणाम होऊ देता का? कदाचित नाही. त्याचप्रमाणे, ज्या प्रकारे तुम्हाला बोध केला जातो त्याचा तुमच्यावर परिणाम होऊ देऊ नका; तर तुम्ही सत्यात प्रगती कशी करू शकता व यहोवासोबतचा आपला नातेसंबंध कसा टिकवून ठेवू शकता याबद्दल तुम्हाला सल्ला देण्यासाठी यहोवा व येशू ज्यांचा उपयोग करतात त्यांचे आवर्जून ऐका.

यहोवाने केलेल्या वडिलांच्या तरतुदीची कदर करा

१९, २०. ‘मानवरूपी देणग्यांबद्दल’ तुम्ही आपली कदर कशी दाखवू शकता?

१९ खास तुमच्यासाठी बनवलेली भेटवस्तू कोणी तुम्हाला दिली तर तुम्ही काय कराल? त्या वस्तूचा उपयोग करून तुम्ही त्याबद्दल आपली कदर व्यक्‍त करणार नाही का? यहोवाने येशू ख्रिस्तामार्फत तुमच्यासाठी “मानवरूपी देणग्या” दिल्या आहेत. या देणग्यांबद्दल कदर दाखवण्याचा एक मार्ग म्हणजे, ख्रिस्ती वडील देत असलेली भाषणे लक्षपूर्वक ऐकणे आणि त्यांनी सांगितलेले मुद्दे लागू करण्याचा प्रयत्न करणे. सभांमध्ये अर्थपूर्ण उत्तरे देण्याद्वारेदेखील तुम्ही आपली कदर दाखवू शकता. वडील ज्या कार्यात पुढाकार घेतात त्यात त्यांना पाठिंबा द्या, जसे की क्षेत्र सेवाकार्य. एखाद्या वडिलाने तुम्हाला दिलेल्या सल्ल्याचा तुम्हाला फायदा झाला असेल, तर तसे त्यांना जरूर सांगा. तसेच, वडिलांच्या कुटुंबाबद्दलही तुम्ही आपली कदर व्यक्‍त करू शकता का? हे नेहमी लक्षात असू द्या, की एखादे वडील आपल्या कुटुंबासोबत जो वेळ घालवू शकले असते तोच वेळ ते मंडळीत परिश्रम करण्यासाठी खर्च करत असतात; तेव्हा, त्यांचे कुटुंब एका अर्थी त्यागच करत असते.

२० होय, आपल्यामध्ये श्रम करणाऱ्‍या, आपल्यावर अध्यक्षता करणाऱ्‍या व आपल्याला बोध करणाऱ्‍या वडिलांबद्दल कदर दाखवण्याची अनेक कारणे आपल्याजवळ आहेत. या “मानवरूपी देणग्या” नक्कीच यहोवाने केलेली एक प्रेमळ तरतूद आहे!

[तळटीप]

^ १ थेस्सलनीकाकर २:७, ८ (ईझी-टू-रीड व्हर्शन): “तरीही आम्ही तुमच्यामध्ये आई जशी प्रेमाने तिच्या मुलाला स्वतःचे दूध पाजते आणि काळजी घेते, तसे आम्ही तुमच्यात सौम्य होतो. कारण आम्हाला तुमच्याविषयी इतके प्रेम वाटले, की आम्ही तुमच्याबरोबर देवाकडून येणारी सुवार्ताच नव्हे तर आमचे स्वतःचे जीवनसुद्धा देण्यास तयार होतो. याचे कारण म्हणजे, तुम्ही आमच्यासाठी प्रिय झाला होता.”

तुम्हाला आठवते का?

• थेस्सलनीका मंडळीचे नेतृत्व करणाऱ्‍या बांधवांबद्दल कदर दाखवण्याची कोणती कारणे तेथील ख्रिश्‍चनांजवळ होती?

• तुमच्या मंडळीतील वडील कशा प्रकारे तुमच्याकरता परिश्रम करतात?

• तुमच्यामध्ये अध्यक्षता करणाऱ्‍या वडिलांपासून तुम्हाला काय फायदा होतो?

• एखाद्या वडिलाने जर तुम्हाला बोध केला, तर तुम्ही काय लक्षात ठेवले पाहिजे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२७ पानांवरील चित्र]

वडील ज्या अनेक मार्गांनी मंडळीची देखरेख करतात त्याची तुम्ही कदर करता का?