व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

‘यशःप्राप्तीचे’ गुपित काय?

‘यशःप्राप्तीचे’ गुपित काय?

‘यशःप्राप्तीचे’ गुपित काय?

“यश!” लगेच कोणाचेही लक्ष वेधून घेईल असा हा शब्द आहे. काही जणांनी व्यवसाय क्षेत्रात उत्तुंग यश मिळवले आहे. भरपूर पैसा व नावलौकिक कमवण्यात त्यांना यश आले आहे. इतर काही जणांनी यशाचे स्वप्न तर रंगवले, पण त्यांचे स्वप्न धुळीस मिळाले.

यश हे बऱ्‍याच प्रमाणात, तुम्ही जीवनात कोणत्या गोष्टीला सर्वात जास्त महत्त्व देता यावर अवलंबून आहे. तसेच, तुम्ही आपला वेळ व शक्‍ती कशी खर्च करता आणि आपले ध्येय मिळवण्यासाठी कितपत खटपट करता या दोन गोष्टीदेखील यश मिळवण्यासाठी महत्त्वाच्या आहेत.

यहोवाच्या सेवकांपैकी बऱ्‍याच जणांना प्रचार कार्यात जास्तीत जास्त सहभाग घेतल्यामुळे खूप समाधान मिळाले आहे. पायनियर सेवेला आपले करियर म्हणून निवडणाऱ्‍या तरुणांना व वयस्कांनादेखील यश मिळाले आहे. पण, काहींना प्रचार कार्य काहीसे कंटाळवाणे वाटते आणि ते या कार्याला जीवनात दुय्यम स्थान देऊन इतर ध्येये मिळवण्याच्या मागे लागतात. असे का घडते? जीवनात सर्वात मोलाचे काय आहे याचा तुम्हाला विसर पडू नये म्हणून तुम्ही काय करू शकता? आणि तुम्हाला ‘यशःप्राप्ती घडावी’ म्हणून तुम्ही काय केले पाहिजे?—यहो. १:८.

शाळेनंतरचे अतिरिक्‍त उपक्रम आणि छंद

शाळेनंतरचे अतिरिक्‍त उपक्रम व छंद आणि देवाची सेवा यांत ख्रिस्ती तरुणांनी योग्य संतुलन साधले पाहिजे. जे असे करतात ते निश्‍चितच आपल्या प्रशंसेस पात्र आहेत आणि ते जीवनात नक्कीच यशस्वी होतील.

पण, काही ख्रिस्ती तरुण मात्र शाळेनंतरच्या उपक्रमांत आणि छंद जोपासण्यात खूप जास्त गुंततात. हे उपक्रम अथवा छंद मुळात वाईट नसतीलही. पण, ख्रिस्ती तरुणांनी स्वतःला हे प्रश्‍न विचारले पाहिजेत: ‘या गोष्टींसाठी मला किती वेळ द्यावा लागणार आहे? या कार्यांत सहभाग घेताना कशा प्रकारच्या लोकांच्या सहवासात मला राहावे लागेल? कशा प्रकारच्या मनोवृत्तींचा प्रभाव माझ्यावर पडेल? आणि कोणती गोष्ट माझ्या जीवनात सर्वात महत्त्वाची बनेल?’ अशा उपक्रमांत एखादी व्यक्‍ती इतकी गढून जाऊ शकते की देवासोबतचा नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी तिच्याजवळ वेळ व शक्‍तीच उरत नाही. तेव्हा, जीवनात कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यायचे हे ठरवणे का महत्त्वाचे आहे हे तुमच्या लक्षात आले का?—इफिस. ५:१५-१७.

व्हिक्टरचे उदाहरण पाहा. * तो सांगतो: “१२ वर्षांचा असताना मी एका व्हॉलीबॉल क्लबचा सदस्य बनलो. मला अनेक बक्षीसं व पुरस्कार मिळू लागले. एक अतिशय सुप्रसिद्ध खेळाडू बनण्याची संधी माझ्यापुढे होती.” काही काळानंतर, या खेळाचा आपल्या आध्यात्मिक आरोग्यावर होत असलेला परिणाम पाहून व्हिक्टर अस्वस्थ झाला. एकदा बायबल वाचताना त्याला चक्क झोप लागली. तसेच, प्रचार कार्यातही त्याला आनंद मिळेनासा झाला. “व्हॉलीबॉलमुळे माझ्याजवळ दुसरं काही करायची शक्‍तीच नव्हती आणि लवकरच माझ्या लक्षात आलं की आध्यात्मिक गोष्टींबद्दलही माझा उत्साह कमी होत चालला आहे. मी जितकं करू शकत होतो, तितकं मी करत नव्हतो याची मला जाणीव झाली.”

उच्च शिक्षण?

ख्रिस्ती व्यक्‍तीने आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण कराव्यात अशी आज्ञा बायबल देते. यांत कुटुंबाच्या भौतिक गरजांचाही समावेश होतो. (१ तीम. ५:८) पण, असे करण्यासाठी एखाद्या व्यक्‍तीजवळ महाविद्यालयाची किंवा विद्यापीठाची पदवी असणे गरजेचे आहे का?

उच्च शिक्षण घेण्याचा निर्णय घेतल्यास, यहोवासोबतच्या आपल्या नातेसंबंधावर त्याचा काय परिणाम होईल याचा विचार करणे महत्त्वाचे आहे. बायबलमधील एका उदाहरणाच्या साहाय्याने हे समजून घेण्याचा प्रयत्न करू या.

बारूख हा यिर्मया संदेष्ट्याचा मदतनीस होता. पण, यहोवाची सेवा करण्याचा जो विशेषाधिकार त्याला मिळाला होता, त्याची कदर करण्याऐवजी बारूख महत्त्वाकांक्षी बनला. हे यहोवाच्या लक्षात आले आणि यिर्मया संदेष्ट्याकडून त्याने बारूखला असा इशारा दिला: “तू आपणासाठी मोठाल्या गोष्टींची वांच्छा करितोस काय? ती करू नको.”—यिर्म. ४५:५.

बारूखला कोणत्या “मोठाल्या गोष्टींची” आकांक्षा होती? कदाचित त्या काळच्या यहुदी समाजात नाव कमावण्याचा त्याला मोह झाला असावा. किंवा, त्याला धनसंपत्ती मिळवण्याची इच्छा असावी. आणि या आकांक्षांमुळे जास्त महत्त्वाच्या गोष्टींचा, अर्थात आध्यात्मिक मोल असलेल्या गोष्टींचा त्याला विसर पडला होता. (फिलिप्पै. १:१०) पण, यहोवाने यिर्मयाद्वारे दिलेल्या इशाऱ्‍याकडे बारूखने लक्ष दिले आणि त्यामुळे त्याचा जीव वाचला.—यिर्म. ४३:६.

या अहवालातून आपण कोणता बोध घेऊ शकतो? बारूखला यहोवाने दिलेल्या सल्ल्यावरून दिसून येते की त्याचे नक्कीच कोठेतरी चुकत होते. तो मोठमोठ्या गोष्टी मिळवण्यास उत्सुक होता. जर तुमच्याजवळ उदरनिर्वाहाचे साधन असेल, तर मग केवळ आपली किंवा आपल्या आईवडिलांची अथवा नातेवाइकांची महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणखीन शिक्षण घेण्याची आणि त्यासाठी वेळ, शक्‍ती व पैसा खर्च करण्याची खरोखरच गरज आहे का?

जॉर्ज नावाच्या एका कंप्युटर प्रोग्रामरचे उदाहरण पाहा. आपल्या सहकर्मींच्या प्रोत्साहनामुळे त्याने विशेष अतिरिक्‍त प्रशिक्षणाचा एक कोर्स करायचे ठरवले. काही काळानंतर, आध्यात्मिक कार्यांसाठी त्याच्याजवळ वेळच नव्हता. तो सांगतो, “मी सतत बेचैन होतो. जी आध्यात्मिक ध्येयं मी ठेवली होती ती मिळवता न आल्यामुळे माझं मन मला खात होतं.”

नोकरीधंद्यात पूर्णपणे गढून जाणे

देवाचे वचन खऱ्‍या ख्रिश्‍चनांना असे प्रोत्साहन देते की त्यांनी मेहनती असले पाहिजे. तसेच, ते नोकरदार असोत किंवा स्वतः मालक असोत, त्यांनी आपले काम जबाबदारीच्या जाणिवेने केले पाहिजे. प्रेषित पौलाने लिहिले: “जे काही तुम्ही करिता ते माणसांसाठी म्हणून करू नका तर प्रभूसाठी म्हणून जिवेभावे करा.” (कलस्सै. ३:२२, २३) पण, मेहनत करणे हे चांगले असले, तरीसुद्धा यापेक्षाही महत्त्वाची एक गोष्ट आहे. आणि ती म्हणजे सृष्टिकर्त्यासोबत एक जवळचा नातेसंबंध. (उप. १२:१३) जर एक ख्रिस्ती आपल्या नोकरी किंवा धंद्यात पूर्णपणे गढून गेला, तर त्याचे आध्यात्मिक कार्यांकडे सहज दुर्लक्ष होऊ शकते.

एखाद्याचा बराचसा वेळ नोकरीधंद्यातच जात असेल, तर आपले आध्यात्मिक संतुलन टिकवून ठेवण्यासाठी आणि आपल्या कुटुंबाला मदत करण्यासाठी आवश्‍यक असलेली शक्‍ती त्याच्याजवळ उरणार नाही. शलमोन राजाने म्हटल्याप्रमाणे, ‘कष्टाने भरलेल्या दोन मुठींसोबत’ मनुष्याला ‘वायफळ उद्योगही’ करावे लागतात. जो ख्रिस्ती नोकरीधंद्यात गढून जातो त्याला कालांतराने तीव्र स्वरूपाच्या, दीर्घकालीन मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. अशी व्यक्‍ती जणू आपल्या कामाची गुलाम बनते आणि शेवटी ती आत्यंतिक थकव्याने ग्रस्त होऊ शकते. असे घडल्यास, ही व्यक्‍ती खरोखरच आपला ‘सर्व उद्योग करून सुख मिळवू’ शकते का? (उप. ३:१२, १३; ४:६) शिवाय, याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कुटुंबातील जबाबदाऱ्‍या पूर्ण करण्यासाठी आणि आध्यात्मिक कार्यांत सहभाग घेण्यासाठी या व्यक्‍तीकडे शारीरिक व भावनिक ताकद शिल्लक राहील का?

पूर्व युरोपात राहणारा जेम्स आपल्या व्यवसायात पूर्णपणे गढून गेला होता. तो सांगतो: “जगिक लोक माझी खूप वाहवा करायचे कारण माझ्याजवळ उत्तम निर्णयक्षमता होती आणि दिलेलं प्रत्येक काम मी अगदी चोखपणे पूर्ण करायचो. पण हळूहळू माझं आध्यात्मिक आरोग्य खालावत गेलं आणि मी क्षेत्र सेवेला जायचं बंद केलं. काही काळानं सभांना जायचंही मी बंद केलं. मी इतका अहंकारी बनलो की वडिलांनी दिलेल्या सल्ल्याकडे मी जराही लक्ष दिलं नाही आणि मंडळीपासून स्वतःला दूर केलं.”

तुम्ही जीवनात यश प्राप्त करू शकता

आपण अशा तीन गोष्टींची चर्चा केली ज्यांत पूर्णपणे गढून जाऊन एक ख्रिस्ती व्यक्‍ती आपले आध्यात्मिक आरोग्य हरवून बसू शकते. तुम्ही यांपैकी कोणत्याही गोष्टींत गुंतला आहात का? असल्यास, तुम्ही खरोखरच यशःप्राप्तीच्या मार्गावर आहात का हे ठरवण्यास पुढील प्रश्‍न, शास्त्रवचने व निरनिराळ्या व्यक्‍तींचे उद्‌गार तुम्हाला मदत करतील.

शाळेनंतरचे अतिरिक्‍त उपक्रम आणि छंद: अशा कार्यांत तुम्ही कितपत गुंतला आहात? जो वेळ तुम्ही पूर्वी आध्यात्मिक कार्यांना देत होता तो वेळ आता या कार्यांत खर्च होतो का? मंडळीतील बांधवांशी भेटणे-बोलणे आता तुम्हाला नकोसे वाटू लागले आहे का? असे असल्यास, दावीद राजाचे अनुकरण करून तुम्हीही यहोवाला अशी विनंती करू शकता: “ज्या मार्गाने मी चालावे तो मला कळीव कारण मी आपले चित्त तुझ्याकडे लाविले आहे.”—स्तो. १४३:८.

यापूर्वी ज्याचा उल्लेख केला होता, त्या व्हिक्टरला एका प्रवासी पर्यवेक्षकाने मदत केली. ते त्याला म्हणाले: “तू व्हॉलीबॉलच्या तुझ्या करियरबद्दल किती उत्साहानं बोलतोस.” व्हिक्टर सांगतो, “त्यांचं ते वाक्य ऐकल्यावर मी जणू खडबडून जागा झालो. मला जाणीव झाली की मी खूपच वाहवत गेलो होतो. मी लवकरच क्लबमधल्या जगिक मित्रांशी संबंध तोडला आणि मंडळीत मित्र बनवण्याचा प्रयत्न करू लागलो.” आज व्हिक्टर आपल्या मंडळीत आवेशाने यहोवाची सेवा करत आहे. तो सर्वांना हा सल्ला देतो: “तुमच्या शाळेच्या अतिरिक्‍त उपक्रमांमुळे तुम्ही यहोवाच्या अधिक जवळ आला आहात की त्याच्यापासून दूर गेला आहात याविषयी तुमच्या मित्रांनी, आईवडिलांनी किंवा मंडळीतील वडिलांनी तुमच्याबाबतीत काय निरीक्षण केले आहे हे त्यांना विचारा.”

देवाच्या सेवेत आणखी विशेषाधिकार मिळवण्यास तुम्ही उत्सुक आहात हे मंडळीतील वडिलांना तुमच्या वागण्याबोलण्यातून तुम्हाला दाखवता येईल का? कदाचित तुमच्या मंडळीतील काही वृद्ध बांधवांना सोबत देण्याची किंवा इतर मार्गांनी, उदाहरणार्थ खरेदी करण्यासाठी किंवा घरातील कामे करण्यासाठी साहाय्याची गरज असू शकते. तुम्ही अशा वृद्ध बांधवांना मदत करू शकता का? तुमचे वय कितीही असो, तुम्ही पूर्ण वेळेच्या सेवेद्वारे इतरांना बायबलमधील आनंददायक सत्ये सांगण्याच्या कार्यात सहभाग घेऊ शकता.

उच्च शिक्षण: ‘स्वतःचेच गौरव पाहण्याविरुद्ध’ येशूने इशारा दिला होता. (योहा. ७:१८) किती शिक्षण घ्यायचे हे ठरवताना ‘जे श्रेष्ठ ते तुम्ही पसंत केले’ आहे का, म्हणजेच, अधिक महत्त्वाचे काय आहे हे लक्षात घेतले आहे का?—फिलिप्पै. १:९, १०.

जॉर्ज नावाच्या त्या कंप्युटर प्रोग्रामरने आपल्या जीवनात काही बदल केले. तो म्हणतो: “वडिलांच्या सल्ल्याकडे मनापासून लक्ष देऊन मी माझ्या जीवनातील अनावश्‍यक गोष्टी कमी करण्याचा निर्णय घेतला. मला जाणीव झाली की आणखी शिक्षण घेण्याची मला गरज नव्हती. कारण त्यासाठी मला खूप वेळ व शक्‍ती खर्च करावी लागेल.” जॉर्ज मंडळीच्या कार्यांत जास्त उत्साहाने सहभाग घेऊ लागला. काही काळाने, त्याला सेवा प्रशिक्षण प्रशालेला—किंवा आता जिला अविवाहित बांधवांकरता असलेली बायबल प्रशाला म्हणतात—उपस्थित राहण्याची संधी मिळाली. देवाच्या संघटनेकडून अधिक शिक्षण मिळवण्यासाठी त्याने जणू ‘वेळ विकत घेतला.’—इफिस. ५:१६, NW.

नोकरीधंदा: आध्यात्मिक कार्यांकडे दुर्लक्ष होईल इतके तुम्ही तुमच्या कामात गुंतला आहात का? आपल्या कुटुंबासोबत संवाद साधण्यासाठी तुम्ही पुरेसा वेळ देता का? मंडळीत तुम्हाला नेमली जाणारी भाषणे अधिक परिणामकारक बनवण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात का? इतरांना आपल्या संभाषणातून प्रोत्साहन देण्याविषयी काय? नेहमी ‘देवाचे भय धरा व त्याच्या आज्ञा पाळा,’ कारण असे केल्यामुळे तुम्हाला यहोवाचे विपुल आशीर्वाद मिळतील आणि त्याच्या सेवेत श्रम केल्यामुळे तुम्ही सुखी व्हाल.—उप. २:२४; १२:१३.

याआधी उल्लेख केलेल्या जेम्सला त्याच्या व्यवसायात फारसे यश मिळाले नाही. उलट, त्याचा धंदा बुडाला. कमाईचे साधन नाही, आणि डोक्यावर कर्जाचे ओझे अशा परिस्थितीत तो यहोवाकडे वळाला. त्याने आपल्या जीवनात आवश्‍यक बदल केले आणि आज तो एक पायनियर व मंडळीत वडील म्हणून सेवा करत आहे. तो म्हणतो: “जीवनात समाधानी वृत्ती बाळगून मी आध्यात्मिक कार्यांसाठी आपली शक्‍ती खर्च करतो, तेव्हा मला खरी मनःशांती मिळते.”—फिलिप्पै. ४:६, ७.

तुम्ही जे काही करता, ते कोणत्या हेतूने करता आणि कोणत्या गोष्टींना जीवनात महत्त्व देता याबद्दल अगदी प्रामाणिकपणे आत्मपरीक्षण करा. यहोवाची सेवा करणे हा कायमस्वरूपी यशाचा मार्ग आहे. या सेवेलाच आपल्या जीवनात सर्वाधिक महत्त्व द्या.

“देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा” समजून त्यानुसार वागण्यासाठी कदाचित तुम्हाला जीवनात अनेक तडजोडी कराव्या लागतील. कदाचित काही अनावश्‍यक गोष्टी जीवनातून काढूनही टाकाव्या लागतील. (रोम. १२:२) पण, मनापासून यहोवाची सेवा केल्यामुळे तुम्हाला ‘यशःप्राप्ती घडेल.’

[तळटीप]

^ काही नावे बदलण्यात आली आहेत.

[३१ पानांवरील चौकट/चित्र]

तुम्ही कशा प्रकारे जीवनात यश प्राप्त करू शकता?

जीवनात लक्ष विचलित करणाऱ्‍या अनेक गोष्टी असताना, जे खरोखर महत्त्वाचे आहे त्याकडे दुर्लक्ष होऊ देण्याचे तुम्ही कसे टाळू शकता? पुढील प्रश्‍नांवर विचार करा आणि जीवनातील तुमचे हेतू आणि प्राधान्यक्रम तपासून पाहा:

शाळेनंतरचे अतिरिक्‍त उपक्रम आणि छंद

▪ या कार्यांत सहभागी होताना, कोणत्या प्रकारच्या मनोवृत्तींचा तुमच्यावर प्रभाव पडण्याची शक्यता आहे?

▪ यांकरता तुमचा किती वेळ खर्च होईल?

▪ या गोष्टी तुमच्या जीवनात सर्वात महत्त्वाच्या बनण्याची शक्यता आहे का?

▪ पूर्वी आध्यात्मिक कार्यांना दिला जाणारा तुमचा वेळ आता या कार्यांत खर्च होत आहे का?

▪ कशा प्रकारच्या लोकांशी तुमचा संबंध येईल?

▪ मंडळीतील बांधवांपेक्षा तुम्हाला या लोकांचा सहवास जास्त आवडतो का?

उच्च शिक्षण

▪ तुमच्याजवळ उदरनिर्वाहाचे साधन असल्यास, आणखी शिक्षण घेण्यासाठी वेळ, पैसा व शक्‍ती खर्च करण्याची खरोखरच गरज आहे का?

▪ तुमच्या गरजा भागवण्यासाठी महाविद्यालयाची किंवा विद्यापीठाची पदवी असणे खरेच आवश्‍यक आहे का?

▪ तुम्हाला सर्व सभांना उपस्थित राहता येईल का?

▪ निर्णय घेताना तुम्ही जास्त महत्त्वाचे काय आहे याचा विचार केला आहे का?

▪ यहोवा आपल्या गरजा भागवण्यास समर्थ आहे या गोष्टीवर तुम्हाला भरवसा वाढवण्याची गरज आहे का?

नोकरीधंदा

▪ तुम्ही जे काम करता त्यामुळे तुम्हाला जीवनाचा आनंद घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो का?

▪ कौटुंबिक जबाबदाऱ्‍या पूर्ण करण्यासाठी आणि आध्यात्मिक कार्यांत सहभागी होण्यासाठी तुमच्याजवळ शारीरिक व भावनिक ताकद शिल्लक राहते का?

▪ तुम्ही आपल्या कुटुंबासोबत संवाद साधण्याकरता पुरेसा वेळ देता का?

▪ आध्यात्मिक गोष्टींना दुय्यम स्थान देण्याइतपत तुम्ही आपल्या कामात गुंतला आहात का?

▪ मंडळीत तुम्हाला नेमलेल्या भाषणांचा दर्जा सुधारणे तुम्हाला शक्य झाले आहे का?

[३० पानांवरील चित्र]

यहोवाने बारूखला त्याच्या महत्त्वाकांक्षी वृत्तीविषयी ताकीद दिली