व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवाच्या स्पष्ट ताकिदींकडे तुम्ही लक्ष देणार का?

यहोवाच्या स्पष्ट ताकिदींकडे तुम्ही लक्ष देणार का?

यहोवाच्या स्पष्ट ताकिदींकडे तुम्ही लक्ष देणार का?

“हाच मार्ग आहे; याने चला.”—यश. ३०:२१.

१, २. सैतान काय करू इच्छितो आणि देवाचे वचन कशा प्रकारे आपल्याला मदत करते?

 प्रवास करत असताना रस्त्यावरील सूचना फलक चुकीची दिशा दाखवत असल्यास तुम्ही वाट चुकू शकता. हे धोकेदायकही ठरू शकते. समजा, तुमचा मित्र तुम्हाला सांगतो, की लोकांची दिशाभूल करण्यासाठी एका गुन्हेगार प्रवृत्तीच्या माणसाने मुद्दामच तो सूचना फलक बदलला आहे. आपल्या मित्राने दिलेल्या या ताकिदीकडे तुम्ही लक्ष देणार नाही का? नक्कीच द्याल.

बायबलमध्ये दोन मार्गांविषयी सांगितले आहे. एक मार्ग नाशाकडे जाणारा आहे, तर दुसरा सार्वकालिक जीवनाकडे. पुष्कळ लोक नाशाकडे जाणाऱ्‍या मार्गावर वाटचाल करत आहेत असे बायबल म्हणते. सैतानाने त्या गुन्हेगार प्रवृत्तीच्या माणसाप्रमाणे या लोकांची दिशाभूल केली आहे. त्याने आपलीही दिशाभूल करण्याचा निर्धार केला आहे. (प्रकटी. १२:९) आज सैतान ज्यांद्वारे आपल्याला यहोवाच्या आज्ञा मोडायला लावतो आणि सार्वकालिक जीवनाचा मार्ग सोडून देण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करतो, अशा काही धोक्यांविषयी आपण मागील लेखात पाहिले. (मत्त. ७:१३, १४) पण, आपण हेदेखील पाहिले की यहोवा देव हा आपल्या मित्रासारखा आहे आणि तो आपल्याला सैतानाच्या डावपेचांविषयी सावध करतो. या लेखात आपण अशा आणखी तीन गोष्टींविषयी चर्चा करू, ज्यांचा उपयोग करून सैतान आपल्याला बहकवण्याचा प्रयत्न करतो. तसेच, हे धोके टाळण्यास बायबलमधील सल्ला कशा प्रकारे आपल्याला मदत करतो हेही आपण पाहू. बायबलचे वाचन करत असताना आपण अशी कल्पना करू शकतो, की यहोवा स्वतः आपल्या पाठीमागे चालत आहे आणि आपल्याला म्हणत आहे: “हाच मार्ग आहे; याने चला.” (यश. ३०:२१) या स्पष्ट ताकिदींचे परीक्षण केल्यामुळे, यहोवा आपल्याला जे सांगतो त्याप्रमाणे वागण्याचा आपला निर्धार अधिकच पक्का होईल.

‘खोट्या शिक्षकांच्या’ मागे जाऊ नका

३, ४. (क) खोट्या शिक्षकांची तुलना पाणी नसलेल्या विहिरींशी का करता येईल? (ख) खोटे शिक्षक कोठून येतात आणि त्यांचे उद्दिष्ट काय असते?

अशी कल्पना करा, की प्रवासात तुम्ही एका वाळवंटातून जात आहात आणि तुम्हाला तहान लागली आहे. काही अंतरावर तुम्हाला एक विहीर दिसते. पाणी मिळेल या आशेने तुम्ही त्या विहिरीजवळ जाता. पण जवळ गेल्यावर तुम्हाला दिसते की विहिरीत पाणीच नाही. तुमची घोर निराशा होते! त्याचप्रमाणे, सत्याची तुलना पाण्याशी आणि खोट्या शिक्षकांची तुलना पाणी नसलेल्या विहिरींशी करता येईल. हे शिक्षक सत्य शिकवतील अशी आशा बाळगणाऱ्‍यांची घोर निराशा होईल. प्रेषित पौल व प्रेषित पेत्र यांच्याद्वारे यहोवा आपल्याला अशा खोट्या शिक्षकांपासून सावध राहण्याची ताकीद देतो. (प्रेषितांची कृत्ये २०:२९, ३०; २ पेत्र २:१-३ वाचा.) हे खोटे शिक्षक कोण आहेत? हे खोटे शिक्षक कोठून येतात आणि ते कशा प्रकारे लोकांना बहकवतात याविषयी पौल व पेत्र आपल्याला सांगतात.

इफिसस मंडळीच्या वडिलांना पौलाने म्हटले: “तुम्हापैकीहि काही माणसे उठून . . . विपरीत गोष्टी बोलतील.” आणि पेत्राने अनेक मंडळ्यांना उद्देशून लिहिलेल्या एका पत्रात असे म्हटले: “तुम्हातहि खोटे शिक्षक होतील.” तेव्हा, खोटे शिक्षक हे मंडळीतूनच येऊ शकतात. हे खोटे शिक्षक म्हणजेच धर्मत्यागी. * त्यांचे उद्दिष्ट काय आहे? पौलाने म्हटले, की यहोवाची संघटना सोडून जाताना हे धर्मत्यागी ‘शिष्यांना आपल्यामागे ओढून घेण्याचा’ प्रयत्न करतात. पौल या ठिकाणी येशू ख्रिस्ताच्या शिष्यांबद्दल बोलत होता. खोटे शिक्षक मंडळीबाहेर जाऊन शिष्य बनवत नाहीत. तर ते मंडळीच्या आतूनच शिष्यांना आपल्यामागे ओढून नेण्याचा प्रयत्न करतात. येशूने या धर्मत्यागी लोकांची तुलना मेंढरांना खाणाऱ्‍या क्रूर लांडग्यांशी केली. मंडळीतील सदस्यांनी सत्य सोडून द्यावे या उद्देशाने धर्मत्यागी त्यांना विश्‍वासातून पाडण्याचा प्रयत्न करतात.—मत्त. ७:१५; २ तीम. २:१८.

५. खोटे शिक्षक कशा प्रकारे लोकांना फसवतात?

खोटे शिक्षक कशा प्रकारे लोकांना फसवतात? ते अतिशय चलाखीने असे करतात. गुन्हेगार ज्याप्रमाणे बाहेरून गुप्तपणे एखाद्या देशात माल आणतात, त्याचप्रमाणे धर्मत्यागी “गुप्तपणे” मंडळीत आपल्या मतांचा प्रसार करतात. ते “बनावट गोष्टी” बोलतात. गुन्हेगार ज्याप्रमाणे बनावटी कागदपत्रे खरी असल्याचे भासवतात, त्याचप्रमाणे धर्मत्यागी अशा प्रकारे बोलतात की ज्यामुळे इतरांना त्यांच्या खोट्या कल्पना खऱ्‍या वाटतील. ते ‘कपटाने वागून’ जास्तीत जास्त लोकांना आपल्या फसव्या शिकवणींवर विश्‍वास ठेवायला प्रवृत्त करू पाहतात. तसेच, पेत्राने असेही म्हटले की ते शास्त्रवचनांचा विपरीत अर्थ करतात. इतरांनी त्यांच्या मतांवर विश्‍वास ठेवावा म्हणून ते बायबलमधील वचनांचा चुकीचा अर्थ लावतात. (२ पेत्र २:१, ३, १३; ३:१६) धर्मत्यागी लोकांना मंडळीतील सदस्यांच्या हिताची चिंता नसते. जर आपण त्यांच्या मागे गेलो, तर आपण सार्वकालिक जीवनाचा मार्ग सोडून देऊ.

६. खोट्या शिक्षकांसंबंधी बायबल आपल्याला कोणता स्पष्ट सल्ला देते?

आपण खोट्या शिक्षकांपासून स्वतःचा बचाव कसा करू शकतो? यासाठी आपण नेमके काय केले पाहिजे हे बायबल आपल्याला सांगते. (रोमकर १६:१७; २ योहान ९-११ वाचा.) बायबलमध्ये अगदी स्पष्ट सांगितले आहे की आपण खोट्या शिक्षकांपासून ‘दूर राहिले’ पाहिजे. याचा अर्थ आपण त्यांना पूर्णपणे टाळले पाहिजे. एखाद्या व्यक्‍तीला संसर्गजन्य रोग झाला असल्यास डॉक्टर ज्याप्रमाणे आपल्याला त्या व्यक्‍तीपासून दूर राहण्यास सांगतात, त्याचप्रमाणे बायबलमधील ही ताकीद आहे. डॉक्टरांना माहीत असते की जर तुम्हाला या रोगाचा संसर्ग झाला तर तुमचा मृत्यू होईल. म्हणूनच ते तुम्हाला अगदी स्पष्ट इशारा देतात आणि साहजिकच तुम्ही त्यांनी सांगितल्याप्रमाणेच कराल. धर्मत्यागी लोक वेडे आहेत, म्हणजेच त्यांची मानसिकता विकृत झालेली आहे असे बायबल म्हणते. आणि ते आपल्या शिकवणींच्या माध्यमाने इतरांनाही आपल्यासारखाच विचार करायला लावतात. (१ तीम. ६:३, ४) यहोवा देव त्या चांगल्या डॉक्टरांसारखा आहे. तो आपल्याला खोट्या शिक्षकांपासून दूर राहण्याची स्पष्ट ताकीद देतो. त्याच्या या ताकिदीचे नेहमी पालन करण्याचा आपण निश्‍चय केला पाहिजे.

७, ८. (क) खोट्या शिक्षकांपासून दूर राहण्यासाठी आपण काय केले पाहिजे? (ख) तुम्ही खोट्या शिक्षकांपासून दूर राहण्याचा दृढ संकल्प का केला आहे?

खोट्या शिक्षकांपासून दूर राहण्यासाठी आपण काय केले पाहिजे? आपण त्यांच्याशी बोलत नाही किंवा आपल्या घरांत त्यांचे स्वागत करत नाही. तसेच आपण त्यांची पुस्तके वाचत नाही, टीव्हीवर त्यांचे कार्यक्रम बघत नाही, इंटरनेटवर त्यांनी लिहिलेली माहिती वाचत नाही किंवा या माहितीबद्दल आपल्या प्रतिक्रिया नोंदवत नाही. धर्मत्यागी लोकांपासून दूर राहण्याचा असा दृढनिश्‍चय आपण का केला आहे? याचे पहिले कारण म्हणजे सत्याचा उगम असलेल्या यहोवा देवावर आपले प्रेम आहे. त्यामुळे देवाच्या वचनातील सत्याच्या विरोधात असलेल्या खोट्या शिकवणी आपण ऐकू इच्छित नाही. (स्तो. ३१:५; योहा. १७:१७) तसेच, ही अद्‌भुत सत्ये शिकवण्यासाठी यहोवा ज्या संघटनेचा उपयोग करतो त्या संघटनेवरही आपले प्रेम आहे. देवाचे नाव काय आहे व त्याचा अर्थ काय आहे, देवाचा या पृथ्वीबद्दल काय उद्देश आहे, मृत्यू झाल्यावर आपले काय होते, तसेच पुनरुत्थानाची आशा या सर्व गोष्टींविषयी यहोवाच्या संघटनेनेच आपल्याला खरे ज्ञान दिले आहे. ही व अशी इतर सत्ये पहिल्यांदा समजली तेव्हा तुम्हाला किती आनंद झाला होता हे तुम्हाला आठवते का? तर मग, खोटे शिक्षक पसरवत असलेल्या फसव्या शिकवणींवर विश्‍वास ठेवून, तुम्हाला सत्य शिकवणाऱ्‍या देवाच्या संघटनेकडे कधीही पाठ फिरवू नका.—योहा. ६:६६-६९.

खोट्या शिक्षकांनी काहीही सांगितले तरी आपण त्यांच्या मागे जाणार नाही! जे पाणी नसलेल्या विहिरींसारखे आहेत त्यांच्यामागे जाणे व्यर्थ आहे. आणि जे अशा लोकांचे ऐकतात त्यांची निराशाच होईल. यहोवाला व त्याच्या संघटनेला एकनिष्ठ राहण्याचा आपण दृढ संकल्प केला आहे. या संघटनेने आजवर कधीही आपली निराशा केलेली नाही. उलट, देवाची संघटना नेहमी आपल्याला त्याच्या वचनातील सत्याचे शुद्ध पाणी मुबलक प्रमाणात पुरवते.—यश. ५५:१-३; मत्त. २४:४५-४७.

‘कहाण्यांवर’ विश्‍वास ठेवू नका

९, १०. पौलाने तीमथ्याला कहाण्यांसंबंधी कोणती ताकीद दिली? कहाण्यांविषयी ताकीद देताना पौलाच्या मनात कदाचित काय असावे? (तळटीपदेखील पाहा.)

रस्त्यावरील दिशा दाखवणारा फलक एखाद्याने चुकीच्या दिशेला वळवल्यामुळे आपली दिशाभूल होऊ शकते. कधीकधी, फलक चुकीची दिशा दाखवत आहे हे सहज ओळखता येते. पण, इतर वेळी हे तितके सोपे नसते. सैतानाकडून येणाऱ्‍या खोट्या शिकवणींबाबतही तसेच आहे. जर आपण काळजी घेतली नाही तर यांपैकी काही शिकवणींमुळे आपली सहज फसवणूक होऊ शकते. प्रेषित पौल आपल्याला अशा खोट्या शिकवणींविरुद्ध इशारा देतो. तो या शिकवणींना ‘कहाण्या’ म्हणतो. (१ तीमथ्य १:३, ४ वाचा.) या कहाण्या काय आहेत आणि आपण त्यांकडे लक्ष देण्याचे कसे टाळू शकतो? सार्वकालिक जीवनाच्या मार्गावर टिकून राहण्यासाठी या प्रश्‍नांची उत्तरे मिळवणे महत्त्वाचे आहे.

१० कहाण्यांबाबतची ताकीद पौलाने ख्रिस्ती मंडळीत वडील असलेल्या तीमथ्यास पहिले पत्र लिहिताना दिली. पौलाने तीमथ्याला मंडळी शुद्ध ठेवण्यास व यहोवाला एकनिष्ठ राहायला बंधुभगिनींना साहाय्य करण्यास सांगितले. (१ तीम. १:१८, १९) या ठिकाणी ‘कहाण्या’ असे भाषांतर केलेला जो मूळ ग्रीक शब्द पौलाने वापरला, त्याचा अर्थ “असत्य” किंवा “काल्पनिक कथा” असा होतो. एका पुस्तकानुसार, कहाणी म्हणजे वास्तवाशी कोणताही संबंध नसलेली एक धार्मिक कथा. (दी इंटरनॅशनल स्टॅन्डर्ड बायबल एन्सायक्लोपिडिया) कदाचित पौल अशा खोट्या धार्मिक धारणांविषयी बोलत असावा ज्या लोकांच्या कल्पनांवर आधारित असलेल्या व मनात जिज्ञासा उत्पन्‍न करणाऱ्‍या लोककथांमुळे पसरवल्या जातात. * पौलाने या कहाण्या धोकेदायक असल्याचे सांगितले, कारण त्यांमुळे ‘वाद उत्पन्‍न होतात.’ याचा अर्थ जे लोक अशा कहाण्यांकडे लक्ष देतात त्यांच्या मनात यांतील खोट्या माहितीविषयी निरनिराळे प्रश्‍न उत्पन्‍न होतात आणि मग ते त्या प्रश्‍नांची उत्तरे शोधण्यात आपला वेळ घालवतात. सैतान या काल्पनिक कहाण्यांचा व खोट्या धार्मिक धारणांचा उपयोग करून लोकांना सर्वात महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला लावतो. पौलाने अगदी स्पष्ट सल्ला दिला की आपण अशा कहाण्यांकडे कधीही लक्ष देऊ नये!

११. लोकांची फसवणूक करण्यासाठी सैतान खोट्या धर्माचा कशा प्रकारे उपयोग करतो? आपण कोणत्या ताकिदीकडे लक्ष दिले पाहिजे?

११ खबरदारी न बाळगल्यास आपल्यालाही फसवू शकतील अशा काही कहाण्या कोणत्या आहेत? कोणतीही धार्मिक शिकवण जी आपल्याला “सत्य ऐकण्यापासून” परावृत्त करू शकते तिला कहाणी म्हणता येईल. (२ तीम. ४:३, ४) सैतान अतिशय धूर्त आहे. तो खोट्या धर्माच्या माध्यमाने लोकांची फसवणूक करतो. म्हणूनच बायबलमध्ये सांगितले आहे की तो “तेजस्वी देवदूताचे” सोंग घेतो. (२ करिंथ. ११:१४) उदाहरणार्थ, ख्रिस्ती धर्मजगतातील पंथ आपण ख्रिस्ताचे अनुयायी असल्याचा दावा करतात. पण दुसरीकडे ते त्रैक्य व नरकाग्नी यांसारख्या खोट्या शिकवणींचाही प्रसार करतात. तसेच, मृत्यूच्या वेळी शरीर नष्ट होते पण मानवाचा एक भाग त्यानंतरही अस्तित्वात राहतो असेही ते शिकवतात. बऱ्‍याच लोकांचा असा समज आहे की नाताळ व ईस्टर यांसारखे सण देवाला संतोषवितात, पण या सणांशी संबंधित असलेल्या चालीरिती मुळात खोट्या धर्मांपासून आलेल्या आहेत. जर आपण खोट्या धर्मापासून स्वतःला वेगळे करण्याच्या व ‘जे अशुद्ध त्याला न शिवण्याच्या’ देवाने दिलेल्या ताकिदीकडे लक्ष दिले तर अशा सर्व धार्मिक कहाण्यांमुळे आपली कधीही दिशाभूल होणार नाही.—२ करिंथ. ६:१४-१७.

१२, १३. (क) सैतानाकडून येणाऱ्‍या तीन खोट्या धारणा कोणत्या आहेत? या प्रत्येक धारणेबाबतचे सत्य काय आहे? (ख) सैतानाच्या कहाण्यांमुळे आपली फसवणूक होऊ नये म्हणून आपण काय केले पाहिजे?

१२ सैतानाकडून येणाऱ्‍या आणखीही काही खोट्या धारणा आहेत ज्यांपासून सांभाळून न राहिल्यास आपली फसवणूक होऊ शकते. यांपैकी तीन खोट्या धारणांची आपण चर्चा करू या. पहिली खोटी धारणा अशी की: तुम्ही मनात येईल तसे वागू शकता; योग्य काय व अयोग्य काय हे तुमचे तुम्ही ठरवू शकता. टीव्हीवर, चित्रपटांत, मासिकांत, वृत्तपत्रांत तसेच इंटरनेटवर आपण कित्येकदा हे ऐकतो. अर्थातच हे खोटे आहे. पण वारंवार हेच ऐकल्यामुळे आपणही याच प्रकारे विचार करायला लागून, जगातील अनैतिक विचारांचे अनुकरण करू लागण्याची शक्यता आहे. सत्य तर हे आहे, की योग्य काय आणि अयोग्य काय याविषयी आपल्याला देवाच्या मार्गदर्शनाची गरज आहे. (यिर्म. १०:२३) दुसरी खोटी धारणा म्हणजे: देव कधीही या पृथ्वीवरील परिस्थिती बदलणार नाही. या धारणेमुळे लोक केवळ आजच्यापुरताच विचार करतात. त्यांना भविष्याची किंवा देवाला आपले वागणे आवडेल किंवा नाही याची पर्वा नाही. आपणही त्यांच्यासारखाच विचार करू लागल्यास देवाच्या सेवेत आपण “निष्क्रिय व निष्फळ” बनण्याची शक्यता आहे. (२ पेत्र १:८) खरे पाहता, यहोवा लवकरच पृथ्वीवरील परिस्थिती बदलणार आहे. तेव्हा, आपल्याला या गोष्टीवर पूर्ण भरवसा असल्याचे आपण आपल्या जीवनातून दाखवून दिले पाहिजे. (मत्त. २४:४४) तिसरी खोटी धारणा ही आहे की: देवाला व्यक्‍तिशः तुमची काळजी नाही. सैतान आपल्याला असे पटवून देऊ इच्छितो की आपण देवाच्या प्रेमाच्या लायकीचे नाही. या लबाडीवर विश्‍वास ठेवल्यास कदाचित आपण यहोवाची सेवा करायचे सोडून देऊ. पण सत्य हे आहे की यहोवाच्या सेवकांपैकी प्रत्येकावर त्याचे प्रेम आहे आणि प्रत्येकाला तो अतिशय महत्त्वाचा लेखतो.—मत्त. १०:२९-३१.

१३ सैतानाच्या जगातील लोकांसारखा विचार न करण्याची आपण सतत खबरदारी बाळगली पाहिजे. कधीकधी त्यांचे म्हणणे व विचार खरे आहेत असे आपल्याला वाटू शकते. पण सैतान आपली फसवणूक करू इच्छितो आणि लोकांना फसवण्यात त्याच्याइतका तरबेज दुसरा कोणीही नाही हे नेहमी आठवणीत असू द्या. सैतानाच्या कहाण्यांमुळे आपली फसवणूक होऊ नये असे वाटत असल्यास आपण बायबलमधील ताकिदींकडे लक्ष दिलेच पाहिजे.—२ पेत्र १:१६.

“सैतानाच्या मागे” जाऊ नका

१४. काही तरुण विधवांना पौलाने कोणता इशारा दिला? आपण सर्वांनीच या इशाऱ्‍याकडे लक्ष देण्याची गरज का आहे?

१४ समजा तुम्हाला रस्त्यावर एक फलक दिसतो ज्यावर असे लिहिलेले आहे: “सैतानाच्या मागे जाण्याचा मार्ग.” साहजिकच कोणताही ख्रिस्ती त्या दिशेने जाऊ इच्छिणार नाही. पण कधीकधी खरे ख्रिस्तीसुद्धा “सैतानाच्या मागे” जाऊ लागण्याची शक्यता आहे. हे कशा प्रकारे घडू शकते याविषयी पौलाने इशारा दिला. (१ तीमथ्य ५:११-१५ वाचा.) तो खरेतर त्या काळच्या मंडळीतील काही तरुण विधवांविषयी लिहीत होता, पण त्याने दिलेल्या सल्ल्यावरून आपण सर्व जण धडा घेऊ शकतो. आपण सैतानाच्या मागे जात आहोत असे त्या विधवांना वाटत नव्हते, पण त्यांच्या वागण्याबोलण्यावरून त्या नेमके तेच करत असल्याचे दिसून आले. आपण कशा प्रकारे नकळत सैतानाच्या मागे जाण्याचे टाळू शकतो? आता आपण चहाडी करण्याविषयी म्हणजेच इतरांबद्दल वाईट गोष्टी बोलण्याविषयी पौलाने दिलेल्या सल्ल्यावर चर्चा करू या.

१५. सैतानाची काय इच्छा आहे? पौलाने दिलेल्या माहितीनुसार सैतान आपल्याला त्याच्या इच्छेप्रमाणे वागायला लावण्यास कोणत्या गोष्टींचा उपयोग करतो?

१५ आपण आपल्या विश्‍वासांविषयी बोलावे असे सैतानाला वाटत नाही. सुवार्तेचा प्रचार आपण बंद करावा असे त्याला वाटते. (प्रकटी. १२:१७) आपण निरर्थक गोष्टींमध्ये किंवा यहोवाच्या लोकांत ज्यांमुळे कलह निर्माण होतील अशा गोष्टींमध्ये आपला वेळ घालवावा असे सैतानाला वाटते. सैतान आपल्याला त्याच्या इच्छेप्रमाणे वागायला लावण्यास कोणत्या गोष्टींचा उपयोग करतो याविषयी पौलाने सांगितले. त्याने म्हटले की त्याच्या काळातील विधवा “आळशी . . . वटवट्या” होत्या. या विधवा आपला बराचसा वेळ ओळखीच्या लोकांच्या घरी जाण्यात व अनावश्‍यक विषयांवर गप्पागोष्टी करण्यात घालवायच्या. आपण त्यांच्यासारखे न वागण्याची काळजी घेतली पाहिजे. उदाहरणार्थ, ज्या गोष्टी महत्त्वाच्या नसतात आणि कधीकधी तर खऱ्‍याही नसतात, अशा गोष्टींविषयी ई-मेल्स वाचण्यात व इतरांना पाठवण्यात कदाचित आपला आणि इतरांचाही बराच वेळ वाया जाऊ शकतो. पौलाने सूचित केले की त्याच्या काळातील त्या विधवा चहाडखोरही होत्या. चहाड्या करणारे कधीकधी इतरांची बदनामी करतात. हे अतिशय धोकेदायक आहे कारण चहाडी करता करता आपण इतरांची निंदा करण्याची, म्हणजेच, त्यांच्याबद्दल खोटी माहिती पसरवण्याची चूक करून बसू शकतो. अशा खोटेपणामुळे सहसा भांडणतंटे निर्माण होतात. (नीति. २६:२०) जे दुसऱ्‍यांबद्दल खोटी माहिती पसरवतात, त्यांना याची कल्पना नसली, तरीसुद्धा ते दियाबल सैतानाचे अनुकरण करत असतात. * यानंतर, पौलाने म्हटले की त्या विधवा “लुडबुड्या” आहेत. याचा अर्थ, त्या इतरांच्या निजी व्यवहारांत दखल देऊन, त्यांनी काय करावे किंवा करू नये हे त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत होत्या. कोणालाही असे करण्याचा अधिकार नाही. वर उल्लेख केलेल्या सर्व धोकेदायक गोष्टींमुळे यहोवाने आपल्याला दिलेल्या सर्वात महत्त्वाच्या कार्यापासून आपले लक्ष विचलित होऊ शकते. आपण देवाच्या राज्याचा प्रचार करण्यासाठी आपला वेळ खर्च केला पाहिजे. जर आपण हे कार्य करायचे थांबवले तर आपण सैतानाचे अनुकरण करू लागू. आणि जर आपण सैतानाची बाजू घेतली तर आपण यहोवाचे विरोधी बनू. आपण कोणाची बाजू घेणार हे प्रत्येकाने ठरवणे गरजेचे आहे.—मत्त. १२:३०.

१६. सैतानाचे अनुकरण करायचे नसल्यास आपण काय केले पाहिजे?

१६ बायबल आपल्याला काय सांगते याकडे लक्ष दिल्यास आपण सैतानाचे अनुकरण करणार नाही. याबाबतीत आपली मदत करू शकतील अशा काही गोष्टींचा पौल उल्लेख करतो. तो म्हणतो की आपण “प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर” असले पाहिजे. (१ करिंथ. १५:५८) आपण यहोवाच्या सेवेत परिश्रम करतो तेव्हा अनावश्‍यक गोष्टींसाठी किंवा धोकेदायक ठरू शकतील अशा गोष्टींसाठी आपल्याजवळ वेळच उरत नाही. (मत्त. ६:३३) तसेच, आपल्या तोंडून “उन्‍नतीकरिता जे चांगले तेच मात्र निघो” असेही पौल सांगतो. (इफिस. ४:२९) कधीही इतरांची चहाडी करू नका आणि जे चहाडी करतात त्यांचे ऐकूही नका. (“वाऱ्‍यासोबत उडून गेलेली पिसे” या शीर्षकाची चौकट पाहा.) आपल्या बंधुभगिनींवर भरवसा ठेवा आणि त्यांचा आदर करा. असे केल्यास तुम्ही नेहमी त्यांच्याबद्दल चांगलेच बोलाल. पौल आपल्याला असेही सांगतो की आपण सर्वांनी “आपापलेच कामकाज” करण्याची आवड धरावी. (१ थेस्सलनी. ४:११, पं.र.भा.) लोकांबद्दल आस्था जरूर व्यक्‍त करा पण हे आदरपूर्वक करा. नेहमी आठवणीत असू द्या, की काही गोष्टी निजी स्वरूपाच्या असतात, आणि त्यांबद्दल बोलण्याची किंवा इतरांना त्या सांगण्याची कदाचित एखाद्याची इच्छा नसेल. तसेच, ज्या गोष्टींबद्दल प्रत्येकाने आपापला निर्णय घेतला पाहिजे, अशा गोष्टींबद्दल इतरांसाठी निर्णय घेण्याचा आपण प्रयत्न करू नये.—गलती. ६:५.

१७. (क) आपण ज्यांबद्दल चर्चा केली त्या ताकिदी यहोवा आपल्याला का देतो? (ख) आपण कोणता निश्‍चय केला पाहिजे?

१७ आपण कोणत्या गोष्टींच्या मागे जाऊ नये हे इतक्या स्पष्टपणे सांगितल्याबद्दल आपण यहोवाचे किती आभारी आहोत! आपण ज्यांबद्दल चर्चा केली त्या ताकिदी, आपल्यावर प्रेम असल्यामुळेच यहोवा आपल्याला देतो हे आपण नेहमी आठवणीत ठेवले पाहिजे. सैतानाकडून आपली फसवणूक होऊ नये आणि आपल्याला त्रास किंवा दुःख होऊ नये असे त्याला वाटते. यहोवा आपल्याला जो मार्ग निवडण्याचे प्रोत्साहन देतो तो सोपा नक्कीच नाही. पण सार्वकालिक जीवनाकडे नेणारा हा एकच मार्ग आहे. (मत्त. ७:१४) “हाच मार्ग आहे; याने चला,” असे यहोवा आपल्याला सांगतो तेव्हा त्याच्या सांगण्याकडे लक्ष देण्याचा आपण निश्‍चय केला पाहिजे.—यश. ३०:२१.

[तळटीपा]

^ धर्मत्याग म्हणजे खऱ्‍या उपासनेविरुद्ध बंड करणे व ती सोडून देणे.

^ टॉबिट किंवा टोबायस नावाचे पुस्तक बायबलचा भाग आहे असे काहींचे म्हणणे आहे. हे पुस्तक पौलाच्या काळात प्रचलित असलेल्या कहाण्यांचे एक उदाहरण आहे. ते ख्रिस्तपूर्व तिसऱ्‍या शतकात लिहिण्यात आलेले पुस्तक असून त्यांत कित्येक खोट्या धारणा व जादूटोण्याशी संबंधित कथा आढळतात. अगदी अशक्य असणाऱ्‍या गोष्टीही या पुस्तकात खऱ्‍या असल्याचे सांगितले आहे.—इन्साइट ऑन द स्क्रिप्चर्स, खंड १, पृष्ठ १२२ पाहा.

^ “दियाबल” याकरता असलेल्या ग्रीक शब्दाचा अर्थ, “इतरांना हानी करण्यासाठी त्यांच्याबद्दल खोटे सांगणारा” असा होतो. पहिली लबाडी सांगणाऱ्‍या सैतानाला या नावानेदेखील ओळखले जाते.—योहा. ८:४४; प्रकटी. १२:९, १०.

तुमचे उत्तर काय?

खालील शास्त्रवचनांतील ताकिदींकडे तुम्ही लक्ष देत आहात हे तुम्ही कसे दाखवू शकता?

२ पेत्र २:१-३

१ तीमथ्य १:३, ४

१ तीमथ्य ५:११-१५

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१९ पानांवरील चौकट/चित्रे]

वाऱ्‍यासोबत उडून गेलेली पिसे

इतरांची चहाडी केल्याने काय परिणाम होतो हे दाखवणारी एक जुनी यहुदी नीतिकथा आहे.

एका मनुष्याने आपल्या गावातल्या सगळ्यात सुज्ञ माणसाबद्दल अनेक लोकांना खोटे सांगितले. काही काळाने, खोटे सांगणाऱ्‍या मनुष्याला पश्‍चात्ताप झाला आणि तो सुज्ञ माणसाची क्षमा मागायला गेला. त्याने सुज्ञ माणसाला विचारले: “तुमची क्षमा मिळण्यासाठी मी काय करावे?” सुज्ञ माणसाने त्याला म्हटले: “तू एक काम कर. पिसे भरून बनवलेली एक उशी घे. ती मधोमध फाड आणि पिसांना वाऱ्‍यासोबत उडून जाऊ दे.” त्या मनुष्याला सुज्ञ माणसाच्या या विनंतीचा उद्देश कळला नाही, पण त्याने त्याच्या सांगण्यानुसार केले. नंतर तो सुज्ञ माणसाकडे आला आणि त्याला विचारले: “आता तर तुम्ही मला क्षमा कराल ना?” सुज्ञ माणसाने उत्तर दिले: “आधी जाऊन सर्व पिसे गोळा कर.” त्या मनुष्याने म्हटले: “पण, ते कसे शक्य आहे? पिसे तर वाऱ्‍यासोबत उडून गेली आहेत. मी ती गोळा करू शकत नाही.” तेव्हा सुज्ञ माणसाने त्याला उत्तर दिले: “पिसे जशी सगळीकडे पसरली तशीच तू सांगितलेली खोटी माहिती कित्येक लोकांपर्यंत पोहचली. आणि जशी तू पिसे गोळा करून आणू शकत नाहीस, तसेच तू सांगितलेली माहिती आता त्या लोकांच्या मनातून काढू शकत नाहीस.”

या कथेतून मिळणारा धडा अगदी स्पष्ट आहे. एखादी गोष्ट बोलून गेल्यावर आपण ती बदलू शकत नाही. आणि कधीकधी आपल्या बोलण्यामुळे झालेले दुष्परिणामही आपण बदलू शकत नाही. म्हणूनच, दुसऱ्‍यांबद्दल एखादी वाईट गोष्ट आपल्या तोंडातून निघण्याआधी, आपले शब्द हे वाऱ्‍यासोबत उडून जाणाऱ्‍या पिसांसारखे असतात हे आपण आठवणीत ठेवू या.

[१६ पानांवरील चित्र]

काही जण कशा प्रकारे धर्मत्यागी लोकांना आपल्या घरात घेतात?