व्हिडिओ पाहण्यासाठी

बायबलने बदललं जीवन

बायबलने बदललं जीवन

बायबलने बदललं जीवन

साठीत असलेल्या एका स्त्रीने मूर्तिपूजा करायचं का सोडून दिलं? मंदिरात काम करणारा शिंतो धर्माचा एक पुजारी यहोवाचा साक्षीदार का बनला? एका स्त्रीला लहानपणीच दत्तक देण्यात आलं होतं. यामुळे आपल्या आईवडिलांनी आपल्याला सोडून दिलंय अशी भावना तिच्या मनात होती. तिने या भावनांवर कशी मात केली? चला, या प्रश्‍नांची उत्तरं त्यांच्याचकडून जाणून घेऊ या.

“आता मी मूर्तींची सेवा करत नाही.”​—आबा दान्सू

जन्म: १९३८

देश: बेनिन

पार्श्‍वभूमी: मूर्तींची उपासना करणारी

माझं आधीचं जीवन: मी सो-चाहोवी नावाच्या एका खेड्यात लहानाची मोठी झाले. हे खेडं एका तलावाजवळ असलेल्या पाणथळ प्रदेशात आहे. आमच्या खेड्यातले लोक मासेमारी करतात आणि गुरंढोरं, बकऱ्‍या, मेंढ्या, डुकरं आणि कोंबड्या वगैरे पाळतात. या भागात रस्तेच नाहीत. त्यामुळे लोक होड्यांमधून ये-जा करतात. काही जण विटांची घरं बांधत असले, तरी सहसा इथे घरं बांधण्यासाठी लाकूड आणि गवताचा उपयोग केला जातो. बहुतेक लोक गरीब असूनही इथे शहरांमध्ये असते तितकी गुन्हेगारी नाही.

माझ्या वडिलांनी मला आणि माझ्या बहिणीला लहानपणीच एका आश्रमात राहायला पाठवलं, जिथे आम्हाला पारंपरिक विश्‍वासांची शिकवण दिली जायची. मोठी झाल्यावर मी योरूबा लोकांच्या दुदुआ (ओदुदुवा) दैवताची उपासना करू लागले. मी या दैवतासाठी एक देऊळ बांधलं. मी त्याला नियमितपणे कंदमुळं, तेल, गोगलगाई, कोंबड्या, कबुतरं आणि इतर प्राणी अर्पण म्हणून द्यायचे. या सगळ्या वस्तू खूप महाग होत्या आणि त्यामुळे माझे सगळे पैसे त्यातच जायचे.

बायबलने जीवन कसं बदललं? मी बायबलचा अभ्यास करू लागले, तेव्हा मला समजलं की यहोवाच खरा देव आहे. मला हेही कळलं की त्याला मूर्तींची पूजा केलेली आवडत नाही. (निर्गम २०:४, ५; १ करिंथकर १०:१४) त्यामुळे मला समजलं की मीही मूर्तींची उपासना नाही केली पाहिजे. म्हणून मी माझ्याजवळ असलेल्या सगळ्या मूर्ती आणि मूर्तिपूजेशी संबंधित असलेल्या सगळ्या गोष्टी घरातून काढून टाकल्या. मी ज्योतिष्यांकडे जायचं आणि धार्मिक विधींमध्ये भाग घ्यायचंही बंद केलं.

माझ्यासारख्या साठीत असलेल्या बाईसाठी हे सगळे बदल करणं सोप नव्हतं. माझ्या ओळखीचे लोक, नातेवाईक आणि शेजाऱ्‍यापाजाऱ्‍यांनी माझा विरोध केला आणि माझी टिंगलही केली. पण मी यहोवाला प्रार्थना केली आणि योग्य ते करायला मदत कर अशी विनंती केली. नीतिवचनं १८:१० यातल्या शब्दांमुळे मला खूप सांत्वन मिळालं. त्यात म्हटलंय, “यहोवाचं नाव एक भक्कम बुरूज आहे. नीतिमान त्यात धावत जाऊन सुरक्षित राहतो.”

यहोवाच्या साक्षीदारांच्या सभांना गेल्यामुळेही मला खूप मदत झाली. खरं ख्रिस्ती प्रेम काय असतं हे मला तिथे गेल्यावर पाहायला मिळालं. तसंच, मी पाहिलं की हे लोक खरंच बायबलप्रमाणे वागायचा प्रयत्न करतात. या गोष्टींमुळे मला खातरी पटली की यहोवाच्या साक्षीदारांचाच धर्म खरा आहे.

मला झालेला फायदा: बायबलमधल्या तत्त्वांचं पालन केल्यामुळे मी माझ्या मुलांच्या आणखी जवळ आले आहे. तसंच अजून एका मोठ्या समस्येपासून माझी सुटका झाली आहे. आता मी माझे पैसे निर्जीव मूर्तींसाठी खर्च करत नाही, कारण यामुळे काहीही फायदा होत नाही हे मला कळलंय. आता मी यहोवाची उपासना करते. तोच आपल्या सगळ्या समस्या कायमच्या सोडवू शकतो. (प्रकटीकरण २१:३, ४) आज मी खूप खूश आहे, कारण मी मूर्तींची नाही तर यहोवाची सेवा करते. आणि यामुळे मी खऱ्‍या अर्थाने सुरक्षित आहे.

मी लहानपणापासून देवाला शोधत होतो.”​—शिंजी साटो

जन्म: १९५१

देश: जपान

पार्श्‍वभूमी: शिंतो पुजारी

माझं आधीचं जीवन: जपानच्या ग्रामीण भागातल्या एका छोट्याशा गावात माझं लहानपण गेलं. माझे आईवडील खूप धार्मिक होते. त्यांनी मला लहानपणापासून शिंतो देवांची उपासना करायला शिकवलं. त्या लहान वयातसुद्धा मी विचार करायचो की भविष्यात आपल्याला एक चांगलं जीवन मिळेल का? तसंच, अडीअडचणीत असलेल्या लोकांना मदत करावी असं मला नेहमी वाटायचं. मला आठवतंय, एकदा शाळेत आमच्या शिक्षकांनी वर्गातल्या सगळ्या मुलांना विचारलं की मोठं होऊन तुम्हाला काय बनायचंय? वर्गातल्या मुलांनी वेगवेगळी उत्तरं दिली, जसं की, मला एक वैज्ञानिक व्हायचंय. पण मी म्हणालो, की मला मोठं होऊन देवाची सेवा करायची आहे. हे ऐकून सगळी मुलं माझ्यावर हसायला लागली.

माझं शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर, मी धर्माचं शिक्षण देणाऱ्‍या एका शाळेत प्रवेश घेतला. तिथे शिकत असताना मला एक शिंतो पुजारी भेटला, जो फावल्या वेळात नेहमी काळ्या कवरचं एक पुस्तक वाचायचा. एकदा त्याने मला विचारलं, “हे कोणतं पुस्तकए, तुला माहितीए का?” मी पुस्तकाचं कवर पाहिलं होतं म्हणून मी म्हणालो, “बायबल.” तेव्हा तो म्हणला, “ज्या कोणाला शिंतो पुजारी व्हायचंय त्याने हे वाचलंच पाहिजे.”

म्हणून मी लगेच जाऊन एक बायबल विकत आणलं. मी ते पुस्तकांच्या कपाटात सहज दिसेल अशा ठिकाणी ठेवलं. खूप जपायचो मी त्याला. पण शाळेत व्यस्त असल्यामुळे मला ते वाचायला कधी वेळच मिळाला नाही. शिक्षण पूर्ण झाल्यावर मी एका मंदिरात शिंतो पुजारी म्हणून सेवा करू लागलो. माझं लहानपणीचं स्वप्न शेवटी पूर्ण झालं होतं!

पण हळूहळू मला एक वेगळंच चित्र दिसायला लागलं. बहुतेक शिंतो पुजारी इतरांशी प्रेमाने वागत नव्हते. त्यांना दुसऱ्‍यांची काहीच काळजी नव्हती. काहींचा देवावरही विश्‍वास नव्हता. एकदा तर एक अनुभवी पुजारी मला म्हणाला, “तू इतर कोणत्याही विषयावर बोलू शकतोस. पण जर इथे टिकून राहायचं असेल तर धार्मिक गोष्टींबद्दल अजिबात बोलायचं नाही.”

अशा गोष्टींमुळे शिंतो धर्मावरचा माझा विश्‍वास हळूहळू कमी होत गेला. मी मंदिरात काम करायचं अजूनही सोडलं नव्हतं. पण त्यासोबतच मी इतर धर्मांचा अभ्यासही करू लागलो. तरी, त्यांपैकी कोणत्याही धर्माने माझ्या मनाचं समाधान झालं नाही. उलट मी जितक्या जास्त धर्मांचं परीक्षण केलं तितकाच मी निराश झालो. कोणत्याच धर्मात खरं काय ते शिकवलं जात नाही असं मला वाटू लागलं.

बायबलने जीवन कसं बदललं? १९८८ मध्ये एका बौद्ध माणसाने मला बायबल वाचायचा सल्ला दिला. तेव्हा मला त्या शिंतो पुजाऱ्‍याची आठवण झाली ज्याने मला हाच सल्ला दिला होता. या वेळी मी तो सल्ला मनावर घेतला. मी बायबल वाचू लागलो आणि बायबलच्या प्रेमातच पडलो. कधीकधी तर मी पहाट होईपर्यंत वाचतच राहायचो.

बायबल वाचल्यामुळे मला त्यात सांगितलेल्या देवाला प्रार्थना करावीशी वाटू लागली. म्हणून मी मत्तय ६:९-१३ यात दिलेली प्रार्थना म्हणायला सुरुवात केली. दर दोन तासांनी मी ही प्रार्थना म्हणायचो. मंदिरातली कामं करत असतानाही मी ही प्रार्थना म्हणायला विसरायचो नाही.

मी जे वाचत होतो त्याबद्दल माझ्या मनात बरेच प्रश्‍न होते. या वेळेपर्यंत माझं लग्न झालं होतं आणि मला माहीत होतं की यहोवाचे साक्षीदार लोकांना बायबलबद्दल शिकवतात. कारण ते आधी माझ्या बायकोला भेटले होते. म्हणून मी एका साक्षीदार बहिणीची भेट घेतली आणि तिला बरेच प्रश्‍न विचारले. तिने माझ्या प्रत्येक प्रश्‍नाचं उत्तर बायबलमधून दिलं. ही गोष्ट मला खूप विशेष वाटली. नंतर, तिने एका भावाला माझ्यासोबत बायबल अभ्यास करायला सांगितलं.

लवकरच, मी यहोवाच्या साक्षीदारांच्या सभांना जाऊ लागलो. त्या वेळी मला कल्पना नव्हती, पण त्या साक्षीदारांमध्ये असेही काही भाऊबहीण होते, ज्यांच्याशी मी आधी खूप उद्धटपणे वागलो होतो. पण तरीसुद्धा त्यांनी माझं प्रेमाने स्वागत केलं आणि माझ्याशी आपुलकीने वागले.

सभांमध्ये मला हे शिकायला मिळालं की पतीने कुटुंबातल्या सदस्यांशी प्रेमाने आणि आदराने वागलं पाहिजे, अशी देवाची इच्छा आहे. आतापर्यंत, मी मंदिराच्या कामात इतका व्यस्त होतो की मी माझ्या बायकोकडे आणि दोन मुलांकडे कधी लक्षच दिलं नाही. पहिल्यांदा मला याची जाणीव झाली की मंदिरात पूजा करायला येणाऱ्‍या लोकांचं तर मी लक्ष देऊन ऐकायचो. पण माझ्या बायकोचं बोलणं मी एकदाही ऐकून घेतलं नव्हतं.

मी जसजसा बायबलचा अभ्यास करत गेलो, तसतशा मला यहोवाबद्दल बऱ्‍याच नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या आणि यामुळे त्याच्यावरचं माझं प्रेम वाढत गेलं. खासकरून रोमकर १०:१३ यांसारख्या वचनातले शब्द माझ्या मनाला भिडले. तिथे म्हटलंय, “जो कोणी यहोवाचं नाव घेऊन त्याला हाक मारेल, त्याला वाचवलं जाईल.” मी लहानपणापासून देवाला शोधत होतो आणि शेवटी मला तो सापडला होता.

आता मंदिरात माझं मन लागत नव्हतं. शिंतो धर्म सोडून द्यावा असं मला वाटायला लागलं. पण लोक काय म्हणतील याची मला काळजी वाटत होती. खरंतर मी आधीच ठरवलं होतं की जर मला दुसऱ्‍या धर्मात खरा देव सापडला, तर मी शिंतो धर्म सोडून देईन. म्हणून १९८९ मध्ये, मी मनात ठरवल्याप्रमाणे मंदिर सोडलं आणि स्वतःला यहोवाच्या हातात सोपवून दिलं.

मंदिर सोडणं मला सोपं गेलं नाही. मंदिरातले मोठे पुजारी मला खूप बरंवाईट बोलले आणि त्यांनी माझं मन वळवण्याचा पुष्कळ प्रयत्न केला. पण माझ्यासाठी सगळ्यात कठीण जर काही होतं, तर ते म्हणजे माझ्या आईवडिलांना माझ्या या निर्णयाबद्दल सांगणं. शेवटी तो दिवस आलाच. मला आठवतंय, त्यांच्या घरी जाताना मला इतकी भीती वाटत होती की अक्षरशः माझ्या छातीत दुखायला लागलं आणि माझे हातपाय गळून पडले. मी रस्त्यात बऱ्‍याच वेळा थांबून यहोवा देवाला प्रार्थना केली.

त्यांच्या घरी पोहोचल्यावरही मला त्यांना माझ्या निर्णयाबद्दल सांगायचं धाडसच होत नव्हतं. कित्येक तास असेच निघून गेले. शेवटी, खूप प्रार्थना केल्यावर मी माझ्या वडिलांना मनातलं सगळं काही सांगितलं. मी त्यांना सांगितलं की मला खरा देव सापडलाय आणि मला त्याची सेवा करायची आहे, म्हणून मी शिंतो धर्म सोडतोय. हे ऐकून माझ्या वडिलांना धक्काच बसला आणि त्यांना खूप दुःख झालं. माझे नातेवाईकही माझी समजूत काढायला तिथे आले. मला माझ्या घरच्यांना दुखवायचं नव्हतं. पण त्याच वेळी मला माहीत होतं की यहोवाची सेवा करणं हेच योग्य आहे. म्हणून मी माझ्या निर्णयावर ठाम राहिलो आणि यामुळे पुढे जाऊन माझ्या घरचे लोक माझा आदर करू लागले.

मी मंदिर तर सोडलं होतं, पण मनाने मी अजूनही तिथेच होतो. इतकी वर्षं पुजारी म्हणून काम केल्यामुळे त्या सगळ्या गोष्टी माझ्या नसानसांत भिनल्या होत्या. मी त्या विसरायचा खूप प्रयत्न केला. पण मी जिथे-कुठे जायचो, तिथे मला त्या आधीच्या जीवनाची आठवण करून देणाऱ्‍या गोष्टी दिसायच्या.

दोन गोष्टींमुळे मला खूप मदत झाली. सगळ्यात आधी, मी माझ्या घरात अशा गोष्टी शोधल्या ज्या माझ्या आधीच्या धर्माशी संबंधित होत्या. तेव्हा मला बरीच पुस्तकं, चित्रं आणि महागड्या वस्तू सापडल्या. मी त्या सगळ्या जाळून टाकल्या. यासोबतच, मी साक्षीदारांसोबत जास्तीतजास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करू लागलो. त्यांनी मला सांभाळून घेतलं आणि खूप आधार दिला. आणि यामुळे हळूहळू आधीच्या जीवनाच्या आठवणी माझ्या मनातून नाहीशा झाल्या.

मला झालेला फायदा: पूर्वी मी माझ्या बायको-मुलांकडे जास्त लक्ष देत नव्हतो. त्यामुळे त्यांना खूप एकटं पडल्यासारखं वाटायचं. पण बायबलमध्ये पतींना अशी आज्ञा दिली आहे की त्यांनी आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवला पाहिजे. मी या आज्ञेप्रमाणे वागायला लागलो, तेव्हापासून आमचं नातं मजबूत झालंय. पुढे माझी बायकोपण माझ्यासोबत यहोवाची सेवा करू लागली. आज आम्ही आमचा मुलगा, मुलगी आणि जावई यांच्यासोबत मिळून आनंदाने यहोवाची उपासना करत आहोत.

आज जेव्हा मी मागे वळून पाहतो तेव्हा मला जाणवतं की माझं लहानपणीचं स्वप्न पूर्ण झालंय. कारण आज मी देवाची सेवा करतोय आणि इतर लोकांनाही मदत करतोय. मी जे काही शोधत होतो ते सगळं मला मिळालंय आणि यहोवाने मला आणखी भरपूर आशीर्वाद दिलेत. खरंच मी त्याचे उपकार शब्दात व्यक्‍त करू शकत नाही.

“जीवनात कशाची तरी कमी भासत होती.”​—लिनेट हाउटिंग

जन्म: १९५८

देश: दक्षिण आफ्रिका

पार्श्‍वभूमी: टाकून दिल्याची भावना

माझं आधीचं जीवन: माझा जन्म जर्मीस्टन नावाच्या एका छोट्याशा शहरात झाला होता. या शहरात बहुतेक लोक मध्यमवर्गीय होते. आणि गुन्हेगारीचं प्रमाण फार कमी होतं. माझा जन्म झाला तेव्हा माझ्या आईवडिलांना वाटलं की ते माझा सांभाळ करू शकणार नाहीत. म्हणून त्यांनी मला दत्तक म्हणून दिलं. मी फक्‍त १४ दिवसांची होते, तेव्हा एका जोडप्याने मला दत्तक घेतलं. ते माझ्यावर खूप प्रेम करायचे. आणि मी त्यांनाच आई-बाबा म्हणू लागले. पण जेव्हा मला समजलं की हे आपले आईवडील नाहीत तेव्हा मला खूप वाईट वाटलं. आपल्या खऱ्‍या आईवडिलांनी आपल्याला टाकून दिलंय असं मला वाटलं. माझे दत्तक आईवडील मला परके वाटू लागले. आणि ते माझ्या भावना कधीच समजू शकणार नाहीत असं मला वाटायला लागलं.

मी १६ वर्षांची झाले तेव्हा मी बारमध्ये जाऊ लागले. तिथे म्युझिक वाजवलं जायचं आणि आम्ही सगळे मित्रमैत्रिणी मिळून डान्स करायचो. १७ वर्षांच्या वयात मला सिगरेट ओढायची सवय लागली. सिगरेटच्या जाहिरातींमध्ये दाखवलेल्या मॉडेल्ससारखं मला अगदी सडपातळ व्हायचं होतं. १९ व्या वर्षी मी जोहॅनसबर्गमध्ये जॉब करू लागले. काही दिवसांतच मला वाईट संगत लागली. यामुळे मला शिव्या द्यायची, सतत सिगरेट ओढायची आणि शनिवारी-रविवारी खूप दारू प्यायची सवय लागली.

पण मी भरपूर शारीरिक व्यायाम करायचे आणि निरनिराळ्या प्रकारचे खेळही खेळायचे. मी माझ्या करिअरसाठी खूप मेहनत घेत होते. कंप्यूटरच्या क्षेत्रात मला नाव कमवायचं होतं. मी भरपूर पैसा कमावला. त्यामुळे लोक मला यशस्वी समजत होते. पण खरं पाहिलं तर मी खूप दुःखी आणि निराश होते. माझ्या जीवनाला दिशा नव्हती. का कोणास ठाऊक जीवनात कशाची तरी कमी भासत होती.

बायबलने जीवन कसं बदललं? मी बायबलचा अभ्यास करू लागले तेव्हा मला समजलं की यहोवा खूप प्रेमळ देव आहे. आणि आपल्यावर प्रेम असल्यामुळेच त्याने आपल्याला त्याचं वचन बायबल दिलंय. जसं काय, जीवनात मार्गदर्शन देण्यासाठी त्याने आपल्यापैकी प्रत्येकाला एक पत्र लिहिलंय. (यशया ४८:१७, १८) मला कळून चुकलं होतं, की यहोवाच्या प्रेमळ मार्गदर्शनाचा फायदा घेण्यासाठी मला माझ्या जीवनात काही मोठे बदल करावे लागतील.

सगळ्यात आधी तर मला माझ्या आधीच्या मित्रमैत्रिणींची संगत सोडावी लागणार होती. मी नीतिवचनं १३:२० यातल्या शब्दांवर खूप विचार केला. तिथे म्हटलंय: “बुद्धिमानांसोबत चालणारा बुद्धिमान होईल, पण मूर्खांची संगत धरणाऱ्‍याचं नुकसान होईल.” या सल्ल्यामुळे मला माझ्या आधीच्या मित्रमैत्रिणींची संगत सोडायला आणि यहोवाच्या साक्षीदारांमध्ये नवीन मित्रमैत्रिणी बनवायला मदत मिळाली.

सिगरेटची सवय सोडून देणं मला सगळ्यात कठीण गेलं. कारण मी त्या व्यसनाच्या पूर्णपणे आहारी गेले होते. या सवयीवर मात करायचा प्रयत्न करत असतानाच, माझ्यासमोर दुसरी एक समस्या उभी राहिली. सिगरेट सोडल्यामुळे माझं वजन जवळजवळ १४ किलोंनी वाढलं. त्यामुळे मला स्वतःचीच लाज वाटू लागली. ते वाढलेलं वजन कमी करायला मला दहा वर्षं लागली. तरीपण सिगरेट सोडायचा जो मी निर्णय घेतला होता, तो योग्यच आहे याबद्दल मला जराही शंका नव्हती. म्हणून मी यहोवाला सतत प्रार्थना करत राहिले. आणि त्यानेच मला या सवयीवर मात करायला शक्‍ती दिली.

मला झालेला फायदा: आता माझं आरोग्य आधीपेक्षा चांगलंय. आज मी समाधानी आहे. आणि पैसा, प्रतिष्ठा, करिअर यांसारख्या गोष्टींच्या मागे मी धावत नाही. कारण त्यापासून मिळणारा आनंद हा फक्‍त तात्पुरता आहे. उलट आज मी लोकांना बायबलमधलं सत्य जाणून घ्यायला मदत करते. आणि या कामातून मला खरंच खूप आनंद मिळतो. या आनंदात भर म्हणजे, आधी माझ्यासोबत काम करणाऱ्‍या माझ्या तीन मैत्रिणीसुद्धा आज यहोवाची उपासना करत आहेत. तसंच माझ्या दत्तक आईवडिलांचा मृत्यू होण्याआधी मी त्या दोघांनाही बायबलमधल्या पुनरुत्थानाच्या आशेबद्दल सांगू शकले, याचंही मला समाधान आहे. आज मी माझ्या पतीसोबत मिळून आनंदाने यहोवाची सेवा करत आहे.

आईवडिलांनी आपल्याला टाकून दिलंय, या भावनेशी मी लहानपणापासून झगडत आले. पण यहोवासोबत जवळचा नातेसंबंध जोडल्यामुळे मला या भावनेवर मात करायला मदत झाली. यहोवाने मला जगभरातल्या भाऊबहिणींचं एक मोठं कुटुंब दिलंय. आणि मला ते खूप आपलंसं वाटतं. या कुटुंबात मला खूप सारे आईवडील आणि भाऊबहीणही मिळाले आहेत.​—मार्क १०:२९, ३०.

[चित्र]

यहोवाच्या साक्षीदारांमध्ये मला खरं प्रेम अनुभवायला मिळालं

[चित्र]

याच शिंतो मंदिरात मी एकेकाळी सेवा करायचो