व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्ही देवाच्या विसाव्यात प्रवेश केला आहे का?

तुम्ही देवाच्या विसाव्यात प्रवेश केला आहे का?

तुम्ही देवाच्या विसाव्यात प्रवेश केला आहे का?

‘देवाचे वचन सजीव, सक्रिय आहे.’—इब्री ४:१२.

१. आज आपण कशा प्रकारे देवाच्या विसाव्यात प्रवेश करतो? यहोवाच्या आज्ञांचे पालन करणे कठीण का असू शकते?

 आपण यहोवाच्या आज्ञांचे पालन केले आणि त्याच्या संघटनेसोबत मिळून काम केले, तर आज आपण त्याच्या विसाव्यात प्रवेश करू शकतो हे याआधीच्या लेखात आपण शिकलो. आपल्या आज्ञाधारकतेवरून आपण यहोवाला हे दाखवतो की त्याचा उद्देश पूर्ण व्हावा अशी आपली इच्छा आहे. पण कधीकधी, यहोवाच्या आज्ञांचे पालन करणे आपल्याला कठीण वाटू शकते. उदाहरणार्थ, आपल्याला आवडत असलेली एखादी गोष्ट करण्याचे आपण सोडून द्यावे अशी यहोवाची इच्छा असल्याचे आपण शिकतो, तेव्हा लगेच त्याच्या आज्ञेचे पालन करणे आपल्याला कठीण जाऊ शकते. असे आपल्यासोबत घडते, तेव्हा आपण “ऐकून घेण्यास तयार” असायला शिकले पाहिजे. (याको. ३:१७, सुबोध भाषांतर) या लेखात आपण अशा काही परिस्थितींची चर्चा करणार आहोत ज्यांमुळे आपण सर्व वेळी यहोवाच्या आज्ञांचे पालन करण्यास खरोखर तयार आहोत की नाही हे दाखवण्याची आपल्याला संधी मिळेल.

२, ३. यहोवाचे मन आनंदित करण्यासाठी आपण काय करत राहिले पाहिजे?

तुम्हाला आपल्या जीवनात बदल करण्याची गरज आहे हे तुम्ही बायबलमधून शिकता तेव्हा तसे करण्यास तुम्ही तयार असता का? याचा विचार करा: बायबल म्हणते की यहोवा ज्या लोकांना आपल्या संघटनेत आणू इच्छितो ते “सर्व राष्ट्रांतील निवडक वस्तु” आहेत. (हाग्ग. २:७) याचा अर्थ, देव अशा लोकांना निवडतो जे त्याच्या नजरेत मौल्यवान आहेत, कारण जीवनात योग्य ते करण्याचा ते प्रयत्न करतात. आपण बायबलचा अभ्यास करायला सुरुवात केली होती, तेव्हा आपल्यापैकी बहुतेक जण चुकीच्या गोष्टी करत होते हे खरे आहे. पण, देवावर व त्याच्या पुत्रावर आपले प्रेम असल्यामुळे आणि देवाचे मन आनंदित करण्याची आपली इच्छा असल्यामुळे, आपण आनंदाने आपल्या विचारसरणीत व आचरणात महत्त्वाचे बदल केले. आपण मदतीसाठी यहोवाला प्रार्थना केली आणि जीवनात आवश्‍यक ते बदल करण्यासाठी खूप परिश्रम केले. शेवटी, आपण बाप्तिस्मा घेऊ शकलो आणि यहोवाची स्वीकृती प्राप्त करू शकलो.कलस्सैकर १:९, १० वाचा.

पण आपण अजूनही अपरिपूर्ण आहोत. आपल्याला अजूनही आपल्या जीवनात बदल करण्याची आणि योग्य ते करण्यासाठी परिश्रम करण्याची गरज आहे. पण आपण यहोवाचे मन आनंदित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत राहिलो, तर तो आपल्याला मदत करण्याचे वचन देतो.

आपल्याला जीवनात बदल करावे लागतात तेव्हा . . .

४. आपल्याला कोणत्या तीन मार्गांनी शास्त्रवचनीय सल्ला मिळण्याची शक्यता आहे?

आपल्या जीवनात बदल करण्याआधी, आपल्याला कोणते बदल करण्याची गरज आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे. हे जाणून घेण्यासाठी यहोवा विविध मार्गांनी आपली मदत करतो. आपल्या विचारसरणीच्या किंवा आचरणाच्या बाबतीत आपण कोठेतरी चुकत आहोत हे दाखवण्यासाठी यहोवा राज्य सभागृहातील एखाद्या भाषणाचा किंवा आपल्या नियतकालिकांतील एखाद्या लेखाचा उपयोग करू शकतो. पण, एखादे भाषण ऐकल्यानंतरही किंवा एखादे प्रकाशन वाचल्यानंतरही, आपल्याला जीवनात बदल करण्याची गरज आहे हे कधीकधी आपल्याला समजत नाही. म्हणून, आपली चूक प्रेमळपणे सुधारण्यासाठी यहोवा मंडळीतील एखाद्या बंधू किंवा बहिणीचा उपयोग करू शकतो.गलतीकर ६:१ वाचा.

५. कोणी आपली चूक सुधारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा काही वेळा आपण कसे वागतो? ख्रिस्ती वडिलांनी आपल्याला मदत करण्याचा सतत प्रयत्न का केला पाहिजे?

दुसरा एखादा अपरिपूर्ण मनुष्य अगदी प्रेमळपणे जरी आपली चूक सुधारत असला, तरी त्याचा सल्ला स्वीकारणे आपल्याला खूप कठीण जाऊ शकते. पण यहोवा मंडळीतील वडिलांना आज्ञा करतो की त्यांनी “सौम्य वृत्तीने” आपल्याला ‘ताळ्यावर आणावे,’ म्हणजे प्रेमळपणे आपली चूक सुधारावी. (गलती. ६:१) आपण त्यांची मदत स्वीकारली, तर आपण यहोवाच्या नजरेत आणखी मौल्यवान बनू. अर्थात, प्रार्थनेत आपण नेहमीच यहोवाला असे म्हणत असतो की आम्ही अपरिपूर्ण आहोत आणि अनेक चुका करतो. पण, आपण केलेली एखादी चूक एखादे वडील आपल्या लक्षात आणून देतात, तेव्हा काही वेळा आपण वेगळे वागतो. आपण जे काही केले त्याबद्दल आपण कारणे सांगण्याचा प्रयत्न करतो, किंवा आपण केलेली चूक इतकी गंभीर नव्हती असे आपण म्हणतो. कदाचित आपण असे म्हणतो, की ज्या व्यक्‍तीने आपली चूक सुधारण्याचा प्रयत्न केला, ती आपल्याला पसंत करत नाही किंवा ती आपल्याशी प्रेमळपणे बोलली नाही. (२ राजे ५:११) किंवा आपल्याला जी गोष्ट ऐकण्याची इच्छा नाही नेमकी तीच गोष्ट एखाद्या वडिलांनी आपल्याला सांगितली, तर आपल्याला खूप राग येऊ शकतो. उदाहरणार्थ, आपल्या कुटुंबातील एक जण काहीतरी चुकीचे करत आहे किंवा आपला पेहराव उचित नाही असे कदाचित ते सांगतील. ते कदाचित शारीरिक स्वच्छतेबद्दल आपल्याला वैयक्‍तिक सल्ला देतील किंवा आपण ज्या प्रकारची करमणूक करतो त्याची यहोवाला घृणा वाटते असे ते आपल्याला सांगतील. आपण रागात असल्यामुळे, बोलू नये असे काहीतरी बोलण्याची शक्यता आहे. यामुळे आपण स्वतः दुःखी होऊ शकतो व ज्या बांधवाने आपल्याला मदत करण्याचा प्रयत्न केला तोदेखील दुःखी होऊ शकतो. पण नंतर जेव्हा आपला राग थंड होतो, तेव्हा सहसा आपण ही गोष्ट स्वीकारतो की त्या बांधवाने जे काही म्हटले होते ते आपल्या भल्यासाठी होते.

६. देवाचे वचन कशा प्रकारे ‘मनातील विचार व हेतु ह्‍यांचे परीक्षण’ करण्यास समर्थ आहे?

हा लेख, इब्री लोकांस ४:१२ या शास्त्रवचनावर आधारित असून, त्यात असे म्हटले आहे की देवाचे वचन “सक्रिय” आहे. याचा अर्थ, देवाच्या वचनात इतके सामर्थ्य आहे की ते लोकांना आपल्या जीवनात बदल करण्यास मदत करते. बाप्तिस्मा घेण्याआधी आपल्याला जे बदल करण्याची गरज होती ते बदल करण्यास देवाच्या वचनाने आपली मदत केली. आणि बाप्तिस्म्यानंतर करावे लागणारे बदल करण्यासही बायबल आपली मदत करू शकते. पौलाने इब्री ख्रिश्‍चनांना लिहिलेल्या आपल्या पत्रात असेही लिहिले की देवाचे वचन “जीव व आत्मा . . . ह्‍यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतु ह्‍यांचे परीक्षक असे आहे.” (इब्री ४:१२) या वचनातील “जीव” हा शब्द, ग्रीक भाषेतील “सायके” या शब्दाचे भाषांतर आहे. या ग्रीक शब्दाचे तीन अर्थ आहेत: लोक, प्राणी, किंवा एका व्यक्‍तीचे किंवा प्राण्याचे जीवन. या ठिकाणी हा ग्रीक शब्द एक व्यक्‍ती बाहेरून जशी दिसते त्यास सूचित करतो. या वचनातील “आत्मा” हा शब्द, ग्रीक भाषेतील “न्यूमा” या शब्दाचे भाषांतर आहे. या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. उदाहरणार्थ, हा शब्द मनोवृत्तीला सूचित करू शकतो. या वचनात, हा शब्द आपल्या आंतरिक प्रवृत्तीला किंवा आपण आतून कसे आहोत याला सूचित करतो. त्यामुळे, पौल येथे असे म्हणत होता की देव आपल्याकडून काय अपेक्षा करतो हे आपल्याला समजते तेव्हा आपण आतून कसे आहोत हे आपल्या आचरणावरून दिसून येते. कधीकधी, इतर लोक जे पाहतात आणि आपण आतून खरोखर कसे आहोत यात फरक असतो का? (मत्तय २३:२७, २८ वाचा.) आता आपण ज्या परिस्थितींविषयी चर्चा करणार आहोत, त्या परिस्थितींत तुम्ही काय कराल याचा विचार करा.

यहोवाच्या संघटनेसोबत प्रगती करत राहा

७, ८. (क) काही इब्री ख्रिश्‍चन अजूनही मोशेच्या नियमशास्त्रातील काही नियमांचे पालन का करू इच्छित होते? (ख) ते यहोवाच्या उद्देशाच्या विरुद्ध वागत होते असे आपण का म्हणू शकतो?

आपल्यापैकी अनेक जणांना नीतिसूत्रे ४:१८ या वचनातील शब्द चांगल्या प्रकारे माहीत आहेत. तेथे असे म्हटले आहे: “धार्मिकांचा मार्ग मध्यान्हापर्यंत उत्तरोत्तर वाढणाऱ्‍या उदयप्रकाशासारखा आहे.” याचा अर्थ, जसजसा काळ जातो, तसतसे यहोवा आपल्याकडून काय अपेक्षा करतो याची अधिकाधिक चांगली समज आपल्याला प्राप्त होते आणि ज्यामुळे यहोवाला आनंद होतो ते आपण आणखी चांगल्या प्रकारे करतो.

याआधीच्या लेखातून आपण शिकलो, की येशूच्या मृत्यूनंतर अनेक इब्री ख्रिश्‍चन अजूनही मोशेच्या नियमशास्त्राचे पालन करू इच्छित होते. (प्रे. कृत्ये २१:२०) ख्रिश्‍चनांना मोशेच्या नियमशास्त्राचे पालन करण्याची गरज नाही हे पौलाने त्यांना स्पष्ट करून सांगितले. तरीसुद्धा, यहोवा आपल्याकडून काय अपेक्षा करतो हे अद्यापही त्यांच्यापैकी काहींनी मान्य केले नाही. (कलस्सै. २:१३-१५) कदाचित त्यांनी असा विचार केला असेल, की आपण जर मोशेच्या नियमशास्त्रातील काही नियमांचे पालन करत राहिलो, तर यहुदी धर्म मानणारे आपला छळ करणार नाहीत. पण, पौलाने इब्री ख्रिश्‍चनांना अगदी स्पष्टपणे सांगितले होते, की ते जर देवाच्या उद्देशाच्या विरोधात कार्य करत राहिले, तर ते देवाच्या विसाव्यात प्रवेश करू शकणार नाहीत. * (इब्री ४:१, २, ६; इब्री लोकांस ४:११ वाचा.) यहोवाची कृपापसंती प्राप्त करण्यासाठी, त्यांनी हे मान्य करायचे होते की आपल्या लोकांनी आता वेगळ्या प्रकारे आपली उपासना करावी अशी त्याची इच्छा आहे.

९. बायबलमधील एखाद्या शिकवणीविषयी आपली जी समज आहे त्यात विश्‍वासू व बुद्धिमान दास सुधारणा करतो तेव्हा आपल्याला कसे वाटले पाहिजे?

बायबलमधील एखाद्या शिकवणीबद्दल पूर्वी आपली जशी समज होती त्यापेक्षा वेगळ्या प्रकारे ती शिकवण समजण्यास कधीकधी विश्‍वासू व बुद्धिमान दास आपल्याला मदत करतो. त्याबद्दल आपण आनंदी असले पाहिजे. या बदलांवरून दिसून येते की आपल्याला सत्य शिकवण्यासाठी यहोवा विश्‍वासू व बुद्धिमान दासाचा उपयोग करत आहे. विश्‍वासू व बुद्धिमान दासाचे प्रतिनिधित्व करणारे नियमन मंडळ, कधीकधी बायबलमधील विशिष्ट सत्यांविषयी आपली जी समज आहे त्याचा फेरविचार करते. यात बदल करणे आवश्‍यक असल्याचे हे बांधव ठरवतात, तेव्हा याआधी जी समज देण्यात आली होती त्यात सुधार करण्यास किंवा त्यावर आणखी स्पष्टीकरण देण्यास ते घाबरत नाहीत. हे बदल केल्यामुळे काही जण विश्‍वासू व बुद्धिमान दासाविषयी वाईट बोलतील हे त्यांना माहीत आहे. पण या गोष्टीला ते सगळ्यात जास्त महत्त्व देत नाहीत. त्याऐवजी, देवाच्या उद्देशाच्या सामंजस्यात कार्य करण्याला ते सगळ्यात जास्त महत्त्व देतात. बायबलमधील एखाद्या शिकवणीविषयी आपली जी समज आहे त्यात विश्‍वासू व बुद्धिमान दास सुधारणा करतो तेव्हा तुम्हाला कसे वाटते?लूक ५:३९ वाचा.

१०, ११. आपण प्रचाराच्या नवीन पद्धती आजमावल्या पाहिजेत असे काही बायबल विद्यार्थ्यांना समजले तेव्हा त्यांनी काय केले? या उदाहरणावरून आपण काय शिकतो?

१० आपण आणखी एका उदाहरणाचा विचार करू या. सुमारे शंभर वर्षांपूर्वी, उत्तम जाहीर भाषणे देणारे काही बायबल विद्यार्थी असा विचार करायचे की भाषणे देणे हाच प्रचार करण्याचा सगळ्यात उत्तम मार्ग आहे. * त्यांना लोकांसमोर भाषणे द्यायला आवडायचे. लोक त्यांच्या भाषणांबद्दल त्यांची वाहवा करायचे तेव्हा त्यांना खरोखर खूप आनंद व्हायचा. पण नंतर, यहोवाच्या लोकांना अधिक स्पष्टपणे समजले की त्यांनी केवळ भाषणे द्यावीत अशी यहोवाची इच्छा नाही; तर, त्यांनी घरोघर जाऊन आणि इतर मार्गांनी प्रचार करावा अशी त्याची इच्छा आहे. उत्तम भाषणे देणाऱ्‍यांपैकी काही जण असे करण्यास तयार नव्हते. त्यांच्या भाषणांमुळे इतरांना वाटायचे की त्यांचे यहोवावर प्रेम आहे व ते त्याच्या आज्ञांचे पालन करतात. पण, या परिस्थितीत त्यांच्या कृत्यांवरून दिसून आले की हे खरे नव्हते. आपल्याला माहीत आहे की यहोवाला त्यांची कृत्ये आवडली नाहीत. शेवटी, त्यांनी यहोवाची संघटना सोडून दिली.—मत्त. १०:१-६; प्रे. कृत्ये ५:४२; २०:२०.

११ खासकरून सुरुवातीला, अनेक बायबल विद्यार्थ्यांनादेखील घरोघर जाऊन प्रचार करणे कठीण गेले. पण ते देवाच्या संघटनेला आज्ञाधारक व एकनिष्ठ राहिले. काही काळानंतर, घरोघर जाऊन प्रचार करणे त्यांना अधिक सोपे वाटू लागले. यहोवाने त्यांना भरभरून आशीर्वाद दिले. तुम्ही पूर्वी कधीच आजमावली नाही अशी प्रचाराची नवीन पद्धत आजमावण्यास विश्‍वासू व बुद्धिमान दास तुम्हाला सांगतो तेव्हा तुम्ही काय करता? या पद्धतीने प्रचार करणे तुम्हाला अतिशय कठीण वाटत असले, तरीसुद्धा तुम्ही विश्‍वासू व बुद्धिमान दासाचे ऐकता का?

आपली प्रिय व्यक्‍ती यहोवाला सोडते तेव्हा . . .

१२, १३. (क) “दुष्टाला आपल्यामधून घालवून द्या,” असे यहोवा आपल्याला का सांगतो? (ख) ख्रिस्ती आईवडिलांसमोर कोणती कठीण परिस्थिती निर्माण होऊ शकते?

१२ यहोवाचे मन आनंदित करण्यासाठी, सर्व मार्गांनी शुद्ध असण्याच्या देवाच्या आज्ञेचे आपण पालन केले पाहिजे ही गोष्ट आपण नक्कीच मान्य करतो. (तीत २:१४ वाचा.) पण या आज्ञेचे पालन करणे काही परिस्थितींत आपल्याला कठीण जाऊ शकते. उदाहरणार्थ, या परिस्थितीचा विचार करा: एका एकनिष्ठ ख्रिस्ती जोडप्याला एकच मुलगा आहे, आणि तो सत्य सोडून देण्याचा निर्णय घेतो. यहोवासोबतच्या व त्याच्या आईवडिलांसोबतच्या त्याच्या मैत्रीऐवजी तो ‘पापाचे क्षणिक सुख भोगण्याची’ निवड करतो. त्याच्या कृत्यांमुळे, तो मंडळीचा भाग राहू शकत नाही. त्यामुळे, मंडळी त्याला देवाच्या लोकांमधून काढून टाकते, किंवा बहिष्कृत करते.—इब्री ११:२५.

१३ असे घडते तेव्हा आईवडिलांना खूप दुःख होते. त्यांना माहीत आहे, की “बंधु म्हटलेला असा कोणी जर जारकर्मी, लोभी, मूर्तिपूजक, चहाड, मद्यपी, किंवा वित्त हरण करणारा असला तर तशाची संगत धरू नये; त्याच्या पंक्‍तीसहि बसू नये,” असे बायबल म्हणते. ते असेही म्हणते: “त्या दुष्टाला आपल्यामधून घालवून द्या.” (१ करिंथ. ५:११, १३) आणि या वचनात “कोणी” असे जे म्हटले आहे त्यात एकाच घरात राहत नसलेल्या कुटुंबीयांचा समावेश होतो हे त्यांना माहीत आहे. पण, आपल्या मुलावरील गहिऱ्‍या प्रेमामुळे, ते कदाचित असा विचार करतील: “आम्ही आमच्या मुलासोबत जास्तीत जास्त बोललं पाहिजे. आम्ही जर त्याच्यासोबत बोललो नाही, तर यहोवाकडे परत येण्यासाठी आम्ही त्याला मदत कशी करणार?” *

१४, १५. आपल्या बहिष्कृत मुलाशी आपण बोलावे की नाही हे ठरवताना आईवडिलांनी काय लक्षात ठेवले पाहिजे?

१४ त्या दुःखी आईवडिलांना पाहून आपल्यालाही दुःख होते. त्यांचा मुलगा आपले आचरण बदलण्याची निवड करू शकत होता. पण आपल्या आईवडिलांसोबत व मंडळीसोबत असण्यापेक्षा वाईट गोष्टी करत राहण्याचे त्याने पसंत केले. आईवडील आपल्या मुलाला मदत करू इच्छितात, पण तो जे करण्याचे ठरवतो त्यावर ते नियंत्रण करू शकत नाहीत. त्यामुळे, त्यांना इतके दुःख का होते हे आपण नक्कीच समजू शकतो.

१५ अशा परिस्थितीत आपले हे प्रिय बंधू व बहीण काय करतील? ते यहोवाच्या स्पष्ट आज्ञेचे पालन करतील का? हे खरे आहे, की क्वचित प्रसंगी, एखाद्या आवश्‍यक कौटुंबिक बाबीसंबंधी त्यांना आपल्या मुलासोबत बोलणे जरुरीचे असेल. पण, ते असा विचार करतील का, की आपल्या मुलाशी बोलण्याची अनेक कारणे आपल्याजवळ आहेत? याविषयी निर्णय घेताना, या बाबतीत यहोवाची इच्छा काय आहे हे त्यांनी आठवणीत ठेवले पाहिजे. यहोवा आपल्या लोकांना शुद्ध ठेवू इच्छितो हे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. म्हणूनच, मंडळीतून ‘त्या दुष्टाला घालवून द्या’ अशी आज्ञा तो देतो. वाईट कृत्य करणाऱ्‍या व्यक्‍तीने जीवनात बदल करून मंडळीत परत यावे म्हणून यहोवा त्या व्यक्‍तीला मदतही करू इच्छितो. यहोवाच्या इच्छेप्रमाणे आपलीदेखील हीच इच्छा आहे हे ख्रिस्ती आईवडील कसे दाखवू शकतात?

१६, १७. अहरोनाच्या उदाहरणावरून आपण कोणता धडा शिकतो?

१६ मोशेचा भाऊ अहरोन याच्या दोन मुलांनी जे केले त्यामुळे अहरोनाला एका कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागले. नादाब व अबीहू या त्याच्या मुलांनी यहोवाला स्वीकृत नसलेल्या पद्धतीने त्याला अर्पण सादर केले. यहोवाने स्वर्गातून अग्नी पाठवून त्यांना मारून टाकले. यामुळे अहरोनाला किती दुःख झाले असेल याचा विचार करा. अहरोन आपल्या मुलांशी बोलू शकत नव्हता. कारण ते मरण पावले होते. पण, असे आणखी काहीतरी होते ज्यामुळे अहरोनाची व त्याच्या कुटुंबाची परिस्थिती आणखी जास्त बिकट झाली होती. मोशेने अहरोनाला व त्याच्या इतर पुत्रांना सांगितले की त्यांनी आपला शोक व्यक्‍त करू नये अशी यहोवाची इच्छा आहे. मोशेने म्हटले: “तुम्ही आपल्या डोक्याचे केस मोकळे सोडू नका आणि आपली वस्त्रे फाडू नका; तसे कराल तर मराल आणि सर्व मंडळीवर कोप भडकेल.” (लेवी. १०:१-६) यातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते; ती म्हणजे, यहोवाला एकनिष्ठ नसलेल्या आपल्या कुटुंबातील सदस्यांवरील आपल्या प्रेमापेक्षा यहोवावरील आपले प्रेम जास्त गहिरे असले पाहिजे.

१७ आज, जे लोक यहोवाच्या आज्ञांचे उल्लंघन करतात अशांना तो लगेच मारून टाकत नाही. तो त्यांच्याप्रती प्रेम दाखवतो आणि त्यांनी आपली वाईट कृत्ये सोडून द्यावीत म्हणून त्यांना संधी देतो. पण, आईवडिलांनी यहोवाच्या आज्ञांचे पालन केले नाही व आपल्या बहिष्कृत मुलाशी किंवा मुलीशी बोलण्याची अनेक कारणे आपल्याजवळ आहेत असा विचार केला, तर यहोवाला कसे वाटेल?

१८, १९. कुटुंबातील सदस्य यहोवाला एकनिष्ठ राहिले, तर त्यांना कोणते आशीर्वाद मिळू शकतात?

१८ अनेक जण सांगतात की त्यांच्या कुटुंबातील सदस्य व मित्र यहोवाला एकनिष्ठ राहिले व ते त्यांच्याशी बोलले नाहीत त्यामुळे ते मंडळीत परतले. उदाहरणार्थ, एका तरुणीने मंडळीतील वडिलांना सांगितले की तिला आपल्या भावाच्या वागण्यामुळे आपली जीवनशैली बदलण्याची प्रेरणा मिळाली. तिचा भाऊ यहोवाला एकनिष्ठ राहिला व तिला बहिष्कृत केले गेले तेव्हा त्याने यहोवाच्या आज्ञेचे पालन केले. यामुळेच मंडळीत परतण्याची इच्छा तिच्या मनात निर्माण झाली.

१९ तर मग, आपण काय केले पाहिजे? जीवनातील सर्व परिस्थितींत आपण यहोवाला आज्ञाधारक राहिले पाहिजे. आपण अपरिपूर्ण असल्यामुळे, असे करणे कधीकधी आपल्याला कठीण जाऊ शकते. पण, आपण हा दृढ विश्‍वास बाळगला पाहिजे की यहोवा आपल्याला जे काही करायला सांगतो ते नेहमी आपल्या भल्यासाठी असते.

‘देवाचे वचन सजीव आहे’

२०. कोणत्या दोन मार्गांनी आपण इब्री लोकांस ४:१२ हे वचन समजू शकतो? (तळटीप पाहा.)

२० पौलाने इब्री लोकांस ४:१२ मध्ये ‘देवाचे वचन सजीव आहे,’ असे लिहिले तेव्हा तो बायबलविषयी बोलत नव्हता. * त्या अध्यायातील इतर वचनांवरून दिसते की तो देवाच्या प्रतिज्ञांविषयी बोलत होता. तो असे म्हणत होता की देवाच्या प्रतिज्ञा हमखास पूर्ण होतात. यहोवाने आपल्या वचनाविषयी असे म्हटले: “ज्या कार्याकरिता मी ते पाठविले ते केल्यावाचून मजकडे विफल होऊन परत येणार नाही.” (यश. ५५:११) म्हणून, आपण अपेक्षा केलेल्या वेळी देव त्याच्या प्रतिज्ञा पूर्ण करत नाही, तेव्हा आपण धीराने वाट पाहिली पाहिजे. यहोवा आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी कार्य करत आहे याची आपण खातरी बाळगू शकतो.—योहा. ५:१७.

२१. यहोवाची सेवा करत राहण्यास, इब्री लोकांस ४:१२ विश्‍वासू वृद्ध लोकांना कसे साहाय्यक ठरू शकते?

२१ ‘मोठ्या लोकसमुदायातील’ अनेक जण कितीतरी वर्षांपासून यहोवाची सेवा करत आहेत. (प्रकटी. ७:९) या दुष्ट जगात वृद्ध होण्याची त्यांनी अपेक्षा केली नव्हती. पण, यहोवाची सेवा करण्यासाठी ते आजही सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. (स्तो. ९२:१४) त्यांना हे माहीत आहे की ‘देवाचे वचन सजीव आहे’ आणि यहोवाने दिलेली अभिवचने नक्कीच पूर्ण होतील. (इब्री ४:१२) त्यांना हे माहीत आहे की यहोवा, पृथ्वीबद्दल व मानवांबद्दल असलेला आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी कार्य करत आहे. देवाचा उद्देश त्याच्याकरता खूप महत्त्वाचा आहे. आणि त्याचा उद्देश आपल्यालादेखील महत्त्वाचा आहे हे आपण दाखवतो तेव्हा त्याला आनंद होतो. देवाच्या विसाव्याच्या या सातव्या दिवशी, कोणतीही गोष्ट यहोवाला त्याचा उद्देश पूर्ण करण्यापासून रोखू शकत नाही. आणि त्याला हे माहीत आहे की एक समूह या नात्याने त्याचे लोक त्याच्या उद्देशाच्या सामंजस्यात कार्य करत राहतील. तुमच्याविषयी काय? तुम्ही देवाच्या विसाव्यात प्रवेश केला आहे का?

[तळटीपा]

^ यहुदी धर्माचे अनेक पुढारी मोशेच्या नियमशास्त्रातील प्रत्येक लहान-सहान गोष्टीचे पालन करण्याचा प्रयत्न करत होते. पण, येशू पृथ्वीवर आला तेव्हा ते हे मानण्यास तयार नव्हते की तोच मशीहा आहे. असे करण्याद्वारे ते देवाच्या उद्देशाच्या विरुद्ध वागले.

^ सन १९३१ पूर्वी यहोवाच्या साक्षीदारांना बायबल विद्यार्थी म्हटले जायचे.

^ आज देव आपल्यासोबत बायबलद्वारे बोलतो. बायबलमध्ये आपले जीवन बदलण्याचे सामर्थ्य आहे. म्हणून, इब्री लोकांस ४:१२ मध्ये आपण जे वाचतो ते बायबलविषयीदेखील तितकेच खरे आहे.

तुम्हाला आठवते का?

• आज देवाच्या विसाव्यात प्रवेश करण्यासाठी काय करणे गरजेचे आहे?

• देव आपल्याकडून काय अपेक्षा करतो हे आपण बायबलमधून शिकतो तेव्हा आपण देवाचे मन आनंदित करू इच्छितो हे आपण कशा प्रकारे दाखवतो?

• यहोवा आपल्याला जे करण्यास सांगतो ते करणे कोणकोणत्या परिस्थितींत आपल्याला कठीण जाऊ शकते? पण आपण त्याच्या आज्ञांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे का आहे?

• कोणत्या दोन मार्गांनी आपण इब्री लोकांस ४:१२ हे वचन समजू शकतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[३१ पानांवरील चित्र]

आईवडिलांना खूप दुःख होते